02 March 2021

News Flash

पर्यावरणाच्या आरोग्याचे सूचक

जैवविविधतेच्या साखळीमधल्या या इवल्याशा जिवाच्या महाराष्ट्रात २४७ प्रजाती सापडतात.

महाराष्ट्राचा ‘बायो’डेटा
फुलपाखरू
सतत हवेत भिरभिरणारं आणि अगदी कमी काळाचं जीवनचक्र असलेलं फुलपाखरू हा म्हटलं तर निसर्गातला अगदी किरकोळ घटक. पण या किरकोळ घटकामध्येदेखील निसर्गाने थक्क करून सोडणारं वैविध्य निर्माण केलं आहे, जैवविविधतेच्या साखळीमधल्या या इवल्याशा जिवाच्या महाराष्ट्रात २४७ प्रजाती सापडतात.

निसर्ग हा अनेक रोचक घटकांनी निर्माण झाला आहे. स्वत: निसर्गानेच उधळलेल्या असंख्य रंगांमध्ये इतकी विविधता आहे की त्याचे र्सवकष वर्णन करायचे तर शब्द कमी पडतील. या निसर्गचक्रातला एक अगदी छोटासा जीव म्हणजे फुलपाखरू. आपल्या बहुविध रंगांनी स्तिमित करून सोडणारा हा जीव. खरं तर फुलपाखरू हा शब्द मराठी असला तरी आपल्याकडच्या काही मोजक्याच फुलपाखरांची मराठी नावं सोडली तर जवळपास सर्वच फुलपाखरांना इंग्रजी नावं आहेत. त्याचं कारण या फुलपाखरांचा प्राथमिक अभ्यास केला तो इंग्रजांनीच. पण दैवदुर्वलिास असा की, याच इंग्रजांच्या स्वत:च्या देशात इंग्लंडमध्ये फुलपाखरांच्या फक्त ४७ प्रजाती सापडतात. आणि आपल्या तब्बल देशात दीड हजार इतक्या प्रजाती आहेत. त्यापकी महाराष्ट्रात २४७ प्रजाती आढळतात. अर्थात पक्षी किंवा प्राण्यांप्रमाणे फुलपाखरांची विस्तृत अशी यादी (चेकलिस्ट) नसली तरी २४७ फुलपाखरांच्या नोंदी झाल्या आहेत हे नक्की.

भारतात फुलपाखरांचे दोन हॉटस्पॉट आहेत. म्हणजे ही ठिकाणं फुलपाखरांचे वैविध्य आणि संख्या या दोन्ही बाबतीत श्रीमंत आहेत. एक म्हणजे उत्तरेत हिमालय आणि उत्तर पूर्वेकडील राज्ये आणि दुसरा हॉटस्पॉट पश्चिम घाट. एकटय़ा पश्चिम घाटातच ३३४ इतक्या प्रजाती असून त्यातील ११ या केवळ पश्चिम घाटातच सापडणाऱ्या (म्हणजेच एन्डेमिक) प्रजाती आहेत. महाराष्ट्राला लाभलेल्या पश्चिम घाटातील सह्यद्रीचा भाग हा अतिशय सृदृढ अशा जैववैविध्याचा आहे. अर्थातच महाराष्ट्रातील फुलपाखरांचे वैभव या परिसरातच अधिक आहे. त्यातही अंबोली आणि परिसर याबाबतीत अधिक समृद्ध आहे. विदर्भातदेखील खूप जंगल आहे, मात्र तेथे सह्याद्रीसारखी जंगलातील विविधता नाही. तसेच तेथील जंगल हे सदाहरित जंगल नाही, फुलपाखरांना सदाहरित जंगल अधिक प्रिय असते. त्यामुळे विदर्भात फुलपाखरं आहेत, पण त्यांचे वैविध्य मर्यादित आहे. पक्षी, प्राणी, झाडे याप्रमाणेच फुलपाखरांचा अधिवासदेखील ठरलेला असतो. काही सर्वत्र आढळणार तर काही ठरावीक ठिकाणीच. ‘सदर्न बर्डिवग’ हे भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू अंबोली आणि परिसरात दिसणार, तसेच ते दक्षिण पश्चिम घाटात आढळणार. पण इतरत्र कुठे दिसणार नाही. मलाबार बॅण्डेड पिकॉक हे अंबोली, सावंतवाडी, तर पॅरीस पिकॉक हे अंबोली व परिसर या ठिकाणीच तुम्हाला दिसतील. एकूणच अंबोलीपासून एक वेगळीच जैवविविधता आपणास दिसून येते. तर क्रिमसन टिप, लिटिल ऑरेंज टिप, स्पॉटेड पीआरओ ही फुलपाखरं देशात इतरत्र दिसतील, पण महाराष्ट्रात फक्त विदर्भातच आढळणार. केवळ महाराष्ट्रातच दिसणारी अशी फुलपाखरं आपल्याकडे नाहीत. पण केवळ पश्चिम घाटात आढळणारी फुलपाखरं महाराष्ट्रातील पश्चिम घाटात म्हणजे सह्यद्रीत काही ठिकाणी दिसतात. एकूणच आपल्या देशात फुलपाखरांची जितकी विविधता आहे तेवढी जगात कुठेही नाही हे मात्र नक्की.

