दिशा खातू – response.lokprabha@expressindia.com
नाताळ-नववर्ष विशेष

मुंबई
मुंबईच्या विविध भागांत नाताळचा सण साजरा करताना परंपरा आणि संस्कृतीचा अनोखा मिलाफ बघायला मिळतो. या काळात ख्रिस्तीबहुल भागातील वातावरण धार्मिक आणि आनंदी वातावरणाने भारावलेले असते.

‘हा दिवस प्रभूचा,

प्रभू येशूच्या जन्माचा.

चला उत्साहात

साजरा करू या

हा दिवस प्रभूचा, हा दिवस नाताळ सणाचा.’

प्रभू येशूच्या जन्मदिनानिमित्त सुमारे १७०० वर्षांपासून २५ डिसेंबर रोजी नाताळ सण साजरा होत आहे. नाताळ हा शब्द ‘नातालिस’ या लॅटीन शब्दाच्या अपभ्रंशातून आलेला आहे. नातालिस म्हणजे जन्म, इथे मात्र हा शब्द येशूचा जन्म या अर्थाने वापरला जातो. पूर्वी या दिवशी फक्त सामूहिक प्रार्थना होत असे. पुढे एकोणिसाव्या शतकापासून नाताळ सण म्हणून मोठय़ा प्रमाणात, झगमगाटात आणि हर्षोल्हासात साजरा होऊ लागला. भारतातल्या ज्या ज्या भागात नाताळ सण साजरा होतो तेथे भारतीय परंपरा आणि पाश्चात्त्य देशातून आलेल्या परंपरांचा मिलाफ दिसून येतो.

मुंबईत कुलाबा, गिरगाव, वरळी, माहीम, वांद्र, सांताक्रूझ, जुहू आणि गोरेगाव-मालाड या भागात खूप वर्षांपासून ख्रिश्चनांचे वास्तव्य आहे. एक महिना आधीपासून नाताळची घराघरांत आणि सर्व चर्चमध्ये तयारी सुरू होते. साफसफाई, रंगरंगोटी करण्यात येते. रोषणाईच्या माळांनी सजावट होते, घरात किंवा अंगणात गोठा बनवण्यास सुरुवात होते. यात विविध विषय घेऊन त्यानुसार गोठय़ाची सजावट होते. रात्री आकाशात तारा लुकलुकला की समजावे येशूचा जन्म झाला, अशी सर्वत्र मान्यता आहे. त्या ताऱ्याचे प्रतीक म्हणून दिवाळीतील कंदिलाप्रमाणे चांदणी खिडकीत किंवा दाराजवळ लावतात. तर लहान मुले मोजे दाराजवळ लावतात. सांता बाबा त्यांच्यासाठी भेट-वस्तू घेऊन येतो आणि या मोज्यात ठेवतो, असे मुलांना वाटते. नाताळ सणानिमित्त सजावटीचे, फराळाचे समान आणि पाश्चिमात्य कपडय़ांची खरेदी होत असते, परंतु काही जण आजही पारंपरिक पद्धतीने गोल घेरदार, जरी काठाची साडी नेसतात तर पुरुष सदरा, लेंगा आणि टोपी घालतात असे वसईतील जॉन रुमाव यांनी सांगितले.

या दिवसांत ख्रिस्ती आळ्यांतून फेर फटका मारला तर घराघरांतून खमंग वास दरवळण्याचा अनुभव घेता येतो. घरोघरी लाडू, चिवडा, िशगोळे (चण्याच्या डाळीची करंजी), नेवरी (मावा करंजी), खजुर रोल, कुलकुले (कणिक आणि गुळापासून बनवून तळलेले), गोड थाळी (रवा, खोबरे, गूळ, अंडी एकत्र करून बेक केलेला पदार्थ), खोबऱ्याच्या वडय़ा, बोरो (बिस्किटे), फुगे (मेदूवडय़ासारखी चव असते मात्र लहान-मोठे तळलेले गोळे असतात), वडे (तांदळाच्या पिठाचे) इत्यादी पदार्थ बनवले जातात. मेरी कॅलिस्टो म्हणतात की, पूर्वीपासून सगळे जण घरी वाईन बनवतात. साधारणपणे द्राक्षे, तांदूळ किंवा बिटापासून वाइन बनवली जाते.

