पर्यटन विशेष
उन्हाळ्याचा वैताग आला की उठून एखाद्या हिल स्टेशनला जावं असं वाटायला लागतं. पण सतत जाऊन त्याच त्या हिल स्टेशन्सचा कंटाळाही आलेला असतो. त्यामुळे नवीन हिल स्टेशन्सच्या पर्यायांच्या शोधात आहात ना? मग हा लेख जरूर वाचा..

हिल स्टेशन अर्थात गिरिस्थळे ही काही भारतीयांची पर्यटन निर्मिती नाही. इंग्रज अमदानीत हिल स्टेशनचा पायंडा आपल्याकडे रुजला. ही गिरिस्थळे आपल्याकडे होतीच, तेथे एखादे गावदेखील वसलेले असायचे. पण त्याचे उन्हाळ्यातील निवासस्थानामध्ये रूपांतर करायला सुरुवात केली ती इंग्रजांनी. उन्हाळ्यातील अतिउष्म्याचा त्रास टाळण्यासाठी अशी गिरिस्थळे शोधून त्यांनी विकसित करायला घेतली. सिमला, गंगटोक, दार्जििलग, मनाली, माथेरान, महाबळेश्वर ही त्यातील काही महत्त्वाची नावं. केवळ ते गाव डोंगरावर आहे, तेथील हवामान थंड आहे इतपतच त्यांचे हे उन्हाळी पर्यटन मर्यादित नसायचे. त्यांनी या ठिकाणांना एक चेहरा दिला. उत्तरेकडील हिल स्टेशनमध्ये मॉल रोड ही एक वेगळी संकल्पना त्यांनी जन्माला घातली. शहरातील एक ठरावीक भाग ज्यामध्ये कोणत्याही वाहनाला बंदी असेल, तेथे आरामात भटकता येईल, खरेदीचा आनंद लुटता येईल, असे मॉल रोड सिमला, दार्जििलगमध्ये हमखास दिसतात. पुढे आपल्याकडे पर्यटनाने चांगलाच जोर पकडला तेव्हा ही हिल स्टेशन जोमाने वाढू लागली. पण त्यांच्या वाढण्याला भौगोलिक मर्यादा आहेत याचा आपल्याला विसर पडला. परिणामी एकेकाळची शांतसुंदर गिरिस्थळे गर्दीने ओसंडू लागली. इतकी की दार्जििलगमध्ये मुंबईतल्या रस्त्यासारखी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. मग चार दिवस शांततेत राहण्यासाठी जायचे असेल ही गिरिपर्यटन स्थळे कुचकामी ठरू लागली, अपुरी पडू लागली. परिणामी काही दुर्लक्षित ठिकाणं हळहळू विकसित होऊ लागली.

मुख्य म्हणजे रस्ते, राहण्याखाण्याची मूलभूत सुविधा अशा ठिकाणी निर्माण झाल्या आणि हे पर्यटन वाढू लागले. उत्तरेत हाफलाँग, पेिलग, धंतोली, लॅन्सडाऊन, दक्षिणेतील शिमोगा, येलागिरी अशी काही नव्याने विकसित होऊ लागलेली हिल स्टेशन्स ही जुन्या पण लोकप्रिय आणि गर्दीने बोकाळलेल्या हिल स्टेशन्सना पर्याय म्हणून सांगता येतील. यापकी लॅन्सडाऊन हे ब्रिटिश काळातीलच हिल स्टेशन. पण त्या काळात तसे मागे पडलेले. उर्वरित अलीकडच्याच काळात वेगाने विकसित झालेले. विशेष म्हणजे येथे मर्यादित पर्यटक येतात आणि शांतपणे राहायचे असेल तर ही ठिकाणं उत्तम पर्याय आहेत. तुम्हाला किमान अ‍ॅक्टिव्हिटी असणारे ठिकाण म्हणून याकडे पाहावे लागेल. रोजच्या कामातून विरंगुळा म्हणूनच याकडे पाहावे लागेल. इतर पर्यटन ठिकाणांप्रमाणे भारंभार अ‍ॅक्टिव्हिटी करायची अपेक्षा येथे पूर्ण होणार नाही.

