अमित भगत – response.lokprabha@expressindia.com

एच. एस. जॉर्ज या ब्रिटिश अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्याच्या असाधारण शौर्यासाठी ब्रिटनचे तत्कालीन राजे पंचम जॉर्ज यांनी सामा वेलादी याला ‘अल्बर्ट मेडल फॉर लाइफसेिव्हग’ पदक जाहीर केले. असे पदक मिळवणारा सामा हा एकमेव भारतीय. त्याची ही शौर्यकथा.

Netanyahu
अग्रलेख: मिरवण्याच्या मर्यादा!
Israel-Iran Conflict
इराणला प्रत्युत्तर देऊ नका! जागतिक नेत्यांचे इस्रायलला आवाहन
rape case in Gaziayabad
प्रियकराने केलेला बलात्कार लपवण्यासाठी आई करायची १० वर्षांच्या मुलीचा छळ, वेश्या व्यवसायात ढकलण्याचाही प्रयत्न
pashmina march will be held there on April 7 to highlight the issues in Ladakh
लडाखवासीयांचा आक्रोश सरकारच्या कानावर पडतच नाही; तुम्हाला तरी ऐकू येतोय?

भूतकाळातील अनेक रोमहर्षक, चित्तथरारक कथा आपण नेहमीच ऐकत असतो. या कथा कमालीच्या उत्कंठावर्धक असतात. बऱ्याचदा त्यात उत्कंठा वाढवणाऱ्या अघटित गोष्टींचा व प्रसंगांचा समावेश असतो. हे प्रसंग त्या कथांचा अंतिम परिणाम साधण्यासाठी वापरलेले असले तरी कित्येकदा त्यामुळे त्या कथा अतिशयोक्तीने भरलेल्या असतात. फारच निवडक सत्यकथा अशा असतात की ज्या मुळातच कमालीच्या रोमहर्षक व चित्तथरारक असतात. त्यांना वाढीव प्रसंगांची गरजच भासत नाही. अशीच एक सत्यकथा आहे गडचिरोलीच्या अतिदुर्गम, घनदाट जंगलातील. त्या गर्द निबिड अरण्यात मागमूस न ठेवता गुडुप झालेली.

सामा वेलादी हा माडिया गोंड आदिवासी मूळचा गडचिरोलीच्या जंगलातील ‘रापेली’ या गावचा. कोवळ्या वयात भावांशी झालेल्या वादानंतर सामा मूळ गाव सोडून रानोमाळ भटकत १०० किमी अंतरावरील बेजुरपल्ली या गावी पोहोचला. तेथील ‘कारे वेलादी’ या गावप्रमुखाकडे तो भूमिहीन मजूर म्हणून दिवसरात्र राबू लागला. उन्हात रापलेल्या शरीरावर केवळ एक लंगोट असा त्याचा वेष होता. गोंड समाजातील प्रथेनुसार ‘गोटुल’मध्येच त्याची बक्काबाईशी ओळख झाली. दोघांनी एकमेकांना आपले जीवनसाथी म्हणून निवडले. ‘गोटुल’ ही गोंड आदिवासींची प्रथा हजारो वर्षांपासून टिकून आहे. तिथे आपला जीवनसाथी निवडण्याचे स्त्रियांना स्वातंत्र्य असते. लग्नानंतर सामा आणि बक्काबाई जवळच्या मुडेवाही या जंगलातील गावात झोपडी बांधून राहू लागले.

