11 December 2018

News Flash

प्रकाशन व्यवसाय : पुस्तकांची बदलती दुनिया (भाग १)

आपल्याकडच्या साहित्याला समृद्ध परंपरा आहे.

(संग्रहित छायाचित्र)

आपल्याकडच्या साहित्याला समृद्ध परंपरा आहे. ही परंपरा आपल्यापर्यंत पोहोचवतात ती पुस्तकं. या पुस्तकांचं स्वरूप अलीकडे बदलताना दिसत आहे. आताच्या काळातल्या विविध गोष्टींना स्वीकारत ही पुस्तकांची दुनिया बदलून जातेय, असं दिसू लागलंय.

‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण सगळ्यांनीच लहानपणापासून ऐकली असेल. वाचन अनेक माध्यमांद्वारे वाचकांपर्यंत पोहोचत असतं. त्यापकीच एक म्हणजे पुस्तक. हे पुस्तक वाचकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतात प्रकाशन संस्था. आपल्याकडे जशी साहित्याची मोठी परंपरा आहे तशी प्रकाशन संस्थांचीही परंपरा आहे. त्यात आता काही प्रकाशन संस्थांच्या दुसऱ्या तर काहींच्या तिसऱ्या पिढीनेही पदार्पण केलं आहे. पण काळानुसार सगळंच बदलतंय म्हटल्यावर प्रकाशन संस्थाही त्याला अपवाद नाहीत. सर्वत्र ऑनलाइनचा जमाना झाल्यामुळे त्यातली तंत्रं, गणितं काहीशी बदलणारच. लोकांची मानसिकता, दृष्टिकोन बदलत असल्यामुळे त्यातही बदल अपरिहार्य आहे. पण हा बदल आता नेमका कोणत्या टप्प्यावर आहे तसंच प्रकाशन संस्थांची सध्याची परिस्थिती, त्यातल्या अडचणी, सुविधा यांचा आढावा घेणं महत्त्वाचं ठरतं.

बऱ्याचशा प्रकाशन संस्थांशी बोलल्यावर एक समान आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात येते. आताच्या वाचकवर्गाची बदललेली पुस्तकांची आवडनिवड. यात सरसकट सगळेच वाचक येत नाहीत. पण बहुतांश वाचक आता माहितीपर पुस्तकांची निवड करतात. म्हणजे आरोग्य, करिअर, स्पर्धा परीक्षा, पर्यटन, पर्यावरण अशा प्रकारची पुस्तकं वाचतात. यामागे लोकांची मानसिकता दडलेली आहे. आता सगळे सजग झाले आहेत. त्यांच्या दैनंदिन आयुष्याशी संबंधित गोष्टींबाबत ज्ञान असणं हे त्यांना आवश्यक वाटतं. म्हणून अशा माहितीपर पुस्तकांची मागणी जास्त असते. यातच ‘यश कसे मिळवावे’, ‘आत्मविश्वास कसा वाढवाल’, ‘व्यक्तिमत्व विकास’, ‘मन:शांती’ या संदर्भातील पुस्तकंही जास्त वाचली जातात. यामागेही लोकांची मानसिकता दडलेली आहे. आपण जे काम करतोय त्यात झटपट यश मिळावं असं त्यांना वाटत असतं. त्यासाठी यश संपादन करण्याबाबतची मार्गदर्शनपर पुस्तकं वाचली जातात. तसंच आताच्या काळात लोकांना बराच ताण असतो. वेगवेगळ्या कारणांनी त्यांचं मानसिक खच्चीकरण झालेलं असतं. अशा वेळी मन:शांतीवर आधारित पुस्तक हाती लागलं तर तो त्यांच्यासाठी त्यावरचा उपाय असतो. पण हा ट्रेण्ड अलीकडचा नाही. अशा पुस्तकांना मागणी होतीच. त्याचा फारसा प्रसार झाला नव्हता. तसंच त्याची इतकी गरज भासावी अशी परिस्थितीही नव्हती. पण आता त्या प्रकारच्या पुस्तकांचा वाचकवर्ग वाढला आहे. अशा पुस्तकांच्या विषयांचा संबध थेट माणसाच्या आयुष्याशी असतो त्यामुळे अशा पुस्तकांची संख्या वाढणारच, हे चित्र स्पष्ट आहे.

