X

आनंद आणि हुरहुर

रात्री सायकल घेऊन चालताना लाखो तारकांची उधळण पाहिली होती.

ट्रेकर ब्लॉगर

सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2

आठव्या दिवसाच्या अखेरीस गटालूप्स आणि नकिला पासवरील सायकिलगचा आनंद घेत सणसणीत उतारावरून व्हिस्की नाल्याच्या ढाब्यांवर पोहोचता पोहोचता सायंकाळ झाली होती. एका ढाब्याच्या बाजूलाच छोटासा तंबू होता, तो आम्ही सहाजणांसाठी घेतला, सामान आत टाकले आणि बाहेर येऊन बसलो. सुमीतने आम्हाला आधीच सांगितले होते, येथे जेवण झाल्याशिवाय झोपायचे नाही. त्याचे कारण होते व्हिस्की नाल्याची रचना. चारही बाजूंनी डोंगराने वेढलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १५ हजार ४०० फूट उंचीवर आहे. त्यातच पुन्हा खोलगट जागेमुळे येथे प्राणवायूची आणखीनच कमतरता. त्यामुळे झोपायचे नाही, अ‍ॅक्टिव्ह राहायचे. सुदैवाने आम्ही ज्या ढाब्यात उतरलो होतो तेथील मालक-मालकीण एकदम मस्त हौशी कलाकार होते. चहा आणि किरकोळ खाणंपिणं होईतो सात वाजले.

एकदोन मिनिटातच आमच्या ढाबा मालकाने ट्रान्झिस्टर आणून टेबलावर ठेवला. सगळे अगदी कान देऊन ऐकायला लागले. आकाशवाणीचे समाचार सुरू झाले. माझे मन क्षणात बालपणात गेले. सात ते सव्वासात िहदी आणि मग प्रादेशिक बातम्या, मग शेतीविषयक कार्यक्रम, तर विविध भारतीवर राष्ट्रीय बातम्या आणि मग फौजी भाईयो के मनपसंद गीतों का कार्यक्रम  लागायचा. हा कार्यक्रम फौजी भाई कसे ऐकत असतील असं चित्र त्यावेळी मनातल्या मनात रेखाटायचो.  तेव्हा रेडिओ हेच करमणुकीचे एकमेव साधन होते. आणि आज व्हिस्की नाल्यातील ज्येष्ठ मंडळी बातम्या ऐकण्यासाठी एकत्र आली होती. त्यांच्याकडे ना स्मार्ट फोन होते, ना फोनला रेंज होती. इथे आजही रेडिओ हेच करमणुकीचे साधन.

येथील मुक्कामी अतिउंचावर होणारा त्रास थोडाफार जाणवू शकतो. पण थंडी आणि वाऱ्याचा त्रास तुलनेत कमी आहे.  इथे ढाब्यावर शाकाहारी मोमो आणि थेंतुक हा नवीन पदार्थ चाखायला मिळाला.  पाण्यामध्ये बऱ्याचशा भाज्या टाकून सूप केले होते. मग कणीक आणि मद्याची मोठी पोळी लाटली होती. तिच्या अखंड लांबलचक पट्टय़ा कापून त्या सूपमध्ये सोडल्या होत्या. ते पुन्हा उकळवले होते. चांगले मोठा वाडगाभर गरमागरम थेंतुक चापल्यावर पोट अगदी तुडुंब भरते.