९ नोव्हेंबर १९२४ च्या सकाळी भारतीय वनसेवा अधिकारी एच. एस. जॉर्ज, हे दक्षिण चांदाचे (सध्याच्या गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याचे) तत्कालीन उपवनसंरक्षक बेजुरपल्ली येथे दाखल झाले. त्यांना प्राणहिता नदीकाठावरील पारसेवाडा या गावी सर्वेक्षणाकरिता जायचे होते. बेजुरपल्ली ते पारसेवाडा हे अंतर १५ कि.मी. आहे. ही वाट निबिड अरण्यातून जाते. दिवसासुद्धा या वाटेने जाताना भीतीने थरकाप उडतो. ८०-९०च्या बुजुर्ग व्यक्ती आजही त्याकाळच्या परिस्थितीचे वर्णन करतात. त्यांच्या सांगण्यानुसार त्याकाळी या जंगलात वाघ, बिबटे तसेच अस्वल यांसारख्या श्वापदांचा स्वैर संचार होता. त्यामुळे एकटा-दुकटा माणूस या जंगलात पाय ठेवायला प्रचंड घाबरत असे. आजही हे जंगल पूर्वीसारखेच घनदाट व भयावह आहे.

बेजुरपल्ली हे ठिकाण ब्रिटिशकाळात सिरोंचा-पारसेवाडा मार्गावरील महत्त्वाचे ठिकाण होते. बेजुरपल्ली ते पारसेवाडा ही वाट मुडेवाही गावातून घनदाट जंगलाच्या मार्गाने जाते. मुडेवाहीच्या डोंगराची रांग या जंगलात शिरून खोल दऱ्या, ओढे यामुळे विभागली गेली आहे. या धोक्यांविषयी जागरूक असलेल्या जॉर्जने बेजुरपल्ली गावात पोहोचल्यावर गावचा प्रमुख असलेल्या कारे वेलादीला पुढच्या प्रवासाविषयी विचारणा केली. कारे वेलादीने सामाला जॉर्जसाहेबांना पारसेवाडा गावापर्यंत सोबत करण्यास सांगितले. जॉर्जबरोबर तीन बलगाडय़ांवर लादलेले सामान होते. १५ किमीची ही वाट अत्यंत घनदाट जंगलातून जात होती. त्यासाठी अवघड नदी-नाले ओलांडावे लागत होते. सामा त्यांच्याबरोबर निघाला.

गडचिरोलीचे हे घनदाट जंगल गोंडवानाचा भाग आहे. त्याला दंडकारण्य म्हणूनही ओळखले जाते. हे जंगल मुळात उष्ण कटिबंधीय पानझडीचे जंगल आहे. याच जंगलात एक नरभक्षक वाघ स्वैर फिरत असल्याची माहिती होती. बलगाडीने साधारणत दोन मलांचे अंतर कापल्यानंतर एक अरुंद दरी सुरू झाली. या भूप्रदेशाची खडानखडा माहिती असलेल्या सामाने जॉर्जला सामानाने भरलेल्या बलगाडय़ा मुख्य मार्गाने जाऊ देण्याचा सल्ला दिला आणि तो स्वत जॉर्जसोबत त्या घनदाट दरीत उतरला. या माग्रे पारसेवाडाचे अंतर साधारणत दोन मलाने कमी होते. सूर्यास्तापर्यंत मुक्कामी पोहोचण्याचे लक्ष्य डोळ्यासमोर ठेवून जॉर्जसुद्धा सामाच्या बरोबर जंगलातील वाट कापू लागला.

जॉर्जने आपल्यासोबत १२ बोअरची शॉर्टगन ठेवली होती. वाटेत जॉर्जने सामाच्या हातात बंदूक आणि तो एका भल्यामोठय़ा शिळेमागे नैसर्गिक विधीसाठी गेला. जॉर्जच्या दुर्दैवाने तिथे जवळच तो नरभक्षक वाघ होता. त्या वाघाने निमिषार्धातच जॉर्जवर मागून झडप घातली. जॉर्जचा गळा पकडला. त्याची धारदार नखे आणि तीक्ष्ण दात जॉर्जच्या मानेच्या मांसल भागात खोलवर रुतले. वाघाने जॉर्जला तसेच जवळपास डझनभर यार्डपर्यंत फरफटत नेले. या अचानक हल्ल्याने भयकंपित झालेल्या जॉर्जने शुद्ध हरपण्याआधी सामाला आवाज दिला. सामाने धावत जाऊन पाहिले तर तो वाघ जॉर्जला घनदाट झाडीत खेचून नेत होता.

