News Flash

प्रकाशन व्यवसाय : असे घडते पुस्तक! भाग २

वाचनाची आवड अनेकांमध्ये निर्माण करणारं पुस्तक वाचकांपर्यंत येतं कसं?

प्रकाशन व्यवसाय : असे घडते पुस्तक! भाग २

वाचनाची आवड अनेकांमध्ये निर्माण करणारं पुस्तक वाचकांपर्यंत येतं कसं? ‘दुकानातून’ असं साधं, सरळ उत्तर तुम्ही द्याल. पण पुस्तक तयार करण्याची प्रक्रिया इतकी सोपी नसते. पुस्तक कसे घडते याविषयी..

पुस्तक हातात पडलं की काही जण एका बैठकीत ते वाचून पूर्ण करतात. त्या पुस्तकातल्या विषयाचा विचार करतात. काही वेळा त्यातल्या एखाद्या व्यक्तिरेखेत गुंतलेले असतात. तर काही वेळा त्यातल्या एखाद्या शब्दाने किंवा वाक्याने हरवलेले असतात. पण हे सगळं होत असताना ते पुस्तक त्यांच्यापर्यंत पोहोचलं कसं असेल; हाही बारीकसा विचार त्यांच्या मनात येऊन जातो. त्यावर ‘प्रकाशकाकडून दुकानापर्यंत आणि दुकानापासून माझ्यापर्यंत’ असं सोपं उत्तर मिळेल. पुस्तक तयार कसं होतं हा त्याच्या पुढचा प्रश्न. याचंही ‘लेखक लिहितो आणि प्रकाशक छापतो’ असं उत्तर मिळेल. पण या दोन उत्तरांतला पुस्तकाचा प्रवास खरं तर अर्धाच आहे. याचं र्अध उत्तर पुस्तक प्रक्रियेत दडलंय. लेखकाला एखादा विषय सुचणं ते पुस्तक तयार होऊन हातात पडणं हा संपूर्ण प्रवास जाणून घेणं महत्त्वाचं ठरतं.

एखाद्या पुस्तकाचा प्रवास हा लेखकापासून सुरू होतो तर एखाद्या पुस्तकाचा प्रकाशकापासून. म्हणजे कधी कधी लेखकाला एखादा विषय सुचला की तो त्यावर कथा, कादंबरी, वैचारिक किंवा अन्य साहित्य लिहितो. त्यानंतर प्रकाशन संस्थेकडे जाऊन पुस्तक प्रकाशित करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात होते. तर काही वेळा प्रकाशन संस्था एखाद्या लेखकाला विशिष्ट विषय देऊन त्याच्याकडून लिहून घेते. पुस्तक प्रकाशनप्रक्रियेतली ही पहिली पायरी असली तरी पुढच्या पायऱ्या साधारण सारख्याच असतात. प्रकाशनाच्या संपूर्ण रचनाप्रक्रियेत सगळ्यात महत्त्वाचा ठरतो तो प्रकाशक. कोणत्याही प्रकाशन संस्थेचा केंद्रबिंदू प्रकाशक असतो. यामध्ये त्यांच्यासोबत संपादकही असतात. संपादकांची जबाबदारी मजकूर संपादन त्यातील आशय, भाषा, मांडणी बघितली जाते. संहितेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत लेखकाशी चर्चा करणं, पुस्तकाचं डिझाइन बघणं, लेखकाकडून पुन्हा लिहून घेणं, कव्हर करून घेणं, ही सगळी संपादकांची जबाबदारी असते. संपादकांकडून मजकूर संपादित झाला की तो मजकूर प्रूफ रीडर्सकडे येतो. योग्य वाक्यरचना करणे, व्याकरणदृष्टय़ा अचूक करणं आणि शुद्धलेखन तपासणे हे प्रूफ रीडरचं काम असतं. यानंतर डिझायनिंग हा टप्पा येतो. यात लेआऊट डिझायनर आणि डीटीपी ऑपरेटर या व्यक्ती महत्त्वाची भूमिका बजावतात. संपूर्ण लेखन पुस्तकाच्या आकारात बसवणं, हेडर, चार्ट्स, चित्रं पुस्तकाच्या साच्यात योग्य पद्धतीने बसवणं हे डिझायनरचं काम असतं.