खरे तर फुलपाखरांकडे केवळ नयनरम्य कीटक म्हणूनच पाहायची आपल्याला सवय आहे. पण त्यांच्याकडे त्याहीपलीकडे जाऊन या सृष्टिचक्राचा भाग म्हणून पाहायला हवे इतके त्यांच्यात वैविध्य आहे. त्यांचे वावरणे, बचावासाठी त्यांनी स्वीकारलेल्या अनेक क्लृप्त्या, हे सारेच इतके विस्मयकारी आहे की या चिमूटभर जिवांच्या आयुष्यात इतक्या काही घडामोडी होत असतील हे सांगूनही खरे वाटणार नाही. सुदैवाने आपल्याकडे आता त्यांचा तसा अभ्यास झाला असून त्यावर बरीचशी पुस्तकंदेखील आली आहेत.

सुरुवातीला आपण फुलपाखरांचे सृष्टिचक्रातील नेमके स्थान समजावून घेऊया. फुलपाखरांच्या अंडय़ापासून अळी तयार होते आणि त्यानंतर तिचे कोशात रूपांतर होते. या कोशातून यथावकाश फुलपाखरू बाहेर पडते. ही अळी अनेक पक्ष्यांचे अन्न असते. विशेषत: एखादा पक्षी जेव्हा विणीच्या हंगामात असतो तेव्हा त्याला प्रथिनयुक्त अन्न गरजेचे असते. ही अळी त्या पक्ष्याची ती गरज भागवू शकते. अशी गरज अन्य अळ्यादेखील भागवतात, त्यामुळे एखाद्या शेताजवळ पक्ष्याचे घरटे असेल तर त्या शेतातल्या अळ्यांवर हे पक्षी जगतात. पण फुलपाखराची अळी ही बहुतांशपणे झाडांवर, वेगवेगळ्या ठिकाणी असते. त्यामुळे पक्ष्यांसाठी ते चांगलेच खाद्य ठरते. फुलपाखरांचा दुसरा सर्वात महत्त्वाचा उपयोग म्हणजे परागीभवन. हे त्या फुलपाखरास खूपच प्रिय असते. कधी कधी अति परागसेवनामुळे  काळसर फुलपाखराचा रंगदेखील तात्पुरता पिवळा दिसू लागतो. त्याचबरोबर फुलपाखराला जगण्यासाठी अनेक घटकांची गरज असते. ती गरज ते याच सृष्टिचक्रातून मिळवत असते. अगदी मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेपासून ते रुईच्या विषारी चिकापर्यंत विविध घटकांचा वापर फुलपाखरे करतात.

फुलपाखरं ही मुख्यत: सर्वसाधारण वातावरणात वाढतात. अति पाऊस, अति थंडी, अति उकाडा आणि वाढते प्रदूषण हे त्यांना सहन होत नाही. त्यामुळे वातावरणाच्या बदलाचे द्योतक म्हणून त्यांच्याकडे पाहता येते. पर्यावरणाचे आरोग्य म्हणून फुलपाखरांकडे पाहिले जाते. फुलपाखरं दिसली नाहीत तर समजून जायचे की येथील पर्यावरणात काही तरी गडबड आहे. त्यांचे शरीर हे अशा वातावरणाच्या तीव्रतेला जुळवून घेण्यासाठी तयारच झालेले नसते. मग अशा वेळी फुलपाखरं काय करतात? तर स्थलांतर करतात. पक्ष्यांप्रमाणे अगदी एका खंडातून दुसऱ्या खंडात जात नाहीत, पण त्यातल्या त्यात कमी त्रास कसा होईल हे पाहतात. हिमालयात अतिउंचावर थंडी वाढली की फुलपाखरं खाली कमी उंचीवर येतात. दक्षिणेत तर ‘क्रिमसन रोझ’सारखी फुलपाखरं चक्क समुद्र ओलांडून श्रीलंका गाठतात. डिसेंबर-जानेवारी या मोसमात तिथे फुलपाखरांच्या झुंडीच्या झुंडी उडताना दिसतात. त्यातील काही वाहनांना थडकून मरणदेखील पावतात. महाराष्ट्राच्या बाबतीत पश्चिम घाटातील फुलपाखरे अति पावसात काही प्रमाणात पूर्व महाराष्ट्रात स्थलांतर करतात. असे स्थलांतर अगदी मुंबईतदेखील दिसून येते. माथेरानमध्ये अतिपावसाच्या काळात तेथील फुलपाखरं कमी पावसाच्या ठिकाणी मुंबई आणि परिसरात येतात. अतिपावसात फुलंदेखील फारशी नसतात, आणि त्यामुळे प्रजननासदेखील अटकाव होतो. महाराष्ट्राचे राज्य फुलपाखरू ‘ब्लू मॉर्मन’ हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. पण यातदेखील आणखीन एक मजा आहे. भर पावसाळ्यात माथेरानचे फुलपाखरू मुंबईत येते, पण जेव्हा ते परत माथेरानला जाते तेव्हा तेच नसते. तर मधल्या काळात त्याच्या एकदोन पिढय़ा मुंबईत जन्माला येऊन गेलेल्या असतात. पण दोन पिढय़ांनतरचे ‘ब्लू मॉर्मन’ पुन्हा आपोआप माथेरानला पोहोचते. हे कसे होते, याचे उत्तर सध्या तरी देता येणार नाही, पण हा त्यांच्या जनुकीय रचनेचा भाग असतो असे म्हणता येईल.

