ध्यानीमनी नसताना कार्टून्सच्या दुनियेत मी प्रवेश केला. या दुनियेत मी हरवूनच गेलो. इथे माझी भेट झाली ती अनेक मित्रांशी. या मैत्रीमुळे इथून बाहेर पडावंसंच वाटत नाही. कार्टून्सच्या अजब दुनियेतल्या २५ वर्षांच्या अनुभवावर टाकलेली ही नजर.

सुट्टीत आपण ट्रेनमधून सहलीला जात असलो की वाटेत अनेक स्टेशनं लागतात बघा. अमुक वाडी किंवा तमुक रोड वगरे. जी स्टेशनं ना आपण कधी पाहिलेली असतात, ना पुढे ती कधी आपल्या लक्षात राहात. पण समजा मध्येच आलेल्या अशाच एका स्टेशनावर आपण उतरलो आणि कित्येक वर्ष तिथेच राहिलो किंबहुना तिथलेच झालो तर? ते स्टेशन, ते गाव, ती दुनिया नंतर आपल्या कायमची लक्षात राहिली तर? मजा येईल? उत्तर कठीण आहे या प्रश्नाचं. हो ना? कारण ती दुनिया कशी असेल काय माहीत? पण माझं असं झालंय. खरंच. मी अभिनयाच्या सहलीवर निघालो होतो आणि वाटेत  ‘कार्टून्सची अजब दुनिया’ हे स्टेशन आलं. मला ते सॉलिड वाटलं आणि मी उतरलो. अजूनही तिथेच राहतो. मला तिथलाच म्हणून ओळखतात आताशा. खरं सांगतो, या दुनियेनी माझं संपूर्ण आयुष्य व्यापून टाकलंय. २५ र्वष झाली असतील मला इथे येऊन. पण वाटतंच नाहीये. कम्माल ना?

पण समजा मी या दुनियेत आलोच नसतो तर? बापरे असा विचारही मला करायचा नाही कारण माझे चिक्कार मित्र इथे राहतात त्यांच्यासोबत माझं आयुष्य अफलातून झालंय. विलक्षण! धम्माल करतो आम्ही आजही. खरंतर मी ५६ वर्षांचा तरुण आहे, पण यांच्यात असलो की कितीही लहान होऊ शकतो. स्टुडिओच्या आत समोरच्या पडद्यावर हे मित्र दिसले आणि मी त्यांना माझा आवाज देऊ लागलो की मी माझा उरतच नाही. त्यांचाच होऊन जातो आणि तेही पटकन माझे होतात कारण त्यांचं बोलणं, हसणं, रडणं, ओरडणं, चीत्कारणं सगळं माझंच. त्यांच्या सगळ्या हालचाली जणू माझ्याच. आम्ही खूप अवलंबून असतो एकमेकांवर. एकमेकांना सोडून नाही राहू शकणार कधीच. त्यामुळे मला इथेच राहायचंय कायमचं. या माझ्या क्रेझी मित्रांसोबत. हे लहानपण मला जपून ठेवायचंय. अजिबात सतत मोठय़ा माणसासारखं वागायचं आणि जगायचं नाहीये आणि ते फक्त यांच्यासोबत राहिलो तरच शक्य आहे. आणि माझं अजून एक सिक्रेट सांगू? कार्टून नेव्हर डाइज.. जोपर्यंत आपली मत्री आहे ना तोपर्यंत माझा आवाज राहीलच.

तर इथे मला पहिला मित्र भेटला तो बघिरा. ‘जंगल बुक’ सिरिअलमधला. काळा पँथर. मोगलीचा खास दोस्त. कायम त्याच्या सोबत आणि त्याचा संरक्षक असणारा, प्रसंगी तितकाच सडेतोड बोलून मोगलीचे कान उपटणारा, बलुशी लहान मुलासारखा भांडणारा पण शेरखानलाही झुंज देण्याची ताकद असणारा. खरी दोस्ती म्हणजे काय आणि ती कशी निभावायची हे आणि प्रेम आंधळं असेल कदाचित, पण दोस्ती कधीच आंधळी नसावी हे बघिराने मला शिकवलं. लीला आणि राधा प्रकरणांमध्ये तो मोगलीला समजावतो की तू एक माणूस आहेस आणि शेवटी तुला माणसांमध्येच जावं लागणार; हा प्रसंग मी कधीच विसरू शकणार नाही, कारण मोगलीच्या बाबतीत तो पझेसिव्ह जरूर आहे, पण आपल्या मित्राचं निसर्गसंमत अंतिम सुख कशात आहे हेही त्याला बरोब्बर समजतं.