दुसऱ्या दिवशी व्हिस्की नाल्याहून निघताना सुमीत सर्वात आधी निघाला कारण तो थेट लेहला जाणार होता, तेदेखील एका दिवसात (१०० किमी). हेच अंतर आम्ही अडीच-तीन दिवसांत कापणार होतो. यापूर्वी त्याने मनाली ते व्हिस्की नाला अंतर २८ तासात कापले होते, आता त्याला व्हिस्की नाला ते लेह १२ तासात पोहोचायचे होते. त्याच्या एका भावी उपक्रमाचा सराव म्हणून. आम्ही आता नवखेच मागे उरलो. पण पुढील दोन दिवसांची वाट एकदम सोप्पी होती. सुमीतच्या मते तर आमची पिकनिकच होती. आणि ते खरेच होते. व्हिस्की नाला ते चांगलांग ला ही पाच किमीची डोंगरचढाई पूर्ण केल्यावर पलीकडे पांगपर्यंत (२४ किमी) दणदणीत उतार होता. तर नंतरच्या दिवशी पांग ते मोरे प्लेनची सुरुवात हे पाच किमी कापल्यावर पुढे सरळसोट आडवा पट्टा ४३ किमीचा. त्यामुळे व्हिस्की नाल्याहून चांगलांग ला गाठायला फक्त दीड एक तास खर्ची पडला असेल, तेवढाच काय तो पेडिलगचा भाग. पुढे थेट उतार. पण त्यात एकच त्रुटी होती, ती म्हणजे अतिशय कच्चा असा मातीचाच रस्ता. त्यामुळे धुळीने जाम वात आणला. त्यातच लष्कराचा भला मोठा ताफा वाटेत आला. किमान शे-दिडशे गाडय़ा होत्या त्यांच्या. त्या गेल्यावर डोंगर उतरून जराशा सपाटीवर येईपर्यंत आमचे चेहरे आणि सायकली पूर्णपणे मातीने भरल्या होत्या. अगदी सहज अक्षर गिरवता येतील असा मातीचा थर होता.

आता दोन्ही बाजूंनी डोंगर, मध्ये एक छोटासा पाण्याचा प्रवाह आणि मध्ये रस्ता असे सुंदर दृश्य होते. पण हे डोंगर म्हणजे एकदम भुसभुशीत.  नुसती माती ओतली आहे असे वाटणारे. तर काहींचे खडक अजूनही शाबूत, पण तेदेखील विरत चाललेले. थोडय़ाच अंतरावर कांगला जल हे ठिकाण येते. येथून दूरवर आणि खाली पाहताना मात्र तेथील डोंगरांत तयार झालेले ते नानाविध आकार पाहून आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. वाऱ्या वादळाने झीज होऊन तयार झालेली मातीची कमान, मातीच्या लांबलचक डोंगरात अजूनही शाबूत असलेल्या खडकांवर वाळूमुळे तयार झालेले सुळके अनेक आकर्षक आकार हे सारेच पाहात राहण्यासारखे होते. तीनचारच्या आसपास आम्ही पांगला पोहचलो.

पांग बरेच मोठे आहे. हिमाचल परिवहनची बस येथे एक मुक्काम करून लेहला जाते. तसेच इतरही पर्यटक येथे मुक्कामी असतात. ३०-४० ढाबे कम पक्की हॉटेल्स येथे आहेत, पण गाव नाही. येथेच सेनादलाचे एक ट्रान्झिट चेक पोस्टदेखील आहेत. जगातील सर्वात उंचावरचे (१५ हजार २८० फूट) ट्रान्झिट चेक पोस्ट म्हणून ते ओळखले जाते. विशेष म्हणजे तेथून सायंकाळी सहा ते सात या वेळेत सर्वसामान्य नागरिकांना सॅटेलाइट फोन सुविधेचा वापर करता येतो. (एका मिनिटाला दोन रुपये). पांगला आम्ही ज्या ढाब्यात उतरलो होतो त्याचे मालक मालकीणही एकदम गप्पिष्ट. येथे थुक्पा खायला मिळाला.  येथे राहण्यासाठी एक छोटीशी खोलीच मिळाली. दुसरा दिवस निवांतच होता. त्यामुळे केलेले सर्वात पहिले काम म्हणजे सायकलवर खच्चून पाणी ओतून जमेल तेवढी माती काढून टाकली.

सकाळी मेन्यू कार्डावर पॅन केक दिसला. सहजच विचारले तर त्या ढाबा मालकाने अंडे आणि काही तरी एकदोन पदार्थ एकत्र केले आणि पाच-दहा मिनिटांत मस्तपकी पॅनकेक समोर आला. प्रकार भन्नाट होता. त्या ढाबा मालक-मालकिणीचा फोटो काढल्यावर मालकिणीने फोटो पाहिला आणि खूश होऊन पाल्रेच्या गोळ्यांची बरणीच पुढे केली, घे हव्या तेवढय़ा. हा अनुभव वेगळाच होता. त्यांचा निरोप घेऊन मोरे प्लेनच्या सुरुवातीसाठीचा पाच किमीचा चढ चढायला सुरुवात केली. आदल्या दिवशी ती लांबलचक वळणं पाहून जरा कंटाळाच आला होता, पण त्यामानाने सहजसोप्पा चढ होता. दीड तासातच वर पोहोचलो. आता पुढे फक्त ४३ किमीचा आडवा पट्टा.

