18 January 2020

News Flash

‘मोक्षप्राप्ती’चा मार्ग

मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी गंगेच्या किनारीच 'पिंडदाना’चा विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा, असा धार्मिक संकेत आहे.

वेदारंभापासून ते ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आणि गायवासरापासून वृक्षांपर्यंतचे तत्त्वज्ञान हिंदू धर्मात सांगितले आहे.

अर्जुन नलवडे – response.lokprabha@expressindia.com
मृत्यू

प्रथा-परंपरा श्रद्धा (नाशिक)

मृत्यूनंतर व्यक्तीला मोक्षप्राप्ती व्हावी, यासाठी गंगेच्या किनारीच ‘िपडदाना’चा विधी शास्त्रशुद्ध पद्धतीने करावा, असा धार्मिक संकेत आहे. प्रत्येकाला गंगाकिनारी जाणं शक्य नसतं, त्यामुळे मग  स्कंदपुराणानुसार महाराष्ट्रात त्र्यंबकेश्वर, गोदाकाठ, कृष्णाकाठ, बाणगंगा आणि कुणकेश्वर अशी तीर्थे सांगितलेली आहेत. या तीर्थाच्या स्थानमाहात्म्याचा लेखाजोखा..

सर्वे भवन्तु सुखिन: सर्वे सन्तु निरामया।

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुखभाग भवेत्।।

 

वेदारंभापासून ते ज्ञानेश्वर माऊलीपर्यंत आणि गायवासरापासून वृक्षांपर्यंतचे तत्त्वज्ञान हिंदू धर्मात सांगितले आहे. त्यात वेगवेगळ्या उपासना पद्धतीदेखील आहेत. त्यामध्ये १२ ज्योतिर्लिगांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. या १२ ज्योतिर्लिगांपैकी त्रिगुणात्मक ज्योतिर्लिग म्हणून त्र्यंबकेश्वराला महत्त्व आहे.

देवकार्यादपि सदा पितृकरय विशिष्यते।
देवताभ्य पितृणां हि पूर्वमाप्यायनं शुभम्।।

याचा अर्थ असा की, देवकार्यापूर्वी पितरांची तृप्ती, पितृऋ ण मुक्ती आणि त्यासाठी पितृकार्याची म्हणजेच श्राद्धाची आवश्यकता आहे. देव आराधनेचा आरंभ पितृऋ ण भक्तीच्या विशेषतेशिवाय निष्फळ आहे. भगवान महाविष्णूच्या कूर्म अवतारातील कृतयुगात, महासम्राट माधांता राजाच्या शक काळात, माघ शुद्ध दशमीच्या माध्यान्ही महर्षी गौतमांच्या तप:सामर्थ्यांने भगवान आषुतोष महादेवांनी गंगेला भूतलावर अवतीर्ण केले. त्रिखंडीतील देवदेवता ऋ षीमुनींनी त्या गंगेला साष्टांग प्रणाम करून तिची स्तुती तसेच  आराधना केली.

नमामि गंगे तव पादपंकजं।
सुरसुरैर्वन्दितदिव्यरूप।।
भुक्तिं च मुक्तिं च ददासि नित्यम्।
भावानुसारेण सदा नराणाम्।।
गोदावरी माहाभागे माहापापविनाशिनी।
धर्मअर्थकाम मोक्षाणां सुलभि गौतम प्रीये।।

धर्म-अर्थ-काम तीन पुरुषार्थाच्या धडपडीतून मानवाच्या मोक्षप्राप्तीसाठी ‘हे गंगा गोदावरी माते तू त्र्यंबकेश्वरी राहावे’, अशी विनंती सर्व देवदेवतांनी गोदावरीला केली. आणि देवदेवतांच्या विनंतीला मान देऊन गोदावरी भूतलावावर वास्तव्यास राहिली. त्र्यंबकेश्वर मोक्षभूमीची माहिती तीर्थ पुरोहित मंगेश धारणे देतात की, महद्भक्त श्रीमद गौतमाच्या तपसामर्थ्यांला सन्मान देऊन आणि भगवान शंकराच्या विनंतीला मान देऊन त्र्यंबकेश्वरी अवतरलेल्या याच गोदावरीचा आशीर्वाद घेऊन श्राद्धकार्य पूर्ण केले जाते. म्हणून त्र्यंबकेश्वरी श्राद्धकर्माला विशेष महत्त्व आहे. संपूर्ण त्र्यंबकेश्वर नगरी ही शिवस्वरूप रुद्राचे ज्योतिर्लिगस्वरूप आहे. १२ ज्योतिर्लिगापैकी विशेषत: त्र्यंबकेश्वर येथे ब्रह्मा-विष्णू-महेश या तीन देवतांचे वास्तव्य आहे. ब्रह्मा-विष्णू-महेश म्हणजे उत्पत्ति-स्थिती आणि लय असे त्रिगुणात्मक स्वरूप होय. निर्माता, पालनकर्ता आणि संहारकर्ता असे त्रिगुणात्मक स्वरूप होय. हे बाल, प्रौढ, वृद्ध असे त्रिगुणात्मक स्वरूप आहे. ‘पिता, पितामह, प्रपितामह माता, मातामह आणि प्रमातामह मम’ म्हणजे माझ्या आणि आईच्या कुळातील तसेच पत्नीच्या कुळातील रक्ताशी संबंधित असणारे जे कोणी नातेवाईक  पितृलोकांसाठी अपेक्षा करीत असतील आणि ते बालपणी प्रौढावस्थेत किंवा वृद्धावस्थेत आकस्मित गेले असतील (अपमृत्य म्हणजे जळून जाणे, बुडून जाणे, आत्महत्या करून जाणे), त्यांच्या काही इच्छा राहून गेल्या असतील, त्यांचे क्रियाकर्मातर यथायोग्य झाले नसेल, असे जे कोणी बाल, प्रौढ किंवा वृद्ध अवस्थेत गेले असतील त्या लोकांना त्र्यंबकेश्वरमध्येच त्रिगुणात्मक मोक्षप्राप्ती मिळू शकते, म्हणून श्राद्ध कार्य त्र्यंबकेश्वरमध्ये केले जाते.

