सुनिता कुलकर्णी

विषयांमधील वैविध्य, भरपूर पर्याय, दर्जेदार आशय यामुळे प्रेक्षकांना ओटीटी प्लॅटफॉर्म जवळचा वाटू लागल्यामुळे आता बड्या बड्या सिताऱ्यांनादेखील ७० एमएमच्या मोठ्या पडद्यापेक्षा प्रेक्षकांचा हातातील मोबाईल आणि घराघरातला टीव्ही स्क्रिन हवाहवासा वाटू लागला आहे.

सैफ अली खान, मनोज वाजपेयी, नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्यासारख्या अभिनेत्यांनी काळाची पावलं ओळखून या आधीच ओटीटी प्लॅटफॉर्म जवळ केला होता. रसिकांच्या तिकडे वळणाऱ्या पावलांचा वेध घेत सुश्मिता सेन, अभिषेक बच्चन यांच्यासारख्या बड्या सिताऱ्यांनीही आता ओटीटीची वाट चोखाळायला सुरुवात केली आहे.

जून महिन्याच्या अखेरीला सुश्मिता सेनची ‘आर्या’ ही वेबसिरीज डिस्ने हॉटस्टारवर प्रदर्शित झाली. सुश्मितासारख्या चांगल्या अभिनेत्रीने केलेल्या आणि पारंपरिक टीव्हीवरील सास-बहू मालिकांच्या रतीबापुढे अर्थातच दर्जेदार असलेल्या या वेबमालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसादही मिळाला. राजस्थानमध्ये असलेलं अमली पदार्थांचा व्यापार करणाऱ्यांचं जाळं आणि त्याच्याशी अप्रत्यक्ष संबंधित असलेली एक गृहिणी थेट त्या जाळ्याच्या क्रेंद्रस्थानी जाऊन पोहोचते अशी क्राइम थ्रीलर जॉनरची ही वेबसीरिज प्रेक्षकांना खिळवून ठेवते.

सुश्मितापाठोपाठ आता अभिषेक बच्चनचं वेबविश्वात दमदार आगमत होत आहे. ‘ब्रीद इनटू द शॅडो’ या सायकॉलॉजिकल थ्रीलर या जॉनरच्या त्याच्या वेबसिरीजचे प्रोमो प्राईम व्हिडिओवर सुरू झाले असून १० जुलै रोजी ती प्रदर्शित होणार आहे.

प्राइमवरच ‘बंदिश बॅण्डिट’ नावाची संगीतमय वेबसीरिज प्रदर्शित होणार असून त्यात प्रमुख भूमिकेत नसरुद्दीन शहा आहेत अशीही चर्चा आहे. तिचे बाकी तपशील अजून समजलेले नाहीत. ‘मेंटलहूड’ या अल्टबालाजीच्या वेबमालिकेतून करिष्मा कपूरने याआधीच ओटीटी प्लॅटफ़र्मवर पदार्पण केलं असून आता या वेबमालिकेचा दुसरा सीझन येऊ घातला आहे.

नेटफ्लिक्सवर मे महिन्यात प्रदर्शित झालेल्या ‘मिसेस सिरियल किलर’ या सिनेमातून जॅकलीन फर्नांडिसनेही ओटीटीच्या विश्वात प्रवेश केला आहे. त्याशिवाय इमरान हाश्मी, हुमा कुरेशी, राधिका आपटे यांनीदेखील याआधीच ओटीटीची वाट धरली आहे.

थोडक्यात सांगायचं तर जिथे ‘स्टार तिथे फॅन’ असंच नेहमी असतं असं नाही तर मनोरंजनाच्या दुनियेची वाट जिथे ‘फॅन तिथे स्टार’ अशीही असू शकते.