महाराष्ट्राचा ‘बायो’डेटा
पक्षीवैभव
महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपैकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. उडत्या पक्ष्यांचा धावा आपण आता तरी ऐकायलाच हवा.

भौगोलिक स्थान आणि विविध प्रकारच्या अधिवासांची उपलब्धता यामुळे महाराष्ट्रात पक्ष्यांचे वैविध्य आढळून येते. १९८१ साली सर्वप्रथम हुमायून अब्दुलअलींनी महाराष्ट्रातील पक्ष्यांची सूची बनविली. त्या यादीत ५४० प्रजातींचे पक्षी महाराष्ट्रात आढळत असल्याचा उल्लेख आहे.

Nandurbar, Heena Gavit,
नंदुरबारमध्ये डॉ. हिना गावित यांच्यासमोर स्वपक्षीय, मित्रपक्षांच्या नाराजीचे आव्हान
Ananta joshi cap collector
गोष्ट असामान्यांची Video: ३५००पेक्षा जास्त भन्नाट टोप्यांचा खजिना जपणारे अनंत जोशी
Birds mumbai, Birds suffer from heat,
मुंबई : वाढत्या उष्म्याचा पक्ष्यांना त्रास, १६ दिवसांमध्ये १०० हून अधिक पक्षी व प्राणी रुग्णालयात दाखल
vasai crime news, sword reveals 3 years ago murder marathi news
एका तलवारीने उघडकीस आणली ३ वर्षांपूर्वीची हत्या, अन्य दोघांच्या हत्येचा कटही उघडकीस

काही वर्षांपूर्वी आनंद प्रसाद यांनी संकलित केलेली पश्चिम महाराष्ट्रातील पक्ष्यांची सूची बीएनएचएसद्वारा प्रकाशित केली गेली. त्यात ४५० पक्षी प्रजातींची माहिती देण्यात आली आहे. नंतर त्यात पक्ष्यांची भर पडत गेली. २०१६ पर्यंत ही सूची ५८० प्रजातींपर्यंत पोहचली होती. आता वाढलेल्या पक्षीमित्रांच्या संख्येमुळे व चांगल्या प्रतीच्या छायाचित्रण सामुग्रीमुळे पक्षीसूची अजूनही वाढतेच आहे.

इंग्रज अधिकारी व पक्षी अभ्यासक डी. अब्रू यांनी सी. पी. अ‍ॅण्ड बेरार अर्थात आताचा मध्य प्रदेश व विदर्भ प्रांताची इत्थंभूत पक्षीसूची इ. स. १९१२ मध्ये व नंतर १९३५ मध्ये प्रकाशित केली होती. दुर्दैवाने त्यापकी जेर्डनचा धाविक (जेर्डन्स कोर्सर) कुणालाही दिसू शकला नाही आणि सायबेरियन क्रौंच भारतातून नामशेष झाला. विदर्भातील पक्ष्यांची अद्ययावत सूची डॉ. अनिल िपपळापुरे यांनी प्रकाशित केली. महाराष्ट्रातील पक्षीशास्त्राचा इतिहास बराच प्रदीर्घ असला तरीही पक्षीशास्त्र खऱ्या अर्थाने आता कुठे भरारी घेऊ लागले आहे. पिवळा धोबी (वेस्टर्न यलो वागटेल) या पक्ष्याचे मोटॅकिला फ्लावा बीमा हे शास्त्रीय नाव पश्चिम महाराष्ट्रातील एक महत्त्वाची नदी असलेल्या भीमा नदीवरून पडले आहे, हे अनेक जणांना माहीत नसेल. १८३२ मध्ये पक्षीशास्त्रज्ञ साईक्स यांना या धोबी पक्ष्याचा नमुना भीमा नदीच्या पात्रात मिळाला होता, त्यावरून त्यांनी हे नाव ठेवले होते.

विविध अधिवास :

महाराष्ट्राच्या भौगोलिक रचनेचा विचार केला असता अधिवासाचे वैविध्य दिसून येते. पश्चिमेला असलेली सह्यद्री पर्वतशृंखला, सह्यद्री व अरबी समुद्राच्या मध्ये असलेली कोकणची किनारपट्टी, महाराष्ट्राच्या उत्तरेला असलेल्या सातपुडय़ाची पर्वतशृंखला, खाली पसरलेला सपाटीचा भूप्रदेश म्हणजे दख्खनचे पठार आणि पूर्व विदर्भातील पर्वतरांगा (भामरागड, चिरोळी, गायखुरी) ठळकपणे सांगता येतात. या सर्व अधिवासांची जंगलांची व हवामानाची वेगळी अशी वैशिष्टय़े असून त्याप्रमाणे त्या त्या विभागातील जैववैविध्य कमी-अधिक आहे.

