सन १७३५ मधील ऑगस्ट महिन्याची १० तारीख. त्या दिवशी एक तरुण हार्लेम या डच शहराजवळची जॉर्ज क्लिफर्ड यांची बाग बघायला आला होता. बागेत असंख्य कॅक्ट्स, ऑर्किड, पॅशन फ्लॉवर, केळी आणि इतरही अनेक झाडं फुललेली होती. त्या तरुणाने नुकतीच औषधीशास्त्राची पदवी संपादन केलेली होती. तो हाता अठ्ठावीस वर्षांचा स्वीडिश कार्ल लिनॅअस. बागेतील पुष्कळशी झाडं त्याने पूर्वी बघितलेली नव्हती. तरीही त्याने फुलांचं निरीक्षण करून त्यांचं वर्गीकरण सांगितलं होतं!

त्याचं कौशल्य पाहून क्लिफर्ड यांनी त्याला नेमून टाकलं. तो १७३८ उन्हाळ्यापर्यंत तिथे राहिला. त्या काळात त्याने बागेतील सर्व झाडांचं वर्गीकरण तर केलंच पण त्याबरोबरच आपली पद्धत घासून पुसून घेतली.

GST Uniform taxation of goods and services
‘जीएसटी’च्या ध्येयपूर्तीसाठी…
loksatta chaturang The main cause of new and old generation disputes is the mode of spending
सांधा बदलताना: ‘अर्थ’पूर्ण भासे मज हा..
wife
पत्नीने तक्रार दाखल करणे क्रुरता नाही…
Inheritance of girls and women Two main types of property ownership
मुली आणि महिलांचा वारसाहक्क

हार्लेमला येण्यापूर्वीच १७३० मध्ये लिनॅअसने एक छोटी पुस्तिका प्रसिद्ध केली होती. तिचं नाव होतं मॅरेज ऑफ प्लॉण्ट्स (वनस्पतींची लागवड). वैद्यकशास्त्राचा अभ्यास करत असतानाच त्याने वनस्पतींच्या पुनरुत्पादक अवयवांचा म्हणजे फुलांचा अभ्यास केला होता. त्याने फुलांचे चार भाग सांगितले होते. फुलांभोवतीचं हिरवं आवरण संदल (sepal), बहुधा रंगीत असणाऱ्या पाकळ्या (petals), फुलाचे पुनरुत्पादक अवयव केसरदल (stamens) ज्यात परागकण असतात आणि त्यांचे स्त्रीलिंगी अवयव किंजदल (carpel). फुलातील हे चारी अवयव वेगवेगळ्या संख्येने, वेगळ्या आकाराने किंवा वेगळ्या स्थानावर उपलब्ध असतात. त्या त्या झाडाच्या पुनरुत्पादन पद्धतीवर आधारित वर्गीकरण त्याने केलेलं होतं.

त्याच्या या कामाला समकालीन अभ्यासकांनी विरोधच दाखवला होता. कारण होतं नैतिकतेचं. त्यानं जी भाषा वापरली होती त्याबद्दल धार्मिक मंडळींचा आक्षेप होता. फुलाच्या अंतर्भागाचं वर्णन त्यानं ‘रतिशय्या’ असं केलं होतं. निर्मात्याने त्याभोवती सुबक पडदे लावले आहेत. नवरदेवाला मंदमंद सुगंधानं गंधित केलं आहे. अशा शय्येवर समारंभपूर्वक सुहागरात साजरी होते असं म्हटलं होतं.

फुलांमध्ये जी मीलन क्रिया होते त्याचं लाक्षणिक वर्णन लिनॅअसनं केलं होतं. अफूच्या फुलाबद्दल तो म्हणतो, ‘इथे निरामय वातावरणात जितके पुरुष तितक्याच स्त्रिया अभिप्रेत नाही तर वीस किंवा त्याहून अधिक पुरुष एका स्त्रीसह बिछान्यात असतात.’ झेंडूच्या फुलाच्या गुंतागुंतीच्या रचनेबद्दल त्यानं म्हटलं होतं, ‘इथे विवाहित जोडप्यांच्या शय्या मध्यभागी आहेत तर त्यांच्या उपपत्न्यांच्या शय्या त्यांच्या भोवती पसरलेल्या आहेत. पत्नी नापीक पण उपपत्नी सुपीक.’

