05 July 2020

News Flash

निमित्त : चतुरंग रंगसंमेलन चौपदरी रौप्यसोहळा

चतुरंगचं रंगसंमेलन म्हणजे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त व्यक्तीला दिलेली उत्सवी मानवंदना!

16-lp-chaturangचतुरंग जीवनगौरव पुरस्काराचे यंदाचे मानकरी आहेत, पारधी समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभुणे. त्याबरोबरच चतुरंग रंगसंमेलनाचं यंदाचं २५ वं र्वष. त्यानिमित्त मुंबई, डोंबिवली, चिपळूण आणि गोवा अशा चार ठिकाणी रंगसंमेलन पार पडलं. त्यानिमित्त चतुरंग परंपरेचा धावता आढावा-

सव्वा-दीड वर्षांपूर्वी चतुरंग संस्थेची चाळिशी मुंबई, चिपळूण, डोंबिवली आणि गोवा या चारही केंद्रांवर वैविध्यपूर्ण कार्यक्रमांनिशी थाटामाटात साजरी झाली. हे चारही सोहळे म्हणजे एखाद्या मातेच्या चारही लेकरांनी त्या मातेचा कृतज्ञता-सोहळा करावा, असंच काहीसं वातावरण होतं. त्यापाठोपाठ चतुरंग रंगसंमेलनाच्या पंचविशीचे वेध सुरू झाले. रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनसुद्धा चारही केंद्रांमधून करण्याची कल्पना पुढे आली आणि सगळ्याच ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी उचलून धरली. रौप्यमहोत्सवी रंगसंमेलन चार ठिकाणी, चार भागांत साजरं करायचं असं पक्कं झालं!!

चतुरंगचं रंगसंमेलन म्हणजे जीवनगौरव पुरस्कारप्राप्त व्यक्तीला दिलेली उत्सवी मानवंदना! सांस्कृतिक-सामाजिक-शैक्षणिक अशा क्षेत्रांसाठी वैकल्पिक रीतीने प्रतिवर्षी हा पुरस्कार दिला जातो. यंदाचा पुरस्कार सामाजिक क्षेत्रासाठी होता. पारधी समाजाच्या उत्थानासाठी जीवन वेचणाऱ्या गिरीश प्रभुणे यांच्या नावावर जीवनगौरव पुरस्काराच्या निवड समितीने मोहोर उमटवली. पहिल्या भागाच्या शुभारंभी सोहळ्यासाठी मुंबईचे ‘गेट वे ऑफ इंडिया’ ही जागा ठरली. पर्यटकांनी गजबजलेल्या या परिसरात रंगसंमेलनासारखा सोहळा साकार करणं हे चतुरंगसाठी एक आव्हानच होतं. याकामी महाराष्ट्र राज्य शासनाच्या पुरातत्त्व विभाग आणि सांस्कृतिक संचालनालयातील सर्वच मंडळींचे आत्मीयतेचे सहकार्य लाभले.

पंचविसाव्या रंगसंमेलन सजावटीचं एक सामायिक वैशिष्टय़ म्हणून चारही प्रेक्षागृही २४ रंगसंमेलनांच्या २४ रंगीबेरंगी गुढय़ा उभारल्या होत्या आणि प्रत्येक ठिकाणी २५व्या रंगसंमेलनाची गुढी प्रेक्षकांतून मिरवत-मिरवत नेऊन रंगमंचावर दिमाखात उभी करण्यात आली. ‘गेटवे’ला ही गुढी जगप्रसिद्ध बासरीवादक पं. रोणू मुझुमदार यांच्या हस्ते रोवली गेली. प्रत्येक ठिकाणी मोठय़ा पडद्यावर दाखविली गेलेली गेल्या चोवीस वर्षांच्या जीवनगौरव पुरस्कार सोहळ्यांची चित्रफीत, केवळ कलाकार आणि चतुरंग कार्यकत्रे यांनाच नव्हे तर उपस्थित तमाम प्रेक्षक-श्रोत्यांना गतस्मृतींनी हलवून गेली. गेली चाळीस वष्रे चतुरंगची वाटचाल जवळून पाहणारे प्रेक्षक, हितचिंतक सद्गदित झालेले दिसले. प्रत्येक चतुरंगी कार्यकर्त्यांचा ऊर अभिमानाने भरून यावा असे ते क्षण होते.