हॉफलाँग हे आसाममधील एकमेव हिल स्टेशन. ईशान्येकडील राज्ये मुख्यत: डोंगरातच वसलेली आहेत. पण आसाममधील बहुतांश भाग तुलनेने सपाट मदानी प्रदेश आहेत. त्यामुळे हॉफलाँग तसे समुद्रसपाटीपासून तीन साडेतीन हजार फूट उंचीवर असले तरी ते आसामचे हिल स्टेशन आहे. रस्ता आणि रेल्व मार्गाने हॉफलाँग जोडलेले आहे. दार्जििलगसारखेच चहाच्या मळ्यांचे लॅण्डस्केप या संपूर्ण प्रदेशात फिरताना जाणवतात. तसेच भरपूर व्ह्य़ू पॉइन्टस हे हॉफलाँगचे आणखीन एक वैशिष्टय़. असंच आणखीन एक वैशिष्टय़ म्हणजे येथील डोंगररांगांमध्ये भटकंतीचे, ट्रेकिंगचे अनेक पर्याय आहेत. त्यातही तुम्हाला कॅिम्पग करायचे असेल तर हॉफलाँग म्हणजे बहारच आहे. हॉफलाँग हा निळ्या डोंगराचा भाग म्हणून ओळखला जातो. येथील बोरेल डोंगररांगेत काही साहसी खेळांचा थरारदेखील अनुभवता येतो. तसेच हे ऑíचडसाठी प्रसिद्ध आहे. हॉफलाँगमधली ऑíचड बाग आवर्जून पाहावी अशी आहे. ब्रिटिश काळातील वसाहतीच्या राज्याच्या काही खुणा हॉफलाँगमध्ये आजही पाहता येतात. तर नव्याने बांधलेले अनेक रिसॉर्टस, तळ्याकाठची रिसॉर्टस् येथे राहण्याचा आनंद द्विगुणित करतात.

येथील नेहमीचे स्थलदर्शन करायचे तर दोन-तीन दिवसांचा मुक्काम पुरेसा आहे. पण तुम्हाला आरामच करायचा असेल तर सात-आठ दिवस घालवणेदेखील शक्य आहे. पण केवळ तेवढय़ासाठी येथून उठून जाणे जरा खर्चीकच ठरू शकते. त्यामुळे त्याला जोडून आसामातील आणखीन भटकंती केल्यास ते फायदेशीर ठरेल. गुवाहाटी-नामेरी राष्ट्रीय अभयारण्य (पक्ष्यांसाठी) -काझिरंगा-हॉफलाँग-माजोली बेट-गुवाहाटी अशी भटकंती करता येईल. पण काझिरंगा अभयारण्य ३० एप्रिल नंतर पर्यटकांसाठी बंद केले जाते. तेव्हा याच ट्रिपमध्ये मेघालयात जाता येईल. पण भर उन्हाळ्यात या इतर ठिकाणी उष्णतेचा त्रास होऊ शकतो. काझिरंगा धरून सप्टेंबर ते मार्च या काळात केव्हाही येथे जाता येईल.

हिमालयीन डोंगररांग अनुभवयाची असेल तर अनेक पर्यटक दार्जििलगला जातात. भारतातील क्रमांक एकचे हिमशिखर कांचनजुंगा पाहायलादेखील दार्जििलगला अशीच पर्यटकांची गर्दी असते. पण ती सारी गर्दी टाळून तुम्हाला हे सारे पाहायचे असेल तर थेट सिक्कीमधील पेिलगला जावे. सिक्कीम सध्या पर्यटनाच्या नकाशावर चांगलंच झळकतंय. पण त्यातही गर्दी गंगटोक आणि नथुला पाससाठी असते. तुलनेने पेिलगला पर्यटकांची गर्दी मर्यादितच असते. पेिलगचे वैशिष्टय़ म्हणजे कांचनजुंगा हिमशिखर आणि हिमाच्छादित शिखरांची रांग तुम्हाला हॉटेलच्या प्रत्येक खिडकीतून दिसत राहते. किंबहुना येथील हॉटेल्सची रचनाच अशी केली आहे की प्रत्येक हॉटेलमधून हे दृश्य दिसू शकते. जवळच असणाऱ्या यूमथांग व्हॅलीमध्ये केवळ एकाच फुलांसाठीचे राष्ट्रीय अभयारण्य आहे. हे फूल म्हणजे ऱ्होडोरॅड्रोन.

पेिलगला अगदी होम स्टेपासून ते पंचतारांकित हॉटेल्स उपलब्ध आहेत. गंगटोकला जोडून पेिलग करता येते किंवा पेिलगबरोबर युमथांग व्हॅलीत जाता येते. तसेच गुरुडोंगमार या १७ हजार फूट उंचीवरील तळ्याचा आनंद अनुभवता येतो. बागडोगरा विमानतळापासून पेिलग १४५ किमीवर आहे किंवा गंगटोकवरूनदेखील जाऊ शकता.

