05 December 2019

News Flash

हरवलेली सर्कस…

आज पन्नाशीत असलेल्यांसाठी त्यांनी लहानपणी पाहिलेली सर्कस म्हणजे एक थरार असतो.

भारतात सर्कस हा व्यवसाय जवळपास १३० वर्षें जुना आहे.

कल्पना पांडे – response.lokprabha@expressindia.com
सर्कस.. आज पन्नाशीत असलेल्यांसाठी त्यांनी लहानपणी पाहिलेली सर्कस म्हणजे एक थरार असतो. उंचावरून अवघड आणि वेगवान झोके घेणाऱ्या त्या मुली, सतत हसवणारा विदूषक, िरगमास्टरच्या तालावर कसरती करणारे प्राणी.. आता ते सगळं हरवलं आहे.

मागच्या वर्षी मुलाच्या शाळेत वेशभूषा स्पध्रेसाठी वेगवेगळ्या पोशाखात यायला सांगण्यात आले. आम्हाला त्याला विदूषकाच्या वेशभूषेत तयार करायचे सुचले. आम्ही त्याच्याशी विदूषक बनण्याविषयी बोललो तेव्हा ते काय असते हे त्याला माहीत नव्हते. सुरुवातीला तो तयार झाला. आम्ही दोघांनी त्याच्यासाठी ‘सी द सर्कस – टू सेव्ह द सर्कस’ असे सर्कस तंबू आणि विदूषक यांचे चित्रही एका फलकावर रेखाटले. पण विदूषकाचा पोशाख पाहूनच तो दचकला आणि त्याने तो घालण्यास स्पष्ट नकार दिला. रात्री उशिरापर्यंत फलक बनवणं आणि आवडीने केलेली तयारी पाण्यात गेल्याचे आम्हाला फार वाईट वाटत होते. मग विचार केला की ज्याला विदूषक, सर्कस ही भानगडच माहीत नाही त्याला त्याचे काय आकर्षण असेल? आजची पिढी या गोष्टीला मुकलेली आहे.

आम्ही लहान असताना गावात अचानक एक दिवस एक मोठा लाइट आकाशात मारला जायचा. लगेच लोकांना समजायचं की गावात सर्कस आली! रस्त्यांवर सायकल रिक्षामध्ये दवंडी पिटली जायची. सर्कसमधल्या प्राण्यांचं आकर्षण म्हणून लहानांपासून मोठय़ांपर्यंत वध्र्याच्या रामनगर जवळच्या एका मैदानाभोवती जमू लागायचे. ते मोठय़ा उत्सुकतेने दोन गोष्टी पाहायचे. एक विदेशातून सर्कसमध्ये काम करण्यासाठी आलेल्या गोऱ्या गोऱ्या मुली आणि दुसरे ते जंगली प्राणी! सर्कसमध्ये काम करणाऱ्या या मुलींचेही आपले वैशिष्टय़ होते. कपाळापासून पायापर्यंत अगदी सारखा रंग, सर्वाचा एकसारखा सुडौल बांधा, चेहऱ्यावर हसू. ग्रामीण तसंच छोटय़ा शहरातल्या लोकांनी अशा महिला पहिल्याच नसायच्या. अशा सुंदर मुली पाहायची संधी फक्त सर्कसमधेच मिळायची. प्राणी व पुरुष कलाकारांपेक्षा सगळ्यांच्या नजरा या महिला कलाकारांकडे सतत जायच्या.

