18 January 2020

News Flash

प्रथा-परंपरा श्रद्धा

मृत्यू म्हणजे नेमकं काय हे समजत नव्हतं तेव्हापासून माणसाने या अटळ वास्तवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे.

जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या वेगवेगळ्या जमाती, पंथ, धर्म या प्रत्येकाचा या वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे.

विजया जांगळे – response.lokprabha@expressindia.com

मृत्यू
अंत हीच सुरुवात! (ख्रिश्चन)

मृत्यू म्हणजे नेमकं काय हे समजत नव्हतं तेव्हापासून माणसाने या अटळ वास्तवाचा अर्थ लावण्याचा प्रयत्न केला आहे. जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या वेगवेगळ्या जमाती, पंथ, धर्म या प्रत्येकाचा या वास्तवाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगवेगळा आहे. त्याने  माणसाला वेळोवेळी जगण्यासाठी आधार दिला आहे. हिंदू धर्मातील मृत्यूविषयीचा दृिष्टकोन आपल्याला बहुतेकांना माहीत असतो. ख्रिश्चन, इस्लाम, बौद्ध,  बेने इस्रायली, पारशी, जैन धर्मीयांच्या मृत्यूविषयक धारणांचा परिचय..

ख्रिश्चन धर्मात पुनर्जन्माची संकल्पना नाही. माणसाचा जन्म आणि मृत्यू एकदाच होतो यावर विश्वास ठेवणारा हा धर्म आहे. मात्र यात पुनरुत्थानाची संकल्पना आहे. मृत्यूमुळे शरीर आणि आत्म्याचे विभाजन होते आणि शरीर नष्ट होते, असे मानले जाते. जगाचा शेवट होईल, तेव्हा सर्वाचा एकत्रित न्यायनिवाडा होईल आणि ज्यांनी चांगली कृत्ये केली असतील, त्यांना तेजस्वी शरीर प्राप्त होईल आणि त्यांचे पुनरुत्थान होईल, अशी ख्रिश्चन धर्मीयांची श्रद्धा आहे. येशूने मृत्यूनंतर स्वसामर्थ्यांने स्वतचे पुनरुत्थान केले आणि त्याच्या पुण्याईमुळे तिसऱ्याच दिवशी तो पुन्हा जिवंत झाला. सामान्यांना मात्र हे शक्य नाही. त्यांना जगाच्या अंताचीच वाट पाहावी लागेल, असे मानले जाते.

पुनर्जन्माची संकल्पना या धर्मात अस्तित्वात नसली, तरी स्वर्ग, नरक आणि शुद्धिस्थान या संकल्पना मात्र अस्तित्वात आहेत. ज्यांनी धर्माचे योग्य रीतीने पालन केले आहे, पुण्य केले आहे त्यांना स्वर्गप्राप्ती होते. ज्यांनी देवाचा सहवास किंवा अस्तित्व नाकारले आहे त्यांना नरकात जावे लागते आणि ज्याला स्वतच्या दुष्कृत्यांची जाणीव आहे, मात्र त्या पापांचे परिमार्जन त्याने आपल्या हायातीत केलेले नाही अशांना मुक्तिस्थानात जागा मिळते, अशी श्रद्धा आहे. मुक्तिस्थान म्हणजे एक प्रकारचे सुधारगृहच. मात्र या सुधारगृहातील व्यक्तींना आपल्या दुष्कृत्यांचे परिमार्जन स्वत करता येत नाही. आपल्या कुटुंबातील व्यक्तींच्या पापांचे परिमार्जन व्हावे आणि त्यांना स्वर्गात स्थान मिळावे, यासाठी त्यांच्या वंशजांनाच प्रार्थना करावी लागते.

जिथे ख्रिश्चन वस्ती असते, तिथल्या चर्चशी आजूबाजूची कुटुंबे जोडलेली असतात. चर्च आणि त्याच्याशी संबंधित कुटुंबे मिळून धर्मग्राम तयार होते. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्याची माहिती, त्याचे कुटुंबीय ज्या चर्चशी जोडले गेले आहेत, त्या चर्चला दिली जाते. ही माहिती मिळताच चर्चच्या बेलचे एका विशिष्ट तालात ठोके दिले जातात. त्यामुळे संपूर्ण धर्मग्रामाला आपल्या भागात कोणाचा तरी मृत्यू झाला आहे, याची सूचना मिळते. एखाद्या व्यक्तीचा मृत्यू रात्री झाल्यास सकाळी आठच्या सुमारास दफनविधी होतो आणि मृत्यू सकाळी झाल्यास संध्याकाळी चारच्या सुमारास दफनविधी केला जातो. त्यासंदर्भातील माहिती देणारी सूचना चर्चमध्ये लावली जाते आणि परिसरातील अन्य चर्चनादेखील त्याची माहिती दिली जाते. जिथे बहुसंख्य ख्रिश्चन राहतात, त्या भागांत मृत्यूसंदर्भातील माहिती देणारे फलक सार्वजनिक ठिकाणी लावले जातात.

