20 January 2018

News Flash

हिमालयातील सायकलिंगचा आनंद

गिर्यारोहणानंतरचा भटकंतीचा निखळ आनंद देणारा प्रकार म्हणजे सायकिलग!

सुमित पाटील- आशीष आगाशे | Updated: February 24, 2017 1:10 AM

हिमालयातील सायकिलग करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उंची.

हिमालय हे पर्यटनासाठी सर्वसामान्यांमध्ये लोकप्रिय आहेच. त्याचबरोबर साहसी खेळांसाठीदेखील लोकप्रिय होत आहेत. पण सध्या या अति उंचावरील वाटांवर सायकलिंगचा आनंद घेणाऱ्यांचे प्रमाण लक्षणीयरीत्या वाढताना दिसत आहे.

गिर्यारोहणानंतरचा भटकंतीचा निखळ आनंद देणारा प्रकार म्हणजे सायकिलग! डोंगरांतील नसíगक सौंदर्य तुम्हाला तिथे जाण्यास प्रवृत्त करत असेल, तर ते तसेच टिकवणे हेदेखील तुमचेच कर्तव्य आहे. सायकलवर भटकंती करून आपण हे कर्तव्य काही प्रमाणात पार पाडतोच, पण या भटकंतीने व्यक्तिगतरीत्या संपन्न होतो. आवाज, धूरविरहित असे सृष्टीचे जैसे-थे रूप तुम्हाला पाहायला, अनुभवायला मिळते. त्यातच ही भटकंती हिमालयाच्या पर्वतरांगांतील असेल तर मग भटक्यांसाठी पर्वणीच म्हणावी लागेल.

गेल्या काही वर्षांत आपल्याकडे हमरस्त्याने, आडवाटांवर व काही प्रमाणात सह्य़ाद्रीच्या डोंगरात सायकलिंग चांगलेच लोकप्रिय झाले आहे. भारतभ्रमण किंवा ठरावीक एक मार्ग आखून लांब पल्ल्याची भ्रमंती करणारेदेखील खूप आहेत. पण हिमालयात स्वत:चे आखणी करून सायकलिंग करणाऱ्यांची संख्या तुलनेने कमीच आहे. अर्थात युथ होस्टेलसारख्या संस्था असे उपक्रम वारंवार करत आहेत.

हिमालयातील सायकलिंगमध्ये काही महत्त्वाच्या बाबी लक्षात ठेवाव्या लागतील. इथे रस्ते हे स्थानिक लोक तसेच सन्यासाठी बांधले जातात. सायकल चालवताना या दोन्ही गटांशी भरपूर संवाद करता येतोच आणि महत्त्वाचे म्हणजे हे सगळे आत्मसात करायला वेळ मिळतो. इथे आपली ‘धिमी लोकल’ सगळ्यात फायदेशीर ठरते. प्रत्येक वस्ती, ढाबा, कॅम्पवर थांबत पुढे जाता येते. स्थानिक खाद्य पदार्थ, कधी सैन्यदलातील जवानांबरोबर चहा-समोसा आणि तुमचे नशीब चांगले असेल तर कोल्ड कॉफी.. असे काहीही मिळू शकते!

काश्मीर ते अरुणाचल प्रदेश अशी दोन हजार ४०० किमी पसरलेली जगातली सर्वात तरुण आणि अति-उंच अशी ही हिमालयाची डोंगररांग आपल्याला लाभली आहे. काश्मीरचे खोरे, लडाख, हिमाचल प्रदेशातील पाच खोरी, उत्तराखंड, सिक्कीम, पश्चिम बंगालचा काही भाग आणि अरुणाचल प्रदेश असे पूर्वेकडे जाताना शिखरांची उंची कमी होत जाते. सीमेपलीकडे हिमालयाचा विस्तार हा नेपाळ आणि भूतानमध्ये आहे. तेथेदेखील भरपूर सायकिलग होते. पण भारतातून भूतानमध्ये सायकल चालवत जाणे थोडे अवघड आहे.

हिमालयातील ड्रीम राइड करताना काय कराल?

हिमालयातील सायकिलग करताना सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे उंची. उंचीमुळे विरळ होत जाणारी हवा आणि हवेतील प्राणवायूची कमतरता हे तसे आव्हानात्मक आहे. पण काही अगदी सोप्प्या आणि मूलभूत गोष्टींची काळजी घेतल्यास त्यावर मात करणे सहज शक्य आहे. या पर्वतरांगेत पूर्वानुभव नसल्यास शक्यतो एकटय़ाने जाणे टाळावे. तसे जाणे काही अशक्य नाही, पण त्यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. त्यापेक्षा सुरुवात तरी अनुभवी संस्थांबरोबर करावी. लोकवस्ती विरळ असल्यामुळे मुक्काम आणि जेवणाची ठिकाणे शोधून ठेवणे, गरज भासल्यास वैद्यकीय सेवा मिळतील अशी ठिकाणे, सैन्यदलाचे तळ माहिती असणेही अनिवार्य आहे.

