काही वर्षांपूर्वी मी एका गुजराती माणसाच्या प्रेमात पडलो. गैरसमज नको.. प्रेमात म्हणजे त्या माणसाच्या अंगचे कलागुण आवडायला लागले अशा अर्थी प्रेमात. तर हा माणूस कोण, असा तुम्हाला प्रश्न पडला असेल. हा माणूस मुळात गुजराती, पण मराठी, िहदी, गुजराती भाषांच्या नाटकांत, सिनेमांत, टीव्ही मालिकांमध्ये आपल्या सहज अभिनयाने सर्वाचं मन जिंकणारा स्मिता तळवळकर यांच्या ‘राऊ’मधला उमदा, तरुण, देखणा बाजीराव पेशवा ‘मनोज जोशी’.. असा हा मनोज जोशी गुजरातमध्ये जन्मलेला पण मराठीवर अपार प्रेम करणारा एक उत्तम अभिनेता, एक गुजराती सद्गृहस्थ. मराठी रंगभूमी, चित्रपट, टीव्ही मालिकांमध्ये अगदी सहज वावरत होता, अजून वावरतो आहे. माझ्यासाठी मनोजचा हा एवढाच परिचय होता. ही गोष्ट १९९६ ते १९९८ च्या काळातली. त्या काळात तो नट आणि मी प्रेक्षक, प्रत्यक्ष भेटीचा योग त्या काळात कधीच आला नाही.
आमच्या पहिल्या भेटीसाठी १९९९ उजाडावे लागले. १९९९ ला अल्फा (आताचं झी मराठी) या वाहिनीने अच्युत वझे या निर्मात्याला एक दैनंदिन मालिका सादर करण्यासाठी बोलावले आणि श्रीयुत वझे यांच्या ‘आभाळमाया’ या दैनंदिन मालिकेचं प्रपोजल पास झालं. ही त्या काळात गाजलेली मालिका. (या मालिकेपासूनच दैनंदिन मालिकांची खऱ्या अर्थाने सुरुवात झाली.) या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी माझे गुरुवर्य स्व. विनय आपटे यांच्यावर सोपवण्यात आली, मी त्या वेळी विनय आपटेंचा प्रमुख साहाय्यक दिग्दर्शक होतो व आमच्या सोबत विवेक देशपांडेसुद्धा या मालिकेच्या दिग्दर्शनाची जबाबदारी स्वतंत्रपणे पार पाडणार होते व त्या मालिकेतल्या एका महत्त्वाच्या रोलसाठी आम्ही मनोज जोशीची निवड केली. मग मीटिंग-शूटिंगच्या निमित्ताने माझी मनोजबरोबरची ओळख वाढली आणि त्याचं उत्तम मत्रीत रूपांतर झालं आणि आज २५ वर्षांनीसुद्धा आमची मत्री कायम आहे.
मनोजचं ‘आभाळमाया’ मालिकेतलं काम संपलं, कालांतराने मालिका संपली. आम्ही सगळेच आपआपल्या वेगवेगळ्या कामांमध्ये गुंतत गेलो. पुन्हा मनोजबरोबर काम करण्याचा योग आजपर्यंत आला नाही, पण कधी तरी फोनवर बोलणं होत असे, काही कार्यक्रमाच्या निमित्ताने भेट होत असे.
मध्यंतरी बराच काळ लोटला आणि एक दिवस एक बातमी ऐकून आम्ही सगळेच थक्क झालो. मनोजचा छोटा भाऊ राजेश जोशी जो एक चांगला अभिनेता होता, अपघातामध्ये गेला. खूप वाईट वाटलं आणि त्यात भर म्हणून मनोज या आघाताने, त्या सगळ्या टेन्शननी जबरदस्त आजारी पडला, इतका की त्याला डॉक्टरांनी पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला. त्याआधीपासून मनोजचा कामासाठीचा संघर्ष चालू होता तो या विश्रांतीच्या काळात पूर्ण थांबला. मनोज कठीण परिस्थितीतून जात होता. मी व विवेक आपटे त्याला मदत करायला, मानसिक आधार द्यायला, दोन-तीन वेळा त्याच्या घरी जाऊन भेटलो. आमच्या हातात तेवढंच होतं, कारण आमचीपण आíथक परिस्थिती अगदीच जेमतेम होती. आम्ही त्याला मानसिक आधार देण्याचा आमच्या परीने प्रयत्न केला.
पुढे काही कारणास्तव मनोजची भेट होऊ शकली नाही, पण त्याने मनाची उभारी धरून पुन्हा काम मिळवायला सुरुवात केली. हळूहळू तो िहदी सिनेमात स्थिरावला. त्याची प्रगती बघून बरं वाटलं. या सगळ्यात बराच काळ निघून गेला आणि एके दिवशी एका इंग्रजी वर्तमानपत्रामध्ये ‘चाणक्य’ मनोज जोशी अशी जाहिरात पाहिली. प्रयोग रविवारी रंगशारदा, वांद्रय़ाला होता. ही संधी मनोज भेटीसाठी योग्य आहे असा विचार करून मी रंगशारदामध्ये दाखल झालो. तिकीट काढायला गेलो तर प्रयोग हाऊसफुल्ल. मग शांतपणे मेकअप रूममध्ये गेलो आणि मनोजसमोर उभा राहिलो. मनात शंका आली की, हा आता एवढा मोठा बिझी नट आपल्याला ओळखेल का? पण हा विचार मनाला शिवत असतानाच मेकअप करत असलेला मनोज पटकन माझ्या जवळ आला आणि त्याने कडकडून मिठी मारली, अत्यंत प्रेमाने चौकशी केली आणि हाऊसफुल्ल प्रयोग असूनसुद्धा एक तिकीट उपलब्ध करून दिलं. त्यानंतर पुढचे तीन तास मी फक्त भारावल्यासारखा युगपुरुष चाणक्यचा जबरदस्त वावर पाहत बसलो. या नाटकाचे लेखक मिहीर भुत्ता. प्रमुख भूमिका मनोज जोशी. निर्माती चारू जोशी (मनोजची पत्नी). या प्रयोगाला शत्रुघ्न सिन्हासुद्धा आले होते.