काही दिवसांमध्ये सर्कशीचा तंबू तयार होऊन तिकिटांची विक्री सुरू व्हायची. सर्कशीच्या जाहिरातींचा जमिनीवरून आकाशाकडे मारलेला व सतत जागा बदलणारा प्रकाश आसपासच्या गावातल्या भागात देखील दिसायचा. खेडेगावात फक्त प्रकाश पाहून सर्कसचा तोंडी प्रचार सुरू व्हायचा. मग या ग्रामीण ठिकाणी मनसुबे बांधणे, नियोजन आखणे सुरू व्हायचे. बैलगाडय़ांमध्ये, बंडय़ांमध्ये बसून अख्खं कुटुंबच्या कुटुंब शहरांकडे धाव घ्यायचं. कधीकधी एकाएका गावातून २०-१५ बंडय़ा एकाच वेळी निघायच्या. यात म्हाताऱ्या आजीबाई ते नातवापर्यंत सर्वाचा सहभाग असे. त्यादरम्यान एखाद्या जत्रेसारखा माहोल तयार होऊन जायचा.

तेव्हा त्यावेळी आजसारखे रेडिमेड चिप्स पॅकेट, समोसे, आईस्क्रीम, थंड पेय, बिस्किटं, चॉकलेट्स वगैरे गोष्टी विक्रीला नव्हत्या. कधीतरी पिवळ्या पुडक्यांमधे पॉपकॉर्न विकणारे दिसायचे. थोडक्यात खाण्यापिण्याच्या गोष्टी विक्रीला नसल्याने गावगडी शेंगदाणे, फुटाणे व मुरमुरे खायला घेऊन जायचे. हीच त्यावेळची खाऊ संस्कृती आणि टाइमपास. या सर्कशीत घटनादेखील मजेदार असायच्या. कधी न पाहिलेला, पूर्ण मैदान व्यापलेला फार उंच असा तंबू, आतमध्ये बसण्यासाठी लाकडी फळीला फळी जोडून गोल रचना केलेले बाक, अगदी उंच दोरखंडाच्या शिडय़ा, आसपास मनोरंजनासाठी फिरणारे विदूषक असं एकंदरीत दृश्य असायचं. सर्कस सुरू होताच गोऱ्या मुली गोल िरग्ज फिरवत िरगणामध्ये यायच्या तेव्हा टाळ्यांचा गडगडाट असायचा. त्यावेळी हत्ती, वाघ, सिंह, अस्वल व वेगवेगळ्या रंगाचे पक्षी असे जंगली प्राणी फक्त सर्कसमध्ये बघायला मिळायचे.  फक्त नावापुरता एक सिंह किंवा वाघ नसून एका िपजऱ्यात चार ते पाच सिंह-वाघ असायचे. इतके सारे प्राणी एकत्र पाहून बघणाऱ्यांचे हृदयाचे ठोके चुकायचे. हंटर म्हणजे चाबूक घेऊन सिंह वाघांना एका रांगेत उभं करून आगीच्या िरगणातून उडी मारायला लावणारा िरगमास्तर हिरो असायचा. हे तीन तास कसे निघायचे हे कळायचेच नाही.

मागच्या १०-१५ वर्षांत मनोरंजनाची साधने अगोदरच्या ६०-७० वर्षांतही बदलली नव्हती एवढी बदलली. भारतात एकेकाळी सर्कसकडे राष्ट्रीय वारसा म्हणून पहिलं जायचं. सरकारी पाहुण्यांना सर्कस आवडीने दाखवली जायची. बहुतांश सर्कस कंपन्यांचे मालक व कलाकार खासकरून मुली केरळी असायच्या. पण आता त्याऐवजी उत्तरपूर्व व झारखंडमधील मुलांची संख्या वाढली आहे. विदेशी कलाकार हे सोवियत रशियाचा कधीकाळी भाग असलेल्या उजबेकिस्तान, तजाकिस्तान व केनिया (कारण तिथे सर्कस हा प्रकारच नाही) सारख्या आफ्रिकन देशांतून दिसतात. सर्कस त्याअर्थाने सर्वात धर्मनिरपेक्ष आणि उदार हृदय असलेलं ठिकाण आहे. तिथे महिलांना मानाची वागणूक असते. सर्कस एखाद्या कुटुंबासारखी चालते. तिथे लोक एकत्र राहतात आणि काम करतात. बाहेरच्या जगाशी फारसा संबंध न उरल्याने सर्कशीत काम करणारे आपसात लग्न करतात.