नंतर भेटला पुम्बा. ‘टिमॉन अँड पुम्बा’. आठवला? येस्स.. हकूना मटाटा, इट मीन्स नो वरीज म्हणणारा? डुकरासारखा दिसणारा शेंदरी रंगाचा, दोन सुळे असणारा. वॉर्थडॉग.. येस्स येस्स. तोच तो. कित्ती गोड मित्र ना? टिमॉन प्रचंड उचापत्या आणि बनेल. पण हा त्याचा मित्र एकदम भोळाभाबडा. टिमॉनला सतत असं वाटत की देवाने सगळी अक्कल आपल्यालाच दिलेली आहे आणि म्हणून तो सतत चुका करतो आणि हा माझा मित्र बिच्चारा कायम त्याची बाजू सावरत राहतो. मला तर कधी कधी सॉलिड राग येतो त्याचा. नाहीतर काय! इतका बावळटपणाही बरा नाही. पण पुम्बाची हीच मत्री करण्याची स्टाइल आहे यार. स्वीट बडी! ‘टिमॉन तुम मेरे खासम् खास दोस्त हो’ हा त्याचा डायलॉग आठवला? पुम्बाला किडे खाण्याची प्रचंड आवड आणि घोरत पडायचं लगेच. मग सतत गॅसेस होतात याला आणि पादत राहतो. पण लगेच खालच्या आवाजात ‘सॉरी’ म्हणतो. निर्मळ मनाचा सच्चा दोस्त. हाही टिमॉनचे कान उपटतो पण पद्धत अतिशय गोड. याच्याही अंगात ताकत खूप आहे, पण भांडणं करण्याचा मुळात स्वभाव नाही. खरंतर ही लायन किंगमधली जोडी पण नंतर यांच्यावर खास सिरीज बनली १०४ भागांची. इतक्या वरच्या आणि खरखरीत स्वरात हा बोलतो कीसुरुवाती-सुरुवातीला मला चार वाक्यं बोललो की थांबायला लागायचं थोडा वेळ, पण नंतर नंतर इतकी दोस्ती झाली की मघाशी म्हटलं तसं तो माझा आणि मी त्याचा झालो. आता ही दोस्ती तुटायची नाय. पुम्बाने आयुष्यात मला खूप काही शिकवलंय. निर्मळ, निरपेक्ष आणि सच्ची दोस्ती म्हणजे काय आणि ती कोणाशी करावी, हे मी त्याच्याकडूनच शिकलो. एकदा मित्र मानलं एखाद्याला की त्याची साथ सोडायची नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हकूना मटाटा. इट मीन्स नो वरीज. किंवा िहदीत सांगायचं झालं तर ‘हर फिक्र को धुए मे उडाता’ किंवा ‘टेन्शन नाय लेनेका’. सध्या त्यांच्यावर एक महत्त्वाची जबाबदारी दिली आहे. मुलांना सुरक्षित कसं राहायचं ते शिकवतायत. स्मार्ट  झालेत दोघं. अर्थात तिथेही टिमॉन अतिशहाणपणा करतोच आणि बिचाऱ्या पुम्बाला सगळं निस्तरावं लागतं. पण भेटत राहतो आम्ही त्या निमित्ताने. आणि पुम्बाला भेटण्यासारखी मज्जा नाही.

