प्राण्यांच्या विश्वाने माणसाला आजवर नेहमीच भुरळ घातली आहे. त्या प्रकारातली ‘कॉल ऑफ द वाइल्ड’ ही कादंबरी आहे एका कुत्र्याची. बक नावाचा हा विलक्षण कुत्रा त्याच्या आयुष्याची गोष्ट सांगता सांगता बघता बघता आपल्या मनात घर करतो. माणूस आणि कुत्रा यांच्यामधल्या हृदयस्पर्शी नातेसंबंधांची उदाहरणं आपण ऐकलेली, वाचलेली असतात. अशा नात्यात गुंतूनही आपल्या अंतरंगातली आदिम हाक ऐकून तिला प्रतिसाद देणारा बक ही गोष्ट घडते ती साधारणपणे एकोणिसाव्या शतकाच्या शेवटी. कॅनडामधल्या क्लोंडाइक प्रांतात सोन्याच्या हव्यासाने जगभरातून लोक गोळा होत होते. त्यांच्यासाठी लागणारं सामानसुमान बर्फाच्या गाडीवरून ओढून नेण्यासाठी तिथे कुत्र्यांचा वापर केला गेला. त्यासाठी ठिकठिकाणांहून दणकट कुत्री अक्षरश: चोरून गोळा केली गेली. त्यातच समावेश होता एका सुखवस्तू घरातल्या प्रेमात वाढवल्या गेलेल्या सेन्ट बर्नार्ड जातीच्या १४० पौंड वजनाच्या बकचा. सॅन्टा क्लारा खोऱ्यातल्या मिलर यांचा तो लाडका कुत्रा. त्यांच्या वाडीत त्याचं जणू साम्राज्यच असायचं. त्याची बडदास्तही त्याच्या इतमामाला साजेशी ठेवली जायची; पण एके दिवशी मिलरसाहेबांच्या माळ्याचा मॅन्युअल हा मदतनीस बकला गोड बोलून भुलवत त्या परिसरातून बाहेर काढतो आणि विकून टाकतो. संबंधित टोळीकडून त्याला तिथून ताबडतोब हलवलं गेलं आणि मग सुरू झाला त्याचा जीवनसंघर्ष. त्याला ज्या प्रवृत्तींचा कधीही अनुभव नाही, अशा प्रवृत्तीची अनोळखी, उद्दाम, क्रूर माणसं, वेगवेगळ्या ठिकाणांहून गोळा झालेले वेगवेगळे कुत्रे, बर्फावरून जड सामान हाकत घेऊन जाण्यासाठीची त्यांची सगळ्यांची कवायत. सातत्याने डायी घळीपासून डॉसनपर्यंतचा आणि परत उलट असा त्यांचा प्रवास, वाटेत आलेले वेगवेगळे अनुभव, निसर्ग, या सगळ्यात बक वेगवेगळ्या गोष्टी शिकत जातो. त्याला पूर्वीच्या मालकाच्या घरातलं, मिलरसाहेबांच्या घरातलं जगणं आठवतंच नाही असं नाही, पण सततची भटकंती, उघडय़ा आकाशाखाली वावरणं हे सगळं त्याला त्याच्या अधिक अंतर्मनात घेऊन जातं. या मनातूनच त्याला फार पूर्वीपासून कसकसल्या हाका ऐकू येत असतात. आजवर दडपलेल्या या हाकांना तो नीट लक्ष देऊन ऐकायला लागतो. या प्रवासात त्याला इतर कुत्र्यांशी जीवघेणा संघर्ष करावा लागतो. तर कधी उपासमारीची वेळ येते. कुत्र्यांच्या टोळीचा प्रमुखपदाचा अधिकार मानाने मिळत नाही तेव्हा तो हा अधिकार ताकदीच्या बळावर हिसकावून घेतो. याच प्रवासात त्याला एका टप्प्यावर त्याच्यावर जिवापाड प्रेम करणारा थॉरटन भेटतो आणि एक अद्भुत असं मैत्र जुळतं. या मैत्रीतूनच ते पूर्वेकडचा एका खाणीचा प्रवास करतात आणि तिथल्या जंगलात बकला आपल्या मनातली आदिम हाक नेमकी कशाची आणि कुणाची होती हे समजतं आणि त्या हाकेला प्रतिसाद देत तो कायमचा लांडग्यांच्या टोळीबरोबर निघून जातो.