रोहन प्रकाशनचे प्रदीप चंपानेरकर याविषयी सांगतात, ‘मधल्या काळात मध्यमवर्गीयांचं राहणीमान बदललं. आरोग्याविषयी माहिती जाणून घेण्याची वृत्ती वाढली. त्यांच्या बदललेल्या राहणीमानाला अनुसरून त्यांचे पुस्तकवाचनाचे विषय बदलले. आरोग्य, पर्यावरण, पर्यटन, तंत्रज्ञान, व्यक्तिमत्त्व विकास, व्यवसाय, पाककला अशा विषयांवरची पुस्तकं वाचायला आवडू लागली. ही पुस्तकं कुतूहलापोटी माहिती म्हणून ते वाचू लागले. या पुस्तकांमध्ये चरित्रात्मक पुस्तकांचाही समावेश होतो.’ चरित्रात्मक पुस्तकांना वास्तवाचा आधार असतो. एखाद्याच्या आयुष्यात घडलेल्या घडामोडींचे चढउतार असतात. त्यामुळे रंजक पद्धतीने ते वाचकांना वाचायला आवडतं. कथा, कादंबऱ्या, ललित साहित्य या विषयांच्या पुस्तकांची मागणी पुष्कळ कमी झाली आहे. या साहित्यप्रकारांऐवजी उपयोजित पुस्तकांना पसंती दिली जाते. शिवाय ज्या कथा, कादंबऱ्या आजही वाचल्या जातात ती जुन्या लेखकांचीच पुस्तकं आहेत. कारण नवे लेखकच नाहीत, असं सांगितलं जातं. पण पॉप्युलर प्रकाशनाच्या संपादक आणि व्यवसायप्रमुख अस्मिता मोहिते थोडं वेगळं मत मांडतात, ‘फेसबुक, ट्विटर, व्हॉट्स अ‍ॅप अशा सोशल मीडियावर अनेकजण चांगलं लिहीत असतात. त्यांच्या लेखनाला त्या व्यासपीठावर चांगला वाचकवर्गही आहे. त्यामुळे वाचकांना आवडेल, त्यांच्यापर्यंत पोहोचेल असं लिहिणारे लेखक हवे आहेत. सोशल मीडियाचा योग्य पद्धतीने वापर केला तर त्याचा फायदा नवीन लेखक शोधण्यासाठी होऊ शकतो. व्यावसायिक हेतूनेच मी सोशल मीडियावर सक्रिय असते. तिथून मला नवनवीन लेखकांची माहिती मिळून त्यांच्याशी संपर्क साधता येतो.’ तर राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे नवीन लेखकांबद्दल त्यांचं मत मांडतात. ‘आम्ही नवीन लेखकांच्या पुस्तकांना नेहमीच प्राधान्य देतो. राजहंस प्रकाशन नवीन लेखकांच्या शोधात नेहमीच असतं. मात्र गुणवत्तेच्या बाबतीत नवीन लेखक अधिक परिश्रम घ्यायला तयार नसतात. त्यांना सगळं झटपट हवं असतं, असं एक निरीक्षण आहे’, बोरसे सांगतात. एकुणात खरंच फेसबुक, ट्विटर, ब्लॉग, व्हॉट्स अ‍ॅप या व्यासपीठांवर प्रयोगशील, वैविध्यपूर्ण लेखन करणारे लेखक बरेच आहेत, हे चित्र सगळ्यांसमोर आहेच.

