18 February 2019

News Flash

दखल : कथा आणि व्यथा सायकल चोरीची

सायकल चोरी झाल्यानंतर काय होते त्याचा हा प्रातिनिधिक अनूभव.

ठाण्यासारख्या शहरात दुभाजकांना लॉक करून सायकल लावावी लागते आहे.

आशिष आगाशे – response.lokprabha@expressindia.com
सायकल चोरीचे कथानक असलेला ‘सायकल’ हा चित्रपट ४ मे रोजी प्रदर्शित होत आहे. आजच्या शहरी जीवनात सायकल वापरणे कमी झाले असले तरी प्रत्यक्षात सायकल चोरी झाल्यानंतर काय होते त्याचा हा प्रातिनिधिक अनूभव.

स्वच्छ आणि सुंदर होऊ इच्छिणाऱ्या ठाण्यात, मी गेली पाच वर्षं रेल्वे स्टेशन परिसरात सायकल लावण्याकरता झगडतो आहे. खासगी कंत्राटदारांनी चालवलेल्या सरकारी वाहनतळावर सायकल लावू दिली जात नाही. सायकलीला एखाद्या उपद्रवी कीटकाप्रमाणे बाजूला ठेवतात. पसे भरून पाìकग करायची तयारी असतानाही यंत्रणा लक्ष देत नाहीत. परिणामी, माझी सायकल एखाद्या गजाला बांधून ठेवण्याशिवाय पर्याय नसतो. या प्रकारावर ‘लोकप्रभा’ने नोव्हेंबर २०१७ च्या अंकात अशोक खळे यांच्या अपघाती सायकल मृत्यूवरील लेखाच्या निमित्ताने प्रकाशदेखील टाकला होता. एकीकडे ठाण्यात सायकिलगला प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकाच सायकली भाडय़ाने देत असताना रोजच्या वापरातील सायकलिंगसाठी कसलीच सुविधा दिली जात नाही. त्यातूनच उद्भवलेला माझ्या सायकलच्या चोरीचा प्रसंग या निमित्ताने सांगावासा वाटतो.

जगभरात तर सांगितले जातेच, पण भारतातही सायकल गरजेची असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. इयत्ता चौथीचे विद्यार्थीसुद्धा ग्लोबल वॉìमग, सस्टेनेबिलिटी, वाहतूक, शारीरिक कस इत्यादीचे दाखले देत सायकल कशी महत्त्वाची आहे हे सांगतात. मात्र प्रत्यक्षातला अनुभव काही वेगळाच असतो. सरकारी यंत्रणांकडून सायकल हे अत्यंत क्षुद्र वाहन असल्याची जाणीव सतत करून दिली जाते. अशाच एका कटू पण  विलक्षण अनुभवातून महिन्याभरापूर्वी मी जे काही अनुभवले ते या सर्वावर कडी करणारे होते.

मध्यरात्री नोकरीवरून परतून ठाणे स्टेशन गाठले. शिवाजी पथावर सायकल लावलेल्या ठिकाणी गेलो असता, माझी सायकल गायब झालेली होती. माझ्या सायकलपेक्षा किततरी जास्त चांगल्या सायकली तिथे होत्या. मग माझीच सायकल का चोरली असावी? तेथेच असलेल्या एका सफाई कामगाराच्या सल्ल्यावरून नजीकच्या गल्ल्यांमध्ये शोध घेतला. कधी कधी गर्दुल्ले गजासह त्याला लावलेली सायकल काढतात आणि विकतात असे मला कळले. पण मला माझी सायकल सापडली नाही. अखेर पोलिसांमध्ये तक्रार द्यायचे ठरवले. तलावपाळी येथील चत्र नवरात्रासाठी संरक्षण करणारी पोलिसांची गाडी गाठली. त्यातील पोलीस वाहनचालकाने वायरलेसवरून कोणतीशी सायकल मिळाल्याची माहिती सांगितली. मी त्वरित जवळच्या ठाणे नगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. एव्हाना रात्रीचा एक वाजलेला होता.

ठाणे अंमलदाराने संबंधित शिपायाला बोलावले. तो येताच त्याने सगळी हकीगत सांगितली आणि मोबाइलमध्ये एक फोटो दाखवला.

‘‘ही तुझी सायकल आहे का?’’

‘‘हो, माझीच.’’

‘‘तुझीच आहे कशावरून? कारण नुकतेच एका पोराने त्याची असल्याचे सांगून ती नेलीय.’’