दम खाऊन आम्ही तिघेही मोरे प्लेनला लागलो. इतके दिवस केवळ पहिल्याच गिअरवर चालवलेली सायकल आता वरच्या गिअरवर पळवता येणार होती. पण विचार केला, जीव काढून पळवून आपण जाणार तरी कुठे आहोत. मुक्काम डेबिरगलाच करायचा होता. त्याच दिवशी त्यापुढे जाणे शक्य नव्हते. मग आरामात या लांबलचक पसरलेल्या रस्त्याचा आनंद घेऊया. पण येथे एक मजा होते. पूर्वीच्या चित्रपटात नायक-नायकिणीचे गाडीतील प्रवासाचे दृश्य स्टुडिओतच करामत करून चित्रित केले जायचे. गाडीच्या मागील पडद्यावर बाह्य़स्थळाची, रस्त्याची पळती दृश्यं दिसायची आणि गाडी आहे तेथेच असायची. मोरे प्लेनवर नेमकी उलट स्थिती असते. येथे सायकल पळत असते; पण समोरचा लॅण्डस्केप काही केल्या बदलत नाही. दहा-पंधरा किमीनंतर एखादं मोठं वळण गेलं की तो बदलतो, परत पुढे तेवढेच अंतर आहे तसाच राहतो. कधी कधी हे कंटाळवाणे वाटू लागते. पण या दोन्ही बाजूस पसरलेल्या पठार आणि डोंगरांच्या कुशीत अनेक गोष्टी दडल्या आहेत. त्यापकीच एक म्हणजे मेंढपाळ.

मोरे प्लेनवरून जाताना डावीकडे खुरटय़ा झुडपांची बरीच हिरवळ दिसत होती. १५-२० किमीनंतर त्याच दिशेला बरीच हालचाल जाणवत होती. आधी कळलेच नाही, पण शंभर एक बकऱ्या चरत होत्या. बऱ्याचशा तेथील मातीच्या रंगात मिसळून गेल्या होत्या. पण इतर काळ्या, तपकिरी असल्याने लक्षात आले. लांबवर कुठेही वस्ती दिसत नव्हती, ना काही खुणा. प्रश्न पडले की हे आले कुठून, चालले कुठे, राहणार कुठे, पाणी कुठे आहे. चार-पाच किमीनंतर या सर्व प्रश्नांची उत्तर मिळाली. एका डोंगराच्या पल्याड लांबवर सुमारे २०-२५ मोठे पांढरे तंबू दिसत होते. तिथे जाण्यासाठी कच्चा रस्तादेखील होता आणि बाहेर काही गाडय़ादेखील लावल्या होत्या.  कल्पेशजींनी सांगितले, हे सर्व मेंढपाळ आहेत. शेकडय़ांनी मेंढय़ा घेऊन ते या मोसमात येथे येतात. खुरटय़ा हिरवळीवर मेंढय़ा चरतात, जवळच असलेल्या नदीचं पाणी पितात. चांगला पसा मिळवून देणारा हा उद्योग. आणि थोडे पुढे गेल्यावर दोनतीनशे मेढय़ांचे भलेमोठे कळपच पाण्यावर जाताना दिसले.

या भागात बाजूच्या डोंगरापलीकडे काही गावंदेखील आहेत. या मोसमात तेथील स्थानिक गावाकडे येत असतात. मोरे प्लेनवर असाच एक गावकरी भेटला. लेहला जाण्यासाठी गाडीची वाट पाहत होता. त्याचे गाव कुठे आहे विचारले तर त्याने डोंगरात खोपच्याकडे बोट दाखवले, तिकडे त्याचे नोरचू म्हणून गाव होते. दारच्चा सोडल्यानंतर हे असे पहिलेच गाव कळले होते. मोरे प्लेन अफाट आहे. पण तेथे अशा अनेक बाबी आहेत. तेथील लोकांचे जनजीवन, त्यांचे थंडीतले स्थलांतर हे सारे कसे होत असेल याची उत्सुकता निर्माण झाली. त्याच तंद्रीत सायकल दामटवू लागलो. वाटेत सोबत आणलेले जेवण केले आणि आमच्या गाडीच्या आड चक्क रस्त्यावरच ताणून पण दिली. दुपारचा एकच वाजला होता, कितीही टाइमपास केला तरी तीनचापर्यंत डेबिरग गाठता येणार होते.

