डॉ. चारुता कुळकर्णी – response.lokprabha@expressindia.com
अमेरिकेतील कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा म्हणजे ‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’. हे ‘मरणाचं सुंदर’ ठिकाण अमेरिका सोडण्यापूर्वी बघायचंच होतं.

अमेरिकेतला मुक्काम संपुष्टात येण्याची चिन्हे दिसायला लागली तसे आवडीची सर्व ठिकाणे पाहून घ्यायची या निर्धाराने आपापल्या बॉसला ‘वर्क-लाइफ बॅलन्स’चा हवाला देत सुट्टय़ा पदरात पाडून घेतल्या. आणि मग पाच भटक्या मित्रांची चार-पाच नॅशनल पार्काना भेटवणारी एक झक्कास रोड ट्रिप ठरली! बरोबर थोडेथोडके सामान, डोक्यात दिवसांचे थोडेथोडके आयोजन आणि बाकी सगळा मामला उत्स्फूर्त असे एकुणात सुटसुटीत गणित होते. त्यात एकाला शे-पाचशे फूट उंचीच्या, घनगोल सिकोया झाडांना (मावत नसतानाही!) कवेत घ्यायचे होते, दुसऱ्या कुणाला योसेमिटी भागातली दरीखोरी धुंडाळायची होती, तर तिसऱ्या कुणाचे तरी, ‘अमेरिकेच्या या भागात येऊन इथला अस्सल वाळवंटी भाग बघितला नाही तर लाज आहे लाज,’ असे चालले होते.. अर्थात अशी अतरंगी मागणी करणारी व्यक्ती इतर कुणी नसून मीच होते हे सुरुवातीलाच सांगून टाकायला हरकत नाही! कारण ‘डेथ व्हॅली’ या नावानेच (आणि आताच्या जगात गुगलच्या कृपेने दिसणाऱ्या फोटोंनी) उत्सुकता इतकी चाळवली गेली होती की हे प्रकरण नावाला जागून ‘मरणाचं सुंदर’ असणार आहे याची जाण्याआधीच खात्री पटायला लागली होती. त्यामुळे आठवडाभर इतर सर्व ठिकाणी यथेच्छ बागडूनही मजल-दरमजल करत ‘डेथ व्हॅली’ला पोहोचलो तोवर बागडायची इच्छा अजून तीव्र झाली होती!

‘डेथ व्हॅली नॅशनल पार्क’ हा अमेरिकेच्या कॅलिफोíनया-नेवाडा राज्यांच्या सीमेवरचा तब्बल ३४ लाख एकरांवरचा अवाढव्य आणि विलक्षण विरोधाभासांनी नटलेला पसारा आहे. एकाच वेळी जगातल्या सर्वात जास्त उष्ण आणि कोरडय़ा म्हणून नावाजलेल्या या भागात अकरा हजार फूट उंचीच्या पर्वतांपासून ते समुद्रसपाटीखाली ३०० फूट खोल अशी भुईसपाट तळी आहेत. एकीकडे लाल-काळ्या डोंगरांतून वाट काढत वाहणाऱ्या पांढऱ्याशुभ्र नद्या आहेत, तर दुसरीकडे अव्याहत सरकत जाणाऱ्या वाळूच्या टेकडय़ा आहेत. एकीकडे दरीच्या तोंडचे पाणी पळाल्याने मलोन्मल पसरलेली मिठाची सरोवरे आहेत तर दुसरीकडे त्याला खेटून बर्फाच्छादित शिखरे आहेत. एकुणात नजर ठरणार नाही (किंवा कदाचित ठरली तरी पुढच्या ठिकाणीदेखील इथे नजर ठरणार नाही असेच वाटेल!) अशी एकापेक्षा एक जबरदस्त आणि परस्परविरोधी भूरूपे! प्रत्येकाची जन्मकहाणी निराळी, प्रचंड टोकाच्या, गुंतागुंतीच्या शे-पाचशे-हजारो-लाखो वर्षांच्या भूशास्त्रीय प्रक्रियांतून बनलेली.. अर्थातच माझ्यासारख्या भूशास्त्र वगरेंच्या मागे लागलेल्या मंडळींसाठी ‘जे जे उत्तम, उदात्त, उन्नत, महन्मधुर ते ते’! असे वातावरण. त्यामुळे तिथे शिरल्या शिरल्या क्षणभराचाही वेळ न दवडता िहडायला आणि सहचऱ्यांची शिकवणी घ्यायला सुरुवात केलीच!

