सूचक आणि मार्मिक भाष्य केलं जातं ते व्यंगचित्रांमध्येच! शब्दरहित चित्रातून विशिष्ट घटनेवर भाष्य करण्याची कला व्यंगचित्रकारांमध्ये अवगत असते. त्यांच्या कल्पनेतलं कार्टून कागदावर उतरवल्यानंतरच त्यांना समाधान मिळतं. ही संपूर्ण प्रक्रिया ते पुन:पुन्हा अनुभवत असतात. व्यंगचित्रकारांच्या नजरेतील कार्टून कॅरेक्टर्स आणखी वेगळ्या स्वरूपातले असतात.

31-lp-cartoonहावभाव हीदेखील भाषाच – शि. द. फडणीस

देवाने विनोदबुद्धी सगळ्यांनाच दिलेली आहे. त्याकडे कुणी दुर्लक्ष करतं, तर कुणी ती मनापासून जोपासतं. ते व्यक्तिपरत्वे बदलत जातं. व्यंगचित्र काढताना या विनोदबुद्धीचा पुरेपूर फायदा होत असतो. चित्राशी संबंधित कोणतीही कला जोपासताना एक गोष्ट खूप महत्त्वाची असते; ती म्हणजे चित्र या भाषेचा अभ्यास असायला हवा. निरीक्षणशक्ती उत्तम हवी. सभोवताली घडणाऱ्या घडामोडींचं भान आणि माहिती असावी. त्यावर व्यक्त व्हावं. विशिष्ट घडामोडींवर चित्रातून भाष्य करण्यासाठी व्यंगचित्रकाराचं त्या घटनेबाबत एखादं मत तयार झालं तर त्याला चित्र काढण्यासाठी मदत होते. जेव्हा एखादा विषय, विचार तारतम्यापासून दूर जातो त्या वेळी तिथे हास्यचित्राला जागा असते. व्यंगचित्राची भाषा समजून घेणं महत्त्वाचं असतं. एकदा ती समजली, की व्यंगचित्रं काढण्यास बरंचसं सोपं जातं. व्यंगचित्रांचं जग विस्तारत आहे. राजकीय व्यंगचित्र म्हणजेच व्यंगचित्र असा अनेकांचा गैरसमज आहे. तो दूर करायला हवा. सामाजिक, राजकीय, भौगोलिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक, शैक्षणिक अशा विविध विषयांशी संबंधित व्यंगचित्र काढता येते. कोणत्याही व्यंगचित्रातले हावभावही तितकेच महत्त्वाचे असतात. हावभाव हीदेखील एक भाषाच आहे. त्या चित्रातली घटना गमतीशीर वाटायला हवी. व्यंगचित्रकाराला नेहमी एक प्रश्न विचारला जातो की, अशा कल्पक गोष्टी सुचतात कशा; तर मला वाटतं की, आजूबाजूची माणसं, घटनाच विविध कल्पना देत असतात. एखादी व्यक्ती काही तरी वक्तव्य करून जाते; पण कदाचित नकळतपणे त्या व्यक्तीने एखादी कल्पना दिलेली असते. प्रत्येक विसंगत विचार आणि घटना हा व्यंगचित्राचा विषय असू शकतो.