‘चाणक्य’ हे एक लक्षणीय िहदी नाटक. आत्ताच्या राजकारण्यांनी, समाजातील सर्व थरांतील लोकांनी मुद्दाम पाहावं असं नाटक. मनोज आणि त्याच्या पूर्ण टीमने अमृतानुभव दिला. मनोज संपूर्ण नाटक आपल्या खांद्यावर लीलया पेलून नेतो. अचूक शब्दफेक, आवाजातला चढ-उतार, िहदी भाषेचं उत्तम ज्ञान या सगळ्याच्या एकत्रित परिणामानं प्रेक्षागृह मंत्रमुग्ध होतं.
या नाटकाचा जन्म मनोजच्या गावातील एक गुरुजी भातखंडे शास्त्री यांच्या प्रवचनातील चाणक्य या व्यक्तिरेखेच्या सततच्या उदाहरणामुळे झाला. मनोजच्या मनात तेव्हापासून चाणक्य घर करून बसला. त्याने ही गोष्ट मिहीर भुत्ताला सांगितली. मग सुरू झाला चाणक्यचा शोध.
मनोजने चाणक्यचा अभ्यास करण्याकरिता ‘मुद्राराक्षस’, ‘कौटिल्य अर्थशास्त्र’, कन्हैयालाल मुन्शींची पुस्तकं वाचली आणि अचानक त्याला अभिप्रेत असलेला अखंड भारताचं स्वप्न पाहणारा, जातीयवादाला छेद देणारा, परकीयांना भारतात प्रवेश मिळवू न देणारा, भारताच्या खऱ्या अर्थानी विकास व्हावा यासाठी प्रयत्न करणारा ‘आर्य चाणक्य’ सापडला तो स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ‘इतिहास के ६ सुवर्णपुष्प’ या पुस्तकातून!
१९८६ पासून मिहीर भुत्ता लिखाणाच्या कामाला लागला आणि १९८९ मध्ये त्याचं नाटक लिहून पूर्ण झालं. १९९० ला या नाटकाचे गुजरातीत प्रयोग झाले. १९९५ ते २००२ आणि २००२ ते २००६. िहदीचे प्रयोग सर्व भारतात, आसाम, गुजरात, महाराष्ट्र, दिल्ली, सिक्किम, केरळ, हिमाचल प्रदेश, सिमला असे सुरू झाले. पुढे काही काळ हे नाटक मनोज बिझी असल्यामुळे बंद झालं.
२६ जून २००८ मुंबई हल्ल्यानंतर मनोजने हे नाटक पुन्हा जनजागृतीचं व्रत डोळ्यांसमोर ठेवून केलं. याच्या पहिल्याच प्रयोगातलं एक लाख रुपयांचं उत्पन्न त्याने शहीद पोलीस हवालदार तुकाराम ओंबळेंच्या कुटुंबाला तातडीची मदत म्हणून अर्पण केलं. एवढंच करून तो थांबला नाही तर त्याने सर्व रसिक प्रेक्षकांना मदतीचं आव्हान केलं आणि प्रत्येकाने यथाशक्ती मदत केली. या नाटकाला मनोजचा मित्र अभिनेता अक्षयकुमार आला होता. त्याने शहीद पोलीस ओंबळे यांच्या कुटुंबीयांना ताबडतोब पाच लाखांचा धनादेश दिला.
मागील २५ वर्षांत या नाटकाचे ९०८ प्रयोग झाले. या एकाच गोष्टीवरून मनोजची चाणक्यनिष्ठा दिसून येते. हे नाटक मनोज एक मिशन म्हणून करतो आहे. त्यामागे जनजागृती, देशाभिमान अशी बरीच कारणं आहेत. एखाद्या राजकारण्याने कसं असावं हे चाणक्य पाहिल्यावर पटतं आणि कौतुक वाटतं की, एका युगपुरुषाने कित्येक वर्षांपूर्वी हा सगळा विचार मांडला आणि अमलात आणला.
आजची राजकीय मंडळी जर हे नाटक अभ्यास म्हणून पाहतील तर त्यांना जातीयवादाचं विकृत खतपाणी घालून राज्यकारभार करण्याची लाज वाटेल व त्यांनी बिघडवलेली समाजव्यवस्था सुधारण्याचा ते मनोमन प्रयत्न करतील, अशी काहीशी आशा आजही मनोजला वाटते आणि तो या नाटकाचे प्रयोग सगळ्या देशभर करत असतो.
अलीकडे त्याची ‘अशोक’ नावाची एक उत्तम िहदी मालिका कलर्सवर सुरू आहे. त्यामध्ये चाणक्य – मनोज जोशी, िबदुसार – समीर धर्माधिकारी आपल्या उत्तम, दर्जेदार अभिनयाची छाप पाडतात आणि मालिकेचं कथानक प्रत्येक भागामध्ये उत्कंठा निर्माण करतं.
विवेक वैद्य – response.lokprabha@expressindia.com