18 February 2019

News Flash

करिअर विशेष : प्रशासकीय सेवांमधील करिअर

भारतीय सनदी सेवा बुद्धिमान तरुण-तरुणींना आजवर नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. या सेवांचे मर्म समजून घेतले आणि नीट तयारी केली तर त्यांना गवसणी घालणे शक्य.

समाज बदलू पाहणाऱ्या बुद्धिमान तरुणांसाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

स्वरुप पंडित – response.lokprabha@expressindia.com
भारतीय सनदी सेवा बुद्धिमान तरुण-तरुणींना आजवर नेहमीच आकर्षित करत आल्या आहेत. या सेवांचे मर्म समजून घेतले आणि नीट तयारी केली तर त्यांना गवसणी घालणे अशक्य नाही.

सातव्या वेतन आयोगामुळे मिळणारे उत्तम वेतन, सरकारी धोरणांत बदल करण्याची संधी, लोकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवून आणण्याची सुविधा देणारी भारतीय प्रशासकीय सेवा. समाज बदलू पाहणाऱ्या बुद्धिमान तरुणांसाठी हे महत्त्वाचे क्षेत्र आहे.

पात्रता :

देशातील कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी

वयोमान २१ वष्रे पूर्ण

विद्यापीठीय परीक्षेतील टक्केवारी वा शैक्षणिक अपयश, ग्रेड यांचा पात्रतेशी संबंध नाही.

परीक्षेचे आयोजन :

भारतीय प्रशासकीय सेवेसाठीच्या परीक्षा या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत घेतल्या जातात. परीक्षेची अधिसूचना जाहीर करणे, अभ्यासक्रम निश्चित करणे, भरतीची प्रक्रिया ठरवणे, भरतीसाठी उमेदवारांची संख्या निश्चित करणे, परीक्षेचे सर्व टप्पे सुरळीत पार पाडणे आयोगाच्या अखत्यारीत येते.

सेवांचे तपशील :

भारतीय प्रशासकीय सेवेसाठीच्या (आयएएस), ’ भारतीय पोलीस सेवा (आयपीएस), ’ भारतीय परराष्ट्र सेवा (आयएफएस), ’ भारतीय महसूल सेवा (आयआरएस), ’ भारतीय वित्त व लेखा सेवा (आयए अ‍ॅण्ड एएस), ’ भारतीय रेल्वे वाहतूक सेवा (आयआरटीएस), ’ भारतीय माहिती सेवा (आयआयएस), ’ सर्व केंद्रशासित प्रदेशांच्या सेवा, ’ भारतीय संरक्षण लेखा सेवा (आयडीएएस) अशा २६ सेवा.

परीक्षा पद्धती :

या परीक्षा तीन टप्प्यांमध्ये होतात  पूर्वपरीक्षा ही माहितीची, मुख्य परीक्षा ही ज्ञानाची तर मुलाखत ही व्यक्तिमत्त्वाची चाचणी असते. स्वाभाविकच पूर्वपरीक्षा ही बहुपर्यायी पद्धतीची, मुख्य परीक्षा लेखी आणि दीघरेत्तरी स्वरूपाची परीक्षा असते.

प्रत्यक्ष परीक्षेचे गुणांकन :

पूर्वपरीक्षा – ४०० गुण

(सामान्यज्ञान २०० गुण, १०० प्रश्न, प्रतिप्रश्न २ गुण)

(सीसॅट २०० गुण, ८० प्रश्न, प्रतिप्रश्न २.५ गुण)

यात एक गोम अशी की, आपण जे प्रश्न अचूक सोडवू त्याबद्दल आपल्याला पूर्ण गुण मिळतातच, पण आपले उत्तर चुकले तर आपण मिळवलेल्या एकूण गुणांतून ०.६६ गुण (सीसॅटच्या पेपरमध्ये ०.८३ गुण) वजा केले जातात.

मुख्य परीक्षेचे १७५० गुण

सामान्य ज्ञानाचे चार पेपर, निबंधाचा एक पेपर आणि वैकल्पिक विषयाचे दोन पेपर (सर्व पेपर प्रत्येकी २५० गुणांचे). त्याशिवाय भारतीय भाषांचे दोन अनिवार्य पेपर असतात. यापैकी एक इंग्रजीचा, तर दुसरा असतो कोणत्याही एका भारतीय भाषेचा, म्हणजेच आपल्यापुरता मराठीचा. हे पेपर प्रत्येकी ३०० गुणांचे असतात. यामध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य असते. मात्र अंतिम गुणवत्ता यादी तयार करताना या पेपरमधील गुण धरले जात नाहीत.

