-सुनिता कुलकर्णी

जॉन अ‍ॅडम्स हे ऑस्ट्रेलियामधले बुद्धीबळपटू. ते ऑस्ट्रेलियन बुद्धीबळ फेडरेशनचे पदाधिकारी देखील आहेत. त्यांनी नुकतंच एक ट्वीट करून त्यात म्हटलं की बुद्धीबळात पांढऱ्या सोंगट्यांपासून खेळाला सुरूवात करतात म्हणून या खेळात वंशविद्वेष आहे असं एबीसीला ( ऑस्ट्रेलियन ब्रॉडकास्टिंग फेडरेशन) वाटतं आहे. त्यांना बुद्धीबळ फेडरेशनचा पदाधिकारी म्हणून या खेळातले नियम बदलावेत का यावर चर्चा करण्यासाठी मला आमंत्रित केलं आहे. करदात्यांच्या पैशावर चालणारी ही संस्था ऑस्ट्रेलियामधल्या प्रत्येक गोष्टीला मार्क्सवादी विचारसरणीच्या चौकटीत बसवायला निघाली आहे.

एबीसीने दिलेलं चर्चेचं आमंत्रण जॉन अ‍ॅडम्स यांनी धुडकावून लावलं खरं पण त्यामुळे खरोखर बुद्धीबळात काळेगोरे हा वंशभेद आहे का या चर्चेला तोंड फुटलं.

अ‍ॅडम्स  यांना ज्या कार्यक्रमात चर्चेसाठी बोलावलं होतं, त्या सिडने रेडिओवरील कार्यक्रमाचे प्रवर्तक जॉन व्हॅलेंटाइन यांनी कार्यक्रमानंतर एक पत्रक काढून सांगितलं की एका मुलीने तिच्या वडिलांना विचारलं की ‘बुद्धीबळाच्या खेळाची सुरूवात पांढऱ्या सोंगट्यांनीच का होते?’ मुलीच्या या प्रश्नाने वडील विचारात पडले आणि त्यांनी ट्वीट केलं की ‘माझ्या मुलीने असं विचारल्यानंतर मला प्रश्न पडला आहे की खरोखरच असं का आहे? बुद्धीबळातही खरंच वंशभेद आहे का?’
त्यांच्या या ट्वीटमुळे आम्हाला हा चर्चेचा कार्यक्रम करावासा वाटला असं जॉन व्हॅलेंटाइन यांनी स्पष्ट केलं. त्या पत्रकात त्यांनी पुढे असंही म्हटलं आहे की आम्ही या निष्कर्षाला आलो आहेत की बुद्धीबळात वंशभेद वगैरे अजिबात नाही. पांढऱ्या सोंगट्यांनी सुरूवात करायची परंपरा आहे इतकंच. दरम्यान ऑस्ट्रेलियामधल्या समाजमाध्यमांमध्ये मात्र ‘ब्लॅक लाईव्ह्ज मॅटर’च्या पार्श्वभूमीवर हा नसलेला वाद निर्माण केल्याबद्दल एबीसीची पिसं काढली जात होती.

दिग्गज रशियन ग्रॅण्डमास्टर्सनीही पांढऱ्या सोंगट्यापासून खेळाला सुरूवात करणं वंशविद्वेषी आहे का? हा मुद्दा खोडून काढला. गॅरी कास्पोरोव्हने ट्वीट केलं की तुम्हाला हा खेळ खरोखरच वंशविद्वेष करणारा वाटत असेल तर करदात्यांच्या पैशावर काम करत असले मूर्ख शोध लावत बसण्यापेक्षा जिथे काळ्या सोंगट्यांनी सुरूवात केली जाते, तिथे जा.
मूळचा प्राचीन चीनमधला ‘शोगी’ हा एक पटावरचा खेळ जपानमध्ये ‘जपानी बुद्धीबळ’ म्हणूनच प्रसिद्ध आहे. या खेळाची सुरूवात काळ्या रंगाच्या मोहऱ्यांनी होते. तिथे मोहरे एकाच रंगाचे असतात, पण जे आधी सुरूवात करतात, त्यांना काळे मोहरे मानलं जातं तर नंतर सुरूवात करतात त्यांना पांढरे मोहरे मानलं जातं.