33-lp-cartoonव्यंगचित्रकार ‘नाटकी’ असावा.. – प्रभाकर झळके

एखादं कार्टून कागदावर उतरवण्याआधी आम्हा व्यंगचित्रकारांच्या डोक्यात एक विशिष्ट कल्पना असते. त्या कल्पनेप्रमाणे चित्र काढायला सुरुवात होते. पहिलंच चित्र अंतिम चित्र म्हणून कधीच होत नाही. मनासारखं कार्टून येईस्तोवर एकाच कार्टूनची अनेक स्केचेस काढली जातात. त्याची मांडणी केली जाते. त्यामध्ये अमुक एखादा प्रयोग केला तर ते कसं दिसेल याचा विचार होतो. ते अंतिम झाल्यानंतर त्या चित्राकडे बघत राहावंसं वाटतं. पहिल्यांदा वडील झाल्याच्या आनंदासारखाच तो आनंद असतो. हा आनंद प्रत्येक चित्रावेळी अनुभवायला मिळतो. दुसरं महत्त्वाचं म्हणजे व्यंगचित्रकारालाच त्याचं चित्र सगळ्यात आधी आवडायला हवं. म्हणूनच मला ते आवडलंय का याचा विचार मी स्वत: आधी करतो. माझ्या कल्पनेतलं कार्टून एक आणि कागदावर दुसरं असं अनेकदा होत असतं. अशा वेळी त्या कार्टूनची मी अनेक स्केचेस काढतो. मनासारखं कागदावर उमटेपर्यंत आर्टिस्टला समाधान मिळत नाही हे खरंय. व्यंगचित्रकार नाटकी असेल तर त्याचा इथे फायदा होतो. नाटकी म्हणजे अभिनयाचं अंग असलेला, या अर्थाने नाटकी. कोणत्याही कार्टूनचे हावभाव अचूकपणे टिपण्यासाठी चित्रकाराच्या नाटकीपणाची मदत होते. कार्टूनमधल्या हावभावांमध्ये विशिष्ट लयकारी असते. ते उत्तमरीत्या रेखाटलं तर चित्रातली गंमत वाढते. हावभावांवरून मला मिकी माऊस आठवतो. त्याच्या हालचाली, हावभाव याकडे बघून आनंद वाटतो. याचं आणखी एक वैशिष्टय़ असं की, मी लहान असताना मला मिकी माऊस आवडायचा, पण आता नाही असं झालेलं नाही. मला आजही ते कार्टून तितकंच आवडतं. वयाच्या विविध टप्प्यांवर त्या कार्टूनविषयीची आवड तशीच आहे. व्यंगचित्रातून कमीत कमी शब्दांमध्ये आशय व्यक्त होतोय का, हे तपासून घेणं व्यंगचित्रकाराचं महत्त्वाचं काम असतं. मला कोणत्याही विषयावरील व्यंगचित्र काढायला आवडतं. खरं तर प्रत्येक व्यंगचित्रकाराला सगळेच विषय हाताळायला आवडत असतात. त्यांची पद्धत मात्र एकमेकांपेक्षा वेगळी असते. सामाजिक विषयांवरील व्यंगचित्रांमधून समाजप्रबोधन होण्यात मदत होत असते. एखाद्या सामाजिक विषयावर लेखन करायचं असल्यास निबंध किंवा लेख लिहिता येईल, पण कमीत कमी शब्दांमध्ये तोच संदेश पोहोचवायचा असेल तर व्यंगचित्राचा आधार घेतला जातो.

