अभिमन्यू लोंढे – response.lokprabha@expressindia.com
नाताळ-नववर्ष विशेष
सावंतवाडी
१६५२ मध्ये उभारलेले सावंतवाडीतील चर्च तेथील राजघराण्याशी समकालीन आहे. त्यामुळे इथली ख्रिसमसची परंपराही जुनी आहे.

ख्रिसमस सण आनंदात साजरा करण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात तसेच सावंतवाडीमध्ये ख्रिश्चन बंधू  तयारीस लागले आहेत. येशू ख्रिस्ताचा जन्म आनंदात साजरा करण्यासाठी ख्रिश्चन धर्मीय घरोघरी रोषणाई करतात. गोवा राज्याच्या सीमेवर सिंधुदुर्ग जिल्हा आहे, त्यामुळे या सणाला आणखीनच महत्त्व येते. सुमारे ४०० वर्षांपासून ख्रिसमस सावंतवाडीत साजरा केला जात असल्याच्या आठवणी आहेत. सावंतवाडीत १६५२ मध्ये चर्च उभे राहिले आहे. सावंतवाडी संस्थानच्या राजघराण्याला समकालीन हे चर्च आहे त्यामुळे सावंतवाडीत ख्रिसमस सण साजरा करण्याची परंपरा जुनीच आहे.

येशू ख्रिस्ताचा जन्मदिनाच्या आधीच्या रविवारपासून चर्चमध्ये फेस्त साजरे केले जाते. पवित्र वर्षांची ही सुरुवात मानली जाते. यानंतर येशू ख्रिस्ताचा जन्म दिनाचा संदेश घेऊन प्रत्येक घरात आणि वाडय़ात कॅरल सिंिगग (गायन) केले जाते. ख्रिस्त धर्मीयांमधील युवक घरोघरी जाऊन गायन करून येशू ख्रिस्ताच्या जन्माचा संदेश देतात. यामुळे सणाची चाहूल घरोघरी लागून राहिलेली असते त्यामुळे क्षणाचा आनंद द्विगुणित होतो. कोकणात गणपती आणि मुंबईत दिवाळी साजरी केली जाते या काळात घरांना रंगरंगोटी केली जाते तसेच फटाक्यांच्या आतषबाजी, दिवाळीत आकाश कंदील, घरांना रंगरंगोटी करतात.

या सणाच्या पूर्वसंध्येला घराच्या बाहेर व घरात येशू ख्रिस्ताचा जन्म देखावा केला जातो. ख्रिसमस ट्री सजवला जातो तसेच गोठे उभारले जातात. या गोठय़ात तीन मेंढपाळ राजे भेटवस्तू घेऊन येतात असे देखावे असतात. येशूच्या जन्म ताऱ्याचा शोध घेत दूत येतो अशी गोठय़ांची मांडणी असते. ख्रिश्चन धर्मीय घरांना रंगरंगोटी करतात करतात. नवीन कपडेलत्ते देखील खरेदी केले जातात.

सावंतवाडीत १६५२ मध्ये चर्च उभारले गेले आहे. या चर्चमध्ये ख्रिश्चन धर्मीयांची खूप गर्दी होत असल्याने सन १९७७ मध्ये दुसरे चर्च बांधण्यात आले आहे. २४ डिसेंबर रोजी रात्री अकरा वाजता चर्चमध्ये पवित्र मिसा (पवित्र प्रार्थना) केली जाते. या वेळी आबालवृद्धांपासून सगळेजण चर्चमध्ये जमतात.

या सणाच्या निमित्ताने करंजी, पुरी, वडे, केक असे विविध पदार्थ केले जातात. एकमेकांकडे हे पदार्थ खाण्यासाठी जातात तसेच िहदू धर्मीयदेखील या सणाच्या निमित्याने ख्रिश्चन धर्मीयांच्या घरी सणाच्या काळात जातात. िहदू-ख्रिश्चनांचे प्रेमाचे नातेदेखील या काळात पाहायला मिळते. या काळात सांताक्लॉज लहान मुलांसोबत घरोघरी फिरतो. ख्रिसमस सणाच्या पूर्वसंध्येला काही शाळातदेखील ख्रिसमसचे सेलिब्रेशन केले जाते. या सणाचा आनंद द्विगुणित होण्यासाठी चर्चमध्ये शुभ संदेशाची प्रार्थना होते. सावंतवाडी शहरातील ऐतिहासिक वारसा असणाऱ्या चर्चमध्ये सणाच्या काळात मोठी गर्दी होते.
छायाचित्र – अनिल भिसे