भारतात सर्कस हा व्यवसाय जवळपास १३० वर्षें जुना आहे. १९९० च्या काळात देशात ३०० सर्कस होत्या. त्या आज कमी होत केवळ २५ च्या आसपास राहिल्या आहेत. पॉकेमोन गो, यु टय़ूब व्हिडीओज, ऑनलाइन गेम्सच्या या आभासी जगात आजच्या मुलांना सर्कसचं फारसं आकर्षण वाटत नाही. म्हणून ती पाहायला फारसं फिरकत नाहीत आणि सर्कस कंपन्यांनाही वाढता प्रवास खर्च, मैदानाचे भरमसाट भाडे, प्राणी मित्र संघटनांविरुद्ध चाललेले कोर्ट खटले आणि मर्यादित प्राणी यामुळे आता पूर्वीसारखं आकर्षण न राहिलेली सर्कस चालवण्यात स्वारस्य दिसत नाही. सर्कस मालक याचं खापर १९९७ साली वन्यप्राण्यांच्या वापरावर आलेली बंदी आणि २०११ साली सर्वोच्च न्यायालयाने लहान मुलांनी सर्कसमध्ये काम करण्यावर घातलेली बंदी यावर फोडतात. त्यांच्या मते ही मुलं सर्कसमध्ये काम करणाऱ्या कलाकारांचीच मुलं असतात. १२ वर्षांंच्या वयात शरीरात लवचिकता असते तेव्हाच त्यांना प्रशिक्षण देता येतं, नंतर ते शक्य नसतं. पर्यावरण तसंच वन खातं सर्कसमध्ये हत्ती, पक्षी, घोडे, कुत्रे यांचा वापर करण्यास बंदी घालण्याच्या बाजूने आहे. ज्या दिवशी ही बंदी येईल त्या दिवशी उरल्यासुरल्या सर्कसही बंद पडतील. महाराष्ट्राची १०५ वषेर्ं जुनी जेमिनी सर्कसदेखील आज शेवटच्या घटका मोजत आहे. आज अशी परिस्थिती आहे की एक ते दोन हजारांच्या आसन क्षमतेच्या तंबूत काही शे लोक आपल्या मुलांना सर्कस दाखवण्यासाठी घेऊन येतात. पण ती मुलंदेखील सर्कस बघण्याऐवजी मोबाइलवर व्हिडीओ गेम खेळत बसतात. आता रेम्बो, एशियाड, गोल्डन, अपोलो, अजंता अशा फक्त दहा सर्कस कंपन्या सगळीकडे दौरे काढत आहेत. बाकी जेमिनी, मेट्रो, रॉयल, राजकमल, ओरिएंटल आदी सर्कस कंपन्या संपल्यात जमा आहेत. सर्कस मालकांना १२५ ते १५० कर्मचाऱ्यांचा ताफा, प्राणी यांचा रोजचा गाडा चालवायला प्रचंड खर्च येतो. सर्कस चालू असताना मैदानाचं भाडं,  वेगवेगळ्या प्रकारचे सात परवाने, स्थानिक प्रसारमध्यमात जाहिरात हा सगळा खर्च प्रचंड असतो. इतकं करूनही प्रेक्षक काही येत नाहीत.

