विनायक परब – @vinayakparab, response.lokprabha@expressindia.com
करिअर निवडताना भविष्यवेधी विषयाचा विचार करायला हवा, असं अमेरिकेतील येल सेंटर फॉर जिनोम अ‍ॅनालिसिसचे कार्यकारी संचालक डॉ. श्रीकांत माने सांगतात.

मानवी जनुकाची उकल करण्यात २००५ साली जगभरच्या संशोधकांना यश आले; त्या प्रकल्पामध्ये जगभरातील अनेक वैज्ञानिक सहभागी होते. त्यातील  महत्त्वाची धुरा ज्या वैज्ञानिकाच्या खाद्यांवर होती त्यांचे नाव डॉ. श्रीकांत माने. आज डॉ. श्रीकांत माने हे जेनेटिक्सचे प्राध्यापक (आपल्याकडे महाविद्यालयातील प्रत्येक अध्यापकाला प्राध्यापक म्हणण्याची चुकीची परंपरा आहे. प्राध्यापक होणे ही शिक्षणशास्त्रातील महत्त्वाची कामगिरी असते. हे पद सहज मिळत नाही) असून येल सेंटर फॉर जिनोम अ‍ॅनालिसिसचे ते कार्यकारी संचालक, तर येल सेंटर ऑफ प्रोटिओमिक्सचे संचालक आणि येल- एनआयएच सेंटर ऑफ मेन्डेलिअन जिनोमिक्स येल युनिव्हर्सटिी स्कूल ऑफ मेडिसिनचे ते प्रिन्सिपल इन्व्हेस्टिगेटर आहेत. ज्या जनुकीय बदलांमुळे माणसाला विकार होतात त्याचा शोध घेऊन त्यावर मात करता येईल, अशा प्रकारच्या अत्याधुनिक जनुकीय औषधांची निर्मिती करणे हे त्यांचे प्रमुख कार्य आहे.

ai researcher demis hassabis
कुतूहल : कृत्रिम बुद्धिमत्तेतील संशोधक उद्योजक
HDFC Life Insurance Company appoints Keki Mistry
केकी मिस्त्री एचडीएफसी लाइफचे नवे अध्यक्ष; एचडीएफसी लाइफची धुरा केकी मिस्त्रींकडे
Loksatta kutuhal Creator of artificial intelligence Judea Perl
कुतूहल: कृत्रिम बुद्धिमत्तेचे रचनाकार – ज्युडेया पर्ल
Upsc Preparation  Economics Kaleidoscope of Pre Exam career
Upsc ची तयारी : अर्थशास्त्र: पूर्व परीक्षेचा कॅलिडीस्कोप

महाराष्ट्रातील रहिमतपूर हे त्यांचे गाव. शालेय शिक्षण गावातच झाले. आजोबा शाळेचे मुख्याध्यापक तर वडील गणिताचे शिक्षक होते. केवळ आणि केवळ शिक्षणामुळेच माणूस मोठा होतो, अशी त्यांच्या वडिलांची धारणा होती. त्यामुळे शिक्षणामध्ये कधीच आडकाठी आली नाही. त्यांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड होती. वयाच्या अवघ्या आठव्या वर्षी वैद्यक क्षेत्रात काही करावे आणि थेट विदेशात जाऊन अभ्यास करावा, असे त्यांना वाटायचे. वैद्यक क्षेत्राची आवड तेव्हापासूनच मनात रुजलेली आणि डोक्यात होती अमेरिका. तिथे काम करण्याचे, संशोधनाचे खूप चांगले स्वातंत्र्य असते असे तेव्हापासून मनावर कोरले गेले होते. त्यांनी १९७१ साली शालेय शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर कऱ्हाडला महाविद्यालयात नंतर कोल्हापूरला शिवाजी विद्यापीठाच्या प्राणिशास्त्र विभागातून बी.एस्सी. केले. मुंबई विद्यापीठाच्या गाजलेल्या इन्स्टिटय़ूट ऑफ सायन्समधून ७९ साली एम.एस्सी. असा त्यांचा प्रवास राहिला. १९८५ साली त्यांना पीएच.डी.ही मिळाली. त्याच वर्षी लग्नही झाले आणि पोस्ट डॉक्टोरल संशोधनासाठी ते अमेरिकेतील जॉन्स हॉपकिन्स युनिव्हर्सटिी मेडिकल कॉलेजमध्ये दाखल झाले. १९९१ साली जॉन्स हॉपकिन्स हॉस्पिटलमध्ये त्यांना पहिली नोकरीही मिळाली. १९९८ साली डब्लू. जी. गोर बायोटेक कंपनीमध्ये ते दाखल झाले. मात्र खासगी कंपनीमध्ये संशोधनावर अनेक मर्यादा येतात, असे त्यांना लक्षात आले. त्यामुळे खासगी कंपनीला सोडचिठ्ठी देत २००१ साली येल विद्यापीठात ज्येष्ठ वैज्ञानिक म्हणून ते दाखल झाले.