सगळ्यात पहिला थांबा गाठायचा ठरवला होता तो ‘रेनबो कॅन्यन’. जीपीएस बाईने सांगितल्याप्रमाणे ‘फादर क्रॉवली विस्टा पॉइंट’ अशी पाटी दिसल्यावर गाडीतून उतरते झालो. या वाळवंटी भागात पाण्याचे दुíभक्ष कमी करण्यासाठी वर्षांनुवष्रे झटून लोकचळवळ उभी करणाऱ्या फादर जॉन क्रॉवलीचे नाव आठवणीने या जागेला दिलेले पाहून कौतुक वाटले, कदाचित या ‘पाद्री ऑफ द डेझर्ट’ने ज्या नजरेने ही रंगीत कॅन्यन निरखली- आपलीशी केली, त्या नजरेने प्रत्येकाने पाहावे अशी अपेक्षा असावी बहुधा.. विचार करत करत विस्टा पॉइंटच्या रेिलगला जाऊन टेकले आणि खाली डोकावले तर काळ्या-लाल आणि न जाणो आणखी किती गडद रंगांचे पट्टे ल्यालेल्या डोंगर-दऱ्या! कधीही अशी काळी-लाल रंगसंगती दिसली रे दिसली की आधी माझं मन थेट दख्खनच्या पठारावर जातं, तिथलाही दगड- बसाल्ट असलाच काळाकभिन्न, पण त्याची धूप व्हायला लागली की त्याची माती निघते ती मात्र चांगली लालेलाल. इथेही तीच भूशास्त्रीय रेसिपी दिसत होती. पण इथले एकावर एक काळे-लाल पट्टे अजून एक भन्नाट रहस्य उलगडत होते. बसाल्ट तयार होताना बऱ्याचदा शिलारसाचे/ लाव्हाचे थरावर थर साठतात, ते थंड होऊन बनलेले कातळ झिजून हळूहळू माती तयार व्हायला लागते. त्याच वेळी पृथ्वीने ‘टायिमग’ साधले तर तिच्या पोटातून बाहेर पडणारा शिलारसाचा रतीब बरोब्बर या मातीच्या थरावर भरला जातो आणि मग भट्टीत गेलेल्या मातीचे जे होते तेच याही मातीचे होते. ती चांगली भाजून आणखी लालेलाल होते! परत पुढच्या लाव्ह्यचा कातळ होतो, पुन्हा त्याची झीज होऊन माती बनते.. सगळे चक्र पुन्हा सुरू! असे चक्र वारंवार फिरल्याने ही ‘रेनबो कॅन्यन’ या दोन रंगांनी आणि त्यांच्या असंख्य छटांनी चट्टेरीपट्टेरी झालेली आहे. हा भाग पुन्हा पुन्हा न्याहाळत राहिले आणि (सुरुवातीला ‘माहेरचा बसाल्ट’ आठवला तरी!) त्याच्या सभोवतालच्या वाळवंटी पर्यावरणामुळे की काय हा भूभाग एकुणात आपल्या जगाच्या पलीकडचा वाटत राहिला. ‘स्टार वॉर्स’ वगरेमध्ये परग्रहावरच्या डोंगर-दऱ्या दाखवतात अगदीच तितकाच पारलौकिक.. अजून थोडा वेळ बघत राहिले आणि वाटलं, आत्ता या ठिकाणी खरोखरच परग्रहवासीयांना ‘नामोहरम’ करायला एखादं लढाऊ विमान आलंच तर काय मज्जा येईल! आणि अक्षरश: पुढच्याच क्षणी खरोखरंच एक अमेरिकन फायटर प्लेन ५० फुटांवर सूर मारून दरीत नाहीसं झालं! ‘ए मला चिमटा काढा रे!’ असं ओरडत शेजारी उभ्या असलेल्या मित्रमंडळाकडे गेले तर तेही हात पुढे करून चिमटा काढून घेण्याच्या बेतात! नक्की काय झालं हे कळायला क्षणभर जावा लागला आणि तेवढय़ात शेजारच्या माहितीफलकाने आधार दिला- ‘डोन्ट बी सरप्राईज्ड टू सी लो-फ्लाइंग मिलिटरी एअरक्राफ्ट्स!’ तेव्हा लक्षात आले, डेथ व्हॅलीचा हा भाग वर्षांनुवष्रे अमेरिकन हवाई आणि नौदलाच्या वैमानिकांच्या ट्रेिनगसाठी वापरला जातो. ही एक फारच भन्नाट माहिती कळली, नुसती कळली नाही तर चक्क अनुभवता आली होती! ‘काय बेक्कार टायिमग साधलेलंय!’ अशी उगाच स्वत:ची पाठ थोपटून परत गाडीकडे निघालो.