काही पुस्तकांमध्ये चित्रांची आवश्यकता असल्यामुळे या प्रक्रियेत चित्रकारही समाविष्ट असतात. पुस्तकाचा विषय लक्षात घेऊन चित्रकाराची निवड करून त्याच्यासोबत पुस्तकाविषयी चर्चा केली जाते. त्याला पुस्तकाची संकल्पना सांगितली जाते. पाककृतीच्या पुस्तकांचं गणित थोडसं वेगळं असतं. या पुस्तकासाठी पदार्थाच्या फोटोंची आवश्यकता असते. अशा पुस्तकांसाठी फोटो खास काढून घ्यावे लागत असल्यामुळे तो खर्च वाढतो. चरित्रात्मक पुस्तकातही फोटो असतात पण त्यात तयार फोटोंची पानं तयार करण्यात खर्च असतो. पाककृतीच्या पुस्तकांसाठी खास फोटो काढावे लागतात आणि त्यासाठी कागदही वेगळा वापरला जातो. त्यामुळे खर्च वाढतो. म्हणूनच कोणत्या पुस्तकाला काय आणि कसं हवं हेही बघावं लागतं. यासाठी फोटोग्राफरशी संवाद साधणं गरजेचं असतं.

पुस्तकाचा आकर्षक बिंदू म्हणजे त्याचं मुखपृष्ठ. हे मुखपृष्ठ उत्तम झालं तरच वाचकाला आकर्षित करतं. खास मुखपृष्ठासाठी विशिष्ट डिझायनरची नेमणूक केली जाते. पुस्तकाचा विषय, बाज, आशय बघून त्याचं मुखपृष्ठ ठरतं. प्रकाशक, संपादक, लेखक आणि आर्टिस्ट अशा चौघांची मतं यामध्ये महत्त्वाची ठरतात. प्रकाशक मार्केटिंगच्या दृष्टीने मत देतो, संपादक-लेखक आशय लक्षात घेऊन त्यांचे विचार मांडतात. तर आर्टिस्ट त्याला डिझाइनचे कोणकोणते घटक त्यात हवेत, यावर भाष्य करतो. अशा प्रकारे या तिन्ही मतांचा एकत्रित विचार करून मुखपृष्ठाचा अंतिम निर्णय घेतला जातो.

पुस्तकाच्या डिझाइनचं काम झालं की छपाईसाठी हालचाल सुरू होते. छपाई (प्रिंटिंग) करताना कागद निवडीचाही विचार करावा लागतो. डायमंड प्रकाशनाचे नीलेश पाष्टे सांगतात, ‘कथा-कादंबऱ्या असलेल्या पुस्तकाच्या छपाईसाठी हलक्या, पिवळसर छटेच्या कागदाला प्राधान्य दिलं जातं. वैचारिक पुस्तकांना पांढरा कागद वापरला जातो. इंग्रजी पुस्तकांमध्ये सर्वसाधारणपणे नैसर्गिक रंग असलेला कागद वापरला जातो. हा कागद दिसताना जाड असतो पण वजनाला हलका असतो. त्यामुळे पुस्तक जड होत नाही. असा कागद वापरण्याचा ट्रेण्ड सध्या इंग्रजीमध्ये दिसतो. मराठीतही तो आता हळूहळू येतोय. त्यामुळे पुस्तक हाताळायला सोपं जातं.’ छपाईमध्ये कागदाबरोबरच रंगांनाही महत्त्व असतं. छपाई करताना तांत्रिक बाबी लक्षात घेता रंगांचं गणित आखावं लागतं. मनोविकास प्रकाशन संस्थेचे  अरविंद पाटकर याविषयी सविस्तर सांगतात, ‘ प्रिंटिंग फोर कलर की सिंगल कलर करायचं हे ठरवलं जातं. सलग मजकूर असेल तर तो ब्लॅक अ‍ॅण्ड व्हाइटमध्ये छापता येतो. काही पुस्तकांमध्ये चित्र असतात. तर काही पुस्तकांत रंगीत फोटो टाकायचे असतात. फोटो असतील तर फक्त फोटो रंगीत करता येत नाही. तर ते संपूर्ण पानच रंगीत करावं लागतं. याला फोर कलर म्हणतात. याचा खर्चही वाढतो. पुस्तकाच्या छपाईप्रमाणेच त्याची बांधणीही ठरवावी लागते. शिलाई की हार्डबाऊण्ड बांधणी करायची हे ठरवलं जातं.’