नाताळच्या दिवशी ताटे सुशोभित करतात, त्यात बनवलेले पदार्थ सजवतात आणि ते ताट शेजारच्या घरांत पाठवतात. पदार्थ वाटून खाण्याच्या या परंपरेला ‘कोस्वाद’ असे सांताक्रूझ भागातील स्थानिक भागात म्हणतात, असे किरण गोम्स यांनी म्हटले. आता कलाकुसर केलेली ताटे सहज बाजारात उपलब्ध होतात. पूर्वी मातीचे ताट कोरून, चित्र काढून, रंग भरून सजवले जात होते अशी ही माहिती त्यांनी दिली. आता मात्र काचेच्या, प्लास्टिकच्या वेगवेगळी ताटे मिळतात. त्याचाच वापर केला जातो.

जशी घराघरांत नाताळची तयारी होते तशी चर्चमध्येसुद्धा एक महिना आधी तयारीला सुरुवात होते. नाताळपूर्वीच्या चार आठवडय़ांना आगमन काळ ऊर्फ प्रतीक्षा काळ (अ‍ॅडव्हेंट) असे ख्रिस्ती परंपरेत म्हटले जाते. या चार आठवडय़ांत प्रत्येक रविवारी एक मेणबत्ती पेटविली जाते. त्याला विशेष असा अर्थ असतो. रविवारच्या सामूहिक प्रार्थने (उपसना) दरम्यान पाना-फुलांच्या गोलाकार माळेत मेणबत्ती तेवत ठेवली जाते. युरोपमध्ये लॉरेल झाडाच्या पानांची माळ बनवली जाते. पहिल्या, दुसऱ्या आणि चौथ्या रविवारी जांभळ्या रंगाची मेणबत्ती लावली जाते. तर तिसऱ्या दिवशी गुलाबी रंगाची मेणबत्ती लावण्यात येते. जांभळा रंग हा पश्चात्तापाचा आहे. केलेल्या चुकांची सुधारणा करा, असा संदेश यातून देण्यात येतो. गुलाबी रंग हा आनंदाचा म्हणून दर्शवला जातो. नाताळ सणाचे जल्लोषात स्वागत करा असा संदेश यातून देण्यात येतो.

याबाबत फादर लॉरेन्स मॅस्करीनस सांगतात की, ‘पहिली वात द्रष्टय़यांची आठवण म्हणून लावली जाते. येशूच्या जन्माबाबत अनेकांनी भाकिते केली होती त्या सर्वाची आठवण याप्रसंगी काढली जाते. मेरी बाळंत असताना ती बेथलेहम गावी जाते तिच्या या प्रवासाची स्मृती म्हणून ही दुसरी वात लावण्यात येते. तिसरी वात ही मेंढपाळाची वात असते. कारण, येशूच्या जन्माची पहिली बातमी मेंढपाळाला देण्यात येते. शेवटची वात ही देव-दूतांच्या नावाने लावली जाते. कारण त्यांनी जगाला ख्रिस्ताच्या जन्माची गोड बातमी दिली आणि सर्वाना आनंद व्यक्त करण्यास सांगितले. यानिमित्ताने चर्चमध्ये विशेष प्रार्थना होतात. ‘आम्ही येशूच्या आगमनाची तयारी करत आहोत. आमच्या मनातील पापाचा अंध:कार दूर कर आणि या जगात शांततेचे वातावरण प्रस्थापित कर.’ अशा आशयाच्या प्रार्थना म्हटल्या जातात.

येशूचा जन्म गोठय़ात झाला होता. त्याच्या जन्माचा देखावा आणि त्या काळाची प्रतिकृती म्हणून नाताळ गोठे बनवण्यात येतात. १२२३ साली संत फ्रान्सिस यांनी पहिल्यांदा इटलीमध्ये ही संकल्पना एका चर्चमध्ये नाताळ गोठा उभारून प्रस्तुत केली. त्यानंतर जगभरात ही प्रथा सुरू झाली.