नवीन लेखकांच्या मुद्दय़ावरून आपसूकच गाडी वळते ती वाचकांकडे. आपली साहित्य परंपरा फार मोठी आणि समृद्ध आहे. पण आता त्यापुढेही जायला हवं ही मानसिकता वाचकांमध्ये निर्माण व्हायला हवी. तसंच नवीन वाचक निर्माण व्हायचा असेल तर जुन्या पठडीतून बाहेरही पडायला हवं. नवीन साहित्यकृती, नवा विषय, नवी मांडणी असं नावीन्य दिलं तरच नवे वाचक त्याकडे आकर्षलेि जातील. थोडक्यात सांगायचं तर हे एकमेकांना पूरक आहे. नव्या लेखकांनी नवं साहित्य आणायचं आणि वाचकांनी नव्या साहित्याला आपलंसं करायचं. कोणत्याही विषयाची चर्चा तरुण वर्गावर येऊन थांबते. तरुण वर्गाचं विशिष्ट विषयात कसं चूक आणि बरोबर याचं विश्लेषण होत असतं. वाचन हा विषयही त्याला अपवाद नाही. आजच्या तरुण वर्गाचं वाचन खूप कमी आहे. त्यांना वाचायलाच आवडत नाही, अशी टीका त्यांच्यावर केली जाते. याचं समर्थन मनोविकास प्रकाशनाचे अरिवद पाटकर करतात. ‘तरुण वर्ग वाचत नाही, ही त्याच्यावर केली जाणारी टीका अन्यायकारक आहे. असं सरसकट विधान करणं चुकीचं आहे. तरुण वर्ग वाचत असतो. त्यांच्या वाचनाचे विषय, माध्यमं बदलत आहेत. त्यांच्या पसंतीस उतरतील असे विषय, पुस्तकंच येत नसतील तर ते काय वाचणार? जुनी जड वैचारिक पुस्तकं ते वाचत नाहीत, हे अगदी स्वाभाविक आहे. कारण आज शाळा, कॉलेज, ऑफिसच्या ठिकाणी इतका ताण असतो की त्यांना तो हलका होईल असं काहीतरी वाचायचं असतं’, पाटकर सांगतात. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे एक वेगळा मुद्दा मांडतात, ‘वाचक चार पुस्तकं चाळून, बघून, त्यावर नजर टाकून मग ठरवतो ते पुस्तक विकत घ्यायचं की नाही ते. पण वाचकांना अशी पुस्तकं पाहता, चाळता येतील अशी दुकानंच नाहीत. ती असायला हवी. विशिष्ट पुस्तक घ्यायचं असं ठरवूनच विकत घ्यायला गेलात तर अशा दुकानांची गरज भासत नाही. पण पुस्तकं चाळण्यासाठी अशी एक जागा ठिकठिकाणी हवी. नवे वाचक तयार व्हावेत असं म्हणतानाच प्रकाशकांनी वाचकांपर्यंत पोहोचायला हवं याबाबत प्रकाशकांचं एकमत आहे. ‘आम्ही वाचकांपर्यंत पोहोचायला हवं’ असं ते मान्य करतात. हाच मुद्दा डॉ. बोरसे पुढे नेत सांगतात, ‘एखाद्या छोटय़ा गावातील साहित्यसंमेलनात पुस्तकांच्या दुकानात चांगला प्रतिसाद मिळतो. याचाच अर्थ पुस्तक उपलब्ध झालं की त्याला वाचक मिळतो. म्हणजेच इथे उपलब्धतेच्या यंत्रणेतच कमतरता आहे. महाराष्ट्राची लोकसंख्या आणि एका पुस्तकाची एक आवृत्ती संपायला लागणारा वेळ या आकडेवारीचा निकष लावायचं ठरवलं तर परिस्थिती एकूणच निराशाजनक वाटते. पण प्रकाशित होणाऱ्या पुस्तकांची संख्या आणि खपणाऱ्या पुस्तकांची संख्या ही आकडेवारी लक्षात घेतली तर परिस्थिती निराशाजनक वाटत नाही.’

प्रकाशकांना वाचकांपर्यंत पोहोचण्यासाठी आता विविध माध्यमांचा वापर करावा लागणार आहे. त्यातल्या पहिल्या क्रमांकावर ऑनलाइनचं माध्यम येतं. आता डिजिटायझेशनचं जाळं पसरत चाललंय. बहुतांशी क्षेत्रं ऑनलाइनचं हे जाळं स्वीकारून पुढे जात आहेत. पुस्तक प्रकाशनही त्यातलंच एक आहे. जवळपास सर्वच प्रकाशन संस्थांनी आता ऑनलाइनच्या ट्रेण्डचं स्वागत करून त्यावर विक्री सुरू केली आहे. त्याला तूर्तास म्हणावा तितका प्रतिसाद मिळत नसला तरी हे भविष्यातलं माध्यम आहे, हे निश्चित. मॅजेस्टिकचे अशोक कोठावळे ऑनलाइन खरेदी-विक्री संदर्भातला एक महत्त्वाचा मुद्दा मांडतात. ते सांगतात, ‘भविष्यात प्रकाशन संस्थांना पुस्तकांच्या मुद्रित कॉपींबरोबर

