News Flash

दखल : कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेतील अनंत भावे यांची पुस्तकं

या पुस्तकात दुसऱ्या महायुद्धातल्या काही कथा दिल्या आहेत.

38-lp-book युद्धस्य कथा: रम्य: असं म्हटलं जातं असलं  तरी खरं तर युद्ध, त्यातून होणारा विनाश, सामान्यांना बसणारा त्याचा फटका या सगळ्याबद्दलही जाणीव ठेवणं आवश्यक आहे. या पुस्तकात दुसऱ्या महायुद्धातल्या काही कथा दिल्या आहेत. पहिल्या ‘जे पेरले ते उगवते’ या कथेत जर्मन गेस्टापोंपासून एका ज्यू माणसाला वाचवणाऱ्या वैमानिकाची गोष्ट सांगितली आहे. पुढे त्याच्या विमानाला अपघात होतो, त्याच्या मेंदूला मार लागतो आणि योगायोगाने त्याने ज्याला वाचवलेलं असतं तो मेंदूचा डॉक्टर असतो. तो या वैमानिकाला शोधून त्याच्यावर शस्त्रक्रिया करतो आणि त्याला वाचवतो. ‘विंगेटची सर्कस’ या कथेत जपानी आक्रमण थोपवण्यासाठी भारतातून ब्रह्मदेशात गेलेल्या गनिमी काव्याने लढू शकणाऱ्या आठ ब्रिटिश तुकडय़ांचा पराक्रम वर्णन केला आहे. जपान्यांच्या टेहळणी चौक्या उद्ध्वस्त करत, त्यांचे दारूगोळ्याचे साठे नष्ट करत, विमानतळ, रस्ते, पूल यांची दुर्दशा करत या तुकडय़ा म्हणजेच चिंडिट्स सुखरूप भारतात परततात. तर शौर्य कशाला म्हणतात या कथेत युद्धभूमीवर जखमा झाल्यानंतरही झुंजत राहणाऱ्या प्रमुखाची गोष्ट आहे. याशिवाय व्हिक्टोरिया, याच्यामुळे लंडन वाचलं, रोनेलचं खरोखर काय झालं, हिटलरचे अखेरचे दिवस या कथाही वाचनीय आहेत.
दुसरे महायुद्ध, काही कथा, मूल्य : ७५ रु., पृष्ठे- ६७

40-lp-bookहेरगिरी या क्षेत्राबद्दल सामान्य माणसाच्या मनात कमालीचं कुतूहल असतं. हेर म्हणून काम करणाऱ्या व्यक्तीचं अपेक्षित वैशिष्टय़च मुळात तो हेर आहे, हे कधीच कुणालाच कळू नये, हे असतं. त्याची ओळख आसपासच्या वातावरणात अशी विरघळून गेली पाहिजे की तो त्या सगळ्या वातावरणाचाच भाग वाटला पाहिजे. त्याचं वेगळेपण कुणाला जाणवतादेखील कामा नये. अशाच  रुडॉल्फ एबेल या अमेरिकेत राहून रशियासाठी हेरगिरी करणाऱ्या गुप्तहेराचं चरित्र ‘दोन चेहऱ्यांचा हेर -रुडॉल्फ एबेल’ या पुस्तकात आहे. कनक बुक्सच्या कुमारांसाठीच्या पुस्तकमालिकेत हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले आहे. अमेरिकेत चित्रकार म्हणून वावरणारा, मित्र, शेजारीपाजारी यांच्या मनात आदराचं स्थान मिळवणारा हा गुप्तहेर आपल्याच हेहानेन नावाच्या सहकाऱ्याच्या फंदफितुरीमुळे पकडला जातो. एबेल हेर म्हणून किती तयारीचा असतो, याची माहिती हे पुस्तक देतं. हेरगिरीच्या विश्वातली गुप्तपणे केली जाणारी संदेशांची देवाणघेवाण, त्यासाठीच्या पद्धती, त्यासाठी घेतली जाणारी काळजी या सगळ्याबद्दलचे विस्मयजनक तपशील पुस्तकात आहेत.
दोन चेहऱ्यांचा हेर, रुडॉल्फ एबेल, मूल्य ६० रुपये, पृष्ठे- ५१

