19 November 2019

News Flash

फ्रेममधली जादू

कान महोत्सवात गौरविण्यात आलेली तरुण सिनेमॅटोग्राफर मधुरा पालित लिंगभेदापलीकडे जाऊन आपलं काम महत्त्वाचं मानते.

सरधोपट करिअर स्वीकारणाऱ्यांची वाट काहीशी सुकर असते. फार कोणी प्रश्न करायला जात नाही.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

कान महोत्सवात गौरविण्यात आलेली तरुण सिनेमॅटोग्राफर मधुरा पालित लिंगभेदापलीकडे जाऊन आपलं काम महत्त्वाचं मानते. सौंदर्य शोधण्याची आवड आणि सतत उत्तम काम करण्याची ऊर्मी असलेली व्यक्ती यशस्वी सिनेमॅटोग्राफर होऊ शकते, असं ती सांगते.

अगदी लहान वयात आंतरराष्ट्रीय पातळीवरील कान महोत्सवात गौरवण्यात आलेल्या सिनेमॅटोग्राफर मधुराला चित्रपट क्षेत्राची पाश्र्वभूमी नाही. पण तिच्या आई-वडिलांना कलात्मक छायाचित्रणाचा छंद आहे. वडिलांना तर त्यासाठी पुरस्कारही मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपटाची पाश्र्वभूमी नसली तरी सौंदर्यदृष्टीचा वारसा मात्र तिला लाभला आहे. कोलकात्यातील सेंट झेवियर्स महाविद्यालयात शिकताना व्हिडीओ प्रॉडक्शन, थिएटर वगैरे विषयांवर काम करण्याची संधी मिळाली आणि आपला कल सिनेमॅटोग्राफीकडे असल्याचं तिच्या लक्षात आलं.

‘सत्यजीत रे फिल्म अ‍ॅण्ड टेलिव्हिजन इन्स्टिटय़ूट’मधील ‘मोशन पिक्चर फोटोग्राफी’ या अभ्यासक्रमाला तिने प्रवेश घेतला. तिथे शिकतानाच अभ्यासाचा भाग म्हणून ‘पेपर बॉय’ हा लघुपट केला. संवाद जवळपास शून्यच असलेला हा कृष्णधवल लघुपट आहे. त्यात कॅमेराच बोलतो. मुलाच्या चेहऱ्यावरचे भाव, कोलकात्यातील अरुंद गल्ल्या, नदीवरचा घाट ही दृश्यं कॅमेऱ्याने बोलकी केली आहेत. या लघुपटाच्या चित्रीकरणासाठी एका वॉचमनच्या मुलाला बोलावून आणल्याचं आणि त्याच्याकडून मुख्य पात्राची भूमिका वठवून घेतल्याचं मधुरा सांगते. हा लघुपट काहीही न बोलताच गरिबी, बालमजुरी, बालकांची मानसिकता, शिक्षणाच्या नाकारल्या जाणाऱ्या संधी अशा अनेक समस्यांवर भाष्य करतो.

‘व्हच्र्युअल रिअ‍ॅलिटी’ (व्हीआर) तंत्रज्ञानाचा प्रयोग करण्याची मोठी संधीही मधुराला मिळाली. हा प्रयोग फारच खास आणि अनुभवविश्व समृद्ध करणारा ठरल्याचं मधुरा सांगते. एरवी आपण चित्रपट फक्त पाहतो. मात्र या तंत्रज्ञानामुळे प्रेक्षक अक्षरश: चित्रपट जगतो. आपणही चित्रपटाचा एक भागच आहोत असा आभास निर्माण करण्याची क्षमता असलेलं हे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने ‘डार्कनेस व्हिजिबल’ ही भयकथा साकारण्यात आली. इंडो-ब्रिटिश प्रकल्पाअंतर्गत भारतात प्रथमच अशा स्वरूपाचा प्रयोग करण्यात येत होता. मात्र काही कारणांमुळे अद्याप तो पूर्णत्वाला जाऊ  शकलेला नाही.

तिच्या ‘अमी ओ मनोहर’ चित्रपटाला केरळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात ‘सवरेत्कृष्ट पदार्पण’ पुरस्काराने गौरवण्यात आलं. ‘लुकिंग चायना युथ प्रोजेक्ट’अंतर्गत चीनला जाऊन तिथल्या विद्यार्थ्यांबरोबर काम करण्याची संधी तिला मिळाली. तिथे तिने स्थानिक विद्यार्थ्यांबरोबर ‘द गर्ल अक्रॉस द स्ट्रीम’ हा लघुपट तयार केला. तोदेखील एक वेगळा अनुभव ठरल्याचं मधुरा सांगते.

