12 December 2019

News Flash

ब्रह्मपुत्रेचा पूर प्राण्यांच्या जीवावर! (आसाम)

ब्रह्मपुत्रा दर पावसाळ्यात चर्चेत येते ती पुरामुळे.

ब्रह्मपुत्रेने पावसाळ्यात धारण केलेल्या रौद्र रुपामुळे सध्या काझिरंगा अभयारण्याचा ९० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. शेकडो वन्य जीव या पुरात अडकून पडले आहेत.

खबर राज्याची
विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

ब्रह्मपुत्रेने पावसाळ्यात धारण केलेल्या रौद्र रुपामुळे सध्या काझिरंगा अभयारण्याचा ९० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. शेकडो वन्य जीव या पुरात अडकून पडले आहेत. एकशिंगी गेंडय़ांची जगातील सर्वात मोठी वासाहत असलेले हे अभयारण्य वाचवण्यासाठी वन विभाग आटोकाट प्रयत्न करत आहे.

तिबेटमध्ये हिमालयाच्या कुशीत उगम पावणारी आणि बंगालच्या उपसागरात विलीन होण्यापूर्वी चीन, भारत आणि बांगलादेशातून प्रवास करणारी ब्रह्मपुत्रा दर पावसाळ्यात चर्चेत येते ती पुरामुळे. वाटेत येणाऱ्या प्रदेशाला सुजलाम्-सुफलाम् करणारी ही नदी पुराच्या काळात मात्र संहारास कारणीभूत ठरते. सध्या ब्रह्मपुत्रेच्या पुराने आसाममध्ये धुमाकूळ घातला आहे. राज्यातील ३३ पैकी ३० जिल्हे पाण्याखाली गेले आहेत. चार हजारांहून अधिक गावांतील ४२ लाखांहून अधिक रहिवाशांना या पुराचा मोठा फटका बसला आहे. दीड लाख हेक्टर शेतजमिनी पाण्याखाली गेल्या आहेत आणि १५ जणांना जीव गमावावा लागला आहे. या पुरामुळे संकटात सापडलेला एक महत्त्वाचा घटक म्हणजे आसाममधील काझिरंगा अभयारण्य आणि त्यातील विविध वन्यजीव!

गोलाघाट आणि नागाव जिल्ह्य़ांत वसलेले काझिरंगा अभयारण्य ४७० चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरले आहे. जगातील सर्वाधिक एकशिंगी गेंडे आढळणारे ठिकाण म्हणून हे अभयारण्य ओळखले जाते. एकशिंगी गेंडय़ांप्रमाणेच गवे, हरिण, सांबर, हत्ती इत्यादींचेही हे वसतिस्थान आहे. या अभयारण्यात हजारो वन्यजीवांचा अधिवास आहे. यातील अनेक प्राणी पुरात अडकले आहेत. अभयारण्याचा साधारण ९० टक्के भाग पाण्याखाली गेल्याचे आसामच्या वन आणि पर्यावरण विभागाने जाहीर केले आहे. एकशिंगी गेंडय़ांसह, हरीण आणि अन्य प्राणी संकटात सापडले आहेत. येथील ३० वन्यजीवांना पुरामुळे जीव गमावावा लागला आहे. त्यात सर्वाधिक संख्या हरिणांची आहे.  अभयारण्याच्या १९९ संरक्षित विभागांपैकी १५५ विभागांना पुराचा फटका बसला आहे. वन विभागाचे अधिकारी आणि सुरक्षारक्षक यांत्रिक आणि साध्या बोटींच्या साहाय्याने प्राण्यांना वाचवण्याचे प्रयत्न करत आहेत.

अभयारण्याच्या उत्तरेला ब्रह्मपुत्रा नदी आहे. तर दक्षिणेकडील भाग काहीसा उंच आहे. गेंडे जीव वाचवण्यासाठी या भागात येतात आणि काही वेळा अभयारण्याची हद्द ओलांडून नागरी वस्तीत शिरतात. अशा वेळी त्यांच्या जीवाला असलेला धोका आणखी वाढतो. संरक्षित क्षेत्राबाहेर पडलेल्या या प्राण्यांची शिकार करण्यासाठी शिकारी टपून बसलेले असतात. राष्ट्रीय महामार्ग ३७ या अभयारण्याजवळून जातो. शिकाऱ्यांच्या तावडीतून निसटून बाहेर पडलेले काही प्राणी महामार्गावर भरधाव वाहनांची धडक बसल्यामुळे मृत्युमुखी पडतात किंवा जखमी होतात. यंदाही मृत्युमुखी पडलेल्या प्राण्यांपैकी काही प्राणी अशा अपघातांमुळे दगावले आहेत.

२०१७ मध्ये आसाममधील पुरात ३१ एकशिंगी गेंडय़ांसह एकूण ३६१ प्राणी वाहून गेले होते. त्यानंतर पूरकाळात सखल भागात राहणाऱ्या प्राण्यांना सुरक्षित जागा उपलब्ध व्हावी म्हणून अभयारण्य क्षेत्रात ३३ उंच जागा कृत्रिमरीत्या तयार करण्यात आल्या. यंदाच्या पुरात परिणामी  अनेक प्राण्यांनी या कृत्रिम उंच जागी आसरा घेतल्यामुळे त्यांचा जीव वाचला.