अर्थात फक्त आपल्याकडेच नाही तर, संपूर्ण जगभरात सर्कसची हीच परिस्थिती आहे. प्रेक्षकांची रोडावत चाललेली संख्या, खालावलेले उत्पन्न, संपलेल्या संधी यामुळे ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’ म्हणून गौरविली गेलेली अमेरिकेची १४६ वर्ष जुनी रीिन्ग्लग ब्रदर्स व बर्नाम एण्ड एम्प बेली सर्कस २०१७ च्या मे महिन्यात बंद पडली. युरोपमध्ये जन्माला आलेल्या सर्कसला अमेरिकेच्या कॅनव्हासच्या जाड कपडय़ाच्या तंबूने चालतं फिरतं बनवलं होतं. पिळदार शरीराच्या कलाकारांची कर्तबगारी आणि आफ्रिका, आशियातल्या जंगलातील विविध प्राण्यांचे खेळ पाहण्यासाठी गर्दी वाढू लागल्याबरोबर याचे व्यवसायीकरण होऊ लागले. मोठय़ा शहरातील लोक ज्या सर्कसचे रसभरीत वर्णन करायचे तीच सर्कस तशाच स्वरूपात ट्रेनचे जाळे वाढले तसे कानाकोपऱ्यांच्या गाववासीयांनाही पाहायला मिळू लागली. २०व्या शतकात महिला सर्कशीचा अविभाज्य भाग ठरल्या व हजारो मेहनती तरुणींना या करमणूक व्यवसायाने रोजगार उपलब्ध करून दिला. सर्कसची लोकप्रियता इतकी होती की राज कपूरलाही त्यावर ‘मेरा नाम जोकर’ हा चित्रपट बनवण्याचा मोह आवरला नाही. त्या काळात लहान मुलं सर्कसमध्ये काम करण्यासाठी घर सोडून पळून जायची. त्यामुळे सर्कस हे एकेकाळी सर्व वयाच्या लोकांसाठी निखळ आनंद देणारं माध्यम होतं. २० व्या शतकाच्या मध्यंतरी १९६० पासून मनोरंजनाची साधनं बदलायला लागली.  टीव्ही, चित्रपट आणि व्हिडिओ गेम्स यांचा प्रसार वाढत गेला. त्यामुळे कॉमिक्स व सर्कस या दोघांना उतरती कळा लागायला सुरुवात झाली. शनिवार-रविवारच्या सुट्टीत मुलं कार्टून्समध्ये रमू लागली. पुढे काही वर्षांनी एनजीओ वाढल्या, आणि प्राणी संस्था-संघटनांनी सर्कसमध्ये प्राण्यांच्या वापरावर बंदी घालावी म्हणून जगभर चळवळ सुरू केली.  न्यायालयीन खटल्याची मालिका चालवली. केवळ हत्ती किंवा इतर प्राणी वापरल्याने अमेरिकेच्या अनेक शहरांत सर्कसच्या खेळाला परवानग्या नाकारण्यात आल्या. २००९ साली ‘ग्रेटेस्ट शो ऑन अर्थ’च्या केनेथ फेल्ड यांना दशकांपासून त्यांच्या सर्कसचं प्रतीक चिन्ह असलेला जम्बो हत्ती काढावा लागला आणि अनेक वर्षांच्या लढय़ानंतर २०१६ साली त्यांच्या ४० हत्तीची रवानगी फ्लोरिडा इथे संरक्षित ठिकाणी करावी लागली. हत्ती नसल्याने तिकिटांचे दर कोसळले, विक्री एकदम घटली. सर्व सर्कस कंपन्यांना हेच आपलेही भविष्य आहे हे कळून चुकले. आता सर्कस कंपन्या फोन अ‍ॅप, नवीन स्टंट, नाटय़प्रयोग वगैरे जोडू लागल्या आहेत. आत्ता फक्त आकाराने छोटय़ा आणि वैशिष्टय़पूर्ण सर्कस तग धरू शकत आहेत!

