साहस
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com, @joshisuhas2
कमांडर अभिलाष टॉमी पुन्हा एकदा शिडाच्या बोटीतून सागर परिक्रमेला निघाले आहेत. मागच्या वेळची परिक्रमा म्हणजे भ्रमंती होती तर या वेळी ही जगभरातील १८ दर्यावर्दीमधली स्पर्धा आहे.

समस्त जग फुटबॉलमध्ये बुडालेले असताना आणि जगाच्या कोणत्याही कोपऱ्यातदेखील क्रिकेटच्या मॅच नसताना भारतीयांना फारसे काम नसते. दुसरीकडे बॉलीवूडप्रेमी संजूबाबाच्या प्रेमात आकंठ बुडालेले असताना एक भारतीय मात्र एका जगावेगळ्या सागरसफरीवर निघाला आहे, याचीदेखील कल्पना नसते. १ जुल २०१८ ला फ्रान्सच्या ल सेबल डी ओलॉन या बंदरावरून कमांडर अभिलाष टॉमी दुसऱ्यांदा सागर परिक्रमेला निघाले आहेत. जगभरातील १८ दर्यावर्दी स्पर्धकांमध्ये ते एकटेच भारतीय स्पर्धक आहेत, तेदेखील निमंत्रित.

सागर परिक्रमा म्हणजे शिडाच्या बोटीतून जगाला प्रदक्षिणा घालणे. तसे ते २०१२-१३ मध्येदेखील सागर परिक्रमा करून आले होते. पण तेव्हाची आणि आत्ताची सागर परिक्रमा यामध्ये शब्दश: जमीन-अस्मानाचे अंतर आहे. कारण तेव्हा ते थेट सॅटेलाइट यंत्रणांचा वापर करत होते. आत्ता त्यांच्याकडे आहे केवळ एक होकायंत्र, काही नकाशे (जे सागराची खोली तसंच प्रदेश दाखवतील) आणि आकाशातील ग्रहतारे. आत्ताची सागर परिक्रमा ही स्पर्धा आहे.

समस्त भारतीयांसाठी अभिमान वाटावी अशीच ही गोष्ट आहे. पण याची सुरुवात आणि अखेरीस त्यांचं सागरावर स्वार होणं हे बऱ्याच अडचणींतून साकार झालं आहे. एकतर आपल्याकडे अशा प्रकाराला फारसं प्रोत्साहन मिळत नाही. यापूर्वीची त्यांची परिक्रमा भारतीय नौदलाच्या माध्यमातून झाली होती. आत्तादेखील त्यांना नौदलाचे सहकार्य आहेच, पण त्याशिवाय त्यांना बऱ्याच गोष्टी स्वत:लाच कराव्या लागल्या आहेत. अगदी बोट बांधणीच्या खर्चापासून जुळवाजुळव होती. पण अक्वारीस शिपयार्डच्या रत्नाकर दांडेकर यांनी ही बोट बांधून दिली, आजवर त्याच्या खर्चाबद्दल त्यांनी चकारही काढलेला नाही. गोवा शिपयार्डने देखील मदत केली आहे. कमांडर दिलीप दोंदे (निवृत्त) त्याच्यासोबत प्रत्येक घडामोडीत होतेच. एकूण खर्चाचा अंदाज लावायचाच तर काही कोटी रुपये खर्च झाले आहेत. हे सारेच प्रकरण खूप दमवणारे असल्याचे अभिलाष सांगतात.

या परिक्रमेमध्ये सर्वात महत्त्वाची बाब होती ती ही बोटच. कारण १९६८-६९ मध्ये जशी बोट वापरली तशीच आत्ता वापरणे बंधनकारक होते. त्यामुळे केवळ दहा मीटर लांबीच्या बोटीवर त्यांना आत्ता पुढचे किमान ३०० दिवस काढावे लागणार आहेत. ही बोट पाहणे आणि त्यावरून समुद्रावर भटकणे हा एक भन्नाट असा अनुभव आहे. प्रस्तुत प्रतिनिधीने या बोटीवर अभिलाष यांची भेट घेतली तेव्हा ३०० दिवस एवढय़ाशा जागेत वावरणे हेच सर्वात पहिले आव्हान असल्याची जाणीव झाली होती. बोटीच्या पुढील बाजूस साधारण दोन मीटर बाय दोन मीटर अशी काय ती मोकळी जागा. बाकी सर्व ठिकाणी काही ना काही कामाच्या वस्तू. तळाशी साधारण तीन एक मीटर रुंद आणि सात-आठ मीटर लांब खोली, ज्यात झोपण्याची जागा, खाद्यपदार्थ, पाणी, इतर सामग्री. किचन आणि टॉयलेटदेखील तेथेच. बोटीच्या शेवटाला सुकाणू आणि त्यासमोर तळाच्या खोलीत उतरायच्या जिन्यासमोर दोन बाय एक फूट लांबीचा मोकळा खड्डा. ज्याच्या एका टोकाला सुकाणू, दुसऱ्या टोकाला शिडाच्या खांबाच्या तळाशी होकायंत्र. या चिंचोळ्या रिकाम्या जागेच्या मागे ऑटो पायलटची एक छोटी दांडी. बोटीच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकाला जाण्यासाठी अगदी एक फूट रुंदीची चिंचोळी जागा. झोपायचे असेल तर तळाशी असणाऱ्या खोलीत दोन फूट रुंदीचा बेड हीच काय ती जागा.