‘कान’मधला पुरस्कार तिला आजही स्वप्नवतच वाटतो. दोन महिन्यांपूर्वी तिला यासाठीचा ई-मेल आला तेव्हा कोणी तरी मस्करी करत असेल, ‘स्पॅम’ असेल असं समजून तिने त्याकडे दुर्लक्ष केलं. पण ‘इंडियन विमेन सिनेमॅटोग्राफर्स कलेक्टिव्ह’मधून (आयडब्लूसीसी) कॉल आला आणि त्यांनी तो मेल खराच असल्याचं सांगितलं. नवोदित सिनेमॅटोग्राफर्सना देण्यात येणाऱ्या पुरस्काराची ती मानकरी ठरली होती. ‘आयडब्लूसीसी’ दरवर्षी कानमध्ये काही नवोदित सिनेमॅटोग्राफर्सची नामांकनं पाठवते. त्यांनीच मधुराचंही नामांकन पाठवलं होतं. त्यामुळे पुरस्कार जाहीर होईपर्यंत तिला त्याची काहीच कल्पना नव्हती. थेट ‘कान’मध्ये पुरस्कार स्वीकारण्यासाठी जाणं हा अतीव आनंदाचा आणि अभिमानाचा, एखाद्या परीकथेसारखा क्षण असल्याचं मधुरा सांगते.

कान महोत्सवात पुरस्कार मिळाल्याचा आनंद मोठा आहेच, पण त्यापेक्षा मोठं आहे ते वाढलेल्या अपेक्षांचं ओझं. आता यापुढची वाटचाल अधिक आव्हानात्मक असल्याची जाणीव मधुराला आहे. ही आव्हानं पेलण्यासाठी ती सज्जदेखील आहे. पुरस्कार स्वीकारून भारतात परतल्यानंतर दुसऱ्याच दिवशी तिने पुन्हा चित्रीकरण सुरू केलं. बॉलीवूडमध्ये काम करण्याची तिची इच्छा आहे, पण त्याची घाई अजिबात नाही.

‘बंगाली चित्रपटसृष्टीत मी समाधानी आहे. चित्रपटांची अतिशय समृद्ध परंपरा माझ्या मातीला लाभली आहे. त्या परंपरेविषयी आदर आणि यथार्थ अभिमानही आहे. प्रादेशिक चित्रपटांसाठी खूप काम केलं गेलं पाहिजे. कारण त्यात आपली पाळंमुळं रुजलेली असतात. आपणच आपल्या भाषेतील चित्रपटांकडे पाठ फिरवली तर या परंपरा कोण जपणार?’ असं ती विचारते. सध्या बंगाली चित्रपटसृष्टीपुढे अनेक आव्हानं आहेत. प्रादेशिक भाषांतील चित्रपट जगभर पोहोचवताना अनेक अडथळे येतात. आर्थिक प्रश्न असतात. बंगाली चित्रपटसृष्टीला गतवैभव मिळवून देणं अतिशय आवश्यक आहे, असं मधुराला वाटतं.

मराठी चित्रपटांविषयी ती कौतुकाने बोलते. मुंबईत संधी मोठय़ा आहेत. तिथे प्रादेशिक भाषांतील चित्रपटांना चांगलं आर्थिक पाठबळही मिळत आहे. मराठीत अनेक सकस कलाकृतींची निर्मिती होत आहे. विविध प्रयोग होत आहेत. तसे प्रयोग बंगालीतही व्हावेत, असं तिला वाटतं. सामाजिक समस्यांवर मार्मिक भाष्य करणारे ‘फँड्री’, ‘जोगवा’सारखे मराठी चित्रपट आवडल्याचं ती सांगते. सध्या मोधुरा ‘पुडी पोरीजायी’ आणि ‘शाहोबाशे’ या दोन चित्रपटांचं काम करत आहे. ‘पुडी पोरीजायी’ ही एका समस्याग्रस्त लहान मुलाची कथा आहे. तर शाहोबाशेमध्ये ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मधील ताणतणावांचं चित्रण करण्यात आलं आहे.