34-lp-cartoonया क्षेत्रात महिलांची संख्या वाढावी  – राधा गावडे 

कॅप्शनसह आणि कॅप्शनविरहित असे व्यंगचित्राचे दोन प्रकार असतात. मला आवडतं ते कॅप्शन नसलेले व्यंगचित्र. अशा चित्रामधलं कार्टून कॅरेक्टर बोलतं. चित्रकाराच्या मनात असलेलं चित्र रेखाटणं, त्यात विनोदनिर्मिती करणं हे सगळं केल्यानंतर ते चित्र बघणाऱ्याच्या चेहऱ्यावर हसू आलं, की तिथे व्यंगचित्रकार जिंकला असं म्हणता येईल. व्यंगचित्रकाराच्या डोक्यात विविध विषयांबाबत विचारचक्र सुरू असतं. त्यामुळे एकाच वेळी हजारो कल्पना व्यंगचित्रकाराच्या डोक्यात फिरत असतात. नवनवीन कल्पना, क्रिएटिव्हिटी यावर केवळ विचार न करता त्यावर प्रत्यक्ष काम करणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी प्रत्येक कार्टून कॅरेक्टरचा अभ्यास करणं गरजेचं आहे. व्यंगचित्रकाराला चित्रकलेचंही ज्ञान असायला हवं. चित्रात व्यंग निर्माण करण्यासाठी एखाद्या पात्राचे हात लांब केले जातात किंवा नाक मोठं केलं जातं. एखाद्या चित्रातील पात्राच्या नाकावर माशी बसली आहे हे दाखवण्यासाठी नाक मोठं केलं जातं. तिथे लक्ष वेधून घेण्यासाठी मुद्दाम तसं केलेलं असतं. हे त्यातलं व्यंग असतं. कार्टून कॅरेक्टरच्या कोणत्या भागाला केव्हा जास्त महत्त्व द्यावं हे व्यंगचित्रकाराला नेमकं कळायला हवं. चित्र बघून त्यातला विनोद कळून लोकांना हसू यायला हवं. जे कार्टून मला हसवतं ते माझ्या लेखी उत्तम कार्टून असतं. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ हे कार्टून माझं आवडीचं कार्टून आहे. कल्पनाशक्तीच्या पलीकडची क्रिएटिव्हिटी आहे. उंदीर आणि मांजर या शत्रूंना घेऊन कार्टून सीरिज तयार केली. हे सुचणंच खूप छान आहे. ‘टॉम अ‍ॅण्ड जेरी’ या विश्वाने सगळ्या वयोगटांना सामील करून घेतलं आहे. व्यंगचित्राच्या क्षेत्रात महिलांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावं असं मला वाटतं. अनेक जणी उत्तम चित्रकार म्हणून काम करताहेत, तर काही काटरून डिझायनर म्हणून कार्यरत आहेत; पण त्यांनी या क्षेत्राचाही विचार करायला हवा. अ‍ॅनिमेशन क्षेत्राप्रमाणे व्यंगचित्राच्या क्षेत्राबद्दलही माहिती पुरवली गेली तर यात सकारात्मक बदल दिसू शकतो.

35-lp-cartoonव्यंगचित्रकार सर्वश्रुत असावा – वैजनाथ दुलंगे

एखादं व्यंगचित्र काढून झाल्यानंतर मिळणाऱ्या आनंदापेक्षा ते काढून होण्याआधीचा आनंद खूप मोठा असतो. चित्रकला आणि व्यंगचित्रकला हे दोन्ही वेगवेगळी क्षेत्रं आहेत. चित्रकला ही व्यंगचित्रकलेची पहिली पायरी आहे. चित्रकलेचा प्रवास करताना मधून एक वेगळा ट्रॅक निघतो जो व्यंगचित्रकलेकडे जातो. आपल्याकडे व्यंग याचा अर्थ काही तरी वेडंवाकडं असा घेतला जातो; पण माझ्या दृष्टीने आपल्या आजूबाजूला घडणारं व्यंग जास्त महत्त्वाचं आहे. घटनेतील व्यंगाला लक्ष्य करायला हवं. अशा व्यंगाकडे बघण्याचा प्रत्येक व्यंगचित्रकाराचा दृष्टिकोन वेगळा असतो. चित्र काढताना त्याची डिझाईन, कॅरेक्टरायझेशन, ठिकाणं, व्यक्तिरेखा, देहबोली या आणि अशा अनेक घटकांचा विचार होणं आवश्यक आहे. एखाद्या नाटक-सिनेमात जसा प्रसंग असतो तसं एखादं चित्र असावं. या दोन्हीत फक्त संगीताचा फरक असतो. चित्रात संगीत नसतं, तर चित्रपट, नाटकात असतं. बाकी सगळं सारखंच असतं. व्यक्तिरेखा, संवाद, नेपथ्य, दिग्दर्शक हे घटक समान आहेत. चित्रातील दिग्दर्शक म्हणजे त्याचा व्यंगचित्रकार. कार्टून कसंही काढलं तरी चालतं, हा समज पूर्णत: चुकीचाच आहे, किंबहुना कार्टून काढण्यासाठी पुरेसा अभ्यास महत्त्वाचा असतो. मिस्कील, सूचक, उपहासात्मकरीत्या एखाद्या घटनेतील व्यंगावर भाष्य करण्यासाठी अनेक गोष्टी पडताळून पाहणं आवश्यक ठरतं. त्या घटनेवर वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त होणंही गरजेचं असतं. त्यासाठी नाक, कान, डोळे उघडे असावे. तरच काही तरी क्रिएटिव्ह करता येते. व्यंगचित्रकार हा पार्ट टाइम जॉब नाही. त्यासाठी पुरेसा वेळ द्यावाच लागतो. तसंच व्यंगचित्रकारांना विविध विषयांवरील वाचनाची आवड असावी. व्यंगचित्र काढण्याचा सराव नियमितपणे व्हायला हवा. व्यंगचित्रांमध्ये वेगवेगळे विषय हाताळता येतात. पण, मला सामान्य माणसांना भेडसावणारे प्रश्न मांडणं जास्त आवडतं. त्यामुळे सामाजिक प्रश्नांवरील व्यंगचित्र काढण्याकडे माझा कल जास्त आहे. वॉल्ट डिस्ने यांनी पूर्वीच्या काळात तयार केलेली सगळीच कार्टून्स माइलस्टोन ठरली आहेत. ती सगळीच अनेकांप्रमाणे माझ्याही आवडीची आहेत.