फुलपाखरू हा कीटक इतका छोटा आहे की ‘अलेक्झांड्रा बर्डिवग’ (२५० मिमी) हा त्यांच्यातला सगळ्यात मोठा जीव तर ‘ग्रास ज्वेल’ (१४ मिमी) हे सर्वात छोटे फुलपाखरू आहे. निसर्गचक्रातील इतर प्राण्यांप्रमाणे निसर्गाने यांना स्वसंरक्षणासाठी काहीही साधन दिलेले नाही. मग हे स्वसंरक्षण कसे करतात हा प्रश्न पडू शकतो. त्यासाठी ही फुलपाखरे अनेक प्रकार अवलंबतात. कधी ते विषारी झाडांचा आधार घेतात, तर कधी स्वत:ची रचनाच झाडांच्या पानासारखी करून भक्षकाला हुलकावणी देतात, तर कधी चक्क एखादा अंगरक्षकदेखील ठेवतात.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या फुलपाखरांपकी अशा काही मोजक्या फुलपाखरांची ही गंमत नक्कीच पाहण्यासारखी आहे. ‘कॉमन टायगर’ हे फुलपाखरू रुईच्या झाडाचा आधार घेत स्वत:चे संरक्षण करते. रुईच्या चिकातील विषाचा ते वापर करते. माणसाने जर हा चीक एक चमचाभर घेतला तर त्याला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. पण ‘कॉमन टायगर’ची मादी ही या पानांवर अंडी घालते. मग ही अळी स्वत:भोवती एखाद्या खंदकाप्रमाणे रचना तयार करते. ती पानाचा मधला भाग नंतर खाते ज्यामध्ये विषाची मात्रा कमी असते. नंतर ती अळी त्या पानाचा देठापासूनचा संबंध तोडून टाकते, परिणामी पानात विष परत येत नाही. हे पान ती फस्त करते. त्यानंतर कोषातून बाहेर येणाऱ्या फुलपाखरात हे विषारी घटक असतात. हे फुलपाखरू अतिशय संथपणे उडते. जणू काही ते पक्ष्याला आमंत्रणच देत असते की ये आणि माझ्यावर हल्ला कर. अशा वेळी पक्ष्याने त्याच्यावर हल्ला केला तर त्या पक्ष्याला उलटी होते. त्यामुळे त्याच्या हृदयाची धडधड वाढते. यामुळे पक्षी मरत नाही, पण त्याला धडा मिळतो की यापुढे या फुलपाखराच्या नादी लागायचं नाही.

आता या फुलपाखरांमध्ये ही बुद्धी आली कोठून? याचे विश्लेषण आपल्याला करता येणार नाही, पण ती त्यांच्यामध्ये जनुकीय संक्रमणातच येत गेली हे नक्की. पण मग ज्या फुलपाखरांकडे अशी काही यंत्रणा नाही ती काय करतात? विशेषत: माद्या. कारण अंडी घालण्यासाठी त्या पानांजवळ जातात तेव्हा त्या पक्ष्यांचे भक्ष्य ठरू शकतात. मग काही मादी फुलपाखरं ही ‘कॉमन टायगर’च्या मादीप्रमाणेच दिसण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे त्या मिमिक्री करतात असं, म्हणूयात. त्यामुळे त्यांना भक्षकापासून सुरक्षित राहता येते. ‘डायनेड ईगल फ्लाय’ या फुलपाखराची मादी ही ‘कॉमन टायगर’सारखी दिसते. मग अशा वेळी नर फुलपाखराने तिला कसे ओळखायचे हा प्रश्न उरतोच. तर ही मादी एक विशिष्ट प्रकारचा सुवासिक गंध सोडते, जेणेकरून नर आकर्षति होतो व प्रजनन होते.

