एके काळी लहानथोर सगळ्यांनाच कॉमिक्सचे अतोनात वेड होते. नंतरच्या काळात दृक-श्राव्य माध्यमामुळे ही कॉमिक्स पडद्यावर सजीव झाली आणि त्याची पुस्तकातली जादू ओसरत गेली. पण आता उदयाला आलेली ग्राफिक नॉव्हेल्स आणि वेब कॉमिक्स, कॉमिक्सला पुन्हा संजीवनी देतील अशी शक्यता आहे.

चित्रपटगृहामध्ये समोरच्या पडद्यावर घडणारी दृश्ये आपण उत्कंठापूर्वकपणे पाहात असतो. मग ती दृश्ये गूढकथेसारखी चित्तथरारक, भयभीत करणारी, कारुण्याची झालर पांघरलेली वा विनोदाची बरसात करणारी असोत. आपण सहज त्यातील महत्त्वाच्या ‘फ्रेम्स’ डोळ्यांनी टिपून मनाच्या कोपऱ्यात कोरीत असतो. अंतत: त्या कथेचा शेवट आपण पाहातो आणि हुश्श असा सुस्कारा सोडून तो चित्रपट चांगला वा वाईट याचे मूल्यमापन करतो.

अशीच परिस्थिती (हास्यचित्र मालिका) कॉमिक स्ट्रिप्स वा कॉमिक्स पुस्तके साकारताना असते. फरक एवढाच पडद्यावर चलत्चित्रे असतात तर कॉमिक्स स्ट्रिप्समध्ये हाताने तयार केलेली चित्रे असतात. चित्रपटामध्ये जशा ‘फ्रेम्स’ लक्षात राहतात तशाच प्रकारे कॉमिक्स स्ट्रिप्समध्ये महत्त्वाच्या फ्रेम्स चितारून कथा समोर मांडली जाते.

अठरावे शतक जसे व्यंगचित्रकलेच्या दृष्टीने महत्त्वाचे तसेच ते कॉमिक्स स्ट्रिप्सच्या दृष्टीने महत्त्वाचे. दोघांचाही उगम वा शोध त्याच काळात लागला. ‘CARTONE’ या इटालियन शब्दाचा अपभ्रंश ‘CARTOON’ (व्यंगचित्र). एका मोठाल्या कॅनव्हासवर साकारलेले कच्चे चित्रांकन म्हणजेच कार्टून.

याचवेळी इंग्लंडमध्ये भिंतीवर लटकवण्यासाठी धाग्यांनी विणून चित्रे तयार केली जात. त्यालाच कालांतराने ‘कॉमिक्स स्ट्रिप्स’ असे नाव पडले. एकोणिसाव्या शतकाच्या पूर्वार्धात इटालियन चित्रकार बंधू ‘अ‍ॅनिबल व ऑगस्टीन करास्सी’ यांनी विशिष्ट माणसाचे व्यक्तिचित्रण अतिशयोक्तीपूर्ण रेषा आणि आकार यांचा वापर करून एक गमतीदार चित्रण केले. त्याचीच फलश्रुती म्हणजे ‘कॅरिकेचर’ (अर्कचित्र).

रोडॉल्फ टॉफ् लर हे स्विस शिक्षक, कॅरिकेचरिस्ट. यांना कॉमिक्सचे जनक म्हटले जाते. त्यांनी १८२७ साली ‘HISTORIE DEM. VIEUX BOXX’ या नावाने कथा प्रसिद्ध केल्या.

हळूहळू ही कला जर्मनी आणि अमेरिकेत आपले पाय पसरू लागली. १८९२ साली प्रथमत: अमेरिकेत ‘चिकागो- इंटर- ओशन’ या दैनिकाने कॉमिक्सची पहिली रंगीत पुरवणी छापली. त्यानंतर थोडय़ाच वर्षांत ‘द यलो कीड’ ही पहिली कॉमिक्स स्ट्रिप्स प्रसिद्ध झाली. १८९६ साली. वर्षभरात जर्मन चित्रकार रुडॉल्फ डीक्  याने सध्या आपण जे कॉमिक्स स्ट्रिप्समध्ये ‘स्पीच बलून’, ‘थिंक बलून्स’ किंवा वेदनेसाठी वापरणारे ‘स्टार’ वापरतो त्यांचा उपयोग करायला सुरुवात केली.