सामान्य ज्ञानामध्ये भारतासह जगाचा इतिहास, भारतीय राज्यपद्धती, भारताचा भूगोल, जागतिक अर्थव्यवस्थेतील भारताचे स्थान, भारतीय परराष्ट्र धोरण, आंतरराष्ट्रीय संबंध, विज्ञान तंत्रज्ञान, चालू घडामोडी, पर्यावरण आदींचा समावेश असतो. तसेच एक प्रश्नपत्रिका ही योग्यायोग्यता, निर्णयक्षमता, नतिक कार्य, मूल्यव्यवस्था, प्रत्यक्ष एखादी परिस्थिती हाताळण्याची कौशल्ये आदी बाबींची तपासणारी असते.

वैकल्पिक विषयाची निवड आपण करायची असते. त्यासाठी कला, विज्ञान, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि वाणिज्य अशा विविध शाखांमधील विविध विषयांचे पर्याय उपलब्ध असतात.

सामान्यपणे तीन तासांमध्ये पाच हजार शब्दांचे लेखन करण्याचे आव्हान असते. तर आयोगाच्या वेळापत्रकाचा विचार करता, दररोज असे दोन पेपर सोडवावयाचे असतात. तात्पर्य एका दिवसात, सहा तासांमध्ये किमान नऊ ते दहा हजार शब्द लिहिण्याचे आव्हान असते. सध्या संगणकीय जमान्यात लेखनाची सवय आणि गती हरवत चालली आहे. तेव्हा या परीक्षांमध्ये ही गती उत्तम असणे हे आव्हान आहे.

२७५ गुणांची मुलाखत 

मुख्य परीक्षेचे १७५० गुण आणि मुलाखतीचे २७५ गुण यांच्या एकत्रित २०२५ गुणांपैकी मिळालेल्या गुणांवरून अंतिम यादी तयार केली जाते. रिक्त पदे असतील त्यानुसार गुणानुक्रमे पहिल्या तितक्या व्यक्ती निवडल्या जातात. कुठच्याही टप्प्यावर अपयश आले तरी सुरुवात पहिल्यापासूनच करावी लागते.

पूर्वतयारी :

स्पर्धा परीक्षांचे आव्हान लक्षात घेता अगदी शालेय किंवा महाविद्यालयीन स्तरापासून तयारी करता येऊ शकेल.

मराठी आणि इंग्रजीवर प्रभुत्व

वेगवान व अवांतर वाचनाची सवय

काळ- काम- वेग- व्याज- क्षेत्रफळे, समीकरणे, तर्कशास्त्र यांसारखी गणिते वेगाने सोडविण्याचा सराव

मूलभूत शालेय विषयांमधील संकल्पना समजून घेणे

चालू घडामोडींविषयी स्वतची मते तयार करणे

लेखनाचा सराव

नियमित वृत्तपत्र वाचन करणे- त्यातही विशेष लेख, अग्रलेख वाचणे- ते समजावून घेणे

जिल्हाधिकारी कार्यालये, पोलीस कार्यालये, मंत्रालय आदी ठिकाणी भेटी देणे, तिथे येणाऱ्या लोकांशी संवाद साधणे

विधिमंडळाचे कामकाज कसे चालते ते पाहणे

काही प्रशासकीय अधिकाऱ्यांशी त्यांच्या कामाच्या पद्धतीविषयी, त्यांच्या कामाच्या आवाक्याविषयी गप्पा मारणे

ऐतिहासिक वास्तू – वस्तुसंग्रहालये यांना भेटी देणे, त्यांचा इतिहास समजावून घेणे

विविध प्रयोगशील सामाजिक संस्थांना – सामाजिक प्रकल्पांना भेटी देणे, उदा. हेमलकसा येथील प्रकल्प, शोधग्राम, विज्ञानाश्रम.

पूर्वतयारी कशी कराल :

एनसीईआरटीची इयत्ता आठवी ते बारावीपर्यंतची सर्व विषयांची पुस्तके, अविनाश धर्माधिकारी यांचे ‘नवा विजयपथ’, रत्नाकर गायकवाड यांनी लिहिलेले व यशदा प्रकाशनने प्रसिद्ध केलेले ‘विकास प्रशासनाच्या विविध प्रयोगांचे अनुभवकथन’, लक्ष्मीकांत देशमुख लिखित ‘बखर भारतीय प्रशासनाची व प्रशासननामा’, ज्ञानेश्वर मुळ्ये लिखित ‘माती, पंख आणि आभाळ’ तसेच ‘नोकरशाहीचे रंग’ आणि अरुण शौरी लिखित ‘गव्हर्नन्स’ (लाल फिती कारभार म्हणजे काय आणि तो कसा टाळावा यासाठी)

त्याव्यतिरिक्त काही महत्त्वाच्या यूटय़ूबवरील ध्वनिचित्रफिती, संकेतस्थळे आणि नियतकालिके यांचा प्रभावी वापर करणे गरजेचे आहे. त्याशिवाय भारतीय राज्यपद्धतीसाठी – एम. लक्ष्मीकांत यांचे इंडियन पॉलिटी. भारतीय अर्थव्यवस्थेसाठी – इंडियन इकॉनॉमी लेखक – रमेश सिंग, पर्यावरणासाठी – श्रीराम आयएएस यांचे एन्व्हायर्नमेंट, भारतीय इतिहासासाठी – आर. एस. शर्मा, सतीश चंद्र, आणि बिपिन चंद्र यांची पुस्तके आणि अन्य नियतकालिके.