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ही सगळी कहाणी वाचताना कधी आपल्या अंगावर रोमांच उभे राहतात, तर ज्या विपरीत परिस्थितीत बक आणि बाकीचे सगळेच अडकतात, त्यामुळे कधी अंगावर काटा येतो. माणूस विरुद्ध निसर्ग हा नेहमीचाच संघर्ष; पण इथे एक कुत्रा विरुद्ध माणूस विरुद्ध निसर्ग असं या संघर्षांचं स्वरूप आहे. त्याला माणूस आणि कुत्र्याच्या प्रेमळ नात्याचा एक पदरही आहे आणि त्याही पलीकडे आहे, जगण्याच्या संघर्षांतही स्वत:च्या मनातल्या आदिम हाकेला प्रतिसाद देण्याची मूलभूत, नैसर्गिक प्रवृत्ती. ती बहुधा प्रत्येक सजीवातच असते. बक ती साद ऐकतो आणि तिच्यामागे जातो, त्याच्यामधला जिप्सी जागा होण्याची प्रक्रिया ही कादंबरी अतिशय प्रभावीपणे आणि चित्तवेधकपणे मांडते.
द कॉल ऑफ द वाइल्ड, जॅक लंडन, अनुवाद : माधव जोशी, डायमंड पब्लिकेशन्स, मू्ल्य : १०० रुपये, पृष्ठे : ११३

उदर्ू म्हणजे फक्त मुस्लिमांची भाषा असं मानून आपल्याकडे तिचा संबंध पाकिस्तानशी जोडण्याची पद्धत आहे. ती आज पाकिस्तानची राजभाषा असली तरी खरं तर उर्दू ही भारतातच जन्मलेली, पुरेपूर भारतीय भाषा आहे. तिच्यावर फारसी, अरबी भाषांचा प्रभाव आहे आणि काही प्रमाणात हिंदीलाही ती जवळची आहे. उर्दू या शब्दाचा अर्थच शाही पडाव, शाही शिबीर असा आहे. मुगल राज्यकर्त्यांच्या काळात अरबी, फारसीचा राज्यकारभारावर प्रभाव होता. सामान्य सैनिकाला ती समजणं अवघड जात असे. त्या काळात अशा सैनिकांच्या व्यवहारांसाठी उर्दू भाषेचा फारसी, अरबी आणि हिंदीमिश्रित उर्दू भाषेचा जन्म झाला असं मानलं जातं. उर्दू म्हटल्यावर अनेकांच्या मनात गजल, तिच्यातली प्रेमभावना, विरहभावना याच गोष्टी येतात; पण उर्दू कवितेने या पलीकडे जाऊन राष्ट्रीयता, स्वातंत्र्यप्रेम, राजकारण, समाजकारण असे वेगवेगळे विषय हाताळले. उर्दू कवितेला असं वैविध्य देणाऱ्या या भाषेतल्या मुहम्मह हुसेन आजाद, अकबर इलाहाबादी, पंडित ब्रजनारायण चकबस्त, तिलोकचंद मेहरूम, सागर निजमी, आनंद नारायण मुल्ला, साहिर लुधियानवी अशा  विविध कवींचा परिचय या  पुस्तकात करून देण्यात आला आहे. त्यांच्याबद्दलच्या माहितीमधून, त्यांच्या कवितांमधून त्यांचा काळ चांगल्या पद्धतीने उभा राहतो. उर्दू भाषेविषयी ज्यांना ममत्व आहे, अशा सगळ्यांना आवडेल असं हे पुस्तक आहे.