ज्या तरुणाने ही सायकल नेली होती, त्याला दोन महिन्यांपूर्वी हरवलेली त्याची सायकल आज  शिवाजी पथावर, दिसली. त्वरित त्याने ठाणे कंट्रोलला फोन करून पोलिसांना पाचारण केले. ते येताच गस्तीवर असलेल्या हवालदारासमोर सायकलीचे कुलूप तोडण्यात आले. दोन तीन ‘खुणा’ सांगितल्यावर त्या हवालदाराने तत्परता दाखवत त्याला ती सायकल घेऊन जाऊ दिली. नशिबाने, त्या मुलाचे नाव आणि मोबाईल क्रमांक आणि सायकलीचा फोटो घेण्यात आला.

एखाद्या चित्रपटाप्रमाणे माझ्यासमोर या गोष्टी उलगडत होत्या. तेथे कार्यरत पोलीस अधिकाऱ्यांकडून माझीच चौकशी सुरू झाली. ऑफेन्स इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स. आणि मी त्यांच्या अपेक्षांना उतरलो. ‘सायकलचे बिल आहे का, सायकल कोणाची आहे?’ इति पोलीस अधिकारी. ‘सायकल माझ्या एका जवळच्या दिवंगत मित्राची आहे. त्याला जाऊन आठ वष्रे झाले. आणि साधारण पाच-सहा वर्ष मी ही त्याची आठवण म्हणून वापरतोय.’ मी उत्तरलो.

सरकारी कामात कागद अति महत्त्वाचा, त्यामुळे माझी केस कमजोर. ‘त्या मुलाकडे बिल आहे. त्याच्या फिर्यादीवर तुम्ही आरोपी ठरता.’ झालेच. माझ्यासारख्या मध्यमवर्गीय, ईएमआयच्या कचाटय़ात अडकलेल्या पामराला मोठे आव्हानच! सायकल जेमतेम एक हजाराची असेल. त्याकरता किती ताणायचे? पण मी परत एकदा फोटो बघितला, लोकेशनची खात्री पटवली आणि पुढे जायचे ठरवले. माझ्याकडे वेगवेगळ्या पद्धतीच्या चार सायकली आहेत, पण ही हिरो हॉक सगळ्यात महत्त्वाची, बहुमूल्य ठेवा. घडलेला प्रकार  अन्याय आहे, झगडायचे ठरवले. माझ्या सायकल पाìकग प्रपंचातील सर्वात इंटरेिस्टग गोष्ट घडत होती.

‘आता रात्रीचे दोन वाजलेत. उद्या सकाळी आठला या. त्या पोरालाही बोलावतो. पण लक्षात असू द्या की त्याची बाजू खरी ठरल्यास तुम्ही आरोपी ठराल.’ पोलिसांचा प्रेमळ निरोप घेऊन निघालो.

माझे नाव, हुद्दा, पत्ता, नंबर इत्यादी नोंदवले गेले एका डायरीत. बाजूलाच त्या मुलाचीही माहिती होती. पहाटे घरी चालत येताना ‘बायसिकल थिव्हज’ या गाजलेल्या इटालियन चित्रपटाची आठवण झाली.

पोलिसांनी सायकलचा एखादा फोटो असल्यास दाखवा, असे सांगितलेले. तसा तो आहे का, हे शोधण्याचे चक्र चालू झाले. पुण्यातील मित्र त्रिलोक खैरनारला झोपेतून उठवले. तो हसायलाच लागला! त्यालाही घडत असलेला प्रकार त्या सिनेमाच्या पटकथेसारखा वाटत होता. माझ्या फोनमधला ‘डेटा’ त्याच्याकडे ठेवलेला आहे. त्रिलोकने हजारो फोटोंपकी दोन काढून दिले. रात्रीच इतर मित्रांनाही आवाहान केले, की चुकून एखादा फोटो असल्यास पाठवा. सफाई कामगाराने सांगितलेल्या गर्दुल्यांची आठवण झाली. मनात विचार आला, सायकल रात्रीच विकली गेली असेल तर?

झोपायला थोडा उशीरच झाला आणि सकाळी नाइलाजाने रिक्षा करून ठाणे नगर पोलीस ठाणे गाठावे लागले. रात्रपाळी संपवून हॅण्डओव्हरच्या तयारीत असलेला वर्ग. कोणतेसे सीसीटीव्ही फुटेज बघताना काही अधिकाऱ्यांनी संवाद साधला. ‘सायकल बेकायदेशीररीत्या लावायची गरजच काय? आपल्या ठाण्यात किती ठिकाणी सायकल स्टॅण्ड तयार झालेत.’ साहेबांनी मौलिक माहिती दिली. ‘साहेब, ते स्टॅण्ड प्रकरण जाहिरातदारांमुळे सुरू आहेत. त्यांच्या सोईप्रमाणे फक्त निवडक मॉलबाहेर ती सोय देण्यात आली आहे. स्टेशन परिसरात काहीच नाहीये उपयोग. मी या अगोदर आयुक्तांना मेल केलेत’ मी माझी बाजू मांडत होतो.