पण हे असं अगदी सहज झालं तर तो हिमालय कसला. शेवटचे दहा किमी असताना त्याने रंग दाखवायला सुरुवात केली. समोर दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर पाऊस जमा झाला होता. जोडीला वाऱ्याचा वेगदेखील वाढला होता. आणि परिणामी सायकलचा वेग मंदावला. त्यामुळे एक तासाचे अंतर दोन तासांत कापून आम्ही डेबिरगला पोहचलो. ताकलांगलाच्या खाली असलेले हे ठिकाण. नेहमीप्रमाणे गाव नाहीच, केवळ ढाबेच. त्यातही सुरुवातीला तंबूवाले आणि पुढे कच्च्यापक्क्या बांधकामाचे. पण सगळा भाग पूर्ण सपाट आणि धुळीचे प्रचंड साम्राज्य. आधी वाटले की येथे सेनादलाचे युद्ध सराव सुरू असतात, अगदी रणगाडेदेखील त्यात वापरले जातात, त्यामुळेच धूळ खूप उडत असेल. पण थोडय़ाच वेळात एका जोरदार वावटळीने ही शंका दूर केली. आता ढाब्यात जाणे श्रेयस्कर होते.

याच ढाब्यावर आम्हाला तिशीच्या आसपासचे एक फ्रेंच ट्रेकर जोडपे भेटले. दोघेही पहिल्यांदाच भारतात आले होते. लेहमधून एक नकाशा घेऊन गेले सात दिवस ते दोघेच डोंगरातून भटकत होते. सामान पाठीवर, सायंकाळी मुक्कामासाठी तंबू लावायचा, सोबतचे पदार्थ खायचे आणि विश्रांती घ्यायची. परत सकाळी डोंगर भटकायला सुरू. त्यांची ही पद्धत डोंगरभटक्यांच्या आदिम प्रेरणेची आठवण करून देणारी होती.  आपल्याकडे यापेक्षा गाइड, भारवाहक असा सारा लवाजमा घेऊन हिमालयातील भटकंती करणे अधिक लोकप्रिय आहे. आणि हे दोघे फ्रान्समधून येऊन असे भटकत होते. त्यांना समजणाऱ्या आणि मला बोलता येणाऱ्या इंग्रजीत आमचा संवाद झाला. चहा आणि पाल्रेजी या ट्रेकर्सच्या खास मेन्यूचा समाचार घेऊन त्यांनी सोमोरीरीला जाण्यासाठी आमचा निरोप घेतला.

दुसऱ्या दिवशी ताकलांग ला नावाचं महात्रासदायी प्रकरण चढायचे होते. उंचीबाबत हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे मोटरेबेल रस्ता असणारे ठिकाण. पण त्याच्या उंचीपेक्षा त्रास होतो तो तेथपर्यंत पोहचण्यासाठी असणाऱ्या लांबलचक वळणांचा. डेबिरग सोडल्यावर ताकलांग ला समोर दिसत राहतो. पण त्याच्यापर्यंत पोहोचण्यासाठी इतकी वळणं घेत तो एकेक डोंगराच्या आतबाहेर करतो की खरंच कंटाळा येतो. हे वर्णन आधी ऐकले होते, त्यामुळे मानसिक तयारी झाली होती. आणि दुसऱ्या दिवशी या सर्वाचे अगदी थेट प्रत्यंतरच आले. त्यातच येथील मलाचे दगड नव्याने रंगवायला घेतल्यामुळे आपण नेमके किती अंतर आलो, किती उरलंय हे कळत नाही. शेवटच्या सहा किमीवर दगड पुन्हा सुरू होतात. पण मी आणि सचिन तीन किमीवर असतानाच पावसाने ताकलांग लावर काळ्या ढगांनी फेर धरायला सुरुवात केली होती. वारा वाढला, पावसाचे थेंबदेखील जाणवू लागले. सुमीत आणि समिधा अध्र्या तासापूर्वीच माथ्यावर पोहोचले होते. कल्पेशजी गाडी घेऊन मागे आले होते. आम्ही पाऊस थांबेपर्यंत गाडीने वर जायचे, आणि पाऊस थांबल्यावर मागे येऊन परत सायकिलग करायचे असा विचार होता. पण आम्ही चांगलेच दमलो होतो. त्यामुळे पाऊस थांबल्यावर हा चढ चढूच याची खात्री नव्हती. शेवटी सेनादलाच्या वाहन ताफ्याला हात करायला सुरुवात केली. शेवटी एका तरुण कॅप्टनची जिप्सी थांबली. त्यांनी आम्हाला ताकलांग लाच्या माथ्यावर सोडले.

