22 February 2019

News Flash

हिमालयाच्या कुशीतले सायकलिंग

हिमालयात सायकल चालवण्याचे एक वेगळेच आव्हान असते.

गेल्या डिसेंबरमध्ये सायकल घेतली तेव्हाच ठरले होते मनाली-लेह या सायकलिंग करायचे.

ट्रेकर ब्लॉगर
सुहास जोशी – response.lokprabha@expressindia.com / @joshisuhas2
महाराष्ट्रातील सायकलस्वारांना सह्य़ाद्रीच्या डोंगररांगांमध्ये सायकलिंग करायची सवय असली तरी हिमालयात सायकल चालवण्याचे एक वेगळेच आव्हान असते.

एखाद्या नव्या कामाची सुरुवात करताना गणपतीचे नाव घेतले जाते. तीच पद्धत लडाखमध्ये अवलंबवायची तर मनाली-लेह महामार्गावर कोणतीही कृती करताना येथे पहिला देव असतो तो म्हणजे ‘बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन’ म्हणजेच बीआरओ. भारतीय पायदळाच्या सोयीसाठी सीमावर्ती भागातील रस्ते बांधायची, देखभाल करायची जबाबदारी यांची. पायदळाला मनाली-लेह रस्त्याची गरज नसती तर कदाचित नागरी सुविधा पुरवणाऱ्या यंत्रणांकडून हा रस्ता बांधून तरी झाला असता का असाच प्रश्न पडतो इतके हे कठीण काम आहे. बीआरओबरोबरच एका व्यक्तीचे नाव घेतल्याशिवाय या रस्त्यावरील भटकंतीबद्दल बोलणे कदाचित व्यर्थ ठरेल. ती व्यक्ती म्हणजे सुखदेवसिंग गिल. केवळ २७ वर्षांचेच आयुष्य लाभलेल्या या अभियंत्याने मनाली ते लेह या रस्त्याचे सर्वेक्षण सर्वप्रथम यशस्वीरीत्या पूर्ण केले. त्यानंतर बीआरओने हा रस्ता पूर्ण केला. मनाली लेह रस्त्यावरून जाताना ज्याच्याबद्दल कृतज्ञता बाळगावी अशी ही व्यक्ती. रोहतांगच्या सपाटीवर त्यांचा स्मृती शिलालेख लावला आहे आणि त्यांना ‘फादर ऑफ मनाली लेह हायवे’ अशा सार्थ संबोधनाने गौरविलं आहे.

गेल्या डिसेंबरमध्ये सायकल घेतली तेव्हाच ठरले होते मनाली-लेह या सायकिलग करायचे. मनाली ते लेह तब्बल ४७३ किमीचे अंतर. संपूर्ण रस्ता डोंगरातून जाणारा. अगदी सपाट अशा भूभागातून जातानादेखील ठरावीक उंचीने चढते रस्ते, तर एखाद्या पासवरून उतरायला लागलं की थेट तळाशी जाईपर्यंत जबरदस्त उतार असणारे रस्ते. वर्षांतील जवळपास सहा-आठ महिने बर्फाने आच्छादल्यामुळे बंद असणारा हा रस्ता खुला होतो तो २६ मेच्या आसपास. सप्टेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापर्यंत तो सुरू राहतो आणि पुन्हा बंद होतो. आव्हान कठीण होते, पण याच वाटेवर गेल्या दहा वर्षांत सायकिलगचे भरपूर उपक्रम झाले आहेत. एका नोंदीनुसार मुंबई आयआयटीच्या एका चमूने साध्या सायकलीनिशी सत्तरच्या दशकात येथे भटकंती केली होती. युथ होस्टेलने हृषीकेश यादव यांच्या पुढाकाराने २००९ मध्ये या वाटेवर मोठय़ा संख्येने सायकस्वारांना आणले.  त्यानंतर या रस्त्यावर सायकिलगला खऱ्या अर्थाने जोर आला. पाठोपाठ व्यापारी तत्त्वावर असे उपक्रम आयोजित करणाऱ्यांची संख्याही वाढली. त्यानुसार या वाटेवरील सुविधा विकसित होत होत्या. ते सर्व पाहता वाटेवरील सुविधांचा वापर करत छोटय़ा चमूसह येथे जाता येऊ शकत होते. तसे प्रयोग झाले होते. म्हणूनच मग मी, सुमीत पाटील आणि समिधा पटेल असे तिघेचजण निघालो. समिधा केवळ १२ वर्षांची. त्यामुळे तिचे आई-वडील सोबत गाडी घेऊन आले होते.