25-lp-cartoon

आणखीन एक वल्ली मला इथे भेटली. इयोर. आठवला? विनी द पुह मधला गाढव? काय कॅरेक्टर आहे यार. इतका मंद मित्र आहे हा माझा. बिचाऱ्याचं स्वत:चं घर बांधतानाही सतत ते पडत असतं. कधीकधी तर हा झोपलेला असताना याच्याच अंगावर पडतं मग पुन्हा बिच्चारा बांधतो. याला हवं तसं जगता नाही येत. मनातलं नीट बोलता येत नाही. त्यात एक विनी सोडला तर बाकी टिगर, रॅबीट, पिग्लेट सगळेच एक सो एक. प्रत्येकाच्या खोपडय़ा अजब. त्या कोणाच्याच खिजगणतीत हा येडबंबू इयोर कधी नसतोच. हेच माझ्या या मित्राचं दुख: आहे यार. नेहमी बिचारा म्हणत असतो. ‘मुझे कोई नहीं बुलाता’ बरं स्वर इतका खालचा खर्जातला असतो की कोणाला ऐकू आला तर शपथ. पण मनाने अतिशय चांगला. वरून जितका कुरूप तितका आतून सुंदर. आणि हे विनीला पक्कं माहीत आहे. म्हणून बाकी कोणीही इयोरबद्दल कितीही काहीही बोललं तरी विनीला तो त्यांच्या गँगमध्ये लागतोच. बरं हा गातोही. मला त्याच्यासाठी गायला खूप मजा येते. त्याच्या खर्जातल्या आवाजात एक वेगळीच गम्मत आहे. हा कधी कधी गँगमधल्या बाकीच्या कोणालाही जमणार नाही असं काहीतरी करून दाखवतो. विनीच्या एका वाढदिवसाला सगळे दोस्त काही ना काही गिफ्ट देतात, पण याला काहीच आणता येत नाही. सगळे हिणवतात बिचाऱ्याला पण शेवटी तो सगळ्यांना घेऊन डोंगराच्या कडय़ावर जातो आणि प्रचंड विलोभनीय असं उल्कापाताचं दृश्य दाखवतो आणि म्हणतो हेच माझं तुला गिफ्ट विनी. असं गिफ्ट जे कोणीच त्याला आजपर्यंत दिलेलं नव्हतं. असा हा माझा दोस्त इयोर. एक मात्र सांगतो की जवळपास याच्यासारखाच आवाज मला माझ्या आणखी एका मित्राला द्यावा लागला होता आणि तो म्हणजे अ‍ॅडम्स फॅमिलीमधला लर्च. आठवला?.  अ‍ॅडम्स फॅमिलीमधे नोकरासारखा वावरणारा लर्च? सूट बूट घातलेला. उंच माणूस. हा . तोच.

कार्टून दोस्त गातातही सॉलिड बरं का. मी आपल्या कॅप्टन क्रॅबला आवाज देत होतो तर यांनी त्या स्पोन्जबोब स्क्वेअर पँट्सचं टायटल साँगच गायलं.

समुंदर के अंदर
पायनापल का घर.
नीला और पिला
और है खड्डेदर.
करता है मनमानी
ढेरसारी शैतानी.
करे नाक मे दम
जो उसने ठानी.

मग मला ते गावच लागलं यार. एक तर याचा आवाज किती खरखरीत त्यात गायचं. पण काय करणार दोस्त म्हटल्यावर करावंच लागलं. मला कधी कधी हा अजिबात आवडायचा नाही. कारण सतत आपला पशाच्या मागे. क्रॅबीपॅटीचा याचा धंदा सॉलिड जोरात तरीही पशांचा भयंकर लोभी. स्पोन्जबोबला खूप त्रास देतो हा. मालक असतो ना तो हॉटेलचा आणि स्पोन्जबोब त्याच्याकडे नोकरीला, त्यामुळे त्याचाही इलाज नाही. पण आतून हा क्रॅब त्याच्यावर खूप प्रेम करत असतो. खरं सांगतो हे माझे कार्टून दोस्त तसे वरवर व्हिलन दिसतात. पण माणसांच्या फिल्म्समध्ये असतात त्यापेक्षा खूप मवाळ आणि आतून चांगले असतात. खूप कमी त्रास देतात हिरोला.

