News Flash

भाषेच्या क्षेत्रातील करिअर

आशिया ही भाषांतराच्या व्यापारातील वाढती बाजारपेठ आहे...

बदलत्या तंत्रज्ञानामुळे जसजसं जग जवळ येऊ लागलं तसतसं व्यावसायिक संवादासाठी एकमेकांच्या भाषा शिकणं अपरिहार्य होऊन बसलं. त्यामुळेच भाषांमध्ये रस असणाऱ्यांसाठी करियरची क्षितिजं खूप विस्तारली आहेत.

भारत देश हा सांस्कृतिक विविधतेने नटलेला आहे. विविधतेमधील एक मुख्य घटक म्हणजे आपल्याला मिळालेला हजारो वर्षांचा बहुभाषिक वारसा ज्यामुळे आपण भारतीय एकाच वेळी अनेक भाषा शिकण्यास आणि वापरण्यास समर्थ असतो. भारतीय उपखंडात जन्माला आलेली व्यक्ती शाळेत शिकताना तिची मातृभाषा, हिंदी (जर ती मातृभाषा नसेल तर) आणि इंग्लिश भाषा शिकते आणि यामुळे ती व्यक्ती द्वैभाषिक किंवा त्रभाषिक होते. शिवाय कित्येकदा राज्यानुसार यात त्या राज्याच्या भाषेचाही समावेश होऊ  शकतो.

जगात साधारणत: पाच हजार भाषा बोलल्या जात असल्या, तरी तज्ज्ञांच्या मतानुसार या भाषांचे अंदाजे २० भाषिक गटात वर्गीकरण केले जाऊ  शकते. सर्वात प्रभावशाली गट म्हणजे इंडो-युरोपिअन भाषा गट ज्यात रोमन भाषा (स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, इ.), जर्मानिक भाषा (इंग्लिश, जर्मन, इ.) आणि इंडो-इराणी भाषा (ईशान्य व दक्षिण भारतातील भाषा वगळता इतर सर्व भारतीय भाषा, तसेच फारसी, उर्दू, बलुची, इ.) यांचा समावेश होतो. भारतीय उपखंडातील रहिवासी यातील अनेक भाषा (हिंदी व इतर भारतीय भाषा, इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, इ.) आजकाल बोलतात. अशा बहुभाषिक समृद्धतेमुळे आणि जागतिकीकरणामुळे गेली दोन दशकं भारतात भारतीय आणि परकीय भाषिक सेवाक्षेत्रातील नवनवीन संधी उपलब्ध होत आहेत. भाषा क्षेत्रातील थिंक टँक असलेल्या ‘कॉमन सेन्स अ‍ॅडवायसरी’ नुसार २०१५ मध्ये भाषाविषयक सेवा आणि साहाय्यक तंत्रज्ञान क्षेत्रात ३६० कोटी डॉलर्सची उलाढाल झाली. २०१८ पर्यंत ही उलाढाल वर्षांला ४७० कोटी डॉलर्सपर्यंत पोचेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

आशिया ही भाषांतराच्या व्यापारातील वाढती बाजारपेठ आहे आणि भारतात हे क्षेत्र नवीन असले तरी यात प्रचंड वाढीच्या संधी आहेत. भारतात मुख्यत: २२ अधिकृत भाषांशिवाय, इंग्लिश, जर्मन, स्पॅनिश, फ्रेंच, इटालियन, पोर्तुगीज, चायनीज, जपानी आणि कोरियन भाषांचा भाषाविषयक सेवा क्षेत्रात समावेश होतो. यात साधारणपणे पुस्तक प्रकाशन, डीटीपी, जाहिरात, भाषांतर आणि अनुवाद यांचा समावेश होतो.

भारतातील भाषा क्षेत्रातील सर्व भाषांचा आढावा घेणे या लेखात शक्य नाही, परंतु यातील काही भाषांचा आणि त्यातील संधींचा आपण या लेखात विचार करणार आहोत.

कुठल्याही भाषेत (हिंदी, इंग्लिश अथवा इतर परकीय भाषा) पदवी मिळवण्यासाठी लागणारी पात्रता म्हणजे कोणत्याही शाखेतील दहावी तसेच बरावी परीक्षेत उत्तीर्ण असणे. अर्थात काही विद्यापीठे/कॉलेजेस राज्याबाहेरील विद्यार्थासाठी प्रवेश परीक्षा घेतात. परकीय भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी बहुतांश विद्यार्थी आंतरराष्ट्रीय भाषा संस्थांमध्ये त्या भाषा शिकतात. ह्य संस्था प्रामुख्याने त्या त्या देशांच्या वकिलातीशी जोडलेल्या असतात. या संस्थांची माहिती आपण पुढे प्रत्येक भाषेसंदर्भात घेणार आहोत.