सह्यद्री पर्वतशृंखला :

सह्यद्रीमध्ये दक्षिणेला (जि. सिंधुदुर्ग) सर्वात अधिक जैववैविध्य आढळून येते. तेथील जंगल सदाहरित असून पावसाचे प्रमाण इतर ठिकाणांपेक्षा अधिक आहे. सह्यद्रीमधील अनेक प्रदेशनिष्ठ (एंडेमिक) पक्षीप्रजाती या प्रदेशात आढळतात. त्यामध्ये निलगिरी रानपारवा (निलगिरी वूडपिजन), मलबार पोपट, मलबार राखी धनेश (मलबार ग्रे हॉर्नबिल), पांढऱ्या पोटाचा निळा माशिमार, तांबूस सातभाई, रुंद-शेपटीचा गवती वटवटय़ा (ब्रॉड-टेल्ड ग्रासबर्ड) तसेच छोटा िशजीर हे होय. महाराष्ट्रातील उत्तर सह्यद्रीच्या प्रदेशात विगोरचा िशजीर (विगोर्स सनबर्ड) ही केवळ एकच पक्षी प्रजाती प्रदेशनिष्ठ आहे.

सातपुडा पर्वतशृंखला :

धुळे नंदुरबारपासून पूर्वेला विदर्भापर्यंत (खरे तर मध्य प्रदेशापर्यंत) पसरलेली सातपुडा पर्वतशृंखला मध्य भारतातील महत्त्वपूर्ण वन्यजीव अधिवास आहे. सातपुडय़ाच्या जंगलांमध्ये ४०० हून अधिक प्रजातींची नोंद झालेली आहे. पद्धतशीर नोंदी उपलब्ध असलेल्या मेळघाटातच ३०० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींची नोंद झालेली आहे. सातपुडय़ात केवळ रानिपगळा (फॉरेस्ट आऊलेट) ही एकच पक्षी प्रजाती प्रदेशनिष्ठ असून त्याची आता पश्चिमेला असलेल्या तानसा अभयारण्यात (जि. ठाणे) सुद्धा नोंद करण्यात आली आहे.

दख्खनचे पठार :

सह्यद्रीच्या पश्चिमेला आणि सातपुडय़ाच्या दक्षिणेला असलेला कमी पावसाचा पठारी  प्रदेश म्हणजे  दख्खनचे पठार होय. या प्रदेशात गवताळ माळरानांसोबतच खुरटी झुडपी जंगलेसुद्धा आहेत. महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात जर कुठला अधिवास अतिशय जलद गतीने संपवला जात असेल तर तो माळराने, गवताळ कुरणे होय. अशा जागांना पडीक जमीन, बंजर, अथवा गायरान संबोधले जाते आणि निरुपयोगी समजले जाते. माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) आणि तणमोर (लेसर फ्लोरिकन) या माळरानावरील अधिवासातील महत्त्वाच्या प्रजाती असून त्यापैकी माळढोक महाराष्ट्रात शेवटच्या घटका मोजतो आहे. माळढोकांच्या संवर्धनासाठी निर्माण केले गेलेले सोलापूर-नगर जिल्ह्यतील विस्तृत माळढोक अभयारण्य त्याचा ऱ्हास थोपवू शकलेले नाही.

पूर्व  विदर्भ :

पूर्व विदर्भातील (चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली) भूप्रदेश मोठय़ा प्रमाणात जंगलांनी व्यापलेला आहे. या प्रदेशात पठारी प्रदेशापेक्षा जास्त पाऊस पडतो तसेच भातशेती केली जाते. त्यामुळे इथली जंगलं (ताडोबा, नवेगाव, नागझिरा) समृद्ध तर आहेतच. सोबतच या भागात असलेले हजारो छोटे तलाव, बोडय़ा पाणपक्ष्यांना आकर्षति करतात. हा प्रदेश महाराष्ट्रातील सारस क्रौचांचे शेवटचे वस्तीस्थान असून भंडारा-गोंदिया जिल्ह्य़ात अंदाजे ६० सारस असावेत असे मानले जाते. सुदैवाने या प्रदेशातील पक्षीमित्र करीत असलेल्या कार्यामुळे आणि स्थानिकांच्या शेतकऱ्यांच्या ग्रामस्थांच्या सहकार्याने सारस टिकून आहे. गडचिरोली जिल्ह्य़ातील सिरोंचा या गोदावरीकाठच्या गावाजवळ जेर्डनच्या धाविकाची (जेर्डन्स कोर्सर) शेवटची नोंद एक शतकापूर्वी घेतली गेली.

महाराष्ट्रातील संकटग्रस्त पक्षी :

वर उल्लेख केल्याप्रमाणे महाराष्ट्रात नोंद झालेल्या ५८० पेक्षा अधिक पक्षी प्रजातींपकी किमान ६२ प्रजाती संकटग्रस्त आहेत. त्यापकी आठ प्रजाती नष्टप्राय (क्रिटिकली एनडेंजर्ड) श्रेणीत मोडतात. त्यापकी जेरडॉनचा धाविक व सायबेरियन क्रौंच एक शतकापासून कुणी महाराष्ट्रात बघितलेला नाही. तसे सायबेरियन क्रौंच भारतातूनच नष्ट झाला आहे. गुलाबी डोक्याचे बदक तर जगातूनच नामशेष झाले आहे. हे पक्षी पूर्वी महाराष्ट्रात बघितले गेले आहेत ही गोष्टसुद्धा आता आपल्याला अविश्वसनीय वाटते.