हास्यचित्र मालिकेचा (कॉमिक्स स्ट्रिप) प्रसार व त्यामध्ये कालानुरूप सुधारणा होत गेल्या. कौतुकाची थाप आणि उत्सुकतेच्या लाटा समाजमनामध्ये तरंगू लागल्या. याचीच प्रचीती म्हणून १९१२ साली ‘न्यूयॉर्क इव्हिनिंग जर्नल’ने संपूर्ण पानभर कॉमिक्स स्ट्रिप्स छापल्या. कॉमिक्सचे गारूड वाचक आणि प्रकाशक यांच्यावर वाऱ्यासारखे फेर धरू लागले. १९३०पर्यंत अचानक दुसऱ्या जागतिक युद्धाचे अक्राळ-विक्राळ ढग पसरू लागले. वर्तमानपत्राच्या कागदाचा दुष्काळ पडू लागला. परिणामी कॉमिक्स स्ट्रिप्सचा आकार छोटा-छोटा होत गेला.

कॉमिक्स स्ट्रिप्स तयार करताना अनेक गोष्टींचा विचार करावा लागतो. ती स्ट्रिप कोणत्या वर्गाच्या लोकांसाठी आहे- खेडय़ातील, शहरातील, मुलांसाठी, मोठय़ांसाठी की दोघांसाठीही, सभोवतालचे राजकीय, भौगोलिक, सामाजिक, सांस्कृतिक वातावरण. कॉमिक्स स्ट्रिप वा पुस्तक यांच्या निर्मितीमागचा हेतू सामाजिक, राजकीय, प्रबोधन, समाजविघातक वा राष्ट्रविरोधक शक्तींचा समाचार घेणे. त्यांना सुमार्ग दाखवणे, हास्यनिर्मितीमधून स्वत:चा विकास, पर्यायाने सामाजिक मनाचा विकास साधणे कॉमिक्स स्ट्रिप लिहिताना खालील गोष्टींचा उपयोग केला जातो.

  • असे काही चित्र निर्माण करायचे की माझ्याकडे सर्व काही आहे. प्रत्यक्षात काहीच नसणे.
  • खायचे दात वेगळे, दाखवायचे वेगळे. अशी परिस्थिती मांडणे.
  • सत्य वा हेतू माहीत नसण्यातून होणाऱ्या गमतीजमती दाखवणे.
  • एखादी चतुर व लबाड व्यक्तिरेखा निर्माण करणे.
  • सरतेशेवटी सत्य उघडकीस आणणे.

कॉमिक्स स्ट्रिप्स दररोज वा आठवडय़ातून एकदा रविवार अशा प्रकारे वर्तमानपत्रात वापरल्या जातात.

साधारणपणे एक पट्टी ३/४ चौकोन- आयत तयार करून वापरली जाते. काहीवेळा एका खाली एक अशा दोन पट्टय़ा वापरल्या जातात. परंतु काही वेळा एक चौकोनी आकाराची पट्टी (स्ट्रिप) वापरली जाते. उदा. ‘डेनिस द मेनिस’ ही स्ट्रिप.

प्रथम संपूर्ण कथा तयार केली जाते. कधी लेखक व चित्रकार दोघेही वेगवेगळे असतात, तर कधी लेखन व चित्रकारी चित्रकारच करतो. उदा. पीनट्स ही जगप्रसिद्ध हास्यचित्र मालिका ‘चार्ल शुल्ट्झ’ या व्यंगचित्रकाराने तयार केली. त्यामध्ये चार्ली ब्राऊन व त्याचा कुत्रा स्नूपी या व्यक्तिरेखा तयार करून दररोज घडणाऱ्या घटनांवर त्याने भाष्य केले. ही मालिका ७५ देश, २१ भाषा, २६०० वर्तमानपत्रे यामध्ये प्रसिद्ध झाली. त्यासाठी १८ हजार स्ट्रिप्स तयार केल्या गेल्या.

चार्ल शुल्ट्झ यांच्या अंतिम इच्छेप्रमाणे त्यांच्या निधनानंतर ही मालिका बंद करण्यात आली.

