सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2
आपला व्यवसाय आणि एखाद्या गोष्टीची आवड वेगळी असा  कुणाचा समज असेल तर या दोन्ही गोष्टी एकत्र कशा येऊ शकतात, हे आदेश शिवकर यांच्याकडून शिकायला हवं.

लडाख हे गेल्या काही वर्षांत पर्यटकांचे आवडते ठिकाण ठरत आहे. काही पर्यटक तेथे जातात तेथील निसर्गसौंदर्याचा आनंद घेण्यासाठी, तर काही साहसी उपक्रमात सहभागी होण्यासाठी. पण एक पर्यटन व्यावसायिक काही वर्षांपासून लडाखला पर्यटकांना घेऊन जातो ते पक्षी दाखवण्यासाठी. मुळात वन्यजीव पर्यटन चाकोरीबद्ध पद्धतीने जात असताना थेट लडाखला पर्यटकांना पक्षी दाखवायला न्यायचे आणि हा अनोखा पर्यटनाचा फंडादेखील यशस्वी करून दाखवायचा हे घडले आहे. ते करून दाखवले ते आदेश शिवकर याने. केवळ पॅशन म्हणून नाही तर एक करिअर म्हणून त्याची व्यावसायिक मांडणी करून लोकांना काहीतरी वेगळे द्यायचे या ध्येयाने आदेशने सुरू केलेल्या पक्षी पर्यटनाची ही कथा म्हणूनच वेगळी ठरते.

पर्यटन हा हल्ली अनेकांच्या जगण्याचा अविभाज्य घटक झाला आहे. पर्यटनाला जाणारे आणि त्यांना घेऊन जाणारे अशा दोघांचीही संख्या दिवसागणिक वाढत आहे. अगदी बहुराष्ट्रीय कॉर्पोरेट पर्यटन कंपन्यांपासून ते एकखांबी तंबू असलेल्यांची संख्या गेल्या २० वर्षांत वाढताना दिसत आहे. अर्थातच पर्यटन हेदेखील करिअरसाठी चांगले क्षेत्र आहे याची खात्री पटल्यामुळे अनेक तरुणांचा ओढा याकडे वाढताना दिसत आहे. पण औषध कंपनीत चांगल्या पदावर काम करत असताना आदेश शिवकर हा तरुण ती नोकरी एकेदिवशी सोडतो आणि पर्यटन व्यवसायात आजवर फारसा कोणी हाताळला नाही असा एक मार्ग शोधतो. त्याने हाताळायला घेतलेला प्रकार सर्वार्थाने वेगळा असतो. आदेश शिवकर यांनी पक्षी पर्यटनाचा हा नवा पर्याय रुजवला आणि यशस्वीदेखील करून दाखवला. म्हणूनच दहा वर्षांपूर्वी सुरू केलेला हा प्रवास आज पक्षी पर्यटन या क्षेत्रासाठी  पथदर्शी ठरावा असाच आहे.

खरं तर पर्यटन व्यवसायात आज काही प्रमाणात साचलेपणा आलेला आहे. त्यातच निसर्गपर्यटनाचा लंबक फक्त व्याघ्र पर्यटनाकडेच झुकलेला आहे. दहा वर्षांपूर्वीदेखील हीच परिस्थिती होती. अशा वेळी लोकांना पक्षी पर्यटनासाठी घेऊन जाणे हे तसे धाडसाचेच म्हणावे लागेल. पण आदेशने हे आवाहन स्वीकारले. त्याचे कारण त्याच्या आजवरच्या प्रवासात दिसून येते. आज एक पक्षी अभ्यासक म्हणून त्यांची ओळख असली तरी लहानपणी त्याला या पक्ष्यांबद्दल काहीच माहिती नव्हते. किंबहुन अज्ञान आणि सोबतच्या सवंगडय़ांमुळे चक्क बेचकीने पक्षी मारण्यासाठी तो भटकायचा. पक्षी निरीक्षण म्हणजे काय, पक्ष्यांचा अभ्यास करायचा म्हणजे काय करायचे वगरे गोष्टी त्याला अजिबातच माहीत नव्हत्या. पण त्याच्या या उद्योगात भरपूर पक्षी मात्र पाहायला मिळायचे. पुढे रुईया महाविद्यालयात गेल्यानंतर महाविद्यालयाच्या नेचर क्लबमध्ये जायला सुरुवात केली. आणि मग त्याला पक्ष्यांची गोडी खऱ्या अर्थाने लागली. पक्ष्यांचे ज्ञान त्याला होतेच, पण त्याला आता पक्ष्यांचे विज्ञानदेखील कळू लागले. त्यातूनच ते बीएनएचएसमध्ये जाऊ लागले. त्याकाळी कॅमेराच काय पण साधी दुर्बीणदेखील घेण्याची आदेशची ऐपत नव्हती. मग पक्षी पाहायची, त्यांच्या सवयी व इतर निरीक्षणे नोंदवून ठेवायची सवय लावून घेतली. आठवडय़ातून एकदा बीएनएचएसला जाऊन त्या माहितीच्या आधारे पुस्तकांतून त्या पक्ष्याविषयी आणखीन माहिती मिळवायला सुरुवात केली. हे सर्व करण्यात वेळ जायचा पण त्यामुळेच त्याचा पाया पक्का झाला. बीएनएचएसच्या पक्षी निरीक्षणाच्या ट्रेलमध्ये तो जाऊ लागला.

