18 January 2020

News Flash

दसरा विशेष : सोनेरी सीमोल्लंघन, शीव ते स्वित्र्झलड.. व्हाया बॅडमिंटन!

भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मीसुद्धा मोठय़ाने राष्ट्रगीत गाऊ लागले.

मानसी जोशी

ऋषिकेश बामणे – response.lokprabha@expressindia.com

दसऱ्याला केल्या जाणाऱ्या सीमोल्लंघनाला एकेकाळी विशेष महत्त्व होते. आज काळ बदलला असला, पूर्वीसारखे सीमोल्लंघन केले जात नसले तरी आपल्यात असलेल्या मर्यादा पार करून त्यापलीकडे पोहोचणं, आकाशाला गवसणी घालणारं काहीतरी मिळवणं हेदेखील एक प्रकारचं सीमोल्लंघनच. मानसी जोशी आणि विक्रांत केणी या दोन क्रीडापटूंनी आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करत जागतिक पातळीवर कर्तृत्वाचा ठसा उमटवला आहे. त्यांच्या या सीमोल्लंघनाच्या निमित्ताने..

दिनांक २५ ऑगस्ट, २०१९, सायंकाळी पाच ते सहाच्या दरम्यान सर्व भारतीयांच्या नजरा फक्त एकाच व्यक्तीवर खिळलेल्या, ती म्हणजे पी. व्ही. सिंधू. स्वित्र्झलडमध्ये झालेल्या जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेतील महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात सिंधूने जपानच्या नोझोमी ओकुहाराचा अक्षरश: धुव्वा उडवला. या विजयी खेळीमुळे ती भारतातर्फे जगज्जेतेपद पटकावणारी पहिली महिला बॅडमिंटनपटू ठरली. परंतु सिंधूने हे अभूतपूर्व यश मिळवण्याच्या बरोबर २४ तासांपूर्वी स्वित्र्झलडमध्येच झालेल्या अपंगांच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत मुंबईतील शीव (सायन) येथे राहणाऱ्या ३० वर्षीय मानसी जोशीने विजेतेपद मिळवून ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. मात्र दुर्दैवाने तिचे यश सर्वासमोर येण्यासाठी काही दिवसांचा अवधी लागला.

वयाच्या २२व्या वर्षी आलेले अपंगत्व आणि त्यामुळे खेळण्यासाठी करावी लागणारी तारेवरची कसरत यांसारख्या अनेक अडथळ्यांवर मात करून मानसीने स्वित्र्झलडमध्ये भारताचा झेंडा डौलाने फडकावला. अंतिम फेरीत तिने भारताच्याच पारुल परमारचा २१-१२, २१-७ पराभव केला. या विजेतेपदानंतरच्या तिच्या भावनाही अन्य खेळाडूंपेक्षा वेगळ्या होत्या.

‘‘अपंग खेळाडूंच्या स्पर्धामध्ये फक्त आशियाई आणि जागतिक अजिंक्यपद या स्पर्धामध्येच सुवर्णपदक विजेत्या खेळाडूचे राष्ट्रगीत वाजवले जाते. त्यामुळे भारताचे राष्ट्रगीत सुरू झाले, तेव्हा मला अश्रू अनावर झाले आणि मीसुद्धा मोठय़ाने राष्ट्रगीत गाऊ लागले. त्या दिवसापासून माझ्या आयुष्याने वेगळे वळण घेतले. मला अनेक कार्यक्रमांसाठी दररोज आमंत्रणे येत असून समाज माध्यमांवरसुद्धा माझ्यावर स्तुतिसुमनांचा वर्षांव होत असल्याने मी या काळाचा फक्त आनंद लुटत आहे,’’ मानसीची ही प्रतिक्रिया तिच्यासाठी हे विजेतेपद किती महत्त्वाचे होते, हे सांगून जाते.