प्रभुरामचंद्रांच्या पदस्पर्शाने शिळारूपी अहिल्येचा उद्धारही याच भूमीमध्ये झाला आहे. तर, पितृऋ णमुक्तीसाठी केलेल्या कर्मामुळे आपल्याही कुळाचा उद्धार होतो, अशी हिंदू धर्मीयांची भावना आहे. अहिल्या आणि गोदावरी नद्यांचा संगमही या कार्यासाठी महत्त्वाचा मानला जातो. शिवकृपेने साधू, संत, मंडलेश्वर, माहामंडलेश्वर, ऋ षीमुनींना याच ठिकाणी विष्णुलोक प्राप्त झाला होता, असे मानले जाते. विश्वात्मक देवतेच्या आशीर्वादप्राप्तीसाठी ‘जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रती वाढो’ असे मागणे मागणाऱ्या ज्ञानराज माऊलींचे वडीलबंधू गुरुराज शिवस्वरूप संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजसुद्धा याच बह्मगिरीच्या पायथ्याशी समाधिस्थ होऊन शिवस्वरूप झालेले आहेत. त्यामुळे त्र्यंबकेश्वर क्षेत्राला श्राद्ध विधीसाठी महत्त्व प्राप्त झालेले दिसून येते.

श्री क्षेत्र त्र्यंबकेश्वरचे पौरणिक माहात्म्य स्पष्ट करताना उन्मेषलिखित ‘श्री त्र्यंबकेश्वर क्षेत्र माहात्म्य’ या पुस्तकात अशी कथा सांगण्यात आली की, त्र्यंबकेश्वरमध्ये गौतम नावाचे तपस्वी राहत होते. त्यांचा जन्म भारद्वाज कुळात झाला होता. त्यांच्या पत्नीचे नाव अहिल्या होते. त्यांनी ब्रह्मगिरीवर हजारो वर्षे तपश्चर्या केली. ते तप करीत असताना, या भागात तब्बल शंभर वर्षे दुष्काळ पडला. गौतमांनी लोकांचे दु:ख जाणून सहा महिने पर्जन्यदेवता वरुणाची प्रार्थना केली. वरुण गौतमासमोर प्रकट होऊन म्हणाला की, ईश्वरी कोपामुळे हा दुष्काळ पडला आहे. मला वृष्टी करता येणे शक्य नाही. एक उपाय सांगतो. तू एक खोल खड्डा खण, म्हणजे अक्षय्य जलाची प्राप्ती होईल. गौतम ऋषीने खड्डा खणला. त्यात भरपूर पाणी लागले. हाच खड्डा पुढे गौतम तलाव नावाने ओळखला जाऊ  लागला. गौतम ऋषींनी खड्डा खणल्याने स्वच्छ पाण्याचा झरा वाहू लागला. त्यामुळे या परिसरात अनेक ऋषी वास्तव्यास आले. गौतमांनी या परिसरात फुले, फळे, धान्य पिकवण्यास प्रारंभ केला. हे स्थान पुढे ‘गौतमाश्रम’ नावाने प्रसिद्धीस आले. असे मानले जाते की एकदा गौतम ऋषीची पत्नी अहिल्या आणि आश्रमातील काही स्त्रिया झऱ्यावर पाणी भरण्यासाठी जमल्या. तेव्हा त्यांच्यात वाद झाला. नंतर भांडणात रूपांतर होऊन सर्व स्त्रिया अहिल्यावर नाराज झाल्या. त्यांनी आपापल्या पतीला ही हकिगत सांगून गौतम ऋषी आणि अहिल्यासंदर्भात तिरस्कार निर्माण केला. सर्व ऋषी गौतमाचा द्वेष करू लागले. त्यांनी गणपतीची प्रार्थना करून त्याला प्रसन्न करून घेतले. आम्हाला हा आश्रम सोडायचा आहे. तेव्हा तू काही निमित्त घडव, अशी विनवणी त्यांनी केली. गणपतीने त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. परंतु, ऋषिमुनी हट्टालाच पेटले होते. तेव्हा गणपती म्हणाला, ठीक आहे. मी निमित्त देतो. त्यामुळे तुम्ही आश्रम सोडून जाऊ  शकाल. आणि गौतमांचेही कल्याण होईल.