स्वातंत्र्य मागणारी उर्दू कविता, प्रा. डॉ. मीर इसहाक शेख, अक्षर मानव प्रकाशन, मूल्य : १२० रुपये, पृष्ठे : १४०

रहस्यकथा म्हटले की अपरिहार्यपणे शेरलॉक होम्सचे नाव डोळ्यासमोर येते, इतके होम्स आणि वाचकांचे नाते घट्ट आहे. शेरलॉक होम्स, डा वाटसन यांचे वाचकांच्या मनावर एकप्रकारचे अधिराज्यच आहे. आता तर इंटरनेटवर शेरलॉक होम्सच्या चातुर्यकथांवर आधारित चित्रपट, मालिकांचे भागही उपलब्ध असतात. पण तरीही या रहस्यकथा वाचण्याची गोडी जराही कमी होत नाही. बघता बघता गुंतागुंतीची होत जाणारी, हाताबाहेर जाते आहे असं वाटणारी परिस्थिती, क्लिष्ट अशा प्रकरणांमध्ये होम्सने आपली तल्लख बुद्धी वापरून आणलेली जान, या कथांमध्ये असलेली चित्रमयता, ठाशीव व्यक्तिरेखा आज इतक्या वर्षांनंतरही जुने वाटू शकत नाहीत, असे तपशील ही सगळी शेरलॉक होम्सच्या कथांमधली गंमत या पुस्तकामध्ये समाविष्ट केलेल्या कथांमध्येही आहे. सहा नेपोलियन्सचं रहस्य. या कथेत शहरात फक्त विशिष्ट दुकानातूनच घेतलेल्या नेपोलियनच्या पुतळ्यांची वेगवेगळ्या ठिकाणी तोडफोड असते. त्यामागचं रहस्य होम्स शोधून काढतो. तर तीन विद्यार्थाचं रहस्य या कथेत त्यानं वेगळ्या प्रकारची होऊ घातलेली कॉपी होण्याआधीच शोधून काढली आहे. सोनेरी चष्म्याचं रहस्य या कथेत सगळे तपशील वाचून आपल्याला काहीच उलगडा होत नाही, पण बघता बघता होम्स सगळं प्रकरण उलगडून दाखवतो. फुटबॉलपटूचं रहस्य, दुसऱ्या डागाचं रहस्य अशा सगळ्याच कथा वाचनीय आहेत. अनुवादही चांगला जमला आहे. प्रत्येक कथा वाचून झाल्यावर पुढच्या कथेत काय असेल याची उत्कंठा निर्माण होते. इंगजी वाचू शकत नाहीत, फार नीट समजू शकत नाही अशा वाचकांसाठी हा उपक्रम स्तुत्य आहे.