39-lp-bookया पुस्तकातली पहिलीच ‘बघा आमच्या डॅनीबॉयला – बाईक टूच्या अ‍ॅडमध्ये’ ही कथा मस्त आहे. आई गावाला गेल्यावर बाबांच्या अ‍ॅडव्हर्टायझिंगच्या ऑफिसमध्ये गेलेल्या सनी आणि डॅनी या दोन छोटय़ा भावांची ही गोष्ट. तिथे बाईकच्या जाहिरातीमध्ये डॅनीची निवड कशी होते, ती गंमत कथेत आहे. ‘मगरी मनातल्या’ या कथेत जंगलात कुटुंबाबरोबर फिरायला गेलेला छोटासा जॉनो, त्याचा मित्र बेन्नी यांची गोष्ट आहे. बाबांनी जंगलात कोणकोणती काळजी घ्यायची, कुठेकुठे जायचं नाही याची सगळी माहिती दिलेली असते. जॉनो त्या सगळ्या सूचना उधळून लावतो आणि बाबांनी ज्या गोष्टी करायच्या नाहीत म्हणून सांगितलेल्या असतात, त्या सगळ्या करतो. त्याला एकटं कसं सोडायचं म्हणून बेन्नो त्याच्या मागोमाग जात राहतो. नदी ओलांडताना जॉनो नीट परत येतो आणि बेन्नो मात्र अडकतो. त्याचा पाय गवतात अडकलेला असतो आणि त्याला वाटतं की मगरीनेच त्याचा पाय पकडलाय. अशा रीतीने मगर त्याच्या मनातच असते. तर ‘अहो परग्रहावर ऑमलेटच नाही’ या गमतीशीर कथेत दोन भाऊ, त्यांची आई, शेतात दिसणारी अतक्र्य वर्तुळं या सगळ्यामधून परग्रहवासींची एक गमतीशीर शक्यता या कथेत मांडली आहे.
मगरी मनातल्या, मूल्य : ४० रुपये, पृष्ठे : ३६

41-lp-bookडोंगरगावची चेटकीण या कथेत चेटकीण धमाल आहे. डोंगरगावातल्या एका शेतकऱ्याची झिम्मड नावाची मुलगी आपल्याला सुरुवातीलाच भेटते. तिला छंद असतो, डोंगरदऱ्यातून फिरायचा. डोंगरदऱ्यांमधून तिला मिळणाऱ्या चित्रविचित्र गोष्टी गोळा करून ठेवायच्या आणि नंतर सगळ्या मुलांना दाखवायची तिला आवड असते. त्याच गावात एका डोंगरावर एका निर्मनुष्य घरात घुबडाबाई नावाची बाई राहात असते. ती कधीच कुणातच मिसळत नसते. ती चेटकीण आहे, असा सगळ्यांचा समज असतो. रानोरानी फिरणाऱ्या झिम्मडलाही तिच्या आईबाबांनी घुबडाबाईपासून लांब राहायला सांगितलेलं असतं. पण परिस्थितीच अशी येते की झिम्मड घुबडाबाईच्या वाडय़ात जाते आणि तिची घुबडाबाईशी कशी मस्त मैत्री होते त्याची गम्मत या कथेत आहे. ‘लिफ्ट देता का प्लीज’ या कथेत बीएमडब्ल्यू ही महागडी कार घेऊन लंडनला निघालेल्या एका तरुण मुलाला हातसफाईत जबरदस्त तरबेज असलेला एक माणूस लिफ्ट मागतो आणि मग त्यांच्या प्रवासात काय काय होतं, ते गमतीशीररीत्या सांगितलं आहे. जवळजवळ ती गोष्ट पूर्ण होईपर्यंत आपल्याला त्यात पुढे काय काय होणार ते समजतच नाही, इतकी ती उत्कंठावर्धक आहे.
डोंगरावरची चेटकीण, मूल्य : ५० रु., पृष्ठे : ४३