बोटीचं वर्णन करायचं तर इतकंच करता येईल. यापेक्षा तेथे अधिक काहीच नाही. तांत्रिक बाबीमध्ये एक हॅम रेडिओ आहे आणि सागराची खोली दाखवणारे एक यंत्र. सॅटेलाइट फोन असेल पण तो केवळ स्पर्धा आयोजकांच्या संपर्कासाठी आणि अगदीच गरज पडली तर वैद्यकीय मदतीसाठी. त्यापलीकडे संपर्क साधला तर स्पध्रेतून बाद.

या सर्व गणितामुळे ही सागर परिक्रमा बरीच प्रदीर्घ अशी ठरणार आहे. अशा प्रकारची पहिली सागर परिक्रमा पूर्ण होण्यास ३१२ दिवस लागले होते. पण या बोटीतून प्रवास करणे ही एक प्रकारची िझगच आहे. अनुभव घेतल्याशिवाय खरे तर ते कळणारच नाही. खुल्या समुद्रात कोणत्याही यंत्राचा आधार न घेता केवळ वाऱ्याच्या आधारे मलोन्मल अंतर कापणं हे तितक्याच मेहनतीचं आहे. अभिलाष टॉमी यांच्याबरोबर या बोटीतून तासभर प्रवास करताना या सफरीच्या खडतरपणाचा अंदाज आला.

येथे महत्त्वाचं असतं ते नेमकी दिशा पकडणं. दिशा पकडायची तर आधी तुम्ही कोठे आहात हे ठरवावं लागतं. मग कोठे जायचं ती दिशा निश्चित करावी लागते. मग उत्तरेपासून ती दिशा किती अंशावर आहे हे ठरवून सुकाणू त्या खांबाच्या तळाशी असणाऱ्या होकायंत्रातील त्या अंशाच्या दिशेने स्थिर ठेवावा लागतो. त्याआधी तुम्हाला वाऱ्याची दिशा पाहून शीड उघडावं लागतं. हे शीड उघडणं म्हणजे सर्वात मेहनतीचं काम. आहारशास्त्रवाल्यांच्या भाषेत सांगायचं तर दिवसातून किमान दोन वेळा शीड उघडणे आणि  बंद करणे यामध्ये किमान चार हजार २०० कॅलरीज खर्च होऊ शकतात. वेगवेगळ्या ठिकाणाच्या दोऱ्या सोडायच्या, त्या पुन्हा दुसऱ्या ठिकाणी बांधून ठेवायच्या असा सारा या टोकापासून त्या टोकापर्यंतचा धावपळीचा मामला. एवढं झाल्यानंतर सुकाणू पकडून बसायची जागा अगदीच चिंचोळी. त्यामुळे धावपळीनंतर आराम असा नाहीच. पण एकदा का शीड उघडले की बोटीला मिळणारा वेग हा काही औरच असतो. बोटीच्या पुढच्या बाजूस जाऊन उभं राहिल्यास लक्षात येतं की सागरावर स्वार होणं म्हणजे काय असतं. शीड ज्या दिशेने उघडलं त्या बाजूला बोट कललेली असते आणि  वाऱ्याच्या वेगाने बोट सागरातून वेगाने मार्ग काढत असते. ही िझगच कदाचित वारंवार असं साहस करायला भाग पाडत असावी. त्यासाठीच तर अभिलाषदेखील निघाले आहेत. आत्ता त्यांच्याशी संपर्क थेट ३०० दिवसांनंतरच होणार आहे.

गोल्डन ग्लोब रेस

१९६८-६९ साली आयोजित केलेल्या सागर परिक्रमेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त या विशेष स्पध्रेचं आयोजन करण्यात आलं आहे. तेव्हा वापरली तशीच बोट वापरणं, तेव्हाइतकीच साधनसामग्री, तंत्रज्ञान वापरणं यामध्ये बंधनकारक आहे. सर रॉबिन नॉक्स जॉन्स्टन यांनी त्या वेळी नऊ स्पर्धकांमध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. त्यांना सागर परिक्रमा पूर्ण करण्यास ३१२ दिवस लागले होते. कमांडर अभिलाष टॉमी यांनी सर रॉबिन यांच्या सुहाली या बोटीची प्रतिकृतीच केली असून त्यांच्या बोटीचं नाव ‘तुरिया’ असं आहे.