‘चतुरंग’ संस्थेविषयी आणि जीवनगौरव पुरस्कार निवड समितीच्या कार्यपद्धतीविषयी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ, उद्योजक दीपक घैसास म्हणाले की निवड समितीचा निर्णय ‘चतुरंग’कडून शिरोधार्य मानला जात असल्यामुळे नतिक जबाबदारी वाढते. निवड समितीचा एक घटक या नात्याने मला अभ्यासाची संधी मिळाली. माझ्या ज्ञानात भरच पडली याबद्दल ‘चतुरंग’चा मी आभारी आहे.

गिरीश प्रभुणे यांच्या कार्याविषयी प्रा. डॉ. वीणा देव म्हणाल्या की संघाचे पूर्णवेळ कार्यकत्रे म्हणून काम करताना गिरीश प्रभुणे यांच्यातला डोळस कार्यकर्ता समाजातील उपेक्षित, अन्यायग्रस्त, व्यसनाधीन, दरिद्री, वंचित घटकांच्या दुखाशी समरस होत गेला. पारधी, लमाण, वैदू इत्यादी अठरापगड जातींच्या परंपरा, चालीरीती, व्यवसाय यांचा अभ्यास करून त्यांच्यातलेच एक होऊन गिरीश प्रभुणे यांनी त्यांचे ‘प्रथमवसन’ केले. लौकिक शिक्षणाबरोबरच कारागिरी, कौशल्ये विकसित करून त्यांना भाषा, विज्ञान, शास्त्र, तंत्रशिक्षण शिकवण्याचा विडा त्यांनी उचलला. तमाशातील महिलांना शिक्षण, आरोग्य याविषयी सतर्क केले. फासेपारधी महिलांचे पुनर्वसन, भटक्या विमुक्त मुलींसाठी वसतिगृह अशी अनेक कामे हातात घेऊन वंचितांचे संसार उभे करण्यासाठी ते झोळी घेऊन वणवण िहडले. त्यासाठी स्वत:च्या संसाराची जबाबदारी शिक्षिकेची नोकरी करणाऱ्या पत्नीवर सोपवली. त्यांचे हे काम पाहता, त्यांच्या जीवनगौरव प्रसंगी -‘सत्य, सुंदर, मंगलाची नित्य आराधना’ हे व्यासपीठावर रेखलेले मंचवाक्य किती समर्पक होते याची प्रचीती समस्तांना आली.

जीवनगौरव पुरस्काराची उत्सुकता वाढवत नेण्याचं कसब ‘चतुरंग’नं छानपकी आत्मसात केलंय. निवेदक प्रदीप भिडे यांनी घनगंभीर खर्जात पुरस्कार प्रदानाची घोषणा केली. ‘चतुरंग’च्या कार्यकर्त्यांनी प्रकाशाच्या झोतात प्रेक्षकांतून सन्मानचिन्ह मिरवीत रंगमंचाकडे नेलं. मानपत्र, सन्मानचिन्ह आणि तीन लाख रुपयांचा धनादेश देऊन (निवृत्त) न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर यांच्या हस्ते गिरीश प्रभुणे यांचा गौरव झाला. पाश्र्वसंगीताच्या ओळी कान-मन-डोळ्यांतून हृदयात शिरल्या.

ज्योतसे ज्योत जगाते चलो,

प्रेम की गंगा बहाते चलो ।

राह में आए जो दीन दुखी,

सबको गलेसे लगाते चलो॥

त्याच वेळी व्यासपीठावर गिरीश प्रभुणे यांच्या जीवनसाथी अरुंधती प्रभुणे यांचा शुभदा जोशी यांच्या हस्ते सन्मान झाला. दरवर्षी ‘चतुरंग प्रतिष्ठान’तर्फे संग्राह्य़ अशी दैनंदिनीयुक्त स्मरणिका प्रकाशित होत असते. या वर्षी ‘चतुरंग’ने महाराष्ट्र आणि गोव्यामधून पंचवीस ‘एकल जनसेवक’ निवडून त्यांचा चारही रंगसंमेलनांमध्ये सन्मान करावा असं ठरवलं होतं. या पंचवीस ‘एकल-जनसेवकां’च्या कार्याची ओळख करून देणारे ‘व्रतस्थ’ नावाचे पुस्तक ज्येष्ठ संपादक निशिकांत जोशी यांच्या हस्ते प्रकाशित करण्यात आले. हे सुंदर पुस्तक स्मरणिकेसोबत विनामूल्य भेट देण्यात आले.