अंत्ययात्रेसाठी चर्चचे फादर त्या व्यक्तीच्या घरी जातात. ते तिथे गेले की पुन्हा बेल वाजवली जाते. मृत व्यक्तीच्या घरी कौटुंबिक प्रार्थना केली जाते. पूर्वी मृत व्यक्तीला शवपेटीत (कॉफिन) ठेवले जात असे. ‘शवपेटय़ा तयार करण्यासाठी होणारी वृक्षतोड आणि पेटय़ांसाठी होणारा खर्च विचारात घेता, अलीकडच्या काळात यात बदल होऊ लागले आहेत. बहुतेक ठिकाणी मृतदेह शुभ्र वस्त्रात गुंडाळला जातो. या वस्त्राला ‘श्राऊड’ असे म्हणतात. हाताने ढकलण्याच्या गाडीवर मृतदेह ठेवून अंत्ययात्रा काढली जाते,’ असे फादर कोरिया सांगतात. अंत्ययात्रेत सर्वात पुढे क्रॉस आणि मेणबत्त्या हाती धरलेल्या व्यक्ती असतात. त्यामागे महिला आणि त्यांच्या मागे पुरुष चालत जातात. मृतदेह चर्चमध्ये आणला जातो. तिथेही फादर प्रार्थना करून पवित्र पाणी शिंपडतात. त्यानंतर मृतदेह दफनभूमीवर नेला जातो. तिथेही येशूच्या पुण्याईमुळे ही व्यक्ती पवित्र होवो, अशी प्रार्थना केली जाते. त्यानंतर ‘इंतेरा’ म्हणजेच दफनविधी सुरू होतो. पाच फूट खोल खड्डा खोदून त्यात मृतदेह ठेवला जातो. ‘सर्व जण मूठमाती देतात. त्यानंतर दफनभूमीतील कर्मचारी मृतदेह मातीने झाकून त्याचे दफन करतात. लोक मृताच्या कुटुंबीयांशी हात मिळवून त्यांचे सांत्वन करतात आणि परत जातात,’ अशी माहिती फादर हिलरी फर्नाडिस यांनी दिली.

मृत्यूनंतर सातव्या आणि तिसाव्या दिवशी तसेच वर्षपूर्तीच्या दिवशी पुन्हा चर्चमध्ये प्रार्थना केली जाते. यावेळी मिसा विधी केला जातो. हा विधी दफनापूर्वी चर्चमध्येही करतात. येशूचा बळी देण्यात आला त्याच्या आदल्या दिवशीच त्याला मृत्यूची चाहूल लागली होती. ‘मी तुमच्यात नसलो, तरी भाकरीच्या रूपाने तुमच्यात राहीन’ असे तो आपल्या अनुयायांना म्हणाला होता. त्यामुळे ख्रिश्चन धर्मातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर सातव्या दिवशी आणि वर्षपूर्तीच्या वेळी अशा प्रकारे भाकरी मोडून मिसा विधी केला जातो. भाकरीच्या रूपाने येशू तिथे उपस्थित असेल आणि त्याच्या पुण्याईमुळे आपल्या पूर्वजांच्या पुनरुत्थानाचा मार्ग खुला होईल, अशी श्रद्धा त्यामागे असते.

पूर्वी ज्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या घरी प्रत्येक जण आपापल्या सोयीनुसार सांत्वनासाठी जात. मात्र आता सामूहिक प्रार्थना आणि सांत्वनासाठी एक विशिष्ट दिवस आणि वेळ निश्चित केली जाते आणि त्याच वेळी फादर, नातेवाईक आणि परिचित सामूहिक प्रार्थना करतात. २ नोव्हेंबर हा ख्रिस्ती धर्मीयांचा पूर्वजांची प्रार्थना करण्याचा दिवस असतो. या दिवशी सर्व जण चर्चमध्ये जातात. त्यानंतर दफनभूमीत जाऊन जिथे आपल्या नातेवाईकांना दफन केले आहे, तिथे मेणबत्ती लावतात आणि फुले, पुष्पचक्र किंवा फुलांनी सजवलेला क्रॉस वाहतात. आपल्या पूर्वजांना स्वर्गात स्थान मिळावे म्हणून हे सर्व विधी असतात.

जन्नत हेच अंतिम उद्दिष्ट  (इस्लाम)

जगात आलेल्या प्रत्येकाचा मृत्यू अटळ आहे. प्रत्येक व्यक्ती आईच्या उदरातून या जगात येते आणि शेवटी पृथ्वीच्या उदरात सामावली जाते. माणसाला पृथ्वीवर पाठवण्यामागे काही निश्चित उद्दिष्टे असतात. इस्लामचे पालन करत, चांगली कृत्ये करत जगणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. पृथ्वीवरील आयुष्य हे क्षणभंगुर आहे. मृत्यूनंतरचे आयुष्य म्हणजेच ‘आखिरत की जिंदगी’ अमर्याद आहे, अशी इस्लामची शिकवण आहे. इस्लममध्ये पुनर्जन्म, आत्मा, अतृप्त इच्छा, भूत इत्यादी संकल्पना नाहीत. पाप-पुण्य-स्वर्ग-नरक आणि मृत्यूनंतरचे जीवन या संकल्पना मात्र आहेत. मृत्यूनंतर प्रत्येक व्यक्तीच्या कृत्यांचा न्यायनिवाडा होतो आणि व्यक्तीला एकतर स्वर्ग म्हणजेच जन्नत नाहीतर नरक म्हणजेच जहन्नम प्राप्त होते, असा दृढ विश्वास आहे. माणसाने जन्नतमध्ये स्थान मिळवण्यासाठी आयुष्यभर प्रयत्न करत राहिले पाहिजे, अशी शिकवण आहे.