२००५ साली मानवी जनुकाची उकल करण्यात यश आल्यानंतर लगेचच त्यांनी पहिला शोधप्रबंध प्रकाशित केला. वाढत्या वयात डोळ्यांत विकार होण्यासाठी कारणीभूत ठरणारे जनुक शोधण्यात त्यांना यश आले होते. त्यामुळे जगभरात जैववैद्यकाच्या क्षेत्रामध्ये अतिसूक्ष्म नेमकेपणाच्या नव्या पर्वाला सुरुवात झाली.

येल मध्ये असतानाच त्यांना ७.५ दशलक्ष अमेरिकन डॉलर्सचे एनआयएचचे अनुदान मिळाले त्यातून मायक्रोअर सेंटर ऑफ न्युरोसायन्सची स्थापना करता आली. २००९ मध्ये एक्झोम सिक्वेन्सिंग करण्यात त्यांना यश आले. प्रोटिन कोिडग जनुकांना एक्झोम म्हणतात, त्यांची उकल करणारे तंत्रज्ञान डॉ. माने यांच्या नेतृत्त्वाखालील टीमने विकसित केले. यामध्ये पहिला टप्प्यात डीएनएचा प्रोटिन्ससंबंधीचा भाग निवडला जातो. या भागाला एक्झोन्स म्हणतात. माणसाच्या शरीरामध्ये असे एक लाख ८० हजार एक्झोन्स असतात. ते मिळून माणसाच्या जनुकाचा केवळ एक टक्का एवढाच भाग तयार होता. पण हा एक टक्का असलेला भागच माणसाची गुणवैशिष्टय़े शारीरिक आणि मानसिक काय असतील त्यासाठी कारणीभूत असतो. त्याची उकल करण्याचे तंत्र डॉ. माने यांनी विकसित केले. हेच तंत्र आता जगभरात सर्वत्र शैक्षणिक आणि क्लिनिकल प्रयोगांमध्ये वापरले जाते. हे सारे स्वस्तात करता येईल, असेही नवे तंत्रज्ञान त्यांनी आता विकसित केले आहे.

डॉ. माने यांनी लिहिलेले १४० हून अधिक शोधनिबंध आजवर प्रकाशित झाले असून नेमक्या कोणत्या जनुकांमुळे माणसाला कोणत्या विकारांना सामोरे जावे लागते, यावर त्यांनी केलेले मूलभूत संशोधन या शोधनिबंधांमध्ये आहे. तर वैज्ञानिक जगतात मानाच्या समजल्या जाणाऱ्या सायन्स, नेचर आदी नियतकालिकांमधून त्यांचे २० हून अधिक शोधलेख प्रकाशित झाले आहेत. जनुकाच्या शोधानंतर लगेचच पहिला प्रकाशित झालेला आंतरराष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचा शोधनिबंध डॉ. माने यांचा होता. सायन्स या विख्यात नियतकालिकाने तो कव्हरस्टोरी म्हणून प्रकाशित केला होता. या शिवाय जैववैद्यकाच्या विषयातील महत्त्वाची तीन पेटंट्स हीदेखील डॉ. माने यांच्या नावावर आहेत.