पुढचा थांबा गाठण्याआधी रात्री डेरा पडणार होता त्या ‘पॅनामिन्ट िस्प्रग रिसॉर्ट’मध्ये क्षणभर विश्रांती आणि क्षुधाशांती करायची ठरली. योसेमितेकडून- उत्तरेकडून डेथ व्हॅलीत शिरकाव केल्याने ही वाटेवरची मोक्याची जागा आधीच हेरून ठेवली होती. पण इतर अनेक रिसॉर्ट्सप्रमाणे ती ‘सर्व सोयींनी युक्त’ असणार असे वाटल्याने खास खचितच नसणार असेही मनाने घेतले होते. वास्तविक रिसॉर्टमध्ये शिरलो तर आजूबाजूच्या वाळवंटी पिवळेपणात बेमालूमपणे मिसळून जावीत अशी लाल-खाकी बठी कौलारू घरे आणि सभोवती संपूर्ण कॅक्ट्सवर्गीय खुरटय़ा झाडाझुडपांचे नेपथ्य! शिवाय, इथे शिरल्यापासून एकाच्याही मोबाइलला रेंज नव्हती, त्यामुळे रिसॉर्टवर वीज वगळता इतर कोणतीही अद्ययावत सोय नाही आणि आता ट्रिपचा शेवटला भाग ‘आपण-नकाशे-पाटय़ा-गप्पा’ हे जाणवून सगळ्यांमधले ‘मोगॅम्बो खूश हुए’ झाले! त्याच खुशीत तिथल्या रेस्टॉरंटमध्ये अमेरिकन-मेक्सिकन-इटालियन यांच्या सरमिसळीतून काही छान सामिष-निरामिष प्रकार चापले आणि ‘स्टोव्हपाइप वेल्स्’च्या दिशेने गाडी हाकायला सुरुवात केली. ‘स्टोव्हपाइप वेल्स्’ ही डेथ व्हॅलीतले अगदी अपवादाने आढळणाऱ्या राहत्या वस्त्यांपकी एक. १९व्या शतकाच्या उत्तरार्धात डेथ व्हॅलीतल्या नसíगक संसाधनाची लोकांना माहिती व्हायला लागली आणि मग त्यानुषंगाने आधी खाणकाम आणि थोडीथोडकी, मोजक्या वस्तीची खेडी तयार झाली, त्यातले अजूनही टिकलेले हे एक. गाडीतूनच खेडय़ातल्या रचना निरखल्या. कारण मुख्य कार्यक्रम हा भाग ओलांडून गेले की दिसणारी वाळूची पठारे आणि टेकडय़ा हा होता. गाडीनेच दोन-चार डोंगर चढलो, तेवढेच उतरलो आणि रस्त्याच्या दोन्ही बाजूंना मलोनमल बारीक वाळूची पठारे अर्थात सॅण्ड/मड फ्लॅटस् दिसायला सुरुवात झाली. वाळवंटी भागात सापडणारे हे एक खास वैशिष्टय़ आणि नदीच्या पोटात शिरल्याचे चिन्हही! वाळवंटी नद्या तशा खूपच कुपोषित, कारण त्यांना कधीच पुरेसे पाणी मिळत नाही. पाणी नसल्यामुळे त्यांच्याकडे गाळ ओढण्याची ताकद नसते. त्याचा परिणाम म्हणून शक्य त्या सर्व ठिकाणी गाळ टाकत टाकत त्या पुढे जातात. वाळवंटातल्या नद्या हे जमेल तितके करत राहतात. मात्र डेथ व्हॅलीतल्या नद्यांना तितपतही शक्ती एकवटता येत नाही. याचे कारण हा भाग जवळजवळ पाच मोठय़ा पर्वतरांगांनी वेढलेला आहे. त्यातल्या मुख्य सिएरा नेवाडा, अर्गस आणि पॅनामिन्ट या