16 October 2019

News Flash

फादर स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण

गोवा येथे इ.स. १६१६मध्ये ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी भाषेतील पहिले महाकाव्य मुद्रित होऊन प्रकाशात आले.

बायबलचा ‘जुना करार’ आणि ‘नवा करार’ यावर आधारित ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठीतील पहिलं मुद्रित महाकाव्य. या महाकाव्याला या महिन्यात ४०० वर्षे पूर्ण होत आहेत.

गोवा येथे इ.स. १६१६मध्ये ‘ख्रिस्तपुराण’ हे मराठी भाषेतील पहिले महाकाव्य मुद्रित होऊन प्रकाशात आले. अर्थात त्या काळी भारतात मुद्रणकला नव्हती. धर्मगुरूंनी गोवा येथे रायतूर या गावात मुद्रणकला ँसर्वप्रथम आणली. धर्मगुरूंना शिकविण्याचे त्यांचे कॉलेज त्या गावात होते. त्या कॉलेजमधून हे महाकाव्य प्रकाशित झाले. मराठी भाषेतील मुद्रित झालेले हे पहिले-वहिले महाकाव्य. ते लिहिले जेजुईट धर्मगुरू फा. थॉमस स्टीफन्स यांनी. मराठीतील इतर महत्त्वाच्या रचना त्यापूर्वी करण्यात आल्या होत्या. पण सर्वप्रथम मुद्रित होऊन छापखान्यातून बाहेर येण्याचे भाग्य मिळाले फा. थॉमस स्टीफन्सलिखित ख्रिस्तपुराणाला.

‘ख्रिस्तपुराण’

ज्या ग्रंथामुळे मराठी वाङ्मयाच्या इतिहासात फादर थॉमस स्टीफन्सचे नाव कायमचे कोरले गेले आणि त्याच्या नावाचा ‘कीर्तिस्तंभ’ उभा राहिला आहे तो ग्रंथ म्हणजे ‘ख्रिस्तपुराण’. प्रस्तुत ग्रंथ ओवीबद्ध असून तो मराठीत आहे, असे स्वत: स्टीफन्सनेच प्रस्तावनेत स्पष्टपणे नमूद केले आहे.

‘‘सुध मराठी मधिमा लोकांसि नकळे देखुनु हेआ पुराणाचा फळु बहुता जनांसि, सुफळू होउसि.. कवेस्वरांचिये रितुप्रमाणे आनियेके सोपी ब्राह्मणांचे भासेंची उतरे ठाई ठाई मिसरित करुन कवित्व सोपे केले.’’ प्रस्तावनेतील फादर स्टीफन्सचे हे विधान संभ्रम पसरविणाऱ्या समीक्षकांसाठी पुरेसे सडेतोड आहे.

गोमंतकातील नवख्रिस्ती लोकांना विशेषत: धर्मातरित ब्राह्मणांना पुराणग्रंथ वाचण्याची सवय होती. ख्रिस्ती झाल्यानंतर असे पुराण वाङ्मय वाचायला मिळत नाही, अशी तक्रार एका ब्राह्मण नवख्रिस्त्याने धर्मसभेत केली.

हे निवरावेया कारणे ।

फिंगियाचा देशी हाति पुराणे ।।

ती वाचेनिया तेथिल जनु ।

निते सेविते कथारसु ।।

पण ते देसिचे मासेसि अभ्यासु ।

नाही आमा ।।

जेसे तेआं तेआं दिपावती ।

देसपरिची पुराण हाती ।।

तैसी पुस्तकंे कां न मेळती ।

आमचां देसी ।।

नवख्रिस्ती लोकांना वाचण्यासाठी ख्रिस्तपुराण तुम्ही तयार करण्याचा आमचा मनोरथ तुम्ही पूर्ण करावा, असे त्या ब्राह्मणाने म्हटले. त्यावरून ‘प्रतिपुस्तक’ म्हणून ख्रिस्तपुराण लिहिण्याची फादर स्टीफन्सला प्रेरणा झाली असावी. त्यांनी दर रविवारी चर्चमध्ये ख्रिस्तपुराण सांगायला सुरुवात केली आणि ९५व्या रविवारी म्हणजे इ.स. १६१४मध्ये ते पठण पूर्ण केले.