दोन महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख डॉ. माने यांनी ‘लोकप्रभा’शी बोलताना केला. ते म्हणाले, करिअर करताना विद्यार्थ्यांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, कोणत्याही विषयात झोकून देऊन, अपार मेहनत घेतली तरच यश आपल्याला मिळते. या संपूर्ण प्रवासामध्ये आशेनिराशेचे असे अनेक क्षण येतात. स्वत अनेकदा निराशेच्या गर्तेत अडकलो होतो. त्यासाठी मानसोपचारही करून घेतले. मात्र अभ्यासाचा व संशोधनाचा ओढा स्वस्थ बसू देत नव्हता. त्या ओढय़ानेच पुन्हा मार्गावर आणण्याचेही काम केले. यामध्ये ध्यानधारणेची खूप मदत झाली. त्यामुळे स्वतलाच वेगळ्या पद्धतीने समजून घेता आले. येल विद्यापीठातील जिनोम सेंटरचे प्रमुखपद हे अतिताण असलेले असे महत्त्वाचे पद आहे. त्यामुळे ताण हा येणारच. तो हाताळता आला पाहिजे.  तणाव आल्यानंतर ध्यानाकडे वळणे म्हणजे उशिरा आलेले शहाणपण असेल. आपल्याकडे विद्यार्थी ध्यानधारणा आदी करताना दिसत नाहीत. त्यातील धर्म बाजूला ठेवा आणि वैज्ञानिक अंगाने त्याकडे पाहा. हे खूप उपयुक्त आहे. भारताला तर ध्यानाची उत्तम परंपरा आहे. त्यामुळे भारतीय विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबरच याकडेही लक्ष द्यायला हवे. करिअरची निवड करताना आणखी एक विषय महत्त्वाचा ठरतो तो म्हणजे भविष्यवेधी विषय. सध्याच्या बाबतीत बोलायचे तर येणारा काळ हा जनुकीय तंत्रज्ञानाचा असणार आहे. या क्षेत्रामुळे मानवाच्याच भविष्यात खूप मोठे बदल होणार आहेत. भविष्यातीलच कशाला तर आज उपलब्ध असलेले जनुकीय तंत्रज्ञान हे तुम्हाला पोटातील अर्भकालाही भविष्यात होणारे विकार सांगण्याची क्षमता राखते. आज हे तंत्रज्ञान थोडे महाग वाटत असले तरी त्याचा इतिहास पाहिला तर लक्षात येईल की, जगभरातील संशोधन जसे वाढते आहे तसतसा या तंत्रज्ञानाच्या किमतीमध्ये मोठा फरक होतो आहे. म्हणजेच त्याच्या किमती वेगात कमी होत आहेत. हे तंत्रज्ञान सामान्यांना परवडेल, अशा किमतीत सहज उपलब्ध होईल, अशा वेळेस या क्षेत्रात काम करणाऱ्या तंत्रज्ञ आणि वैज्ञानिकांची मोठी गरज असणार आहे. सध्या या विषयासाठी भारतामध्ये संधींची तशी वानवा असली तरी विदेशातील विद्यापीठांमध्ये अनेक फेलोशिप्स उपलब्ध आहेत. शिवाय तिथे नोकरी करूनही शिकता येते. फक्त मेहनतीची तयारी तेवढी हवी. विज्ञानाच्या क्षेत्रात ज्यांना काम करायचे आहे, त्यांनी विद्यार्थिदशेमध्येच स्वतला लहानमोठय़ा संशोधन प्रकल्पांमध्येही गुंतवून घ्यायला हवे. विदेशातील विद्यापीठ प्रवेशाच्या वेळेस केवळ तुमचे परीक्षेतील गुण पाहिले जात नाहीत तर तुम्ही प्रत्यक्ष संशोधनाच्या क्षेत्रात किती व कसे कार्यरत होतात, याला अधिक महत्त्व दिले जाते. मला स्वतला मिळालेली संधीही अशाच प्रकारे जगातील उत्तम संशोधकांशी जोडले गेल्यानेच मिळाली. जैववैद्यकातील अतिसूक्ष्म नेमकेपणा (प्रीसिजन मेडिसिन) हे उद्याचे भविष्य आहे. शिवाय हे क्षेत्र दिवसेंदिवस अधिकाधिक विस्तारते आहे. एपिजिनोमिक्ससारखी नवीन क्षितिजेही खुली होत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भविष्यवेधी असलेल्या अशा जिनोमिक्सकडे वळावे. इथे खूप मोठय़ा संधी त्यांची वाट पाहात आहेत.