ध्वनिचित्रफिती :

भारताचे आजी व माजी परराष्ट्र सचिव यांची भारतीय परराष्ट्र धोरणाविषयीची भाषणे, रिझव्‍‌र्ह बँकेच्या आजी-माजी गव्हर्नरांनी भारतीय तसेच जागतिक अर्थव्यवस्थेविषयी केलेली विविध भाषणे, खान अ‍ॅकॅडमी या यूटय़ूब वाहिनीवरील ध्वनिचित्रफिती, संविधान या राज्यसभा या वाहिनीवर तयार करण्यात आलेल्या मालिकेचे दहा भाग, सिंहासन या एबीपी माझावरील मालिकेचे सर्व भाग, बीबीसी व दूरदर्शनने भारतीय स्वातंत्र्यलढय़ाविषयी तयार केलेले माहितीपट, नामांकित व्यक्तींची-अभ्यासकांची विविध चालू घडामोडींवरील व्याख्याने. लोकसभा, राज्यसभा व डीडी न्यूज या वाहिन्या नियमित पाहण्याची सवय

संकेतस्थळे :

www.pib.nic.in

NSIGHTS ON INDIA HOMEPAGE

http://www.arthapedia.in

www.quora.com

नियतकालिके :

सिव्हिल सíव्हसेस क्रॉनिकल, योजना, कुरुक्षेत्र, वर्ल्ड फोकस, इकॉनॉमिस्ट- द वर्ल्ड इन मालिका

वयोमर्यादा आणि प्रयत्न

खुल्या संवर्गासाठी कमाल वयोमर्यादा ३२ वष्रे व एकूण जास्तीत जास्त सहा वेळा परीक्षा देण्याची मुभा.

अन्य मागासवर्गीयांसाठी कमाल वयोमर्यादा ३५ वष्रे आणि एकूण जास्तीत जास्त नऊ प्रयत्न.

अनुसूचित जाती आणि जमातींसाठी कमाल वयोमर्यादा ३७ वष्रे असून त्यांच्या अटेम्प्टवर मर्यादा नाहीत.

परीक्षेचे वेळापत्रक

सामान्यपणे जानेवारी महिन्यादरम्यान ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’ या वृत्तपत्रात या परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर मे महिन्याच्या शेवटच्या किंवा जूनच्या दुसऱ्या रविवारी पूर्वपरीक्षा होते. या परीक्षेचा निकाल साधारणपणे सप्टेंबपर्यंत लागतो. आणि मुख्य परीक्षा डिसेंबर महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी सुरू होते. त्यानंतर या परीक्षेचा निकाल लागून मार्च-एप्रिलमध्ये मुलाखती घेतल्या जातात. मे महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडय़ात परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला जातो. अर्थात काही वेळा प्रशासकीय कारणास्तव या वेळापत्रकात बदल केले जाऊ शकतात.

अभ्यास करण्याविषयी

या परीक्षांचा अभ्यास घरच्या घरी निश्चित करता येतो. मात्र अभ्यासाची दिशा, काय वाचावे – काय टाळावे, अभ्यासाची खोली (डेप्थ), आवाका, उत्तर लेखनाची पद्धत, सराव चाचण्या आदी बाबी लक्षात घेता या परीक्षांच्या अद्ययावततेची कल्पना असणारी एक तरी माहीतगार व्यक्ती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपलब्ध असावी. ती नसेल तर मात्र एखादा क्लास लावण्यास हरकत नाही. सध्या ऑनलाइन पद्धतीनेही बरेच मार्गदर्शन उपलब्ध झाले आहे. महाराष्ट्र राज्य सरकारतर्फे मुंबईत सीएसटीजवळ तसेच औरंगाबाद, नागपूर येथे राज्य प्रशासकीय प्रशिक्षण संस्था आहे. तेथे मोफत मार्गदर्शन करण्यात येते. निवासाची सोयही उपलब्ध असते. मात्र त्यासाठी दरवर्षी प्रवेशपरीक्षा घेतली जाते. या दोन्ही प्रकारच्या परीक्षांच्या जाहिराती वेळोवेळी राज्यातील अग्रगण्य वृत्तपत्रांत देण्यात येतात.