भारतात शाळांमध्ये शिकवण्यासाठी उमेदवारांनी सीटीईटी (सेन्ट्रल टीचर एलिजिबिलिटी टेस्ट) उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. बी.एड. झालेल्या विद्यार्थ्यांसाठीसुद्धा ही परीक्षा उत्तीर्ण होणे गरजेचे आहे. राष्ट्रीय अथवा राज्य स्तरावर विद्यापीठात लेक्चरर अथवा संशोधक होण्यासाठी अनुक्रमे नेट (नॅशनल एलिजिबिलिटी टेस्ट) अथवा सेट (स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट) उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

भारतातील अधिकृत भाषा

हिंदी

भारतातील अधिकृत भाषा व उत्तर भारतात सर्वत्र पसरलेली हिंदी भाषा ही जगातील सर्वाधिक बोलली जाणारी चौथी भाषा आहे. भारतीय शाळांमध्ये अवलंबलेल्या त्रिभाषा सूत्र धोरणामुळे (मातृभाषा + हिंदी + इंग्लिश), हिंदी भाषा भारतातील जास्तीत जास्त शाळांमध्ये शिकवली जाते. हिंदी भाषेच्या उच्च शिक्षणासाठी खालील संस्थांचा उल्लेख करणे आवश्यक आहे.

शिक्षण : विद्यापीठ स्तरावर बनारस हिंदू विद्यापीठ, दिल्ली विद्यापीठ, जामिया मिलिया इस्लामिया विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ येथील हिंदी विभागात पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेता येते.

नोकरीच्या संधी : हिंदीवर प्रभुत्व असणाऱ्या उमेदवारांसाठी भाषांतर व अनुवाद, जाहिरात, हिंदी मालिका तसेच चित्रपटांसाठी लेखन, सूत्रसंचालन, निवेदक, शाळा व कॉलेजेसमध्ये शिक्षक अशा विविध संधी उपलब्ध होऊ  शकतात. अर्थात यातील काही क्षेत्रांमध्ये फक्त हिंदी भाषेचे उत्तम ज्ञान असणे पुरेसे नसून त्या जोडीला लेखन कौशल्य, मास काम्युनिकेशन, किमान अजून एका भाषेचे उत्तम ज्ञान असणेही तितकेच गरजेचे आहे.

इंग्रजी

इंग्रजी ही ब्रिटिशांनी भारतात आणलेली भाषा असली तरी सर्व जगात आणि भारतातदेखील व्यावसायिकदृष्टय़ा या भाषेचे अत्यंत महत्त्व आहे आणि हिंदीखेरीज इंग्रजी ही भारतातील अधिकृत कामकाजाची भाषा आहे. अनेक विद्यार्थी शाळेपासून इंग्रजी शिकत असले तरी या भाषेवर प्रभुत्व मिळवण्यासाठी यातील पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेणे गरजेचे आहे. भारतातील सर्व मोठय़ा शहरांतील विद्यापीठे  व त्यांच्याशी संलग्न असणाऱ्या कॉलेजेसमधील इंग्रजी विभागातून इंग्रजी भाषेत पदवी मिळवता येते.

भारतातील इंग्रजी विषयात पदवी व पदव्युत्तर शिक्षण देणाऱ्या नावाजलेल्या शिक्षण संस्था खालीलप्रमाणे आहेत.

विद्यापीठे व इंग्रजी भाषेतील अभ्यासक्रम:

द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद : साहित्य, भाषाशास्त्र, इंग्रजी भाषा अध्यापन

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली : भाषा, साहित्य, तुलनात्मक सांस्कृतिक अभ्यास, भाषांतर, व्याकरण अभ्यास, नवीन इंग्रजी साहित्य, इ.

इंग्रजी विभाग, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई :

इंग्रजी भाषा अध्यापन, अमेरिकन साहित्य, राजकीय विचार आणि इंग्रजी अभ्यास, विशेष अभ्यासक्रम: माध्यमांसाठी लेखन, सर्जनशील लेखन कौशल्य आणि भाषांतर अभ्यास.