सायकलिंगच्या मार्गाबाबत काही खबरदारी आधीच घ्यावी. प्रथम मॅपराईड किंवा गुगल मॅपसारख्या संकेतस्थळावर जाऊन आपल्या मार्गाचा नकाशा तयार करून त्याचा लॅटिटय़ूड प्रोफाइल काढणे अनिवार्य आहे. इंटरनेटच्या मायाजालात आज अजीर्ण होईल इतका डेटा उपलब्ध आहे. त्याच्या आहारी जायचे की नाही हे आपल्याला ठरवायचे आहे. काही माहिती ही ‘आवश्यक’ या श्रेणीत मोडते, ती नक्कीच घ्या, पण अति माहिती घेऊन गोंधळू नका. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे इतर कोणाचे अनुभव जगायला म्हणून हिमालयातले सायकलिंग करू नका. तो अनुभव त्यांचा ब्लॉग वाचून पण शक्य आहे.

बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशन अर्थात बीआरओच्या अथक प्रयत्नांमुळे आपल्याला हिमालयातील सायकलिंग शक्य होत आहे हे लक्षात घ्यावे लागेल. यातील बरेच रस्ते बाराही महिने सुरू नसतात. हिमालयीन पर्वत रांगेत अजूनही घडामोडी होत असतात त्यामुळे तेथे काही ना काही पडझड सुरूच असते. बहुतांश सायकिलग हे उन्हाळ्यात होते, तरी जायच्या आधी माहिती घेतलेली चांगली. बीआरओच्या अनेक प्रकल्पांवर व इतर काही प्रकल्पांवर काम करणाऱ्या आणि दूरच्या प्रदेशातून आलेल्या मजुरांशी गप्पा मारा. तुमच्या ज्ञानात तर भर पडेलच, शिवाय सायकलिंगसाठी काही महत्वाची माहिती हाताशी लागेल.

उन्हाळा असला तरी हिमालयात कधीही पाऊस तुम्हाला झोडपू शकतो. त्याला झेलायची तयारी असणं महत्त्वाचे आहे. त्याप्रमाणेच आपले सारे सामान पॅक करणे महत्त्वाचे आहे. रोज दुपारी दोननंतर हवामात बदल होऊ लागतात. त्यामुळे शक्य तेवढय़ा लवकर निघून मुक्कामाचे ठिकाण गाठणे फायदेशीर असते.

सायकल चालवत आपण हळूहळू मेहनत करत उंची गाठतो ज्याचा आपल्याला तेथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी फायदाच होतो. तरीपण साधारण सात-आठ हजार फुटांवर पोहोचल्यानंतर दोन दिवस तेथील वातवरणाशी जुळवून घेण्याकरिता थांबणे बंधनकारक आहे. पहिला दिवस आरामाचा आणि मग दुसऱ्या दिवशी थोडी उंची गाठून परत खाली येऊन मुक्काम करायचा. पुढचे कॅम्प ठरवताना पण ‘राइड हाय अ‍ॅण्ड कॅम्प लो’ हे ब्रीद लक्षात ठेवायचे. लडाखसारख्या परिसरातील आपल्याला १४ हजार फुटांच्यावर मुक्काम करावा लागतो. असे केल्यास हा मुक्काम आणि तेथे सायकल चालवणे सहज शक्य होते. जाण्याआधी चौकशी केल्यास कदाचित आपले वैद्यकीय सल्लागार एका विशिष्ट गोळीचे सेवन सुरू करायला सांगतील. या गोळ्यांची खरेदी करावी पण त्या अगदीच गरज असल्यास घ्याव्यात.

सायकलिंग हे सर्वानाच उल्हसित करणारे माध्यम आहे. पण एखादा वाईट दिवस असल्यास अगदी अट्टाहासाने स्वत:ला प्रसन्न ठेवणे चांगले. हताशपणा, चीड चीड, चक्कर येणे, पोटात मळमळ यांपकी कोणतीही गोष्ट निदर्शनास आल्यास शक्य तेवढे लवकर कमी उंचीवर जाणे गरजेचे आहे. ग्रुपबरोबर फिरत असल्यास सोबतच्या मित्रांकडे लक्ष ठेवावे आणि सहलही एकत्र एन्जॉय करावी.