लॅन्सडाऊन हे खरे तर अगदी ब्रिटिशकालीन हिल स्टेशन. पण तुलनेने कमी प्रसिद्धीस आलेले. त्यामुळे इतर ब्रिटिशकालीन ठिकांणांप्रमाणे येथे गर्दी बोकाळली नाही. उत्तराखंड राज्यातील पौडी गढवाल जिल्ह्य़ातील या ठिकाणाचे मूळचे नाव कालू डाण्डा. गढवाली भाषेत त्याचा अर्थ आहे ‘काळा पहाड’. पण हे काळेपण केवळ नावापुरतेच मर्यादित आहे. ब्रिटिशांना गुरखा रेजिमेंटमधून गढवाल रेजिमेंट स्वतंत्र करायची होती तेव्हा कालू डाण्डाची मुख्यालय म्हणून निवड झाली (१८८७). नंतर गव्हर्नर लॉर्ड लॅन्सडाउन याच्या नावाने हे गाव ओळखले जाऊ लागले. गर्द वनराजीचा वेढा असलेले हे गाव साडेपाच हजार फूट उंचीवर वसले आहे. येथील लष्करी मुख्यालयामुळे एकूणच वातावरणात कडक शिस्तीचा अंमल जाणवत राहतो.

नाही म्हणायला येथे स्थलदर्शनासाठी दोनचार टिपिकल जागा आहेत. पण हे ठिकाण आहे ते मस्त आरामात ताणून देण्यासाठी. सभोवतालच्या हिरवाईत मस्त सुट्टीचा आनंद घ्यायला लॅन्सडाऊन हे अगदी योग्य ठिकाण आहे. भुल्ला ताल किंवा कालेश्वर महादेव मंदिर ही दोन मंदिरे पाहण्यासारखी आहेत. एक छोटंसं तळंदेखील आहे. तसेच दरवान सिंग संग्रहालय म्हणजेच गढवाल रेजिमेंट म्युझियम आवर्जून पाहायला हवे.

दिल्लीहून लॅन्सडाऊनला येताना किंवा जाताना वाटेत हृषीकेश किंवा हरिद्वारला दोन दिवस राहता येईल. हृषीकेशला गंगेच्या पाण्यात व्हाइट वॉटर राफ्टिंगचा थरारदेखील अनुभवता येईल. लॅन्सडाऊन दिल्लीहून २४० कि.मी. अंतरावर आहे. दिल्ली-मिरत-नजिबाबाद-कोटद्वार हा सोईचा मार्ग. जवळचा विमानतळ जॉली ग्रँट (डेहराडून) आणि रेल्वे स्थानक कोटद्वार (४० कि.मी.). ऑक्टोबर ते मे उत्तम काळ. बर्फ पडत नसला तरी डिसेंबर- जानेवारी सर्वात थंड महिने.

उत्तरेतील लोकप्रिय हिलस्टेशन्सप्रमाणे दक्षिणेत उटी, कोडाईकॅनाल, कूर्ग, मुन्नार ही हिल स्टेशन्स प्रसिद्ध आहेत. उत्तरेप्रमाणेच यातील काही ब्रिटिशांनी विकसित केली असली तरी त्यावर ब्रिटिश झाक तुलनेने कमी आहे. पण ही पर्यटनस्थळेदेखील सध्या गर्दीने ओसंडत असतात. त्यावर पर्याय म्हणून कर्नाटकातील शिमोगा, तामिळनाडूतील येलागिरी आणि केरळातील इडुक्की या काही चाकोरीबाहेरील पर्यटनस्थळांना जायला हरकत नाही.

म्हैसूर, कुर्ग, काबिनी, वायनाड ही एकमेकांना जोड असलेली पर्यटनस्थळांची रांगच आहे. तुलनेने शिमोगा हे आडवाटेला आहे. पश्चिम घाटातील तुलनेने कमी वर्दळीचे असे हे ठिकाण तसे पर्यटनाच्या नकाशावर फारसे दिसत नाही. उडुपीवरून रेल्वेने येथे पोहोचता येते. घनदाट वनराजी हे याचे वैशिष्टय़ आहेच. पण त्याचबरोबर येथून जवळच असलेला जोग वॉटरफॉल हे आणखीन एक महत्त्वाचे आकर्षण ठरते. दोनचार दिवसाचा येथील मुक्काम आणि त्याला जोडून मग जोग वॉटरफॉल अशी चार-पाच दिवसाची उत्तम ट्रिप येथे करता येते. जोग वॉटरफॉल्सला जोडूनच आपल्याला तीन प्राचीन मंदिरांची भटकंतीदेखील करता येते. शिमोग्याहून धुक्यात हरवणाऱ्या अगुम्बे येथेदेखील जाता येते. पण तुलनेने ते उडुपीपासून जवळ आहे. शिमोगाहून आपण गोव्यात उतरू शकतो किंवा बेळगावला येऊन पुढे दांडेलीला जाता येते. मस्त आराम करायचा असेल तर हे ठिकाण उत्तम पर्याय आहे.