सर्कस हा आपल्या देशात गेल्या सव्वाशे वर्षांपासून मनोरंजनाचा भाग बनला असला तरी तिला सरकारने सांस्कृतिक व कला विभागाची मान्यता दिलेली नाही. भारतात सर्कस कलाकार क्रीडा व युवा घडामोडींच्या विभागांतर्गत येतात. असंघटित कामगार असल्यामुळे कोणत्याच सवलती सुविधा या कलाकारांना मिळाल्या नाहीत. त्यांचे कल्याण मंडळदेखील नाही. या कलाकारांचे उत्पन कामाप्रमाणे आठ ते २० हजारांच्या दरम्यान असते. सर्कस कंपनी बंद पडते तेव्हा त्यातल्या कलाकारांना पैशासाठी मिळतील ती कामं करावी लागतात. त्यात फारसे पैसेही मिळत नाहीत. सर्कस बंद करायला सर्वात जास्त विरोध सर्कसमध्ये काम करणाऱ्यांचाच असतो. सर्कसच्या जीवनाशी एकरूप झाल्याने बाहेरच्या जगात गेल्यावर त्यांच्या जगण्याची घडी बसत नाही. अनेक लोकांचे नवीन तंत्र कौशल्य शिकण्याचे वय संपलेले असते. सततच्या प्रवासामुळे घर व समाजाशी नाळ तुटलेली ही भटकी माणसं बाहेरच्या कमी पगार आणि वाईट जीवनमानापेक्षा आपल्या फोिल्डग कॉट आणि दोन-तीन पेटय़ांतील सामानाबरोबरचे जग अधिक सुरक्षित समजतात. उदाहरणच द्यायचं तर विदूषकांना सर्कसमध्ये मान मिळतो. पण बाहेरचे जग त्यांच्यासाठी निष्ठुर आहे असे त्यांना वाटते. इथे सोवियत रशियाचं उदाहरण देणे खूप गरजेचे आहे.