लेखक, संपादक आणि प्रकाशक यांच्यात लेखनाविषयी चर्चा होणं खूप गरजेचं असतं. पूर्वीच्या काळी श्री. पु. भागवत, रामदास भटकळ, दिलीप मांजगावकर यांसारखे अनेक संपादक-प्रकाशक हे लेखकांशी वेगवेगळ्या विषयांवर सातत्याने चर्चा करायचे. त्यांच्या लेखनातील दुरुस्ती सांगून त्यांना पुन्हा लिहायला लावायचे. त्या संपादकांना भाषेची, लेखनाची जाण होती. भाषेवर प्रभुत्व होतं. योग्य आणि अचूक लेखन वाचकापर्यंत पोहोचवायची कळकळ होती. त्यामुळे पूर्वीचे काही संपादक आवर्जून लेखकांशी चर्चा करायचे. नवनवीन माहितीची देवाणघेवाण करायचे. आता या चर्चेला वेगळं स्वरूप प्राप्त झालं आहे. प्रकाशकांची आताची पिढी या संपूर्ण क्षेत्राकडे केवळ पिढीजात काम असं न बघता व्यवसाय म्हणूनही बघते, हे विशेष. अरविंद पाटकर सांगतात, ‘कधी लेखक आमच्याकडे कथा-कादंबऱ्या घेऊ येतात, तर कधी आम्ही लेखकाला विशिष्ट विषय देऊन त्यांच्याकडून लिहून घेतो. आम्ही प्रकाशित करत असलेल्या पुस्तकांच्या लेखनाला अशी सुरुवात होते. आमच्याकडे आलेली कादंबरी सर्वप्रथम संपादक विभागात वाचली जाते. कधीकधी तिची गुणवत्ता चांगली असते, पण तिचं विक्रीमूल्य कमी असतं. तरी ती स्वीकारली जाते. कारण लेखकाचं नाव आणि त्याचं लेखन या दोन्हीत ताकद असते. त्यामुळे त्यात विक्रीच्या दृष्टीने लेखकाशी चर्चा करून योग्य ते बदल लेखकाकडून करून घेतले जातात. लेखकाशी संवाद होणं खूप महत्त्वाचं असतं. लेखक आता टाइप करून देत असले तरी त्यात वाक्यरचना, शुद्धलेखन, भाषाशैली हे बघावं लागतं.’

पुस्तकाची छपाई पूर्ण करण्याआधी त्याची किंमत निश्चित करावी लागते. याबद्दल रोहन प्रकाशनचे रोहन चंपानेरकर सविस्तर माहिती देतात. ‘पुस्तकाचा विषय आणि वाचकाला नेमकं काय आवडेल याबद्दल अनेकदा अंदाजच बांधले जातात. हे अंदाज कधी चुकतात, तर कधी बरोबर येतात. पुस्तकांचं सिनेमासारखं असतं. सिनेमा किती चालेल याचा फक्त अंदाज बांधता येतो; तसंच पुस्तकाचंही आहे. विषय, मांडणी, बाजारपेठेचा अंदाज हे सगळं विचारात घेऊन पुस्तकाची किंमत ठरवली जाते. कधीकधी पुस्तकाच्या किमतीवर त्याची विक्री अवलंबून असते. पुस्तकाची किंमत कमी ठेवली तर विक्री जास्त होऊ शकते आणि किंमत जास्त ठेवली तर विक्री कमी होऊ शकते. मराठी वाचक पुस्तकाच्या किमतीबाबत खूप विचार करतो. इंग्रजी पुस्तकांची किंमत जास्त असूनही ती पुस्तकं विकत घेतली जातात. पण मराठी पुस्तकांची किंमत जास्त ठेवली तर ती घेतली जात नाहीत. आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक अशा विषयांच्या पुस्तकांची किंमत जास्त ठेवता येत नाही. पण साहित्यविषयक पुस्तकाची किंमत थोडी जास्त ठेवली तर ते विकत घेतलं जाऊ शकतं. अनेकदा रोहन प्रकाशन पुस्तक अधिकाधिक वाचकांपर्यंत पोहोचवण्याच्या हेतूने पुस्तकांची किंमत कमी ठेवतं. पुस्तकाच्या जास्त प्रती वाचकांपर्यंत पोहोचल्या तर संच म्हणून त्याचे पैसे जास्त मिळतात. पुस्तक विक्रीची ही कार्यपद्धती प्रकाशन संस्थांच्या विचारसरणीशी जोडली जाते. ती प्रत्येक प्रकाशन संस्थेपरत्वे बदलत जाते. पुस्तकाच्या हजार-दोन हजार प्रती विकून तिथेच थांबायचं की आणखी प्रती वाचकांपर्यंत पोहोचवायच्या, हे प्रत्येक प्रकाशन संस्थेने ठरवायला हवं.’ एका पानाला सव्वा रुपये यानुसार पुस्तकाची किंमत ठरवण्याचा ट्रेण्ड सध्या आहे. म्हणजे १०० पानांच्या पुस्तकाची किंमत १२५ रुपये इतकी आहे. खरंतर प्रति पान सव्वा रुपया ही किंमत आधी कमी होती. त्यानंतर ती एक रुपये एवढी झाली. गेल्या दोन वर्षांत यात वाढ होऊन सव्वा रुपया इतकी झाली आहे.