डोंगराळ भागातील काही ठिकाणं ही तशी हिल स्टेशन म्हणून अजिबातच विकसित झालेली नसतात. रस्ते असतात, पण वाहतुकीची साधनं मर्यादित, तसेच राहण्याखाण्याची व्यवस्थाही प्राथमिक असते. पण या ठिकाणची शांतता, निसर्गसौंदर्य मात्र अप्रतिम असते. केवळ त्याचा आनंद घेत दोनचार दिवस आराम करून ताजेतवाने व्हायचे असेल तर केरळातील इडुक्की या ठिकाणी जायलाच हवे. कोचिनपासून १३० किमी अंतरावर असलेले इडुक्की हे पोनमुडी धरणाच्या जलाशयाकाठी वसलेले आहे. म्हणजे हे गाव पूर्वीपासून होतेच, जलाशय नंतर बांधण्यात आला. पण या गावी जायचे तर खासगी वाहन हवे. अगदी तीक्ष्ण वळणांच्या प्रवासात नितांतसुंदर निसर्ग तर अनुभवायला मिळतोच, पण त्याचबरोबर हा प्रवासही खूप थरारक असतो. शासकीय विश्रामगृह हा येथे राहण्याचा उत्तम आणि स्वस्त पर्याय आहे. पण काही प्राथमिक सुविधा असणारी हॉटेल्सदेखील काही काळांपूर्वी येथे झाली आहेत. हा प्रदेश हत्तींचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. सपाटीवरून प्रवास करताना असे हत्तींचे कळप येथे फिरताना सहज दिसतात. तसेच जवळच आनंद िशदे या हत्ती अभ्यासकाचा प्रकल्पदेखील आहे. ‘हत्तींचे बोलणे ऐकणारा, समजू शकणारा माणूस’ अशी आनंद यांची ख्याती आहे. कोचिनवरून चार तासाचा प्रवास करून येथे येता येते, तर पुढे मुन्नापर्यंत आपली ट्रिप वाढवून तेथून कोचिन गाठता येते.

तामिळनाडूमधील उटी आणि कोडाईकनाल ही प्रसिद्ध हिल स्टेशन्स आहेत. नव्याने विकसित होत असलेले हिल स्टेशन म्हणजे येलागिरी हे होय. जोलापपट्टाई जंक्शनवरून पुढे बसने प्रवास करून आपण येलागिरीला पोहचू शकतो. येथे सहकुटुंब सहलीसाठी असणाऱ्या सुविधा नाहीत. पण अनेक व्ह्य़ू पॉइन्टस आहेत. एक मानवनिर्मित तळेदेखील आहे. ट्रेकिंगचे अनेक पर्याय उपलब्ध आहेत आणि दोनचार दिवस आराम करायला बऱ्यापकी हॉटेल्सदेखील आहेत. या ट्रिपला जोडून कांचिपूरम (तीन तास), वेल्लोर (दोन तास) या ठिकाणीदेखील जाऊ शकता. चेन्नईहून येलागिरी हे पाच तासावर आहे, तर बेंगलोरहून तीन तासावर आहे.

देशभरात अशी अनेक ठिकाणे सध्या विकसित होत आहेत. पर्यटनासाठी गरजेच्या असणाऱ्या दोन महत्त्वाच्या गोष्टी रस्ते आणि हॉटेल्स किंवा होम स्टे सुविधा आज अशा ठिकाणी तयार झाल्या आहेत. या चाकोरीबाहेरच्या ठिकाणांना जोडून नेहमीचे एखादे लोकप्रिय ठिकाणदेखील निवडता येते आणि आठवडा सत्कारणी लावता येऊ शकतो. गरज आहे थोडी वाट वाकडी करण्याची तयारी ठेवण्याची. तेवढे असेल तर मात्र हा आनंद अगदी सहज मिळू शकेल. यंदाच्या उन्हाळ्यात हे आजमावून पाहायला हरकत नाही.
आत्माराम परब – response.lokprabha@expressindia.com