‘लोकप्रभा’च्या १६ सप्टेंबरच्या अंकामधील स्वदेश घाणेकर यांचा ‘इतर खेळांचे ‘क्रिकेट’ होवो’ हा लेख रिओ ऑलिम्पिकमधील भारताच्या कामगिरीचे योग्य विश्लेषण करणारा वाटला.

रिओ ऑलिम्पिक २०१६मध्ये किमान १० पदकं मिळतील ही व्यक्त केलेली अपेक्षा, चला दोन तर दोन या समाधानावर थोपवली गेली. नेमबाजांनी नेम चुकवले, धावपटू मागे पडले, जिमनॅट्सचं पदक थोडक्यात हुकलं वगैरे वगैरे चर्चाही झाल्या. भारतानं याबाबतीत योग्य ती पावलं टाकली नव्हती, असंही म्हणता येणार नाही. स्पर्धेची तयारी करण्यासाठी परदेशातील स्पर्धाची रंगीत तालीम, परदेशी मार्गदर्शक, चांगलं प्रशिक्षण, परदेशात चांगल्या सुविधा यांमध्ये कुठे कमतरताही ठेवली गेली नाही. पण खरी गरज आहे ती खेळाडूंमध्येच अव्वल स्थानापर्यंत जाऊन किंवा वेगळे काही करून दाखवण्याची ऊर्जा आणि इच्छा यांची. तरच ऑलिम्पिक विजयाची शक्यता निर्माण होऊ  शकते.

१९९६च्या ऑलिम्पिकमध्ये पदकतालिकेत ३८व्या स्थानावर असणाऱ्या ग्रेट ब्रिटननं रिओ ऑलिम्पिकमध्ये पहिल्या पाचांमध्ये मुसंडी मारली. याचं श्रेय तिथल्या अव्वल दर्जाच्या खेळाडूंचं प्रावीण्य सातत्यानं जपणारी व्यवस्था आणि पदकच पटकवण्याच्या जिद्दीची मानसिकता जागी ठेवणारं प्रोत्साहन यांना जातं.

आपल्याकडे मुळात क्रिकेटशिवाय कुठल्याही खेळाला महत्त्व नाही. ऑलिम्पिक खेळांबद्दल आस्था नाही. डॉक्टर, इंजिनीअर, आर्किटेक्ट यापलीकडे जाऊन कला-क्रीडा क्षेत्रात करिअर करण्याची मानसिकता जोपासण्याची तयारी नाही. कारण खेळामध्ये करिअर करून आयुष्यभराच्या उदरनिर्वाहाची सोय होण्याची शाश्वती नाही हीच विचारसरणी आहे. खेळ आणि अभ्यास यात अभ्यासालाच महत्त्व आहे.

खेळाडू व्हायचं तर थेट सचिन तेंडुलकर किंवा सानिया किंवा सायना किंवा आता सिंधू व्हायचं ही स्वप्नं पाहायला हरकत नाही. पण तिथेपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांनी घेतलेले अपरंपार कष्ट करण्याची मानसिकता आणि जिद्द आहे का हा खरा प्रश्न आहे. कठोर परिश्रम, आधुनिक विज्ञानाधारित साधनं, व्यायाम, थोडंसं नशीबही (कारण शेवटच्या सामन्यापर्यंत जाऊन तिथे नशीब कसं साथ देतं हेही महत्त्वाचं असतं) पदक विजेत्यांसाठी महत्त्वाचे असतात.

रिओ ऑलिम्पिकमध्ये केवळ दोन पदकं आणि पदक तालिकेत ६७वं स्थान असूनही केवळ खेळांमध्ये भाग घेऊन प्रतिनिधित्व केलं म्हणून डोक्यावर घेऊन नाचण्याची आपली प्रथा. ज्या दोन खेळांत पदकं  मिळाली त्या खेळाडूंवर बक्षीस रकमांची खैरात बघून अवघ्या आयुष्याची कमाई एका पदकानं होत असेल, जाहिरातबाजीत पुढचा निर्वाह भागणार असेल तर देशासाठी एक ऑलिम्पिक पदक मिळवून आणायची आस्था आजच्या युवा पिढीत निर्माण होईलही कदाचित. पण ते देशाभिमानाचं, प्रतिष्ठेचं जाज्वल्य लक्षण म्हणून जेव्हा खेळांना प्राधान्य दिलं जाईल तेव्हाच हरेक ऑलिम्पिकमध्ये हरेक खेळगटात भारत चमकण्याची शाश्वती निर्माण होऊ  शकेल हे उमजून प्रयत्न केले गेले पाहिजेत.

या पाश्र्वभूमीवर असं म्हणावंसं वाटतं की ऑलिम्पिकमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्यांवर ‘दौलतजादा’ करण्याची इतर देशात न दिसणारी (कारण त्यांच्याकडे अशी कामगिरी अपवादात्मक नसेलही, ज्यामुळे एवढं अप्रूप दाखवण्याची त्या देशांना गरज वाटत नाही) मानसिकता आपल्याकडे बोकाळण्यापेक्षा, गाव, जिल्हा, राज्य स्तरावर अव्वल स्थानावर पोहोचण्याची मानसिकता आणि प्रतिभा असणारे खेळाडू निर्माण करण्यासाठी, शिष्यवृत्ती पुरस्कार दिले जावेत. पदकविजेत्या खेळाडूंना द्यावयाच्या बक्षीस रकमा ठेवींच्या स्वरूपात बाजूला ठेवून त्यावरच्या घसघशीत व्याजातून प्रोत्साहनपर पुरस्कार, प्रशिक्षण साधनं उपलब्धता, गोपीचंद (बॅडमिंटन), कुलदीप मलिक (कुस्ती) यांसारख्या प्रशिक्षकांना योग्य ती गुरुदक्षिणा, अशा व इतरही खेळांच्या प्रशिक्षकांच्या प्रशिक्षण संस्था अद्ययावत करण्यासाठी पैशाचं पाठबळ, गाव-जिल्हा-राज्य पातळीवर चमकणाऱ्या खेळाडूंना अनुदान पुरस्कार, त्याद्वारे पुढच्या वाटचालीसाठी देशभरातल्या स्पर्धामध्ये भाग घेण्यासाठी पैशाची मदत आणि सातत्यपूर्ण मार्गदर्शनाची सोय अशा मार्गानी अनेक खेळाडू प्रत्येक खेळगटात निर्माण होतील हे बघणं आवश्यक आहे.

ग्रेट ब्रिटनचं उदाहरण डोळ्यांसमोर ठेवून २० वर्षांपूर्वीची जिल्हा-राज्य स्तरावरची दयनीय खेळगती बदलायची असेल तर भारतात अजून बऱ्याच प्रयत्नांची गरज आहे, हे कुणालाही पटेल.
श्रीपाद कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com