धोकाग्रस्त (एनडेंजर्ड) श्रेणीत महाराष्ट्रातील आठ प्रजातींचा अंतर्भाव झालाय. त्यामध्ये रानिपगळा, मोठा क्षत्रबलाक (ग्रेटर अ‍ॅडज्यूटंट), पांढरे गिधाड, तणमोर (लेसर फ्लोरिकन), काळ्या पोटाचा सुरय (ब्लॅक-बेलीड टर्न) तसेच मोठा जलरंक (ग्रेट नॉट) हे पक्षी आहेत.

संभाव्य संकटग्रस्त  (व्हल्नरेबल) या श्रेणीत १८ प्रजाती तर संकट समीप श्रेणीत (नियर थ्रेटनड) एकूण २८ प्रजाती अंतर्भूत आहेत.

गिधाडे :

महाराष्ट्रात गिधाडांच्या अनेक प्रजातींची नोंद झाली असली तरी पांढऱ्या पुठ्ठय़ाची, लांब चोचीची आणि पांढरी गिधाडे १९९० आणि त्यापूर्वी खूप संख्येत आढळत होती. दुर्दैवाने गिधाडांची संख्या देशभरात जेव्हा कोलमडली तेव्हा महाराष्ट्रातील गिधाडेसुद्धा दिसेनाशी झाली.

आता महाराष्ट्रात पांढऱ्या पुठ्ठय़ाची गिधाडे (नष्टप्राय श्रेणी) केवळ रायगड जिल्ह्य़ात फणसाड अभयारण्य, तळकोकण, पुणे परिसर तसेच विदर्भात पेंच व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली जिल्ह्य़ात थोडय़ाफार प्रमाणात दिसतात. लांब चोचीची गिधाडे (नष्टप्राय श्रेणी) नाशिक-पालघर जिल्ह्य़ातील जंगले, तळकोकणात रत्नागिरी जिल्हा आणि गडचिरोली जिल्ह्य़ात थोडय़ाफार प्रमाणात दिसतात. राज गिधाड (रेड-हेडेड व्हल्चर), पांढरी गिधाडे (इजिप्शिअन व्हल्चर) व गिधाडांच्या इतर प्रजाती कुठेही एवढय़ा मोठय़ा संख्येत आढळल्याची नोंद नाही. आहेत त्या केवळ एखाद् दुसऱ्या गिधाडाच्या नोंदी.

गुरांच्या उपचारांसाठी उपयोगात आणले जाणारे डायक्लोफेनॅक नावाचे वेदनाशामक औषध गिधाडांसाठी विष ठरले आहे. हे वेदनाशामक औषध मृत जनावराच्या कलेवरातून गिधाडांच्या शरीरात पोहोचते. या औषधामुळे गिधाडे मरत आहेत हे सिद्ध होऊन शासनदरबारी ते पोहोचेपर्यंत देशातील अंदाजे ९९ टक्के गिधाडे संपून गेली. कधी काळी कुणी लक्षसुद्धा देणार नाही इतक्या मोठय़ा संखेत आढळणारी गिधाडे आज दुर्मीळ होऊन बसली आहेत. आता डायक्लोफेनॅक या औषधाचा गुरांवर वापर करण्यास प्रतिबंध घातले गेले आहेत.

गिधाडांच्या संवर्धनासाठी फणसाड, तसेच नाशिक जिल्ह्य़ात उपाहारगृह (व्हल्चर रेस्टॉरंट) चालू करण्यात आले. आजूबाजूच्या परिसरातील मृत जनावरे जमिनीत न पुरता या ठिकाणी आणून टाकली जातात. रायगड जिल्ह्य़ात म्हसळा तालुक्यातील चिरगाव येथे तसेच श्रीवर्धन तालुक्यातील जासवली येथेसुद्धा हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. गिधाडांच्या संवर्धनासाठी सह्य़ाद्री निसर्ग मित्र, सीस्केप, वन विभाग इ. अनेक संस्था महाराष्ट्रात काम करत आहेत.

