16 February 2019

News Flash

करिअर विशेष : संशोधनाचे क्षेत्र आव्हानाचे 

भौतिकशास्त्र आणि कंडेन्स मॅटर फिजिक्समधील नामवंत संशोधक चारुदत्त कडोलकर यांचा संशोधन क्षेत्रातील प्रवास खरोखर निराळा आहे.

नामवंत संशोधक चारुदत्त कडोलकर आयआयटी गुवाहाटीमध्ये ऑल राउंडर प्रोफेसर म्हणून परिचित आहेत. भारतातील आघाडीच्या संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे. (कंडेन्स मॅटर)

प्रशांत जोशी – response.lokprabha@expressindia.com
भौतिकशास्त्र आणि कंडेन्स मॅटर फिजिक्समधील नामवंत संशोधक चारुदत्त कडोलकर यांचा संशोधन क्षेत्रातील प्रवास खरोखर निराळा आहे. आयआयटी गुवाहाटीमध्ये ऑल राउंडर प्रोफेसर म्हणून ते परिचित आहेत. भारतातील आघाडीच्या संशोधकांमध्ये त्यांचा समावेश आहे.

तुमचा संशोधनाचा प्रवास कसा होता..?

डोंबिवलीच्या अतिशय साध्या महाविद्यालयातून शिक्षण पूर्ण केल्यानंतर मी आयआयटी मुंबईमधून माझे मास्टर्सचे शिक्षण पूर्ण केले. तोपर्यंत असे अजिबात निश्चित नव्हते की मला संशोधनात करिअर करायचे आहे. प्रत्येक विषय अत्यंत आवडीने शिकायचा आणि त्या त्या विषयात अधिकाधिक जाणून घ्यायचं, या प्रक्रियेमध्येच मला असं उमगलं की भौतिकशास्त्र या विषयाकडे माझा सर्वाधिक ओढा आहे. आणि मी तो संशोधनाचा विषय म्हणून निवडायचा ठरवलं.

तेव्हा अमेरिका, युरोप या देशांत कंडेन्स मॅटर या क्षेत्रात मोठय़ा प्रमाणावर संशोधन संधी उपलब्ध होत्या. मी इटलीतल्या विद्यापीठात प्रवेश मिळवून माझं संशोधन पूर्ण केलं. त्यानंतर मी आयआयटी गुवाहाटीमध्ये भौतिकशास्त्राचा प्राध्यापक झालो. तेव्हापासून मी कम्प्युटेशनल फिजिक्स, क्वांटम मेकॅनिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, अशा अनेक विषयांवर काम करतो.

तुमच्या मते संशोधन म्हणजे नेमके काय ?

संशोधन हे फक्त विज्ञान या विषयाशी निगडित आहे, हा एक मोठा गरसमज आपल्याकडे आहे. खरं तर सायन्स, आर्ट्स, कॉमर्स या सगळ्याच क्षेत्रात संशोधन अत्यंत महत्त्वाचे असते. एखादे प्रॉडक्ट लाँच करायचं असेल त्यापूर्वीदेखील संशोधन केले जाते त्याला खऱ्याखुऱ्या संशोधनाचा दर्जा दिला जात नसला तरी त्यासाठीदेखील तुम्हाला डेटा कलेक्शन, त्याचं विश्लेषण या गोष्टी आवश्यक असतात. संशोधन करणे म्हणजे एखाद्या गोष्टीशी निगडित आणि तिच्यावर परिणाम करणाऱ्या सर्व गोष्टींचा योग्य अभ्यास करणे.

कसं आणि कधी ठरवायचं की मला संशोधनात करिअर करायचं आहे.?

खरं तर संशोधनात करिअर करायचं आहे, हे आधीच ठरवणं म्हणजे थोडा आततायीपणा ठरू शकतो. कोणतं करिअर करायचं याची चिठ्ठी आपल्या घरी येत नाही किंवा एका रात्रीत साक्षात्कारही होत नाही. त्यासाठी आपल्याला योग्य समज येणं गरजेचं असतं. आणि वेळ जाऊ द्यायचा असतो. तो वेळ म्हणजेच तुमचं ११वी आणि १२ वी. साधारण बारावीपर्यंत ढोबळपणे आपल्याला आपल्या आवडीनिवडीचा अंदाज येतो. तो आला की आपण त्यानुसार विषय निवडायचे आणि आपल्या पदवी अभ्यासक्रमाला सुरुवात करायची. आपल्याला कोणत्या विषयात संशोधन करायचं किंवा आपल्या संशाोधन क्षेत्रात जायचं आहे, याचा निर्णय मुलांनी पदवी पूर्ण केल्यानंतर घेतल्यास अधिक सोयीस्कर ठरू शकतं. तोपर्यंत आपल्या अभ्यासक्रमात असणाऱ्या विषयांचं नीट आकलन करून घेणं अपेक्षित आहे. खरं तर आपल्या करिअर निवडीचा आलेख हा उलटय़ा शंकूसारखा असायला हवा.  शंकूचे आकारमान खालच्या दिशेने मोठे असते आणि नंतर तो बारीक बारीक होत जातो तसाच सुरुवातीला ढोबळपणे विषय निवडून समज आणि विषयाचे ज्ञान वाढेल तशी आपल्या विषयाची निवड निश्चित होत जाईल. सुरुवातीलाच विषयाची काळजी करण्याची गरज नाही.

संशोधनात करिअर करायचे असल्यास कोणता अभ्यासक्रम निवडावा?

