20-lp-chandrakant-kukarniकाही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारणत: २० वर्षांपूर्वी मी ‘वाडा चिरेबंदी’, ‘मग्न तळ्याकाठी’ आणि ‘युगांत’ ही ट्रायोलॉजी केली होती. भाग एक, भाग दोन, भाग तीन असं सलग साडेआठ तासांचं नाटक तेव्हा रंगमंचावर पहिल्यांदा झालं. महेश एलकुंचवारांनी यामध्ये अशी गंमत केली आहे की, ‘वाडा’ जर ८०-८५ सालात घडत असेल तर दहा वर्षांनंतर त्या ठिकाणी काय बदल झाले हे त्यांनी ‘मग्न तळ्याकाठी’ या नाटकात मांडलं आहे.

मी नेहमीच म्हणतो की हे नाटक माझ्यासाठी फार महत्त्वाचं आहे. प्रत्येक कलाकाराने, दिग्दर्शकाने, तंत्रज्ञाने करून पाहावं असं नाटक आहे. भले ते तुम्ही व्यावसायिक करा, प्रायोगिक करा किंवा नाटय़शास्त्राचा अभ्यासक्रम असणाऱ्या विद्यापीठांनी किंवा संस्थेने करा; पण जरूर करावं, असं हे नाटक आहे. या नाटकातल्या ज्या ‘संकल्पना’ आहेत, ज्या पद्धतीने ते बांधलंय, रचलंय. त्यामध्ये जी मांडणी आहे ती नाटय़शास्त्र शिकणाऱ्या आणि बघणाऱ्यालाही बरेच काही शिकवते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे या नाटकात विदर्भातला माणूस दाखवला असला तरी कोकणातल्या, खान्देशातल्या, मराठवाडय़ातल्या लोकांनाही ते त्याचंच नाटक वाटतं. कारण ते अख्ख्या महाराष्ट्राचंच नाटक आहे. हे नाटक आपल्याकडचं खेडं आणि शहर, एकत्र कुटुंब पद्धतीतून विघटन कसं होत गेलं, त्याचबरोबर बदलत जाणारा बाजूचा समाज, रूढी, परंपरांचं ओझं न झेपणं, पण तरी ते पाळणं, जातीयता, रीतीरिवाज आणि ते न झेपणं मग आधुनिक युगात जगताना त्याची होणारी घुसमट असं बरंच काही या नाटकात आहे.

पहिल्या भागामध्ये सूत्र होतं की, वडील गेल्यामुळे शहरातला मुलगा गावात येतो आणि नाटक सुरू होतं. पुढे १२-१३ दिवसांमध्ये ते नाटक घडतं. पहिल्या भागात एक संवाद आहे; ‘बाकी काही असो, पण मरणाला आणि तोरणाला तरी एकत्र आलं पाहिजे’. म्हणूनच की काय, दुसऱ्या भागात आता मंडळी लग्नाला एकत्र आली आहेत. ‘मग्न तळ्याकाठी’मध्ये नवीन तीन-चार पात्रं आहेत. भवताल, खेडं, सारंच बदलंय. मग त्यांच्यामधल्या संबंधांचं काय झालं ते सांगणारी ही मांडणी आहे. मी नेहमी सांगतो की, या नाटकाला कथेतली वळणं आहेत, कादंबरीचा आवाका आहे, कवितेची तरलता आहे आणि नाटकाचे अवकाश आहे. हे नाटक करायला फार आव्हानात्मक आहे. कंदिलाच्या प्रकाशात हे नाटक घडतं तर आता घरात टय़ुबलाइट आली आहे. गाव बदललं, शहर बदललं, राजकीय-सामाजिक परिस्थिती बदलली. पण माणसं तीच आहेत, वयाने वाढलेली. एखाद्या नाटकात नाटककार एखाद्या घराविषयी लिहितो किंवा त्यातल्या साताठ पात्रांविषयी लिहितो तेव्हा तो फक्त त्यांच्याबद्दलच लिहीत नसतो, तर भवतालाबद्दलही लिहीत असतो. रचनेमध्ये, आशयामध्ये आणि आकृतीबंधामध्ये आदर्श असं हे नाटक आहे. तेव्हा हे मी आविष्कार संस्थेकडून प्रायोगिकवर केलं होतं. प्रायोगिक रंगभूमीवर इतकी र्वष उत्तम काम झालं असेल आणि  त्यामुळेच प्रेक्षकांची अभिरुची आज वाढली असेल; तर ते आता मुख्य धारेत का सादर होऊ नये. कारण प्रायोगिकचीच सर्व मंडळी हळूहळू मुख्य प्रवाहामध्ये आली. त्यामुळे व्यावसायिक रंगभूमीवर वेगवेगळ्या आशयाची नाटकंही आली.