‘क्रिमसन रोझ’ आणि ‘कॉमन रोझ’ या फुलपाखरांनादेखील पक्षी हात लावत नाहीत. मग त्यांचीच मिमिक्री ‘कॉमन मॉर्मन’ या फुलपाखराची मादी दोन वेगवेगळ्या रंगांत करते.

दुसरे असेच आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे झाडाच्या वाळलेल्या पानांप्रमाणे दिसणारी फुलपाखरे. ‘ब्ल्यू ओक लिफ’ हे आपल्याकडे हमखास दिसणारे फुलपाखरू अनेकांना माहीत असेलच. तर असेच ‘ऑरेंज ओक लिफ’ हे हिमालयात सापडते. एका बाजूने मस्त निळा रंग मिरवणारे हे ‘ब्ल्यू ओक लिफ’ फुलपाखरू पंख मिटून बसले की एखाद्या वाळलेल्या पानासारखे दिसते. पक्षी मागे लागला की हे फुलपाखरू उडत उडत पटकन जमिनीवर किंवा झाडावर पंख मिटून बसून जाते. पक्षी निळा रंग शोधत राहतो आणि तो काही त्याला दिसत नाही. आता हा बदल त्या फुलपाखरात कसा झाला असेल, तर हे सारे बदल उत्क्रांतीच्या ओघात घडत गेले. कधी काळी ही फुलपाखरे मातकट होती. मग त्यांच्यावर पानांप्रमाणे डाग, रेषा तयार होत गेल्या. ज्यांच्यावर असे डाग, रेषा अगदी स्पष्ट आणि प्रभावी होत्या ती उत्क्रांतीच्या प्रक्रियेत जगली, वाढली. निसर्ग हा एक कसबी मूर्तिकार आहे, असे जे आपण म्हणतो त्याचे हे उत्तम उदाहरण आहे.

फुलपाखरांचे भडक रंग ही पक्ष्यांसाठी धोक्याची सूचना असते. अशा रंगांच्या फुलपाखरांच्या मागे पक्षी जात नाहीत. ‘जिझाबेल’लादेखील पक्षी त्रास देत नाहीत, कारण ते बांडगुळावर अंडी घालते. त्याच्या पानांमध्ये टॉक्सिक रसायन असते.

काही फुलपाखरे ही चक्क अंगरक्षक घेतात. ‘कॉमन सिल्व्हर लाइन’ या फुलपाखराची अळी पाहिली तर तिच्यावर एक मुंगी बसलेली दिसेल. ही मुंगी तिचे संरक्षण करते. साहजिकच हे संरक्षण ती काही फुकट करणार नाही. त्यासाठी तिलादेखील काही तरी मोबदला मिळायला हवा. तर हा मोबदला तिला मिळतो. त्या अळीच्या टोकावर मधुर रसाच्या ग्रंथी असतात. तो मधुर रस त्या मुंग्यांना आवडतो. त्यामुळेच अळी कोशात जाईपर्यंत ती मुंगी तिचे रक्षण करत असते.

फुलपाखरांच्या जीवनमानात काही घटना खूपच इंटरेिस्टग आहेत. त्यांच्यात अगदी माणसाप्रमाणे हुंडय़ाची पद्धत असते. हा हुंडा क्षार रूपाने मादीला दिला जातो. मादी अशाच नराची निवड करते, ज्याच्याकडे क्षार अधिक असतात. फुलपाखरांकडे फुलांमधून मिळालेली ऊर्जा असते, पण क्षार नसतात. मादीला या क्षारांची गरज असते. मग हे क्षार मिळवण्याचे काम नराचे असते. त्याला आपण ‘मड पडिलग’ म्हणतो. ज्याच्याकडे अधिक क्षार असतात त्यालाच मादीशी समागम करण्याची संधी मिळते. चिखलावर बसून नर हे क्षार गोळा करतात.

काही फुलपाखरे एक नंबरची दारूडी असतात. दचकलात ना, पण हे खरे आहे. यांचे खाद्य हे फुलांपेक्षा अशा प्रकारच्या पदार्थावर अधिक असते जेथून त्यांना हे हाय फ्यूएल मिळेल. हे घटक त्यांना मिळतात कुजलेल्या फळांमधून. पेरू, पपई यांसारखी फळे पडून कुजली की त्यावर ते अक्षरश: वेडय़ासारखे बसलेले असतात. जणू काही िझगलेलेच असतात. अगदी तुम्ही त्यांना हात लावलात तरी त्यांना उडता येत नाही. मध्यंतरी एकदा बोरिवलीच्या संजय गांधी नॅशनल पार्कमधील एका दारूच्या गुत्त्यावर पोलिसांनी धाड टाकली होती. तेव्हा तेथील कुजलेल्या गुळावर फुलपाखरे मजेत बसलेली आम्ही पाहिली आहेत.