42-lp-bookचांगल्या हेराचं लक्षण म्हणजे तो ज्यांच्यामध्ये वावरत असतो, तिथल्या सामान्य माणसांना तो कुणी तरी वेगळा वैशिष्टय़पूर्ण माणूस न वाटता त्यांच्यामधलाच एक वाटतो. त्याच्याबद्दलच्या खऱ्या गोष्टी लोकांपर्यंत कधीच पोहोचत नाहीत. अशा हेरांच्या विविध कथा प्रसिद्ध आहेत. हेरगिरीचं विश्व इतकं गूढ आहे, की त्यामुळेच त्याचं बहुतेकांना कमालीचं आकर्षण असतं. जॉर्जिना हार्डिग यांनी लिहिलेली ‘द स्पाय गेम’ ही कादंबरीही एका हेर स्त्रीच्या कुटुंबावरची, विशेषत: तिच्या मुलांवरची कादंबरी. १९६१ मध्ये लंडनमध्ये कॅरोलीन नावाची एक स्त्री सकाळीसकाळी दाट धुक्यामध्ये गाडी घेऊन बाहेर पडते आणि ती परत येतच नाही. तिच्या लहान मुलांना ती अपघातात मरण पावली एवढंच सांगितलं जातं. हा एवढाच तपशील घेऊन जगणारी अ‍ॅना आणि पीटर ही तिची दोन लहान मुलं नंतर कशी वाढतात, आईच्या नाहीसं होण्याचा आणि ती हेर होती, या कुजबुजीचा त्यांच्यावर नेमका काय परिणाम होतो, आपल्या आईचा इतिहास नेमका काय होता, तिचं नेमकं काय झालं याचा शोध घेण्याची प्रेरणा तिच्या मुलीमध्ये कशी निर्माण होते या सगळ्याची मांडणी या कादंबरीत करण्यात आली आहे.
हेरगिरीचा पोरखेळ, डॉर्जिना हार्डिग, अनुवाद : उज्ज्वला गोखले, मेहता पब्लिशिंग हाऊस, पृष्ठे : २३०, मूल्य :२४०

43-lp-bookशेरलॉक होम्सच्या प्रेमात असलेले भलेभले लोक लंडनला गेले की ‘२२१ बी- बेकर स्ट्रीट’ हा शेरलॉक होम्सचा पत्ता शोधायला निघतात, कारण त्यांच्या दृष्टीने शेरलॉक होम्स हा कुणी काल्पनिक गुप्तहेर नसतोच. तो या जगात अस्तित्वात असलेला खराखुरा माणूसच असतो. ही माोहिनी आहे, सर आर्थर कानन डायल यांनी आपल्या अचाट कल्पनाशक्तीतून निर्माण केलेल्या शेरलॉक होम्स या व्यक्तिरेखेची. जगभरातल्या वाचकांना तो नेहमीच भुरळ घालत आला आहे. एखाद्या घटनेची उकल करण्याचं त्याचं बुद्धिकौशल्य, त्याची अचाट तर्कशक्ती या सगळ्यांनी शेरलॉक होम्सच्या कथा-कादंबऱ्यांना एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं आहे. साधारण सव्वाशे वर्षांपूर्वी डायल यांनी लिहिलेल्या होम्सकथा-कादंबऱ्या आजही ताज्या टवटवीत वाटतात. काळाच्या मर्यादा पार करून त्या पुढे आलेल्या आहेत, हे त्यांचं यश आहे. रहस्यकथांचा मापदंड ठरतील अशा होम्स मालिकेतल्या चार कादंबऱ्या, पाच कथासंग्रह त्यांनी लिहिले. त्यांच्यावर सिनेमे, टीव्ही मालिका, नाटकं निघाली. पुस्तकं तर अजूनही वाचली जातातच. तरीही शेरलॉक होम्स या व्यक्तिरेखेची गोडी आजही कमी झालेली नाही. दिलीप चावरे यांनी अनुवाद केलेल्या या पुस्तकात शेरलॉक होम्सच्या सात कथा आहेत. त्यातली पहिली ‘रिकाम्या घराचं रहस्य’ या कथेत रोनाल्ड अडेर यांच्या खुनाचा तपास करण्याचा प्रयत्न करणारा डॉ. वॉटसन आपल्याला सांगतो की, एका प्रकरणाच्या तपासादरम्यान दरीत पडून शेरलॉक होम्सचा मृत्यू झाला असा आहे. सगळं जग तसंच समजत असताना अचानक वेगळ्या वेशात शेरलॉक होम्सच त्याच्यासमोर येऊन उभा राहतो आणि मग वॉटसनला अवघड वाटलेलं ते प्रकरण सहज उलगडून दाखवतो. त्याशिवायच्या सगळ्याच कथा अतिशय उत्कंठावर्धक आहेत.
शेरलॉक होम्सचं पुनरागमन, डायमंड पब्लिकेशन्स, सर आर्थर कॉनन डायल, अनुवाद दिलीप चावरे, पृष्ठे : १७८, मूल्य : १९५ रुपये