आज आपण टेलिव्हिजनवाल्यांना फक्त शिव्या घालतो, अभिरुचीहीन चाललंय, त्यामुळे लोकांचा बुद्धय़ांक वाढत नाही असं म्हणतो. तर मग उत्तम अभिरुचीसंपन्न नाटक का सादर करू नये? या नाटकाचं बऱ्याच भारतीय भाषांसहित फ्रेंचमध्येही रूपांतर झालं, अशा वेळेला हे नाटक करायला हवं; पण हे नाटक करणं धाडस आहे. कारण हे मनोरंजनप्रधान नाटक नाही. करमणुकीचं तर नव्हेच नव्हे. पण दुसरी गोष्ट अशी की, एक मोठा नटवर्ग आहे जो बुद्धिमान आहे. फक्त अर्थार्जनासाठी आणि करिअरसाठी त्यांनी टेलिव्हिजन माध्यम निवडलंय. ते उत्तम ताकदीचे नट आहेत. पण प्रत्येकाची खंत आहे, की मला चागलं नाटक करायचं आहे. मग अशा काही कलाकारांना मी एकत्र बोलावलं आणि सांगितलं की, एक वर्षभराची कमिटमेंट आपण अशी करू की, वीकेंड थिएटर सादर करू. शनिवार-रविवार आपण हे नाटक करायचं. त्यामुळे आपण तुम्हाला अन्य कामं करायला सोमवार ते शुक्रवार कालावधी मिळू शकेल. वर्षभर आपण हे करुन पाहू. त्याचं आणि एलकुंचवारांच्या ७५ व्या वाढदिवसाचं निमित्त झालं. मला ‘लोकसत्ता’मधूनच फोन आला. तुम्ही त्यांच्या नाटकाची ट्रायोलॉजी केली आहे तर तुम्ही त्यांच्याविषयी काहीतरी लिहा. त्या वेळी ‘वाडा’च्या प्रक्रियेबद्दल लिहिताना मला उलगडलं की हे पुन्हा करायलाच हवं. त्यांचा ऑक्टोबरमध्ये वाढदिवस झाला आणि मी नोव्हेंबरमध्ये नाटक रंगमंचावर आणलं. गमतीचा भाग असा आहे की, सध्याच्या घडीला विनोदीच चालतं, असं म्हटलं जातं, पण या नाटकाने यशाचा एक विक्रम प्रस्थापित केला. शिवाय कलाकारांनी वेळ देणं, शिस्तबद्ध तालीम करणं, वर्षभर कमिटमेंट पाळणं, प्रेक्षकांनी ते उचलून धरलं, नव्या पिढीचे प्रेक्षक हे नाटक बघायला आले. नाटकाला पुरस्कार आणि प्रतिष्ठा मिळाली. पुण्याच्या बालगंधर्व नाटय़गृहात एकदा कर्टन कॉल घेताना प्रेक्षकांमधून विचारणा झाली की आता तुम्ही ‘मग्न तळ्याकाठी’ कधी करणार, आम्हाला ते बघायचं आहे. त्याचवेळी हा दुसरा भाग करायचंय हे ठरलं.