फुलपाखरू या शब्दामध्येच फूल हा शब्द असला तरी फुलपाखरे ही काही फुलांवर अजिबातच फिरकत नाहीत. काही दिवसांपूर्वी आम्ही एका संस्थेत गेलो होतो. त्यांनी भरपूर झाडे, फुलझाडे लावली होती, पण त्यावर फुलपाखरे अगदीच मर्यादित होती. कारण तेथील फुले फुलपाखरांसाठी नव्हतीच. गुलाब, मोगरा, शेवंती, जाई-जुई अशा फुलांवर फुलपाखरे अजिबात फिरकत नाहीत, कारण त्यांची रचना फुलपाखरांना परागकण शोषून घेता येतील अशी नसते.

या फुलपाखरांच्या परागीभवनाचे काम इतर कीटक करतात. फुलपाखरांसाठी गरजेची असतात ती गुच्छेदार फुले. घाणेरी, निरगुडी सारख्या फुलांवर फुलपाखरे हमखास येतात, कारण या फुलांची रचना ही त्यातील परागकण फुलपाखरांनी शोषून घ्यावेत अशी विकसित झालेली असते.

सर्वच फुलांवर फुलपाखरे येत नाहीत, तसेच काही फुलपाखरे ही कोणत्याच फुलांवर जगत नाहीत. घाम, प्राण्यांचे मलमूत्र, विष्ठा, माशांचे अथवा अन्य प्राण्यांचे अवशेष, मेलेले खेकडे, वगरे हेच त्या फुलपाखरांचे खाद्य असते. ‘ब्ल्यू ओक लिफ’ हे फुलपाखरू तर तुम्हाला पावसाळ्यात मेलेल्या खेकडय़ांवर हमखास दिसणार. तर काही फुलपाखरे मांसाहारी प्राण्यांच्या विष्ठेवर बसतात. कारण त्यात नायट्रेट अधिक असते आणि ते नायट्रेट त्या फुलपाखरांना मादीला द्यायचे असते.

आणखीन एका वेगळ्या प्रकारे अन्न मिळवणारे फुलपाखरू म्हणजे

‘टायगर’ आणि ‘क्रो बटरफ्लाय’. ही खुळखुळा या वनस्पतीवर जगते. या छोटय़ाशा झाडाच्या पानांतून त्यांना पायरोलीझीडीन अल्कॉलाइड मिळते. या झाडाला फुलपाखरं अक्षरश: लगडलेली असतात. ही पान खरवडून ते अल्कॉलाइड मिळवतात. त्याचा वास खूप उग्र असतो. अशा सर्वाधिक उग्र वासाच्या नराची निवड मादी करते. जेणेकरून त्याच्याशी समागम केल्यानंतर दिल्या जाणाऱ्या अंडय़ांना आणि फुलपाखरांनादेखील तो वास मिळेल आणि त्याचे संरक्षण होईल. अशाच प्रकारे सापसुंड या झाडावर ‘क्रीमसन रोझ’देखील बसलेले असतात.

फुलपाखरू आणि पतंगांमध्ये बऱ्याच वेळा सर्वसामान्यांची गफलत होण्याचा संभव असतो. पण फुलपाखरू हे दिशाचर आहे, तर पतंग हे निशाचर. ‘इव्हििनग ब्राऊन’सारखी काही फुलपाखरं सायंकाळीदेखील उडतात, तर काही पतंग दिवसा फुलपाखरांबरोबर उडतात. पण हे केवळ अपवादच म्हणावे लागतील. उत्क्रांतीच्या टप्प्यांवर आधी पतंग आले आणि मग फुलपाखरं आली. तुलनेने फुलपाखरं तरुण आहेत. पण शास्त्रीय दृष्टिकोनातून या दोघांची जातकुळी एकच आहे. लेपिडोप्टेरा- स्केली विन्ड इन्सेक्ट हे – म्हणजेच अंगावर खवले असलेले कीटक. पण पतंग हे प्रजातीनुसार आणि संख्येनुसारही फुलपाखरांच्या दहापट आहेत.

फुलपाखरांचे जीवनचक्र, त्यांची वैशिष्टय़ं आपण पाहिली. ही सारी महाराष्ट्रात आढळणारी फुलपाखरं आहेत. तुलनेने पश्चिम घाटात यांची संख्या अधिक आहे. त्यांचे सृष्टिचक्रातील महत्त्वदेखील वेळोवेळी अधोरेखित होत गेले आहे. येनकेनप्रकारेण  ते आपल्याशीदेखील जोडलेले आहे. कारण आपणदेखील याच चक्राचा भाग आहोत. फुलपाखराचा मला काय उपयोग असे आपण म्हणू शकणार नाही. त्यातही जिथे त्यांचा वावर अधिक आहे तो पश्चिम घाट म्हणजे केवळ एक जंगल नाही तरी आपण सगळेच जिच्यावर विसंबून आहोत, अशी एक व्यवस्था आहे.