लेखन तयार झाल्यावर त्यामधील व्यक्तिरेखा तयार करणे महत्त्वाचे असते. त्यांची देहयष्टी, पेहराव, हावभाव, ती चारही बाजूने कशी दिसते- समोरून पाठीमागून, डाव्या-उजव्या बाजूने- याचा विचार करून रेखाटन केले जाते. ती कथा कुठे घडते- शहरात, जंगलात, वाळवंटात की पाण्यात याचा विचार करून त्याप्रमाणे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. त्यासाठी चित्रकलेचे पूर्ण ज्ञान, निरीक्षण वगैरे गोष्टींची जाण अत्यावश्यक असते. आवश्यकतेनुसार एक पट्टी (स्ट्रिप) चितारताना त्यामध्ये मुख्य व्यक्तिरेखा व दुय्यम व्यक्तिरेखा तसेच संवादाचा बलून कुठे असावा जेणेकरून मुख्य चित्र झाकोळले जाणार नाही. याचे भान ठेवून चित्राची रचना करावी लागते. चित्राची ‘रचना’ ही कॉमिक्स स्ट्रिपचा डोळा आहे. यासाठी वेगवेगळ्या रचना तयार करण्याचा अभ्यास असणे आवश्यकच. त्याचप्रमाणे डोक्यावरून बर्डस् आय व्हीव्ह, फिश आय व्हीव्ह अशा प्रकारच्या वेगवेगळ्या कोनांमधून, ‘परस्पेक्टिव्ह’ वापरून चित्रांकन करणे म्हणजे ती स्ट्रिप कलात्मकतेच्या उच्च पातळीवर नेणेच!

प्राण्यांवर स्ट्रीप करायची असेल तर त्यांची वागणूक, त्यांची शरीरयष्टी, त्यांचे हावभाव यांचा सखोल अभ्यास असणे आवश्यकच. कॉमिक्समध्ये प्राण्यांच्या हावभावांना अत्यंत महत्त्व आहे. उदा. डोनल्ड डक, गारफिल्ड, पोगो, मिकी माऊस, जंगल बुक वगैरे.

चित्र चितारताना कच्चे चित्र पेन्सिलनेच तयार करावे. पेन वापरू नये. कारण पेन्सिलचा वापर करताना उत्स्फूर्तपणे आपली पेन्सिल पेपरवर फिरत असते. (कारण नको असलेल्या रेषा आपण खोडणार हे गृहीत धरलेले असते.) त्यामुळे उत्स्फूर्ततेमधून चित्र तयार करण्याचा अत्यानंद आपण उपभोगू शकतो. तसेच चित्रामध्ये एक प्रकारची लय असते. त्यामुळे चित्र ठोकळेबाज होत नाही. जीवनात लय असेल तर जीवन ‘लय’मय होऊन जाते. ही उत्स्फूर्तता पेनने चित्रांकन करताना सापडत नाही. पेन्सिल ड्रॉईंग झाल्यावर पेन वा ब्रशने काळ्या रंगाचा वापर करून चित्र तयार करावा. व त्यानंतर रंग लेपन करावे.

वर उल्लेख केल्याप्रमाणे, स्ट्रिपमधील प्रत्येक व्यक्तिरेखा, सर्व बाजूंनी चितारता आली पाहिजे. कारण ती व्यक्तिरेखा असंख्य वेळा त्या स्ट्रिपमध्ये डोकावत असते. परत-परत दिसणे (रिपीटेशन) हा कॉमिक्स स्ट्रिप्सचा ‘आत्मा’ आहे. मी जेव्हा ‘सनी दि सुपर स्लुथ’ हे कॉमिक्स पुस्तक तयार करीत होतो त्यावेळी त्याचा हिरो क्रिकेटपटू सुनील गावस्कर १९८७ चितारताना अतिशय कठीण गेले. कारण वास्तववादी पद्धतीने ते कॉमिक्स तयार करीत होतो. परंतु काही काळ सराव केल्यानंतर सुनीलचा चेहरा सहज चितारता येऊ लागला, म्हणजे चित्र चितारताना त्या व्यक्तीची शरीरयष्टी, कपडे, हावभाव हे तोंडपाठ झाले पाहिजे. तरच ती व्यक्तिरेखा असंख्य वेळा चित्रातून खेळवता येईल. ती व्यक्तिरेखा झाड, दगड, प्राणी, पक्षी, फुलांच्या रूपात असली तरीही. हेच तत्त्व व्यंगचित्रात्मक वा वास्तववादी पद्धतीने रेखाटन करताना वापरले जाते.

कॉमिक्स स्ट्रिपचे दोन प्रकार आहेत. एक म्हणजे शब्द आणि चित्र. दुसरे म्हणजे शब्दविरहित चित्र.

शब्द वापरताना अतिशय हुशारीने व समर्पक वापरले पाहिजेत. कारण शब्द आणि चित्र हे स्ट्रिपचे दोन हात आहेत. त्यातील एक भाग जरी लक्षवेधक नसला तर ती संपूर्ण रचना रुचिहीन बनते. तसेच स्ट्रिपचे नाव हे सुटसुटीत – आकर्षक पाहिजे. तरच संपूर्ण स्ट्रिप वाचण्याला वाचक उद्युक्त होईल.

