07 July 2020

News Flash

शोध नव्या ‘पाचक’ जीवाणूचा

मायक्रोबिअल कल्चर कलेक्शन व आघारकर संशोधन संस्थेने नुकताच ‘क्लोस्ट्रिडियम पुनेन्स’ जीवाणूचा शोध लावला.

पुण्यातील मायक्रोबिअल कल्चर कलेक्शन (एम.सी.सी.) आणि आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी नुकताच ‘क्लोस्ट्रिडियम पुनेन्स’ या जीवाणूचा शोध लावला आहे. यातलं पुनेन्स हे नाव पुणे शहराच्या नावावरून घेतलेलं आहे.

एका टाचणीच्या टोकावर एका वेळेस अब्जावधी जीवाणू असतात, असं म्हटलं जातं. मनुष्य प्राण्याचे अस्तित्व असलेला जगाचा असा कुठलाच कोपरा नाही जिथे जीवाणूंचे अस्तित्व नाही. जीवाणूंची संख्या जरी अब्जावधींमध्ये असली तरी कार्य आणि जनुकीयदृष्टय़ा संपूर्णपणे समजलेले जीवाणू फार कमी संख्येने आहेत. त्यामुळे एखाद्या नवीन जीवाणूचा शोध लागतो तेव्हा तो शोध एक अप्रूप ठरून राहतो. नुकतेच पुण्यातील मायक्रोबिअल कल्चर कलेक्शन (एम.सी.सी.) आणि आघारकर संशोधन संस्थेतील संशोधकांनी ‘क्लोस्ट्रिडियम पुनेन्स’ (Clostridium Punens) या जीवाणूचा शोध लावला. यातलं पुनेन्स हे नाव पुणे शहराच्या नावावरून घेतलेलं आहे. ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ सिस्टेमॅटिक अ‍ॅण्ड इव्होल्युशनरी मायक्रॉबायोलॉजी’ या अमेरिकन संशोधन पत्रिकेत सदर जीवाणूविषयीचा शोध निबंध नुकताच प्रसिद्धही झाला आहे.

कुठलाही नवीन शोध हा बहुधा एक अपघात असतो, असं म्हणतात. क्लोस्ट्रिडियम पुनेन्सबाबतही असेच काहीतरी झाले. एम.सी.सी.च्या डॉक्टर योगेश शौचे यांचे या संशोधनात प्रमुख योगदान राहिले. या शोधाविषयी अधिक माहिती देताना शौचे म्हणतात, ‘‘पुण्यातील एका व्यक्तीच्या आतडय़ात हा जीवाणू आम्हाला सापडला. खरे तर गेली जवळपास दहा वर्षे आमचे संशोधन चालू आहे. माणसाच्या पोटात लाखो जीवाणू असतात. या जीवाणूंचा माणसावर काय परिणाम होतो याविषयी आमचे संशोधन चालू होते. दहा वर्षांपूर्वी जेव्हा आम्ही हा अभ्यास सुरू केला तेव्हा हा अभ्यास नवीन होता. भारतीय माणसाचा आहार हा जगातील इतर माणसांच्या आहारापेक्षा वेगळा आहे. परिणामत: भारतीय माणसाच्या शरीरात आढळणारे जीवाणूही वेगळ्या गुणधर्माचे असणे अपेक्षित आहे. हा वेगळेपणा आम्ही अभ्यासत होतो. आपल्या पोटातलं वातावरण हे प्राणवायूविरहित असतं. अशा वातावरणात आढळणाऱ्या जीवाणूंचा अभ्यास करणे हाही आमच्या संशोधनाचा एक भाग होता. या सर्व एकंदरीत संशोधनाचा परिणाम हा ‘क्लोस्ट्रिडियम पुनेन्स’चा शोध लागण्यात झाला.’’

प्राणवायूविरहित वातावरणात राहणाऱ्या जीवाणूंचे गाढे अभ्यासक असणारे डॉ. दिलीप रानडे यांनीही या संशोधनात मोलाचे योगदान दिले.

‘वुई मोस्टली डोन्ट गेट सिक . मोस्ट ऑफन, बॅक्टेरिया आर कीपिंग अस वेल.’

असे जीवाणू एकमेकांशी कशा प्रकारे संपर्क साधतात याचा शोध लावणाऱ्या अमेरिकन मोलेकुलर बायोलॉजिस्ट बोनी बेस्सलर यांचे सुप्रसिद्ध विधान आहे. पुण्यात शोध लागलेला जीवाणूही बहुतेक बोनी बेस्सलर यांच्या व्याख्येत मोडतो. क्लोस्ट्रिडियम पुनेन्स या जीवाणूच्या जीनोम सिक्वेन्सचा अभ्यास केल्यानंतर हा जीवाणू काही विशिष्ट जीवनसत्त्वे तयार करत असल्याचे आढळून आले ज्याचा उपयोग वनस्पतीजन्य polysaccharides चे पचन करण्यासाठी होऊ शकतो असे अनुमान आहे. सूक्ष्म जीवाणू तज्ज्ञांच्या मते जीवाणूंचा आणि आजाराचा संबंध आहेच, पण मानवी स्वभावावरसुद्धा जीवाणूंचा परिणाम होतो. डायबेटिस, लठ्ठपणा अशा आजारात जीवाणू उपायही करू शकतात आणि अपायसुद्धा.