पण आदेश केवळ अशी माहिती जमा करून थांबला नाही. उपजतच असलेला बडबडय़ा स्वभाव आणि नेतृत्वगुण यामुळे तो हौशी पक्षीनिरीक्षकांना भरपूर माहिती देऊ लागला. पक्षी निरीक्षणाच्या ट्रेलचे नेतृत्व करू लागला. आपल्या काही समविचारी मित्रांबरोबर त्याने ‘मुंबई बर्ड क्लब’ हा अनौपचारिक ग्रुप सुरू केला. देशभरातील पक्षी अभयारण्यांना भेटी देऊ लागला. त्यातूनच त्याच्याकडे माहितीचा प्रचंड साठा जमा झाला. दुसरीकडे औषध कंपनीत औषध विक्री प्रतिनिधी म्हणून नोकरीदेखील सुरू होती. नोकरीतदेखील त्याला चांगलेच यश मिळाले होते. टाटा फार्मा, रॅनबक्सी, ग्लेनमार्क अशा कंपन्यांमध्ये त्याने काम केले. मार्केटिंग मॅनेजर पदापर्यंत पोहचला. पण पक्षी पाहण्यासाठी भटकण्याची त्याची उर्मी सतत उफाळून येत असे. दहा-वीस वर्षांपूर्वी आपल्याकडे जंगल पर्यटन, निसर्ग पर्यटन हा प्रकार नुकताच मूळ धरू लागला होता. पण त्यामध्ये बहुतांश भर हा व्याघ्र पर्यटनाकडेच होता. वाघ हमखास दिसतील अशा जंगलांमध्ये पर्यटकांना नेणे हेत त्यांचे उद्दिष्ट असे आणि या प्रकाराला पर्यटकांचादेखील प्रतिसाद असे. पण त्यापलीकडेदेखील जंगलात खूप काही असते. पक्षी पर्यटन हादेखील प्रकार असतो याबद्दल आपल्या देशात म्हणावे तितके प्रबोधनच झालेले नव्हते. याबाबतीत आदेश एक नेमकं उदाहरण देतो. दहा वर्षांपूर्वी अमेरिकेतील पक्षी पर्यटन आणि त्याच्याशी निगडित व्यवसाय यांची उलाढाल ही ५६ अब्ज अमेरिकी डॉलर्स होती तर आपल्या देशातील औषध निर्माण क्षेत्राची उलाढाल पाच अब्ज डॉलर्स इतकीच होती. अमेरिकेत ९०च्या आसपास पक्ष्यांच्या प्रजाती आहेत, तर भारतात १२५० प्रजातींचे पक्षी आढळतात. मात्र आपण पक्षी पर्यटनाकडे करिअर म्हणून पाहिले नव्हते. अशा वेळी त्याने थेट पक्षी पर्यटनात उतरायचे ठरवले.

आदेशला आवड तर होतीच, या क्षेत्रात तो पारंगतदेखील होता. पण केवळ एवढेच असून चालणार नव्हते. कारण येथे तुम्हाला वेगवेगळ्या स्वभावांच्या लोकांना एकत्र घेऊन जायचे असते. त्यांच्या संपूर्ण टूरचे नियोजन हा भाग तर आहेच, पण त्याचबरोबर तुम्ही या पर्यटकांना का आणि कशासाठी घेऊन आला आहात याचा विसरदेखील पडू द्यायचा नसतो. आदेश सांगतो की अशा वेळी तुम्हाला तुमचा पाया पक्का करावा लागतो. तुमच्या कंपनीची तत्त्वं ठरवावी लागतात. त्यामध्ये तडजोड करून चालत नाही. त्यातूनच तुमची एक प्रतिमा तयार होते. मग ही प्रतिमाच तुमचा व्यवसाय वाढवत राहते. आदेशने याची सुरुवात त्याच्या कंपनीच्या नावापासूनच केली. ‘नेचर इंडिया’ हे त्याच्या पर्यटन व्यवसायाचे नाव. आदेश पक्षीमित्रांमध्ये ‘आदी दी बर्डी’ या नावाने प्रसिद्ध आहे. त्याच नावाने कंपनी सुरू करण्याचा अनेकांनी सल्ला दिला होता; पण तो आदेशने पूर्णपणे टाळला.