रस्त्यावर जे काही खायला मिळेल ते खा. पाणी शक्यतो प्रचलित स्रोतांमधून घ्या (विशेष करून हिमाचल प्रदेशमध्ये). हिमालयात नकळत डिहायड्रेड (शरीरातील पाणी कमी होते). हिमालयातील थंडीमुळे पाणी पिण्याचे प्रमाण कमी होते. त्यासाठी आपण पाणी आणि इलेक्ट्रोलाइट्स सतत घेणे आवश्यक आहे. गरज भासल्यास खाण्याच्या पदार्थामध्ये मिठाची मात्रा वाढवू शकता. हवामान आणि त्यात आपण करत असलेले शारीरिक श्रम, अशा दोन्ही बाबींमुळे खाण्यावर विशेष लक्ष्य गरजेचे आहे.

रस्त्यातील चढ हे अटळ आहेत. आपल्याला १५-२० किमीचे घाट सायकलने पार करायची सवय असते. पण हिमालयात बऱ्याच वेळेला हे अंतर त्याच्या दुप्पट असू शकते. तर ते थकता अंतर कापत राहणे गरजेचे आहे. अगदी हलक्या गिअरवर, छातीचा भाता न फुलवता हळूहळू चढ पार करणे गरजेचे आहे.

हिमालयात रस्ते कसेही असू शकतात. लडाखच्या काही भागात एकदम कार्पेट पसरल्याप्रमाणे गुळगुळीत रस्ते आहेत तर, अरुणाचल प्रदेशमध्ये अत्यंत वाईट असे रस्ते आहेत. एमटीबी किंवा हायब्रीड प्रकारच्या सायकली हिमलयासाठी वापरणे उत्तम.

हिमालयातील सायकलिंगबाबत सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे सवयीचीच सायकल चालवणे महत्त्वाचे आहे. सरावाला कोणताही पर्याय नाही आणि आठवडय़ातून किमान तीन-चार दिवस सराव करणे गरजेचे आहे. याशिवाय आठवडय़ातून एकदातरी लांब पल्ल्याचे सायकिलग (किमान पाच-सहातासाचे) करणे आवश्यक आहे. कारण हिमालयातील सायकलिंगसाठी बराच काळ सीटवर बसून अंतर कापण्याची सवय होणे गरजेचे आहे.

हिमालयात सायकलिंग करताना कायमच कमीत-कमी आणि गरजेचेच सामान सोबत ठेवले पाहिजे. पॅनिअर बॅग्ज म्हणजे सायकलिस्टचा आवडता मित्र. २०-२५ किलो सामान सहज वाहून नेणाऱ्या पिशव्या कॅरिअरवर लावल्या जातात. याव्यतिरिक्त इतर छोटय़ा बॅग्ज येतात त्या घेणे भागच होते. अतिदुर्गम प्रदेशात टूर असल्यास टेन्ट न्यावा लागू शकतो.

सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे आपल्या आयुष्यातील नेहमीच्या कामातील बदल म्हणून आपण हिमालयात जातो. आपल्याला अनिश्चितपणा विषयी आवड निर्माण होणे गरजेचे आहे कारण बरेच वेळा, ठरवल्याप्रमाणे काहीच घडत नाही. या शक्यतेमुळे कायम जास्तीचे चार-पाच दिवस हाताशी ठेवूनच निघावे.

हिमालयातील सायकलिंग हे अजून फारसे लोकप्रिय नसले तरी त्यामध्ये अनोखा आनंद तुम्हाला मिळू शकतो. जो इतर कोणत्याही महामार्गावरील लांबच्या पल्ल्याच्या सायकलिंगपेक्षा वेगळा असतो.

हिमालयात सायकलिंग कुठे कराल?

मनाली-लेह-खारदुंगला : बहुधा सर्वात लोकप्रिय मार्ग, पण अतिशय उंची गाठणारा आहे.

लेह-लामारुयु-कारगिल-द्रास-श्रीनगर : उत्तम रस्ते, थोडे कमी चढ (फक्त दोन िखडी)

गुवाहाटी-तवांग : अत्यंत खडतर असा मार्ग आहे. रस्ते मुळातच फारसे नाहीत. वाटेत तुलनेने सुविधा कमी आहेत.

तिनसुकिया-वॉलाँग-काहो : भारतातील अतिपूर्वेकडील मॅकमोहन रेषेजवळ नेणारा मार्ग. सोपा आणि नयनरम्य.

सिमला-स्पिती व्हॅली : उंची जास्त, खडतर मार्ग.

दार्जििलग-गंगटोक-नथुला : भरपूर दमछाक, हवामान कधीही बदलू शकते. रस्ता वाईट नाही पण चांगलादेखील नाही.

अर्थात आजही नियमित पर्यटनासाठीदेखील हिमालयात अनेक वाटा अज्ञात आहेत. त्यामुळे सायकलिस्टना अशा वाटा शोधण्यासाठी संपूर्ण हिमालयच मोकळा आहे.
सुमित पाटील- आशीष आगाशे – response.lokprabha@expressindia.com

First Published on February 24, 2017 1:10 am

Web Title: cycling in himalaya
  1. No Comments.