गणपतीने दुर्बळ, म्हाताऱ्या गाईचे रूप घेतले आणि गौतम ऋषींच्या भातशेतात ती गाय चरू लागली. गौतमांनी गाईला हाकलण्याचा प्रयत्न केला, पण ती जाईना. तेव्हा त्यांनी दर्भाची (कुश) काडी त्या गाईवर फेकली. आणि ती काडी लागण्याचे निमित्त होऊन गाईने प्राण सोडला. हा प्रकार ऋषींना समजताच त्यांनी गोंधळ केला. तुमच्यावर गोहत्येचे पातक लागले आहे. तेव्हा आम्ही आश्रमात राहणे योग्य ठरणार नाही. आम्ही इथून जातो. तुम्ही प्रायश्चित्त घेऊन पापमुक्त झाल्यावर आम्ही या आश्रमात परत येऊ. गौतम ऋषींनी सर्वाना पापमुक्तीचा उपाय विचारला. ऋषींनी आपसात विचारविनिमय करून सांगितले की, तुम्ही तीन वेळा पृथ्वी प्रदक्षिणा करा. ब्रह्मगिरीस १०१ प्रदक्षिणा घाला. या तपश्चर्येने शिवशंकरास प्रसन्न करून घ्या. त्याच्या जटेतील गंगा भूमीवर आणून त्यात स्नान करा. त्या गंगाजली शंभर कुंभ भरून ज्योतिर्लिग श्री त्र्यंबकेश्वरास स्नान घाला. म्हणजे तुम्ही पापमुक्त व्हाल, असे सांगून ऋषिमुनी आश्रमाकडे पाठ फिरवून निघून गेले. ऋषींनी सांगितल्यानंतर गौतमांनी पत्नीसह सर्व विधी पूर्ण केले. त्यांच्या सेवेने श्री त्र्यंबकेश्वर प्रसन्न झाले. गौतमांनी त्र्यंबकेश्वरास नमस्कार करून त्यांची स्तुती केली. आम्हाला गोहत्येच्या पापातून मुक्त करावे, अशी प्रार्थना केली. शंकर म्हणाले, ‘तथास्तु! तुला माझ्याकडून काय हवे? गौतमांनी श्रीशंकरास त्यांच्या जटेतील गंगेने भूमंडळी यावे, आपणास आणि सर्व प्राणिमात्रांना पावन करावे, अशी विनंती केली. शंकराने ताबडतोब गंगेला भूमंडळी जाण्यास सांगितले; परंतु ती जायला तयार होईना. तेव्हा शंकरांनी रागाने जटा आपटल्या. तेव्हा गंगा भूमंडळी येण्यास निघाली. तिने शंकरास विनंती केली की, या ब्रह्मगिरीवर आपण कायमस्वरूपी वास्तव्य केले तरच मी भूमंडळी जाईन. शंकरांनी तिची विनंती मान्य केली. गंगा भूमंडळी प्रकटली. भारतातील सर्व तीर्थे आणि क्षेत्रांतील देवता तिथे हा सोहळा पाहण्यास उपस्थित होते. या देवतांनी शंकराने आणि गंगेने या स्थळी कायमस्वरूपी राहावे, अशी विनंती केली. तेव्हा गंगा म्हणाली, मी येथे आले आहे ते गौतमांना गोहत्येच्या पातकापासून मुक्त करण्यासाठी. ते झाल्यावर मी जाणार. परंतु जगाच्या कल्याणासाठी तुम्ही सर्व देवगण आणि क्षेत्रे येथे राहात असाल तर आणि सर्व तीर्थामध्ये माझे वैशिष्टय़ मान्य असेल तरच मी येथे राहीन. तेव्हा सर्व नद्या आणि तीर्थानी वचन दिले की, सर्वाचा मित्र बृहस्पती ज्या वेळी सिंह राशीत येईल, त्या-त्या वेळी आम्ही सर्व देव-देवता त्र्यंबकेश्वराच्या सान्निध्यात येऊन वास्तव्य करू. तुझ्या जलात स्नान करू. तेव्हापासून सिंह राशीत जोपर्यंत गुरू असतो, तोपर्यंत सर्व तीर्थे, क्षेत्रे, देवता, नद्या आणि देवगण त्र्यंबकेश्वरमध्ये राहतात. या कथेच्या संदर्भाने दर बारा वर्षांनी त्र्यंबकेश्वरमध्ये कुंभमेळा भरू लागला. त्यामुळे गंगेच्या पाण्यात स्नान करून पूजाअर्चा करणे किंवा श्राद्धाचे विधी करणे महत्त्वाचे समजले जाते.

त्र्यंबकेश्वरमध्ये केल्या जाणाऱ्या श्राद्धांच्या विधींचे महत्त्व स्पष्ट करताना तीर्थ पुरोहित राजा दीक्षित म्हणतात की, मानव हा देहाच्या रूपात प्राणी आहे. लिंगदेह, सूक्ष्मदेह, स्थूलदेह यांनी मिळून मानवाचे शरीर तयार झालेले आहे. अशा शरीरातील प्राण जेव्हा निघून जातात तेव्हा अपूर्ण वासना घेऊन तो देह पृथ्वी सोडतो. अशा वेळी त्याच्या अपूर्ण वासना पूर्ण करण्यासाठी श्राद्ध घातले जाते. मृतकांसाठी श्राद्ध घातल्या जाणाऱ्या अनेक पवित्र भूमींपैकी श्रेष्ठ भूमी म्हणून ‘त्र्यंबकेश्वर’चा उल्लेख ‘धर्मसिंधू’ ग्रंथामध्ये सापडतो. तो उल्लेख असा की,

सह्य़स्यचो द्भवो यत्र यत्र गोदावरी नदी।
प्रुथिव्यांमपि क्रुत्स्नायां स प्रदेशोति पावन:।।

मृतकांच्या मुक्तीसाठी प्रार्थना करायला उत्तम जागा म्हणजे दंडकारण्यातील त्र्यंबकेश्वर किंवा त्रिसंध्या क्षेत्राची भूमी मानली गेली आहे. आपण घरी नियमित श्राद्ध घालतो. पण त्यामध्ये श्राद्धकर्म चुकीचे झाले तर त्याची सुधारणा करण्यासाठी विविध ठिकाणांवर वेगवेगळे विधी दिलेले आहेत. उदाहरणार्थ, केदारनाथ किंवा बद्रीनाथ येथील ब्रह्मकपाल नावाच्या शिळेवरती पिंडदान केले जाते. त्याचप्रकारे कुशावर्त किंवा अहिल्या-गोदा संगमावरती श्राद्धाचे विधी करण्यास सांगितले आहेत. नारायण नागबळी, त्रिपिंडी श्राद्ध, सपिंडी श्राद्ध, एपोद्दिष्ट श्राद्ध, मैकोद्दिष्ट श्राद्ध, अशा वेगवेगळ्या प्रकारचे श्राद्ध येथे घातले जातात. त्र्यंबकेश्वरमध्येच नारायण नागबळी आणि त्रिपिंडी श्राद्ध घातले जाते. कारण हे धार्मिक विधी या ठिकाणीच केल्यानंतर सफल होतात, असे पुराणांमध्ये सांगण्यात आलेले आहे. अशा श्राद्ध घातलेल्या किंवा अनेक धार्मिक विधी केल्याच्या ५०० वर्षांपूर्वीच्या नोंदी आजही येथील पुरोहितांकडे सापडतात. त्र्यंबकेश्वरमध्येच हे श्राद्धाचे विधी करण्याचे कारण असे सांगण्यात येते की, प्रभू श्रीराम पंचवटीमध्ये राहत असताना त्यांचे वडील दशरथ यांचा मृत्यू झाला. त्यांचे श्राद्ध म्हणजेच अध्र्वद्वयिकाचे कर्म श्रीरामाने त्र्यंबकेश्वरमध्ये केले. पुराणामध्ये अश(ा कथा सांगण्यात आल्या आहेत. म्हणून त्र्यंबकेश्वर स्थानाला हिंदू धर्मात खूप महत्त्व प्राप्त झालेले आहे.