सामा क्षणाचाही विलंब न करता जॉर्जच्या दिशेने धावला. त्याने थरथरत्या हातांनी बंदुकीचा छाप खेचण्याचा प्रयत्न केला. परंतु जॉर्जने ती बंदूक सामाकडे देताना तिला लॉक केले होते त्यामुळे बंदुकीतून गोळी काही सुटेना. आणि ते लॉक कसे उघडायचे याचे सामाला काहीच ज्ञान नव्हते. तेवढय़ात वाघाने सामाकडे पाहून डरकाळी फोडली. आपली शेपटी हलवून तो सामावर झेपावणार तितक्यात प्रसंगावधान राखून सामाने बंदुकीच्या दस्त्याने वाघाच्या डोक्यात जोरदार प्रहार केला. त्यामुळे तो नरभक्षक वाघ अधिकच संतापला आणि डरकाळ्या फोडू लागला. त्या डरकाळ्यांनी घाबरून पळून न जाता सामाने त्या गोऱ्या साहेबाला वाचवायचे ठरवले. मानेचा लचका तोडल्याने रक्तबंबाळ झालेले जॉर्जचे शरीर सामाला डोळ्यासमोर दिसत होते. त्याला वाचविण्याकरिता जिवावर उदार होऊन सामा वाघावर तुटून पडला. आपली सर्व शक्ती एकवटून तो बंदुकीच्या दस्त्याच्या वाघाच्या डोक्यावर जोरदार प्रहार करत राहिला.

वाघ त्या प्रहाराने गांगरून गेला आणि दूर हटला. परंतु ओढय़ाला फेरा मारून, गर्द झाडीतून दुसऱ्या बाजूने बाहेर येऊन सामावर चाल करून आला. तोपर्यंत सामाने जॉर्ज साहेबाचे शरीर आपल्या बाजूने ओढले आणि वाघाच्या पुढच्या हल्ल्याला तो तयार झाला. वाघ अधिकच आक्रमक होऊन आपल्या शिकारीचा पुन्हा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करू लागला. जोरदार डरकाळ्या फोडत तो सामावर झेपावण्याच्या आधीच सामाने त्याच्या तोंडावर पुन्हा एकदा बंदुकीचा जोरदार मारा केला. आता तर वाघाने संतापून बंदुकीचे तोंड पकडण्याची पराकाष्ठा केली. या झटापटीत सामाने बंदुकीचा दस्ता वाघाच्या घशात कोंबला. जॉर्जच्या रक्ताने माखलेले त्याचे विक्राळ तोंड, रक्ताळलेले दात आणि तोंडातून पडणारी फेसाळणारी लाळ यामुळे तो नरभक्षक वाघ अधिकच क्रूर व भेसूर दिसत होता.

दरम्यान, वाघाच्या डरकाळ्या आणि सामाच्या किंकाळ्या यांमुळे जॉर्जला शुद्ध आली. पण सावरून उभे राहण्याच्या प्रयत्नात तो पुन्हा कोसळला. असह्य़ प्राणांतिक वेदनांनी तो तडफडू लागला. शेवटी माघार घेत वाघ जंगलातील काळोखात अदृश्य झाला.

सामा जवळ येताच पुन्हा उठण्याची धडपड करणारा जॉर्ज अखेरीस तोल जाऊन कोसळला. त्याच्या मानेवरील जखमेतून रक्तस्राव होतच होता. वाघाचे चार तीक्ष्ण दात त्याच्या मानेत खोलवर रुतले होते. परंतु सुदैवाने त्याची तिथली रक्तवाहिनी तुटली नव्हती त्यामुळे तो बचावला होता. अन्यथा तो जागीच मरण पावला असता. सामाने जॉर्ज साहेबास आपल्या खांद्यावर घेतले आणि तो पुन्हा परतीच्या दिशेने मुडेवाहीकडे धावू लागला.