अनेक वष्रे सह्यद्रीत भटकल्यानंतर डोंगर नवीन नव्हते. पण हिमालयाची भव्यता काही वेगळीच आहे. सह्यद्रीशी तुलना करायची नाही, पण सह्यद्रीत सर्वोच्च शिखराच्या उंचीवरूनच आमच्या सायकिलगची सुरुवात झाली. सह्यद्रीची सर्वोच्च उंची पाच हजार ४०० फूट, तर मनाली सहा ७०० फुटांवर. दोन दिवस तेथील हवामानाशी जुळवून घेण्यासाठी वेळ दिला आणि एके दिवशी दुपारनंतर सायकलवर टांग टाकली.

पहिल्या दिवशी फार अंतर कापायचे नव्हते, पण उंची बऱ्यापकी गाठली जाणार होती. ठिकाण ठरले होते. पलचन किंवा कोठी यापकी एक गाव. पण काही कारणास्तव पलचनपासून दोन किमी आत असणारे सोलंग गाठावे लागले. त्यात हा सगळा रस्ता चढाईचा होता तो वेगळाच. मनाली सोडल्या सोडल्या बियास नदीच्या काठाने सरळ पण चढाचा रस्ता पार करत दहा किमीवरच्या पलचनला पोहोचायला दीड एक तास लागला. पलचन तसेही फार काही आकर्षक गाव नाही. येथे अगदी रस्त्याच्या बाजूलाच खाटांवर जुगाराचे अड्डे भरले होते. त्यातच सोलंगला कोणतातरी उत्सव होता. त्यामुळे वर्दळदेखील बरीच. पण त्या गर्दीतून मूळ सोलंग तसे लांबच होते. डोंगर उतारावरचे आणि रोहतांग पासच्या डोंगरामागे वसलेले सोलंग संधीप्रकाशात आणखीनच आकर्षक वाटत होते. सोलंगवरून पुढे जाणारा रस्ता धुंदीपर्यंत जातो. तेथूनच पुढे रोहतांग टनेलची सुरुवात होते. रोहतांगच्या पोटातून जाणारा हा टनेल थेट कोखसर आणि सिस्सू या दोन गावांमध्ये उघडतो. या बोगद्याचे काम जवळपास पूर्ण होत आले असून पुढील वर्षीच्या मोसमात तो खुला होऊ शकतो. ही सारी रस्ते, वाहतूक व महामार्गमंत्री नितीन गडकरींची धावपळ. त्यामुळे येथील लोकांना त्यांचे नाव चांगलेच माहीत आहे.

सोलंगचा मुक्काम मात्र झक्कास होता. बियासचा प्रचंड असा खळखळाट ऐकत, हिम साचलेल्या डोंगरमाथ्यावर झेपावणारे कोवळे सोनेरी किरण पाहत येथील सकाळ सुरू होते. त्याच ऊर्जेच्या जोरावर रोहतांग पार करायचे असे ठरवून सायकली बाहेर काढल्या. पलचन, कोठी, गुलाबा आणि मढी गाठून मग रोहतांग पास गाठायचा असा विचार होता. पण हा सर्वच रस्ता चढाचा. मोठमोठी वळणे घेत झाडांच्या सावलीतून मस्तपकी वर चढत जाणारा. वाटेत एक-दोन चहा, नाश्त्याचे ठेले. बाकी फक्त आपणच. गुलाबा येथे एक पोलिसांचा तपास कक्ष. पण तो मुख्यत: रोहतांग पास पार करणाऱ्या वाहनांनी प्रदूषण कर भरला आहे का हे तपासणारा. मात्र गुलाबा नावाचे गाव कुठे आहे असे विचाराल तर ते मात्र येथे कुठेच दिसत नाही. एखादी वाडी-वस्ती असावी कदाचित, पण त्याबद्दल नेमके ना पोलिसांना सांगता येते ना टपरीधारकांना. लेह-मनाली रस्त्यावर मधल्या अनेक थांब्यांवर हाच प्रकार आहे. गुलाबाच्या तपासनाक्यावर पाणी मिळते आणि स्वच्छतागृहाची सोयदेखील आहे हे महत्त्वाचे.

मढी हे पलचनपासून सुमारे ३० किमीवर आहे. लांबलचक फेरफटका मारून जाणारा रस्ता झाडीने वेढला असला तरी शेवटी शेवटी कंटाळा आणि थकवा दोन्ही जाणवायला लागतात. एकतर शेवटचा टप्पा अगदीच रखरखाटाचा आहे आणि त्यातच पोटात कावळे ओरडायला सुरुवात झाली होती. जेवणाच्या वेळी मढी गाठायचे ठरले होते, पण जेवणाची वेळ उलटून गेल्यावरच आम्ही मढीला पोहोचलो. शेवटचा टप्पा कंटाळवाणा असला तरी मढीच्या अगदी जवळ पोहोचल्यानंतर असणाऱ्या ओढय़ाच्या किनारी चार ते पाच गिधाडांचे एकत्रित दर्शन झाले. सह्य़ाद्रीत अगदीच ठरावीक ठिकाणी दिसणारी आणि अस्तित्वाच्या संदर्भात धोक्याच्या पातळीजवळ पोहोचलेली ही गिधाडं अशी एकत्रित पाहण्याचा आनंद काही वेगळाच होता. रोहतांगच्या वरच्या टप्प्यात या गिधाडांची कॉलनी असावी. कारण दुसऱ्या दिवशी सायकल चालवताना एक गिधाड तर अगदी दहा मीटरवरून उडत गेले.