दक्षिणवाहिनी गोदा (नाशिक)

त्र्यंबक्यगिरीच्या डोंगरावर गोदावरीचा उगम झालेला आहे. तिला ‘दक्षिणवाहिनी गोदा’ असेही म्हणतात. भगिरथ ऋषींनी गंगेच्या निर्मितीसाठी आणि आपल्या पूर्वजांच्या उद्धारासाठी शंकराची तपश्चर्या केली आणि गोदावरीला पृथ्वीवर आणण्यासाठी प्रवृत्त केले. गौतम ऋषींच्या तपश्चर्यने पुनीत झालेल्या डोंगरावर गोदावरी नदीची निर्मिती झाली, असं मानलं जातं. तेव्हा शंकराकडून गोदावरीला वरदान देण्यात आले की, दर बारा वर्षांनी साधू, संत, महंत, तपस्वी, त्यागी तुझ्या तीरावर येतील. गुरू सिंह राशीमध्ये प्रवेश करेल तेव्हा सिंहस्थाला आरंभ होतो. त्यावेळी शाही स्नान सुरू होतील. तेव्हापासून इथे ‘सिंहस्थमेळा’ भरतो. याठिकाणी अहिल्या आणि गोदावरी या दोन नद्यांचा संगम आहे. गौतम ऋषींच्या शापाने शिळा होऊन पडलेली नदी म्हणजे ‘अहिल्या’ होय. अहिल्या ही गोदावरीची दासी होती. अहिल्येने गोदावरी म्हणून पृथ्वीवर अवतरण्याचा प्रयत्न केला, हे गौतम ऋषींच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी तिला शाप दिला. तेव्हा ती शिळा होऊन पडली. अशी ही अहिल्या नंतर रामाच्या पदस्पर्शाने पावन झाली, असं मानलं जातं. अहिल्या काही अंतरावर गेल्यानंतर गोदावरीला मिळाली आहे. तिला ‘शुष्क अहिल्या’ असे म्हणतात. फक्त चातुर्मासामध्ये ही नदी वाहते.

पितृ पक्षांना आपल्या पितरांना मोक्ष मिळावा, यासाठी कर्तन, पूजन, दान, श्राद्ध, अशी हजारो प्रकारची श्राद्धकर्म केली जातात. यामध्ये अतृप्त जीवात्म्यांना सद्गती मिळावी, त्यांचे आशीर्वाद मिळावेत, म्हणून गोदाकाठी श्राद्ध करण्याची परंपरा आहे. राम वनवासात असताना वशिष्ठ मुनींनी रामाला राजा दशरथांचे निधन झालेले आहे, त्यामुळे तू गोदाकाठी श्राद्ध केले पाहिजे, असे सांगितले. म्हणून रामाने बाण मारून गौतमी गोदावरीला गंगाद्वारा डोंगरावर औदुंबराच्या मुळातून बाहेर काढली. तेथे राम आणि लक्ष्मण यांना आपल्या पित्याचे श्राद्ध केले आहे, अशी आख्यायिका आहे. आजही ती ठिकाणे राम कुंड आणि लक्ष्मण कुंड नावाने प्रसिद्ध आहेत. रामाने वनवासात असतानाचे पहिले श्राद्ध गोदाकाठी केले असे मानले जाते.

पूर्वी गोदाकाठी नागतीर्थ, बिल्वतीर्थ, कंचनतीर्थ, मुकुंदतीर्थ, इंद्रतीर्थ, पंचमतीर्थ, रामतीर्थ, काशीतीर्थ, अशी वेगवेगळी नावे असलेली १०८ तीर्थे होती. त्र्यंबकेश्वरी कुशावर्त तीर्थ आहे. कुश म्हणजे गर्भ आणि आवर्त म्हणजे रोखणे, असा त्याचा अर्थ आहे. त्याबाबतची आख्यायिका अशी की, गौतम ऋषींनी वाहत्या गोदावरीला जेथे रोखले आहे, त्या ठिकाणाला कुशावर्त असे म्हणतात. त्याचबरोबर तेथे अमृतकुंड, गौतमतलाव अशी ठिकाणी आहेत. गोदाकाठी होणाऱ्या पिंडदानाबद्दल त्र्यंबकेश्वर पुरोहित संघाचे प्रशांत विनायक गायधनी माहिती सांगतात की, श्राद्धामध्ये पहिल्यांदा पिंडदानाचा अधिकार मिळावा म्हणून गोदावरीची पूजा आहे. त्याला ‘देहशुद्धी प्रायश्चित्त’ असे म्हणतात. याचाच अर्थ माझ्या जन्मापासून आजपर्यंत कायीक, वाचीक, मानसिक, अशी विविध प्रकारची पातके असतात. ती नष्ट होऊ शकत नाहीत. मात्र, ती पापे दूर होऊन या कार्याला देह शुद्ध असावा म्हणून त्या पापांना दूर करण्यासाठी प्रायश्चित्त घेणे आवश्यक असतं असं मानलं जातं. म्हणून गोदावरीच्या कुशावर्त तीर्थावर हा विधी केला जातो. यामध्ये माती, भस्म, स्नान, मुख्य स्नान, पूर्वजांच्या नावाचे उच्चारण करून केशवपन करतात. यामध्ये ज्यांच्या वडिलांचे निधन झालेले असते, त्यांनीच केशवपन करावे, असा धार्मिक संकेत आहे. त्यांनतर त्र्यंबक राजाचे दर्शन घेऊन अहिल्या-गोदावरीच्या संगमावर पूजा सुरू होते. पूर्वजांप्रती आपले उत्तरदायित्व आहे, असे मानून हे विधी हिंदू धर्मामध्ये केले जातात. त्याचबरोबर श्राद्धामध्ये भूमीचे पूजन, सूर्यनारायणाचे पूजन, कलशाचे पूजन, पाच देवतांचे पूजन असते. यामध्ये चांदीचा ब्रह्मदेव, सोन्याचा विष्णू, तांब्याचा शंकर, लोखंडाचा यम यांची पूजा केली जाते. त्यानंतर पिंडदान आणि कावळ्याला नैवेद्य दाखविला जातो. कावळा हा यमाचा दूत मानला जातो. कारण, कावळ्याला एकच बुबूळ आहे. तेच बुबूळ तो दोन्ही बाजूंना फिरवू शकतो. हे कावळ्याला मिळालेले वरदान आहे. त्यानंतर या विधीमध्ये पळसांच्या काडय़ा तसंच वाळलेला नारळ आणि गव्हाच्या कणेकपासून मनुष्याचा प्रतीकात्मक पुतळा तयार केला जातो. आणि त्यानंतर पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसांपर्यंत पिंडदान केले जाते. त्यात प्रत्येक अवयवाचे पिंडदान केले जाते. मोक्षगती प्राप्त होण्यासाठी पहिल्या दिवसापासून दहाव्या दिवसांपर्यंत पिंडदान करणे अपेक्षित आहे. अकराव्या दिवशी एक पिंडदान केले जाते. त्यात महिकोद्दिष्ट श्राद्ध, शोड्ष श्राद्ध, १२ महिन्यांचे पिंडदान, पितरांचे आशीर्वाद, असे विधी केले जातात.