रांगा नुसत्या उंच नाहीतर अमेरिकेच्या पश्चिम किनाऱ्याला समांतर उत्तर-दक्षिण पसरलेल्या आहेत. त्यामुळे पॅसिफिक महासागराकडून येणारे भरपूर पाणीदार ढग ही अडथळ्यांची र्शयत पार करून डेथ व्हॅलीपर्यंत पोहोचतच नाहीत आणि त्यामुळे इथल्या मोजक्या काही भागात मिळून दरवर्षी जास्तीत जास्त दीड इंच पाऊस पडतो. त्यामुळे या भागातल्या नद्या क्वचितच वाहत्या दिसतात, उलट गेली काहीशे-हजार वष्रे हे चक्र सदोदित चालू राहिल्याने नद्यांची पात्रेच्या पात्रे मऊ, बारीक वाळू-चिखलाच्या पठारांमध्ये बदलून गेली आहेत. रस्त्याच्या कडेला गाडी लावून या सॅण्ड/मड फ्लॅट्सवर निवांत फिरता-बसता येऊ शकते. आम्ही त्याच तयारीत असताना अजून एक पूर्णपणे अनपेक्षित प्रसंग घडला तो म्हणजे तिथल्या कोयोटचे दर्शन! हा लांडग्याचा भाऊबंद पण आकाराने खूपच लहान आणि शरीरयष्टीनेसुद्धा.. रखरखीत शब्दालाही लाजवेल अशा या वाळवंटात त्याचे मुख्य खाद्य म्हणजे सापडतील तेवढे कीटक, त्यामुळे इथल्या झाडांसारखाच इथला हा प्राणीही खुरटाच! लहानपणी कार्टून नेटवर्कवर ‘रोडरनर शो’मध्ये रोडरनरला जायबंदी करण्यासाठी नानाविध युक्त्या करून स्वत:च फसणारा कोयोट बघून खूप हसू यायचे, पण त्याचे हे असे किडमिडे रूप बघून वाईट वाटले. आमच्या नुसत्या गाडीच्या आवाजानेही तो दचकला आणि आमच्यासाठी पठारे मोकळी टाकून पळूनच गेला बिचारा! मग थोडा वेळ त्यातल्या एका पठारावर निवांत पाय पसरून कॅमेऱ्याचा क्लिकक्लिकाट आणि गप्पाटप्पा करून घेतल्या आणि सूर्यास्त गाठण्यासाठी मस्किट फ्लॅट डय़ून्सकडे निघालो. डेथ व्हॅलीच्या अगदी उत्तर टोकाला ‘युरेका’ नामक तब्बल ७०० फूट उंचीच्या आणि जवळजवळ एक मल रुंद वाळूच्या अजस्र टेकडय़ा आहेत. त्यांची ख्याती अशी की उन्हाळ्यात विशेषत: जेव्हा टेकडय़ांमधली वाळू पूर्णत: कोरडी असते त्यादरम्यान टेकडीच्या माथ्यावरचे वाळूचे कण वाऱ्याबरोबर खालीवर करताना एकमेकांवर आपटून एखाद्या पाइप ऑर्गन/बासरीप्रमाणे वेगवेगळ्या पट्टीत आवाज निर्माण करतात. ही ‘गाणारी वाळू’ ऐकायला आणि पाहायला खास लोक देशोदेशीहून इथे येत असतात, पण दुर्दैवाने आम्ही त्यातले नव्हतो! एक तर आमची ही चक्कर ऑक्टोबरच्या सुमारास घडली होती आणि शिवाय युरेका डय़ून्स काही अंशी दुर्गम भागात असल्याने तिथे जाण्याचा मार्ग काही कारणाने नेमका बंद होता, त्यामुळे आम्ही दुधाची तहान ताकावर भागवायला