शब्दविरहित कॉमिक्स स्ट्रिप करताना कल्पनाशक्तीचा वापर अतिशय तल्लखपणे करावा लागतो. कारण त्यातील चित्रे ही त्यांच्या हावभावातून बोलत असतात. यामध्येही चित्रांची रचना फारच आकर्षक असावी लागते. इंग्लिशमध्ये गॅग कार्टून्स (ॅंॠ उं१३ल्ल२) असे संबोधले जाते. अशा प्रकारच्या कार्टून्स स्ट्रिपचा वापर न्यूयॉर्कर या अमेरिकी मासिकाने पुरेपूर करून घेतला.

चित्र चितारताना क्लोज-अप-, मिड शॉट व लाँग शॉट अशा प्रकारे चित्रांकन चित्राची व कथेची कलात्मता द्विगुणित करण्यासाठी केला जातो.

स्ट्रिप चितारताना त्याच्या शेवटच्या ‘फ्रेम’मध्ये ‘पंच’ चित्रातून वा शब्दातून अचूकपणे दिला जातो, त्या वेळी जो आनंद चित्रकाराला होतो तो अवर्णनीयच असतो. हवेत तरंगल्यासारखा. शब्द वापरताना कथेला समर्पक. साधेसुधे व कमीतकमी वापरावे. आपले चित्र रेषांच्या माध्यमातून बोलले पाहिजे. शब्दबंबाळ स्ट्रिप असू नये. कॉमिक्स स्ट्रिप हे ‘चित्रांचे’ माध्यम आहे. हे लक्षात ठेवून कथा/ कल्पना पुढे न्यावी.

कॉमिक्स पुस्तक हे असंख्य ‘फ्रेम्स’ने बनविले जाते. प्रत्येक फ्रेम बारीकसारीक प्रसंगाने फुलविली जाते. उत्सुकता वाढविली जाते. शेवटी त्याचे सत्य उजेडात आणले जाते.

यात थरारनाटय़, गूढता, भय-भीती, दरोडे-खून, प्रेमसंबंध, काल्पनिक अलौकिक जग इत्यादी मानवाच्या भावनांचा समावेश केला जातो.

फँटम, द स्पायडर मॅन, टारझन, सुपरमॅन, रामायण, महाभारत इत्यादी. अमर चित्रकथेतील बहुसंख्य पुस्तके यांनी वास्तववादी चित्रकलेचे महत्त्व अधोरेखित केले आहे.

भारतीय ‘लोककला’, भारतीय ‘मिनिएचर’ चित्रकला व भारतीय शास्त्रीय संगीत याव्यतिरिक्त कला, या आपण पाश्चिमात्य व युरोपियन यांच्याकडून घेतल्या आहेत. साहजिकच कॉमिक्सची ही कला आपण त्यांच्याकडून घेतली आहे. १९६० साली फँटम, मँड्रेक यांसारख्या कॉमिक्सचे भारतीय भाषेमध्ये भाषांतर करून तीच पुस्तके भारतीय बाजारपेठेत वितरित करण्यात आली. त्याला आलेले यश पाहून प्रभावित झालेल्या अनंत पै यांनी भारतीय मातीतले विषय घेऊन त्यावर कॉमिक्स तयार करण्यास सुरुवात केली. त्याच काळात पाश्चिमात्य देशात ‘सुपर हिरो’ असलेल्या कॉमिक्सनी धुमाकूळ घातला. त्यामुळे प्रभावित झालेल्या भारतीयांनी नवीन भारतीय ‘सुपर हिरो’ जन्माला घातला. त्याचे नाव  ‘बतुल दी ग्रेट’ वा त्यानंर अनेक हिरो निर्माण झाले.

याच काळात काही इंग्रजी वर्तनामपत्रांनीही नवीन कॉमिक्स पुस्तके व स्ट्रिप्स बाजारात आणल्या. लेखक व्यंगचित्रकार अबिद सुर्ती यांनी कॉमिक्सच्या क्षेत्रात मोलाचे काम केले. गुन्हेगारी आणि डिटेक्टिव्ह यांच्यावर आधारित ‘बहादूर’ ही चित्रमालिका तयार केली. त्यानंतर ‘इन्स्पेक्टर आझाद’, ‘ढब्बूजी’ अशा अजरामर चित्रमालिका तयार केल्या.  अनंत पै यांनी अनेक भारतीय विषय हाताळण्यास सुरुवात केली. १९६७ पासून पंचतंत्र, धार्मिक कथा- रामायण, ऐतिहासिक, महाभारतसारखे काव्य असे विषय घेऊन जोरदार कॉमिक्स तयार करण्याचा धडाका  लावला.

