डॉ. गिरीश वालावलकर
लोकप्रभा दिवाळी २०२०

कोविडने प्रत्येकाच्या आयुष्यात अनेक प्रश्न निर्माण केले. सतत धावणारं जग बंद पाडलं. सर्वच स्तरांवर निराशाजनक स्थिती उद्भवली. जिवंत राहण्यासाठी, तगून राहण्यासाठी आज प्रत्येकाला धडपडावं लागत आहे. अशा स्थितीत हताश होण्यापेक्षा यातून बाहेर कसं पडता येईल, यावर विचार करणं सकारात्मकतेकडे नेऊ शकतं. कोविडमुळे उद्भवलेल्या समस्यांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न..

करोना संसर्ग सुरू झाल्यावर अनेक वस्तू आणि उत्पादनांच्या विक्रीवर मोठे परिणाम होऊ लागले. गाडय़ांना गिऱ्हाईक मिळेना. कारखाने बंद पडू लागले. कंपन्या प्रचंड तोटय़ात जाऊ लागल्या. त्या वेळी काही कंपन्या आणि उद्योजकांनी गोंधळून न जाता शांतपणे परिस्थितीचं मूल्यमापन करून लगेचच स्वत:मध्ये आवश्यक ते बदल केले. त्या उद्योजकांनी करोनाकाळात मागणी येईल अशी उत्पादनं तयार करून आपले उद्योग यशस्वी ठेवले. फोर्ड, जनरल मोटर्स, टेस्ला यांसारख्या गाडय़ांचं उत्पादन करणाऱ्या नावाजलेल्या कंपन्यांनी उत्पादन बंद केलं आणि गाडय़ांच्या सुटय़ा भागांपासून ‘व्हेंटिलेटर्स’ तयार करून विकायला सुरुवात केली. व्हेंटिलेटर्सना प्रचंड मागणी होती. त्याचा कंपन्यांना फायदा मिळाला. टाळेबंदीच्या काळात कपडय़ांची मागणीसुद्धा एकदम घटली. त्या वेळी ‘ब्रूक्स ब्रदर्स’ आणि ‘न्यू बॅलन्स’सारख्या आधुनिक फॅशनच्या कपडय़ांची निर्मिती करणाऱ्या मान्यवर कंपन्यांनी मास्क आणि सर्जिकल गाऊन्स तयार केले. त्यामुळे त्या कंपन्या तगून राहिल्या. करोनाच्या सुरुवातीच्या काळात डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताकडे ‘हायड्रॉक्सीक्लोरोक्विन’ या औषधाची मागणी केली. त्यापाठोपाठ हायड्रॉक्सीक्लोरोक्विनला जगभरातून अचानक प्रचंड मागणी येऊ लागली. सरकार हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या उत्पादनाला उत्तेजन देऊ लागलं. माझ्या एका मित्राचा अंबरनाथला औषधांचा कारखाना आहे. माझ्या मित्राने त्याच्या कारखान्यातल्या मोकळ्या जागेत हायड्रॉक्सीक्लोरोक्विनच्या उत्पादनासाठी एक तात्पुरता प्लान्ट उभा केला. गेल्या चार वर्षांत त्याच्या कारखान्याला जे उत्पन्न मिळालं होतं त्यापेक्षा जास्त उत्पन्न त्या चार महिन्यांत मिळालं. चहूबाजूंनी येऊ घातलेल्या बदलांचा योग्य तो अंदाज घेतला, त्यानुरूप आवश्यक ती व्यावसायिक आणि व्यावहारिक कौशल्यं आत्मसात केली आणि सकारात्मक मानसिकतेने त्या बदलांचा स्वीकार केला तर करोनानंतरच्या आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक जीवनातसुद्धा आपण अधिक यशस्वी, आनंदी आणि समाधानी होऊ शकतो..

(उर्वरित लेख वाचा प्रत्यक्ष ‘लोकप्रभा दिवाळी २०२०’मध्ये. अंक बाजारात सर्वत्र उपलब्ध.)