इंग्रजी विभाग, जाधवपूर युनिव्हर्सिटी, कोलकाता : इंग्रजी साहित्य

इंग्रजी विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे : इंग्रजी भाषा आणि तिचे सौंदर्यशास्त्र, येथे अनेक आंतरराष्ट्रीय विद्यार्थी शिकावयास येतात.

इतर संस्था :

ब्रिटिश कौन्सिल

ग्रेट ब्रिटनची शैक्षणिक व सांकृतिक संबंध जपणारी संस्था म्हणजे ब्रिटिश कौन्सिल. या संस्थेची भारतात नवी दिल्ली, मुंबई, पुणे, कोलकाता, हैदराबाद, चेन्नई, चंडीगड, बेंगळुरू आणि अहमदाबाद इथे कार्यालये आहेत. ही संस्था इंग्रजी भाषेचे अभ्यासक्रम चालवते तसेच इंग्रजी भाषेच्या आंतरराष्ट्रीय परीक्षाही घेते. याविषयीची अधिक माहिती www.britishcouncil.in या वेबसाइटवर मिळेल.

व्यावसायिक संधी:

इंग्रजी भाषा शाळा, कॉलेजेसमध्ये शिकवण्याव्यतिरिक्त इंग्रजी भाषेच्या उच्चशिक्षणामुळे विविध कंपन्यांमध्ये सॉफ्ट स्किल ट्रेनर, जाहिरात लिखाण, प्रूफरीडिंग, संपादन, भाषांतर व अनुवाद (यासाठी इंग्रजीव्यतिरिक्त किमान अजून एका भारतीय/परकीय भाषेवर उत्तम प्रभुत्व पाहिजे), निवेदन अशा व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ  शकतात.

परकीय भाषा:

फ्रेंच

फ्रेंच भारतात ब्रिटिशांच्या अगोदर आले असले, तरी ते नंतर भारतातील चंदननगर, पाँडिचेरी या काही भागांपुरते मर्यादित राहिले. फ्रेंच भाषा २९ देशांतील अधिकृत भाषा आहे, तसेच युरोपियन युनियन व युनायटेड नेशन्सची कामकाजाची एक भाषा आहे. भारतातील विविध कॉलेजेस आणि विद्यापीठातून फ्रेंच भाषा शिकवली जाते. या भाषेच्या शिक्षणाबरोबर अनेक विद्यापीठांतून फ्रेंच साहित्य, फ्रेंच भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, फ्रेंच भाषाशास्त्र, भाषांतर व अनुवाद याचे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

भारतातील फ्रेंच भाषेतील शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्था खालील प्रमाणे आहेत.

द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद : फ्रेंच साहित्य, भाषाशास्त्र, भाषांतर

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली : फ्रेंच भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, भाषांतर अभ्यास, फ्रेंच साहित्य, इ.

फ्रेंच विभाग, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई : फ्रेंच भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, साहित्य, भाषांतर अभ्यास.

परकीय भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे: फ्रेंच भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, फ्रेंच भाषेतील पदव्युत्तर शिक्षण, साहित्य आणि सांकृतिक अभ्यास.

दिल्ली विद्यापीठ : फ्रेंच भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, भाषांतर अभ्यास, फ्रेंच साहित्य, साहित्य आणि सांकृतिक अभ्यासातील पदव्युत्तर शिक्षण.

इतर संस्था:

आलिआन्स फ्रान्सेस:

फ्रेंच भाषा आणि संस्कृतीचा जगभर प्रसार करण्यासाठी निर्माण झालेल्या या फ्रेंच संस्थेची भारतात २२ केंद्रे आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार येथे फ्रेंच भाषेतील विविध अभ्यासक्रम घेतले जातात. तसेच फ्रेंच शिक्षण मंत्रालयाच्या फ्रेंचच्या परीक्षा येथे घेतल्या जातात. ही संस्था फ्रेंच शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देते तसेच अधिकृत भाषांतर व अनुवादाची सेवाही पुरवते. अधिक माहितीसाठी www.afindia.org  ही वेबसाइट पहावी.

व्यावसायिक संधी:

फ्रेंच भाषा शाळा, कॉलेजेस व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये शिकवण्याव्यतिरिक्त फ्रेंच भाषेच्या उच्चशिक्षणामुळे खालील व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ  शकतात.

साहित्यिक/तांत्रिक भाषांतर व अनुवाद (कंपनीमध्ये अथवा स्वतंत्रपणे)

फ्रेंच भाषकांसाठी टूर गाईड (यासाठी भारताच्या वारसा स्थळांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे).