सत्कारानंतर मनोगत व्यक्त करताना गिरीश प्रभुणे यांनी अध्रे आयुष्य, जगण्याची कला शिकण्यात गेले आणि नुकतीच कामाला सुरुवात झाल्या झाल्याच एवढा मोठा जीवनगौरव वगरे होत असल्याबद्दल संकोच वाटतो, अजूनही मी स्वत:ला इतका मोठा मानत नाही असे नम्रपणे नमूद केले. संघाच्या शाखेतून, वाचनातून, पूर्वसुरींकडून प्रेरणा घेऊन माझ्या हातून जे काही कार्य घडले ते, महासागरातून ओंजळसुद्धा न भरण्याइतके लहान आहे असे ते म्हणाले. उपेक्षित समाजाची कौशल्ये, कारागिरी, पारंपरिक कला टिकवल्या पाहिजेत. त्यांचे कौतुक करून, सन्मान करून त्यांना जास्तीत जास्त वाव दिला पाहिजे. त्यांना मुख्य प्रवाहात आणले पाहिजे तरच भारत वैभवसंपन्न बनेल. ‘गेटवे’च्या दरवाजाचं दगडी कोरीव काम हे एका वडार जमातीतील स्रीचं कौशल्य आहे हे त्यांनी आवर्जून सांगितले.

नरेंद्र चपळगावकर यांनी गिरीश प्रभुणे यांच्या कार्याचा सविस्तर आढावा घेतला. गावकुसाबाहेरचे, कुठेही नोंद नसलेले, राजकीय महत्त्व नसलेले, त्यामुळेच सरकारचे लक्षही नसलेले भिल्ल, लमाण, वारळी, पारधी या समाजांना स्थर्य, स्वाभिमान, स्वत:ची ओळख देण्याचं काम गिरीश प्रभुणे यांनी केलं. त्यांचा सन्मान पाहण्यासाठी त्यांच्या ‘समरसता गुरुकुलम्’ आश्रमशाळेची चाळीस मुले उपस्थित होती याचा उल्लेख करून न्या. चपळगावकर म्हणाले की, गिरीश प्रभुणे यांनी माणसाचं आयुष्य फुलविणारा कायमस्वरूपी प्रकाश या समाजाला दिलाय, ज्यामुळे हा समाज सन्मानाचं जीवन जगू शकेल.

17-lp-chaturangहा सोहळा ‘गेटवे’ येथे होत असल्यामुळे, तो वेळेच्या काटेकोर बंधनात बसवावा लागला. चिपळूण, डोंबिवली, गोवा इथे झालेल्या कार्यक्रमातील चित्रफितीमध्ये ‘गेटवे’चा पंचविसावा जीवनगौरव पुरस्कार प्रदान सोहळा समाविष्ट करण्यात आला होता. त्यामुळे या तिन्ही ठिकाणच्या प्रेक्षकांना गेटवेच्या कार्यक्रमाचा आस्वाद घेता आला.

रौप्यमहोत्सवी जीवनगौरव व रंगसंमेलन पंचविशीविषयी बोलण्यासाठी चिपळूणमध्ये विजय कुवळेकर, डोंबिवलीमध्ये डॉ. प्रसाद देवधर, तर गोव्यामध्ये चंद्रकांत कुलकर्णी हे उपस्थित होते. चतुरंगविषयी बोलताना विजय कुवळेकर म्हणाले की, चतुरंगचा झेंडा उंच असण्याचं कारण म्हणजे तो धरण्याचं काम करणारा मजबूत दांडा म्हणजेच ‘चतुरंग कार्यकर्ता’, जो पुढे पुढे मिरवताना कधीच दिसत नाही. चतुरंग रंगसंमेलनात व्यासपीठावर स्थानापन्न नसलेल्या मोठमोठय़ा आदरणीय व्यक्ती, समोर प्रेक्षकांमध्ये बसलेल्या दिसतात! त्याचप्रमाणे समाजामध्ये उत्तुंग काम करणाऱ्या व्यक्तीचा जीवनगौरव व्यासपीठावर होत असतो आणि जनमानसामध्ये आदराचं स्थान असणाऱ्या अशा व्यक्तीचा गौरव, जनतेने उभारलेल्या निधीतून दिल्या जाणाऱ्या खऱ्याखुऱ्या ‘जनपुरस्कारा’ने होत असतो. या पुरस्काराच्या निधी संकलनाचं मर्म सांगताना विजय कुवळेकर यांनी भारतरत्न पं. मदनमोहन मालवीय यांनी सांगितलेल्या ओळी उद्धृत केल्या -‘देश के हर द्वारपर एक दाता खडा है अपनी खुली थली हाथों में लिये, कमी उन हाथोंकी है जिन्हे वो अपनी थली दे सके।’ हे हात चतुरंगपाशी आहेत, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.