परीक्षेचे माध्यम

सर्व परीक्षांसाठीच्या प्रश्नपत्रिका या हिदी व इंग्रजी माध्यमातून उपलब्ध असतात. मात्र मुख्य परीक्षा व मुलाखत ही भारतीय राज्यघटनेच्या आठव्या परिशिष्टामध्ये नमूद केलेल्या २४ भारतीय भाषांपैकी कोणत्याही भाषेत लिहिता व देता येते. अगदी मराठीतही.

राज्यसेवा परीक्षा (एमपीएससी)

केंद्रीय स्तरावर घेतल्या जाणाऱ्या परीक्षेप्रमाणेच राज्यांमध्येही अशाच अधिकारी पदाच्या परीक्षा घेतल्या जातात. उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, साहाय्यक पोलीस आयुक्त, तहसीलदार, मंत्रालयातील कक्ष अधिकारी, सहकार तालुका उपनिबंधक, जिल्हा उपनिबंधक, विभागीय सहनिबंधक, महाराष्ट्र राज्य वित्त व लेखा सेवा, साहाय्यक विक्रीकर आयुक्त, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी या व अशा विविध पदांसाठी राज्य लोकसेवा आयोग परीक्षा घेतो. केंद्रीय परीक्षांच्या तुलनेत या परीक्षेचा केंद्रिबदू महाराष्ट्र राज्य व भारत इतका मर्यादित असतो, तर आयएएससाठी हाच केंद्रिबदू भारत व जग असा असतो.

परीक्षा पद्धती :

राज्यसेवा परीक्षेतही पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत असाच क्रम असतो. मात्र येथे पूर्वपरीक्षा आणि मुख्य परीक्षा या दोन्ही परीक्षा बहुपर्यायी पद्धतीच्या असतात. पूर्वपरीक्षेत दोन प्रश्नपत्रिका सोडवायच्या असतात. प्रत्येकी २०० गुण आणि दोन तास. येथेही आयएएसच्या परीक्षेप्रमाणेच उत्तर चुकल्यास मिळविलेल्या गुणांपकी एक चतुर्थाश गुण वजा होतात.

सामान्य ज्ञानाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये चालू घडामोडी, भारताचा इतिहास (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भाने) व भारताची स्वातंत्र्य चळवळ, महाराष्ट्र-भारत आणि जगाचा भूगोल, राज्य व राष्ट्रीय स्तरावरील शासन पद्धती, राज्यघटना, आíथक जगातील घडामोडी, अर्थव्यवस्था, पर्यावरण, परिसंस्था आणि वातावरणीय बदल आदींविषयी प्रश्न विचारले जातात. २०० गुणांसाठी एकूण १०० प्रश्न असतात. त्यामुळे वेळ पुरेसा असतो आणि प्रश्नपत्रिका वाचून सहज पूर्ण होऊ शकते.

कलपरीक्षण चाचणीमध्ये आकलन, उताऱ्यावरील प्रश्न, बुद्धिमापन चाचणी, गणिते, आकडेमोड, नकाशा किंवा आलेखावरील प्रश्न, निर्णयक्षमता तपासणारे प्रश्न अशा अनेक बाबींचा समावेश असतो. येथे ८० प्रश्न असतात. मात्र उतारे बऱ्यापकी क्लिष्ट असल्यामुळे वाचनासाठी वेळ पुरत नाही. त्यामुळे उमेदवारांनी परीक्षा देताना या बाबी लक्षात ठेवून वाचन वेग वाढविण्याचा सराव करावा.

या परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर मुख्य परीक्षा असते. येथे प्रत्येकी १५० गुणांचे सामान्य ज्ञानाचे चार पेपर असतात. पहिला इतिहास व भूगोल. दुसरा भारतीय राज्यघटना व भारतीय राजकारण. तिसरा मानव संसाधन विकास व मानवी हक्क, तर चौथा अर्थव्यवस्था, नियोजन, कृषी, विज्ञान व तंत्रज्ञान. सर्व प्रश्नपत्रिका १५० प्रश्नांच्या व दोन तास वेळेत सोडविण्याच्या असतात. त्याच्या बरोबरीनेच अनिवार्य इंग्रजी व मराठी भाषेचे पेपर असतात. दोन्ही भाषांचे पेपर प्रत्येकी १०० गुणांचे, प्रत्येकी तीन तासांचे व बहुपर्यायी आणि दीघरेत्तरी असे मिश्र स्वरूपाचे असतात. या सर्व विषयांचा अभ्यासक्रम राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) संकेतस्थळावर उपलब्ध आहे. एकूण मुख्य परीक्षा ८०० गुणांची असते.

