News Flash

प्रेक्षणीय दापोली

कोकणातला रत्नागिरी जिल्ह्य़ातला दापोली हा तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती या सगळ्यांचा अनोखा संगम.

प्रचंड नैसर्गिक श्रीमंती लाभलेल्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या ‘दापोली’सारखा तालुका महाराष्ट्राच्या नकाशात क्वचितच सापडेल.

फिरस्ती

अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com

कोकणातला रत्नागिरी जिल्ह्य़ातला दापोली हा तालुका म्हणजे निसर्ग, इतिहास, संस्कृती या सगळ्यांचा अनोखा संगम. रोजच्या रहाटगाडग्यातून बाहेर पडून थोडं वेगळं काही अनुभवायचं असेल तर दापोलीसारखा पर्याय नाही.

प्रचंड नैसर्गिक श्रीमंती लाभलेल्या कोकणात रत्नागिरी जिल्ह्य़ातल्या ‘दापोली’सारखा तालुका महाराष्ट्राच्या नकाशात क्वचितच सापडेल. दापोली म्हटलं की आंबे, समुद्रकिनारे आणि मासे इतकंच आपल्याला माहिती आहे. यापलीकडे दापोलीमध्ये दाभोळ बंदर, मुघलकालीन मशीद, चंडिकादेवीचं मंदिर, पन्हाळेकाजीच्या लेणी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी धोंडो केशव कर्वे, धर्मतत्त्वज्ञ पांडुरंग वामन काणे या तीन भारतरत्नांची गावे, रँग्लर रघुनाथ परांजपे यांचे बालपण गेलेले ठिकाण, सुवर्णदुर्ग, कणकदुर्ग, गोवा किल्ला, कोकण कृषी विद्यापीठ, लालबुंद जांभा दगडाचा परिसर, ब्रिटिशकालीन चर्च अशा अनेक गोष्टी आहेत.

शाही मशीद आणि दाभोळ बंदर

कोकणामध्ये दाभोळ बंदरात आदिलशाहीच्या काळापासूनची प्रचंड शाही मशीद आहे. तिचा अंडा मशीद किंवा मासाहेबा मशीद असा उल्लेख केला जातो. ही मशीद विजापूर येथील शाही जामा मशिदीची प्रतिकृती मानली जाते. या वास्तूत प्रवेश करण्यासाठी प्रशस्त, सुंदर काळ्या दगडाच्या पायऱ्या आहेत. तेथेच हौद व कारंज्याची मांडणी केलेली आहे. मशिदीच्या दर्शनी भागात तीन भव्य कमानी आहेत. चारही कोपऱ्यांवर अतिशय प्रमाणबद्ध मनोरे आहेत. मनोऱ्यावर दगडात कोरलेले साधे पण मनोवेधक नक्षीकाम आहे. छज्जाच्या मध्यभागावर छोटे छत्रीवजा घुमट व त्याच्या पाठीमागे मशिदीचा भव्य घुमट आहे. घुमटावर पूर्वी सोनेरी पत्रा होता असे सांगितले जाते. या मशिदीच्या निर्मितीच्या कथा वेगवेगळ्या सांगितल्या जातात. त्यातील एक कथा अशी की, इ. स. १६५९ मध्ये विजापूरची राजकन्या आयेषाबीबी मक्केला जाण्यासाठी दाभोळला आली. पण हवामान ठीक नसल्याने ती जाऊ शकली नाही. मौलवीने सोबत आणलेले धन धार्मिक कार्यासाठी वापरावे, असा तिला सल्ला दिला. त्यानुसार तिने कामीलखान या शिल्पकाराकडून ही मशीद बांधून घेतली. त्यासाठी त्या वेळेस त्यासाठी १५ लाख रुपये खर्च आल्याची नोंद आहे. दाभोळ बंदरात अरबी घोडय़ांची आवक केली जात होती. मसाल्याच्या पदार्थाचा व्यापार होता. सध्या बंदरात मोठय़ा होडय़ांमधून चारचाकी, तीनचाकी वाहने पलीकडच्या किनाऱ्यावर सोडली जातात. येथे माशांची विक्री मोठय़ा प्रमाणात केली जाते.

चंडिका देवीचे मंदिर

या नैसर्गिक गुहेमध्ये देवीची तीन फूट उंचीची काळ्या पाषाणातील मूर्ती आहे. तिला शेंदूर फासलेला आहे. गुहेचे प्रवेशद्वार चांदीच्या पत्र्याने मढवलेले आहे. गुहेत उतरण्यासाठी पायऱ्या केलेल्या आहेत. आत पूर्ण अंधार आहे. तेथे जागोजागी समया तेवत ठेवलेल्या असतात. पांडव अज्ञातवासात असताना त्यांनी ही गुहा निर्माण केली, असे मानले जाते. या स्थानामागची कथा अशी की, गोसावी महंत ‘जमना पुरी’ यांना देवीने स्वप्नात येऊन गुहेचा मार्ग सांगितला. जमना पुरी यांना गुहेत देवीची पाषाणातली मूर्ती आढळली. या मूर्तीचे वैशिष्टय़ म्हणजे देवीचे अर्धे शरीर जमिनीखाली आहे. त्यांनी देवीची पूजाअर्चा सुरू केली. कालांतराने ही पूजाअर्चा ‘बाळ पुरी’ या विश्वस्तावर सोपवून त्यांनी मंदिराजवळच जिवंत समाधी घेतली. सध्या देवीची पूजा करणारी पिढी ही पुरी घराण्याची ३२ वी पिढी आहे. मंदिराचा परिसर नयनरम्य आहे. पावसाळ्यात जवळच एक धबधबा कोसळतो. शिवाजी महाराजांनी दाभोळ जिंकल्यानंतर अंजनवेलचा गोपाळगड, गोवळकोट व आडिवरे भागावर स्वारी केली. या मोहिमेदरम्यान त्यांनी अनेक वेळा या स्थानास भेट दिली होती, असा उल्लेख सापडतो.