येथे मात्र धमाल होती. पर्यटनाच्या मोसमात येथे एक ढाबा लागतो. म्हणजे गोलाकार तंबू. समुद्रसपाटीपासून उंची १७,५८२ फूट, म्हणजे जवळपास एव्हरेस्टच्या पायथ्याइतकी. तेथे हा ढाबेवाला कधी एकटाच तर कधी वडिलांबरोबर राहतो. ताकलांग ला पार करणारे सर्वच पर्यटक, बायकर्स येथे थांबतात. त्यांना चहा, मॅगी, ऑम्लेट, बिस्किट तिथे मिळतं. हा ढाबावाला मुलगा प्रचंड उत्साही होता. तो सतत काही तरी मस्ती मजा, नकला करत होता. या अतिउंचावरील वातावरणाचा कसलाही परिणाम होऊ नये यासाठी त्याची ही सततची धावपळ सुरू होती. त्याच्यामुळे आम्हीदेखील इतक्या उंचीवर मस्त हसतखेळत होतो. पावसाबरोबरच बायकर्सची गर्दी वाढू लागली. तंबूच्या खिडक्यांतून पाऊस आत येऊ पाहत होता. त्यातच त्याने हिवाळ्यात खोलीमध्ये ऊब टिकवून ठेवणारी बुखारी पेटवली. मग सारेच जण त्या ऊबेच्या भोवती उभे राहू लागले. आम्ही चहा आणि मॅगी चापत होतो. चार-पाच कप चहा झाला होता एव्हाना. तीन तासांनी दुपारी तीनच्या आसपास पाऊस थांबला.

आता रूमसेला जाऊन मुक्काम करण्याशिवाय पर्याय नव्हता. पाऊस नसता तर आम्ही आणखी पुढे जाणार होतो. पण आज पावसाने आमची चांगलीच परीक्षा बघायचे ठरवले होते. ताकलांग ला सोडल्यावर पुढे  २० किमीचा एक-दोन डोंगर पार करून जाणारा उतार आणि मग पुढे परत आडवा उतार. पण पाच एक किमी गेल्यावर पुन्हा पाऊस सुरू झाला. आता आम्हाला एकच आसरा होता, तो म्हणजे अंडरपास. नाले-ओढय़ांसाठी घाटात बांधलेली ही ठिकाणं. अशाच एका अंडरपासमध्ये आम्हाला जावे लागले. तेथे अर्धा तास थांबून पुन्हा उतरायला पुन्हा सुरुवात केली. पायथ्याला पोहोचलो, पुढचे दहा किमी बाकी असताना पावसाने आम्हाला चांगलेच गाठले. रूमसे गाठेपर्यंत जॅकेट वगरे घालूनदेखील चांगलेच भिजलो होतो.