त्यानंतर मुलाखत १०० गुणांची असते. मुख्य परीक्षा व मुलाखत यांच्या एकत्रित गुणांमधून अंतिम गुणवत्ता यादी तयार केली जाते. सर्व प्रश्नपत्रिका मराठी व इंग्रजी माध्यमातून असतात. राज्य लोकसेवा आयोगातर्फे परीक्षेनंतर काही दिवसांतच आदर्श उत्तरतालिका जाहीर करण्यात येते. त्यामध्ये उमेदवारांच्या काही सूचना असल्यास त्यावर विचार करून काही दिवसांनी अंतिम उत्तरे प्रसिद्ध केली जातात. शिवाय प्रत्यक्ष परीक्षेदरम्यान आपल्याला आपल्याच उत्तरपत्रिकेची कार्बन प्रत मिळते. त्यामुळे आयोगाने जाहीर केलेली उत्तरे, पुढील टप्प्यासाठी निर्धारित केलेली पात्रता गुणसंख्या आणि आपले गुण यांच्यात तफावत आल्यास आपल्याला पारदर्शी पद्धतीने खातरजमा करता येते. ही सुविधा केंद्रीय लोकसेवा आयोग देत नाही.

या परीक्षांबाबत विशेष काय

कोणतीही शैक्षणिक पाश्र्वभूमी असलेली व्यक्ती या परीक्षा देऊ शकते, आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची समान संधी देशपातळीवर उपलब्ध होते, परीक्षांमधून उत्तीर्ण झाल्यास समाजात शाश्वत नोकरीसह प्रतिष्ठाही मिळते, या क्षेत्रातील आदर्श अर्थात रोल मॉडेल्सही मोठय़ा संख्येने तयार होत आहेत, या परीक्षांविषयी मार्गदर्शन करणाऱ्या शासकीय व खासगी यंत्रणा उपलब्ध आहेत आणि सर्वात मुख्य म्हणजे या करिअरची माहिती देणारी अधिकृत व्यवस्थाही तयार आहे, त्यामुळे महाराष्ट्रातील अधिकाधिक युवकांना येथे वळणे सुलभ झालेले पाहावयास मिळते.

संसदीय सचिवालयातील संधी

विधिमंडळाच्या कामकाजात व्यत्यय, लोकसभेचे कामकाज आधी दहा मिनिटांसाठी व अखेर दिवसभरासाठी तहकूब, आज सभागृहात विरोधकांचा सभात्याग या आणि अशा बातम्यांमुळे आपण अनेकदा अस्वस्थ होतो. किंबहुना, हे असे का होते, कामकाज सारखेच रहित का राहते, प्रत्यक्ष संसदेत काय चालते हे कळण्याचीसुद्धा आपल्याला फारशी संधी मिळत नाही. मग उरते ती केवळ निराशा. पण हे सगळे पाहण्याची, त्या क्षणांचा साक्षीदार होण्याची, संधी आणि तीसुद्धा न्याय्य वेतन व सुविधांसह मिळणार असेल तर.? चमकायला झालं ना. खरं आहे. अशी संधी मिळू शकते. केंद्रीय स्तरावर संसदेच्या तर राज्य पातळीला विधिमंडळाच्या सचिवालयात रुजू होता येते.

त्यासाठी मार्ग कोणता…

केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे संसदीय सचिवपदासाठी परीक्षा घेतली जाते. केंद्रीय लोकसेवा आयोगातर्फे घेतल्या जाणाऱ्या सनदी सेवांच्या परीक्षेप्रमाणेच ही परीक्षाही तीन टप्प्यांमध्ये होते. पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा व मुलाखत. मुख्य परीक्षेलाही सामान्यज्ञान व निवडक विषयांच्या यादीतून एका वैकल्पिक विषयाची निवड करावी लागते.

पूर्वपरीक्षा बहुपर्यायी, मुख्य परीक्षा पारंपरिक किंवा दीघरेत्तरी स्वरूपाची तर मुलाखत व्यक्तिमत्त्वाची संयतता तपासणारी असते.

फक्त इथे सामान्यज्ञान या विषयात राज्यशास्त्र या उपघटकावर भर असतो. संसदीय कार्यपद्धती, संसदीय संकल्पना, कामकाजाचे तास, नियम, कामकाजाची पद्धती, प्रश्नोत्तरांचा तास, विविध ठराव, ते लागू करण्यासाठीच्या पूर्वअटी अशा अनेक बाबींचे ज्ञान आपल्याला असावे लागते. शिवाय भारतात संसदीय शासनप्रणाली हे ब्रिटिशांचे वेस्टमिन्स्टर मॉडेल आपण अंगिकारले आहे. मंत्र्यांची सामूहिक जबाबदारी, या पद्धतीची बलस्थाने-कच्चे दुवे आदी बाबींविषयी माहिती असायला हवी. मुख्य परीक्षेमध्ये असणाऱ्या वैकल्पिक विषयात दोन पेपर असतात. त्याचा अभ्यासक्रम पदव्युत्तर पदवी दर्जाचा असतो. एखाद्या विषयातील आपल्या ज्ञानाची सखोलता पाहणे हा या प्रश्नपत्रिकांचा मुख्य हेतू असतो.