आज जंगल भटकणाऱ्यांची संख्या वाढते आहे. फुलपाखरांची आवड असणारे अनेक गट तुम्हाला समाजमाध्यमांवर सहज सापडतील. मी ‘बटरफ्लाइज ऑफ इंडिया’ हे पुस्तक लिहिले तेव्हा आपल्या देशातीलच नाही तर फुलपाखरांचा अभ्यास करणाऱ्या अगदी पाकिस्तान, भूतानमधील फेसबुकवरील समूहांची मदत मला मिळाली होती. आपणदेखील अशा समूहांमध्ये सामील व्हायला हवे. महत्त्वाचे म्हणजे हे सारे अनुभवणे, त्याचा आनंद घेणे हे सारे निखळ आनंदाचे तर आहेच, पण एक आरोग्यदायी छंद आहे. कळत्या वयातच मुलांना असे छंद लागले तर नक्कीच या फुलपाखरांच्या छोटय़ाशा दुनियेचा अफाट आनंद आयुष्यभर घेता येईल.

फुलपाखरांच्या नावातील गंमत

इंग्रजांनी आपल्याकडच्या फुलपाखरांचा अभ्यास केला. फुलपाखरं जमा करणे, त्यांची रचना तपासणे, त्यांचे नामकरण करणे हे सर्व त्यांनी केले. त्यामुळे आजही आपल्याकडच्या सर्वच फुलपाखरांची नावं ही इंग्रजी आहेत. मध्यंतरी पुण्याच्या विवेक परांजपे यांनी ही नावं मराठीत करण्याचा प्रयत्न केला होता. ढाण्या वाघ, हबशी अशी अनेक रंजक नावं त्यांनी दिली होती. पण त्यांच्या अकाली निधनानंतर हे काम थांबले. विशेष म्हणजे आपल्याकडे ग्रामीण भागातून अनेक पक्ष्यांना मराठी नावं आहेत तशी फुलपाखरांना नाहीत. या सर्वामुळेच आजही इंग्रजी प्रचलित नावंच वापरली जातात. पण या नावांमध्येदेखील रंजकता आहे.

सुरुवातीला ही नावं देणारे अभ्यासक सन्यातील होते. त्यामुळे त्यांनी अनेक ठिकाणी कमाडोर, सरजन्ट अशी नाव दिलेली आढळतात.

काही ठिकाणी पौराणिक कथा, ग्रीक कथांतील पात्रांचा आधार घेण्यात आला आहे. ‘जेझेबेल’ हे फुलपाखरू अतिशय भडक रंगाचे असते. हे पात्र एका ग्रीक कथेतील आहे. त्यानुसार याचा अर्थ देहविक्रय करणारी स्त्री असा होतो. एका ग्रीक राजाच्या अंगवस्त्राचे नाव जेझबेल असे होते.

तर जंगलात सतत व्याकुळतेने उडणाऱ्या छोटय़ाशा पांढुरक्या फुलपाखराला आपण ‘साइकी’ म्हणून ओळखतो. ‘साइकी’ हीदेखील एका कथेतील परी आहे. तिचा प्रियकर जंगलात हरवलेला आहे आणि ती त्याच्या शोधात सरभर झालेली आहे. ‘साइकी’ हे फुलपाखरू हे सतत सरभरच झालेले असते. ते कधीच एका जागी स्थिर बसत नाही.

‘मॉर्मन’ हादेखील अशाच एका कथेतील नायक, ज्याला अनेक स्त्रिया असतात. तर ‘मॉर्मन’ या फुलपाखराचादेखील तीन रंगांच्या मादी फुलपाखरांशी समागम होतो.

फुलपाखरांचं जीवनचक्र

अंडी, अळी, कोश व प्रौढ फुलपाखरू असे फुलपाखराचं जीवनचक्र असतं. मादी तिच्या आयुष्यात एकदाच समागम करते. तर नर दोन-चार वेळा करतो. काही नर तर आणखीन विचित्र असतात. अपोलो नावाचं एक फुलपाखरू समागम झाल्यानंतर मादीला एक असा प्लग लावतो, ज्यामुळे ती अन्य कोणाशी समागम करणार नाही. मादी कोशातून बाहेर पडते तेव्हा तिच्या पोटातच अंडी असतात. पण ती फलित झालेली नसतात. ती नराशी समागम करते तेव्हाच ती अंडी फलित होतात आणि मग मादी ती अंडी पानावर सोडते. काही प्रजातींचे नर, मादी कोशातून केव्हा बाहेर पडते याची वाटच पाहत असतात. तर काही नर चक्क कोशाशीच समागम करतात.