मागच्याच वर्षी मार्च महिन्यात ग्रॅण्डमास्टर अनिश गिरी आणि जगज्जेता मॅग्नस कार्लसन यांच्यात एक सामना झाला. २१ मार्च रोजी असलेल्या ‘जागतिक वंशभेद विरोधी दिना’च्या निमित्ताने आणि संयुक्त राष्ट्रांच्या वंशभेद विरोधी मोहिमेचा भाग म्हणून या सामन्यात काळया मोहऱ्यांनी आपल्या खेळाची सुरूवात करत कार्लसन म्हणाला होता की ‘खेळाची सुरूवात कोणत्या मोहऱ्यांनी करायची हा नियम रंग बघून किंवा रंगभेदाचं राजकारण म्हणून केला गेलेला नाही. पण बुद्धीबळातच नाही तर आयुष्यातही काही जणांना रंगाचा फायदा होतो असं कुणाला वाटत असेल तर आपण ते नियम मोडून योग्य तो संदेश देऊ शकतो.’

पांढऱ्या मोहऱ्यांनी सुरूवात करण्याबाबत आंतरराष्ट्रीय बुद्धीबळ संघटनेचा नियम असा आहे की नियमावलीतील कलम १.२ नुसार पहिल्यांदा पांढऱ्या सोंगट्यांनी सुरूवात होईल. त्यानंतर खेळाडू आलटून पालटून खेळतील.
१९ व्या शतकापर्यंतच्या नोंदीनुसार जो खेळाडू खेळाला सुरूवात करत असे, तो कोणत्या रंगाच्या सोंगटीने खेळायचं याची निवड करत असे. ‘द चेस प्लेयर’ या नियतकालिकाने १८५१ पासून खेळांच्या नोंदी करायला सुरूवात केली. त्यात अशी नोंद आहे की कार्ल अॅण्डरसन हा त्या दशकामधला उत्कृष्ट जर्मन खेळाडू काळ्या सोंगट्यांनी सुरूवात करत असे.
‘भारतातील बुद्धीबळाचा इतिहास’ या पुस्तकाचे लेखक आणि भारताचे पहिले आंतरराष्ट्रीय मास्टर मॅन्युअल अॅरॉन म्हणतात की ‘ज्यांनी बुद्धीबळाचे नियम सुरू केले त्यांनी सुरूवात कोणत्या सोंगटीने करायची ते ठरवलं. आणि हे नियम आशियाई तसंच आफ्रिकी लोकांनी नाही तर युरोपीयन लोकांनी तयार केले आहेत. ते आपण तयार केले असते तर कदाचित काळ्या सोंगट्यांनी खेळाची सुरूवात केली असती. पण त्यात वंशविद्वेष आहे असं मला खरोखरच वाटत नाही. एक तर भारतीय बुद्धीबळामध्ये कोण आधी कोणत्या रंगाच्या सोंगट्यांनी खेळतो याला अजिबात महत्व नाही. इथे सगळी रचना वेगळीच आहे. बुद्धीबळ हा खेळ एके काळी भारतातून पर्शियामध्ये आणि तिथून युरोपमध्ये गेला आहे.’

सत्यजीत रे यांच्या ‘शतरंज के खिलाडी’ या सिनेमात मिर्झा सज्जाद अली आणि मीर रोशन अली हे दोन्ही बुद्धीबळवेडे पांढऱ्या तसंच लाल रंगाच्या सोंगट्यांनी खेळताना दाखवले आहेत. कारण या सिनेमचा जो काळ दाखवला आहे, त्या १९ व्या शतकाच्या मध्याच्या काळात सोंगट्या मातीपासून, दगडापासून तयार केल्या जात. म्हणून त्या तशा रंगाच्या असत. ही सगळी चर्चा इंडियन एक्स्प्रेसमध्ये निहाल कोशी यांनी केली आहे. थोडक्यात काय रंग कोणताही असो बुद्धीचं बळ असणं महत्वाचं.