गोदामहात्म्यामध्ये असे सांगितले जाते की, अहिल्या आणि गोदावरीचा संगम असणाऱ्या ठिकाणी पूर्वी स्त्रिया सती जात असत. तेथे सती गेलेल्या स्त्रियांची स्मशानभूमी आहे. त्यास ‘महास्मशान’ असे म्हणतात. या ठिकाणी अतृप्त जीवात्म्यांच्या सद्गतीकरिता पिंडदान करतात. प्रेतकर्म, श्राद्धकर्म, पितृकर्म, असे विधी येथे केले जातात. तसेच अशा विधींना नारायण बळी, नागबळी, सपिंडी श्राद्ध, अशी विविध नावे दिली आहेत. गोदावरीचे दोन तीर, अहिल्येचे दोन तीर आणि अहिल्या-गोदावरीच्या संगमाचे दोन तीर, असे सहा तीर ज्या स्थानावर येतात त्या ठिकाणी हे विधी करावेत, अशी श्रद्धा आहे. म्हणून श्राद्धाच्या दृष्टीने ‘गोदाकाठ’ या ठिकाणाला विशेष महत्त्व आहे.

कोकणची काशी ‘कुणकेश्वर’  (सिंधुदुर्ग)

देवगडपासून सुमारे १० किलोमीटर अंतरावर श्री देव कुणकेश्वर हे देवस्थान आहे. कुणकेश्वर हे देवस्थान पिंडदान आणि श्राद्ध कार्यासाठी विशेष प्रसिद्ध आहे. या ठिकाणी समुद्रात १०८ शिवलिंग दिसत असल्यामुळे या गावाला तीर्थाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. ज्या ठिकाणी तीर्थ असते, तेथे पितृकांच्या किंवा मृतकांच्या आत्म्याला शांती मिळते असे विविध पुराणांमध्ये सांगितल्यामुळे कुणकेश्वराला श्राद्धाच्या दृष्टीने महत्त्व आहे.

श्राद्धासंबंधी कुणकेश्वर हे ठिकाण विशेष प्रसिद्ध असण्याला एक आख्यायिका कारणीभूत आहे. ती अशी की, अज्ञातवासात असताना शिवभक्त पांडव कोकणातून प्रवास करत होते. कुणकेश्वर येथे आल्यानंतर त्यांना शिवलिंग आणि सभोवतालचा रम्य निसर्ग नजरेस पडला. या जागी तीर्थक्षेत्री प्रतिकाशी निर्माण केली तर जनताजनार्दनाला काशीला जाण्याचे कष्ट पडणार नाहीत, म्हणून त्यांनी एका रात्रीत १०८ शिविलग तयार करण्याचा निर्धार केला. पांडव त्या पवित्र समुद्रकिनारी एका रात्रीत १०८ शिवलिंग साकारत असल्याचे अंतज्र्ञानाने काशी विश्वेश्वराच्या लक्षात आले. आपले माहात्म्य कमी होऊ नये म्हणून काशी विश्वेश्वराने कोंबडय़ाचे रूप धारण करून पहाटेची बांग दिली. त्यावेळी पहाट झाली असे समजून शिवलिंग निर्मितीचे कार्य मध्येच थांबवून पांडव पुढील प्रवासासाठी निघाले. मात्र, त्यांनी जी शिवलिंग तयार केलेली होती, ती आजही कुणकेश्वरमध्ये दिसतात, म्हणून कुणकेश्वराला ‘कोकणची काशी’ असे नाव मिळाले. काशीला मृतकांच्या आत्म्याला शांती मिळते म्हणून पिंडदानाच्या किंवा श्राद्धाच्या कार्यक्रमाच्या दृष्टीने हे ठिकाण महत्त्वाचे आहे.