कामाचे स्वरूप

संसदीय सचिव किंवा विधिमंडळातील सचिव म्हणजे नेमके काय काम करावे लागते, अशी शंका उपस्थित झाली असेल, तर आपण योग्य मार्गाने चाललो आहोत असे समजावे. लोकसभेचे कामकाज पाहताना, सभापतींच्या स्थानाच्या खाली काही अधिकारी वर्ग एका लंबवर्तुळाकार टेबलाभोवती बसलेला आणि त्यांच्याभोवती असंख्य फायलींचा ढिगारा पाहिल्याचे निश्चितच आठवत असेल. हा वर्ग संसदीय सचिवालयाशी संबंधित असतो.

संसदेचे कामकाज टिपणे, म्हणजे संसदेच्या कामकाजाच्या दिवशी कोण-कोण बोलले, काय-काय बोलले, त्याची पाश्र्वभूमी काय होती, कोणाचे बोल कामकाजातून वगळायचे आदेश सभापतींनी दिले, प्रश्नोत्तरांच्या तासात कोणाकोणाचे प्रश्न विचारले जातील, त्यापकी तारांकित प्रश्न किती, अतारांकित प्रश्न किती, त्यांची लेखी उत्तरे सादर करावयास लागणारा वेळ, मुळात संसदेच्या त्या-त्या दिवसाची कार्यक्रम पत्रिका अशा असंख्य बाबींचे भान ठेवायला जबाबदार, कर्तव्यदक्ष आणि सचोटीच्या माणसांची गरज असते. कारण अशा व्यक्ती या इतिहासाच्या साक्षीदार असतात. त्यांनी नोंदविलेल्या बाबींमधून संसदेच्या कामकाजाचा इतिहास उभा राहत असतो. त्यामुळे या व्यक्तींना अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि संसदीय सचिवालय हे निश्चितच अशा जबाबदार व्यक्तींसाठी उत्तम कारकीर्द घडविणारे ठरवू शकते.

अभ्यास करताना…

या परीक्षांचा अभ्यास करताना वाचन, संसदीय कामकाजावरील विवेचन पाहणे, लोकसभा आणि राज्यसभा या वाहिन्या आवर्जून पाहणे अशा बाबी उपयुक्त ठरतात. त्याबरोबरच जागतिक स्तरावरील राजकीय घडामोडींचे ज्ञान, त्यातील सूक्ष्म बदल टिपण्याची हातोटी विकसित करणे गरजेचे असते. सामान्यपणे परीक्षेचे स्वरूप हुबेहूब आयएएसच्या परीक्षेसारखीच असते. फक्त या परीक्षेच्या अधिसूचनांचा कालावधी निश्चित सांगता येत नाही. म्हणजे ज्याप्रमाणे सनदी सेवा परीक्षांसाठी निश्चित महिना, परीक्षेच्या निश्चित तारखा सांगता येतात, तशा इथे सांगता येत नाहीत. मात्र एवढी एक मर्यादा सोडली तर ही परीक्षा आणि या सेवेतील संधी निश्चितच समाधानकारक ठरू शकतात.

काही संदर्भ पुस्तके

माधव गोडबोले यांनी लिहिलेली भारतीय संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा, धर्मनिरपेक्षता ही पुस्तके भारताची राज्यघटना, संसद, संसदेतील नोंदी, महनीय व्यक्तींचे मोठेपण अधोरेखित करणारे किस्से अशा अनेक बाबी व संसदीय सचिवाच्या भूमिका या पुस्तकातून खूप सहजपणे उलगडत जातील. संसदेला ५० वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने स्मरणिका प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ती अत्यंत माहितीपूर्ण आणि उपयुक्त आहे. त्याबरोबरीनेच नियमित अभ्यासासाठी संसदीय सचिव सुभाष कश्यप यांनी लिहिलेली, तसंच एनबीटी प्रकाशनाची आपले संविधान व आपली संसद ही दोन्ही लहानशीच पण नेमकी व अचूक माहिती देणारी पुस्तके आहेत. भारताचे निवृत्त न्यायाधीश मकरंद काटजू यांचे नुकतेच प्रसिद्ध झालेले ‘विथरिंग ज्युडिशियरी’, झोया मोदी यांचे ‘टेन जजमेंट्स दॅट चेंज्ड इंडिया’, ग्रॅनव्हिल ऑस्टीन यांचे ‘वìकग ऑफ अ डेमोक्रॅटिक कॉन्स्टिटय़ुशन’ ही व अशी पुस्तके उत्तम ठरतील.