व्यक्तीचे निधन वृद्धापकाळाने, आजाराने, अपघाताने झालेले असो, ती व्यक्ती पुरुष, स्त्री वा बालक असो, केले जाणारे विधी साधारण सारखेच असतात. अगदी थोडा फरक असतो. कोणत्याही व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर प्रथम मृतदेहाला स्नान घातले जाते आणि शुभ्र वस्त्रात म्हणजेच कफनमध्ये गुंडाळले जाते. पुरुषांचा चेहरा अंतिम दर्शनासाठी खुला ठेवला जातो. स्त्रियांसाठी असलेली पर्दा प्रथा मात्र मृत्यूनंतरही कायम राहाते. स्त्रीचा मृत्यू झाल्यानंतरही घरातील अगदी जवळच्या नात्यातील व्यक्तींनाच तिचा चेहरा पाहण्याची परवानगी असते. मृतदेह इतरांपुढे आणण्यापूर्वी तिचा चेहरा झाकण्यात येतो. मृतदेह शवपेटीत ठेवला जातो. ही शवपेटी ख्रिश्चन धर्मीयांत वापरल्या जाणाऱ्या शवपेटीपेक्षा थोडी वेगळी- आयताकृती असते. तिला चार जण खांदा देतात. कुराण-ए-शरीफमधील दुवा कलमाचे पठण करत घरापासून दफनभूमीपर्यंत अंत्ययात्रा काढली जाते.

दफनभूमीवर पोहोचल्यानंतर मृतदेह मोकळ्या जागी ठेवून नमाज-ए-जनाजा वाचला जातो. एरव्ही पढण्यात येणारा नमाज आणि मृत्यूसमयी पढण्यात येणारा नमाज यात फरक असतो. यावेळी सजदा केला जात नाही. उभ्या उभ्याच तो वाचला जातो. काही जण हा नमाज वाचण्यासाठी इमाम बोलावतात तर काही वेळा रक्ताच्या नात्यातील पुरुष सदस्य तो वाचतात. त्यानंतर शवपेटीला पुन्हा खांदा देऊन ती कबरीपर्यंत नेली जाते.

दफनभूमीतील कर्मचाऱ्यांनी सहा फूट खोल, दोन फूट रुंद आणि सहा फूट लांबीची कबर खोदलेली असते. त्यात मृतदेह ठेवला जातो. मृतदेहाचा चेहरा मक्केच्या दिशेला वळवला जातो. मुस्लिमांच्या प्रत्येक दफनभूमीत मशीद असते. त्याआधारे मक्केची दिशा म्हणजे कोणती हे कळते. उपस्थितांपैकी प्रत्येक जण एक एक मूठ माती एका मोठय़ा भांडय़ात गोळा करतात आणि ही माती मृतदेहाच्या डोक्यापाशी ठेवली जाते. लाकडाचे छोटे छोटे तुकडे मृतदेहावर तिरके रचून तो पूर्णपणे झाकला जातो. त्यावर प्रत्येक जण तीन वेळा मूठभर माती टाकतो. त्यानंतर संपूर्ण मृतदेह मातीने आच्छादला जातो आणि मृतासाठी कुराण-ए-शरीफमधील आयत वाचल्या जातात. दफनविधी झाल्यावर सर्वजण आपापल्या घरी जातात. ज्याच्या घरातील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, त्या घरात त्या दिवशी अन्न शिजवले जात नाही. शेजारी-पाजारी किंवा नातेवाईक त्यांच्या घरी जेवण घेऊन जातात.

दफन केलेल्या व्यक्तीला न्यायनिवाडय़ाच्या दिवशी पुन्हा उठवले जाईल आणि जन्नत किंवा जहन्नम प्राप्त होईल, असा विश्वास असतो. मृत्यूनंतर २४ तासांनी ‘कुराण खानी’ हा विधी होतो. त्यासाठी सर्व परिचित पुरुष मशिदीत जातात. तिथे इमाम दुवा मागतात. स्त्रिया मात्र घरीच जमतात आणि कुराणातील ३० प्रकरणांपैकी एक-एक प्रकरण प्रत्येक जण वाचतो. कुराणाच्या या पठणामुळे मिळणारे पुण्य मृत व्यक्तीला समर्पित केले जाते. त्याला जन्नत प्राप्त व्हावी यासाठी प्रार्थना केली जाते. त्यांतर सर्वाना मिठाई वाटली जाते.