कुणकेश्वर हे स्वयंभू शिवालय आहे. या शिवलिंगाभोवती ‘कुणक’ नावाच्या वृक्षांची राई होती. म्हणून या देवाला कुणकेश्वर या नावाने ओळखले जाऊ लागले. या देवस्थानासंबंधी आख्यायिका अशी की, एका ब्राह्मणाची गाय रोज चरत चरत या भागात येई आणि कुणकराईतील शिविलगावर आपल्या अमृतमय दुधाचा पान्हा सोडत असे. मात्र ही गाय आपल्या धन्याच्या घरी दूध देत नसे. त्यामुळे गाईच्या दुधाचे काय होते, हे ब्राह्मणास कळेना. म्हणून ब्राह्मणाने तिच्यावर पाळत ठेवली. तेव्हा त्याला असे दिसून आले की, आपली गाय बिनदिक्कतपणे त्या पाषाणावर दुधाचा पान्हा सोडते आणि आपल्याला त्यापासून वंचित ठेवते. त्यामुळे तो क्रोधीत झाला. त्याने गाईला मारण्याच्या उद्देशाने आपल्या हातातील काठी गाईच्या दिशेने फेकली. मात्र, ती काठी निसटून शिवलिंगरूपी पाषाणाला लागली आणि पाषाणातून रक्त वाहू लागले. ते दृश्य पाहताच ब्राह्मण घाबरला. त्याने लगेच पाषाणाला शरण जाऊन भक्तिभावाने पूजाअर्चा सुरू केली.

या संदर्भात दुसरी दंतकथा सांगितली जाते की, पूर्वी िहदुस्थानचा व्यापार इराण, आफ्रिका, अरबस्तान या मध्य पूर्वेकडील देशांशी जलमार्गाने होता. समुद्रामार्गे होणारा हा व्यापार अतिशय धोकादायक होता. अशाच एका व्यापाऱ्याच्या गलबताचा तांडा कोकण किनारपट्टीवरील सागरावरून जात असताना अचानक आलेल्या प्रलयंकारी वादळात तो व्यापारी सापडला. आता आपण काही वाचत नाही असे त्याला वाटले. त्यावेळी त्याला कुणकराईतील मिणमिणती ज्योत दिसली. त्यालाच परमेश्वर मानून त्याने त्याचा धावा सुरू केला. त्याला लगेचच त्याची प्रचीती आली. वादळ शांत झाले आणि त्याची गलबते सुखरूप किनारी आली. देवाने आपले प्राण वाचविले म्हणून त्याने आपली सर्व संपत्ती खर्च करून कुणकराईत शिवलिंगाचे मंदिर उभे केले आणि ज्या देवाने आपले प्राण वाचविले त्या परमेश्वर चरणी आपले जीवन समर्पित करण्याच्या उद्देशाने त्या व्यापाराने भव्य मंदिराच्या कळसावरून झोकून दिले आणि आत्महत्या केली. अशा आख्यायिका असलेल्या कुणकेश्वराला भगवान शंकाराच्या दर्शनासाठी हजारो भाविक भेट देत असतात.

कोकणची काशी म्हणून प्रचलित असणाऱ्या कुणकेश्वरमध्ये पांडवांनी शिवलिंग तयार केली आहेत. अशा ठिकाणी शंकराचे वास्तव्य असल्याने पूर्वजांच्या किंवा मृतकांच्या आत्म्याला शांती मिळते, या भावनेतून वर्षांनुवर्षे कुणकेश्वरमध्ये पिंडदान केले जाते. महाराष्ट्रात श्राद्धाचे विधी करण्याची काही मोजकीच ठिकाणे आहेत. त्या ठिकाणांमध्ये ‘कुणकेश्वर’चा समावेश होतो. या ठिकाणी श्राद्धाचे विधी केले तर ते सफल होतात, असे मानले जाते.

कृष्णाकाठचे विधी (कराड)

पिंडदान करणे म्हणजे मृतकांविषयी किंवा पूर्वजांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे होय. त्यांनी केलेल्या उपकाराची जाणीव ठेवण्यासाठी पिंडदान केले जाते. पूर्वी पूर्वजांच्या प्रतिमा, प्रतीके, पुतळा, मंदिरे बांधून कृतज्ञता व्यक्त करता येत होती. मात्र, ती खर्चीक आणि सामान्यांना परवडणारी नव्हती. मग, अशा वेळी पिंडदान करणे महत्त्वाचे समजले जाऊ लागले. याबाबत कराड येथील डॉ. विनायक गरुड सांगतात की, पूर्वी पिंडदान ज्याच्या त्याच्या आर्थिक परिस्थितीनुसार केले जात. राजा असेल तर तो सोन्या-चांदीच्या भांडय़ातून श्राद्ध घालत होता. मध्यमवर्गीय माणूस तांब्या-पितळेच्या भांडय़ातून श्राद्ध घालत होता. मात्र, एखाद्या गरिबाला श्राद्ध घालणे परवडत नसेल तर त्याने गावाच्या बाहेर जाऊन दक्षिण दिशेची अधिदेवता यम असलेल्या दक्षिण दिशेला सांगितले की, ‘‘मला अशा पद्धतीने श्राद्ध घालणे शक्य नाही. मी माझ्या आर्थिक परिस्थितीमुळे पूर्वजांसाठी काहीही करू शकत नाही. तर मला माफ कर’’, तरी त्या श्राद्धाचे किंवा पिंडदानाचे पुण्य त्याला मिळते, असे शास्त्रात सांगितलेले आहे. स्कंदपुराणांमध्ये काशीसारख्या दूरच्या ठिकाणी पिंडदान करण्याचे निर्देश आहेत. मात्र, सामान्य माणसाला त्या दूरच्या ठिकाणी जाणे बहुतेक वेळी शक्य नसते. अशा वेळी त्याला जवळच्या नदी तीरावर पिंडदान करता येते, असेही सांगण्यात आलेले आहे. त्यामुळे कृष्णाकाठावरील पिंडदानाला महत्त्व आहे. आणि तिला दक्षिण काशी असेही संबोधले जाते. कारण, कृष्णा ही महानदी आहे. तसेच कराड या ठिकाणी कृष्णा-कोयनेचा प्रीतिसंगम अद्वितीय आहे. त्या ठिकाणी केला जाणारा पिंडदान विधी हा सुवर्णाप्रमाणे सुंदर आणि थेट परमेश्वराला जाऊन पोहोचणारा आहे. त्यामुळे कृष्णेकाठी श्राद्धाचे कार्यक्रम करावेत, असा उपदेश पुराणांमध्ये सापडतो.