मस्किट फ्लॅट डय़ून्सना जाऊन भिडलो. खरे तर इथलीही एकेक टेकडी शंभरेक फुटांची, आपल्यासारख्या पाच-सहा फुटी देहाला खुजे करून सोडणारी. त्यामुळे त्या तशा तथाकथित बुटक्या टेकडय़ांचे वेगवेगळे आकार बघत सूर्य क्षितिजावर येईपर्यंत िहडलो. त्यातल्या काही चंद्रकोरीच्या आकाराच्या, काही चांदण्यांसारख्या बहुकोनी आणि बाकी नुसत्या सरळसोट; मुळात जुलमी वारा नेईल त्या दिशेला हजारो मल उडत जाणाऱ्या आणि टाकेल तिथे जाऊन पडणाऱ्या, त्यातल्या त्यात मध्ये मध्ये मस्किट (आपल्याकडल्या बाभळीसारख्या) झाडांनी रेखलेल्या! या टेकडय़ांतली वाळू इथे उडत उडत येण्याच्या खूप आधी या ठिकाणी एक भलामोठ्ठा तलाव होता, ज्याचे अस्तित्व आजच्या घडीला डून्सच्या पायथ्याशी भरपूर पोपडे पडलेल्या मोठाल्या मड फ्लॅटमधून जागोजागी दिसत राहतं. याच पुरातन जमिनीत आपले पाय रोवून या मस्किट झाडांनी फांद्यांचे इतके मोठे आणि मजबूत जाळे विणले आहे की या फांद्यांच्या झोपाळ्यावर निवांत पहुडून लाल-गुलाबी-केशरी-जांभळ्या रंगांनी ठसवलेला सूर्यास्त बघत बसलो. तो सोहळा आटोपून परतीच्या वाटेला लागलो तोवर चांगलाच अंधार झाला होता, पण तरीही मुद्दाम पुन्हा एकदा सॅण्ड/मड फ्लॅट्सवर थांबलोच. कारण रस्त्याच्या कडेला गाडी थांबवून (एक इंडिकेटर वगळता) सगळे दिवे बंद करून वर बघण्याचा अवकाश की समोर अख्खीच्या अख्खी आकाशगंगा हजर! डेथ व्हॅलीच्या या भागापासून कोणत्याही दिशेला १०० मलांपर्यंत मोठी मानवी वस्ती नाही. त्यामुळे कोणत्याच प्रकारचे प्रदूषण नाही. उलट अमेरिकेतले (किंबहुना जगातलेही) सर्वात काळेकुट्ट आकाश इथे पाहायला मिळते. नॅशनल पार्क सíव्हसने अलीकडे याचीही मोजदाद करून डेथ व्हॅलीला इतर असंख्य पार्काच्या तुलनेत याबाबतीत तिसऱ्या क्रमांकाचा बहुमान दिला आहे. एकुणात खगोलप्रेमींसाठी नुसती चंगळ आहे ही जागा म्हणजे! हजारो वर्षांपूर्वी या भागात वस्ती करायला आलेल्या आदिम रहिवाशांचेही अगदी असेच मत पडले असावे. म्हणूनच की काय त्यांनी या सगळ्या भागातल्या दगडधोंडय़ांवर अंतराळातल्या विविध घडामोडींची चित्रे रेखाटून-कोरून ठेवली आहेत. तब्बल आठ हजार वर्षांचा पल्ला गाठलेली ही चित्रे आजही मानवी मेंदूच्या अभिजाततेची ओळख पटवतात. या पूर्वजांच्या पुण्याईला स्मरत आम्ही पॅनामिन्ट िस्प्रग रिसॉर्टमध्ये परतलो आणि लवकरच जेवून उरलेले तारे स्वप्नात बघत बसलो!