ई-बुक्सही तयार करावी लागणार आहेत. एखादं पुस्तक विशिष्ट वेबसाइटवर ऑनलाइन विक्रीसाठी असेल आणि वेबसाइटने यासंदर्भात थेट लेखकाशी संपर्क साधला तर त्यावर प्रकाशन संस्थांचा आक्षेप असतो. कारण त्या पुस्तकाचं डिझाइन, प्रसिद्धी, कव्हर या सगळ्यावर प्रकाशकाचा कॉपीराइट असतो. एखाद्या लेखकाने स्वत:च ई-बुक केलं तर तिथे प्रकाशकाचा संबंध येत नाही. पण ते तसं करू शकणार नाहीत. कारण त्यांच्या पुस्तकांना मागणी निर्माण होणार नाही. ही मागणी निर्माण करण्याचं काम मुद्रित पुस्तक करत असतं. थेट ई-बुक करणं खरं तर परवडणारं नाही. त्यासाठी कराव्या लागणाऱ्या डीटीपी, डिझाइन या प्रक्रियांचा खर्च जास्त असतो.’ तर ऑनलाइन खरेदी-विक्री ही येणाऱ्या काळातली स्पर्धा आहे का असं विचारल्यावर ऑनलाइन विक्रीचं स्वागत करत पॉप्युलर प्रकाशनाच्या अस्मिता सांगतात, ‘ऑनलाइन पुस्तकं विकत घेणं ही स्पर्धा होत नाही. ज्या गाव-शहरांमध्ये दुकानं उपलब्ध नाहीत; त्यांच्यासाठी ऑनलाइन पुस्तक विक्री ही एक सोय आहे. त्यामुळे मला ही अजिबात स्पर्धा वाटत नाही. उलट प्रकाशकांसाठी ही सोय फायद्याचीच आहे. ऑनलाइनच्या निमित्ताने आमचं पुस्तक गावागावात पोहोचेल.’ मनोविकासचे अरिवद पाटकरही याला दुजोरा देतात. ‘ऑनलाइनची निर्माण होणारी स्पर्धा अजून तितकी तगडी झालेली नाही. पण हे नवं तंत्रज्ञान आत्मसात करावंच लागणार आहे. त्यासाठी नवे लेखकही शोधावेच लागतील. तसंच विक्रीबाबतचे नवे तंत्रही स्वीकारायला लागणार आहे’, ते सांगतात.

ऑनलाइन हे भविष्य असलं तरी या संपूर्ण प्रक्रियेला वेळ लागू शकतो. तसंच आपल्याकडे टेक्नोसॅव्ही असणाऱ्यांची संख्या किती आहे, हे बघावं लागेल. हे सगळं तंत्र आता कदाचित वरकरणी बदलेल. त्यात पर्यायही अनेक दिसतील पण ते पूर्णत: प्रत्यक्षात आणायला अजून काही वेळ जाईल. डिजिटल माध्यमातून पुस्तक विक्री होताना मुद्रित माध्यमामधील पुस्तकांच्या खरेदीवर परिणाम होणार. अशा वेळी ‘पुस्तकांची विक्री की साहित्याची विक्री’ यापकी प्रकाशकांचा नेमका उद्देश काय हे ठरवणं महत्त्वाचं आहे. साहित्याच्या विक्रीचे दोन मार्ग आहेत; एक डिजिटल आणि दुसरं मुद्रित माध्यम. यातला समतोल साधणं हे अधिक चांगलं ठरेल. पुस्तक प्रकाशनाचं माध्यम बदलत राहणारच. ते आत्मसात करावंच लागणार. यात काही धोका नसला तरी प्रकाशकांनी त्याची तयारी केली पाहिजे.

ऑनलाइनचा मुद्दा मांडतानाच पुस्तकांच्या वेगवेगळ्या विषयांवरील प्रकाशकांवरही नजर टाकणं महत्त्वाचं ठरतं. ठरावीक विषयांवरचीच पुस्तकं प्रकाशित करणाऱ्या वेगवेगळ्या प्रकाशन संस्था आहेत. त्यापकीच अपरांत प्रकाशन संस्था प्राचीन इतिहास या विषयावरील पुस्तके प्रकाशित करते. प्रकाशक पराग पुरंदरे सांगतात, ‘इतिहास हा माझ्या आवडीचा विषय असल्यामुळे मी त्यासंबंधी पुस्तकांचं प्रकाशन करतो. आम्ही प्राचीन इतिहास या विषयात तज्ज्ञ असलेल्या डॉ. गो. बं. देगलूरकर, डॉ. अरिवद जामखेडकर आणि डॉ. मधुकर केशव ढवळीकर यांच्या पुस्तकांवर काम करतो आणि ते प्रकाशित करतो. याशिवायही अन्य लेखकांची प्राचीन इतिहास, इतिहास यासंबंधीची पुस्तकं प्रकाशित करतो. अशा पुस्तकांना तुलनेने थोडा कमी प्रतिसाद मिळतो. पण ज्यांचे अभ्यासाचे विषय प्राचीन इतिहास, इतिहास असे आहेत त्यांच्याकडून अशा पुस्तकांना मागणी जास्त आहे. मी पुस्तक प्रकाशन व्यवसाय न करता हौस म्हणून करतो. काही अत्यंत जुनी पुस्तकं त्यात काहीसे बदल करून मी रििपट्र करतोय. अ‍ॅमेझॉन, फ्लिपकार्ट, बुकगंगा या ऑनलाइन साइट्सवर धुळे, बार्शी अशा गावांतून मागणी असते. सोशल मीडियावर पुस्तकांचा प्रसार केल्यामुळे तिथेही चांगला प्रतिसाद मिळतो. काही शहरांमध्ये तिथल्या मोठय़ा दुकानांमध्ये पुस्तकं ठेवली असली तरी सगळीकडून चांगलाच प्रतिसाद मिळतो असं नाही.’