ख्रिस्तपुराणाची वैशिष्टय़े

फा. स्टीफन्सने पाश्चिमात्य ख्रिस्ती धर्म आपल्या ख्रिस्तपुराणातून पौर्वात्य किंबहुना देशी करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. त्यासाठी ग्रांथिक मराठीऐवजी स्थानिक बोलीचा जाणीवपूर्वक वापर केला. ओवीबद्ध रचना केली. अध्यायांना ‘अवस्वरू’, स्वर्गाला ‘वैकुंठ’, ‘वैकुंठनगरी’, नरकाला ‘अंध:कूप’, परमेश्वराला ‘वैकुंठराया’, ‘स्वामीगुरू’ असे या भूमीशी जवळीक साधणारे खास शब्द योजले. म्हणूनच ‘ओम नमो विश्वभरिता’ हाही शब्दसमूह त्याच प्रतवारीतला आहे आणि त्यामुळेच ‘महाराष्ट्र सारस्वत’कार वि. ल. भावे यांना या महाकाव्याचा निर्माता कोण याविषयी संशय घ्यायला जागा निर्माण करणारा ठरला आहे.

‘ख्रिस्तपुराण’ हे ‘पहिले पुराण’ व ‘दुसरे पुराण’ (बायबलचा जुना करार आणि नवा करार) अशा दोन भागांत आहे. परंतु, ते बायबलचे भाषांतर नाही. मर्सडन संग्रहातील देवनागरी हस्तलिखितात आदिपुराण (४,०३५ आणि देवपुराण (६,६०६) अशा एकूण १०,६४१ ओव्या आहेत. प्रा. शांताराम बंडेलू (मंगळूर) प्रतीत पहिल्या पुराणात ३६ अवस्वरात ४१८१ ओव्या तर दुसऱ्या पुराणात ५९ अवस्वरात ६७८१ ओव्या आहेत. एकूण ओवीसंख्या १०,९६२ म्हणजे हा ग्रंथ ज्ञानेश्वरीपेक्षाही मोठा आहे.

‘ख्रिस्तपुराण’ या महाकाव्यात फा. थॉमस स्टीफन्स केवळ ख्रिस्ती-हिंदू संवादाच्या शक्यतेबद्दलचा सिद्धान्त सांगत नाहीत. ख्रिस्तपुराणात बायबलची ख्रिस्तीकथा दुसऱ्या भाषेत (मराठी) आणि दुसऱ्या परंपरेत, म्हणजे हिंदू वैष्णव परंपरेत सांगितली आहे. एवढेच नव्हे, तर ती दोन धर्मामधील फक्त गाठभेट नसून ती परस्परांची सफलता, संपन्नता आहे. त्यांच्या ख्रिस्तपुराणात फा. स्टीफन्स ख्रिस्ती-हिंदू गाठीभेटीचे साक्षीदार आहेत.

फा. थॉमस स्टीफन्स यांनी संस्कृतीकरणात फारच मोठे योगदान दिलेले आहे. संस्कृतीकरण ही आज काळाची गरज आहे. विशेषत: भारतीय चर्चची गरज आहे. चारशे वर्षांपूर्वीच थॉमस स्टीफन्स यांनी संस्कृतीकरणाची आवश्यकता ओळखली होती आणि त्या दृष्टीने ख्रिस्तपुराणातून त्यांनी केलेला प्रयत्न स्तुत्य आहे. यामुळे फा. थॉमस स्टीफन्स यांना भारतातील, किंबहुना आशिया खंडातील, ‘ख्रिस्ती धर्माच्या संस्कृतीकरणाचे जनक’ असे म्हणणे योग्य होईल.

फा. स्टीफन्स १५७९ मध्ये गोव्याला पोहोचले. प्रार्थनांचे अनुवाद करणे, त्या शिकवणे व त्यांचा प्रसार करणे, यापलीकडे ते गेले. ते एक कल्पक विचारवंत आणि द्रष्टे होते व त्याचा प्रत्यय त्यांनी केलेल्या कामांतून येतो. पोर्तुगीज भाषेत त्यांनी लिहिलेले ‘कोंकणी भाषेचे व्याकरण’ हे कोंकणी भाषेतील पहिले छापील पुस्तक होय. त्यांचे श्रेष्ठ दर्जाचे साहित्य म्हणजे ‘ख्रिस्तपुराण’.

१६०५ पर्यंत फा. स्टीफन्सचे ख्रिस्तपुराण जवळजवळ पूर्ण होत आले होते. कारण १६०५ मध्ये फा. स्टीफन्सनी जेजुईट जनरल रेव्ह. क्लाउडिउस आक्वाविवा यांना पत्र लिहून स्थानिक भाषेत ख्रिस्तपुराण प्रसिद्ध करण्याची परवानगी मागितली.

एक इंग्रज जेजुईट (येशूसंघीय) फा. थॉमस स्टीफन्स (१५४९-१६१९) यांनी ४०० वर्षांपूर्वी नेमके हेच साधण्याचा प्रयत्न केला. त्यांनी हिंदूंच्या धार्मिक भाषेतून पवित्र शास्त्रामधील जुन्या आणि नव्या करारांचा वृतान्त कथन केला. ख्रिस्ती सिद्धान्त जसेच्या तसे ठेवून त्यांनी कोकण प्रांतातील लोकांना ब्राह्मण-मराठा देशी भाषेत ज्ञानेश्वर,  (१२७५-१२९६) एकनाथ यांच्या शैलीत शुभवर्तमान सांगितले.