‘हे आम्हाला काय सांगताय? थांबा थोडा वेळ’ इति अधिकारी.

मी जाणीवपूर्वक ‘शांततेत’ होतो, पण मधेच एक उद्रेक झालाच माझा. बहुधा झोपेच्या अभावामुळे असावे, एका अधिकाऱ्याने सायकल जमा करायचा पर्याय सुचवला. कागद महत्त्वाचा आणि दोघांकडेही बिल नसल्यास सायकल जमा करावी, असे सुचवण्यात आले. माझे म्हणणे होते, त्याची सायकल दोन महिन्यांपूर्वी म्हणजे ६० दिवसांपूर्वी गायब झाली आहे, मी ६१व्या दिवसाचा फोटो दाखवला, तर सायकल जमा का करायची? अखेर सव्वानऊ वाजता तो मुलगा सायकल घेऊन आला. पण तेवढय़ात पोलिसांची शिफ्ट बदलली!

सायकलच्या निमित्ताने एका वेगळ्या वेळेच्या पोलीस स्टेशनची नवीन ओळख झाली. कधीतरी घडलेल्या गुन्ह्य़ाच्या तपासाकरता काही शिपाई सीसीटीव्ही फुटेज पाहत होते. तर इतर रात्र पाळीवाले झोप अनावर झाल्याने डोळे चोळत दिवसपाळीच्या साथीदारांची वाट पाहत होते. त्यांच्याचपकी एकजण वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना जीपने घेऊन आला. साहेबांच्या मागोमाग जवळील हॉटेलातील अण्णा डोसा अथवा उत्तपा घेऊन दाखल झाला. साहेबांचा नाश्ता होईपर्यंत बाहेर पोलिसांची परेड अथवा मीटिंग झाली. त्यातील संवाद इतक्या दबक्या स्वरात होता की काही ऐकू आले नाही.

अखेर रात्रपाळीतले अंमलदार आले आणि माझी केस या नवीन साहेबांच्या हाती सुपूर्द करण्यात आली. माझी हेड कॉन्स्टेबलवरून थेट साहाय्यक पोलीस निरीक्षकांकडे ‘बढती’ झाली होती. म्हटलं हे साहेब तरी समजून घेतील आपली बाजू. नवीन साहेबांनी शिफ्ट चालू होताना काय काय करावे लागते याची जाणीव करून दिली मला. रोजच्या डायऱ्या, अहवाल, संकलन, कोर्ट तारखा, आरोपी किती-कोठे-कसे आणि सुट्ट्या असा प्रपंच संपल्यावर माझी उमेद वाढली. साडेनऊ झाले होते, मला नाश्ता आणि ऑफिस दोन्ही खुणावत होते, पण सायकल महत्त्वाची.

तितक्यात नवीन आयकार्डचा नवीन मुद्दा पुढे आला. चिप आणि मॅग्नेटिक पट्टीवाले कार्ड खात्यातर्फे दिले गेलेले, पण त्याची रंगसंगती काही साहेबांना आवडली नव्हती फारशी. बऱ्याच सहकाऱ्यांना अगदी बोलवून-बोलवून नापसंती जाहीर करण्यात आली. असा मूड असताना माझ्या सायकल केसवर सुनावणी सुरू झाली. दोन्ही बाजू ऐकण्यात आल्या. सायकल नेलेला मुलगा पोलीस भरतीसाठी प्रशिक्षण घेत होता आणि एका मॉलमध्ये खासगी शिपाई म्हणून नोकरी करत होता. माझ्या सायकलशी साधम्र्य असलेली त्याची सायकल दोन महिन्यांपूर्वी चोरीला गेलेली. त्याची गरज तीव्र होती.

माझी सायकल बघून त्याने पोलिसांना पाचारण करून, त्यांच्यासमोर कुलूप तोडून सायकल घरी नेली होती. त्याच्याकडेही पावती नव्हती. दोन महिन्यांपूर्वी सायकल चोरीला गेलेली असताना तक्रारही नोंदवलेली नव्हती.