साहित्य प्रकारातील सध्याच्या ट्रेण्डमध्ये असलेला एक प्रकार म्हणजे अनुवादित पुस्तकं. हल्ली अनुवादित पुस्तकांचं प्रमाण वाढत आहे. त्याला मागणीही तितकीच आहे. पण या अनुवादित पुस्तकांविषयी राजहंस प्रकाशनाचे संपादक, संचालक डॉ. सदानंद बोरसे त्यांचं स्पष्ट मत मांडतात, ‘एखाद्या पुस्तकाचा अनुवाद जितक्या काळजीपूर्वक व्हायला हवा तितका होत नाही. अशा प्रकारचा अनुवाद मूळ पुस्तक आणि अनुवादित पुस्तक अशा दोघांसाठीही योग्य नाही. ज्या गतीने पुस्तकांचे अनुवाद होत आहेत, ती गतीच याला कारणीभूत आहे. गुणवत्तेच्या दृष्टीने ते कुठेतरी घसरताहेत. अशा पुस्तकांमध्ये वैविध्य मिळत आहे पण गुणवत्ता घसरतेय, हे लक्षात घ्यायला हवं. ‘लवकरात लवकर प्रसिद्ध करा’ हा त्यामागचा घातक दृष्टिकोन वेळीच लक्षात घ्यायला हवा.’

छोटय़ा शहरांतील प्रकाशकांना येणाऱ्या अडचणी, प्रतिसाद लक्षात घेणं इथे महत्त्वाचं ठरतं. याबद्दल औरंगाबादच्या जनशक्ती वाचक चळवळ प्रकाशनाचे श्रीकांत उमरीकर सविस्तर सांगतात. पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र असा फरक स्पष्ट करत ते मुद्दे मांडतात, ‘पुणे हे शहर पुस्तकांची बाजारपेठ म्हणून विकसित झालं आहे. यामुळे आपोआपच तिथल्या प्रकाशक, वितरक यांना संपूर्ण महाराष्टातले ग्राहक मिळतात. ताबडतोब पसा सुटण्याच्या दृष्टीने काही योजना राबवणं पुण्यात सोपं आहे. अशा योजना उर्वरित महाराष्ट्रात ते करणं थोडं कठीण जातं. त्यामुळे फरक करायचाच असेल तर तो पुणे आणि उर्वरित महाराष्ट्र असा करता येईल. पुस्तकांच्या विषयांच्या संदर्भात मात्र हा फरक नसतो. पुणे, मुंबई या शहरांमधून पुस्तकांची खरेदी केली जाते पण ती पुस्तकं उर्वरित महाराष्ट्रातील वेगवेगळ्या ठिकाणी जातात. या शहरांतून पुस्तकांची विक्री झाल्याचं कागदोपत्री दिसतं. पण ग्राहक तिथलाच असतो असं नाही. मुख्य वितरक, मुख्य प्रकाशक पुण्याला असल्यामुळे प्रत्यक्ष झालेली खरेदी विक्री पुण्याला दिसते. पण ती असते उर्वरित महाराष्ट्राची. म्हणजे औरंगाबादचा एखादा ग्राहक तिथल्याच प्रकाशकाचंच पुस्तक पुण्यात जाऊन खरेदी करतो. पण ते तो तिथल्या तिथे म्हणजे औरंगाबादमध्ये त्याच्याकडूनच घेत नाही. अर्थकारणाच्या दृष्टीने पुणे शहरासाठी हे महत्त्वाचं ठरतं. पण असं उर्वरित महाराष्ट्रासाठी होत नाही.’ विदर्भाच्या लाखे प्रकाशनाचे चंद्रकात लाखे सरकारी अनुदानाबद्दल मुद्दा मांडतात. ‘सरकारी ग्रंथालयांना अनुदान मिळत नसल्यामुळे ते पुस्तकं विकत घेऊ शकत नाहीत. त्याचा परिणाम प्रकाशन संस्थांवर होतो. शाळांचंही ग्रंथालयांप्रमाणेच आहे. त्यामुळे तिथूनही प्रकाशन संस्थांवर परिणाम होतो. आता सगळं ऑनलाइन झालंय. त्याचाही थोडा परिणाम होतो. पण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी सुरू केलेल्या ‘बुके नको, बुक द्या’ या उपक्रमाला चांगली सुरुवात झाली आहे. विदर्भात कुठेही कोणाचाही सत्कार झाला की त्या व्यक्तीला बुकेऐवजी एक बुक म्हणजे पुस्तक दिलं जातं.’

