-सुनिता कुलकर्णी

एखादी समस्या जगडव्याळ असते म्हणजे काय, आभाळच फाटलं असेल तर ठिगळ कुठे कुठे लावायचं म्हणजे काय याचा शब्दशः अनुभव सध्या सगळ्यांना येतो आहे. करोनामुळे झालेल्या परिणामांचे इतके वेगवेगळे पैलू प्रसारमाध्यमांमधून पुढे येत आहेत की सावरायचं तरी काय काय आणि कुणाकुणाला हा प्रश्न पडावा.
इंडियन एक्स्प्रेसने आजच प्रसिद्ध झालेल्या आदिती राजा यांच्या बातमीमध्ये आढावा घेतला गेला आहे, सरोगेट बाळांचा. गुजरातमधलं आणंद हे भारतातलं सरोगसी केंद्रच म्हणावं असं. टाळेबंदीमुळे तिथे ‘आकांक्षा इनफर्टिलिटी सेंटर’ या एका सरोगसी केंद्रातच जवळजवळ २७ बाळं अडकून पडली आहेत. (आणंदमध्ये अशी केंद्रं खूप मोठ्या संख्येने आहेत.) जेमतेम महिनाभर वयाची ही बाळं. ती जन्मली आणि टाळेबंदी सुरू झाली. त्यामुळे गुजरातबाहेरच्या राज्यांमध्ये असलेले त्यांचे पालक अतीतीव्र इच्छा असूनही या बाळांना ताब्यात घ्यायला येऊ शकलेले नाहीत.

‘आकांक्षा’च्या डॉ. नयना पटेल सांगतात की, कर्नाटकातील बंगळुरू येथील एक जोडपं त्यांच्या सरोगेट बाळाच्या जन्मासाठी टाळेबंदीतही बंगळुरू ते गुजरात असा १६०० किलोमीटरचा तीन दिवसांचा प्रवास करून आणंदला पोहोचलं. १४ दिवसांच्या विलगीकरणानंतर आता त्यांच्या हातात त्यांचं बाळ आम्ही दिलं आहे. पण सगळ्याच जोडप्यांना असं करणं शक्य नाही. त्यामुळे आमचे डॉक्टर्स आणि नर्सेसच या बाळांना सांभाळत आहेत आणि त्यांचे पालक फोनवरून आपल्या बाळांची ख्यालीखुशाली विचारत आहेत.

बंगळुरू ते गुजरात हा प्रवास करणाऱ्या त्या जोडप्यालाही वाटेत अनेक ठिकाणी पोलिसांनी अडवलं. बंगळुरूमधुन त्यांना या प्रवासाची परवानगी मिळाली असली तरी वलसाडमध्ये त्यांना पोलिसांनी ११ तास चौकशीसाठी थांबवून ठेवलं. ‘बाळाच्या जन्मासाठी ते हा प्रवास करत आहेत’ असं त्यांच्या परवान्यामध्ये लिहिलेलं असलं तरी ‘संबंधित महिला गरोदर दिसत नाही, तेव्हा तुम्ही खोटं बोलत आहात’ असं संबंधित पोलिसांचं म्हणणं होतं. सरोगसी हा प्रकारच त्यांना माहीत नव्हता आणि सांगूनही समजत नव्हता.

पुण्यात राहणाऱ्या आयटीमध्ये काम करणाऱ्या एका जोडप्याचं सरोगेट बाळ मार्चच्या अखेरीस ‘आकांक्षा’मध्ये जन्मलं. पण कोविद पोलिसांकडे अनेकदा अर्ज करूनही या जोडप्याला मात्र आणंदला जायची परवानगी मिळाली नाही. ‘आकांक्षा’कडून पाठवले जाणारे बाळाचे फोटो आणि व्हिडिओ यावरच त्यांना समाधान मानावं लागतं आहे. टाळेबंदीच्या काळात आणंदमधल्या विविध सरोगसी केंद्रांमध्ये जन्मलेल्या त्यांच्यासारख्याच अनेक बाळांच्या पालकांना आपण कधी आपल्या बाळाला हातात घेऊन जोजावतो असं झालं आहे.

दरम्यान सरकारने गेल्या जुलै महिन्यात सरोगसी विधेयक आणून त्याद्वारे आपल्या देशात व्यावसायिक सरोगसीवर बंदी आणली असून काही विशिष्ठ परिस्थितील सरोगसीलाच मान्यता दिली आहे.