पावलस मुगुटमल – response.lokprabha@expressindia.com
नाताळ-नववर्ष विशेष
पुणे
नाताळच्या निमित्ताने होणाऱ्या पाटर्य़ा, तसंच जल्लोष यांचं दर्शन या काळात होतं. पुण्याने ख्रिसमसच्या सणाला खास मराठमोळा टच दिला आहे. तोही अनुभवता येतो.

कोणत्याही सणाची चाहूल पहिल्यांदा बाजारपेठेला लागते. त्यानुसार सध्या पुण्यातही नाताळ सणासाठी बाजारपेठा सजल्या आहेत. खरेदीही जोमाने सुरू झाली आहे. इतर कोणत्याही शहरात असते तसेच नाताळ सणाचे वातावरण पुण्यातही आहे. मात्र, नाताळला असलेला मराठमोळा बाज हे येथील वैशिष्टय़ आहे. पुण्यात पहिले चर्च बांधण्यासाठी सवाई माधवराव पेशव्यांनी परवानगी दिली. त्यानंतर १७९२ मध्ये पेशव्यांनी दिलेल्या जागेवर क्वॉर्टर गेट येथे ‘सिटी चर्च’ उभे राहिले. त्यानंतर इंग्रजांच्या काळात लष्कर परिसर, खडकी आदी भागांत चर्चच्या ऐतिहासिक वास्तू बांधल्या गेल्या. आजही त्या दिमाखात उभ्या आहेत. अलीकडच्या काळात नव्याने काही चर्च उभे राहिले. नाताळाच्या निमित्ताने या वास्तूंवर आकर्षक रोषणाई साकारण्यात आली आहे. त्याचप्रमाणे चर्चच्या आवारात येशू ख्रिस्ताच्या जन्माचे देखावेही उभारण्यात येत आहेत. पुणे आणि परिसरामध्ये नाताळ साजरा करण्यात काहीशी भिन्नता असून, ती येथे राहणाऱ्या मराठी ख्रिस्ती बांधवांनी निर्माण केली आहे. पुणे आणि जवळच्या िपपरी-चिंचवड शहर आणि परिसरात केरळी आणि मूळ गोव्याकडील ख्रिश्चनांची कुटुंबेही आहेत. लष्कर, कोरेगाव पार्क भागात त्यांची संख्या मोठी आहे. कोरेगाव पार्कमध्ये अनेक परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत. त्यांच्याकडून पाश्चिमात्य परंपरेप्रमाणे नाताळ उत्साहात साजरा केला जातो. मात्र, मराठी घरांमध्ये नाताळ साजऱ्या करण्याच्या पद्धतीला दिवाळीचा हलकासा स्पर्श आहे.  पुणे, िपपरी-चिंचवड शहरांमधील ख्रिस्ती बांधवांमध्ये मराठी ख्रिश्चनांची संख्या सर्वाधिक आहे. रोजगार, व्यवसायाच्या निमित्ताने राज्याच्या विविध भागांतून येऊन शहरात वसलेल्या अनेक ख्रिस्ती कुटुंबीयांची या शहरांत आता तिसरी-चौथी पिढी आहे. राज्याच्या आणि विशेषत: पुण्याच्या संस्कृतीशी त्यांची नाळ अगदी घट्ट आहे. त्यामुळेच धर्मातील सर्व प्रकारच्या चालीरीती पाळतानाही त्यांचा नाताळ दिवाळीमय असतो.

दिवाळीला करंज्या, चकल्या, चिवडा, शंकरपाळे, अनारसे आदी फराळ केला जातो. बहुतांश मराठी ख्रिस्ती घरांमध्ये नाताळला हाच फराळ असतो. गोवनीस किंवा केरळी ख्रिस्ती कुटुंबीयांमध्ये केकची मेजवानी असते. मात्र, मराठी ख्रिश्चनांच्या घरात नाताळात करंज्या- चकल्यांचाच गंध दरवळतो. सणाच्या निमित्ताने घरी येणाऱ्या पाहुण्यांना हाच फराळ दिला जातो. नाताळचे वेगळेपण म्हणून त्यात केकचाही समावेश असतो. दिवाळीत एकमेकांना फराळाची ताटे दिली जातात अगदी तशीच ताटे ख्रिस्ती बांधव एकमेकांना तसंच दिवाळीत ज्यांनी फराळाची ताटे दिली त्यांना देतात. नाताळातही फराळाला मागणी असल्याने काही वर्षांपासून दिवाळीप्रमाणे नाताळातही शहरातील मिठायांच्या दुकानांमध्ये फराळ उपलब्ध होतो. चमचमते रंगीबीरंगी तारे, बॉल्स आणि बेल्सने सजविलेला ‘ख्रिसमस ट्री’ घरात ठेवला जातो. पण, त्याचबरोबरीने नाताळच्या दिवशी काही कुटुंबे घराला तोरण बांधून दारात रांगोळीही रेखाटतात. पणत्यांऐवजी आकर्षक, नक्षीदार मेणबत्त्यांचा प्रकाशोत्सव केला जातो, हाच काहीसा फरक. सणासाठी नवे कपडे घेताना अनेक ख्रिस्ती बांधव कुर्ता-पायजमा, शेरवानीलाही पसंती देतात. दिवाळीत सणाच्या आनंदाबरोबरच दिवाळी अंकांतून साहित्यिक फराळाचीही मेजवानी दिली जाते. पुण्यात तर दिवाळी अंकांची मोठी बाजारपेठ आहे. अलीकडे पुण्यातून नाताळाच्या कालावधीत काही नाताळ अंकही निघू लागले आहेत. अमेरिकेत नाताळ अंक ही संकल्पना फार जुनी आहे. पण, शहरात निघणाऱ्या नाताळ अंकांची संकल्पना ही दिवाळी अंकांना मिळणाऱ्या मोठय़ा यशातून पुढे येत आहे.

घरोघरी जाऊन नाताळ गाणी म्हणण्याची परंपराही शहरात आहे. येशू ख्रिस्ताच्या जन्माची वार्ता सांगणारी आणि महती सांगणारी गीते मूळ इंग्रजीमध्ये आहेत. ‘कॅरोल’ म्हणून ती लोकप्रियही आहेत. मराठी ख्रिस्ती बांधवांनी मराठीतून गाणी निर्माण केली. नाताळच्या आधी १० ते १५ दिवसांपासून ती घरोघरी जाऊन गायली जातात. शहराच्या विविध चर्चमधील मुले-मुली ख्रिस्ती घराघरांत जाऊन ही गीते गातात. त्यातून नाताळचे वातावरण तयार होते. शहरात रोमन कॅथोलिक, प्रोटेस्टंट आदी दोन्ही पंथांचा प्रभाव असला, तरी या पंथातही मराठी ख्रिस्ती बांधव मोठय़ा प्रमाणावर आहेत. मराठी ख्रिश्चनांसाठी चर्चचे कामकाज आणि प्रार्थना सभा मराठीतूनही घेतल्या जातात. नाताळच्या निमित्ताने होणाऱ्या पाटर्य़ा, तरुणाईचा जल्लोष, पाश्चात्त्य परंपरेचा प्रभाव आदी गोष्टीही शहरातील नाताळ वातावरणात दिसत असला तरी मराठी संस्कृतीच्या स्पर्शातून साजरा होणारा मराठमोठा नाताळ मात्र लक्ष वेधून घेतो.