‘महिला सिनेमॅटोग्राफार’ या संकल्पनेची संभावना मधुरा ‘बकवास’ या शब्दात करते. ‘मुली मैलोन्मैल पायपीट करून डोक्यावरून पाण्याचे हंडे वाहून आणू शकतात, बांधकामाच्या ठिकाणी उन्हातान्हात राबू शकतात, बाळाला जन्म देताना असह्य़ वेदना सहन करू शकतात, पण सिनेमॅटोग्राफर होऊ  शकत नाहीत, असे म्हणणे हा निव्वळ दुटप्पीपणा आहे,’ अशा शब्दांत ती हा मुद्दा धुडकावून लावते. प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतोच. त्याचे प्रकार माणसागणिक वेगळे असतात. यशस्वी झाल्यानंतर संघर्ष संपतो का? तर तसंही नाही. प्रत्येक नव्या टप्प्यावर नवी आव्हानं उभी असतातच. त्यांना तोंड देत, त्यांचं संधीत रूपांतर करत पुढे जात राहायला हवं. मी माझ्या वाटय़ाचा संघर्ष करून इथवर पोहोचले आहे आणि यापुढेही संघर्ष सुरूच राहील. पण मुलगी आहे, म्हणून सिनेमॅटोग्राफर होऊ  शकत नाही किंवा चांगली सिनेमॅटोग्राफर ठरू शकत नाही, हे साफ चूक आहे.

सरधोपट करिअर स्वीकारणाऱ्यांची वाट काहीशी सुकर असते. फार कोणी प्रश्न करायला जात नाही. पण वेगळ्या वाटेवरचं करिअर निवडणाऱ्यांना दुहेरी संघर्ष करावा लागतो. ‘माझ्यासारखं वेगळ्या वाटेचं क्षेत्र निवडणाऱ्या अनेकांना घरच्यांचा विरोध होतो. या आघाडीवर मी फारच नशीबवान आहे. मला घरून पूर्ण पाठिंबा मिळाला आणि आजही मिळत आहे. आज माझे आई-बाबा अतिशय आनंदी आहेत. त्या आघाडीवरच्या संघर्षांतून सुटल्यामुळे मी माझ्या कामावर शांतपणे पूर्ण लक्ष केंद्रित करू शकले,’ अशा शब्दांत मधुरा आपल्या कुटुंबीयांविषयी कृतज्ञता व्यक्त करते.

‘या क्षेत्रात करिअर करायचं आहे, त्यांनी आपल्या कामाकडे अतिशय गांभीर्याने पाहायला हवं. नाही तर ते सिनेमॅटोग्राफर होतील, पण चांगली कारकीर्द घडवू शकणार नाहीत. नुसताच महागडा कॅमेरा हाती असून भागत नाही. त्यातून सौंदर्य टिपणारी दृष्टी असायला हवी. ती जाणीवपूर्वक विकसित करायला हवी. आपल्या क्षेत्रातील महान व्यक्तींच्या कलाकृतींचा अभ्यास करायला हवा. ज्येष्ठांबरोबर काम करण्याच्या संधी हुडकून काढून त्यांचा पुरेपूर वापर करायला हवा. विविध प्रकारच्या, आपल्यापेक्षा वेगळी पाश्र्वभूमी असलेल्या व्यक्तींशी चर्चा करण्याची सवय लावून घ्यायला हवी. या सवयींतूनच सिनेमॅटोग्राफर घडतो, खुलतो,’ असं ती सांगते.

आज प्रत्येक क्षेत्रात स्पर्धा शिगेला पोहोचली आहे. त्यामुळे सतत स्वत:च्या कौशल्यांत सुधारणा करत राहणं, नवं काही तरी शिकत राहणं अपरिहार्य आहे. आज तुम्ही उत्तम असाल, पण उद्या एखादी नवखी व्यक्तीही तुम्हाला सहज मागे टाकू शकते, याचं भान सतत बाळगायला हवं. त्याची भीती न बाळगता ते आव्हान म्हणून पेलायला हवं, असं मधुराला वाटतं. ‘मी माझा प्रत्येक प्रकल्प हा आपल्या आयुष्यातला अखेरचा प्रकल्प आहे आणि यातच आपल्याला आपलं ‘सर्वोत्तम’ द्यायचं आहे, असं स्वत:ला बजावून सुरू करते आणि पूर्णत्वाला नेते,’ असं ती सांगते. हेच तिच्या यशाचं सूत्र आहे. कानसारख्या स्वप्नवत दुनियेतून आल्यानंतरही यशाच्या क्षणभंगुरतेची पुरेपूर जाणीव तिला आहे.

First Published on June 7, 2019 1:08 am

Web Title: career in cinematography
Just Now!
X