फादर थॉमस स्टीफन्स यांनी एक यथार्थ समतोल साधला. त्यांनी सुंदर, सुशोभित हिंदू मंदिरात येशू स्वामीची स्थापना केली. डॉ. शं. गो. तुळपुळे म्हणतात : ‘बायबलमधील मूळ सत्यापासून यत्किंचितही न ढळता, हिंदू मनाला पटेल असा पौर्वात्य वेश आणि तोही काव्यरूपाने ख्रिस्तचरित्राला देण्याची कामगिरी खरोखरच कठीण होती; परंतु स्टीफन्सने ती पार पाडली आहे. भाषा, वृत्त, कल्पना, कविसंकेत इत्यादी सर्व काव्यांगे त्याने अस्सल मराठी ठेवली आहेत. आतील मूर्ती तेवढी येशू ख्रिस्ताची, बाकी मंदिराचा सारा थाट हिंदू पद्धतीचा, अशी या पुराणाची रचना आहे.’

स. गं. मालशे यांच्या मते, ख्रिस्तपुराण रचताना फा. स्टीफन्स यांनी जुन्या मराठी संतसाहित्याचा आणि ‘आख्यानकाव्याचा’ अभ्यास केला होता. पोर्तुगालमधील ब्रागा येथे एक मराठी वाङ्ग्रंथ अथवा सर्व संग्रह अस्तित्वात असल्याची माहिती गोमंतकीय संशोधक प्रा. पांडुरंग पिसुलेंकर देतात. प्रियोळकरांच्या मते हा ग्रंथ कदाचित फा. थॉमस स्टीफन्स यांच्या हस्ताक्षरातील असावा. फा. स्टीफन्स जेथे धर्मोपदेशक होते त्या रायतूर कॉलेजमध्ये सुरुवातीला हा ग्रंथ होता.

ख्रिस्तावर पुराण लिहिण्याच्या फा. स्टीफन्स यांच्या कार्याचे कौतुक अशासाठी की, साष्टीच्या सारस्वत ब्राह्मण आणि मराठी समाजाला एखाद्या धार्मिक प्रबंधापेक्षा पुराण जास्त आवडेल हे त्यांनी ओळखले होते.

ख्रिस्तपुराणांत पुष्कळ भारतीय, कोंकणी, महाराष्ट्रीय, सूत्रे, शब्द प्रतिमा, संकल्पना, कल्पना आणि परिभाषा आहेत. भारतीय पुराणांच्या परंपरेला अनुसरून ख्रिस्तपुराणाची सुरुवात नमन, मंगलाचरण, देवस्तुती, संत-महंत स्तुतीने केली असून, ग्रंथ पूर्ण होण्यासाठी दैवी मदतीची प्रार्थना केली आहे.

गमतीचा भाग म्हणजे फा. थॉमस स्टीफन्स यांची ख्रिस्तपुराणाची देवनागरीत लिहिलेली हस्तलिखिते लंडनमधील फिन्सबरी सर्कस येथील ‘स्कूल ऑफ ओरिएंटल स्टडीज’मधील ‘मर्सडन कलेक्शन’मध्ये सापडल्याचे जस्टिन अ‍ॅबट यांनी १७ ऑगस्ट १९२५ रोजी भारतातील एका संपादकांना लिहून कळविले.

ख्रिस्त हा नवीन राजा जन्मास आलेला आहे, हे ऐकून तत्कालीन राजा हेरोद याच्या पायाखालची भूमी सरकली. तो चवताळला. दोन वर्षांखालील सर्व पुरुष लेकरांची कत्तल करण्याचे फर्मान त्याने काढले. सगळीकडे हाहाकार माजला. त्याचे वर्णन फादर थॉमस स्टीफन्स यांच्या भाषेत आपण पाहू या.

‘लेंकरुवांचें आंग टोंपत ।

मातेसि घावो लागत ।

मिसळुनि दोगांचे रक्त ।

भूमी वरुषे ।।९।।

दुधाची बाळके मारिती ।

तीं रक्तासवें दुध उदरती ।

रक्तदुधाची मिसळि होंती ।

भूमी पडोनि ।।३०।।

बाळ आहे मातेचे कडियेसि ।

हिरउनु घेंती तेयासि ।

चरणी धरोनि शिळेसि ।

आपटुनि देती ।।३१।।

(ख्रिस्तपुराण – दुसरे पुराण अवस्वरू १३:२९-३१)
फादर डॉ. नेल्सन फलकाव – response.lokprabha@expressindia.com

First Published on December 23, 2016 1:14 am

Web Title: christmas and new year special father stephens christpuran