स्कंदपुराणामध्ये २००० श्लोकांमध्ये संपूर्ण कृष्णामाहात्म्य येते. कृष्णाकाठावरती एकूण १८६ तीर्थक्षेत्रे आहेत. यापैकी कराड परिसरात साधारणपणे ३५ ते ४० तीर्थक्षेत्रे आहेत. त्यामध्ये गरुडतीर्थ, हाटकतीर्थ, भैरवतीर्थ, गणेशतीर्थ, नागतीर्थ, लक्ष्मीतीर्थ, नृसिंहतीर्थ, मरकडेयतीर्थ, कल्याणतीर्थ, ब्रह्मतीर्थ, ज्ञानतीर्थ, धर्मतीर्थ, हौसतीर्थ, तारकतीर्थ, शुक्रतीर्थ, कंकणतीर्थ या सर्व तीर्थाचे ‘र्क हाटक उपाख्यान’ या ग्रंथामध्ये उल्लेख सापडतात. या तीर्थक्षेत्री धार्मिक पूजा करावी किंवा श्राद्ध घालावे, असे धर्मशास्त्रीय ग्रंथांमध्ये सांगितलेली आहेत. स्कंदपुराणामध्ये कराडच्या तीर्थक्षेत्रांवर कोणकोणती श्राद्धं करता येतात, याची माहिती दिलेली आहे. त्यामध्ये एकूण ९६ श्राद्धं सांगितलेली आहेत. त्यातील तीर्थक्षेत्राच्या अनुषंगाने सांगितलेली श्राद्धं कराडच्या विविध तीर्थक्षेत्रांवर केली जावीत, असे स्कंदपुराणामध्ये सांगितलेले आहे. कराडच्या जगप्रसिद्ध असणाऱ्या प्रीतिसंगमाला अनुसरून सात घाट येतात. या घाटांवर पिंडदान आणि धार्मिक कार्यक्रम करण्यासाठी शास्त्राने परवानगी दिलेली आहे. आपण काशीला जाऊन पुण्यकर्म करतो, अगदी त्याचप्रमाणे त्या पुण्यकर्माचं समफल कृष्णाकाठच्या घाटांवर प्राप्त करता येते. त्यासंदर्भात अधिक माहिती देताना डॉ. विनायक गरुड सांगतात की,

तीर्थाना हि प्रभावेण कलिकल्मषशत्रुणा।
कृष्णायाश्र्चापि सांनिध्यात् पापं नैव भविष्यति ।।

याचा अर्थ असा की, प्रत्यक्षात भगवान विष्णूला कृष्णा नदीचे स्वरूप मानलेले आहे. आणि त्याच्याच आज्ञेने ब्रह्मदेवाने नदी सागरादी तीर्थक्षेत्रे मानवाच्या पापक्षालनार्थ उत्पन्न केली, असा आशय कराडच्या संदर्भाने पुराणात आलेला आहे. पूर्वी कृष्णा नदीवर वैदिकांचे मंत्रजागर झालेले आहेत. त्रिपिंडी, नारायण नागबळी हे विधी ठरावीक ठिकाणीच केले जातात. परंतु, हे विधी कराडच्या कृष्णाकाठी करायला हरकत नाही, असे उल्लेख देखील आपल्या धार्मिक ग्रंथांमध्ये सापडतात. तीर्थक्षेत्रं आणि त्यांचे माहात्म्य स्कंदपुराणांमध्ये वर्णन केलेले आढळते. कृष्णा माहात्म्य हे ६० अध्यायांमध्ये विभागलेले असून २३०० श्लोकांमध्ये त्याचे वर्णन केलेले आहे. श्राद्धांबद्दलच्या अनुषंगाने महाभारतात एक कथा येते की, पांडवांचा वनवास प्रवास सुरू होता. त्या वेळी कराडला कृष्णेच्या काठावर पांडव येऊन गेल्याचा संदर्भ कृष्णा माहात्म्यामध्ये येतो. त्याचबरोबर आगाशीवच्या पांडव लेणींमध्ये गुहा आहेत, त्यात पांडवांचा निवास होता. अशा प्रकारच्या धार्मिक कथा कृष्णाकाठच्या अनुषंगाने शास्त्रांत किंवा पुराणात सापडतात. म्हणून कृष्णाकाठाच्या पिंडदान विधींना महत्त्व आहे.

बाणगंगा माहात्म्य (मुंबई)

भगवान शंकराच्या जटेमध्ये असणाऱ्या गंगेला भारतीय संस्कृतीत अनन्य साधारण महत्त्व आहे. गंगेच्या पाण्यात स्नान केल्यानंतर मनुष्याचे पापक्षालन होते. मृतकांच्या आत्म्याला शांती आणि मुक्ती मिळते. मात्र, मृतकांच्या उपकाराची जाणीव व्यक्त करण्यासाठी पवित्र गंगेच्या किनारी श्राद्धाचे कार्य करावे, असे शास्त्रपुराणात सांगितलेले आहे. अशी श्राद्धं करण्याची ठिकाणे भारतामध्ये ठरावीकच आहेत. त्र्यंबकेश्वर, कुणकेश्वर, हरिहरेश्वर, गोदाकाठ आणि कृष्णाकाठ अशी यादी आपल्यासमोर येते. श्राद्धाचेही काही विधी विशिष्ट ठिकाणीच करावेत, तरच मृतकांच्या आत्म्याला मुक्ती मिळते, असे सांगितले जाते. या यादीमध्ये मुंबईमधील ‘बाणगंगा’ तीर्थाचा सामावेश होतो.