माळढोक

माळरानावरचा सर्वात राजिबडा पक्षी असलेला माळढोक (ग्रेट इंडिअन बस्टर्ड) (नष्टप्राय श्रेणी) आता केवळ भारत आणि पाकिस्तानात स्वत:चे अस्तित्व टिकवून आहे. एके काळी पश्चिम भारतातील बहुतेक राज्यातून प्रसार पावलेला माळढोक आज केवळ राजस्थान, गुजरात, महाराष्ट्र व आंध्र प्रदेशात तग धरून आहे. असे मानले जाते की २०० पेक्षा कमी माळढोक आता शिल्लक राहिले असावेत. महाराष्ट्राचेच उदाहरण घेतले तर संवर्धनाची कशी वाताहत झाली ते लक्षात येते. इ.स. २००६ मध्ये सोलापूर जिल्ह्य़ातील माळढोक अभयारण्यात २७ माळढोक होते. तिथे आता केवळ तीन माळढोक दिसत असून गेल्या अनेक वर्षांपासून त्यांचे प्रजनन झालेले नाही. आता ही संख्या परत वाढण्याची आशा मावळत चालली आहे. वन्यजीव अभयारण्याचे नियम सोलापूर जिल्ह्यतील जनतेच्या ‘विकासाच्या मार्गात’ अडसर ठरल्यामुळे ‘माळढोक हटवा, शेतकरी वाचवा’ असे मोच्रे निघाले तरी शासनाला अनेक वष्रे जाग आली नाही. प्रकरण न्यायालयात चालत राहिले. जनविरोधी धोरणांमुळे आणि अभयारण्याचे क्षेत्र घटविण्यात झालेली प्रचंड दिरंगाई माळढोकाच्या जीवावर बेतली. स्थानिक लोकांनी स्वत:च ‘विकासाच्या मार्गातील अडसर’ दूर केला. माळढोकांच्या नष्टचर्यासाठी मोकाट भटकी कुत्री, अनियंत्रित गुरेचराई, शेतीसाठी माळरानांवर होत असलेले अतिक्रमण, परिसरातील पिकांमध्ये होत असलेले बदल, विशेषत: उसाचे वाढते क्षेत्र, कीटकनाशकांचा वाढता वापर आदी कारणे आहेत. माळढोक अभयारण्याचे क्षेत्र साडेआठ हजार चौ.कि.मी. वरून घटवून आता ३०० चौ.कि.मी. करण्यात आले आहे. पण आता फार उशीर झालाय असे वाटते. उरलेले तीन माळढोक संपवल्यानंतर माळढोक अभयारण्य ‘डीनोटीफाय’ करण्याची मागणी पुढे आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. याउलट चंद्रपूर जिल्ह्यतील वरोरा परिसरात थोडे माळढोक शेतांमध्ये तग धरून आहेत. इथे त्यांना कुठल्याही अभयारण्याचे अधिकृत संरक्षण नाही. पण वरोरा परिसरात येऊ घातलेले औष्णिक विद्युत प्रकल्प, खदानी, त्याच्या चराईच्या जागी (शेतात) नजीकच्या भविष्यात येऊ घातलेल्या मानवी वसाहती (ले-आउट) आदीमुळे येथेसुद्धा माळढोक सुरक्षित नाहीच.

तणमोर (लेसर फ्लोरिकन):

माळढोकाच्या कुळातील तणमोर (धोकाग्रस्त श्रेणी) हा गवताळ माळरानावर अवलंबून असलेला सुंदर पक्षी असून आज त्याचीही संख्या झपाटय़ाने घटत चालली आहे. पूर्वी फार विस्तृत प्रदेशात आढळणारा तणमोर आता मोजक्याच ठिकाणी फार कमी संख्येत आढळून येतो. महाराष्ट्रात याच्या फार कमी नोंदी असून, यांची मुख्य संख्या मध्य प्रदेश, गुजरात व राजस्थानात आढळते. माळरानांवर शेतीसाठी होत असलेले अतिक्रमण त्याचा अधिवास हिरावून घेत आहेत. मुख्य म्हणजे अजूनही गवताळ माळरान म्हणजे निरुपयोगी ‘बंजर’ जमीन (वेस्टलॅण्ड) ही संकल्पना जनमानसात रुजलेली आहे. ती त्याच्या अधिवासाच्या विनाशास कारणीभूत ठरते. अनेकदा तर वनविभागचगवताळ माळरानांवर झाडे लावून वनीकरण करत असते असे आढळून आले आहे! वन विभाग तसेच प्रशासनाला असलेले वृक्षारोपणाचे ‘टाग्रेट’ त्याला कारणीभूत आहे. अकोला-वाशीम जिल्ह्यतील माळरानावर अंदाजे २५ तणमोर असावेत असा दावा पक्षी तज्ज्ञांनी केला आहे. या परिसरात फासेपारधी समाजाचे लोक पक्ष्यांची पारंपरिक शिकार करीत असतात. कौस्तुभ पांढरीपांडे हे ‘संवेदना’ या संस्थेच्या माध्यमातून फासेपारध्यांच्याच मदतीने तणमोराचे संवर्धन करण्याचे प्रयत्न करीत असून त्यांना यश मिळत आहे ही जमेची बाजू. फासेपारधी समाजातील तरुणांना पक्षी स्थलांतर अभ्यासात पक्षी पकडणारे कामगार (बर्ड ट्रॅपर) म्हणून रोजगार दिला जाऊ शकतो. तसेच गवताळ प्रदेशात पक्षी पर्यटनाला (बर्ड टुरिझम) चालना देऊन समाजातील हुशार मुलांना त्यात प्रशिक्षित केले जाऊ शकते. अर्थात हे अत्यंत काळजीपूर्वक केले जाणे गरजेचे आहे.