एखाद्या स्त्रीच्या पतीचे निधन झाल्यास ती ४० दिवस घराबाहेर पडत नाही. याला ‘इद्दत’ असे म्हणतात. इतर अनेक धर्मात असते, तशी वर्षभरानंतरचा स्मृतिदिन साजरा करण्याची प्रथा इस्लाममध्ये नाही, परंतु हल्ली काही जण स्मृतिदिनी अनाथाश्रम, वृद्धाश्रमांत दानधर्म करतात. जगात जन्माला आलेल्या प्रत्येकाने कुराण-ए-शरीफवर विश्वास ठेवावा, इस्लामच्या शिकवणीचे काटेकोर पालन करत जगावे, चांगली कृत्ये करावीत, दानधर्म करावा अशी शिकवण आहे. पृथ्वीतलावरचे जीवन हे अंतिम नसून ती मृत्यूनंतरच्या अमर्याद जीवनाची तयारी आहे. ते जीवन उत्तम असावे, जन्नत प्राप्त व्हावी, यासाठी स्वतला सज्ज करणे हा पृथ्वीवरील जीवनाचा उद्देश आहे, अशी श्रद्धा असते. मृत्यू म्हणजे या नव्या न संपणाऱ्या आयुष्याकडे वाटचाल असते.

ऊर्जेच्या रूपांतराचा सिद्धांत (बौद्ध)

एखाद्या फळाचे बीज मातीत मिसळते आणि त्यातून दुसरे झाड उगवते तेव्हा तो त्या फळाचा पुनर्जन्म असतो का? बौद्ध धर्माच्या मते नाही. पुन्हा झाड उगवते, त्याला पाने-फुले-फळे लगडतात तेव्हा तो केवळ त्या फळाचा पुनर्जन्म कसा म्हणता येईल? त्या बीजाला माती, पाणी, सूर्यप्रकाश, हवा या आणि अशा अनेक घटकांची साथ लाभते. त्या सर्वातील शक्ती एकत्र येऊन नव्या झाडाची, फळाची उत्पत्ती होते. या प्रक्रियेत एकाहून अधिक घटकांची ऊर्जा एकत्र आलेली असते. बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मते मानव हादेखील निसर्गाचा असाच एक घटक आहे. त्याचे आयुष्य हा ऊर्जेचा एक प्रवाह आहे. मृत्यूनंतर त्याच्यात सामावलेली ऊर्जा निसर्गात विलीन होते आणि कालांतराने ती ऊर्जेच्या प्रवाहाचेच नवे रूप धारण करते.

मानवी शरीरात चार माहुतस्कंध आणि पाच उपादानस्कंध असतात. पृथ्वी, आग, तेज आणि वायू हे माहुतस्कंध आणि रूप, वेदना, सज्ञा, संस्कार आणि विज्ञान हे उपादानस्कंध मृत्यूनंतर निसर्गात विलीन होतात. निसर्गात जसे स्थायूरूप घटक असतात तसेच शरीरातही हाडांच्या रूपाने स्थायूरूप घटक असतात. निसर्गातील हवा शरीरात वायूंच्या रूपात अस्तित्वात असते, निसर्गाप्रमाणेच मानवी शरीरातही पाणी असते, उष्णताही असते. भन्ते बोधिशील सांगतात, बौद्ध तत्त्वज्ञानाच्या मते कोणत्याही व्यक्तीच्या मृत्यूनंतर निसर्गाचाच एक भाग असलेले हे सर्व घटक निसर्गातच विलीन होतात.

या विलीन होणाऱ्या स्कंधांच्या शांतीसाठी जलदान विधी केला जातो. पण हा विधी मूळ बौद्ध तत्त्वज्ञानातून आलेला नाही. मृत्यूनंतरच्या विधींविषयी मूळ बौद्ध तत्त्वज्ञानात काहीही उल्लेख नाही. काळाच्या ओघात हे विधी बौद्ध धर्मीयांनी स्वीकारले. प्रांताप्रांतांप्रमाणे ते बदललेले दिसतात. मृत्यूमुळे निर्माण होणारे दु:ख दूर करण्यासाठी दु:खमुक्तीच्या गाथा वाचल्या जातात. बौद्ध धर्मातील एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यानंतर भन्तेंना पाचारण केले जाते. परित्राणपादातील मरणानुसती गाथा, त्रीशरण पंचशील, शरणते गाथा इत्यादी गाथा वाचल्या जातात. भन्ते नसल्यास बौद्धाचार्य हे कार्य करतात. अंत्ययात्रा कशी काढावी, मृताला स्नान घालावे की नाही, अग्नी कोणी द्यावा याविषयी काहीही उल्लेख मूळ बौद्ध धर्मात नाहीत. मृत व्यक्तीला शुभ्र वस्त्रे घातली जातात आणि स्मशानभूमीवर नेले जाते.