दुसऱ्या दिवशी भल्या पहाटे गाशा गुंडाळून भटंकतीची सुरुवात झाली ती ‘फरनेसक्रीक व्हिजिटिंग सेन्टर’पासून. डेथ व्हॅली भागातल्या भूशास्त्रीय, पर्यावरणशास्त्रीय, पुरातत्त्वीय, आणि ऐतिहासिक या आणि अशा सर्व प्रकारच्या अभ्यासाचा मागोवा घेणारे हे केंद्र. त्यामुळे प्रत्येक थोरापोराला त्यांच्या त्यांच्या आवडीचे काही ना इथे बघायला मिळतेच. मी जमतील तेवढे सगळे लहानमोठे भूशास्त्रीय माहितीपट बघून घेतले. त्यात एकंदरीत डेथ व्हॅलीची जडणघडण तर बघायला मिळालीच, पण मुख्यत्वे वेळेअभावी बघता न आलेल्या ठिकाणांची एक आभासी का होईना पण एक सर झाली, पश्चिम टोकाचा ‘रेसट्रॅक प्लाया’ हा त्यातलाच एक. हजारो वष्रे अभावाने आढळणाऱ्या पाण्याचा आणि भरारणाऱ्या वाऱ्याचा एकत्रित परिणाम म्हणून कोरडेठाक पडलेले हे सरोवर ऊर्फ ‘प्लाया’ जगभरात एका विलक्षण गोष्टीसाठी ओळखले जाते, ती म्हणजे ‘सरकते दगड’. सरोवराच्या कोरडय़ा पृष्ठभागावरून थोडेथोडके नाहीतर मणभर वजनाचे हजारो दगड वर्षांनुवष्रे आपल्याला पत्ता लागू न देता शेकडो मीटर अलगदपणे सरकत जातात, तेही एखाद्या शर्यतीत भाग घेतल्यासारखे आखीव मार्गावरून आणि या प्रक्रियेत आपापले ठसे मागे ठेवतात, म्हणून हा प्लायाला आपसूक नाव पडले ‘रेसट्रॅक प्लाया’! इतक्या अवाढव्य आणि बोजड दगडांना अव्याहतपणे कोणता अज्ञात हात ओढतो हे कोडे गेले शतकभर अनेकांना अभ्यासाला पुरले आणि अगदी अलीकडेपर्यंत पुरून उरले होतेही. अर्थात, कुठल्याही गोष्टीची भौगोलिक स्थिती तंतोतंत दाखवू शकणारे जीपीएस तंत्र गेल्या दशकात अधिकाधिक विकसित होत गेले आणि चक्क अशी एकेक जीपीएस या सरकत्या दगडांना चिकटवून शास्त्रज्ञांनी प्रतिसेकंदाच्या नोंदी घेत घेत गेल्या काही वर्षांत या दगडांचे वजन-आकारमान-वेग आणि त्यांचा इथल्या प्रचंड वेगवान वाऱ्याशी असलेला परस्परसंबंध यांची ठोस गणिते मांडली. हे सगळे वाचताना वाटले, एरवी विज्ञान तंत्रज्ञान घडवत असते, पण कधी कधी तंत्रज्ञानही विज्ञान घडवू शकते तर! अजून काय वाचायचे राहिले आहे असा विचार करत असतानाच मित्रमंडळाने, ‘हे पाहता न आलेले असेच मन लावून पाहत बसलीस तर आम्हाला बाकीचेही स्पॉट्स इथेच पाहावे लागतील,’ असे कुचकट सत्यवचन ऐकवले आणि आम्ही ‘झाब्रिस्की पॉइंट’च्या दिशेने मुकाट गाडी पिटाळायला लागलो!