मादीने पानावर अंडी घातल्यानंतर अंडय़ावर चिकट द्राव असल्यामुळे ती पानावर चिकटून राहतात. काही माद्या एका वेळी एकच अंडं घालतात. काही एका वेळी खूप अंडी घालतात. काही माद्या कधी कधी एका झाडावर एकच अंडं घालतात. आपण कसे पसे एकाच बँकेत ठेवत नाही तसं फुलपाखरंदेखील एकाच झाडावर अंडी न घालता वेगवेगळ्या झाडांवर घालतात. विशेष म्हणजे अंडी घातली की फुलपाखराच्या मादीचं काम संपतं. अंडय़ांचं तसेच कोशाचं संरक्षण करणं, त्यातून आलेल्या फुलपाखराचं पालनपोषण करणं असं पालकत्व येथे नाही.

अंडय़ाच्या आत अळीची वाढ झाली की मग ती अंडय़ाचं पुढील आवरण फोडून ती बाहेर येते. बाहेर आल्यावर प्रथम ती अंडय़ाचं कवचच खातं. मग पान खाऊ लागते. या काळात अळी पाच ते सहा वेळा कात टाकते आणि मग कोशात जाते. कोशात जाण्यापूर्वी अळी योग्य जागा म्हणजेच झाडाचं पान शोधते. मग रेशमाचे धागे विणून स्वत:साठी ती जागा सुरक्षित करून घेते. पतंगांच्या कोशावर जसं रेशमाचं भरपूर आवरण असतं तसं येथे नसतं. पतंगाइतकं रेशीम फुलपाखरांकडे नसतं. काही कोश तर काठीसारखे दिसतात. कोशांचे रंग सर्वसाधारणच असतात. कोशात किती वेळ थांबायचे हे त्या त्या परिस्थितीवर अवलंबून असतं.

फुलपाखरू कोशातून बाहेर पडताना पाहणं खूपच मोहक असतं. साधारण पहाटेच्या वेळी ही प्रक्रिया होते. कोशातून बाहेर पडल्यानंतर साधारण १२ ते १५ दिवसांमध्ये त्याचे नवीन अवयव विकसित होतात. कोशातून बाहेर पडलेलं फुलपाखरू फांदीला उलटं लटकून बसतं. जेणेकरून रक्तप्रवाह शरीरात पसरू शकेल. त्याच्या रक्तात लोह नसतं, तांबं असते. त्यामुळे रक्त पिवळट असतं. कोशातून बाहेर पडल्यावर साधारण अध्र्या तासात ते पंख पसरून उडू लागतं. भक्षकाने हल्ला करू नये म्हणून ही प्रक्रिया साधारण पहाटेच्या वेळी होते. फुलपाखराचं आयुष्य हे सुमारे किमान २ आठवडय़ांपासून पासून जास्तीत जास्त सुमारे दोन महिने असते.

बटरफ्लाय गार्डन

बटरफ्लाय गार्डन ही संकल्पना खरं तर परदेशातील आहे. ज्या ठिकाणी थंड वातावरण आहे अशा ठिकाणी फुलपाखरं फार जगत नाहीत. मग अशा ठिकाणी एका काचेच्या घुमटामध्ये तयार केलेल्या बागेत आणि कृत्रिमरीत्या नियंत्रित केलेल्या तापमानात वेगवेगळी फुलपाखरं सोडली जातात. या वातावरणात ती फुलपाखरं त्यांचा विहित काळ घालवतात आणि मृत्युमुखी पडतात. मग नवीन फुलपाखरं पुन्हा त्या घुमटात सोडावी लागतात. कारण त्या कृत्रिम वातावरणात त्यांचा समागम होत नाही, प्रजनन होत नाही. मग अशा ठिकाणी बाहेरील देशांतून फुलपाखरांच्या अळ्या आयात केल्या जातात. मलेशिया आणि इंडोनेशियासारख्या देशांतून ही निर्यात अगदी नियमित होत असते. बटरफ्लाय फाìमग अशी संकल्पनाच त्यांच्याकडे विकसित झाली आहे. बटरफ्लाय गार्डन असलेल्या ठिकाणी निर्यात करण्यासाठी एका अळीमागे एक डॉलर इतकी किंमत दिली जाते. उत्तर केनियातील किप्पो या ठिकाणचे शेतकरी वन्यजीवांचा खूप त्रास होतो, म्हणून जंगल तोडून वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करावा या निष्कर्षांप्रत आले होते. पण त्या ठिकाणी बटरफ्लाय फाìमग ही संकल्पना रुजवली गेली आणि आज तेथील शेतकरी सधन तर झालेच, पण तेच जंगलाचं संरक्षणदेखील करत आहेत. कारण त्या जंगलामुळेच त्यांच्याकडे भरपूर फुलपाखरं येतात, आणि मग त्यांनी अंडी आणि अळ्या मिळतात.