नटांनाही त्याचं अप्रूप वाटलं. आता खरं सागू का, हे नाटक आता फक्त माझं किंवा एलकुंचवारांचं राहिलं नाही. हे नाटक आता ते करणाऱ्या नटांचं आणि प्रेक्षकांचं झालंय. तसं तर गेली २० र्व्ष मी ते माझ्या मनात ठेवलं आहेच. कारण ते माझं फार जवळचं, लाडकं नाटक आहे. या नाटकाने मला समाधान मिळालं. माझ्या नावावर सलग साडेआठ तास नाटक करण्याचा विक्रमही झाला. प्रदीप मुळ्येसारखा नेपथ्यकार मिळाला, आनंद मोडकसारखे संगीतकार मिळाले, ताकदीचे नट, ‘आविष्कार’सारखी संस्था मिळाली. विजय तेंडुलकरांनी मला सांगितलं होतं, तुला वाटतंय ना करायचं, तर नफ्या-तोटय़ाचा विचार न करता ते ‘आविष्कार’तर्फे कर. एवढी मोठी संधी मिळाल्यावर मी १०० दिवसांची तालीम आणि सलग साडेआठ तासांच्या नाटकाचे तेव्हा सलग ३७ प्रयोग करू शकलो. आणि आता तर ‘वाडा’चे नव्याने व्यावसायिक रंगभूमीवर १३२ प्रयोग झाले. आता ‘मग्न तळ्याकाठी’ या दुसऱ्या भागाची प्रक्रिया सुरू आहे. येत्या १४ मे रोजी हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. याचा मला खूप आनंद आहे आणि मी एक कनेक्टिव्हिटी म्हणून या नाटकाकडे बघतो. लोकांनी आम्हाला दुसरा भाग बघायचाय हे सांगणं फार मोठं आहे. नटांनाही असं वाटलं की, या नाटकाने आम्हाला बरंच काही दिलं आहे. आम्हाला पैसे, प्रसिद्धी मिळतेच, पण आम्हाला या नाटकाने एक नट म्हणून समाधान दिलं. ते लेखक, मी, संस्था यांच्याबद्दल आनंदी आहे. ते आता ‘वाडय़ा’तले सदस्यच झाले आणि ते म्हणाले की आता आपण भाग दोन करूया. मी परत नव्याने विचार केला. एलकुंचवारांशी बोललो. भरपूर चर्चा केली. त्यांनी आजच्या काळात ते करताना त्यामध्ये काही बदल केले. आम्ही नवीन रंगावृत्ती केली. काही संकलन केलं. सगळं करून हे नाटक रंगमंचावर येत आहे. विशेषत: वैभव मांगले, प्रसाद ओक, निवेदिता सराफ, भारती पाटील, नेहा जोशी, प्रतिमा जोशी, पौर्णिमा मनोहर आणि साऱ्या टीमचे आभार मानायचे आहेत. त्यांनी दीड र्वष मला सरेंडर केलं आणि मीही त्यांना चांगलं देऊ शकलो. ते दिलेला शब्द पाळतायत. ते शूटिंग करत असले तरी या नाटकासाठी आवर्जून वेळ काढतायत. अन्य कामांचा विचार करता त्यांच्यासाठी या नाटकातून जास्त मानधन मिळत नसेलही, पण नटासाठी समाधानच महत्त्वाचं असतं ना!

या क्षेत्रातली गंमत तीच आहे की तुम्हाला परफॉर्मन्स् करून मजा आली पाहिजे. तेंडुलकर नेहमी म्हणायचे की, नाटक, गोष्ट, कथा, कादंबरी कुठली चांगली? जी तुमच्या आयुष्याची समजूत वाढवते. ते बघण्यापूर्वीचे आपण आणि बघण्यानंतरचे आपण याच्यामध्ये थोडा जरी फरक झाला तर ते आपण जिंकलं. तसं या नाटकात झालं, याचा मला आनंद आहे. या नाटकामुळे फक्त विनोदीच नाटक चालतं, लोकांना गंभीर गोष्टी चालत नाहीत, लोकांना फक्त नाच-गाण्यांचे इव्हेंट करायला, पाहायला आवडतात या अंधश्रद्धा दूर झाल्या. निर्माते दिलीप जाधव आणि श्रीपाद पद्माकर यांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने पहिल्या भागाचे प्रयोग केले आणि प्रेक्षकांनी दिलासा दिला. त्या जोरावर आता मी ‘मग्न तळ्याकाठी’ करतोय. हे नाटक कालातीत आहे, आताच्या घडीलाही त्याला समकालीन मूल्यं आहेत. जेव्हा ‘मग्न तळ्याकाठी’ बघाल तेव्हा तुम्हाला वाटेल, याला का वीस वर्षांपूर्वीचं म्हणायचं? हे तर आत्ताच्या घडीलासुद्धा लागू होतं. लेखक जेव्हा काळाच्या पुढचं लिहितो तेव्हा ते महत्त्वाचं असतं. ते परिमाण या नाटकाला आहे. हे करताना मला फार ओथंबून समाधान मिळतंय आणि आता ‘मग्न तळ्याकाठी’ घेऊन मी पुन्हा एकदा १४ मे रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
चंद्रकांत कुलकर्णी – response.lokprabha@expressindia.com