44-lp-book‘तुटलेल्या बोटाचे संदर्भ’ या किरण डोंगरदिवे यांच्या कवितासंग्रहातील कविता मोजक्या शब्दांत नेमका आशय मांडतात. या कविता वेदनेचे गाणे गाणाऱ्या असल्या तरी त्या वेदना आत्मकेंद्रित नाहीत. त्यामुळेच कवीला असलेले सामाजिक भान त्याच्या कवितांमधून ठिकठिकाणी व्यक्त होते. धर्माच्या नावाखाली काय चाललंय हे सांगताना कवी म्हणतो,
केशराची शेती, उगवे बंदूक, गोळ्यांचा संदूक, भरलेला

‘तुटलेलं बोट’ हा संदर्भ भारतीय माणूस आपसूकपणे एकलव्याशी जोडतो. तिथपासून तो संदर्भ कवीने पाच कवितांमधून आजच्या काळाशी जोडत आणला आहे. ‘तुटलेल्या बोटाचे संदर्भ’ ही कविता एकलव्याचा आकांत मांडते, पण तो आकांतही द्रोणाला, समाजाला प्रश्न विचारणारा आहे, तर ‘तुटलेल्या बोटाचे शापित संदर्भ’ ही कविता आहे कर्णाची वेदना मांडणारी. त्याच्या मनगटात ताकद आहे, त्याच्याकडे कवचकुंडलांचं तेज आहे, पण तो आपलं मूळ सांगू शकत नाही, म्हणून त्याला समाजमान्यता नाही. हे दु:ख एकटय़ा कर्णाचं नाही, तर लायकी असतानाही संधी नाकारल्या गेलेल्या प्रत्येकाचंच आहे.

तर ‘तुटलेल्या बोटाचे बदललेले संदर्भ’ या कवितेतला एकलव्य द्रोणाचार्याना ठणकावून सांगतो की, मी माझा अंगठा देणार नाही आणि दगडाकडूनही दीक्षा घेणार नाही. तेव्हा तुम्हीच आता गुरुशिष्याचं नातं भेदापलीकडे न्या आणि पवित्र ठेवा. मी मात्र यापुढे शब्दामध्ये अडकणार नाही. तुमच्या शिष्योत्तमांनी बाणाच्या टोकावर सूर्य झेलले तरी मी रानातला काजवाही माझ्या तीरांनी मारणार नाही.

‘तुटलेल्या बोटाचे शैक्षणिक संदर्भ’ या कवितेत कवी म्हणतो,

पिको अक्षरांचा मळा

कोरा न राहो फळा

दिवसभर

या संस्कृतीमध्ये कुणा भिल्लपुत्रावर रडायची वेळ येऊ नये अशीही याचना कवी या कवितेतून करताना दिसतो.

‘तुटलेल्या बोटाचे अनुत्तरित संदर्भ’ या कवितेत कवीला त्याचा अंतर्आत्मा एक मार्मिक प्रश्न विचारतो की, एकलव्याचं बोट मागणारा परका होता, पण प्रज्ञासूर्याचं दिशादर्शक बोट छाटून त्याच्या वैचारिक क्रांतीला तिलांजली देणारे आपलेच होते ना?
तुटलेल्या बोटाचे संदर्भ, किरण डोंगरदिवे, नभ प्रकाशन; पृष्ठे : १४०, मूल्य : १२० रुपये
response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 13, 2016 1:07 am

Web Title: book review 81
Next Stories
1 प्रतिक्रिया : आस्तिक नास्तिक
2 खटय़ाळ टॉम-जेरी
3 छोटय़ांचा दोस्त
Just Now!
X