डोंबिवलीमध्ये चतुरंगविषयी बोलताना डॉ. प्रसाद देवधर म्हणाले की, चतुरंग हे एक टिश्यू कल्चर आहे. मुंबई, डोंबिवली, पुणे, चिपळूण, गोवा येथील सर्व प्रकारच्या-वयाच्या-क्षमतेच्या कार्यकर्त्यांना एकत्र जोडणारं अजब फेविकॉल म्हणजे ‘चतुरंग’! चतुरंगला मधाची उपमा देऊन ते म्हणाले, ‘मधामध्ये अत्युच्च औषधी गुणधर्म असणं हे जसं हजारो मधमाश्यांच्या कष्टाचं फलित असतं, तसं चतुरंगची गुणवत्ता हे अनेक कार्यकर्त्यांच्या कष्टांचं फलित असतं!’

सुप्रसिद्ध सिने-नाटय़ दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी गोव्यात बोलताना चतुरंग ही शिस्त, सातत्य, नियोजनबद्धता, निरपेक्षता यांची चतुसूत्री असल्याचे नमूद केले. समरसता, समतोल, सर्वसमावेशकता आणि समन्वय यांचा मेळ म्हणजे चतुरंग असा कौतुकाचा उल्लेख त्यांनी केला.

चतुरंग स्मरणिका आणि ‘व्रतस्थ’ पुस्तक या दोन्हीच्या संदर्भात बोलण्यासाठी ‘गेटवे’ येथे डॉ. उदय निरगुडकर, चिपळूण येथे व्यंगचित्रकार विकास सबनीस, डोंबिवली येथे दा. कृ. सोमण आणि गोव्यात विजय केंकरे यांची उपस्थिती होती. डॉ. उदय निरगुडकर म्हणाले की, रंगसंमेलन स्मरणिका म्हणजे एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे न्यावा असा समृद्ध वारसा आहे. स्मरणिकेमधील एकेक लेख म्हणजे बावनकशी सोन्याचा दागिना आहे. विकास सबनीस म्हणाले की, ही स्मरणिका म्हणजे सत्कारमूर्तीचा जीवनपट उलगडणारी, प्रेरणादायी लेखांचा संग्रह असलेली, कायम-स्वरूपी अशी ठेव आहे. ‘व्रतस्थ’ पुस्तक वाचताना वेगवेगळ्या रूपांत पंचवीस देव भेटल्याचा साक्षात्कार होतो, असे भावोद्गार दा. कृ. सोमण यांनी डोंबिवली येथे बोलताना काढले. विजय केंकरे यांनी, ‘व्रतस्थ’ पुस्तकातील जनसेवकांचे कार्य आजच्या पिढीने जाणून घेऊन, त्यांच्या कार्यातून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

चिपळूण येथील सोहळ्याचे प्रमुख पाहुणे होते, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार िशदे. त्यांनी स्मरणिकेमधील गिरीश प्रभुणेंच्या मुलाखतीत, ते काही काळ राष्ट्रीय स्वयंसेवक संघात, काही काळ समाजवाद्यांबरोबर तर आणीबाणीच्या काळात जयप्रकाशजींबरोबर असल्याच्या प्रांजळ कथनाबद्दल, त्यांच्या स्पष्टवक्तेपणाला दाद दिली. काळाप्रमाणे बदलण्याची, सावरकरांचे दलितविषयक विचार पुढे नेण्याची गरज व्यक्त करून चतुरंग संस्थेमध्ये सामाजिक क्रांती घडविण्याची कुवत आहे, असे प्रतिपादन िशदे यांनी केले. डोंबिवलीच्या सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना विनय सहस्रबुद्धे म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी जसे गणेशोत्सवासारख्या उत्सवाचे सामाजीकरण केले; महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांनी छोटय़ा छोटय़ा गोष्टींचे राष्ट्रीयीकरण केले त्याप्रमाणे चतुरंग संस्था सांस्कृतिक जाणिवांचे समाजिकीकरण आणि सामाजिक संवेदनांचे सांस्कृतिकीकरण करण्याचे काम करते आहे. रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनाच्या गोव्यातील सांगता सोहळ्यात प्रमुख पाहुणे या नात्याने बोलताना निशिकांत जोशी म्हणाले की, जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, सुंदर आहे ते ते पुढे नेण्याचं काम चतुरंग संस्था करीत आहे. गोव्याने अनेक थोर माणसे देशाला दिलेली आहेत. चतुरंगच्या सांस्कृतिक-सामाजिक कार्याच्या पाठीशीदेखील गोवेकरांनी ठामपणे उभे राहावे, असे आवाहन निशिकांत जोशी यांनी केले.