आता माझा मित्र मोजोजोजो घ्या ना. पॉवरपफ गर्ल्समधला. किती खुंखार आणि भयानक वाटतो. त्याचा आवाजही किती घोगरा आणि खरखरीत काढावा लागला मला. पण तो पॉवर पफ गर्ल्सचा भाऊच आहे. मनातून त्यांच्यावर जळणारा पण कधीच जिंकू न शकलेला. प्रोफेसरनी केमिकल एक्सचा जरा घोळ केला नसता तर हाही चांगलाच झाला असता. तसा मिकी माउस क्लब हाउसमधला पीट. पूर्वी खूप भयानक वाटायचा, पण आताशा खूप सुधारलाय. मिकीही त्याची मदत घेतो अधूनमधून. अहो आपला डॉक्टर ड्रेकन घ्या ना. किम पॉसीबल मधला. मला नाकातून बोलावं लागतं याच्यासाठी. कित्ती बावळट आहे हा. शिगोसारखी हुशार मदतनीस असूनसुद्धा याच्या मूर्खपणामुळे हरतो कायम. फाइंिडग निमोमधला शार्क. ब्रूस मात्र जरा जास्तच वाईट वागला निमोशी. मान्य आहे. पण काही काही असतात हो असेही मित्र. आपण सांभाळून घ्यायचं. दोस्ती में सब चलता है यार!

माझ्या या कार्टून दोस्तांच्या अजब दुनियेत मी खूप रमतो. फ्रेड फ्लिनस्टोन्स, रॉक्को मधला हेफ्फर, कॅट डॉगमधला डॉग, गला गला मधला बिन्या बिन्या पोलीवाग, स्टार वोर्समधले योडा, काऊन्ट डुकू, झेब, हाउ टू ट्रेन युवर ड्रेगनमधला बुभ, किंग आर्थर, सिंड्रेलामधला राजपुत्राचा बाप, ब्रेव्हमधला किंग, टूनपूर का सुपर हिरोमधला विलन, सुपरमॅनमधला आल्फ्रेड, हॉन्गकोंग फुईमधला डॉक्टर आय क्यू हाय, रॅटॉटुइलमधला शेफ, बोन्कर्समधला लकी पिकेल, बेअर इन द बिग ब्लू हाउसमधला बेअर. अहो किती मित्रांची नाव सांगू? अजून खूप आहेत. हा अख्खा कार्टून डे त्यांची नावं घेण्यातच जाईल. मला सांगा इतके सगळे विविधरंगी आणि विविधढंगी मित्र असल्यावर मला ही अजब दुनिया कशी सोडता येईल. माझं आजपर्यंतच आयुष्य त्यांच्यासोबतच गेलंय आणि उरलेलं सगळं आयुष्य मी त्यांच्या सोबतच घालवीन. अगदी आत्ता आलेला कुंग फु पांडामधला जनरल काय आणि येऊ घातलेला अँग्री बर्डस्मधला पिग हे नवे मित्रही मला बघीराइतकेच प्रिय आहेत. ते मला वेगळ्याच अजब दुनियेत घेऊन जातात, त्यांच्या गोष्टी सांगतात, त्या ऐकता ऐकता माझं स्वत:चं आयुष्य तिथेच थांबतं. मी त्या काळात वयाने मोठा होतच नाही. उलट जितक्या दोस्तांना आवाज देतो तितका रोज लहान लहान होत जातो. खरा होत जातो.

आजही मी स्टुडिओच्या दारात जातो. चप्पल आणि चिंता बाहेर काढून ठेवतो, आत शिरतो. आत एक नवा कार्टून दोस्त माझी वाटच पाहात बसलेला असतो. तो इंग्लिश भाषेतला त्याचा आवाज मला ऐकवतो आणि म्हणतो, ‘बोल बघू हेच िहदीत’; मग मी प्रयत्न करतो. त्याच्यासारखा होण्याचा अंतर्बाह्य़. बरं तिथे त्याच्या आणि माझ्याशिवाय कोणीच नसतं. त्यामुळे आम्ही दोघंही एकमेकांचे होतो. आणि एकदा तसे झालो की तो माझ्याशिवाय आणि मी त्याच्याशिवाय अस्तित्वातच असू शकत नाही. कारण तो माझ्या तोंडातून त्याची भाषा बोलू लागतो अखंड. आणि मी त्याला चाचपडतो, अंजारतो, गोंजारतो. त्याला खूप जवळ घेतो. आणि मग आम्ही एकमेकांना वचन देतो. कधीच सोडून न जाण्याचं!
उदय सबनीस – response.lokprabha@expressindia.com