23 January 2020

News Flash

जीवनानंदाचे प्रतीक चेरीब्लॉसम

वसंतात जपानमध्ये चेरीब्लॉसमच्या काळात म्हणजेच साकुराची फुलं फुलण्याच्या काळात ‘हनामी’ हा पुष्पोत्सव सुरू होतो.

माणसाच्या जीवनचक्राशी कमालीचं साधम्र्य असणाऱ्या चेरी ब्लॉसमचा उत्सव हे जपानी संस्कृतीचं आगळंवेगळं वैशिष्टय़ आहे.

ऋतू पर्यटन
विजय दिवाण – response.lokprabha@expressindia.com

वसंतात जपानमध्ये चेरीब्लॉसमच्या काळात म्हणजेच साकुराची फुलं फुलण्याच्या काळात ‘हनामी’ हा पुष्पोत्सव सुरू होतो. माणसाच्या जीवनचक्राशी कमालीचं साधम्र्य असणाऱ्या चेरी ब्लॉसमचा उत्सव हे जपानी संस्कृतीचं आगळंवेगळं वैशिष्टय़ आहे.

तुम्ही कधी वसंत ऋतूत जपानला गेलात, तर तिथले अनेक रस्ते पांढऱ्या, गुलाबी, किंवा किंचित जांभळट फुलांनी अंगभर बहरलेल्या ‘साकुरा’ वृक्षांनी सजलेले दिसतील. साकुरा वृक्ष म्हणजे सुंदर फुलांच्या बहरासाठी जगभर प्रसिद्ध असणारे चेरीब्लॉसम्!

जपानी संस्कृतीमध्ये अनेक शतकांपासून माणसांना अभूतपूर्व असा जीवनानंद देणारा वृक्ष अशी साकुराची ख्याती आहे. हा जीवनानंद तात्कालिक, पण अलौकिक असतो असे जपानचे लोक मानतात. तात्कालिक यासाठी, की वसंत ऋतूच्या आगमनानंतर अवघे १० दिवस या चेरीब्लॉसम् फुलांचा बहर टिकतो आणि नंतर ती सारी फुले गळून पडतात. एका दृष्टीने या साकुरा वृक्षांचा जीवनक्रम मानवाच्या जीवनक्रमाशी मिळताजुळता आहे. हा वृक्ष मोठा होऊन सुमारे १५ वर्षांचा झाला की मार्च-एप्रिलमध्ये त्याला फुले येऊ  लागतात. हा वृक्ष २०-२१ वर्षांचा झाला की त्याच्या फुलांचा बहर शिगेला

पोहोचतो. त्यानंतर मात्र हा बहर कमी कमी होत जातो. साधारण ७० वर्षांनंतर हा वृक्ष मृत होतो.

याच रीतीने माणसाच्या जीवनातही शैशवातून तारुण्यात प्रवेश केल्यानंतर प्रीतीचा आणि सहजीवनाचा बहर सुरू होतो. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींतून अपरिमित आनंद घेत माणूस जगतो. प्रौढत्व आले की त्याच्या तारुण्याचा बहर ओसरत जातो आणि पुढे सत्तरीनंतर कधी तरी त्याचे जीवन संपून जाते.

साकुरा वृक्ष आणि माणूस यांच्या जीवनक्रमांत असे विलक्षण साधम्र्य आहे. त्यामुळेच जपानमध्ये साकुरा नवजीवनाचे, नवनिर्माणाचे आणि आनंदाचे प्रतीक मानतात.

या वृक्षाच्या बहराच्या मोसमात जपानमधील सर्वसामान्य लोक आपापल्या मित्रमैत्रिणींना आणि आप्तस्वकीयांना निमंत्रणे देऊन एकत्र बोलावतात. पांढऱ्या-गुलाबी चेरीब्लॉसमने डवरलेल्या वृक्षांखाली एकमेकांना मेजवान्या देतात. या बहराचे दर्शन घेण्यासाठी सामुदायिक पुष्पोत्सव साजरा करतात. या पुष्पोत्सवाला ते ‘हनामी पुष्पोत्सव’ म्हणतात. या उत्सवात लोक जागोजागी फिरून चेरीब्लॉसम् पाहतात, त्या फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेले मद्य प्राशन करतात आणि आवडीच्या पदार्थाचा आस्वाद घेतात. गप्पागोष्टी, नृत्य-संगीतात रंगून जात आपला आनंद व्यक्त करतात. या पुष्पोत्सवाच्या मोसमात जपानमधील शाळा-महाविद्यालयांत आणि निरनिराळ्या कार्यालयांत विद्यार्थ्यांच्या किंवा कर्मचाऱ्यांच्या नातलगांसाठी पुष्पोत्सवाच्या स्वागताचे कार्यक्रम आयोजित केले जातात.

