सध्याचे मस्त गुलाबी थंडीचे दिवस आहेत मौजमजेचे, धमाल-मस्ती करण्याचे. कॉलेजियन्स वेगवेगळ्या फेस्टिव्हलमध्ये रंगलेत. नाटक, डान्स, लिखाण अशा वेगवेगळ्या स्पधरंमध्ये धम्माल करताहेत..

केबीपी महाविद्यालय
सैनिकांना आदरांजली

‘फ्रीडम इज नॉट फ्री इट कॉस्ट सॅक्रिफायजेस’ या घोषवाक्याने आपल्या थीमची ओळख करून देणारा केबीपी महाविद्यालयाचा युवातरंग महोत्सव यंदा ठाणे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे यांच्या उपस्थितीत पार पडला. पोलीस, आर्मी, नेव्ही अशा सगळ्या संरक्षक दलाची कार्य आणि कर्तव्ये लोकांपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे असे प्रतिपादन त्यांनी या ‘युवातरंग’ फेस्टिव्हलच्या बक्षीस समारंभाप्रकरणी केले.

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात व्याख्याने आणि परिसंवादाबरोबरच नृत्य, गायन, नाटक, चित्रकला आयोजित केले होते.विद्यार्थ्यांनी आपल्या कलेद्वारे देशाच्या प्रगतीमध्ये योगदान द्यावे यासाठी ‘फ्रीडम इज नॉट फ्री इट कॉस्ट सॅक्रिफायजेस’ या थीमवर आधारित रांगोळी, मेहंदी, नेल आर्ट, टी-शर्ट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, फोटोग्राफी, वेब-डिझायनिंग, उत्स्फूर्त नाटय़ाविष्कार, नृत्य आणि गायन अशा सोळा स्पर्धाचे आयोजन युवातरंगमध्ये करण्यात आले होते. प्रत्येक स्पर्धेमधून स्वातंत्र्याचे विविध प्रसंग सांगितले जात होते, तर कुठे स्वातंत्र्यसमरात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली वाहिली जात असल्याने महाविद्यालयात एकंदर देशभक्तीपर वातावरण पाहायला मिळत होते. फेस्टिव्हलच्या बक्षीस समारंभाप्रसंगी ठाणे पोलीस सहआयुक्त आशुतोष डुंबरे, मेजर मनीष कच्छी, संस्थेचे अध्यक्ष संजय मोरे, प्राचार्य संतोष गावडे उपस्थित होते. या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मेजर मनीष कच्छी यांनी आजच्या तरुणांमध्ये प्रचंड प्रमाणात ऊर्जा आणि उत्साह असून ती ऊर्जा त्यांनी सकारात्मक कामांमध्ये खर्ची करावी, असे सांगितले. फेस्टिव्हलमध्ये ठाणे-मुंबईमधील ५० महाविद्यालयांनी सहभाग दर्शवला. भांडुपमधील डी.ए.व्ही. महाविद्यालयाने या महोत्सवाचा कर्मवीर चषक पटकावला.

ज्ञानसाधना महाविद्यालय
इंद्रधनु महोत्सव

इंद्रधनु महोत्सवाच्या अंतर्गत आंतरशालेय नृत्यस्पर्धेचा कार्यक्रम नुकताच पार पडला. या स्पर्धेत पंधरा शाळा सहभागी झाल्या होत्या. पारंपरिक लोककला, पाश्चात्त्य नृत्यकला, हिंदी चित्रपटांमधील विविध गाण्यांच्या तालावर विद्यार्थी थिरकले. स्पर्धेचे उद्घाटन ज्ञानसाधना संस्थेचे कमलेश प्रधान, खजिनदार सतीश शेठ आणि प्राचार्य चंद्रशेखर मराठे यांनी केले. या स्पर्धेत श्री माँ बाल निकेतन हायस्कूल या शाळेच्या संघाला प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले. पद्मवती व्यंकटेश हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, कळवा व श्रीरंग विद्यालय, ठाणे या दोन शाळांच्या संघांना अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांकाची पारितोषिके मिळाली. तसेच श्री माँ विद्यालय, ठाणे या शाळेच्या संघाला उत्तेजनार्थ षारितोषिक मिळाले. सर्व शाळांमधील सहभागी विद्यार्थ्यांना सहभाग प्रमाणपत्रे देण्यात आली. प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिक विजेत्या संघास अनुक्रमे पाच हजार, तीन हजार, दोन हजार रोख रक्कम स्मृतिचिन्ह, सांघिक प्रमाणपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. उत्तेजनार्थ संघास एक हजार रोख रक्कम देण्यात आली. या स्पर्धेसाठी सचिन स्टुडिओज्च्या शाखांचे प्रमुख सचिन पाटील, नृत्यदिग्दर्शिका व नाटय़ अभिनेत्री मेधा दिवेकर आणि कथ्थक विशारद तसेच ‘एकापेक्षा एक’ कार्यक्रमात सहभागी झालेल्या स्नेहा चव्हाण आदी मान्यवर परीक्षक होते. महोत्सवासाठी कनिष्ठ महाविद्यालयातील उपप्राचार्या डॉ. विद्या लोणकर, पर्यवेक्षिका डॉ. विद्या हेडाऊ  यांचे मार्गदर्शन लाभले होते.