ज्यांचा सहज कल नोंदी करण्याकडे आहे, ज्यांना शब्दांकनाची-कामकाजाची टिपणे काढण्याची उपजत आवड आहे, राजकीय घडामोडींचे निरीक्षण करण्याची ज्यांना आवड आहे आणि सचिव म्हणून कामे करण्याकडे ज्यांचा कल आहे अशांसाठी ही परीक्षा न्याय्य आणि उत्तम करिअर देऊ शकते.

गुप्तचर खात्यातील सेवा

या खात्याच्या कामाच्या स्वरूपात प्रचंड वैविध्य आहे. अगदी एकाच वाक्यात सांगायचे तर ‘सर्वच व्यावहारिक क्षेत्रांमधील मानवी हालचालींवर लक्ष ठेवणे आणि त्यातील राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने असलेल्या संशयास्पद गोष्टी टिपणे’ हे खरे काम आहे. भारताच्या कार्यकारी मंडळातील शासकीय अधिकाऱ्यांच्या नेमणुका, कनिष्ठ न्यायालयापासून ते सर्वोच्च न्यायालयापर्यंत न्यायाधीशांच्या नियुक्त्या, भारत सरकारतर्फे दिल्या जाणाऱ्या पद्म पुरस्कारांसाठी निवडण्यात येणाऱ्या व्यक्ती आदींची पाश्र्वभूमी तपासून त्यांना ‘क्लिअरन्स’ देणे हे गुप्तचर खात्याच्याच कामाचे एक अंग आहे. एखाद्या विशिष्ट मतदारसंघातील/ राज्यातील/ किंवा मध्यावधी निवडणुका घेण्यापूर्वी तेथील परिस्थिती निवडणुका घेण्यायोग्य आहे किंवा कसे याबाबत अहवाल देणे, अतिमहत्त्वाच्या पदांवरील व्यक्तींचा कोठेही दौरा असेल तर तेथील सुरक्षितता तपासणे, अतिमहत्त्वाच्या व्यक्तींशी केला जाणारा पत्रव्यवहार, ई-मेल संपर्क यांच्यावर नजर ठेवणे हेही गुप्तचर खात्याचे काम असते. भारतातील एका निवृत्त कॅबिनेट सेक्रेटरींच्या आत्मचरित्रात त्यांनी नमूद केल्याप्रमाणे प्रत्येक आमदार-खासदारांची दिनचर्याही गुप्तचर खात्याच्या स्कॅनरखाली येऊ शकते.

त्याशिवाय, आक्रमक, फुटीरतावादी, देशद्रोही, मूलतत्त्ववादी व्यक्ती-संघटना आदींबाबतही तपशीलवार माहिती गोळा करणे, ती संपादित करणे, त्याची सत्यासत्यता पडताळणे, अतिरेकी संघटनांच्या हालचाली टिपणे- त्यांचे सांकेतिक शब्द डीकोड करणे, देशविघातक शक्ती न्यूट्रलाईज करणे, अशा व्यक्तींची नेटवर्कस् जाणून घेणे आणि राज्य तसेच केंद्र सरकारला त्याबाबत माहिती पाठवणे तसेच प्राप्त माहितीच्या आधारे स्थानिक पोलीस, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील वरिष्ठ अधिकारी यांना खबरदारीच्या सूचना देणे असे या खात्याच्या अनेक कामांपकी काही ज्ञात कामांचे स्वरूप असू शकते.

या खात्याची एक महत्त्वाची मर्यादा म्हणजे आपण नेमके काय काम करतो आहोत, याची स्पष्ट कल्पना आपल्या कुटुंबीयांनाही देता येत नाही. पण ही संरक्षण क्षेत्राशी संबंधित कोणत्याही खात्यात काम करताना येणारी मर्यादा आहे.

या खात्यातील भरती प्रक्रिया :

सामान्यपणे केंद्रीय गृह मंत्रालय आणि राज्य गृह मंत्रालय अशा दोन्ही पातळ्यांवर ही भरती होते. कधी थेट किंवा ज्याला सरळसेवा भरती म्हणतो त्याप्रमाणे तर कधी द्विस्तरीय किंवा त्रिस्तरीय परीक्षांद्वारे ही भरती होते. या केंद्र सरकारच्या गृह खात्याच्या संकेतस्थळावर याची जाहिरात व अन्य तपशील पाहायला मिळतो. राज्य सरकारतर्फेही योग्य ती पूर्वसूचना- जाहिरात देऊनच भरती प्रक्रिया राबविली जाते. त्याशिवाय कर्मचारी भरती आयोग (स्टाफ सिलेक्शन कमिशन)मार्फतही असिस्टंट सेंट्रल इंटिलिजन्स ऑफिसर (एसीआयओ) आणि इंटिलिजन्स ऑफिसर (नार्कोटिक्स कंट्रोल- अमली पदार्थ नियंत्रण विभाग) या पदांसाठी वर्षांतून एकदा किंवा क्वचित दोनदा परीक्षा घेतली जाते. या परीक्षांबाबतची पूर्वसूचना ‘एम्प्लॉयमेंट न्यूज’मध्येही पाहायला मिळते. काही वेळा त्या त्या वेळच्या गरजांनुसार आवश्यक ती कौशल्ये आणि किमान शैक्षणिक पात्रता अटींद्वारे ही भरती प्रक्रिया होते.