या विविध फलनप्रक्रियेनुसार त्याने वनस्पतींचं वर्गीकरण केलं होतं. १७३५ च्या अखेरीस त्याने आपल्या ‘सिस्टिमा नेचर’  (Systema Nature) या पुस्तकाची पहिली आवृत्ती प्रकाशित केली. त्यात त्यानं प्राणी, वनस्पती आणि खनिजं यांची तीन स्वतंत्र अधिराज्ये (Kingdom) कल्पून त्यांचं तर्कशुद्ध वर्णन केलं होतं.

सुरुवातीला लिनॅअसनं वनस्पतींची विभागणी सपुष्प आणि अपुष्प अशा दोन गटांत केली होती. नंतर सपुष्पांची फोड फुलांच्या रचनेवर आधारित ठेवली. पहिला वर्ग केला ज्या फुलात केसरदल आणि किंजदल असणारी एकलिंगी फुलं आली. त्याचे पुन्हा केसरदलांची संख्या, त्यांची लांबी, त्यांची जागा यानुसार वर्ग (class) केले. वर्गाची फोड गणात (order) केली ती किंजदलांच्या संख्येनुसार प्रत्येक गणाची विभागणी केली, वंशात (Genus). त्यासाठी त्याची शरीररचना पाहिली. वंशाची पोटविभागणी झाली जातीत (Species). त्याच्या वर्गीकरणात जात हा शेवटचा घटक. पुढे पोटजात आली ती त्याने आणली नव्हती.

लिनॅअसने प्राण्याचं वर्गीकरण याच तऱ्हेने केलं, पण ते विस्तृत होऊ शकलं नाही, कारण तोपर्यंत प्राण्यांचं शरीरविज्ञान फारसं ज्ञात नव्हतं. मात्र वर्गीकरण करण्याचा हा पहिलाच प्रयत्न नव्हता. तोपर्यंत बहुतेक शास्त्रज्ञांनी सजीवांची विभागणी आद्याक्षरांनुसार केली होती; नाहीतर अधिवासावरून. परिणामी देवमासा आणि मासा एका पंक्तीत बसले होते. लिनॅअसने पहिल्यांदा देवमाशाला सस्तन प्राण्यात गणले.

वनस्पती शास्त्रज्ञ वनस्पतींच्या अगडबंब नावाचा वापर करताना मेटाकुटीला येत. ते पाहून तो एकाला म्हणाला, ‘अहो, अशी नावं वापरू नका हो! त्याऐवजी मी नावं देतो, ती वापरून बघा.’ त्याने काही परिचित वनस्पतींना दिलेली द्विनाम पद्धतींची सुटसुटीत नावं सांगितली. त्याने अशीच नावं प्राण्यांनाही दिली.

१७३५ मध्ये त्याने तयार केलेली नावं होती ५४९, ती १७५८ च्या दहाव्या आवृत्तीत ४३८७ वर पोचली. त्याच्या द्विनाम पद्धतीमुळे पूर्वीची नावं मागे पडली. या पद्धतीत पहिलं नाव असतं वंशाचं आणि दुसरं जातिवाचक. त्याने वनस्पती आणि प्राण्यांसाठी वापरलेली ही पद्धत आता एकूणच सजीव सृष्टीसाठी स्वीकारली गेली आहे. लिनॅअसनं दीर्घकाळ औषधी आणि वनस्पतीशास्त्राचा अध्यापक म्हणून काम केलं.

सजीवांच्या वर्गीकरणाच्या त्याच्या कामामुळे त्याला १७६१ मध्ये स्वीडनमधील महनीय नागरिकांचा दर्जा देण्यात आला. युरोपमधील अनेक विद्वानांनी त्याचा गौरव केला. स्वीडिश अकादमी ऑफ सायन्सेसचा तो सहसंस्थापक आणि पहिला अध्यक्ष होता. पक्षाघाताच्या आजाराने त्याचं १७७८ मध्ये निधन झालं.

इतक्या प्रतिभाशाली शास्त्रज्ञाची एक चूक झाली होती. त्याच्या अंदाजे जगभरात सहा हजार वनस्पती आणि चार हजार ४०० प्राणी होते. हा अंदाज नगण्य होता. कारण त्याच्या पावलावर पाऊल टाकून पुढे जात शास्त्रज्ञांनी केलेला सजीव सृष्टीचा अंदाज १.३ ते तीन कोटींच्या दरम्यान आहे. त्यांपैकी सुमारे वीस लाख प्रजातींचं नामकरण लिनॅअसच्या द्विनाम पद्धतीने झालं आहे, ही त्याला आदरांजली म्हणायची.
दिगंबर गाडगीळ – response.lokprabha@expressindia.com