जीव वाचवून संरक्षित क्षेत्राबाहेर आलेल्या वन्यजीवांची शिकार टाळण्यासाठी दरवर्षी ठिकठिकाणी शिकारविरोधी तळ स्थापन केले जातात. यंदा असे १९९ तळ स्थापन करण्यात आले होते, मात्र त्यापैकी १६९ तळ सध्या पाण्याखाली गेले आहेत. २२ तळ सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहेत. शिकारविरोधी भरारी पथकेही तैनात करण्यात आली आहेत. प्राण्यांचे मार्गक्रमण सुकर करण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. काही तरंगत्या तळांचीही सुविधा ठेवण्यात आली आहे. महामार्गावर येणारे प्राणी अपघातात मृत्युमुखी पडू नयेत म्हणून राष्ट्रीय महामार्ग ३७वरून मार्गक्रमण करणाऱ्या वाहनांना वेगमर्यादा निश्चित करून देण्यात आली आहे. ती पाळली जावी यासाठी वेळ नमूद केलेले कार्ड प्रत्येक वाहनाला दिले जात आहे. वन्य प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी पोहोचण्यास मदत करण्यासाठी १००हून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वनाधिकारी प्रवीण कासवान यांनी पुरात अडकलेल्या आणि वाहून जाणाऱ्या हरणांची समाजमाध्यमावर पोस्ट केलेली चित्रफीत व्हायरल झाली आहे. वन्य जीवांच्या अधिवासांवर अतिक्रमण झाल्यामुळे आणि त्यांच्या अधिवासांच्या मध्येच पायाभूत सुविधा उभारल्या जाऊ लागल्यामुळे संकटाच्या काळात सुरक्षित ठिकाण गाठणे हे त्यांच्यासाठी आव्हान ठरू लागले आहे, असे मतही त्यांनी मांडले आहे. पुरात वाहून जाणाऱ्या गेंडय़ाच्या पिल्लाला वनरक्षकांनी बोटीत ओढून आणून वाचवल्याची चित्रफीत प्रसारित झाली आहे. तीन एकशिंगी गेंडे आणि चार हरणांना पुरातून वाचवण्यात यश आले आहे. त्यांच्यावर वन्यजीव पुनर्वसन आणि संवर्धन केंद्रात उपचार करण्यात येत आहेत. तिथे एकूण ३० प्राण्यांना दाखल करण्यात आले होते. त्यापैकी २३ प्राण्यांना उपचारांनंतर सोडून देण्यात आले आहे.

ब्रह्मपुत्रेला पूर दरवर्षीच येतो. काही तज्ज्ञांच्या मते या पुरामुळे काझिरंगाचा मोठा भाग दरवर्षी पाण्याखाली जात असला, तरीही हे उपयुक्त संकट आहे. यात कोणतेही कष्ट न घेताच अभयारण्यातील निरुपयोगी आणि अतिरिक्त तण पाण्याबरोबर वाहून जाते. अभयारण्यात काही नैसर्गिक नाले, कालवे आहेत. या कालव्यांतून पाणी आत शिरते, तेव्हा ती चिंतेची बाब नसते. ब्रह्मपुत्रा आपल्या पात्राची हद्द सोडून वाहू लागते, तेव्हा ते नैसर्गिक संकट मानले जाते. त्याला तोंड देण्यासाठी दरवर्षी जय्यत तयारी केली जाते. वन विभागही सज्ज असल्याचा दावा दरवर्षी करतो, मात्र निसर्गाच्या लहरीमध्ये ही सर्व तयारी अक्षरश वाहून जाते.

काझिरंगाएवढय़ा प्रमाणात नसला, तरी एकशिंगी गेंडय़ांचा अधिवास या परिसरातील अन्यही अभयारण्यांत आहे. अशा अधिवासांपैकी पोबितोरा आणि मानस हे परिसर देखील जलमय झाले आहेत. मोरीगाव जिल्ह्य़ातील पोबितोरा वन्यजीव अभयारण्याचा ७० टक्के भाग पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे तेथील एकशिंगी गेंडे अभयारण्याबाहेर पडून अधिक उंच जागेच्या शोधात भरकटले आहेत. या अभयारण्यांतही १००हून अधिक एकशिंगी गेंडे आहेत. पुरामुळे त्यांच्यापुढे जीवन-मरणाचा प्रश्न उपस्थित झाला आहे. बह्मपुत्रेप्रमाणेच राज्यातील अन्यही १० नद्यांना पूर आला आहे. त्यामुळे परिस्थिती अधिक बिकट झाली आहे.

पाण्याची पातळी काहीशी कमी होताच विविध प्राण्यांचे मृतदेह अभयारण्य क्षेत्रात आणि क्षेत्राबाहेरही दिसू लागतात. एक हत्ती, दोन गेंडे आणि काही हरणांचे मृतदेह आढळले आहेत. अनेक प्राणी वाहून गेल्यामुळे त्यांचे मृतदेहही हाती लागलेही नाहीत. बह्मपुत्रेचा पूर एवढा मोठा आहे, की त्यात संपूर्ण गुवाहाटी बुडून जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. साधारण ९० हजार हेक्टर शेतजमीन पाण्याखाली गेली आहे. केंद्र सरकारने बचाव आणि मदतकार्यासाठी २५१.५२ कोटी रुपयांचा निधी दिला आहे.

ब्रह्मपुत्रेचा पूर ही नित्याचीच घटना झाली आहे. आसामवासीय त्याला सरावलेही आहेत. पण दर पावसाळ्यात ही महाकाय नदी जे नुकसान करून जाते ते भरून निघणारे नसते. त्यासाठी केले जाणारे मानवी प्रयत्न तोकडेच पडतात.

First Published on July 26, 2019 1:03 am

Web Title: brahmaputra flood wildlife survival
Just Now!
X