पुस्तकांची बदलती रचना, विषय, मागणी या साऱ्यामुळे त्याची संपूर्ण दुनियाच बदलून जात आहे. ऑनलाइन जमाना स्वीकारत प्रत्येक प्रकाशन संस्था वेगवेगळा प्रयत्न करत आहे. शिवाय वाचकांपर्यंत पोहचायला हवं, हे मान्य करत त्यांचे त्या दृष्टीनेही प्रयत्न चालू आहेत. वाचक प्रकाशकांपर्यंत पोहोचत होता आता प्रकाशकांनी वाचकापर्यंत कसं पोहोचायचं याचा विचार व्हायला हवा. तरच पुस्तकांची दुनिया खऱ्या अर्थाने बदलली आहे असं म्हणता येईल.

नोटाबंदीचा फटका प्रदर्शनांना
गेल्या वर्षी याच महिन्यात झालेल्या नोटाबंदीचा फटका विविध पातळ्यांवर बघायला मिळाला. त्यापकीच एक म्हणजे पुस्तक प्रदर्शन. नोटाबंदी झाल्यानंतर पुस्तक प्रदर्शनांचं प्रमाण कमी झालं होतं. नोटाबंदी झाल्यानंतर साधारणत: दोन-तीन महिने लोकांकडे चलन नव्हतं. प्रदर्शनांच्या ठिकाणी ऑनलाइन व्यवहार चालत नसून चलनच द्यावं लागत होतं. त्यावेळी लोकांचं प्राधान्य हे आवश्यक वस्तू घेण्याला होतं. त्यामुळे त्यावेळी एखाद्या ठिकाणी पुस्तक प्रदर्शन चालू असलं आणि पुस्तक खरेदीची कितीही इच्छा असली तरी ते घेतलं जायचं नाही. कॅशलेसचा पर्याय असलेल्या पुस्तकांच्या दुकानांना मात्र नोटाबंदीचा फटका बसला नाही.

वाचनावरून लोकप्रियता ठरवावी, विक्रीवरून नाही
सध्या पुस्तकांच्या विक्रीचं प्रमाण चांगलं आहे. त्यात कादंबऱ्या विकत घेण्याचं प्रमाण पुष्कळ कमी झालं आहे. टीव्हीच्या माध्यमातून कादंबरी वेगवेगळ्या स्वरूपात दिसत असते. त्यामुळे लोकांना त्यातून शिकण्यासारखं काही नाही. कथांना पूर्वी होती तशीच मागणी आजही आहे. माहितीपूर्ण पुस्तकांना सर्वाधिक मागणी आहे. पुस्तकांना आणि दिवाळी अंकांना ग्रामीण आणि शहरी अशा दोन्ही भागांकडून समप्रमाणात मागणी आहे. शहरी लोक वाचनालयावर भर देतात. एक दिवाळी अंक वाचनालयाद्वारे दहा जणांपर्यंत पोहोचतो. ते दहा जण तो अंक वाचतात. पण विक्रीवरून पुस्तकांची, दिवाळी अंकांची लोकप्रियता न ठरवता ते किती वाचले जातात यावरून ठरवली पाहिजे. मराठी पुस्तकांच्या किमती हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. मराठी प्रकाशक पुस्तकांच्या दर्जाला खूप महत्त्व देतात. त्यामुळे त्याचं कव्हर, डिझायिनग, मांडणी हे सगळंच उत्तम केलं जातं. त्यामुळे त्याची किंमत वाढत जाते. याची खरंच गरज असते का, असा कधी कधी विक्रेत्यांना प्रश्न पडतो. कमी किमतीत आपण पुस्तक देऊ शकलो तर त्याची विक्री मोठय़ा प्रमाणावर होऊ शकते.
– मंदार नेरुरकर, वितरक, आयडिअल बुक डेपो, दादर