भग्नावस्थेतील चर्च

दापोलीच्या कॅॅम्प परिसरातील चर्च ब्रिटिशकालीन इतिहासाची साक्ष देते. १८१८-१८५७ या कालावधीत येथे असलेला इंग्रज अधिकारी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी हे चर्च बांधले गेले. चर्चची ही इमारत गॉथिक शैलीत होती. दगडी चिऱ्यांनी बांधलेली ही इमारत अतिशय देखणी होती. चर्चच्या उंच मनोऱ्यावर एक सहा फुटांची मोठी घंटा होती. ती चोरीला गेली, असे सांगितले जाते. चर्चच्या खिडक्या दोन्ही बाजूने लांब आणि वरच्या दिशेने निमुळत्या होत जातात. १८१८ पासून ब्रिटिश राजवटीत सैन्य दलातले सर्व, म्हणजे जवळजवळ दोन हजार कोकणवासी इथं पेन्शन करिता वर्षांतून चार वेळा जमायचे. त्या काळात या चर्चच्या आवारात एसपीजी मिशनची ख्रिस्ती धर्माच्या प्रसाराची व्याख्याने चालायची. चर्चसमोरील आवार आणि इमारत अजूनही स्कॉटिश मिशनच्या हक्काची आहे असे सांगितले जाते. अशाच रचनेचे चर्च पुणे जिल्ह्य़ातील पुरंदर किल्ल्याजवळ आहे.

जालगावचे जंगल

खरं तर संपूर्ण दापोलीच विविध प्रकारच्या झाडांनी, फळांनी, फुलांनी, पक्ष्यांनी आणि प्राण्यांनी नटलेलं आहे, मात्र जालगाव जंगलात जायचं कारण म्हणजे येथे असणारे निजसुरे दाम्पत्य. जिल्पा निजसुरे आणि प्रशांत निजसुरे यांनी आपलं सुखवस्तू आयुष्य सोडून निसर्ग समजून घेण्यासाठी एक तप खर्ची घातलं आहे. मुंबईतून फॉरेस्ट्री विषयात एमएस्सी झालेल्या जिल्पा निजसुरे यांनी जंगलातील पक्ष्यांचा अभ्यास केला आहे. त्याशिवाय फुलपाखरे, छोटे कीटक, विविध झाडं आणि त्यांचा जीवन प्रवास त्या सांगतात तेव्हा ऐकणारा भान हरपतो. कारण, आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्या आजूबाजूला निदर्शनास येणाऱ्या फुलपाखरांचा, पक्ष्यांचा आणि वनस्पतीचा एवढय़ा बारकाईने आपण कधीच विचार केलेला नसतो. निसर्गाच्या संवर्धनाबद्दल आपण वैयक्तिक पातळीवर काय करायला हवे, आपली छोटी-छोटी सकारात्मक कृतीसुद्धा निसर्गाची काळजी घेण्यासाठी पुरेशी असते. फक्त आपला दृष्टिकोन बदलायला हवा, हे त्यांनी सांगितलं.

मुरुड गाव

समुद्रकिनारा ही या गावाची शान आहे. कारण, हळुवारपणे आपल्या पायाला स्पर्श करणाऱ्या समुद्राच्या लाटा, ऐन उन्हातही शीतल वारा आणि किनाऱ्यावर उपलब्ध असणारी घोडागाडी, आजूबाजूला झुलणारी सुपारीची झाडे.. या गावची दुसरी शान म्हणजे भारतरत्न महर्षी धोंडो केशव कर्वे. ते ज्या शाळेत शिकले ती शाळा आणि तिच्यासमोरील समोरील ग्रंथालय हे विशेष आकर्षण आहे. या गावात आणखी एक विशेष गोष्ट आजही पाहायला मिळते. ती म्हणजे ‘पाखाडी’. यामध्ये खालची पाखाडी आणि वरची पाखाडी असे दोन प्रकार पडतात. पाखाडी हा आजच्या काळात अजब वाटावा असा प्रकार आहे. पूर्वी गावात सवर्णासाठी वेगळा आणि निम्न मानल्या जाणाऱ्या एका मोठय़ा वर्गासाठी वेगळा रस्ता बांधला गेला होता. त्यामुळे एकाच रस्त्यावर दोन वेगवेगळ्या वाटा इथे पाहायला मिळतात. याची रचना निम्न स्तरातील व्यक्तींची सावली सवर्णावर पडणार नाही, अशा पद्धतीने केलेली दिसून येते. आता हा जातीभेद इतिहासजमा झाला असला तरी जुन्या समाजरचनेच्या या खुणा अस्तित्वात आहेत.