रानिपगळा (फॉरेस्ट आऊलेट):

केवळ महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशात आढळणारे, दिवसा वावरणारे हे छोटे घुबड नष्ट झाला म्हणून आपण एक शतक त्याच्याकडे दुर्लक्ष केले गेले. गेल्या शतकात त्याचा अधिवास असलेली ओरिसा-छत्तीसगढ राज्यातील जंगले दिसेनासी झाली. तिथे जंगले होती याचा मागमूससुद्धा आता नाही. केवळ मध्य भारतातील सातपुडा पर्वतरांगांमध्ये आढळणाऱ्या या दुर्मीळ घुबडाला पुन्हा अंधारात ढकलून त्याचे संवर्धन साधता येणार नाही हे आपण समजून घेणे गरजेचे आहे. त्याचा पुनशरेध लागल्यानंतर ज्या ठिकाणी त्याच्या नोंदी घेण्यात आल्या होत्या त्यापकी यावल अभयारण्याच्या फार मोठय़ा भागावर अतिक्रमण झाले असून या ठिकाणी रानिपगळा लुप्त झाल्यातच जमा आहे. सुदैवाने, गेल्या काही वर्षांत या पक्ष्याचा ठाणे जिल्ह्यतील तानसा अभयारण्य, नाशिक जिल्ह्यत तसेच गुजरात राज्यातील लगतच्या जंगलात त्याची नोंद झाली आहे. त्याची एकूण संख्या २५० पेक्षा कमी असून केवळ मेळघाटात तो सुरक्षित आहे असे मानले जाते. हा पक्षी जगात इतरत्र कुठेही आढळत नसल्यामुळे त्याच्या संवर्धनाची जबाबदारी महाराष्ट्र, गुजरात आणि मध्य प्रदेशातील जनतेवर आहे. नुकतेच रानिपगळ्याला नष्टप्राय श्रेणीतून काढून धोकाग्रस्त श्रेणीत टाकण्यात आले आहे.

सारस क्रौंच :

फार पूर्वी मुंबई परिसरात पूर्वी सारस क्रौंच दिसायचा. आता मात्र केवळ विदर्भातील भंडारा व गोंदिया जिल्ह्य़ात सारसाचे वास्तव्य टिकून आहे. सुदैवाने या जिल्ह्य़ातील गोंदिया निसर्ग मंडळ व इतर पक्षी मित्रांनी सारस संवर्धन मोहीम राबविली असून त्याला यश मिळते आहे. आता प्रशासनसुद्धा सारस संवर्धनाबाबत जागृत झाले असून ‘सारस महोत्सव’सारखे उपक्रम सुरू झाले आहेत. सारस क्रौंच हा मुख्यत्वे भातशेतीत किंवा छोटय़ा तलावात (याला बोडी म्हणतात) घरटे करतो. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांच्या व ग्रामस्थांच्या सहकार्यानेच सारस

संवर्धन होत आहे. अंदाजे ६० सारस या दोन जिल्ह्य़ांत असावेत असे मानले जाते.

महाराष्ट्रातील महत्त्वाची पक्षीक्षेत्रे:

बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा २०१६ मध्ये महाराष्ट्रातील एकूण २८ स्थळे महत्त्वाची पक्षीक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केले आहेत. त्यासाठी या संस्थांद्वारा जागतिक निकष लावून स्थळांची निवड केली जाते. जसे संकटग्रस्त पक्षी प्रजातींचा आढळ, पाणथळ जागा असेल तर २० हजारांहून अधिक पाणपक्ष्यांचा वावर किंवा एखाद्या प्रजातीच्या जागतिक लोकसंख्येच्या एक टक्का संख्या त्या ठिकाणी आढळत असावी. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या पक्षीक्षेत्रांची नावे अशी आहेत- भीमाशंकर अभयारण्य, वेंगुर्ला रॉक्स, गंगापूर धरण व गवताळ प्रदेश, आय.एन.एस. शिवाजी व परिसर (लोणावळा), जायकवाडी पक्षी अभयारण्य, माळढोक अभयारण्य, कोयना अभयारण्य, माहुल शिवडीच्या दलदली, मेळघाट व्याघ्र प्रकल्प, नागझिरा अभयारण्य, नंदूर मधमेश्वर अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान; ओझर, वणी आणि परिसर; राधानगरी अभयारण्य, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान (मुंबई-ठाणे), ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प; तळोदा राखीव जंगल, तानसा अभयारण्य, ठाण्याची खाडी (आता ठाणे क्रीक फ्लेिमगो अभयारण्य), तोरणमाळ राखीव जंगल, आंबोली तिलारी राखीव जंगल, चांदोली राष्ट्रीय उद्यान, हतनूर धरण, कर्नाळा पक्षी अभयारण्य, महेंद्री राखीव जंगल, पेंच व्याघ्र प्रकल्प, फणसाड अभयारण्य आणि उजनी जलाशय.

