14 August 2020

News Flash

करिअर विशेष : ज्वेलरी क्षेत्राला नवी झळाळी

चांगल्या कपडय़ांना शोभतील असे चांगले दागिने घातले की व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं.

चांगल्या कपडय़ांना शोभतील असे चांगले दागिने घातले की व्यक्तिमत्त्व खुलून दिसतं. म्हणूनच ज्वेलरी डिझाइन या घटकाच्या पलीकडे जाऊन ज्वेलरीच्या क्षेत्रात करिअर म्हणून अनेक गोष्टी करता येऊ शकतात.

दहावी-बारावीच्या परीक्षा आता संपल्या आहेत, पुढे काय करायचं हे काही मंडळींनी आधीच ठरवून ठेवलं असेल पण काही जण मात्र अजूनही त्याबद्दल विचार असतील. सध्याची तरुणाई प्रत्येक गोष्टीचा चौकसपणे विचार करणारी आणि आपल्या करियरबाबतीत जागरूक असते. आपल्या मनाला जे पटेल आणि जे आवडेल त्याचा चारही बाजूंनी विचार केला जातो आणि आपल्याला नक्की काय करायचं आहे हे ठरवलं जातं. पालक सांगतायत म्हणून वैद्यकीय, अभियांत्रिकी शिक्षण घेण्यापेक्षा आपला कल कशात आहे हे ओळखून स्वत:साठी करियर निवडलं जातं. कला क्षेत्राकडे बऱ्याच जणांचा ओढा असतो. त्यातल्या वेगवेगळ्या वाटा तरुणाईला खुणावत असतात. त्यातल्याच ज्वेलरी या क्षेत्रात करियर कशा प्रकारे होऊ शकेल, केवळ ज्वेलरी डिझायिनगव्यतिरिक्त आणखी कोणकोणत्या संधी ज्वेलरी व्यवसायात उपलब्ध असतात त्याबद्दल सांगणारा हा लेख.

ज्वेलरी व्यवसायात काय काय संधी उपलब्ध आहेत याबद्दल आत्मन ज्वेलरी या ब्रॅण्डच्या संस्थापक आणि क्रिएटिव्ह हेड अस्मिता म्हणाल्या, ‘ज्वेलरी डिझायिनगपुरतंच हे क्षेत्र मर्यादित राहिलं नाही. भारतात ई-कॉमर्स खूप प्रगती करत आहे, सर्वच क्षेत्रांमध्ये त्याचा फायदा झाला आहे. ज्वेलरी व्यवसायही त्यामुळे खूप प्रगती करत आहे’.

या क्षेत्रात काम करण्यासाठी बऱ्याच संधी उपलब्ध आहेत.

रिटेल स्टोअर

ज्वेलरी व्यवसायात उतरायची इच्छा असणारे स्वत:चं एखादं दुकान किंवा स्टार्टअप चालू करू शकतात. त्यासाठी तुम्हाला डिझायिनगची आवड असलीच पाहिजे असं नाही. एखाद्या ठिकाणाहून मोठय़ा प्रमाणावर दागिने विकत घेऊन ग्राहकांना तुम्ही एका विशिष्ट किमतीत दागिने विकू शकता. परंतु यासाठी कोणत्या प्रदेशात कशा प्रकारचे दागिने बनतात, कोणत्या राज्यातले कोणते दागिने लोकप्रिय आहेत. तिकडची दागिन्यांतली वैशिष्टय़ काय आहेत असा चौफेर अभ्यास असं महत्त्वाचं असतं. त्यामुळे रिटेल स्टोअरही खूप चांगली संधी ज्वेलरी व्यवसायात उपलब्ध होते.

ऑनलाइन स्टोअर्स

सध्या अनेक ऑनलाइन माध्यमं अपल्याकडे उपलब्ध आहेत. या माध्यमांचा वापर करून आपण आपलं स्वत:चं ऑनलाइन स्टोअर चालू करू शकतो. अत्यंत मोठय़ा प्रमाणावर बिझनेस करायचा असेल तर ऑनलाइन माध्यम हे अगदी चांगलं माध्यम आहे. स्वत: डिझाइन केलेली ज्वेलरी करागिरांकडून बनवून घेऊन किंवा स्वत: बनवून घेऊन दागिने तयार करून ते विकता येतात. ऑनलाइन बिझनेस करताना दागिन्यांचे जास्त वेगवेगळे प्रकार किंवा डिझाइन लागत नाहीत; परंतु त्यांची संख्या मात्र जास्त लागते. जेणेकरून जास्त ग्राहकांना एकाच वेळी तुम्ही दागिने विकू शकता.