परंपरागत बनवण्यात येणा-या नाताळ गोठय़ांमध्ये, सर्वसाधारणपणे बेथलेम गावाची पाश्र्वभूमी साकारलेली असते. डोंगर, नद्या, गवताळ परिसर तसेच लाकडी गोठा, मध्यभागी बाळ म्हणजेच येशू आणि डोक्यावर रंगवण्यात आलेला तारा (येशूचा जन्म झाल्यावर आकाशात तारा उगवला होता त्याची प्रतिमा) दाखविण्यात येतो. एका बाजूला मेरी तर दुसऱ्या बाजूला जोसेफ, कोपऱ्यात बसलेली गाय, येशूच्या जन्माची सुवार्ता सांगणारे मेंढपाळ, भेट-वस्तू घेऊन आलेले तीन राजे (जन्माची सुवार्ता समजल्यानंतर पूर्व देशातील तीन राजे दर्शनासाठी जातात) ही मूळ रचना सर्वत्र पाहायला मिळते.

नातळ गोठे चर्चच्या आवारात, घरी किंवा अंगणात, आळीच्या मध्यभागी किंवा चौकात (सार्वजनिक ठिकाणी) उभारले जातात. यातून मुलांच्या सर्जनशीलतेचे दर्शन घडते. रोषणाई, कागदी-कापडी सजावट, सांता बाबाचे मुखवटे बनवणे, मूर्ती बनवण्याचे काम करतात. वांद्रे, वरळी भागातील काही ठिकाणी परंपरेनुसार जोसेफला सदरा आणि धोतर, मेरीला लाल रंगाची जरीच्या काठाची साडी नेसवतात. तसेच तिची साडी, खण, नारळ, वेणीने ओटीसुद्धा भरतात असे रोमिला डिमेलो यांनी सांगितले.

नव्वदच्या दशकानंतर गोठय़ाच्या रचनेत बदल होत गेले. गोठा बनवण्याच्या निमित्ताने तरुणांना एकत्र आणणे, विविध सामाजिक प्रश्नांवर चर्चा करणे. हे प्रश्न सार्वजनिक गोठय़ांद्वारे समोर आणण्याचे कार्य होऊ लागले. नागरी समस्या, शिक्षण, आरोग्य इत्यादींवर भाष्य होऊ लागले. तसेच गोठय़ांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर वाढला चलचित्रे, संगीत, लेझर इत्यादीं गोष्टींनी गोठा परिपूर्ण होऊ लागला आहे.

नाताळच्या दोन आठवडे आधीपासून नाताळ गाण्यांना म्हणजे कॅरल्सना सुरुवात होते. कॅरोलियन या ग्रीक शब्दापासून कॅरल हा शब्द आला आहे. याचा अर्थ गोलाकार उभे राहून गाणी म्हणणे, नृत्य करणे. चौथ्या शतकात रोम मध्ये सर्वप्रथम कॅरल झाल्याचे पुरावे आहेत. नाताळ कॅरल्स १९६० पासून संपूर्ण जगभरात सुरू झाले असे फादर लॉरेन्स मॅस्करीनस सांगतात. ही गाणी कोळी, आगरी, मराठी, मालवणी भाषेत गायली जात असत. मात्र त्यात पोर्तुगीज आणि इंग्रजी शब्दांची सरमिसळ होत असे. आता िहदी आणि इंग्रजीमध्येच सर्वाधिक गाणी म्हटली जातात. तरुणांचा चमू सायंकाळी चर्चच्या परिसरात, आळ्यांमध्ये, चौकात गाणी म्हणत असतात. सोबत गिटार, पाँगो, माऊथ ऑर्गन अशी संगीत वाद्य असतात. त्यात आकर्षण म्हणून कोणी सांताक्लॉज ही बनतात.