१९१७ साली रशियात कम्युनिस्ट विचारांच्या बोल्शेविक क्रांतीपूर्वी सर्व सर्कस कंपन्या खासगी  होत्या. पण क्रांतीनंतर त्यांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्यात आले. सर्कस शोचे उपन्न शासन घ्यायचे, पण त्याबदल्यात सर्कस कंपन्यांना घशघशीत सोयीसुविधा, सरकारी पाठबळ मिळू लागले. केवळ मनोरंजनाचे साधन म्हणून नव्हे तर रोजगार देणारा कलाप्रकार म्हणून सर्कस विकसित करण्यात आली. त्यासाठी सरकारकडून विविध ठिकाणी प्रशिक्षण केंद्रांची उभारणी करण्यात आली. १९२९ साली संयुक्त सोवियत रशियन सरकारने त्यांची राजधानी मॉस्को इथे ‘स्टेट कॉलेज ऑफ सर्कस अ‍ॅण्ड व्हरायटी आर्टेस’ची उभारणी केली. सोव्हियत रशियाचा भाग असलेल्या गणराज्यांमध्ये ७० मोठय़ा प्रशिक्षण इमारती बांधल्या गेल्या. नव्या दमाचे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध झाल्याने आणि पैशांची काळजी मिटल्याने सोवियत सर्कस कंपन्या जगभर दौरे करू लागल्या. सर्कस कलाकारांना सन्मान दिले गेले. १९४४ साली सोव्हियत युनियनमध्ये सहभागी देशांची पहिली स्पर्धा भरवण्यात आली. दरवर्षी होणाऱ्या या स्पध्रेत जिंकणारा, संयुक्त सोव्हियत रशियाच्या सर्वात चांगल्या सर्कस कार्यक्रमाचा भाग बनायचा. १९६०च्या काळात या स्पध्रेच्या विजेत्यांना सोव्हियत सर्कस आंतरराष्ट्रीय सहलीत सहभागी केले जायचे. या सर्व सर्कस कंपन्यांनाच संपूर्ण जगात प्रसिद्ध ‘मॉस्को सर्कस’ म्हणून ओळखले जायचे. सर्कस हे कला व अभिमानाचे केंद्र बनले. निकेता ख्रुश्र्च्ोवनंतर लियोनिद ब्रेझ्नेव राष्ट्रप्रमुख झाले. जेलिना या त्यांच्या मुलीची दोन्ही लग्ने सर्कस कलाकारांशीच झाली होती. १९७१ साली मॉस्को विद्यापीठाजवळ लेनिन हिल या ठिकाणी अत्याधुनिक तांत्रिक सुविधायुक्त विशाल हॉल व तीन हजार ३०० आसन क्षमतेच्या मॉस्को सर्कस ऑन लेनिन हिल्स (न्यू सर्कस)ची उभाराणी झाली. हे ठिकाण आजही जगातले एकमेवाद्वितीय इनडोअर सर्कस केंद्र आहे. दुसऱ्या महायुद्धाच्या काळातही रशियन सर्कस जगभरात प्रयोग करण्यात सर्वात आघाडीवर राहिली. या प्रशिक्षण केंद्रातून शिकलेल्यांची कला, स्टंट आणि अभियांत्रिकी कौशल्य सर्वाच्या पुढे होते. आजही त्यांना कुठेच तोड नाही. या कलाकारांना जगभरातून सर्कस कंपन्यांमध्ये चांगल्या वेतनावर मागणी असायची. त्यामुळे हे मनुष्यबळ अमेरिका, युरोप, आस्ट्रेलिया इथल्या सर्कस कंपन्यांमध्ये कामावर लागले. रशियन सर्कस तेव्हा जगात कलात्मक उंचीवर पोहोचली होती. सरकारच्या पाठबळ व संशोधनामुळे रशियन कलाकार जगातील सर्वात असामान्य आणि नावीन्यपूर्ण कृती सादर करायचे. त्यांना काहीही अशक्य नाही असा समज सर्कस जगात रूढ झाला होता. १९७०-८० साली या विद्यार्थ्यांना सर्कस प्रशिक्षण विद्यालयात त्यांच्या आवडत्या शाखेत दर आठवडय़ाला २० तास प्रशिक्षण दिले जायचे. प्रशिक्षण पूर्ण केलेल्या नोंदणीकृत महिला, पुरुष उमेदवारांची देशभरातल्या ७० प्रशिक्षण शाळांमध्ये विभागणी केली जायची. या सर्कस कलाकारांना सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच चांगली जीवनशैली जगायला मिळायची. सर्कसचे नियमित प्रयोग व्हायचे आणि निवृत्ती वयानंतर चांगले पेन्शन, मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी शासनाची असायची. अगदी लहान मुलांसाठी शासकीय पाळणाघराची सोय आणि गर्भवती महिला कलाकारांना मातृत्व रजा, प्रवासाची व राहण्याची आरामदायक सुविधा असायची. कम्युनिस्ट सरकार सर्कसकडे लोकमनोरंजन म्हणून पहायचे. ऑपेरा किंवा बॅले नृत्य वगैरे महागडय़ा मनोरंजन पर्यायांपेक्षा सर्कस खूप स्वस्त असल्याने तिला गरिबांचे कला व मनोरंजन केंद्र म्हणून मान्यता मिळाली. कम्युनिस्ट राजवट असेपर्यंत या कलाकारांना काम व पगाराची निश्चिती होती. साहित्य, कपडे, प्रवास, जेवण व राहण्याची व्यवस्था सरकार करायचे.