पाणथळ जागांना रामसर मान्यता: 

१९७१ साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलॅण्ड्स’ या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते. याच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापरासंबंधीचे निर्णय घेण्यात आले. या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चच्रेद्वारा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. हा कृती आराखडा नंतर १९७५ मध्ये झालेल्या दुसऱ्या परिषदेत संमत करण्यात आला. या कृती आराखडय़ात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. अशा स्थळांचे मग त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आले. या आराखडय़ात ‘पाणथळ जागेची’ व्याख्यासुद्धा करण्यात आली. भारताने रामसर करारावर १९८२ मध्ये सही केली व सहभागी झाला. तेव्हापासून आजतागायत भारतातील केवळ २६ पाणथळ जागांना मान्यता देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील रामसर मान्यतेच्या नऊ निकषांनुसार विचार केला तर महाराष्ट्रातील अनेक पाणथळीच्या जागा पात्र ठरतात. २००८ मध्ये बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीद्वारा ‘पोटेंशिअल अ‍ॅण्ड एक्झीिस्टग रामसर साइट्स इन इंडिया’ हा ग्रंथ प्रकाशित केला गेला. त्यात जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), वेंगुर्ला रॉक्स (बन्र्ट आयलंड, जि. सिंधुदुर्ग), माहुल शिवडीची खाडी (जि. मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), ठाण्याची खाडी (जि. ठाणे-मुंबई) या पाणथळ जागांचा समावेश होता. पण त्यांनंतर पक्षीमित्रांची संख्या वाढली व अनेक पाणथळींवर आढळणाऱ्या पक्ष्यांबद्दल अधिक माहिती उपलब्ध झाली. आता पुन्हा एकदा आपण रामसर निकषांचा विचार केला तर उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), हतनूर धरण (जि. जळगाव), नवेगावबांध (जि. गोंदिया), लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या स्थळांचा सुद्धा संभाव्य स्थळांच्या यादीत समावेश होतो. विशेष म्हणजे २०१६ मध्ये लोणार सोडून इतर सर्व जागा बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी व बर्डलाइफ इंटरनॅशनलद्वारा महत्त्वपूर्ण पक्षीक्षेत्रे (इम्पर्ॉटट बर्ड एरिया) म्हणून घोषित केल्या आहेत.

२०१२ मध्ये महाराष्ट्र शासनाने जायकवाडी पक्षी अभयारण्य (जि. औरंगाबाद), उजनीचे धरण (भिगवण) (जि. पुणे-सोलापूर), माहुल शिवडीची खाडी (जि. मुंबई), नांदूर मध्यमेश्वर वन्यजीव अभयारण्य (जि. नाशिक), नवेगाव बांध (जि. गोंदिया) व लोणार सरोवर (जि. बुलडाणा) या सहा पाणथळ जागा महाराष्ट्र शासन प्रस्तावित करणार असल्याचे घोषित केले होते.

दुर्दैवाने २०१२ पासून सहा वर्षांत महाराष्ट्र शासनाच्या विचाराधीन असलेल्या संभाव्य रामसर स्थळांपकी एकाही स्थळाला अजूनतरी रामसर दर्जा मिळालेला नाही. पण मध्यंतरी ठाणे खाडीला फ्लेिमगो अभयारण्याचा दर्जा महाराष्ट्र शासनाने दिला.

डिसेंबर २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाने मुंबईच्या परिसरात तीन नवीन पक्षी अभयारण्ये देण्याची घोषणा केली. राज्य वन्यजीव मंडळाने माहुल-शिवडीची खाडी, पाम बीच रोड वरील टी. एस. चाणक्य – एन. आर. आय. येथील पाणथळ जागा आणि उरणजवळील पाणजे-फुंडे येथील पाणथळ जागांना पक्षी अभयारण्ये म्हणून मान्यता देण्यात आली. दुर्दैवाने अजूनही ही तीन अभयारण्ये अस्तित्वात आलेली दिसत नाहीत.

महाराष्ट्रातील पक्षी अभ्यास :

गेल्या काही वर्षांत संपूर्ण देशातच पक्षी निरीक्षण झपाटय़ाने वाढले आहे. पण या छंदिष्ट पक्षीमित्रांपकी बहुतेक जणांचा उद्देश छायाचित्रण करणे हा असतो. त्या पलीकडे त्यांना जायचे नसते. फेसबुक तसेच आता व्हॉट्सअ‍ॅपसारख्या समाजमाध्यमांवर आता पक्षीमित्रांचे अनेक गट असून त्याद्वारे छायाचित्रे व माहिती एकमेकांपर्यंत पोहोचते. पण केवळ छायाचित्रे ‘शेअर’ करण्यापलीकडे पक्षिमित्रांनी जावे.