कालसुसंगत संपादकांची गरज आहे
वाचणाऱ्या समाजाचं आता बघणाऱ्या समाजात रूपांतर होत आहे. तंत्रज्ञानाच्या विविध सोयींमुळे वेगवेगळे पर्याय उपलब्ध झाले आहेत. याचा उपभोग घेणारा वर्ग प्रचंड वाढतोय. सध्या दोन प्रकारचा वाचकवर्ग आहे. एक; ज्याला जात्याच वाचनाची भूक आहे. जो स्वत:साठी वाचतो, स्वत:च्या अभ्यासासाठी, बुद्धीसाठी आणि जगाचं ज्ञान घेण्यासाठी वाचतो. तर दुसरा; ‘हाऊ  टू’ची म्हणजे माहितीपर पुस्तकं वाचणारा वाचक. ‘हाऊ  टू’च्या पुस्तकांना जास्त मागणी आहे. वाचनामुळे तुम्ही समृद्ध होत जाता. तुम्ही आयुष्यात चार चुका करत असाल तर वाचनाच्या क्रियेने तुमच्यात आत्मभान निर्माण होतं. पण वाचण्यासाठी काय निवडता हेही तितकंच महत्त्वाचं आहे. लेखकाकडून लिहून घ्यायला, चांगलं काम करून घ्यायला मराठीत संपादक नाहीत. तर इंग्रजीत असे तरुण संपादक विपुल प्रमाणात आहेत. इंग्रजी चांगलं नसलेल्या वर्गासाठी ‘हाऊ  टू’ प्रकारच्या पुस्तकांचा काळ आहे असं वाटतं. ललित लेखन कमी प्रमाणात निर्माण होतंय. तसंच ते कमी प्रमाणात वाचलंही जातंय. तसं लेखन करणारेही आसपास कुणी नाहीत. वाचन करणारे सुशिक्षित लोक इंग्रजी येत असल्यामुळे इंटरनेट जास्त वापरायला आणि इंग्रजी साहित्य वाचायला लागले. कारण आजचं लिहिलं गेलेलं साहित्य इंग्रजी भाषेत प्रचंड मोठय़ा प्रमाणात आणि सातत्याने येतंय. आपल्याकडच्या प्रकाशन संस्था अजूनही ७० ते ८० साली विविध विषयांकडे बघायची आणि त्यावर प्रक्रिया करून ते प्रकाशित करण्याची जी पद्धत होती, त्याच काळात आहेत. म्हणजे आपण साधारण ४० वर्षे मागे आहोत. कामात सातत्य नसणं, आजच्या गतीशी जुळवून न घेणं आणि स्पर्धेचं भान नसणं या बाबी प्रकर्षांने दिसून येताहेत. आपल्याला तंत्रज्ञानामुळे घडत असलेल्या बदलांचं भान असायला हवं. प्रत्येक गोष्टीला एक वय असते. म्हणजे समजा ‘वेक अप सिद’ हा सिनेमा २५ वर्षांचा तर ‘रंग दे बसंती’ ४० वर्षांचा आहे. आपण एक सिनेमा म्हणजे एक व्यक्ती तयार करतो. तर तसं मराठी साहित्य १२५ वर्षांचं झालेलं आहे. ते निदान चाळिशीचं व्हायला हवं. एखाद्या माणसाचं वजन १२५ वरून ८० वर आणणं जितकं अवघड आहे तितकंच मराठी साहित्याचं वय आजचं करणं खूप अवघड आहे. हे रोमान्सच्या कादंबऱ्या किंवा ‘हाऊ  टू’ची पुस्तकं प्रकाशित करून होणार नाही. आजच्या काळाशी संबंध असणाऱ्या तरुणांची आपल्याला गरज आहे. मराठी पुस्तकांच्या दुकानातील पुस्तकं तीसेक र्वष तरी बदलली नाहीयेत. ती फार क्वचित बदलतात. तिथला ‘हाऊ  टू’ आणि भाषांतरित पुस्तकांचा स्टॅण्ड मात्र सतत बदलत असतो. कारण ती पुस्तकं युझर फ्रेण्डली आहेत. भाषांतरासाठी सोप्या असणाऱ्या पुस्तकांचं भाषांतर करण्याचा वेग प्रचंड आहे. मराठी समाज दोन प्रकारचा तयार झालाय. इंग्रजी येणारा समाज आणि इंग्रजी न येणारा समाज. हे द्वंद्व या दोन समाजांमध्ये कायम राहणार. लेखक ही मराठीमध्ये सध्या सगळ्यात दुय्यम गोष्ट झाली आहे. प्रकाशन संस्थांमधील ज्येष्ठ मंडळींना सत्ता पुढे द्यायची असली तरी योग्य माणसं नाहीयेत. तशी माणसं निर्माण केलेली नाहीत. जोवर आपल्याला वर्तमानकाळाचं भान येत नाही तोवर म्हणजे पुढची दहा एक र्वष तरी आपण अशा जाळ्यात राहू असं मला वाटतं. हे भान आता रंगभूमी आणि सिनेमाला यायला लागलंय. आता तिसरा क्रमांक साहित्याचा आहे. अजूनही आपण जुनं तेच तेच वाचतोय. आता ते थोडं आवरायला हवं. दुसरी एक महत्त्वाची गोष्ट मला नेहमी जाणवते, ती म्हणजे मराठीमध्ये संपादक नाहीत; प्रकाशक आहेत. लेखकांना चांगल्या संपादकांची गरज असते. संपादक लेखकाला प्रवृत्त करून तो त्याच्याकडून लिहून घेत असतो. प्रकाशक भरपूर झालेत आणि संपादक कमी आहेत. काही संपादक प्रकाशक असतात. पूर्वीच्या काळातील श्रीपु, माजगावकर, भटकळ यांसारखे संपादक-प्रकाशक जाणकार आहेत. आता फक्त त्यांचा काळ वेगळा आहे. त्यांची बुद्धी अजूनही तल्लख आहे. त्यांना त्यांचा व्यवसाय कळतो. त्यांना त्याचा काळ कळतो. पण आता काळ बदललाय. लेखक नसतील तर ते कोणासोबत काम करतील? नेटके, कालसुसंगत संपादक तयार न होणे हा सगळ्यात मोठा धोका आहे. पुस्तकं प्रकाशित करायला आता आर्थिक बाजू भक्कम हवी. मुद्रण, डिझाइन हीदेखील आता कोणाची मक्तेदारी राहिलेली नाही. पण साहित्याची, लेखनाची जाण पैशाने आणता येत नाही. प्रकाशक आणि संपादक या दोन स्वतंत्र शाखा निर्माण होण्याची गरज आहे. कालसुसंगत चांगले संपादक तयार करायला हवेत. तसंच वाचकांपर्यंत पुस्तक पोहोचवण्याचे वेगळे मार्ग निवडायला हवेत.
– सचिन कुंडलकर, लेखक, दिग्दर्शक