आपल्या देशातील कायद्यानुसार हे सारंच बेकायदेशीर ठरतं. मात्र बेंगलोर येथे वनखात्यामार्फतच असंच एक काचेचं बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात आलं आहे. त्यांना त्याच्या व्यवस्थापनात अनेक अडचणी येत असतात. पण त्या ठिकाणी अदिवासींना जर आपण बटरफ्लाय फाìमगची परवानगी दिली तर केनियाप्रमाणेच फायदा होऊ शकतो.

अर्थात आपल्या देशात कृत्रिमरीत्या बटरफ्लाय गार्डनची गरजच नाही. आपल्याकडे ठाण्याजवळ ओवळेकरवाडी येथे नसíगक बटरफ्लाय गार्डन तयार करण्यात आले आहे. तेथे फुलपाखरांना पूरक अशी झाडं आहेत. त्याला लागूनच राष्ट्रीय उद्यानाची सीमा आहे. त्यामुळे तेथे मुबलक फुलपाखरं पाहायला मिळतात. त्याशिवाय संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातदेखील असंच एक फुलपाखरांसाठी नसíगक उद्यान तयार करण्यात आलं आहे.

फुलपाखरांमधील वैविध्य

सर्व फुलपाखरं एकूण सहा गटात विभागलेली आहेत. हे गट त्यांची शरीररचना, रंग, वर्तणूक यानुसार करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात फुलपाखरांच्या आजवर नोंदवलेल्यापेक्षा नवीन नोंदी सापडलेल्या नाहीत. भारतात काही प्रमाणात अशा नव्या नोंदी केल्या गेल्या आहेत.

स्कीपर या गटातील फुलपाखरं फारशी रंगीत नसतात, ही फुलपाखरे विशेषत: पहाटे किंवा सायंकाळी सक्रिय असतात. ती अतिशय वेगाने उडतात, त्यामुळे त्यांना स्कीपर म्हणून ओळखले जाते. या गटाचे शास्त्रीय नाव हेस्परिडी असे आहे.

स्वॅलोटेल – या गटातील फुलपाखरे मोठी आणि बहुरंगी असतात. पॅपलिऑनिडी हा यांचा शास्त्रीय गट आहे. यांच्या मागील पंखाना शेपटीसारखा अवयव असल्यामुळे स्वॅलोटेल म्हणून ओळखले जातात. भारतातील सर्वात मोठे फुलपाखरू सदर्न बर्डिवग याच गटातील आहे.

यलोज आणि व्हाइट – छोटी छोटी पिवळी आणि पांढरी फुलपाखरं या गटात मोडतात. पायरिड हा यांचा शास्त्रीय गट. जमिनीलगत उडणारी ही फुलपाखरं अगदी लहानपणापासूनच आपल्याला परिचित असतात. क्षारशोषणासाठी एखाद्या डबक्याजवळ, चिखलावर थव्याने ही फुलपाखरं एकत्र जमलेली पाहता येतात.

ब्लूज – ही निळ्या रंगाची नखाएवढी फुलपाखरं असतात. लायसेनिडी हा त्यांचा शास्त्रीय गट. यांना मागील पंखाजवळ शेपटी असते आणि त्यावर डोळासदृश ठिपके असतात. भक्षक या खोटय़ा शेपटय़ा आणि डोळ्यावर हल्ला करतात, पण त्यामुळे फुलपाखराच्या जीवाला काही होत नाही.

ब्रश फुटेड – या गटातील फुलपाखराच्या पायाच्या पहिल्या जोडीवर कुंचल्यासारखा केसांचा झुपका असतो, म्हणून ते ब्रश फुटेड. यांचा शास्त्रीय गट म्हणजे निम्फालिडी. केसांचा झुपका असलेल्या पायांच्या जोडीचा वापर चालण्यासाठी केला जात नाही. ही फुलपाखरे चार पायांवरच चालतात.

पंचीज आणि ज्युडीज – या गटातील फुलपाखरं ही फुलांवर खूप कमी आढळतात. कुजलेली फळे, पक्ष्यांची विष्ठा यावर आढळतात. या गटातील प्लम ज्युडी हे एकच फुलपाखरू महाराष्ट्रात आढळते. उर्वरित सर्व हिमालयात दिसतात.
लेखक हे फुलपाखरु तज्ज्ञ आहेत.
(शब्दांकन – सुहास जोशी)
आयझॅक किहिमकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 16, 2018 1:06 am

Web Title: butterfly 3
Next Stories
1 पक्ष्यांचा धावा ऐकणार केव्हा?
2 झाडाझुडपांच्या देशा
3 वाघ-सिंहाच्या पलिकडे
Just Now!
X