03-ornament

ज्वेलरी डिझायनर

ज्वेलरी क्षेत्रामध्ये ज्वेलरी डिझायनर होण्याची खूप मोठी संधी आहे. डिझायिनगचं शिक्षण घेतलं असेल किंवा कल्पनाशक्ती चांगली असेल तर एखाद्या ज्वेलरी फर्ममध्ये ज्वेलरी डिझायनर म्हणून तुम्ही काम करू शकता. हल्ली ज्वेलरी डिझायिनग एखाद्या डिझाइनचं स्केचिंग करणं किंवा डिझाइनचं डिजिटल मॉडेल तयार करणं या दोन प्रकारे केलं जातं.

ज्वेलरी डिझायिनग ट्रेनर

ज्वेलरी डिझाइनचं शिक्षण घेतलं असेल तर त्यातून अनेकांना ट्रेिनग देऊ शकता. त्यात तुमच्या क्रिएटिव्हिटीचा फायदा तुम्हाला होतो. तुम्ही तुम्हाला हव्या त्या वेगवेगळ्या पद्धतीने ज्वेलरी कशी डिझाइन करायची हे शिकवू शकता. त्यातून तुम्ही पैसा मिळवू शकता आणि इतरांनाही त्याचा फायदा होतो.

जेमॉलॉजिस्ट

विविध रत्नांचा शास्त्रशुद्ध अभ्यास करून तुम्ही जेमॉलॉजिस्ट होऊ शकता. हिरे म्हणजे काय, रंगीत हिरे म्हणजे काय, कोणकोणती इतर रत्नं आहेत यांचा सखोल अभ्यास जेमॉलॉजीमध्ये केला जातो. कोणती रत्नं कोणा कोणाला उपयोगी ठरतात याचा अभ्यास करून लोकांना त्यापासून दागिने तयार करून दिले जातात. जेमॉलॉजीचा अभ्यास करून तुम्ही ज्वेलरी कन्सल्टंटसुद्धा होऊ शकता. ज्वेलरी कन्सल्टंट स्वत: दागिने बनवत नाही किंवा त्यांचं डिझायिनगही करत नाही; परंतु व्यवस्थित अभ्यास करून तुमच्याकडे असलेले दागिने किंवा रत्नं किती शुद्ध प्रतीची आहेत, त्यांचा दर्जा काय आहे याबद्दल व्यवस्थित माहिती देतात, आणि त्याबदल्यात पसे आकारतात.

ज्वेलरी स्टायलिस्ट

कपडय़ांसाठी जसे स्टायलिस्ट असतात तसेच ज्वेलरीसाठीही स्टायलिस्ट असतात. ते कोणत्या आऊटफिटबरोबर कोणती ज्वेलरी घातली पाहिजे याबद्दल माहिती देतात. तुमचं एखाद्या समारंभासाठी किंवा मोठय़ा इव्हेंटसाठी कोणते कपडे घालायचे हे ठरलं की त्यानुसार हे ज्वेलरी स्टायलिस्ट त्या कपडय़ांवर तुम्ही कोणती ज्वेलरी घातली खुलून दिसेल, तसेच ही ज्वेलरी तुम्ही कुठून बनवून घेऊ शकता किंवा कशा प्रकारच्या ज्वेलरी बनवून घ्यायला हवी याबद्दल मार्गदर्शन करतात.

ज्वेलरी ब्लॉिगग

सध्या ज्वेलरी ब्लॉिगग हे क्षेत्र खूप मोठय़ा प्रमाणावर पसरत आहे. सोशल मीडिया किंवा यू टय़ूबच्या साहाय्याने तुम्ही ज्वेलरी ब्लॉिगग करू शकता. सध्याचे दागिन्यांचे लेटेस्ट ट्रेण्ड्स काय आहेत, कोणत्या सेलिब्रेटीने कोणते दागिने घातले होते, कोणत्या अवॉर्ड फंक्शनमध्ये कोणते दागिने झळकले, सध्या डिझायनर्स कोणते प्रयोग करत आहेत या सगळ्याबद्दल ज्वेलरी ब्लॉिगग माध्यमातून तुम्ही लिहू शकता. यामध्ये तुम्ही एकाच वेळी स्टायलिस्ट, डिझायनर, ज्वेलरी मेकर होऊ शकता.

परदेशात भारतीय दागिन्यांना खूप मागणी आहे. त्यामुळे भारतीय ज्वेलरीचे परदेशात प्रमोशन करणं हाही एक पर्याय आहे. त्याचबरोबर एखाद्या ब्रॅण्डची फ्रँचायझी घेऊन तुम्ही त्या ब्रॅण्डची ज्वेलरी विकू शकता. ऑनलाइन माध्यम त्यासाठी खूप सोयीचं आहे. स्वत:चा व्यवसाय असेल तर तुम्ही विविध शहरात फ्रँचायझी चालू करू शकता.
प्राची परांजपे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2017 1:17 am

Web Title: career special jobs in jewellery field
Next Stories
1 करिअर विशेष : भारतीय सनदी सेवांचे क्षितिज
2 करिअर विशेष : फिरा, लिहा, कमवा!
3 मनमुक्ता : आरोग्यपूर्ण ‘ती’
Just Now!
X