व्होइस ओव्हर, प्रूफरीडिंग

जर्मन

भारतीय विद्या आणि संस्कृत भाषेच्या अभ्यासाकरिता जर्मन संशोधकांनी १९व्या शतकात भारतात प्रवेश केला. या आदानप्रदानामध्ये भारतीयांनी जर्मन भाषेचा स्वीकार केला. शैक्षणिक संशोधनाबरोबरच भारतीय आणि जर्मन कंपन्यांमधील करारांमुळे, तसेच भारतीय विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये मिळणाऱ्या संधींमुळे जर्मन भाषेला भारतात मागणी आहे.

भारतातील विविध कॉलेजेस आणि विद्यापीठातून जर्मन भाषा शिकवली जाते. या भाषेच्या शिक्षणाबरोबर अनेक विद्यापीठांतून जर्मन साहित्य, जर्मन भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, जर्मन भाषाशास्त्र, भाषांतर व अनुवाद याचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

भारतातील जर्मन भाषेतील शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्था खालीलप्रमाणे आहेत.

द इंग्लिश अँड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद : जर्मन साहित्य, भाषाशात्र, भाषांतर.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली : जर्मन भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, भाषांतर अभ्यास, जर्मन साहित्य, इ.

जर्मन विभाग, मुंबई युनिव्हर्सिटी, मुंबई : जर्मन भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, संशोधन, तत्त्वज्ञान, साहित्य, भाषांतर अभ्यास, इ.

परकीय भाषा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे : जर्मन भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, जर्मन भाषेतील पदव्युत्तर शिक्षण, साहित्य आणि सांस्कृतिक अभ्यास, भाषांतर अभ्यास, इ.

इतर संस्था

ग्योथ इन्स्टिटय़ूट (मॅक्स मुल्लर भवन):

जर्मन भाषा आणि संस्कृतीचा जगभर प्रसार करण्यासाठी निर्माण झालेल्या या जर्मन संस्थेची भारतात सहा केंद्रे आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार येथे जर्मन भाषेतील विविध अभ्यासक्रम घेतले जातात. ही संस्था जर्मन शिकवणाऱ्या शिक्षकांना प्रशिक्षण देते. अधिक माहितीसाठी www.goethe.de ही वेबसाइट पाहावी.

व्यावसायिक संधी:

जर्मन भाषा शाळा, कॉलेजेस व इतर शैक्षणिक संस्थांमध्ये  शिकवण्याव्यतिरिक्त जर्मन भाषेच्या उच्चशिक्षणामुळे खालील व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ  शकतात

वाहन उद्योगातील महत्त्वाच्या जर्मन व भारतीय कंपन्यांसाठी (Bosch, Allianz, Daimler Chrysler, Audi, B.) तांत्रिक भाषांतर व अनुवाद.

जर्मन भाषकांसाठी टूर गाईड (यासाठी भारताच्या वारसास्थळांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे).

व्होइस ओव्हर, प्रूफरीडिंग

 

स्पॅनिश

जगात सर्वाधिक बोलल्या जाणाऱ्या भाषांपैकी एक, स्पॅनिश ही अमेरिकेतली दुसरी अधिकृत भाषादेखील आहे. त्याचप्रमाणे भारतातील बीपीओ क्षेत्रात सर्वाधिक वापरली जाणारी भाषा आहे. भारत व दक्षिण अमेरिकेतील राष्ट्रांमध्ये वाढलेल्या औद्योगिक संबंधांमुळे भारतात या भाषेला आज अधिकाधिक मागणी आहे. भारतातील विविध कॉलेजेस आणि विद्यापीठातून स्पॅनिश भाषा शिकवली जाते. या भाषेच्या शिक्षणाबरोबर अनेक विद्यापीठातून Hispanic (स्पॅनिश बोलणारे देश किंवा लोक) साहित्य, स्पॅनिश भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, स्पॅनिश  भाषाशास्त्र, भाषांतर व अनुवाद याचे पदवी व पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

भारतातील स्पॅनिश भाषेतील शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्था खालीलप्रमाणे आहेत.

द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद : स्पॅनिश साहित्य, भाषाशात्र, भाषांतर.

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली : स्पॅनिश  भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, Hispanic अभ्यास, बहुभाषिक आणि आंतरराष्ट्रीय संधीबाबत स्पॅनिशचा उपयोग, इ.