मंदार खाडिलकर हा त्याचा समविचारी मित्र. तोदेखील आयटी कंपनीत नोकरी करायचा. त्यालादेखील असेच काहीतरी करायचे होते. मग तो आदेशबरोबर या व्यवसायात उतरला. आदेशने हे पाऊल उचलून दहा वर्ष झाली. त्याची कंपनी वर्षांतून किमान ३०-३५ टूर आखते. त्यातील ८० टक्के टूर  पक्षी पर्यटनाच्या असतात. दरवर्षी किमान एक-दोन नवीन ठिकाणांचा समावेश त्यामध्ये होत असतो. त्यासाठी तो आणि मंदार नवीन ठिकाणांची रेकी करत असतात. आदेशच्या या नावीन्यपूर्ण ठिकाणांमधील अगदी लडाख, अरुणाचलमध्ये पक्षी पर्यटनाचा देखील समावेश आहे. त्याला हे शक्य होते कारण त्याचा अभ्यास आहे आणि त्याला नावीन्याची ओढ आहे.

गेल्या काही वर्षांत पॅशन म्हणून अनेकजण अशा प्रकारच्या ऑफ बीट पर्यटनाच्या व्यवसायात उतरत आहेत. आदेशकडे देखील असे अनेकजण मार्गदर्शनासाठी येत असतात. अशांना आदेशचे एकच सांगणे असते की, केवळ पॅशन म्हणून याकडे पाहू नका. कारण पॅशन असणे हे महत्त्वाचे आहेच, पण त्या पॅशनच्या आधारे हा व्यवसाय करणे वेगळे आहे. आदेश सांगतो की, येथे तुम्हाला लोकांना पक्षी दाखवायचे असतात. त्यांच्या शंकाकुशंकांना उत्तर द्यायचे असते. एखादा पक्षी तुम्ही स्वत: हजार वेळा पाहिला असेल, पण तुमच्याबरोबर आलेल्या पर्यटकासाठी तो कदाचित पहिलाच अनुभव असू शकतो. अशा वेळी वेगळे कौशल्य तुमच्याकडे असणे गरजेचे आहे. कदाचित प्रवासाचे नियोजन, निवासाचे व्यवस्थापन वगरे बाबी सहज होऊ शकतील, पण तुम्हाला जेव्हा लोकांना घेऊन जंगलात, वाळवंटात, ओसाड माळावर जायचे असते तेव्हा असा समूह हाताळण्याची क्षमता तुमच्याकडे हवी. येथे केवळ पॅशन कामी येत नाही. त्यामुळे नव्याने कोणालाही या व्यवसायात यायचे असेल तर आधी अशा प्रकारे समूहाला हाताळण्याचे कसब कष्टाने जोपासावे लागेल. किमान स्थानिक पातळीवर लोकांना पक्षी निरीक्षणाला घेऊन जावे लागेल. फॉईलेज आऊटडोअरसारख्या व्यावसायिक पर्यटक कंपनीत स्वयंसेवक म्हणून तुम्ही प्रशिक्षण घेऊ शकता. तर कर्नाटक वनविभाग आणि बीएनएचएसमध्ये नॅचरलिस्ट लिडरशिपचे अभ्यासक्रम पूर्ण करू शकता.