रूमसेला प्रशस्त होम स्टे मिळाला. उत्तम जेवण झालं. दुसऱ्या दिवशी भरपूर अंतर कापायचे होते. ७० किमी. उपशीपर्यंत २० किमी उतारच होता. आणि दोन्ही बाजूंनी डोंगर असलेली वाट. वाटेत छोटीमोठी गावंदेखील. या रस्त्यावर डोंगराचे इतके मस्त आकार आहेत, की कधी कधी ग्रॅण्ड कॅन्यनच्या मधून जातोय असेच वाटत होते. (याला सुमीतने दुजोरा दिला, कारण त्याने तिकडे सायकल चालवली होती.) उपशीला मात्र एकदम शहरात आल्यासारखेच वाटले. कारण जाहिरातींनी रंगवलेले दुकानांचे फलक, पर्यटकांची वर्दळ आणि हॉटेल्सची गर्दी. येथे सिंधू ओलांडावी लागते. उपशीला चहा घेऊन आम्ही पुढे निघालो. आता चढ उताराचा रस्ता सुरू झाला होता. पण त्याचा फारसा त्रास नव्हता. वाटेत लष्कराचे त्रिशूल नावाचे भले मोठे युनिट आहे. जवळपास दहाएक किमी दोन्ही बाजूंना केवळ लष्करच असते. डोंगर भागातील सर्व प्रकारच्या लष्करी हालचालींचे प्रशिक्षण, सराव या ठिकाणी होत असल्याचे तेथील विविध फलकांवरून जाणवले. पुढे कारूला शहरी हॉटेलात मिळणारे पदार्थ मिळाले. पुढे लेहपर्यंतचा रस्ता फारसा त्रासदायक नव्हता. काही ठिकाणी तर अलिबाग, चौलच्या रस्त्याचा भास होत होता. आता वाटेत मोनेस्ट्री दिसू लागल्या. गावंही बरीच होती. रहदारी होती, पण तिचा सायकिलगला त्रास होत नव्हता. वाटेत एके ठिकाणी सिंधू दर्शन असा दगड दिसला. पण त्या बाजूने चक्क एक छोटा नाला वाहत होता. अखेरीस आम्ही चोगलस्मारला पोहचलो. लेह अजून १२ किमीवर होते. पण आता आपण एका प्रसिद्ध पर्यटन स्थळी जात आहोत याची जाणीव झाली, त्याचे कारण म्हणजे ट्रॅफिक जाम. त्यातून आरामात वाट काढत आम्ही निघालो. येथून पुढे सगळा चढच आहे. त्यामुळे सावकाश निघालो. लेह जिल्ह्य़ाचे ठिकाण असल्यामुळे बरेच मोठे आहे. आणि नेहमीप्रमाणेच आजूबाजूला पसरले आहे. त्यातच येथे अनेक सरकारी मध्यवर्ती कार्यालयं, आयटीबीपी आणि बीआरओची केंद्रीय मुख्यालयंदेखील आहेत. हे सर्व पार करून लेहच्या मनाली चौकात पोहोचेपर्यंत चार वाजले होते. पण आम्हाला अजून थोडे पुढे चढ चढून जायचे होते. कारण लेहची पूर्वापार वेस पुढे होती. सध्या ती लेह गेट म्हणून ओळखली जाते. १५-२० मिनिटात लेह गेटला पोहोचलो.

अकरा दिवस सुरू असलेल्या सायकिलगचे हे शेवटचे ठिकाण होते. अकरा दिवसांतील अनेक प्रसंग डोळ्यांसमोर येत होते. चढावर अनेकदा दमलो होतो, कधी सुसाट उताराची धमाल अनुभवली होती, रात्री सायकल घेऊन चालताना लाखो तारकांची उधळण पाहिली होती, ढाब्यावरील मुक्कामाची मजा घेतली होती, त्या रखरखाटातून प्रवास करतानादेखील डोंगरांच्या भव्यतेने दडपून गेलो होतो. खूप काही नव्यानेच अनुभवलं होतं. वेळ आणि अंतराचे गणित जुळवले होते, पण उगाच शरीराची परीक्षा घेतली नव्हती. त्यामुळे ठरवलेल्या दिवसांपेक्षा दोन दिवस अधिक लागले होते, पण त्याचे काही वाईट वाटत नव्हते.

दुसऱ्या दिवशी सकाळच्याच विमानाचे तिकीट असल्याने, खारदुंग ला करणे शक्य नव्हते. अर्थातच पुढच्या वर्षी परत इकडे येणे क्रमप्राप्त होतेच, आणि तसेही वाटेतील काही आवडलेल्या ठिकाणी पुन्हा सायकल चालवायची होती. त्याच मनसुब्यात लेहचा निरोप घेतला.

First Published on: September 7, 2018 1:02 am