केवळ चांगले छायाचित्र मिळवण्याच्या मागे लागून पक्ष्याचे हित दुर्लक्षित केले जाऊ नये. पक्ष्यांच्या घरटय़ांची छायाचित्रे आता समाजमाध्यमांवर टाकायला मनाई करण्यात आली आहे.

या उलट महाराष्ट्रातील पक्षिमित्रांद्वारा अनेक दुर्मीळ पक्ष्यांच्या नोंदी घेतल्या गेल्या आहेत. अनेक पक्षिमित्रांनी त्या शास्त्रीय नियतकालिकांमध्ये प्रकाशितसुद्धा केल्या आहेत. महाराष्ट्रातील अनेक ठिकाणच्या पक्षीवैविध्यावर संकलित केलेल्या पक्षीसूची प्रकाशित झाल्या आहेत (अमरावती, वसई, यवतमाळ, वर्धा, नंदुर मधमेश्वर इ.) एवढेच नव्हे तर छोटी मोठी सुंदर पुस्तकेसुद्धा प्रकाशित झाली आहेत. त्यात बर्ड्स ऑफ वेस्टर्न घाट्स अ‍ॅण्ड कोकण, बर्ड्स ऑफ महाराष्ट्र, बर्ड्स ऑफ नाशिक, नंदूर मधमेश्वरचे पक्षी, जायकवाडीचे पक्षी, बर्ड्स ऑफ मुंबई, भीमथडीचे पक्षीवैभव, बर्ड्स ऑफ ठाणे क्रीक, ठाणे परिसरातील पक्षी अशी कितीतरी नावे सांगता येतील. या दृष्टीने निश्चितच महाराष्ट्र फार पुढे आहे. काही पक्षीमित्रांनी पक्ष्यांवर सखोल संशोधन करून महाराष्ट्राची मान आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावली आहे. त्यात धनेश पक्षी, शिकारी पक्षी तसेच घुबडांवरील संशोधनाचा विशेष उल्लेख करता येईल.

सामान्य पक्ष्यांचा अभ्यास :

चिमणीसारख्या अगदी आपल्या घराशेजारी आढळणाऱ्या पक्ष्यांची संख्या घटल्याचे सांगितले जाऊ लागले आहे. खरे काय ते शोधून काढण्यासाठी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीने (बीएनएचएस) पुढाकार घेऊन सामान्य पक्ष्यांची शास्त्रीय प्रगणना करायला सुरुवात केली आहे. या प्रगणनेत सर्वसामान्य पक्षी निरीक्षकांना पक्ष्यांच्या नोंदी कशा घ्यायच्या याचे मार्गदर्शन केले जाते. ठरावीक वेळी, ठरावीक मार्गावर, ठरावीक अंतर पुन्हा पुन्हा वर्षांतून तीनदा अशी गणना केली जाते. या गणनेतून सामान्य पक्ष्यांची सद्य:स्थिती आपल्याला कळेल तसेच अनेक वष्रे माहिती जमविल्यानंतर पक्ष्यांच्या संख्येत होत असलेले चढउतारसुद्धा कळतील. सुदैवाने महाराष्ट्रात सर्वात अधिक माहिती पक्षीमित्रांनी जमविली असून त्याचा अहवालसुद्धा पक्षीमित्रांसाठी उपलब्ध झाला आहे. २०१७ मध्ये या प्रगणनेच्या अहवालाप्रमाणे पारवे (कबूतर), पोपट, चिमणी, लाल-बुडय़ा बुलबुल, कावळा, साळुंकी आणि छोटा तपकिरी होला ही सर्वात जास्त संख्येत आढळणाऱ्या पक्ष्यांची नावे होय. पण सार्वत्रिक आढळाचा विचार केला तर बुलबुल सर्वत्र आढळतो असे दिसून आले. पक्षीमित्रांनी जर अशा अभ्यासात वर्षांतून तीन वेळा माहिती संकलित करण्यात मदत केली तर पक्ष्यांच्या संख्येबद्दल खूप काही समजेल.

नोंदींचे काय करायचे?

आता हजारो लोकांना पक्षी निरीक्षणाचा छंद जडला आहे. या सर्व पक्षीमित्रांना विनंती आहे की त्यांनी घेतलेल्या नोंदी समाजाला किंवा पक्षी अभ्यासकांना उपलब्ध होतील अशा संकेतस्थळावर टाकाव्यात. बीएनएचएसद्वारा आयोजित केल्या जाणाऱ्या पक्षी गणनेमध्ये सहभागी व्हावे. जेणेकरून आपल्याला आपल्या देशातील सद्य:स्थितीचा आढावा घेता येईल. तुम्ही जमविलेली माहिती पक्षी संवर्धनासाठी कामी पडेल. मोबाइल फोनद्वारे अँड्रॉइड अ‍ॅपद्वारे पक्षी निरीक्षणाच्या नोंदी ई-बर्डसारख्या वेबसाइटवर अगदी सहजपणे टाकता येतात.