भन्ते आयुपाल सांगतात, बौद्ध धर्मात दिशांमध्ये पवित्र-अपवित्र असे भेद नाहीत. सूर्य उगवतो ती पूर्व दिशाही पवित्र आहे आणि मावळत्या सूर्याला उदरात घेते ती पश्चिम दिशाही पवित्रच आहे. त्यामुळे कोणत्या दिशेला डोके असावे आणि कोणत्या दिशेला पाय असावेत, असे कोणतेही नियम नाहीत. मृतदेहाजवळ मेणबत्त्या लावल्या जातात, मृताच्या शरीरावर चंदनाचे तुकडे ठेवले जातात आणि अग्नी दिला जातो. मृत व्यक्तीला त्याचा मुलगा, मुलगी किंवा अन्य कोणीही व्यक्ती अग्नी देऊ शकते. दहनानंतर अस्थी नदीत विसर्जित केल्या जातात.

बौद्ध तत्त्वज्ञानानुसार मृत्यूनंतर ऊर्जा निसर्गात विलीन होते. मागे काहीच उरत नाही. त्यामुळे पुनर्जन्म, पुनरुत्थान, स्वर्ग, नरक, अतृप्त इच्छा अशा कोणत्याही संकल्पनांना स्थान नाही. परिणामी मृत व्यक्तीला शांतता लाभावी म्हणून कोणतेही विधी सुचवण्यात आलेले नाहीत. थेट वार्षिक स्मृतिदिनी परित्राणपादाचे पठण केले जाते आणि भोजन, वस्तू, अन्नधान्य, औषधे, अन्य उपयुक्त साहित्याचे दान केले जाते.

बौद्ध धर्मात कर्माची विभागणी पाप-पुण्य अशी न करता कुशल किंवा अकुशल कर्म अशी करण्यात आली आहे. घरातील ज्येष्ठांची सेवा, दानधर्म, प्रामाणिकपणा इत्यादी कृत्ये कुशल कर्म म्हणून ओळखली जातात. तर अप्रामाणिकपणा, िहसा, कठोर वाणी हे अकुशल कर्म ठरते. ऊर्जा निर्माण करता येत नाही, नष्टही करता येत नाही, तिचे फक्त रूपांतर होत राहते या विज्ञानातील सिद्धांताचे बौद्ध धर्मातील कर्मसिद्धांताशी साधम्र्य आहे. मानवाच्या मृत्यूनंतर निसर्गात विलीन झालेली त्याची ऊर्जा नवे रूप धारण करते. पण हा त्या विशिष्ट व्यक्तीचा पुनर्जन्म नाही. विविध घटकांतून मुक्त झालेल्या ऊर्जेचे ते रूपांतर आहे, असे बौद्ध धर्म मानतो. बौद्ध धर्माचे हे तत्त्वज्ञान विज्ञानातील सिद्धांताशी बरेच मिळतेजुळते असल्याचे दिसते.

‘ईडन गार्डन’ची आकांक्षा (बेने इस्रायली)

साधारण पहिल्या किंवा दुसऱ्या शतकात कधी तरी इस्रायलमधील व्यापाऱ्यांचे जहाज भर समुद्रात फुटले. त्यातील व्यापारी भारताच्या समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले आणि कायमचे इथेच स्थायिक झाले. ज्यू धर्माचे पालन करणारा हा समाज काळाच्या ओघात स्थानिक संस्कृतींचा स्वीकार करत इथल्या समाजात मिसळून गेला. त्यांच्या धार्मिक प्रथा-परंपरा त्यांनी आजही जपल्या असल्या, तरी स्थानिक समज-गैरसमजांचा प्रभाव त्यावर जाणवतो.

बेने इस्रायलींच्या मूळ धर्मश्रद्धा आणि ग्रंथांत पुनर्जन्म किंवा पुनरुत्थानाला स्थान नाही. पण प्रचंड मोठा काळ भारतात घालवल्यामुळे इथल्या श्रद्धांचा, जन्म-मृत्यूविषयक संकल्पनांचा प्रभाव या समाजावरही पडलेला दिसतो. बेने इस्रायलींचा पुनर्जन्मावर विश्वास नाही. तरीही आपल्या नवजात बालकांमध्ये ते आपल्या पूर्वजांच्या खाणा-खुणा शोधतात. बाळाला त्याच्या आजोबांचेच नाव दिल्याचे काही कुटुंबात दिसते. भारतातील समज-गैरसमजांचाच प्रभाव अशा लहान-मोठय़ा गोष्टींतून डोकावतो. पुनर्जन्मावर विश्वास नसला, तरी स्वर्गाची संकल्पना मात्र असित्वात आहे. फक्त ही संकल्पना तिथे ‘गार्डन ऑफ ईडन’ किंवा ‘ईडन गार्डन’ म्हणून ओळखली जाते. मृत व्यक्तीला या ‘गार्डन ऑफ ईडन’मध्ये स्थान मिळावे हा मृत्यूनंतरच्या संस्कारांचा उद्देश असतो.