मढी येथून पुढे रोहतांगचा १२ किमीचा चढ चढून पुन्हा ३१ किमी अंतर उतरायचे हे जरा त्रासदायकच ठरले असते. त्यात पुन्हा आम्ही येण्याआधीच्या आठवडय़ात या भागात पाऊसदेखील चांगलाच झाला होता. त्यामुळे या उतारावरील निम्म्या अधिक दगड-मातीच्या रस्त्यावर चिखलाचा सामना करावा लागला असता. १५ दिवसांपूर्वीच सुमीत या रस्त्यावरून गेलेला असल्यामुळे त्याला याचा चांगलाच अंदाज होता. त्यामुळे मढीला मुक्काम करणे श्रेयस्कर ठरणार होते.

मढी तसे रोहतांगच्या चढावरचे मध्यावरचे ठिकाण. दहा-बारा ढाबे आणि वनखात्याचे एक विश्रामगृह हेच काय ते मढीचे अस्तित्व. त्यातही वनखात्याच्या विश्रामगृहाला नुकतीच आग लागल्याने ते पूर्णत: ढासळलेले. एकूण ढाब्यांपैकी एकाच ढाब्यावर राहण्याची सोय आहे ती; देखील अगदीच मर्यादित. पण आत्ता तेथील सर्वच ढाबे रस्ता रुंदीकरणात मागील बाजूस जात असून त्यांचे बांधकाम जोरात सुरू आहे. पुढील वर्षी कदाचित सर्वच ढाब्यांवर राहण्याची सोय होऊ शकेल.

मढीत आम्हाला आणखीन एक भिडू मिळाला, सचिन राठी. हा दिल्लीचा. मनालीहून सायकल भाडय़ाने घेऊन एकटाच निघाला होता. आणि गुलाबापर्यंत येतानाच दमल्यामुळे सायकल एका जीपमध्ये टाकून मढीला आला होता. जरासा अबोलच. सुमीतला असे कोणी नवीन भेटले की जाम उत्साह येतो. त्याने लगेचच ठरवले, याला काहीही करून लेहपर्यंत घेऊन जायचे. सचिनदेखील तयार झाला.

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे सहा वाजता रोहतांगची चढाई सुरू झाली. आता रस्ता मध्ये मध्ये खराब होता. पण वळणावळणाला उंची गाठली जात होती. आधी मढी आणि नंतर पार दूरवर कोठी, पलचनमधील इमारती अगदी छोटय़ा, छोटय़ा होत गेल्या. पण अजूनही समोरचा डोंगर कालचाच होता. जोपर्यंत रोहतांग पास पार करत नाही तोपर्यंत तरी नवीन डोंगर दिसणार नव्हता. त्यामुळे जरा कंटाळापण आला होता. त्यातच वळणं लांबत होती. आणि उंची वाढत असल्याने दमदेखील चांगलाच लागत होता. या वाटेवर पहिल्यांदाच सेनादलाच्या ट्रक्सचा भलामोठा ताफा आम्हाला ओलांडून गेला. हा रस्ता उघडलेला असतो तेव्हा येथे विशेषत: सैन्यदलाच्या वाहनांची वर्दळ प्रचंड असते. अगदी रोजच्या रोज शेदोनशे वाहने वरखाली जात असतात. लेह आणि परिसरात असणाऱ्या सैन्यदलाच्या युनिट्समध्ये उर्वरित वर्षांसाठी लागणाऱ्या सामानाची बेगमी करणे हा त्यामागचा महत्त्वाचा हेतू.