पुस्तकाची किंमत ठरली की त्याचं विपणन (मार्केटिंग) आणि विक्री याकडे लक्ष दिलं जातं. पुस्तकाचा विषय, लिखाण, हेतू या सगळ्याचा विचार करून त्यानुसारच मार्केटिंगचं तंत्र आणि बजेट ठरवलं जातं. मार्केटिंगचं बजेट पुस्तक आणि प्रकाशन संस्थांपरत्वे बदलत जातं. पुस्तकाच्या मार्केटिंगचे दोन प्रकार आहेत. डायरेक्ट टू कन्झ्युमर आणि सेलिंग चॅनल्स. डायरेक्ट टू कन्झ्युमर म्हणजे वर्तमानपत्र, मासिकांमधल्या जाहिरातींमार्फत विक्री आणि सेलिंग चॅनल्स म्हणजे ऑनलाइन, पुस्तकांची दुकानं, पुस्तकांची प्रदर्शनं इ.मार्फत होणारी विक्री. पुस्तकाच्या विक्रीसंबधी एक गोष्ट महत्त्वाची असते. प्रकाशकांचा दुकानदारांशी थेट संबंध असावा लागतो. त्यांची वितरण व्यवस्था सक्षम आणि ताकदीची असली की पुस्तकाच्या विक्रीवर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो. यासाठी राज्यभरातील दुकानदारांची माहिती असायला हवी.

या संपूर्ण व्यवसायात लेखकाचं मानधन आणि वितरकांचं कमिशन या अत्यंत महत्त्वाच्या बाबी आहेत. लेखकाचं मानधन विशिष्ट साच्यात ठरलेलं नसतं. ते प्रत्येक लेखकानुसार बदलत जातं. रोहन चंपानेरकर सांगतात, ‘समजा, २०० रुपये किंमत असलेल्या एका पुस्तकाच्या १००० प्रतींच्या एका आवृत्तीचा विचार केला तर ती आवृत्ती दोन लाख रुपयांची होते. वितरण, वाहतूक, प्रकाशन संस्थेचं कार्यालय हा सगळा खर्च यामधून होतो. यात वितरणाचा खर्च सगळ्यात जास्त असतो. वितरणाचं कमिशन साधारणपणे २५ ते ४० टक्के दिलं जातं. लेखक-प्रकाशकाच्या पुस्तकासंबंधी चर्चेतून लेखकाचं मानधन ठरतं. तर अनुवादित पुस्तकांचं स्वरूप थोडं वेगळं असतं. अनुवादाच्या पुस्तकांबद्दल मूळ हक्कधारकाशी बोलणी करून हक्क घेतले जातात आणि त्यानंतर मराठीत अनुवाद करणाऱ्यांसाठी योग्य अनुवादक निवडला जाऊन त्याचाही खर्च प्रकाशकाला करावा लागतो.’ याच मुद्दय़ावर नीलेश पाष्टे स्पष्ट करतात, ‘पुस्तकाचा वाचक किती आहे आणि लेखक आणि प्रकाशक यांच्यातील सामंजस्यातून लेखकाचं मानधन ठरतं. काहींना पुस्तक प्रकाशित झाल्यावर एकरकमी विशिष्ट रक्कम दिली जाते. त्यामुळे त्यानंतर पुस्तकाचा खप होवो न होवो त्याच्यावर लेखकाचं मानधन अवलंबून राहत नाही. पुस्तकावरील किमतीच्या (एमआरपी) विशिष्ट टक्केवारीत मानधन दिले जाते. ही टक्केवारी पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्या आहेत यावर अवलंबून असते. एका वर्षांत लेखकाच्या पुस्तकाच्या किती प्रती विकल्या गेल्या याची आकडेवारी लेखकाला दिली जाते. त्यानुसार गणित करून त्यांना मानधन दिलं जातं. पुस्तकावरील किमतीच्या साधारणपणे ५ ते १२ टक्के इतके लेखकाला दिले जातात. लोकप्रिय आणि नावाजलेल्या लेखकासाठी ही टक्केवारी १५ टक्के इतकी असते.’