प्रत्येक अभ्यासक्रमाचं स्वत:चं एक उद्दिष्टय़ असतं. मुख्य विषयाचं नेमकं स्वरूप समजावणे हे ११ वी अगर १२वीचं उद्दिष्टय़ असतं. पदवी अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतल्यानंतर तुम्हाला मोठमोठय़ा विषयांत प्रोजेक्ट  करणे अजिबात अपेक्षित नाही.  हल्ली मुलं आवड नसलेल्या विषयातही मोठमोठय़ा नावांना भुलून प्रोजेक्ट करायला जातात. पदवी अभ्यासक्रमात फक्त आपण निवडलेला विषय नीट समजून घेणे, त्या संदर्भात उपलब्ध असणाऱ्या तंत्रज्ञानाची ओळख करून घेणे, त्यानुसार आपल्या विषयाशी निगडित पुस्तकांचे वाचन आणि सद्य:स्थितीत आपल्या आवडीच्या विषयासंदर्भातील माहिती गोळा करून अपडेटेड राहाणे अपेक्षित आहे. पदव्युत्तर शिक्षणात आपल्याला आपल्या करिअरची साधारण दिशा कळलेली असते तेव्हा आवश्यक त्या अभ्यासपद्धती शिकून घेणे आणि त्यांचा आपल्या कामात समावेश करून घेणे अपेक्षित असते. संशोधनाकडे वळणाऱ्यांना मास्टर्समध्ये घेतलेले शिक्षण  पीएच.डी.च्या काळात अत्यंत उपयुक्त ठरू शकते. हल्ली सगळ्या शाखा या एकमेकांत इतक्या मिसळल्या गेल्या आहेत की, तुम्ही कोणत्याही एका क्षेत्रामधून दुसऱ्या क्षेत्रामध्ये सहज प्रवेश करू शकता. त्यामुळे ‘अमुक शिक्षण घेतल्यामुळे मी फसलो. मला आता माझे क्षेत्र बदलता येणार नाही’ अशी तक्रार सहसा ऐकू येत नाही. आमच्याकडे इंजिनीअरिंग करणारी अनेक मुलं नंतर मूलभूत संशोधन करतात.

संशोधनात इन्स्टिटय़ूट्स अगर संस्थेचा किती महत्त्वाचा भाग असतो?

पदवीचे शिक्षण हे मोठय़ा संस्थेतूनच घ्यायला हवे असा अट्टहास नसावा. ते कोणत्याही सरकारमान्य महाविद्यालयातून घ्यायला हवं. विद्यापीठांचा अभ्यासक्रम हा कमीअधिक फरकाने साधारण सारखाच असतो, त्यामुळे दिलेला अभ्यासक्रम आपण नीट अभ्यासू शकलो तर त्यामुळे फार फरक पडत नाही. पदव्युत्तर आणि पुढच्या अभ्यासक्रमासाठी मात्र संस्था हा महत्त्वाचा मुद्दा असतो. चांगल्या शिक्षण संस्थांत चांगल्या सुविधा उपलब्ध होतात. त्यामुळे संशोधन आणि पदव्युत्तर अभ्यासासाठी संस्था महत्त्वाच्या ठरतात. मुख्य संशोधनासाठी खूपदा कोणत्याही संस्थेपेक्षा ज्या विषयात आपल्याला काम करावयाचे आहे त्या विषयातील निष्णात माणसांसोबत काम करणे जास्त योग्य आणि हितकारक ठरू शकते.

उत्तम संशोधकाच्या अंगी कोणकोणते गुण असणे अपेक्षित आहेत?

संशोधन करणारे लोक अत्यंत हुशार, एकपाठी, अद्वितीय बुद्धिमत्ता असणारे असतात, असा आणखी एक चुकीचा समज आहे. सामान्य बुद्धिमत्ता असणारी परंतु प्रचंड इच्छाशक्ती, विषयाची आवड, कामसू अशी व्यक्ती उत्तम संशोधक होऊ शकते. संशोधन हे काही धनाढय़ांचे क्षेत्र नाही. त्यामुळे वर्षांला लाखोंचं पॅकेज अपेक्षित असेल तर हे क्षेत्र न निवडलेलं बरं. संशोधन करू इच्छिणारे वयाच्या ३२ वर्षांपर्यंत विद्यार्थी म्हणून शिकतच असतात, त्यामुळे इतर लोक लाखो रुपये कमवतात तेव्हा संशोधन क्षेत्रातील लोक २५-३० हजारांच्या संशोधन विद्यावेतनावर जगत असतात. त्यामुळे खरोखर विषयाची आवड असणाऱ्यांनीच या क्षेत्रात यावे. याखेरीज एखाद्या संशोधकाकडे संयम, उत्सुकता, विश्लेषण क्षमता, उत्तम व्यवस्थापन क्षमता अपेक्षित असते आणि या सगळ्यांपेक्षा अधिक महत्त्वाचे म्हणजे नैतिक तत्त्वे महत्त्वाची वाटणे असणे आवश्यक आहे. सध्या संशोधनाच्या नावाखाली चुकीचे आलेले रिझल्टही चालढकल करून खपवले जातात, ही वृत्ती संशोधकाला आणि एकंदरीत या व्यवसायालाच मारक ठरत असते, कारण चुकीच्या गोष्टी पाठवून पुढच्या पिढीची दिशाभूल केली जाऊ शकते. संशोधकाने सगळ्यांपेक्षा जास्त नैतिक असणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

First Published on June 8, 2018 1:21 am

Web Title: career special issue research sector a challenging career field charudatta kadolkar