याशिवाय तुम्हाला सातत्याने तुमचे ज्ञान वाढवत राहणे आवश्यक आहे. कारण येथे एकदाच शिकलं आणि काम झालं असं होत नाही. पक्ष्यांचे अधिवास बदलत आहेत, टॅक्सोनॉमीमध्ये अभ्यास होत आहे. जगभरात वेगवेगळी संशोधनं होत आहेत. या सर्वाशी तुम्ही जोडलेलं असणं गरजेचं आहे. आणि याचबरोबर पर्यटकांचे वर्गदेखील बदलत आहेत. पूर्वी ८० टक्के लोकांना पक्षी पाहण्यात आनंद होता आणि २० टक्के लोकांना छायाचित्रणात. आज हे प्रमाण उलट झालं आहे. अशा वेळी अनेक पर्यटकांना फोटो मिळणं हेच टूरचं यश वाटतं. कोणाला पक्षी उडवायचा असतो आणि तसा उडतानाचा फोटो हवा असतो, कोणी पक्ष्यांच्या घरटय़ाच्या फोटोमागे असतो. अशा ट्रेण्डमुळे कधीकधी तत्त्वांचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे आदेशच्या कंपनीच्या नियमांमध्ये पहिलीच ओळ आहे, नेचर फर्स्ट. तेथे जाणारे आपण दुय्यम आहोत. हे नियम पाळणारे पर्यटक आदेशला मिळतात हेच त्याच्या कारकीर्दीचे यश आहे. म्हणूनच आदेश सांगतो की पर्यटकांशी बांधीलकी तर हवीच, पण निसर्गाशी असलेली बांधीलकी सोडता कामा नये. तेथे तडजोड नकोच.

चार घटका निवांतपणा हवा म्हणून पर्यटन करणाऱ्यांची संख्यादेखील भरपूर असते. मग या चार घटकांमध्ये दोन घुटकेपण येतात. पण आदेशच्या टूर तुम्हाला निसर्गाची अनोखी ओळख करून देणाऱ्या असतात. त्यापासून काहीतरी प्रेरणा घ्यावी अशी त्याची इच्छा असते. म्हणूनच धुम्रपान आणि मद्यपानास पूर्णत: बंदी असा नियम तो लागू करतो. या गोष्टीचा पर्यटकसंख्येवर कसलाही विपरीत परिणाम न होता उलट फायदाच अधिक झाला असे तो सांगतो. हीच तत्त्वं तो जोपासत आला आहे. आदेश सांगतो एकदा तुमची ही प्रतिमा तयार झाली की मग तुम्हाला माहितीपत्रक, व्हिजिटिंग कार्ड वगरे गोष्टी छापायला लागत नाहीत. तुमचा ग्राहक वर्गच तुमची जाहिरात करतो. आज आदेशकडे अशा ग्राहकवर्गाचा मजबूत पाया आहे. व्यवसाय वृद्धीच्या मोहापोटी भारंभार गर्दी जमवणंदेखील त्याच्या तत्त्वात बसत नाही. त्यामुळेच तो लडाखला केवळ सहा पर्यटकांना घेऊनदेखील पक्षी पर्यटन आखू शकतो.

केवळ पक्षी पर्यटनच नाही तर वन्यजीव पर्यटनातील अशा अनेक छोटय़ा मोठय़ा गोष्टींसाठीच्या पर्यटनात भविष्यात करिअरला चांगलाच वाव असल्याचे आदेश नमूद करतो. अगदी फुलपाखरू पर्यटन, वेगवेगळे वृक्ष दाखवण्याचं पर्यटन असे पर्याय आहेत. आणि हे सारे एकत्रितपणे गुंफून वर्षभर तुम्हाला कार्यरत राहता येऊ शकते. मात्र ते करताना योग्य वेळी योग्य जागी टूर नेणं महत्त्वाचं असतं. अर्थात योग्य अभ्यास, समूह हाताळण्याची हातोटी आणि आपल्या कंपनीची तत्त्वं जोपासणं गरजेचं आहे.

आदेश आज पक्षी पर्यटन क्षेत्रातील व्यावसायिक असला तरी त्याची निसर्गाप्रति आस्था, ओढ पूर्वीसारखीच आहे. पक्षी पर्यटन हा व्यवसाय असला तरी निसर्गात जात असताना त्याचे नियम पाळायलाच हवेत असं त्याचं ठाम म्हणणं आहे. त्यामुळे काही समविचारी मित्रांसोबत त्याने त्या संदर्भातील एक आदर्श नियमावलीदेखील तयार केली आहे. त्याचबरोबर निसर्गाचं आपण काही तरी देणं लागतो या भावनेने त्याच्या छोटय़ाशा कंपनीमार्फत वन्यजीव क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या होतकरू कार्यकर्त्यांना तो यथाशक्ती मदतदेखील करत असतो.

सर्वानाच आवडीच्या क्षेत्रात करिअर करायला मिळतंच असं नाही. प्रचलित चौकट अनेकांना तोडता येत नाही. पण आदेशने ती वेळीच तोडली आहे. स्वत:च्या आवडीतून एक उत्तम करिअर सुरू करून इतरांसाठीदेखील मार्ग आखून दिला आहे.