हनामी पुष्पोत्सवाची ही प्रथा जपानमध्ये इसवी सन ७१० ते ७९४ या काळात सुरू झाली. त्या काळात तिथे ‘गेनमेई’ नामक सम्राज्ञीची राजवट होती. ती राजवट ‘नारा राजवट’ म्हणून ओळखली जात असे.

चेरीब्लॉसमच्या अनेक प्रजाती असतात. पण जपानमध्ये पूर्वीच्या नारा राजवटीत केवळ एकाच स्थानिक प्रजातीची झाडे लावली जात. त्या झाडांच्या फुलांचा उत्सव साजरा केला जात असे आणि त्या उत्सवात फक्त राजदरबारातल्या सरदारांचा आणि महत्त्वाच्या व्यक्तींचाच सहभाग असे. मात्र पुढे इसवी सन ७९४ ते ११८५ या काळात तिकडच्या ‘हेईयन’ राजवटीत साकुराच्या अनेक देशी-विदेशी प्रजातींची लागवड मोठय़ा प्रमाणावर केली जाऊ लागली आणि तिथले सर्वसामान्य लोकही हा महोत्सव साजरा करू लागले. मग हळूहळू हा उत्सव खऱ्या अर्थाने एक मोठा ‘लोकोत्सव’ झाला.

जपानमधील साकुराच्या वनरायांचा बहर हा दक्षिणेकडील ‘ओकिनावा’ भागात बराच आधी, म्हणजे जानेवारीच सुरू होतो आणि नंतर हळूहळू तो उत्तरेकडील भागांत पसरू लागतो. क्योटो आणि टोकियो इथले वृक्ष मार्चमध्ये बहरतात आणि त्यानंतर काही आठवडय़ांनी उत्तरेकडील पर्वतीय प्रदेशांत ‘होक्काइडो’ भागातील वृक्षही बहरू लागतात. तिथले हवामान खाते दरवर्षी कोणकोणत्या भागांत साकुराची झाडे कधी बहरतील याचे अंदाज व्यक्त करते आणि त्यानुसारच जपानी लोक आपापले पुष्पदर्शनाचे सोहळे आयोजित करतात.

जपानमधील बौद्ध धर्मीय चेरीब्लॉसमला बौद्ध तत्त्वज्ञानात नमूद केलेल्या जीवनाच्या क्षणभंगुरतेचे प्रतीक मानतात. चेरीब्लॉसमप्रमाणे  मर्त्य मानवाच्या जीवनातील सौंदर्य, सुख, उन्माद या गोष्टीही नाशवंत असतात आणि म्हणूनच माणसाने नियतीचे भान ठेवून कर्माचा पाठपुरावा करणे कसे श्रेयस्कर आहे, हे त्या तत्त्वज्ञानात सांगितलेले आहे. १८व्या शतकातील ‘मोतुरी नोरिनागा’ नावाच्या एका जपानी विद्वानाने याबद्दल बरेच काही लिहून ठेवलेले आहे. जीवनाच्या या क्षणभंगुरतेचे आणि चेरीब्लॉसमचे संदर्भ जपानमधील अनेक कथा-कवितांतून, लोकगीतांतून आणि लेखांतून आढळतात. तसेच तिथल्या अनेक ग्राहकोपयोगी वस्तूंवरही चेरीब्लॉसमचीचित्रे छापलेली असतात.