आदर्श महाविद्यालय
रंगला ‘हार्मोनी’ फेस्टिव्हल

आदर्श महाविद्यालयात डिसेंबर महिन्यात हार्मोनी फेस्टिव्हलची रेलचेल पाहायला मिळाली. साहित्य, नृत्य सादरीकरण आणि फाईन आर्टस् विभागामध्ये घेतलेल्या स्पर्धानी विद्यार्थ्यांना आकर्षित केले. लिटररी म्हणजेच साहित्य स्पर्धामध्ये घोषवाक्य, संहितावाचन, वादविवाद आणि कथाकथन अशा निरनिराळ्या स्पर्धाचा समावेश या महोत्सवात करण्यात आला होता. तसेच सादरीकरण प्रकारामध्ये अ‍ॅड मॅड शो, एकपात्री अभिनय, सोलो फ्यूजन डान्स, मिमिक्री अशा स्पर्धाचा समावेश करून विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे या महोत्सवात सहभाग दर्शवला होता. फाईन आर्टस्मध्ये हेअर स्टाईल, मेहंदी, टाकाऊपासून टिकाऊ , पोस्टर तयार करणे, सलाड डेकोरेशन, नेल आर्ट, एग शेल पेंटिंग अशा वेगवेगळ्या स्पर्धामध्ये विद्यार्थ्यांनी आपली कौशल्ये सादर केली.

या फेस्टिव्हलचा प्रारंभ ‘नो प्लास्टिक’ आणि ‘नो व्हेईकल डे’ने झाला होता. या दिवशी महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक, प्राचार्यानीसुद्धा प्लास्टिकचा तसेच वाहनाचा वापर टाळला. महोत्सवामधील एक दिवस राष्ट्रीय एकता दिन म्हणून साजरा केला गेला. या दिवशी महाविद्यालयामध्ये प्रत्येक वर्ग भारतातील एक राज्य निवडून त्याप्रमाणे पूर्ण वर्ग सजवला होता. त्या राज्यातील संस्कृती, खाण्याच्या पद्धती, बोलीभाषा, चालीरीती समजून घेण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यांनी या निमित्ताने केला.

जोशी बेडेकर महाविद्यालय
‘गंधर्व’मध्ये नॉस्टाल्जिया

मुंबई आणि ठाण्यातील महाविद्यालयातील विद्यार्थी आवर्जून ज्या फेस्टिव्हलची वाट पाहत असतात तो जोशी-बेडेकर महाविद्यालयाचा आंतरमहाविद्यालयीन गंधर्व फेस्टिव्हल येत्या २० आणि २१ जानेवारीला पार पडणार आहे. यंदा महोत्सवाचे दहावे वर्ष आहे. दरवर्षी कोणती तरी एखादी संकल्पना घेऊन त्यावर आधारित महोत्सव साजरा केला जातो. महाविद्यालयाच्या आवारात एखादी संकल्पना ठरवून त्यानुसार सुशोभीकरण केले जाते. गेल्या वर्षी ‘स्वदेशी’ ही संकल्पना घेण्यात आली होती. मात्र यंदाचे दहावे वर्ष असल्याने काही तरी नवीन साकारण्याचे विद्यार्थ्यांनी ठरवले आहे. या आंतरमहाविद्यालयीन महोत्सवात निरनिराळ्या स्पर्धेत दरवर्षी शंभरहून जास्त महाविद्यालयांतील सुमारे बारा हजारहून अधिक विद्यार्थी आपला सहभाग नोंदवतात.

