मागच्या वर्षीच्या सायन्स काँग्रेसमध्ये पुराणातली विमानं भिरभिरल्यामुळे ते वादग्रस्त ठरले होते तर यावर्षीच्या सायन्स काँग्रेसमध्ये आपल्याकडच्या मिथकांचा शंखनाद केला गेला. हे काय चाललं आहे? जग कुठे आहे आणि आपण कुठे चाललो आहोत?

प्रो. वेंकटरमण रामकृष्णन हे नाव  जीवशास्त्रातीलच नव्हे तर  भारतातल्या सर्वच विज्ञान क्षेत्राशी निगडित मंडळींसाठी फार जवळचे आहे. २००५ साली स्ट्रक्चर अ‍ॅण्ड फंक्शन ऑफ रिबोसोम (Structure & Function of ribosome) या कामासाठी त्यांना रसायनशास्त्रातले नोबेल पारितोषिक मिळाले आहे.  दरवर्षीप्रमाणे वेंकटरमण याही वर्षी भारतात आले, अनेक संशोधन संस्थांना त्यांनी भेट दिली, व्याख्यानं दिली; पण यंदा ते चर्चेत आले ते ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ साठी.

या काँग्रेसचे आयोजन हे मुख्यत: संशोधनासाठी चालना मिळावी आणि जगभरातल्या तसेच देशातल्या शास्त्रज्ञांचे कार्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे म्हणून केले जाते; पण सध्या ही परिस्थिती राहिलेली नाही, असं वेंकटरमण यांचं मत आहे. पंजाब विद्यापीठातील चर्चासत्रात त्यांनी सांगितले की, ‘इंडियन सायन्स काँग्रेस’ आता एका सर्कशीसारखी आहे. तिथे विज्ञानापेक्षा इतर गोष्टीच जास्तच चर्चिल्या जातात आणि यापुढे मी कधीही इंडियन सायन्स काँग्रेसला जाणार नाही.

वेंकटरमण रामकृष्णन यांच्यासारखा नोबेल विजेता शास्त्रज्ञ असे विधान करतो तेव्हा परिस्थिती खरोखरच गंभीर असते. त्यांच्या या विधानाला पाश्र्वभूमी आहे ती मागल्या वर्षी मुंबई विद्यापीठात पार पाडलेल्या १०२ व्या इंडियन सायन्स काँग्रेसची. त्या कार्यक्रमांमध्ये कार्यक्रमात वैदिक कालखंडावर चर्चा  करताना कॅ. आनंद बोडस यांनी असे विधान केले की सात हजार वर्षांपूर्वी भारतीयांनी विमानाचा शोध लावला होता. भारद्वाज ऋषींचा या कामात मोलाचा वाटा आहे. ‘विमानसंहिता’ या ग्रंथात याबद्दल बरंच लिहिलं आहे, वगैरे वगैेरे. वेंकटरमण रामकृष्णन यांच्या मते हे अशक्य आहे. ते खरं असेल तर त्याला पुराव्यांची गरज आहे.

हे वैदिक काळ प्रकरण मागच्या वर्षांपुरते सीमित न राहता या वर्षीही डोकावले. कारण आयसीएसच्या माहितीपत्रकात होते, लॉर्ड शिवा, अज अ ग्रेटेस्ट एन्व्हरॉनमेंटालिस्ट असलेले इन द वर्ल्ड, ब्लोन ऑफ शंख- अ‍ॅन इंडिजिनियस ट्रॅडिशन फॉर फिटनेस अ‍ॅण्ड वेलनेस हे पाहून अनेकांच्या मनात विचार आला की, खरंच हे १०३ वे इंडियन सायन्स काँग्रेस आहे की एखादी धार्मिक परिषद? हे कमी होते म्हणून की काय, म्हैसूरमध्ये नुकत्याच पार पाडलेल्या १०३ व्या आयसीएसमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांनी शंख वाजवून शंखाचे महत्त्व सांगितले. वर जगभरातल्या शास्त्रज्ञांपुढे हेही विधान केले की शंख वाजवल्यामुळे किंवा  शंखनादामुळे मानसिक विकार बरे होतात आणि पांढरे केस काळे होतात. सायन्स काँग्रेसमध्ये जिथे देशोविदेशीच्या तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांच्यासमोर असे सिद्ध न झालेले सिद्धांत मांडणे कितपत योग्य आहे, यामुळे भारताची विज्ञानजगात काय प्रतिमा होईल याचा कोणी विचार केला नाही. अशाच एका कारणामुळे आणि सीएसआयआर मिटिंगच्या संदर्भातील प्रकरणामुळे प्रो. पी. एम. भार्गव (सीसीएमबीचे डिरेक्टर) यांनी आपला पद्मभूषण पुरस्कार परत केला.

पुराणातल्या या उदाहरणांना मान्यता का द्यायची नाही याबद्दल प्रो. वेंकटरमण रामकृष्णन यांनी खूप नेमक्या शब्दांत स्पष्टीकरण दिले आहे. ते म्हणतात, कोणतेही तंत्रज्ञान हे विज्ञानाच्या पातळीवर सिद्ध करता आले पाहिजे.

मलेरियावर औषध शोधणाऱ्या शास्त्रज्ञाला २०१५ सालातल्या  नोबेल पारितोषिकाने गौरवण्यात आले. आयुर्वेदाच्या बाबतीतही तसेच करण्याची गरज आहे. आपल्याकडील जुन्या ज्ञानाला जागतिक पातळीवर अशी मान्यता मिळवून द्यायची असेल, तर सध्याच्या जगाच्या मूल्यमापनात त्याला सिद्ध करण्याची गरज आहे; पण उमा भारतींसारखेही करू नये. हिंदू पुराणांमध्ये गंगा नदी कैलास पर्वतावरून उगम पावली, असा उल्लेख आहे तेव्हा गंगेचे उगमस्थान गंगोत्री हे नसून कैलास आहे या शोधासाठी त्यांनी नॅशनल इन्सिटय़ुट ऑफ हायड्रोलॉजीला (NIH) कामाला लावले.

‘जुने ते सोने’, पण ते खरंच सोने आहे का याची शहानिशा आपण केली पाहिजे. वेंकटरमण रामकृष्णन यांच्या विधानाचा योग्य तो संदर्भ घेऊन त्या दिशेने जर काम केले तर भारतासाठी आणि विज्ञानासाठी ते सार्थ ठरेल. आपण काय करायचं ते ठरवायची आता वेळ आली आहे. पूर्वजांचे इतके गोडवे गात बसायचं की आपल्या हातून काहीच गौरवशाली निर्माण व्हायला वेळ आणि उर्जाच उरली नाही, असं होऊ नये.
सोमवल्ली दळवी – response.lokprabha@expressindia.com