मानसीच्या संघर्षांची गाथा सुरू झाली वयाच्या सहाव्या वर्षी. त्या वेळी भाभा अणू संशोधन केंद्रात कार्यरत असणारे वडील गिरीशचंद्र यांच्यासह फावल्या वेळेत मैदानात बॅडमिंटन खेळण्याची मानसीला सवय लागली. पुढे हाच खेळ आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनणार आहे, याची तिला त्या वेळी  पुसटशी कल्पनाही नव्हती. ऑटोमिक एनर्जी सेंटर शाळेतून १०वीपर्यंतचे शिक्षण घेणाऱ्या मानसीने २०१० मध्ये मुंबईतील के. जे. सोमय्या महाविद्यालयातून अभियांत्रिकीची पदवी मिळवली. या दरम्यानही मानसीने बॅडमिंटनचा सराव सुरू ठेवला. परंतु सगळं सहज मिळाले, तर त्याची किंमत नसते, असे स्वत: मानसीही म्हणते. तिच्या बाबतीतही असेच घडले.

डिसेंबर २०११ मध्ये चेंबूर येथील अणुशक्ती नगर येथून विक्रोळीच्या दिशेने प्रवास करण्यासाठी निघालेल्या मानसीला समोरून येणाऱ्या ट्रकने जोरदार धडक दिली आणि यामध्ये तिला डावा पाय गमवावा लागला. परंतु मानसीने हार न मानता बॅडमिंटनमध्ये कारकीर्द घडवण्याचा निर्णय पक्का केला. सुरुवातीच्या काळात तिला एका पायावर उभे राहणेही जमत नव्हते. पण. २०१४ मध्ये मानसी राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी झाली. त्या वेळी तिने कृत्रिम पायाचा वापर करून जिद्दीने खेळ केला.

२०१५ मध्ये कारकीर्दीत पहिल्यांदाच अपंगांच्या जागतिक स्पर्धेत खेळणाऱ्या मानसीने मिश्र दुहेरीत रौप्यपदकाची कमाई केली. हे यश तिला भविष्यातील आव्हानांसाठी प्रेरणा देणारे ठरले. पुढील तिन्ही वर्षे मानसीने आशियाई, जागतिक यांसारख्या स्पर्धेत देशाला अनेक पदके जिंकवून दिली. परंतु तिच्या कामगिरीची फारशी दखल घेतली गेली नाही. २०१८मध्ये मानसीने पहिल्यांदाच पुलेला गोपीचंद यांच्या हैदराबाद येथील अकादमीत सराव करण्यास सुरुवात केली.

२०१९ हे वर्ष मात्र तिच्या कारकीर्दीला कलाटणी देणारे ठरले. एप्रिल महिन्यात तिने जागतिक स्पर्धेची पात्रता निश्चित केली. मग ऑगस्टमध्ये रंगलेल्या या स्पर्धेत उपउपांत्यपूर्व फेरीपासून तिने हळूहळू अंतिम फेरीही गाठली आणि अखेरीस जगज्जेतेपद मिळवले. व्यावसायिक पातळीवर भारत पेट्रोलियमचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मानसीच्या यशात विलास दामले आणि लिमये यांचे मोलाचे योगदान आहे. त्याशिवाय देवनार येथील रोटरी क्लब, भाभा अणू संशोधन केंद्रातील क्रीडा विभाग येथील अनेकांचेही तिला वेळोवेळी साहाय्य लाभले. आतापर्यंत मानसीने विविध पातळींवरच्या स्पर्धामध्ये सात सुवर्ण, सात रौप्य आणि १२ कांस्यपदके मिळवली आहेत. सध्या ती पुढील वर्षी होणाऱ्या अपंग खेळाडूंच्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी तयारी करीत आहे.

First Published on October 4, 2019 1:02 am

Web Title: dasara special manasi joshi differently abled badminton player sports personality
Next Stories
1 ‘तिला’ही साजशृंगारासह निरोप
2 प्रथा-परंपरा श्रद्धा
3 ‘मोक्षप्राप्ती’चा मार्ग
Just Now!
X