वाचन चळवळींवर प्रश्नचिन्ह

वाचन चळवळींमधून लेखकाशी गप्पा, नवीन पुस्तकाची माहिती, नवीन पुस्तकावर चर्चा, विविध पुस्तकांवर चर्चा, निबंध स्पर्धा असे विविध उपक्रम केले जातात. त्यानंतर तिथे पुस्तकांची विक्रीही होते. अशा प्रकारचे कार्यक्रम आता प्रकाशकांना करावे लागणार आहेत. प्रकाशकांना आता नुसतं पुस्तक प्रकाशित करून चालणार नाही तर त्याच्या मार्केटिंगचाही मुद्दा लक्षात घ्यावा लागेल. शहरांपेक्षा आता गावांमध्ये लोक जास्त वाचू लागले आहेत. खेडोपाडय़ातील पुस्तक प्रदर्शनांना चांगला प्रतिसाद मिळतो. जालना, नांदेड, परभणी, उस्मानाबाद इथे पुस्तकं जास्त विकली जातात. प्रकाशकांना आता गावांकडे लक्ष द्याावे लागणार आहे. पूर्वी वाचक दुकानात येऊन त्याला हवं ते पुस्तक विकत घ्यायचे पण आता प्रकाशकाला ग्राहकांपर्यंत पोहोचावे लागणार आहे. वाचन चळवळीतून राबवत असलेल्या कार्यक्रमांचा वाचन वाढावं हा एवढाच उद्देश असतो. पण हेही प्रयत्न अपुरे आहेत. ते खरं तर शाळेपासून सुरू व्हायला हवेत. काही शाळांमध्ये ग्रंथालयंही नाहीत. पूर्वी शिक्षक सांगायचे काय वाचावं पण आता तसं काहीच होत नाही. वाङ्मयीन वातावरणही फारसं कुठे दिसत नाही. सोशल मीडियामुळे वाचनाकडे गंभीरपणे बघितलं जात नाही. त्याबद्दल फारशी उत्सुकताही राहिलेली नाही. नवीन वाचक फारसा तयार होताना दिसत नाही. जो नवा वाचक तयार होतो तो इंग्रजीकडे वळतो. चेतन भगत, देवदत्त पट्टनायक अशांची पुस्तकं वाचली जातात. वाचन चळवळ पुढे नेण्यासाठी कोणीही नवीन लोक येत नाहीत. आताची पिढीसुद्धा ते काम करायला तयार नाहीत. त्यामुळे वाचन चळवळींचं काय होणार यावर प्रश्नचिन्हच आहे. असे उपक्रम खर्चीक झाले आहेत हेही त्यामागचं कारण आहे.
– श्याम देशपांडे, वाचन चळवळीचे कार्यकत्रे, औरंगाबाद

चैताली जोशी – response.lokprabha@expressindia.com@chaijoshi11

First Published on November 3, 2017 1:03 am

Web Title: books and publication house