शेरलॉक होम्सच्या रहस्यकथा, गूढ रहस्याचा वाढता थरार., सर आर्थर कॉनन डायल, डायमंड पब्लिकेशन्स, मूल्य – रु. १५०/-, पृष्ठे झ्र् १५१

आपल्या रोजच्या जगण्यात भाषा ही इतकी अपरिहार्य गोष्ट असते की आपल्याला अति परिचयात अवज्ञा या उक्तीनुसार तिचं महत्त्व खूपदा लक्षातच येत नाही. भाषा हा मानवी मेंदूचा अत्युच्च आविष्कार आहे. जगात पाच हजारांहूनही अधिक भाषा अस्तित्वात आहेत असं मानलं जातं. याचा अर्थ वेगवेगळ्या काळात मानवी मेंदूने इतक्या प्रकारे अत्युच्च दर्जाचं काम केलेलं आहे. पण आज यातल्या बऱ्याच भाषा मरणपंथाला लागलेल्या आहेत. पुढच्या पन्नास वर्षांत यातल्या अधिकांश भाषा नष्ट होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. या सगळ्या पाश्र्वभूमीवर भाषा या घटकाकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन अधिक उन्नत करण्याचा या पुस्तकाचा प्रयत्न आहे आणि तो चांगल्यापकी यशस्वी होतो असं म्हणता येईल. भाषा निर्माण कशा झाल्या, मुळात अशा विविध प्रकारे भाषा निर्मितीचं काम मानवी मेंदू कसं करू शकला, एका भाषेतून दुसरी भाषा किंवा एक भाषा आणि तिच्या विविध बोली कशा निर्माण होऊ शकल्या, वेगवेगळे भाषाविषयक सिद्धांत भाषानिर्मितीविषयी काय सांगतात अशा अनेक प्रश्नांची चर्चा लेखकाने या पुस्तकात केली आहे. भाषा आणि भूगोल, पर्यावरणीय वैशिष्टय़े यांचा जवळचा संबंध असतो. आज जर पर्यावरण आणि भूगोलाला मानवी प्रगतीमुळे धोका पोहोचतो आहे तर त्याचा अपरिहार्य परिणाम आज ना उद्या भाषेवर झाल्याशिवाय राहणार नाही, या आपल्या सिद्धांताचे सूतोवाच लेखकाने पुस्तकात केले आहे. भाषांविषयी कुतूहल असणाऱ्यांना हे पुस्तक नक्कीच आवडेल.
‘भाषेचं मूळ’, संजय सोनवणी, चपराक प्रकाशन, मू्ल्य – रु. ११०/-, पृष्ठे झ्र् ११२

शोध हा एक साहित्यावरील समीक्षात्मक लेखांचा संग्रह आहे. अगदी हातात पाटीपेन्सिलही धरता येत नाही, अशा वयापासून साहित्य आपल्या जीवनात कविता आणि गोष्टींच्या रूपात मौखिक स्वरूपात प्रवेश करतं. आपलं वय आणि आकलन वाढेल तसतसं त्याचं स्वरूप बदलत जातं. मनोरंजन हा त्याचा स्थायीभाव बाजूला पडून जीवनाचा गाभा आपल्याला त्यातून प्रतीत व्हायला लागतो. तसंतसं साहित्याचं आपल्या आयुष्यातलं स्थानही बदलत जातं. त्यातल्या वेगवेगळ्या संकल्पना, वेगवेगळे प्रवाह, विचार आपल्याला आकर्षून घ्यायला लागतात. आपण साहित्याकडे अधिक गांभीर्याने बघायला लागतो. आपलं अनुभवविश्व त्यातून ताडून बघायला लागतो. जीवनातल्या गुंतागुंतीचं प्रतिबिंब साहित्यातून दिसतं. आपलं अनुभवविश्व आशा रीतीने कलात्मक पातळीवर पोहोचतं. आपली चिंतनशीलता, जीवनविषयक जाणीव अशा रीतीनं समृद्ध करण्याची ताकद साहित्यात आहे. या पुस्तकातील लेखांमधून या गोष्टींची सतत जाणीव होत राहते. कलावंतांचा शून्यवाद, साहित्यातील आत्माविष्कार, जीवनवादाचे स्वरूप, मार्क्‍सवादी समीक्षा, साहित्यातील सुसंगती हे सगळे लेख या अर्थाने वाचले जायला हवेत. मात्र एकच त्रुटी म्हणजे ही सगळी प्रकरणं प्रत्येकी साधारण तीन-चार पानांमध्ये संपतात. ती आणखी तपशिलात यायला हवी होती, असं पुस्तक वाचताना जाणवतं.
‘शोध’ , डॉ. शशिकांत लोखंडे, प्रकाशक- लोकवाङ्मयगृह, मूल्य – रु. २००/-, पृष्ठे – १२४.
response.lokprabha@expressindia.com

मराठीतील सर्व विशेष लोकप्रभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Book review
First published on: 10-06-2016 at 01:07 IST