या वर्षी परफॉर्मिग आर्टस, लिटररी, फाईन आर्टस, स्पोर्ट्स यासारखे वेगवेगळे तब्बल चाळीसच्या वर इव्हेंट होणार असून जास्तीत जास्त महाविद्यालयापर्यंत गंधर्व पोहोचवणार आहेत. या महोत्सवासाठी वेगवेगळ्या विद्यार्थ्यांचे इव्हेंट, स्पॉन्सरशिप, सिक्युरिटी, पब्लिक रिलेशन, लॉजिस्टिक, पब्लिसिटी यांसारख्या कमिटी कसोशीने पूर्वतयारीस लागलेल्या आहेत. गंधर्व महोत्सवाची अधिक माहिती फेसबुक, इन्स्टाग्राम यांसारख्या सोशल साइट्सवरही उपलब्ध आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी यंदाच्या १०व्या गंधर्व महोत्सवासाठी उत्सुक आहेत. विद्यार्थी गंधर्व महोत्सवाची तयारी स्वत: करीत असतात आणि महाविद्यालय त्यांना पूर्ण सहकार्य करते, अशी माहिती महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुख प्रा. अर्चना प्रभुदेसाई यांनी दिली.

‘नॉस्टाल्जिया’ ही गंधर्वची थीम असल्याने संपूर्ण महाविद्यालयाचा परिसर नॉस्टाल्जिक वस्तूंनी सजवण्यात येत आहे. शाकालाका बूमबूमची पेन्सिल, लहानपणी मिळणाऱ्या लिमलेटच्या गोळ्या, आठ आण्यांना मिळणारी पेप्सी अशा वस्तूंनी महाविद्यालय सजवण्यात विद्यार्थी व्यग्र आहेत. माजी विद्यार्थ्यांसाठी अ‍ॅल्युमिनाय इव्हेंटच्या तयारीत सध्या महाविद्यालयातील विद्यार्थी दिसत आहेत.

वझे केळकर महाविद्यालय :
मराठमोळा मंथन फेस्टिव्हल

वझे केळकर महाविद्यालयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळातर्फे नुकताच मंथन फेस्टिव्हल पार पडला. मराठी भाषा आणि संस्कृतीची विविध अंगे आणि जगात असलेले मराठी भाषेचे महत्त्व विविध स्पर्धाद्वारे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी ‘मंथन- जागर मराठीचा’ या मराठमोळ्या फेस्टिव्हलचे आयोजन करण्यात आलेले होते. या फेस्टिव्हलमध्ये चित्रकला स्पर्धा, लघुनाटय़ स्पर्धा, लोकनृत्य स्पर्धा आणि गायन स्पर्धा अशा वेगवेगळ्या उपक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याने महाविद्यालयातील विद्यार्थी मराठमोठय़ा वेशभूषेत पाहायला मिळाले.

विविध मराठी कविता आणि त्यांचे अर्थ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी काव्यरसग्रहण, विविध संतांच्या भजन आणि कीर्तनाची विद्यार्थ्यांना नावीन्याने ओळख व्हावी म्हणून भजन आणि कीर्तन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. समाजातील घडामोडींवर चर्चा करण्यासाठी विधानसभा केळकरची, कट्टा आणि कटिंग यासारख्या दोन वेगळ्या माध्यमातील वादविवाद स्पर्धा, विद्यार्थ्यांना शुद्ध मराठी बोलता यावे यासाठी ‘एक मिनिट मराठी’ सारख्या विविध स्पर्धा फेस्टिव्हलमध्ये पाहायला मिळाल्या.

फेस्टिव्हलचा बक्षीस समारंभ दिग्दर्शक सतीश राजवाडे आणि लेखक कौस्तुभ सावरकर यांच्या हस्ते पार पडला. या वेळी विद्यार्थ्यांशी गप्पा मारताना त्यांनी दिग्दर्शन, लेखन आणि आपल्या वैयक्तिक जीवनातील विविध अनुभव विद्यार्थ्यांना सांगितले. महाविद्यालयीन स्तरावर रुईया महाविद्यालय आणि शालेय स्तरावर पाच शाळांना सर्वोत्कृष्ट सहभागाचे पारितोषिक मिळाले. या फेस्टिव्हलमध्ये ठाणे आणि मुंबईच्या पन्नास शाळांच्या तसेच अनेक महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांनी हजेरी लावली होती. फेस्टिव्हलच्या उद्घाटन समारंभात प्राचार्य डॉ. बी. बी. शर्मा, उपप्राचार्य डॉ. शुभांगी भावे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य विद्याधर जोशी, पर्यवेक्षिका अवंतिका कानडे, मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाचे निमंत्रक अरविंद जाधव आणि उर्मिला फडके उपस्थित होते.

सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या..

तुमच्याही कॉलेजमध्ये अशीच धमाल चाललीय? आम्हालाच नव्हे, तर सगळ्या महाराष्ट्राला कळू द्या.. तुमचा लेख, फेस्टिव्हलचे फोटो आणि कॉलेजच्या आयडीची झेरॉक्स आम्हाला मेलवर पाठवून द्या. आमचा इमेल response.lokprabha@expressindia.com

किन्नरी जाधव – response.lokprabha@expressindia.com