सुनीता कुलकर्णी

करोनापासून समाजाला वाचवण्यासाठीच्या लढाईत आघाडीवर उभे आहेत पोलीस, डॉक्टर, नर्सेस आणि इतर वैद्यकीय कर्मचारी, पालिका कर्मचारी, पत्रकार, सफाई कामगार… आज हे सगळे आघाडीवर आहेत म्हणून बाकीचा समाज सुरक्षितपणे घरात राहू शकतो आहे. पण या बाकीच्या समाजाला खरोखरच या लढवय्यांच्या संघर्षाची जाणीव आहे का?

करोनाच्या प्रादुर्भावाने काल मुंबईत दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. लोकांना करोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी टाळेबंदी आवश्यक आहे आणि लोक ती पाळत नाहीत, म्हणून पोलिसांना रस्त्यावर उभं राहून ती पाळायला भाग पाडावं लागतंय. म्हणजे तुम्ही आम्ही सुरक्षित रहावं यासाठी पोलिसांना, वैद्यकीय कर्मचाऱ्यांना जीव धोक्यात घालावा लागतो आहे.

यातल्या प्रत्येकालाच आपापलं कुटुंब आहे, प्रियजन आहेत, आपापल्या आयुष्याची स्वप्नं आहेत. त्यांनाही करोनाच्या संसंर्गाची भीती आहे. पण या गोष्टी बाजूला ठेवून हे सगळे जण गेला दीड महिना कर्तव्याला प्राधान्य देत आपापली कमान सांभाळत आहेत. कशासाठी आणि कुणासाठी… तर तुमच्याआमच्यासाठी.

आजपर्यंत आपण पडद्यावर खोटी खोटी फाईट मारणाऱ्या हिरोंना डोक्यावर घेऊन खूप नाचलो आहोत. पण आता थांबवूया ते सगळं, जसा जगातल्या कुठल्याही धर्माचा देव मानवतेला या संकटापासून वाचवायला पुढे आला नाही आणि डॉक्टर्स आणि नर्सेस पुढे सरसावले, तसंच कुठल्याही सिनेमातला हिरो आज या न दिसणाऱ्या शत्रूशी लढायला मैदानात आलेला नाही, तर ज्यांची सिनेमांमधून कायम खिल्लीच उडवली गेली, ते पोलीस करोनाशी दोन हात करायला मैदानात उभे आहेत. त्यांच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना सहवेदना तर आहेच, पण त्यांचं बलिदान, त्यांचे श्रम वाया जाऊ नयेत ही आपलीच सगळ्यांची जबाबदारी आहे.

तेव्हा या लढवय्यांसाठी तरी घरीच रहा, सुरक्षित रहा.