सध्या हौशी नवोदित लेखकांचीही संख्या वाढतेय. असे लेखक त्यांचं लेखन घेऊन प्रकाशकांना गाठतात. पण त्यांच्या लेखनाचा आणि त्यांच्या वाचकांचा अंदाज येत नसल्यामुळे प्रकाशक त्यांची पुस्तक छापताना विचार करतात. त्यांच्याशी कशा प्रकारे व्यवहार केला जातो हे नीलेश पाष्टे सविस्तर सांगतात, ‘एखादा विषयाचा वाचक खूप कमी आहे, तो विषय लिहिणारा लेखकही फार नावाजलेला नाही, विक्रीचे स्पष्ट चित्र नाही, अशा परिस्थितीत प्रकाशक अशा लेखकाला नकार कळवतात. त्याच्या पुस्तकाला व्यावहारिकदृष्टय़ा विक्री नाही, वाचक नाही. त्यामुळे त्यात पैसे गुंतवू शकत नाही, असं सांगतात. पण काही वेळा प्रकाशक त्यांचं पुस्तक छापतातही. पण त्या पुस्तकाच्या काही प्रती लेखकाने बायबॅक कराव्यात म्हणजे त्यांनीच विकत घ्याव्यात किंवा थेट काही रक्कम भरावी असं सांगितलं जातं. कारण त्यातून प्रकाशकाचा खर्च सुटतो. अशा परिस्थितीत थेट रक्कम भरण्याला व्हॅनिटी प्रेस अशी संज्ञा वापरली जाते. या सगळ्यात प्रकाशकाला धोका नसून लेखकाला असतो. पुस्तकाच्या पहिल्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळाला तर त्याच्या दुसऱ्या आवृत्तीचं स्वरूप इतर पुस्तकांप्रमाणे ठरवलं जातं.’

एकुणात, पुस्तक निर्मितीप्रक्रियेत प्रकाशक, लेखक, संपादक, प्रूफ रीडर, लेआऊट डिझायनर, कव्हर डिझायनर, चित्रकार, फोटोग्राफर, मार्केटिंग विभाग हे सगळे घटक महत्त्वाचे असतात. प्रत्येक प्रकाशन व्यवस्थेने अशा प्रकारची चांगली यंत्रणा उभी करणं अपेक्षितच आहे. डीटीपी ऑपरेटर, वाक्यरचना, व्याकरणाची जाण असणारा प्रूफ रीडर, भाषेवर प्रभुत्व असणारा संपादक, चित्रभाषा जाणणारा चित्रकार, पिंट्रिंगचं तांत्रिक अचूक ज्ञान असणारा, उत्तम बाइंिडग करणारा; अशा व्यक्ती प्रत्येक प्रकाशन संस्थेत असाव्याच लागतात. लेखक, संपादक, प्रकाशक, प्रूफ रीडर यांच्यासह इतरांचंही वाचन चांगलं हवं. ही सगळी तज्ज्ञ मंडळी असतील तरच चांगली पुस्तकं काढू शकतील आणि वाचकांपर्यंत ती योग्य प्रकारे पोहोचतील.
चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com, @chaijoshi11

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 10, 2017 1:03 am

Web Title: book publication this is how book gets published part 2
Next Stories
1 एका स्वप्नाची पूर्ती…
2 अरुपाचे रूप : ‘माती’चे मोल
3 प्रकाशन व्यवसाय : पुस्तकांची बदलती दुनिया (भाग १)
Just Now!
X