दुर्गादेवीचे मंदिर

चौदाव्या-पंधराव्या शतकात सौराष्ट्राहून  येऊन एका सिद्धपुरुषाने सर्व जमातींना स्थान देऊन वसाहत निर्माण केली. तेव्हा सुरुवातीला देवीचे देऊळ अगदी साधे होते. कालांतराने ग्रामस्थांनी देऊळ नवीन करायचे ठरवले. त्यानुसार शंकरभट दीक्षित, विश्वनाथ जोशी, आपाभट दातार, केशवभट कर्वे व नारो हरी बाळ असे मुरुडचे कर्ते लोक कामाला लागले. १७६३ मध्ये हे दुर्गादेवीचे मंदिर उभे राहिले. या मंदिराची इमारत काळ्या दगडांच्या मजबूत चौथऱ्यावर उभी आहे. पायऱ्या चढून वर गेलं की तिन्ही बाजूंनी मोकळा सभामंडप आहे. मधोमध सुवर्ण नक्षी असलेली फरशी बसवण्यात आलेली आहे. सभा मंडपात सुंदर वेलबुट्टी काढलेले आकर्षक खांब आहेत. देवीची मूर्ती तेज:पुंज आहे. सभा मंडपाच्या बाहेर पोर्तुगीज देवळात असते तशी मोठी घंटा टांगलेली आहे. काळ्या दगडाच्या चौथऱ्यावर बांधलेलं तुळशी वृंदावन आणि शेजारी मोठी काळ्या दगडाची दीपमाळ आहे.

पन्हाळेकाजी लेणी

दापोलीतून सुमारे २८ किलोमीटर अंतरावर थोरली-धाकटी कोटजाई नदी आहे. या नदीजवळ ‘पन्हाळेकाजी’ हे गाव आहे.  डोंगरकपारीत वसलेले हे गाव, बाजूला फणसांनी लगडलेली झाडे, नदीवरचा छोटासा पूल, नदीतील स्वच्छ आणि नितळ पाणी पाहत-पाहत आपण लेणींच्या दिशेने प्रवास करतो. या निसर्गरम्य अशा पन्हाळेकाजी गावाला महत्त्वाचा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. येथील लेण्यांमध्ये २८ शैलगृहे आणि २९ वे बागवाडी आदी ठिकाणे आहेत. या लेणींमधून फिरताना अनेक भिक्षू गृहे, स्तूप, सभामंडपे, अनेक छोटय़ा-छोटय़ा मूर्ती पाहायला मिळतात. या लेणींमध्ये बैठक व्यवस्था, पावळ्यातील पाणी जाण्यासाठी खोदलेली चर, भिंतीमध्ये तयार केलेल्या देवळ्या, छताच्या बाजूला अत्यंत अवघड असलेल्या ठिकाणी कोरलेली महाभारतातील विशिष्ट दृश्ये, रामायणातील प्रसंग, वेगवेगळ्या देवदेवतांच्या मूर्ती, सभामंडपे, शिल्पे आहेत. हीनयान, वज्रयान, नाथ संप्रदाय यांच्या निवासाच्या आणि शिलाहार साम्राज्याच्या अनेक खुणा येथे पाहायला मिळतात.

उंचच उंच सुपारीची आणि नारळाची झाडे, वाटेत काजूच्या बागा, झाडाच्या खोडांना बुंध्यापर्यंत लगडलेले फणस, आंब्यांच्या बागा, लालबुंद माती, मंडईत बसलेले मच्छीविक्रेते, कृषी विद्यापीठ हे सगळं पाहणं म्हणजे मोठी पर्वणीच म्हणावी लागेल. त्याचबरोबर फेसाळणाऱ्या समुद्राच्या लाटा झेलत उभा सुवर्णदुर्ग हा आजही छत्रपती शिवराय तसंच आंग्रे कुटुंबीयांच्या कर्तृत्वाची साक्ष देतो. गोवा किल्ला, कनकदुर्ग हेदेखील पर्यटकाला इतिहासात घेऊन जातात. दापोलीचे हर्णे बंदर आणि त्या ठिकाणी होणारा माशांचा लिलाव पाहण्यासारखा आहे. केवळ आंबा, समुद्र आणि मासे यापुरतंच मर्यादित न ठेवता दापोलीतल्या निसर्गाचा आनंद घ्यायचा असेल, तर इथे एकदा नक्की भेट द्या.

(ही टूर ‘तालुका दापोली डॉट कॉम’ या संकेतस्थळातर्फे आयोजित करण्यात आली होती.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 31, 2019 1:02 am

Web Title: dapoli tour
Next Stories
1 Cricket World Cup 2019 : है तय्यार हम..!
2 Cricket World Cup 2019 : इतिहास विश्वचषकाचा!
3 मनी की बात..
Just Now!
X