अमर चित्रकथेच्या माध्यमातून ‘टिंकल’ने बाजारपेठ काबीज केली. त्यासाठी अनेक लेखकांचे योगदान मिळाले- त्याचप्रमाणे नामांकित चित्रकारांनी आपआपल्या परीने ही कला अति उंचावर नेऊन ठेवली. उदा. राम वाईरकर, दिलीप कदम, सौरेन रॉय, प्रताप मुळीक, वसंत हळबे, चंद्रकांत विटणकर, प्रदीप साठे, अर्चना आंबेरकर, गोविंद बमानिया इत्यादी.

व्यंगचित्रकार प्राण यांच्या ‘चाचा चौधरी’ कॉमिक्सने मुले आणि वडिलधाऱ्यांना कॉमिक्सचे वेड लावले. व्यंगचित्रकार अजित नैनान यांनी ‘अ‍ॅडव्हेंचर ऑफ मूछवाला’ डिटेक्टिव आणि पूह, त्याचा कुत्रा हे गुन्हे सोडवताना आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग कसा करतात हे जगासमोर ठेवले. अमर चित्रकथेचे ‘सुपांदी’ आणि ‘शिकारी शंभू’ यांनी मैलाचा दगड कॉमिक्स क्षेत्रात निर्माण केला.

काही कॉमिक्स वा कॉमिक्स स्ट्रिप्स या स्वतंत्र एकाच वर्तमानपत्र वा नियतकालिकासाठी असतात, तर काही कॉमिक्स या ‘सिंडिकेट’ पद्धतीने वितरित केल्या जातात. जगात सर्वप्रथम ‘पोगो’ ही स्ट्रिप ‘न्यूयॉर्क स्टार’ या वर्तमानपत्रासाठीच वापरली गेली. त्यानंतर अनेक ‘सिंडिकेट’ वितरण संस्था निघाल्या.

भारतामध्ये राज कॉमिक्स, डायमंड कॉमिक्स, अमर चित्रकथा, टिंकल यांचे कार्य जसे उल्लेखनीय आहे तसेच लहान मुलांसाठी ‘चिंटू’चेही कार्य वैशिष्टय़पूर्ण आहे. त्यामानाने लक्षात राहण्याजोग्या व फार काळ टिकणाऱ्या कॉमिक्स स्ट्रिप्स दिसून येत नाही.

सत्य घटनेवर आधारित ‘आजोबा’ही कॉमिक्स स्ट्रिप तयार झाली. यामध्ये विहिरीमध्ये पडलेला बिबळ्या वाघ पकडला जातो व त्याच्या गळ्यामध्ये ‘रेडिओ कॉलर’ लावून तो जंगलात सोडला जातो. तो ज्या ज्या ठिकाणी जातो त्याचे सर्व रेकॉर्डिग होते. तो एका रात्रीत माळशेज घाट ते मुंबई असे १२५ कि. मी. अंतर फिरला असे सिद्ध केले गेले.

तसेच सामाजिक कारणासाठी लोकांमध्ये भीती, गैरसमज यांचा मोड करून जागरूकता निर्माण करण्यासाठही कॉमिक्स स्ट्रिपचा वापर अतिशय छान पद्धतीने करता येतो हे जैतापूर अणू प्रकल्पावर कॉमिक्स स्ट्रिप्स काढून सिद्ध करण्यात आले.

७० ते ९० व्या दशकापर्यंत कॉमिक्स पुस्तके व स्ट्रिप्स यांचा सुवर्णकाळ म्हणता येईल. त्यानंतरच्या दशकात दूरदर्शनचा उदय व केबल नेटवर्कचा प्रभाव यांनी कॉमिक्स वाचणे हळू हळू कमी होत गेले. केबल नेटवर्क व इंटरनेटचा वापर लोक इतर माहिती व कॉमिक्स वाचण्यासाठी करू लागले. त्यामुळे आपोआपच कॉमिक्सच्या जगतावर अवकळा आली.

ग्राफिक नॉव्हेल्स हा चित्रमय प्रकार उदयास आला आहे. तसेच ‘वेब कॉमिक्स’ ही इंटरनेटने दिलेली संधी तरुण ‘कॉमिक्स’ चित्रकारांना सुवर्णसंधी’ ठरो!
प्रभाकर वाईरकर – response.lokprabha@expressindia.com