अखेरीस दुपारनंतर रोहतांगचा टॉप पार करून उताराला सुरुवात झाली. रोहतांगच्या परिसरात एरवी बरीच गर्दी असते. पण आत्ता मनालीचा पर्यटन सिझन नसल्यामुळे ही गर्दी बरीच कमी होती. रोहतांगच्या पलीकडे एक वेगळंच जग आहे. झाडांनी आच्छादलेला रस्ता आता पार मागे राहिला होता आणि समोर उघडे बोडके रखरखीत डोंगर दिसत होते. त्यावर सध्या तरी हिरवळ होती, पण अनेक ठिकाणी रखरखाटदेखील. त्यामुळे डोंगरांची भव्यता आणखीन अंगावर येऊ लागली. कोखसर गाठल्यावरच आम्हाला जेवायला मिळणार होते. तोपर्यंत आमच्या बॅगेत असलेला खुराक हाच आधार होता. रोहतांग चढताना एक मजेशीर प्रसंग घडला. सचिन तसा फारसा न भटकणारा. तर सुमीतचा या रस्त्यावर चांगलाच राबता होता. सुमीतने आम्हाला सांगितले होते की पाणी संपले तर थेट येणाऱ्या-जाणाऱ्या गाडीला हात करायचा आणि मागायचे. अगदी भूक लागली असेल तर खायला मागितले तरी हरकत नाही. सचिनने याची अगदी ताबडतोब अंमलबजावणी केली आणि दोन बाटल्या पाणी आणि एक भलामोठा मारीचा पुडा त्याने मिळवला. त्याच्यासाठी हा अनुभव एकदमच वेगळा होता.

रोहतांगचा उतार सुसाट होता, पण चारेक किमी चांगला रस्ता संपल्यावर पुढे सगळंच माती आणि दगडधोंडय़ांचं राज्य होतं. प्रचंड चढ चढल्यानंतर आलेला उतार म्हणून आनंद होता, पण त्याला चांगलाच ब्रेक लागला. चारच्या आसपास कोखसरला पोहचलो. कोखसरच्या अलीकडे डोंगर उतारच्या शेवटच्या टप्प्यात ग्राम्पूजवळ एक फाटा उजवीकडील डोंगररांगात घुसतो. हा फाटा स्पितीकडे जाणारा. आम्ही डावीकडून कोखसर गाठले. आत्ता आमच्या बाजूने स्पितीमधून वाहणारी भागा नदी होती. तिच्या पलीकडे भलीमोठी डोंगररांग. याच डोंगराच्या पोटातून रोहतांग टनेल काढला होता. त्याचे या बाजूचे तोंड आणि तेथील पुलाची कामे जोरात सुरू होती. रस्ता बऱ्यापैकी उताराचा. भागा नदीच्या वेगवान प्रवाहाबरोबर सायकलदेखील वेगाने सुटली होती. मुक्कामाचे ठिकाण होते सिस्सू. येथे बरेच होम स्टे आहेत. अतिशय स्वच्छ आणि निगा राखलेली अशी ही सुविधा म्हणजे भटक्यांसाठी पर्वणीच म्हणायला हवी. विशेष म्हणजे ही सारी व्यवस्था त्या घरातील स्त्रियाच सांभाळतात. अगदी घरगुती पाहुणचारच म्हणावा अशी ही सुविधा. पोळी, भाजी, डाळ आणि भात, वर घरगुती लोणी असं सुग्रास घरगुती शाकाहारी जेवण झाल्यावर दिवसभराचे श्रम पार पळून गेले.

सिस्सू हे येथील पंचक्रोशीतलं मोठं गाव. परिसरातली मुलं शाळेसाठी येथेच येतात. दहावीपर्यंतची शाळा, पोस्ट ऑफिस अशा सुविधा येथे आहेत. हल्ली शहरातील लोकांना तशी पोस्ट ऑफिसपेक्षा कुरिअरची सवय अधिक असते. पण येथे मात्र पोस्ट ऑफिस ही अगदी प्राथमिक गरजेची गोष्ट असते.

सिस्सू आणि परिसरात शेतीदेखील बरीच आहे. त्यामुळे घरं आणि शेती अशी सरमिसळ दिसते. मुख्यत: फ्लॉवर, बटाटा आणि ब्रोकोली यांचं पीक इथं घेतलं जातं. हिवाळा संपला की डोंगरातील ग्लेशियर्स वितळून येणारं पाणी हा यांचा मुख्य आधार. डोंगरात पाइप बसवून त्याद्वारे घराघरांत आणि शेतीला पाणी पुरवलं जातं. पाण्यासाठी हीच पद्धत पुढे वाटेवरील सर्व ठिकाणी वापरली होती. चंदीगढ, कर्नाल, अंबाला येथील व्यापारी येऊन या भाज्या विकायला थेट बाजारात घेऊन जातात.

तिसऱ्या दिवशीची भटकंती सिस्सू ते जिस्पा अशी होती. सुरुवातीला तंडीपर्यंतचा सुसाट उतार आणि मग सावकाश चढाई असं याचं स्वरूप. सकाळी लवकर उठून आम्ही त्यासाठी सज्ज झालो.
(क्रमश:)

First Published on August 24, 2018 1:03 am

Web Title: cycling in himalayas