बेने इस्रायलींमध्ये एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला की, सर्व नातेवाईक त्या व्यक्तीच्या घरी जमतात. ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तिचा मुलगा किंवा घरातील अन्य एखादा पुरुष ‘तेहिलिम’चे पठण करतो. यावेळी मृत व्यक्तीला शांतता लाभावी म्हणून ‘बाबा’ म्हणजे पुजारी प्रार्थना करतात. सधन कुटुंबांत मृतदेह कॉफिनमधून नेला जातो. मात्र हा फार खर्चीक पर्याय असल्यामुळे सर्वसामान्यांमध्ये मृतदेह डोलाऱ्यात ठेवतात. पूर्वी घरापासून दफनभूमीपर्यंत मृतदेह डोलाऱ्यात ठेवून अंत्ययात्रा काढली जात असे. मात्र, आता घरापासून दफनभूमीपर्यंत मृतदेह रुग्णवाहिकेतून नेला जातो आणि नंतर विधीपुरता डोलाऱ्यात ठेवून कबरीपर्यंत नेतात, असे मोझेस फणसापूरकर यांनी सांगितले. सिनेगॉगमधील फलकावर मृताविषयी माहिती लिहिली जाते.

जिथे दफन केले जाते, तिथे केवळ पुरुषच जातात. दफनभूमीत महिलांसाठी एक जागा निश्चित केलेली असते. सर्व महिला तिथेच बसतात. मृत्यू नैसर्गिक कारणांमुळे किंवा आजारांमुळे झाला आहे की आत्महत्या, हत्या इत्यादीमुळे झाला आहे, यावरून कुठे दफन करावे हे ठरते. हत्या झालेली असेल किंवा आत्महत्या केलेली असेल, त्यांचे मृतदेह पुरण्यासाठी दफनभूमीच्या उजवीकडील कोपऱ्यात जागा निश्चित केलेली असते. मृत पुरुष ७५ वर्षांवरील असल्यास त्यांचा मुलगा, जावई, भाऊ इत्यादी जवळचे नातेवाईक मृतदेहाभोवती सात फेऱ्या मारतात. हा विधी महिलांबाबत केला जात नाही. त्यानंतर मृत व्यक्तीला ‘गार्डन ऑफ ईडन’मध्ये स्थान मिळावे, यासाठी प्रार्थना केली जाते. दफनभूमीतील कर्मचारी चार फूट खोल आणि सहा फूट रुंद कबर खोदतात. त्यानंतर मृतदेह कबरीत ठेवतात. उपस्थित व्यक्ती एक एक मूठ मातीत एका पिशवीत भरतात. महाराष्ट्रातील बेने इस्रायली याला मूठमाती देणे म्हणतात. ही पिशवी मृतदेहाच्या उशाशी ठेवली जाते. त्यानंतर कर्मचारी मृतदेहावर मातीचा थर घालतात. त्यावर नातेवाईक थोडी माती घालतात. पुन्हा प्रार्थना केली जाते. त्यानंतर जवळचे नातेवाईक मृत व्यक्तीच्या घरी जातात. तिथे साधे जेवण केले जाते. यात नारळाचे दूध आणि भाताचा समावेश असतो, अशी माहिती श्ॉलोम फणसापूरकर यांनी दिली.

सातव्या दिवशी पुन्हा सर्व नातेवाईक दफनभूमीवर जमतात. तिथे प्रार्थना केली जाते. मृत व्यक्तीच्या नावातील अक्षरांनुसार मंत्रोच्चारण होते. याला ‘हारकाबा’ म्हणतात. हा विधी संपला, की प्रत्येक जण मृताच्या नातेवाईकांना सब्जा, खजूर किंवा आपापल्या मर्जीप्रमाणे विविध खाद्यपदार्थ देतात. त्यानंतर सर्वजण दफनभूमीवरील सभागृहात जमतात आणि तिथे भोजन करतात. काही जण भोजनाचा कार्यक्रम घरी देखील करतात. महिनाभराने ‘हारकाबा’ पुन्हा म्हटला जातो. साडेदहा महिन्यांनी कुदळ मारण्याचा विधी असतो. त्यात कबरीच्या आजूबाजूने कुदळ मारून माती मोकळी केली जाते. आपल्या पूर्वजांना ‘गार्डन ऑफ ईडन’मध्ये चिरशांती लाभावी, हा ज्यू धर्माचे पालन करणाऱ्या सर्व बेने इस्रायलींच्या प्रथांचा उद्देश असतो.

अहंकारापासून मुक्ती (जैन)

आत्मा आणि शरीर हे दोन भिन्न घटक आहेत. आत्मा अनादी काळापासून अस्तित्वात आहे आणि अनंत काळापर्यंत अस्तित्वात राहणार आहे. शरीर मात्र नश्वर आहे, या विश्वासावर जैन धर्माचे तत्त्वज्ञान आधारलेले आहे. आत्मा स्वनिर्मित आहे, मात्र त्याला त्याचे ज्ञान नाही. मोह, माया, मत्सर, काम, क्रोध, द्वेष अशा विविध विकारांची लागण होऊन आत्मा कर्मात बद्ध होत राहतो आणि त्यामुळेच त्याचा वारंवार जन्म होत राहतो. या विकारांतून मुक्त होणे म्हणजे देवत्वाला पोहोचणे, असे जैन धर्म मानतो.