नाताळच्या आदल्या दिवशी २५ तारखेला रात्री सगळेजण तयार होऊन चर्चमध्ये जातात. या वेळी काही जण पांढऱ्या रंगाच्या उंची कपडय़ांना प्राधान्य देतात तर काही जण पारंपरिक लाल, गुलाबी रंग निवडतात. लुगडे, चोळी, घेरदार गोल साडी (खांद्यावरून अर्धा पदर सोडलेला), पायघोळ परकर, पोलका, ओढणी, सदरा, लेंगा, धोतर, कोट, लाल किंवा काळ्या रंगाची टोपी असा पारंपरिक पोषाख करणारे खूप कमी आहेत. सध्या गाऊन, वन पीस, स्कर्ट-टॉप, जीन्स, ब्लेझर, शर्ट, जॅकेट असे पोषाख परिधान करतात दिनिका रॉड्रिग्जने सांगितले.

त्या दिवशी चर्चमध्ये साधारण दोन तास प्रार्थना होते, येशूच्या जन्माचा आनंद साजरा करण्यात येतो. घरी परतल्यानंतर सर्व कुटुंबीय, शेजारी एकत्र येऊन गाणी म्हणतात. ‘नाताळचा सण आमुचा, हा हौसेचा.’, ‘स्वर्गात परमेश्वराला व पृथ्वीवर सज्जनांना शांति.’, ‘शांतीची ही रजनी, सुखाची ही कहाणी.’, ‘नीज रे ख्रिस्ता, नीज रे ख्रिस्ता ; माऊली मेरी हलविते तुजो पाळणा.’ अशी काही पारंपरिक गाणी गायली जातात. तसेच तरुणांकडून नवीन गाण्यांची ही मफील सुरू असते.

जुहू भागात पूर्वी बांडी बनवली जात असे. मातीच्या मडक्यात बटाटा, वांगी, भेंडी, फरसबी, अंडी, मीठ-मसाला घालून एकत्र करून जमिनीच्या आत निखाऱ्यांवर शिजवले जात होते. रात्री गाणी, जेवण होत असे. आता बांडीची जागा बाब्रेक्यू, बिर्याणी, पार्सल, हॉटेलातील जेवणाने घेतली आहे.

दुसऱ्या दिवशी पूर्वी कुलाबा भागात तांदळाची खीर, फळे, नारळाचा नवेद्य दाखवला जात होता असे सौमिल जॉ सांगितले. ईस्ट इंडियन कुटुंबांमध्ये काही पारंपरिक पदार्थ जेवायला बनवले जातात. मोईले, खुड्डी (मटन आणि भोपळ्याची भाजी), कांजी (पातळ भाजी) बोंबील चटणी, गाजर-पपईचे लोणचे, सांदण, फुगे, आप्पे, अरोझ फुगात (काजू आणि प्लम घातलेला भात). गोड पदार्थामध्ये डोव्ह नट्स, पॅनकेक, काकडीचा केक, तांदळाची भरड, गूळ आणि नारळाचे दूध घालून बनवलेला केक, रवा आणि दह्य़ापासून बनवलेला केक, ढेबरे (फळांच्या रस आणि तांदळाच्या पिठापासून बनवलेला केक) इत्यादी काही पारंपरिक पदार्थ आजही बनवले जातात असे ही सौमिल यांनी सांगितले.

चर्चमध्ये, संकुलात मुलांसाठी, मोठय़ांसाठी स्पर्धाचे, संगीत-नृत्याच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. नाताळ गोठय़ांची स्पर्धा प्रत्येक आळीमध्ये होते. पूर्वी चर्चच्या आवारात जत्रा लागत असे. आता ट्रॅफिक, अपुरी जागा, गर्दी यामुळे जत्रा होत नाहीत. तात्पुरत्या स्वरूपाची छोटी-मोठी दुकाने तेवढी लागतात. चर्चतर्फे नाताळ पुस्तिका काढली जाते. ज्यात सामाजिक, आध्यात्मिक, कौटुंबिक, आरोग्य विषयक लेख, कथा, कविता असतात. नाताळ अंकांचे ही वाचन या काळात होते.