शौचे यांच्या मते या आधीही त्यांनी असे पाच-सहा जीवाणू शोधलेले आहेत. मात्र आता शोधलेला जीवाणू हा जनुकीयदृष्टय़ा वेगळा आहे. एखादा शोधलेला जीवाणू हा खरेच नवीन आहे का हे ठरवण्याचे काही आंतरराष्ट्रीय निकष आहेत. हे निकष क्लोस्ट्रिडियम पुनेन्स पूर्ण करतो.

सूक्ष्म जीवाणूतज्ज्ञ आणि औषध निर्मिती क्षेत्रातील वैज्ञानिक डॉक्टर गिरीश महाजन यांच्या म्हणण्यानुसार क्लोस्ट्रिडियम पुनेन्सचा शोध हा अपघात नव्हे. असा कुठलाही शोध लागण्यामागे जीवाणूंच्या जनुकीय रचनेचा सखोल अभ्यास आणि कुठल्या पायरीवर कुठला प्रयोग करावा या गोष्टीचा अचूक निर्णय, या गोष्टी महत्त्वाच्या असतात. हा शोध फक्त शास्त्रज्ञांच्या दृष्टीनेच नव्हे तर एकंदरीत मानवी आरोग्याशी संबंधित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीसाठी/संस्थेसाठी महत्त्वाचा आहे. फक्त क्लोस्ट्रिडियम पुनेन्सबाबत मर्यादित न राहता महाजन अशा प्रकारच्या अनेक शोधांचे महत्त्व विषद करताना म्हणतात, एखाद्या नवीन जीवाणूचा शोध लागला की त्यातून मानवी आरोग्याशी निगडित अनेक नवीन धागेदोरे समोर येतात. डॉक्टर शौचेनी शोधलेल्या जीवाणूप्रमाणेच अनेक जीवाणू आहेत आणि असतील ज्यांचा मानवी पचन संस्थेचे कार्य सुरळीत चालण्यासाठी उपयोग होऊ  शकतो.

नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिटय़ूटचे माजी संचालक, डॉ. रमेश परांजपे यांनाही शौचे यांचा शोध नावीन्यपूर्ण वाटतो. परांजपे नमूद करतात की सदर जीवाणू हा आपल्यासाठी किती फायद्याचा आणि किती तोटय़ाचा हे बघणे तसेच त्याचा प्रसार किती झालाय याचा अभ्यास करणेही यापुढे महत्त्वाचे ठरणार आहे. जिनोम सिक्वेन्सिंगमधल्या प्रगतीमुळे असे शोध लागण्यास खूपच मदत झालीय.

भारत हा प्रतिजैविके वापरणारा जगातल्या सगळ्यात मोठय़ा देशांपैकी एक आहे. प्रतिजैविकांच्या संशोधन प्रक्रियेत मानवी शरीरातील जीवाणूंची माहिती असणे हे खूप महत्त्वाचे ठरते. प्रतिजैविकांवर संशोधन करणारे डॉ. महाजनांसारखे संशोधक उपयुक्त जीवाणूंचा अपायकारक जीवाणूंचा सामना करण्यासाठी कशा प्रकारे उपयोग केला जाऊ शकतो, याचा सदैव अभ्यास करत असतात. महाजन सांगतात की, मानवी शरीरात असणाऱ्या जीवाणूंना अजूनही बरेच समजावून घेणे बाकी आहे. पुण्यातल्या संशोधकांनी लावलेला नवीन जीवाणूचा शोध मला याकरिता महत्त्वाचा वाटतो की प्राणवायूविरहित वातावरणातील जीवाणूचा अभ्यास करणे ही अतिशय कठीण गोष्ट आहे.

शौचे यांचा यापुढचा प्रयत्न हा क्लोस्ट्रिडियम पुनेन्स चा प्रयोगशाळेत आणखी सखोल अभ्यास करून हा जीवाणू माणसाला उपयोगी कसा आहे हे सप्रमाण सिद्ध करणे हा असेल. मानवी आरोग्य केंद्रस्थानी असणाऱ्या एखाद्या संशोधनाचा अंतिम टप्पा हा त्या संशोधनाच्या फलनिष्पत्तीचा प्रत्यक्षात वापर सुरू होणे हा असतो. यासाठी विविध औषध कंपन्यांचे सहकार्य घेणे अतिशय महत्त्वाचे आहे. प्रयोगशाळेत क्लोस्ट्रिडियम पुनेन्सची उपयोगिता सिद्ध करून भविष्यात औषध कंपन्यांना या संशोधनात रस घेण्यास प्रवृत्त केले जाऊ शकते. फक्त सूक्ष्मदर्शिकेखाली दिसणारे जीवाणू हे एक अदृश्य वास्तव आहे. सध्या ऐकिवात येणाऱ्या विविध आजारांच्या पाश्र्वभूमीवर क्लोस्ट्रिडियम पुनेन्ससारख्या मानवी आरोग्याला उपयोगी जीवाणूचा शोध लागणे हे आरोग्य क्षेत्रासाठी नक्कीच एक आशावादी चित्र आहे.
सचिन जगदाळे – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 30, 2015 1:07 am

Web Title: clostridium punence
टॅग Bacteria
Next Stories
1 प्रश्न तुमचे उत्तर डॉक्टरांचे!
2 सरदार पटेल : एक मुत्सद्दी नेतृत्व
3 शताब्दी ‘गीतारहस्या’ची!
Just Now!
X