जैन धर्मात देवगती, मनुष्यगती, पशुगती आणि नरकगती अशा चार गती मानण्यात आल्या आहेत. दया, क्षमा, शांती, सरलता, सहजता, साम्यभावाचे आचरण करणाऱ्यांना देवगती किंवा मनुष्यगती प्राप्त होते. दुराचारी व्यक्तींना नरकगती किंवा पशुगती प्राप्त होते. अन्य धर्मामध्ये कृतीला महत्त्व आहे. जैन धर्मात याविषयीच्या कल्पना काहीशा वेगळ्या आहेत. कर्म मग ते चांगले असो वा वाईट ते आपण करू शकतो, या अहंभावाचा स्पर्श झाला तरी ते अयोग्य ठरते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचे भले वा वाईट करण्याची क्षमता आपल्यात आहे, असे वाटणे हेदेखील अयोग्य ठरते. अशा विचारांना जैन धर्मात ‘मिथ्यातो’ म्हणून संबोधले जाते.

मिथ्यातो विचारांपासून जो मुक्त होतो, त्याला वैराग्य प्राप्त होते. वैराग्याची परिसीमा म्हणजे नग्न दिगंबरावस्था. या अवस्थेत मनुष्य मोह-मायेपासून अतिशय दूर पोहोचतो. त्याला शरीरावरील वस्त्रांचाही मोह राहात नाही आणि तो वस्त्रांचा त्याग करतो. हे जैन साधू मग कायम भ्रमण करत राहतात. कोणत्याही एका ठिकाणी तीन दिवसांपेक्षा अधिक काळ राहात नाहीत. आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा या पर्युषण पर्वाच्या चार महिन्यांतच ते एका ठिकाणी राहतात. मूळ धार्मिक शिकवणीनुसार त्यांनी हे चार महिने अरण्यात राहणे अपेक्षित आहे. मात्र सध्याच्या काळात ते शक्य नसल्यामुळे ते शहराबाहेरील मंदिरात किंवा धर्मशाळेत राहतात.

दिगंबर स्थितीच्या पुढील स्थिती म्हणजे भगवान. जे मुनी ४५ मिनिटांपेक्षा अधिक काळ आत्म्यात विलीन राहू शकतात, त्यांना देवत्व प्राप्त होते. या स्थितीत पोहोचलेल्या व्यक्तीचा पुनर्जन्म होत नाही. त्यांच्या निर्वाणानंतर ते पुन्हा अवतारही घेत नाहीत. ज्यांना भगवानाचे स्थान प्राप्त झालेले नाही, अशा व्यक्ती मात्र त्यांच्या कर्मानुसार ८४ लाख योनींपैकी कोणत्याही योनीत पुनर्जन्म घेत राहतात.

स्वर्ग, नरक कुठे आणि कसे आहेत याचे वर्णनही जैन धर्मग्रंथांत आहे. स्वर्ग म्हणजे उध्र्वलोक, पृथ्वी म्हणजे मध्यलोक आणि नरक म्हणजे अधोलोक. सूर्य, चंद्र, ताऱ्यांपासून खूप उंचावर स्वर्ग आहे. स्वर्गाचेही वेगवेगळे १६ स्तर आहेत. या १६ स्वर्गाच्या वरचे स्थान म्हणजे अनुदिश आणि त्याच्याही वरचे स्थान म्हणजे अनुत्तर. ज्यांना आत्म्याचे ज्ञान प्राप्त झाले आहे, त्यांना अनुदिशमध्ये स्थान मिळते. मोक्षाच्या आधीची पायरी म्हणजे अनुत्तर. या स्थानी पोहोचलेल्या व्यक्तीचा पुन्हा मनुष्य योनीत मुनी म्हणून जन्म होतो आणि मुनींच्या निर्वाणानंतर त्यांना मोक्ष प्राप्त होतो. थोडक्यात मनुष्य जन्मातूनच मोक्ष प्राप्त होऊ शकतो, असे जैन धर्म मानतो.

जैन धर्माचे अभ्यासक किशोर शास्त्री सांगतात, जैन धर्माच्या मते मृत्यूनंतर शरीरातून आत्मा निघून जातो आणि केवळ शरीर उरते. शरीर महत्त्वाचे मानलेले नाही. त्यामुळे मूळ धर्मात मृत्यूनंतरच्या विधींविषयी काहीही नमूद नाही. केवळ मृत्यूनंतर ४५ मिनिटांत मृतदेह जाळून टाकण्यात यावा, एवढेच नमूद आहे. ४५ मिनिटांनंतर शरीरात विविध जिवाणू-विषाणू निर्माण होतात. त्यामुळे मृतदेहाचे दहन होताना, तेदेखील नाहक जाळले जातात. ही हिंसा टाळणे हाच यामागचा उद्देश आहे. लोकव्यवहारांत मात्र त्या त्या ठिकाणच्या समाजांच्या परंपरा जैन धर्मीयांनी स्वीकारल्याचे दिसते. शक्यतो सूर्यास्तापूर्वी दहन करावे असा सोयीस्कर बदल केलेला दिसतो. महाराष्ट्रात मृत व्यक्तीला अंघोळ घालणे, शुभ्र वस्त्रे घालणे इत्यादी विधी आढळतात. मात्र खांदा कोणी द्यावा, अग्नि कोणी द्यावा याविषयी कोणतीही बंधने नाहीत. मुलगा, मुलगी, जावई, सून कोणीही हे विधी करू शकते. राजस्थान, बुंदेलखंड वगैरे भागांत मात्र आजही शक्यतो ४५ मिनिटांच्या आत मृतदेहाचे दहन केले जाते आणि या भागांत अंत्यविधींत महिलांचा सहभाग फारसा नसतो.