महाराष्ट्रातील पक्षीमित्र चळवळ :

महाराष्ट्रातील पक्षीमित्र चळवळ आता तिशी पार करून वयात आली आहे. महाराष्ट्र पक्षीमित्र संघटनेचे आता एक हजार सदस्य असून दरवर्षी संमेलन घेण्याची परंपरा केवळ महाराष्ट्राने सुरू केली आहे. विशेष म्हणजे अशी संमेलने इतरत्र कुठेही होत नाहीत. दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या संमेलनात महाराष्ट्रातील तीन-चारशे पक्षीमित्र सहभागी होतात व विविध विषयांवर होणाऱ्या चच्रेत हिरिरीने भाग घेतात. नुकतेच ३१ वे महाराष्ट्र पक्षीमित्र संमेलन ठाण्यात पार पडले. त्यासोबतच विदर्भातसुद्धा ही चळवळ छान रुजली असून दरवर्षी विदर्भस्तरीय संमेलने आयोजित केली जातात. यावर्षीचे अर्थात १९ वे विदर्भस्तरीय संमेलन यवतमाळला पार पडले. हळूहळू खानदेशसुद्धा प्रगती करीत असून इथेसुद्धा दोन संमेलने झाली आहेत. या सोबतच आणखी पुढे जाऊन वध्र्याला ‘शेतकरी पक्षीमित्र संमेलन’ नुकतेच आयोजित करण्यात आले होते. अकोला येथे चार वर्षांपासून शालेय पक्षीमित्र संमेलन आयोजित केली जात आहेत. अशी पक्षी संमेलने जिल्हा स्तरावर, तालुका स्तरावर होणे गरजेचे आहे, जेणेकरून पक्ष्यांचे महत्त्व आपल्या राज्यातील गावागावात, खेडय़ात प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचेल.

त्या दृष्टीने अमरावती येथे आयोजित केल्या गेलेल्या ‘बर्ड फेस्टिवल’ व गोंदिया येथे झालेला ‘सारस फेस्टिवल’चा उल्लेख करावा लागेल. असे उत्सव शाळा, महाविद्यालये व वन विभागाच्या मदतीने, सहभागाने आयोजित होतील तेव्हाच पक्षी संवर्धनाचे महत्त्व तळागाळात पोहोचेल.

पक्षी पर्यटनातून रोजगार :

भारतातच नव्हे तर संपूर्ण जगातच वन्यजीव पर्यटन प्रचंड प्रमाणात वाढले आहे. यात सर्वात जास्त लक्ष मोठे वन्यप्राणीच आकर्षून घेत असले तरीही त्यात पक्षी पर्यटनाचासुद्धा वाटा मोठा आहे. भारतात येणारे बरेच विदेशी पर्यटक दिल्ली-आग्रा-भरतपूर बघून परत जातात. पण ईशान्येकडील राज्यांमध्ये हिमालयातील पक्षी बघण्यासाठी आता विदेशी तसेच भारतीय पक्षी निरीक्षकांचा ओढा वाढला आहे. त्यामुळे अनेक गावांचा चेहरामोहराच बदलून जात आहे.

मुंबई परिसरातील लोकांना हजारो फ्लेिमगो बघण्याची संधी ठाणे खाडीमुळे उपलब्ध झाली. त्या ठिकाणच्या कोळी युवकांना वन विभाग (कांदळवन विभाग) व बीएनएचएसने ‘बर्ड गाइड’ म्हणून प्रशिक्षण दिले. होडीतून पक्षी दाखवून चांगले उत्पन्न मिळत असल्यामुळे  आता मासेमारीपेक्षा हा व्यवसाय अधिक चांगला वाटू लागला आहे. नंदूर मधमेश्वर आणि उजनी येथील युवकांना उपलब्ध झालेला रोजगारसुद्धा पक्षी पर्यटनाद्वाराच मिळालेला आहे. शहरातील अनेक छंदिष्ट उच्चशिक्षित युवकांनी इतर क्षेत्रातील नोकऱ्या सोडून पक्षी पर्यटन हाच व्यवसाय म्हणून स्वीकारला आहे. त्यांनी स्वत:च्या कंपन्या काढून अधिकृतरीत्या तो व्यवसाय सुरू केला आहे आणि यशस्वीपणे चालवतसुद्धा आहेत. अशी अनेक मराठी नावे सांगता येतील. आज ही मराठी माणसे इतरांना पक्षी पर्यटनात नोकऱ्या उपलब्ध करून देत आहेत, हेही नसे थोडके.
(छायाचित्रे : आदेश शिवकर, नयन खानोलकर, मयुरेश खटावकर, सतिश गोगटे, नंदकिशोर दुधे, अभिजित आवळसकर, संवेदना छायाचित्र ग्रंथालय)
लेखक हे पक्षीतज्ज्ञ असून,  ‘महत्वाची पक्षीक्षेत्रे’ या बीएनएचएसच्या उपक्रमाचे व्यवस्थापक आहेत.
डॉ. राजू कसंबे – response.lokprabha@expressindia.com