डून विद्यापीठ : स्पॅनिश साहित्य व संस्कृतीचा अभ्यास, इ.

दिल्ली विद्यापीठ : स्पॅनिश भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, भाषांतर अभ्यास, स्पॅनिश साहित्य आणि स्पॅनिश सांकृतिक अभ्यासातील पदव्युत्तर शिक्षण.

इतर संस्था

इंस्तीतुतो हिस्पानिया :

१९९७ मध्ये स्थापन झालेल्या या संस्थेचं उद्दिष्ट स्पॅनिश भाषा आणि संस्कृतीचा भारतभर प्रचार करणे असा आहे. या स्पॅनिश  संस्थेची भारतात पाच केंद्रे आहेत. आंतरराष्ट्रीय मानकानुसार येथे स्पॅनिश भाषेतील विविध अभ्यासक्रम घेतले जातात. अधिक माहितीसाठी www.institutohispania.com  ही वेबसाइट पाहावी.

 

व्यावसायिक संधी:

स्पॅनिश भाषा कॉलेजेस व इतर शैक्षणिक संस्थांमध्येमध्ये शिकवण्याव्यतिरिक्त स्पॅनिश भाषेच्या उच्चशिक्षणामुळे खालील व्यावसायिक संधी उपलब्ध होऊ  शकतात

BPO मध्ये स्पॅनिशचा वापर

तांत्रिक भाषांतर व अनुवाद

प्रूफरीडिंग

स्पॅनिश भाषिकांसाठी टूर गाईड (यासाठी भारताच्या वारसास्थळांचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक आहे).

 

जपानी भाषा

जपानी भाषा ही दक्षिण आशियाई भाषांपैकी अत्यंत मागणी असलेली एक भाषा आहे. यात विविध शैक्षणिक व कार्पोरेट जगतात संधी उपलब्ध होत आहेत. १९८० पासून झालेल्या इंडो-जपानी संबंधातील बदलांमुळे तसेच उद्योग आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील देवाणघेवाणीमुळे या भाषेला भारतात मागणी वाढली आहे.

भारतातील काही कॉलेजेस आणि विद्यापीठांतून जपानी भाषा शिकवली जाते. या भाषेच्या शिक्षणाबरोबर अनेक विद्यापीठांतून भाषाशास्त्र, भाषांतर व अनुवाद, व्याकरण याचे पदव्युत्तर शिक्षण दिले जाते.

भारतातील जपानी भाषेतील शिक्षण देणाऱ्या काही प्रमुख संस्था खालीलप्रमाणे आहेत.

द इंग्लिश अ‍ॅण्ड फॉरेन लँग्वेजेस युनिव्हर्सिटी, हैदराबाद : जपानी साहित्य, भाषाशास्त्र, भाषांतर

जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी, नवी दिल्ली : जपानी भाषेचे परकीय भाषा म्हणून अध्यापन, भाषांतर अभ्यास, साहित्य, इतिहास, इ.

दिल्ली विद्यापीठ : जपानी भाषेत पदव्युत्तर शिक्षण.

टिळक महाराष्ट्र विद्यापीठ :  जपानी भाषा व संस्कृतीचं पदव्युत्तर शिक्षण.

इतर संस्था

जपान फाऊंडेशन : जपानी भाषेच्या परीक्षा येथे घेतल्या जातात.

जपानी दूतावास : जपानी भाषा शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी स्कॉलरशिप्स दिल्या जातात. अधिक माहितीसाठी http://www.in.emb-japan.go.jp/ ही वेबसाइट पाहावी.

 

या लेखात आपण फक्त काही भाषांच्या शिक्षणाच्या आणि व्यावसायिक संधींची माहिती करून घेतली. याव्यतिरिक्त चायनीज, रशियन, इटालियन, कोरियन, पोर्तुगीज, अरेबिक इ. भाषांनादेखील भारतात मागणी आहे. आपण कोणत्याही क्षेत्रात असलो तरी एखादी परकीय भाषा शिकणे हे केव्हाही फायद्याचे ठरते. भाषा सेवा क्षेत्र हे प्रचंड वाढीचे क्षेत्र असून त्यात विविध व्यावसायिक संधी उपलब्ध आहेत.
जुई नातू-कानिटकर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2016 1:09 am

Web Title: career in languages
टॅग : Language
Next Stories
1 ‘कले कले’नं घडवा जीवन…
2 वाटा करिअरच्या…
3 चर्चा : तहानलेल्या महाराष्ट्राचे वास्तव
Just Now!
X