रक्ताच्या वासाने वाघ पुन्हा त्या दोघांच्या मागावर येऊ लागला. याची जाणीव होताच सामाने वेग वाढवला. जोरदार आरडाओरडा करत तो एका हातात बंदूक उगारून धावू लागला. शेवटी वाघाने त्यांचा पिच्छा सोडला. जॉर्ज साहेबास खांद्यावर घेऊन त्याने एक डोंगर पार केला. एका ओढय़ापाशी येताच सामाने जॉर्जची जखम पाण्याने स्वच्छ धुवून साफ केली. आजूबाजूच्या झाडीतून औषधी झाडपाला आणून त्याचा रस जॉर्जच्या जखमेवर पिळला. आणि पुन्हा त्याला खांद्यावर घेऊन गावाच्या दिशेने धावू लागला. मुडेवाही गावात पोहोचल्यावर त्याच्यावर आदिवासी पद्धतीने उपचार केले गेले. तेथून त्याला हलवून चंद्रपूर (चांदा) येथे नेण्यात आले. पुरेसे बरे वाटू लागल्यावर त्याला नागपूर येथील मेयो हॉस्पिटलात दाखल करण्यात आले. तेथे लेफ्टनंट कर्नल टार आणि नìसग स्टाफने त्यांची चांगली काळजी घेतली आणि शेवटी त्यांची प्रकृती चांगली झाली. १९२४ मध्ये दक्षिण चांदा वनक्षेत्राचा उपवनसंरक्षक असणारा एच. एस. जॉर्ज हा १९४७ मध्ये संपूर्ण मध्य प्रांताचा सर्वोच्च वनाधिकारीपदी मुख्य वनसंरक्षक म्हणून सेवानिवृत्त झाला.

सामाने जॉर्ज साहेबाला खांद्यावर घेऊन साधारणत चार किमी अंतर कापले. या मार्गावर जवळपास एक किमीपर्यंत तो वाघ त्या दोघांच्या मागावर होता. सामाच्या सततच्या ओरडण्यामुळे तो त्यांच्यापासून दूर राहिला. परंतु त्याच दिवशी त्याने एका गावकऱ्याला ठार मारले होते. या घटनेनंतर त्या वाघास नरभक्षक म्हणून घोषित करण्यात आले. त्यानंतर काही महिन्यांत जवळपासच्या गावातील अनेक लोकांना ठार त्याने मारले. त्यानंतर तो त्या भागातून विस्मयकारकरीत्या कायमचा नाहीसा झाला.

एच. एस. जॉर्ज या ब्रिटिश (पान २४ वर)   अधिकाऱ्याचे प्राण वाचविण्याच्या असाधारण शौर्यासाठी ब्रिटनचे तत्कालीन राजे पंचम जॉर्ज यांनी सामा वेलादी यास ‘अल्बर्ट मेडल फॉर लाइफसेिव्हग’ हा पुरस्कार जाहीर केला. हा पुरस्कार जीव धोक्यात घालून इतरांचे प्राण वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करणाऱ्यांना दिले जातो. युद्धभूमीव्यतिरिक्त अन्य ठिकाणी दाखविलेल्या असामान्य शौर्यासाठीचा तो एक महत्त्वाचा पुरस्कार होता. ७ मार्च १८६६ रोजी सर्वप्रथम तो सुरू झाला आणि १९७१ मध्ये तो बंद करण्यात आला. ब्रिटनची राणी व्हिक्टोरियाचे १४ डिसेंबर १८६१ रोजी निधन झालेले पती तसेच प्रिन्स अल्बर्ट यांच्या नावे हा पुरस्कार सुरू करण्यात आला होता. सुरुवातीला हा पुरस्कार केवळ समुद्रावर जीव एखाद्याचा वाचविण्याच्या असामान्य शौर्याबद्दल देण्यात येत असे. १८७७ मध्ये तो जमिनीवर एखाद्याचा जीव वाचविण्याच्या असामान्य शौर्याबद्दलसुद्धा देण्यात येऊ लागला. हा सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्कार प्राप्त करणारा सामा वेलादी हा एकमेव भारतीय आदिवासी आणि मध्य प्रांताचा एकमेव रहिवासी होता.