रंगसंमेलनाच्या चारही ठिकाणी सर्व सहभागी-साहाय्यकांबद्दल बोलताना चतुरंगचे संस्थापक आणि ज्येष्ठ कार्यकत्रे विद्याधर निमकर यांनी समाजाच्या विविध स्तरांतून विविध रूपाने चतुरंगला लाभणारा प्रतिसाद आणि जिव्हाळा हा शब्दात न सामावणारा असल्याने आभार, कृतज्ञता, ऋणनिर्देश हे शब्द त्यांच्या प्रेमापुढे थिटे पडत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

आज महिनाभराने मागे वळून पाहताना रौप्यमहोत्सवी रंगसंमेलनाचे केवळ एकेका आठवडय़ाच्या अंतराने एकापाठोपाठ एक दिमाखात साकार झालेले हे चारही भाग म्हणजे जणू एक स्वप्नच वाटतंय. या चारही ठिकाणचे कार्यकत्रे जणू एकसुरात म्हणताहेत, ‘दूरी रास्तेपे नहीं, मनमे होती है’! मनं जवळ असली तर रस्त्याचं अंतर तोडणं सहज शक्य असतं. चतुरंगला ते नक्कीच जमलंय्! कारण आम्ही सारे कार्यकत्रे बारा महिने, तेरा काळ चतुरंगी असतो आणि चतुरंगीच आहोत!!

असे रंगले संमेलन

रौप्यमहोत्सवी जीवनगौरव पुरस्कार, पंचवीस एकल जनसेवकांचा कृतज्ञ सन्मान या साऱ्याचा एकत्रित आनंद म्हणजे यंदाचं, चार भागांचं-चार ठिकाणी साकारलेलं चतुरंग रंगसंमेलन! शुभारंभ शनिवार १२ डिसेंबर २०१५ रोजी मुंबई-गेट वे ऑफ इंडिया येथे, रविवार २० डिसेंबर २०१५ रोजी युनायटेड इंग्लिश स्कूल, चिपळूण येथे, शनिवार दि. २६ डिसेंबर २०१५ रोजी स.वा. जोशी विद्यालय डोंबिवली येथे आणि सांगता ३ जानेवारी २०१६ रोजी कला अकादमी पणजी-गोवा येथे! ‘गेटवे’ला सागराच्या काठी पं. रोणू मुजुमदार आणि राहुल देशपांडे यांची ‘स्वरसागर’ जुगलबंदी आणि पं. विश्वमोहन भट्ट यांची अभिजात भारतीय संगीत व राजस्थानी लोकसंगीत यांचा मिलाफ असलेली ‘नजराणा’ मफल! चिपळूणमध्ये हर्षदा जांभेकर आणि अदिती भागवत यांची लावणी कथ्थक जुगलबंदी, तर स्वर-सूर-ताल यांचा स्वरोत्सव साकारणारी राहुल देशपांडे, अमर ओक, विजय घाटे आणि अनय गाडगीळ यांची ‘बेधुंद’ मफल चिपळूणप्रमाणेच गोवा येथेही प्रेक्षकांना लाभली. शिवाय सोनिया परचुरे आणि नकुल घाणेकर यांचा ४० सहकलाकारांसमवेतचा ‘गीतरामायणावरचा नृत्याविष्कार’ गोवेकरांना मंत्रमुग्ध करून गेला. डोंबिवलीत ‘बियॉण्ड बॉलीवूड’ हा िहदी चित्रगीतांवरचा स्वर-सूर-ताल-नृत्योत्सव आणि जयतीर्थ मेवुंडी व आनंद भाटे यांचा ‘भीमसेनी स्वरोत्सव’ डोंबिवलीकरांना सुखावून गेला.
ऊर्मिला देसाई – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 12, 2016 1:25 am

Web Title: chaturanga rangasamelan
Next Stories
1 मुलाखत : प्रत्येक गीत कविता असावी!
2 व्हॅलेंटाइन्स डे : प्रेमाचा आनंद…
3 व्हॅलेंटाइन्स डे : प्रेमाचं वय…
Just Now!
X