मी पुन्हा ‘६१’व्या दिवसाचा पाढा वाचला. माझी सायकल ओळखण्यासाठी खास खूण म्हणून सायकलला काही विशिष्ट ठिकाणी केलेल्या वेल्डिंगबद्दल सांगितले. अखेर बाब फोटोवर येऊन अडकली. त्रिलोकने पाठवलेला फोटो कधी काढला ते सिद्ध करण्याकरता कॉम्प्युटरची गरज होती, कारण माझ्या फोनवर मी ही सगळी माहिती असलेला ‘मेटा डेटा’ दाखवू शकत नव्हतो. मग माझ्या आय-फोनचादेखील उद्धार झाला. या प्रतिष्ठेच्या पोलीस स्टेशनात इंटरनेट सुविधा नव्हती, हे ऐकून मी थक्क झालो. मी मेलवरून त्यांना फोटो पाठवूनदेखील काही उपयोग नव्हता.

त्यानंतर साहेबांनी मला सायबर कॅफेमध्ये जाऊन तो डेटा आणायला सांगितलं. मोबाइल वापरामुळे स्क्रीनशॉट प्रकार माहीत होता त्यांना. अखेर मीच त्यांना जाणीव करून दिली की फिर्यादीनेच असा डेटा आणताना त्यात काही बदल केले तर? तुम्ही माझ्यावर विश्वास कसा टाकणार? हा मुद्दा त्यांना पटला. साहेब तसे तरुणच वाटत होते. तेवढय़ात त्यांना मागील एका खोलीत इंटरनेट असणारा कॉम्प्युटर असल्याचे लक्षात आले. परत मी आणि तो पोरगा असे मागे गेलो. परत आमचे तोंडी जबाब. ही सायकलची स्टोरी जणू प्रत्येक कर्मचाऱ्यासाठी मनोरंजनाचे साधन झाली होती.  इतके ऐकून अखेर मागच्या कॉम्प्युटरवरचे साहेब बोलले की त्यांच्याकडेही इंटरनेट नाही. दिवसातनं कधीतरी इंटरनेट येते आणि रोजचे रिपोर्ट अपलोड होतात. मी मनोमन डिजिटल इंडियाला अभिवादन केले.

तेवढय़ात आणखीन मोठय़ा साहेबाची राऊंड असल्याचे कळले. आम्ही मागच्या बराकबाहेर तसेच उभे. राऊंडवरच्या साहेबाने कोठडीतून सुटलेल्या आरोपीला विचारावे तशा प्रेमळ स्वरात आम्हा दोघा सायकल दावेकरूंना ‘इथे उभे राहून काय करताय’ असे विचारले. त्यांनादेखील ‘६१ दिवस’ थिअरी पटली, पण कॉम्प्युटर कुठेच नव्हता!

अखेर त्या मुलालाच बहुधा माझी बाजू पटली. मला बाजूला घेऊन तो म्हणाला ‘मला तुमचं पटतंय. पण पोलीस मला त्रास देणार नाहीत, असे काही तरी करून सायकल घेऊन जा’. मी त्याला म्हटले, ‘तू त्यांच्याकडे जाऊन स्पष्टपणे दावा सोड. त्यांना ब्याद टळल्याचा आनंदच होईल.’ तसेच झाले.

अखेरीस साधारण साडेअकरा वाजता सायकल परत मिळाली.

निघताना, मी साहाय्यक पोलीस निरीक्षकांना सर्वसाधारण कार्यपद्धतीबाबत (standard operating protocol) विचारले. मी काय म्हणतो आहे, हे त्यांच्या लक्षात यावे म्हणून त्यांची मोटारसायकल चोरी झाली आणि ती परस्पर कोणाला तरी दिली तर काय वेदना होतील असे विचारले. ‘अहो ती मोटारसायकल आहे, तुम्ही बेकायदेशीर लावलेल्या सायकलशी कुठे तिची तुलना करताय?’ असा त्यांचा प्रतिप्रश्न होता.

मी नवीन कुलूप विकत घेतले आणि नाइलाजास्तव परत तिथेच  सायकल लावायला लागलो. साधारण दोन आठवडय़ांनी पुन्हा रात्रपाळीवर असलेले तेच शिपाई दिसले. ‘काय मिळाली की नाही तुझी सायकल? मला माहितीच होतं की तुला मिळेल ती’. त्यांचे हे वाक्य ऐकून १५ दिवसांपूर्वी त्यांनी बहुधा टिंगल करायला किंवा पोलीस-नागरिक मत्री दृढ करायला त्या मुलाला माझ्या सायकलचे कुलूप उघडून दिले असावे असेच मला आता वाटू लागले आहे.

First Published on May 4, 2018 1:03 am

Web Title: bicycle theft