स्मशानातून परत आल्यानंतर घरातील सर्वजण अंघोळ करतात आणि सोयरे जेवण आणून देतात. मृत्यूनंतर ९ दिवस कोणतेही धार्मिक कृत्य केले जात नाही. १०व्या दिवशी सोयरे मंदिरात अभिषेक करतात आणि त्यातील गंधोदक मृत व्यक्तीच्या घरी जाऊन कुटुंबीयांवर शिंपडतात. त्यानंतर कुटुंबीय मंदिरात जाऊन दर्शन घेतात व व्यवहार सुरू करतात. १२व्या दिवशी पूजा आणि भोजन केले जाते. महाराष्ट्रात सव्वा महिना, सहा महिने किंवा वर्षांनंतर श्राद्ध केले जाते. मात्र यापैकी काहीही मूळ जैन धर्मात सांगितलेले नाही. आपण एखादे कर्म करण्यास सक्षम आहोत, या अहंकारापासून मुक्त होणे हा जैन धर्मीयांच्या जीवनाचा अंतिम उद्देश असतो.

अंत्यसंस्काराचे आव्हान (पारशी)

पारशी किंवा झोराष्ट्रियन समाजात पृथ्वी आणि अग्नि पवित्र तर मृतदेह अशुद्ध, अपवित्र मानण्यात आला आहे. मृतदेहाचे दहन केल्यास अग्नि आणि दफन केल्यास पृथ्वी दूषित होते, असे मानले जाते. त्यामुळे दहन-दफन विधी न करता पारशी समाजात मृतदेह पक्ष्यांच्या भक्षणासाठी सोडून दिला जातो.

पारंपरिक पारशी घरांमध्ये मृतदेह ठेवण्यासाठी विशिष्ठ जागा निश्चित केलेली असे. त्या जागेवरच मृतदेह ठेवला जात असे. आता ते शक्य नाही. मृत्यूनंतर पुजारी येऊन पापक्षालनासाठी प्रार्थना करतात. पारशी धार्मिक विधींमध्ये अग्निचे स्थान अनन्यसाधारण आहे. अंत्यविधींच्या वेळीही घरात पवित्र अग्नि आणला जातो. मृतदेहाला स्नान घातले जाते आणि शुभ्र वस्त्रे घातली जातात. मृतदेहाभोवती वर्तुळ रेखले जाते. घरातील विधी झाल्यानंतर ‘टॉवर ऑफ सायलेन्स’पर्यंत अंत्ययात्रा काढली जाते. यात शुभ्र कपडे घातलेल्या व्यक्ती जोडीने रांगेत चालतात. अंत्ययात्रेत श्वानाचे स्थान महत्त्वाचे असते.

अंत्ययात्रा ‘टॉवर ऑफ सायलेन्स’मध्ये जाते. विहीरसदृश रचना असलेल्या या ठिकाणी मृतदेह ठेवला जातो. या मृतदेहाचे गिधाडे व अन्य पक्षी भक्षण करतात. सूर्यकिरणांमुळे तो सुकून जातो आणि त्यानंतर केवळ हाडे उरतात. नंतर या अस्थि मध्यभागी असलेल्या खड्डय़ात सोडल्या जातात. मृत्यूनंतर चार दिवस दुखवटा पाळला जातो. मृत व्यक्तीच्या नावे एखादी धर्मादाय संस्था स्थापन केली जाते किंवा दान दिले जाते.

वाढत्या शहरीकरणात आपल्या परंपरा सांभाळणे हे पारशी समाजासाठी आव्हान ठरत आहे. अनेक ठिकाणी गिधाडांची संख्या कमी होऊ लागल्यामुळे मृतदेह बराच काळ तसेच पडून राहतात. यावर उपाय म्हणून काही ठिकाणी सौर ऊर्जेचा वापर करून मृतदेहांवर अधिकाधिक सूर्यकिरणे केंद्रित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र त्याला म्हणावे तसे यश आलेले नाही. पावसाळ्यात तर हा पर्याय पूर्णच फोल ठरत आहे.

First Published on September 20, 2019 1:03 am

Web Title: death is beginning different religions rituals
Next Stories
1 ‘मोक्षप्राप्ती’चा मार्ग
2 सदाको आणि क्रेन पक्षी
3 भारत-रशिया तोल साधणारी मैत्री
Just Now!
X