१९९०-९५ पर्यंत ही प्रशिक्षण केंद्रे जगभराला भन्नाट प्रयोग करून दाखवणारे उमदे कलाकार देत राहिली. सोव्हियत युनियनला उतरती कळा लागल्याबरोबर ही सर्कस प्रशिक्षण प्रदर्शन केंद्रे पांढरा हत्ती वाटू लागली. रशियात सर्व पातळीवरचा खर्च कमी करण्याची धोरणे आखण्यात आली. भ्रष्टाचार वाढला, रशियन फेडरेशनच्या सांस्कृतिक समितीने लक्ष काढून घेतले. अब्जावधींची सरकारी मालमत्ता सार्वजनिक आणि खासगी भागीदारीच्या नावाखाली खासगी हातांमध्ये सोपवणे वेगाने सुरू झाले. यातून बहुतांश सर्कस कंपन्या निकाली काढण्यात आल्या. २००७ साली मॉस्को स्टेट सर्कसची इमारतदेखील विकायला काढल्यानंतर रशियन जनतेकडून मोठा विरोध झाला. यामुळे राष्ट्राध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांना त्या इमारतीला खासगीकरण करण्यासाठी तयार केलेल्या सरकारी संपत्तीच्या यादीतून वगळावे लागले. सोव्हिएतमधून वेगळ्या पडलेल्या देशांमध्ये ही व्यवस्था कोलमडली पण आजही जगातल्या सर्वात प्रसिद्ध १३०० सर्कस कंपन्यांपैकी २५ टक्के कंपन्या या पूर्वी सोव्हियत रशियाचा भाग असलेल्या देशांच्या आहेत, यावरून त्याचा आवाका लक्षात येतो.

भारतात कित्येक दशकांपासून केरळ सरकार सर्कस कंपन्यांना अत्यंत कमी कर व स्वस्त जमीन उपलब्ध करून देत आले आहे. तिथे माकपच्या सरकारने सत्तेत आल्यानंतर ९ सप्टेंबर २०१५ रोजी केरळ संगीत नाटक अकादमीतर्फे सर्कस कलाकांसाठी एक लाखांपर्यंतचा वैद्यकीय विमा जाहीर केला. तसेच रुग्णालयात दाखल झाल्यास सर्कस कलाकाराला दररोज एक हजार रुपयांची आíथक मदतदेखील जाहीर केली. थिएटर, संगीत, नृत्य, कथाप्रसंग (कथाकथन) कलाकारांना लागू असलेल्या सर्व विमा व वैद्यकीय सुविधा सर्कस कलाकारांसाठी लागू करण्यात आल्या. त्यांना सरकारी पारितोषिकांसाठी पात्र धरण्याचेदेखील केरळ सरकारने जाहीर केले. १७ एप्रिल २०१७ रोजी केरळ सरकारनेच केरळ राज्यातील २५० सर्कस कलाकारांसाठी पेन्शनची तरतूद केली आहे. हा एकमेव अपवाद वगळता बाकी सर्व राज्य सरकारे व केंद्र सरकार या बाबतीत पूर्णपणे उदासीन व असंवेदनशील आहेत.

आम्ही मुलाला सर्कस पाहायला घेऊन गेलो तेव्हा तो पहिल्यांदाच सर्कस पाहत असल्यामुळे आ वासून सगळ्या गोष्टी पाहत होता. मी पाहिलेली जुनी आणि ही नवीन सर्कस यांची तुलना करण्यात ते तीन तास घालवले. घरी आल्यावर काही दिवस माझा मुलगा ‘मी मोठा होऊन सर्कशीत काम करणार’ असं म्हणत राहिला. त्यावेळी  आपण भाग्यवान, आपल्याला खरी सर्कस पहायला मिळाली. आता मात्र ती हरवलेली आहे.

कुणालाच नकोय सर्कस

पॉकेमोन गो, यु टय़ूब व्हिडीओज, ऑनलाइन गेम्सच्या या आभासी जगात आजच्या मुलांना सर्कसचं फारसं आकर्षण वाटत नाही. म्हणून ती पाहायला फारसं फिरकत नाहीत आणि सर्कस कंपन्यांनाही वाढता प्रवास खर्च, मैदानाचे भरमसाट भाडे, प्राणी मित्र संघटनांविरुद्ध चाललेले कोर्ट खटले आणि मर्यादित प्राणी यामुळे आता पूर्वीसारखं आकर्षण न राहिलेली सर्कस चालवण्यात स्वारस्य दिसत नाही.

First Published on January 18, 2019 1:03 am

Web Title: circus
Just Now!
X