पात्रता :

किमान शैक्षणिक पात्रता पदवी  ही असते. त्याव्यतिरिक्त अनेकदा गरजांनुसार बारावी उत्तीर्ण आणि काही ‘टेक्निकल’ पात्रता (तंत्रशिक्षणविषयक पात्रता) असलेल्यांनासुद्धा या सेवांची संधी उपलब्ध असते. अपवादात्मक परिस्थितीत इयत्ता दहावी उत्तीर्ण आणि वैशिष्टय़पूर्ण कौशल्यांचाही (उदा. ड्रायिव्हग वगरे.) नोकरीसाठी विचार केला जातो. त्यामुळे दहावीपासून पदवीपर्यंतच्या सर्वच इच्छुकांनी या भरतीकडे नजर ठेवावी. खुल्या संवर्गाला २७ व्या वर्षांपर्यंत (राज्यात ३० व्या वर्षांपर्यंत) परीक्षेद्वारे केल्या जाणाऱ्या भरतीचा लाभ घेता येतो. तर सरळसेवा किंवा थेट भरतीसाठी खुल्या संवर्गाला तिसाव्या वर्षांपर्यंत पात्र ठरविले जाते. अन्य संवर्गासाठी ३०-३३-३५ अशी सवलत नियम तसंच जाहिरातींमध्ये नमूद केल्यानुसार दिली जाते.

कौशल्ये :

सामान्यपणे उत्तम संवादकौशल्ये, तीक्ष्ण निरीक्षणशक्ती, तीव्र स्मरणशक्ती, तंत्रज्ञानावरील पकड, संगणक आणि इंटरनेटचे ज्ञान, कोणत्याही क्षेत्रात पारंगत होण्यासाठी शिकायची तयारी अशा कौशल्यांची या खात्यातील सेवांसाठी गरज असते. या परीक्षेचे अर्ज ssconline.gov.in / mha.nic.in या संकेतस्थळांवर जाहिरात- अधिसूचना आल्यानंतर उपलब्ध होतात. शिवाय अनेक रेल्वे स्थानकांवरील वृत्तपत्रांच्या स्टॉलवर हे अर्ज उपलब्ध असतात.

सध्या आयुक्त, राज्य गुप्तवार्ता विभाग यांच्यातर्फे २१० पदांची जाहिरात आली असून त्याचा तपशील mahapariksha.gov.in व mahapolice.gov.in या संकेतस्थळांवर उपलब्ध आहे.

परीक्षेचे स्वरूप :

गुप्तचर खात्यातर्फे घेतली जाणारी परीक्षा दोन प्रकारे होते. एक वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न आणि दुसरे दीघरेत्तरी प्रश्न. भारताचा भूगोल, इतिहास, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र, परराष्ट्र धोरण, विज्ञान-तंत्रज्ञान, गणित (अरिथमॅटिक्स, लॉजिक, रिझिनग आदी.) आणि चालू घडामोडी तसेच कलतपासणी करणारे प्रश्न यांचा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षेत समावेश होतो. तर दीघरेत्तरी प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्रजी भाषेवरील प्रभुत्व तपासले जाते. काही वेळा केवळ द्विस्तरीय तर काही वेळा पूर्वपरीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत अशा त्रिस्तरीय पद्धतीने परीक्षा घेतली जाते.

संदर्भ पुस्तके :

उपकार प्रकाशनासह अन्य प्रकाशनांची एसीआयओ परीक्षेसाठी तयार करण्यात आलेली विशेष पुस्तके आणि मार्गदर्शके.

महत्त्वाचे आणि भविष्यवेधी

भारतातील उच्च शिक्षणासाठीची बदलती धोरणे आणि उद्दिष्टे लक्षात घेता, विद्यापीठीय शिक्षक पेशा हा भविष्यातील नोकऱ्यांचे नवे दालन खुले करू शकतो. त्यासाठी राष्ट्रीय पातळीवर घेतली जाणारी नेट ही पात्रता परीक्षा महत्त्वाची आहे. जानेवारी आणि जुलमध्ये ही परीक्षा होते. जनरल स्टडीज् आणि पदव्युत्तर परीक्षेच्या विषयाच्या दोन बहुपर्यायी प्रश्नपत्रिका असे परीक्षेचे स्वरूप असते. अधिक तपशील cbsc.net या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

First Published on June 8, 2018 1:06 am

Web Title: career special issue government jobs