बाणगंगेचे वैशिष्टय़ असे की, नदीच्या अवघ्या दहा फुटांवर समुद्र असूनही बाणगंगेचे पाणी गोडे आहे. गंगेचे पाणी पवित्र मानले असल्याने श्राद्ध सफल होते. इहलोकी जशी आई-वडिलांची सेवा केली, त्याचप्रकारे परलोकीदेखील त्यांची अन्नपाणी देऊन सेवा करावी, असा भाव प्रत्येक श्राद्धाच्या पाठीमागे असतो. माणूस पृथ्वीतलावरून गेला तरी त्याचे कर्म संपत नाही. परलोकी गेल्यावरही त्याचे कर्म सुरू असते. त्यामुळे त्याच्या अन्नपाण्याची सोय व्हावी. यासाठी वर्षांतून एकदा तरी श्राद्ध घातले जाते. मनुष्याच्या तृप्ततेचे साधन अन्न असल्याने श्राद्ध विधीमध्ये पिठाचे किंवा भाताचे गोळे केले जातात. तांब्याच्या िंकंवा अन्य भांडय़ातून हा विधी केला जातो. मात्र, अशा विधींमध्ये जोपर्यंत आपण पितृकांना अन्न घेण्याची परवानगी देत नाही तोपर्यंत पितृक अतृप्त राहतात. म्हणूनच श्राद्धामध्ये ‘अन्नसपर्पण’ हा विधी आहे. मृतकांच्या आत्म्याला शांती लाभू दे, आईच्या घराण्यातील पितर तृप्त होऊ दे, वडिलांच्या घराण्यातील पितर तृप्त होऊ दे, यासाठी पिंडदान केले जाते किंवा श्राद्ध घातले जाते.

बाणगंगा तीर्थाबद्दल संजय मुणगेकर म्हणतात की, धार्मिक विधी केल्या जाणाऱ्या प्रत्येक ठिकाणाला माहात्म्य असते. त्याच प्रकारे बाणगंगेलादेखील माहात्म्य आहे. पाणी पिण्यासाठी परशुरामाने बाण मारून निर्माण केलेली गंगा म्हणजे बाणगंगा होय. प्रत्येक श्राद्ध हे गंगेच्या किनारी करावे, या उद्देशाने लोक बाणगंगेला श्राद्ध घालतात. कारण, तेथे श्राद्ध घातल्यानंतर पितरांना मोक्षप्राप्ती होते. गंगेचे पाणी पापमुक्तीसाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी महत्त्वाचे समजले जाते. बाणगंगेवर नारायण नागबळी, त्रिपिंडीसारखे विधी करता येतात. एखादे श्राद्ध तीर्थावरच केले जाते, कारण तेथे भगवंताचे वास्तव्य असते, असे मानले जाते. भगवंताचे वास्तव्य असलेल्या ठिकाणी पवित्र स्थान प्राप्त झालेले असते. त्यामुळे परमेश्वराचे वास्तव्य असणाऱ्या ठिकाणी श्राद्ध घातले की, पितृकांना मुक्ती मिळते. ‘पुनर्भि जन्मम, पुनर्भि मरणम्’ या दृष्टिकोनातून पितृक संतुष्ट व्हावेत, यासाठी श्राद्ध घालण्याची परंपरा निर्माण झालेली आहे.

पुरोहित शशीकांत पांडे बाणगंगेविषयीची आख्यायिका सांगतात की, राम आणि लक्ष्मण सीतेच्या शोधात फिरत होते. सीता लवकर सापडावी, म्हणून राम-लक्ष्मण भगवान शंकराची पूजा करत होते. शंकराच्या पूजेकरिता पाणी हवे होते. तेव्हा रामाने आपल्या धनुष्यातील बाण मारला. त्यातून गंगेची निर्मिती झाली. दुसरी अशी कथा आहे की, प्रभू श्रीरामाला शंकराची रोज उपासना करायची होती. त्यामुळे लक्ष्मण रोज काशीहून शिवलिंग आणून देत असते. मात्र, एकेदिवशी लक्ष्मणाला उशीर झाला त्यामुळे रामाने वाळूपासून शिवलिंग तयार केले. त्यातूनच वाळकेश्वर मंदिर उभारले गेले. या तीर्थावर वाळकेश्वर आणि बाणगंगा दोन्हीही असल्यामुळे येथे केलेले श्राद्ध सफल होते, असा भाव लोकांत आहे.

भगवान शंकराने गंगेला आपल्या मस्तकी धारण केल्यामुळे गंगा पवित्र मानली जाते. त्यामुळे गंगेतीरी केलेल्या श्राद्धामुळे पितृकांची तृप्ती होते, असा भाव लोकांमध्ये दृढ असल्यामुळे बाणगंगेवर श्राद्धाचे विधी मोठय़ा प्रमाणात केले जातात. इतर नद्यांवर श्राद्ध केले जात नाही. कारण, गंगेसारखं माहात्म्य त्यामागे नसते. गंगा म्हणजे ईश्वराचे अस्तित्व, परमेश्वराची खूण. ती परमेश्वराची प्रतीक आहे. जिथे ईश्वर आहे तेथेच आपल्या पितृकांना शांती मिळू शकते. ईश्वराने गंगा निर्माण केलेली असल्यामुळे तिचे पाणी कधीच आटत नाही. शंकराच्या जटांतून वाहणाऱ्या पवित्र गंगेतच पितृक  संतुष्ट होऊ शकतात. कारण, गंगेचे पाणी त्यांना अमृतासमान आहे. त्यामुळे अमृताच्या पाण्यातून मृतकांच्या आत्म्याची संतुष्टी करण्यासाठी बाणगंगेवर श्राद्ध घातले जाते.

First Published on September 20, 2019 1:02 am

Web Title: death road to freedom
Next Stories
1 सदाको आणि क्रेन पक्षी
2 भारत-रशिया तोल साधणारी मैत्री
3 पृथ्वीवर सजीव सृष्टी का निर्माण झाली?
Just Now!
X