सामाला या पुरस्कारासोबत ४५ एकर जमीन बहाल करणारी सरकारी सनद, बलजोडी, चांदीचा कमरपट्टा, त्याच्या शौर्याचे अंकन केलेला चांदीचा बाजूबंद आणि रोख बक्षीस मिळाले. हा पुरस्कार घेण्यासाठी तो लंडनला जाऊ शकला नाही, म्हणूनच त्याला मध्य प्रांताचे मुख्यालय नागपूर येथे बोलाविण्यात आले. तो केवळ एक लंगोट लावून पुरस्कार घेण्यासाठी गेलेला होता. त्यामुळे राज्यपालांना त्याच्या छातीला ते पदक लावता न आल्याने ते त्याच्या हातात देण्यात आले.

मात्र सामाच्या परिवाराची आज शोकांतिका झाली आहे. ४५ एकरांपकी २० एकरांची सुपीक गाळाची जमीन ही प्राणहिता नदीच्या पुरात वाहून गेली आहे. त्या मोबदल्यात पर्यायी जमीन देण्यास शासकीय अधिकाऱ्यांनी नकार दिला आहे. सामा १९६८ मध्ये मरण पावला. त्याच्या हक्कासाठी त्याच्या परिवाराचा संघर्ष चालूच आहे. सामाचा नातू िलगा वेलादी हा मुडेवाही गावचा सरपंच आहे. त्याने आपल्या हक्कासाठी स्थानिक प्रशासकीय अधिकाऱ्यांकडे दाद मागितली. पुरावा म्हणून ब्रिटिशांनी दिलेली सनद दाखवली, तर अधिकाऱ्यांनी ती जमीन ब्रिटिशांकडून घेण्यास सांगितले. आता त्याच्या कुटुंबीयांचा पर्यायी जमिनीसाठी संघर्ष सुरू आहे.

शोध सामा वेलादीचा

लंडन गॅझेटमधील चंद्रपूर जिल्ह्य़ााच्या ब्रिटिशकालीन नोंदी शोधत असताना मला या असामान्य वास्तवकथेचा उल्लेख मिळाला. या प्रसंगाचा आपल्या देशात कुठेही नामोल्लेख नाही. आदिवासी संस्कृती आणि जीवन यांवर अभ्यास व संशोधन करणाऱ्या संस्थांकडेही याबाबत काहीच माहिती नसावी ही दुर्दैवाची गोष्ट आहे. दक्षिण चांदाचे मुख्य वनसंरक्षक म्हणून सेवानिवृत्त झालेल्या व्ही. टी. पत्की यांच्या मदतीने संबंधित मी मुडेवाही जवळच्या जॉर्जपेठा या गावी पोहोचलो. सदर गाव हे एच. एस. जॉर्ज यांनीच वसविल्याची माहिती मिळाली. त्यामुळे सामाच्या वंशजांचा ठावठिकाणा शोधणे शक्य झाले. मला सामाच्या मुला- नातवंडांचा शोध घेता आला. सदर प्रसंग घडला ते ठिकाण पाहता आले. त्याची कथा सामाच्या वंशजांकडून समजून घेता आली. या भागातील माडिया गोंड समाजाची भाषा माडिया तसेच तेलुगू असल्याने हनुमान वरके यांच्या मदतीने मला स्थानिकांशी संवाद साधता आला. त्यामुळे सामाच्या शौर्याची कहाणी मांडता आली.