जपानी साम्राज्यशाहीच्या काळात सम्राटांनी काबीज केलेला प्रदेश, त्या सम्राटाच्या मालकीचा झाला हे दर्शविण्यासाठी त्या प्रदेशात मोठय़ा प्रमाणावर साकुराची झाडे लावली जात. १९३० साली जपानच्या तत्कालीन सम्राटाच्या शाही सैन्यातील काही मोजक्या अधिकाऱ्यांचे एक स्वप्न होते, सम्राटाला पदच्युत करून सैन्याने जपानची सत्ता पूर्णपणे हस्तगत करावी आणि तिथे सैन्याचेच राज्य स्थापन करावे. त्यासाठी या अधिकाऱ्यांनी जी संघटना स्थापन केली होती, तिचे नाव त्यांनी ‘साकुराकाई’ (म्हणजे चेरीब्लॉसम सोसायटी) असे ठेवले होते. तसेच दुसऱ्या जागतिक महायुद्धाच्या वेळीदेखील चेरीब्लॉसमच्या  लोककथांचा वापर जपानमधील सामान्य नागरिकांना प्रेरित करण्यासाठी केला गेला होता. तेव्हा महायुद्धात शहीद झालेल्या जपानी सैनिकांनाही चेरीब्लॉसमची उपमा दिली जात असे. जपानी हवाई दलाचे अनेक वैमानिक त्या युद्धात आपापली विमाने घेऊन हाराकिरीच्या (आत्महत्येच्या) तयारीने शत्रुपक्षावर हल्ला करण्यासाठी उड्डाणे करीत. त्या विमानांवर दोन्ही बाजूंनी चेरीब्लॉसमची चित्रे रंगवलेली असत.

आज साकुराची झाडे आणि फुले केवळ जपानमध्येच आढळतात असे नव्हे, तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये ती लावली आणि वाढवली जातात. अल्पजीवी चेरीब्लॉसमच्या निमित्ताने जगातील अनेक देशांतील पर्यटन बहरले आहे. मानवी जीवनक्रमाचे प्रतीक म्हणता येईल अशा या फुलांचा क्षणभंगुर बहर पर्यटकांची ओंजळ दीर्घकाळ टिकणाऱ्या आनंदाने भरून टाकत आहे.

अन्यही अनेक देशांत…

ऑस्ट्रेलिया, ब्राझील, कॅनडा, चीन, फ्रान्स, जर्मनी, कोरिया, म्यानमार, न्यूझीलंड, नेदरलँड, तैवान, थायलंड, तुर्कस्तान, ब्रिटन आणि अमेरिका या सर्व देशांत साकुराची लागवड केलेली आहे. भारतात देखील हिमालयाच्या कुशीत असणाऱ्या उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर आणि सिक्कीम या भागांत ही झाडे बऱ्याच प्रमाणात आहेत. शिवाय पश्चिम बंगालच्या उत्तरेकडील दार्जिलिंग आणि जलपायगुडी येथेही ती आढळतात. भारताच्या ईशान्येकडील राज्यांपैकी गारो हिल्स आणि खासी हिल्स येथेही चेरी वने आहेत. हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या काही तीर्थक्षेत्रांच्या परिसरांतदेखील तुरळक प्रमाणात साकुराची लागवड करण्यात आली आहे. या हिमालयीन साकुरा झाडांपैकी ‘प्रूनस सिरॅसॉयडस’ या जातीच्या झाडाला भारतात पद्मकाष्ठ असे म्हटले जाते. हे भगवान विष्णूचे झाड आहे असे भाविक मानतात. भारतातील चेरीब्लॉसम साधारणत: ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यांत शिशिर ऋतूच्या सुरुवातीस पाहायला मिळतो. त्यामुळे भारतातील चेरीब्लॉसम महोत्सवदेखील त्याच काळात होतात. मेघालयातील शिलॉँग शहरात शिशिर ऋतूत होणारा चेरीब्लॉसम महोत्सव देशभरात प्रसिद्ध आहे.

First Published on July 19, 2019 1:03 am

Web Title: cherry blossoms joy of life
Next Stories
1 अॅप्रिकॉट ब्लॉसमची स्वर्गीय अनुभूती
2 मृत्युतांडवाच्या स्मृती जागवताना…
3 प्रसारण मुत्सद्देगिरी
Just Now!
X