36-lp-cartoonनिरीक्षण महत्त्वाचं – प्रभाकर वाईरकर

एखाद्या घटनेत विरोधाभास, व्यंग सापडलं, की तिथे व्यंगचित्राचा जन्म होतो. एक उदाहरण देतो. एखादी व्यक्ती वाईट गात असते; दुसरी व्यक्ती तिच्या गायनाचं कौतुक करत असते, पण खरं तर हे कौतुक वरवरचं असतं; अशा वेळी तिथे व्यंगचित्राला वाव आहे, हे लक्षात घ्यावं. अशी घटना, प्रसंग दिसल्यावर त्यावर व्यंगचित्र काढायचं ठरलं, की त्यात नेमकं काय स्पॉटलाइटमध्ये आणायचं, मांडणी कशी करायची हे विचार सुरू होतात. त्यातलं व्यंग विरोधाभासाने दाखवायचं, की सूचक पद्धतीने हा पुढचा विचार अधोरेखित होतो. एखाद्या व्यंगचित्राबाबतच्या कल्पना डोक्यात पक्क्य़ा झाल्या की, तत्संबंधीचं विचारमंथन सुरू होतं. नवनवीन कल्पना सुचत जातात; पण सुचलेलं सगळंच प्रत्यक्षात कसं उतरवता येईल याचं नियोजन असावं. चित्रात सगळ्यात जास्त अधोरेखित काय करायचं, संवाद, देहबोली की चेहरा, हा मुद्दा पुढे येतो. ही मतं व्यंगचित्रकारांनुसार बदलत जातात. एखाद्याने डोळे मोठे करू या असं ठरवलं तर ते नेमके कसे करू या, हे चित्रकाराने ठरवायला हवं. यासाठी व्यंगचित्रकारांचं निरीक्षण उत्तम असावं. एखाद्या चित्रासाठी कार्टून कॅरेक्टर व्यंगचित्रकाराला स्वत: शोधावे लागतात. त्यातल्या व्यक्तिरेखा कशा दिसाव्यात, कशा असाव्यात, किती असाव्यात याचाही वेगळा अभ्यास व्यंगचित्रकाराला करावा लागतो. खरं तर या सगळ्या व्यक्तिरेखा आपल्या आजूबाजूलाच वावरत असतात. त्या टिपणं आर्टिस्टचं काम आहे. व्यंगचित्रकाराने केलेलं निरीक्षण प्रत्यक्ष कागदावर उमटलं, की त्याला समाधान मिळतं. तो आनंद वेगळा असतो. विचार आणि चित्रकला उत्तम असली, की निर्माण होणारं कार्टून उत्तमच असतं. त्यात सौंदर्य, आकर्षकता ठळकपणे जाणवते.
response.lokprabha@expressindia.com