फ्रान्सिस स्मिथ आणि ख्रिश्चियन ब्रेऊर्ट झाब्रिस्की ही दोन्ही अमेरिकन खाणकाम व्यवसायातली मातब्बर नावे. १९ व्या शतकाच्या शेवटी शेवटी विविध कारणांनी बोरॅक्सला, विशेषत डेथ व्हॅलीतल्या उच्च प्रतीच्या बोरॅक्सला प्रचंड मागणी वाढली. स्मिथने स्वतच्या प्रचंड मोठय़ा-महत्त्वाकांक्षी ‘पॅसिफिक कोस्ट बोरॅक्स कंपनी’द्वारे या भागातला जवळजवळ सगळा बोरॅक्स खाण व्यवसाय एकहाती चालवला होता. त्याच्या काळात एकेका खेपेला ओढायला वीसेक खेचरांचा ताफा लागेल एवढे बोरॅक्स खणून काढले जात असे. वाढत्या व्यवसायाचा डोलारा सांभाळता यावा म्हणून स्मिथने नेवाडाच्या वाळवंटात वाढलेल्या झाब्रिस्कीचा चुणचुणीतपणा पाहून त्याला वयाच्या एकविसाव्या वर्षी खाणकामगारांवर मुकादमगिरी करायला ठेवून घेतले. तिथपासून हा मुलगा डोळसपणे डेथ व्हॅलीच्या वेगवेगळ्या भूरूपांचे बारकावे आणि त्यातल्या बेचक्यातले बोरॅक्स निरखत राहिला आणि पुढे स्मिथच्या माघारी एकेक पायरी चढत चढत कंपनीच्या सर्वोच्च पदी पोहोचला. त्याच्या अखत्यारीत १९२०च्या दशकाच्या सुरुवातीपर्यंत खेचरांच्या गाडीऐवजी ‘आगीनगाडी’तून अमेरिकेच्या विविध भागांत डेथ व्हॅलीतल्या बोरॅक्सचा अमर्याद पुरवठा करणारी ‘पॅसिफिक कोस्ट बोरॅक्स कंपनी’ ही सर्वात यशस्वी कंपनी झाली. कालांतराने बोरॅक्सची मागणी कमी व्हायला लागली तसे झाब्रिस्कीने वाळवंटी पर्यटनावर लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली आणि डेथ व्हॅली भागात पहिलेवहिले पर्यटन केंद्र उभे राहिले. १९३३च्या सुमारास अमेरिकन सरकारने ‘डेथ व्हॅली’ भागाला ‘राष्ट्रीय स्मारक’ करायचे ठरवले आणि तब्बल ६० वर्षांनी, १९९४ मध्ये कॅलिफोíनया डेझर्ट प्रोटेक्शन अ‍ॅक्टच्या अंतर्गत त्याला ‘नॅशनल पार्क’ म्हणून संरक्षित करण्यात आले. या भागातली अर्थव्यवस्था आणि पर्यटन व्यवसायाची पायाभरणी या दोन्हीतले झाब्रिस्कीचे योगदान वाखाणण्यासाठी एका खास स्थळाला आजही ‘झाब्रिस्की पॉइंट’ म्हणून संबोधले जाते. माहितीफलकावरून झाब्रिस्की पॉइंटची रेसिपी एका वाक्यात सांगता येईल.. एक बुटकी टेकडी घ्या, तिला पांढरे-पिवळे आणि अधेमध्ये काळे चट्टे मारा आणि आवडतील तेवढय़ा जास्तीस्त जास्त वळ्या द्या. मग अशा अजून किमान चाळीसेक टेकडय़ा एकत्र ठेवून द्या, की झाला ‘झाब्रिस्की पॉइंट’वरून दिसणारा नजारा तयार! भूशास्त्रीय भाषेत, ज्याला ‘बॅडलॅण्ड’ म्हणतात त्याची जन्मकहाणी थोडय़ाफार फरकाने अशीच सांगता येते. हा सगळा मामला कुठल्या तरी अतिप्राचीन (काही लाख वष्रे जुन्या) चिखल-वाळूने बनलेल्या ठिसूळ दगडांना डोंगर तयार होण्याच्या प्रक्रियेत पडलेल्या वळ्यांचा आहे. इथे चिखल आणि वाळूसोबत कधीकाळचा काळसर अग्निजन्य खडक आणि त्याच्या लाव्हासोबत बाहेर पडलेल्या ज्वालामुखीच्या राखेने पांढऱ्या दगडावर काळे पट्टे उमटवले आहेत ही एक जमेची बाजू! थोडक्यात, एवढय़ा नितांतसुंदर भागाला ‘गुडलॅण्ड’ म्हणावे अशी अवस्था असताना त्याला ‘बॅडलॅण्ड’ म्हणायची गुस्ताखी कुणाची असावी, या प्रश्नाला उत्तर नव्हते!

‘गुडलॅण्ड’ला ‘गुडबाय’ म्हणत अजून दक्षिणेकडे सरकत हळूहळू भटकंतीच्या शेवटच्या टप्प्यात आलो. आता फक्त तीन महत्त्वाची ठिकाणे सर करायची राहिली होती, त्यातली दोन टोकाच्या उंचीवर आणि एक खोल दरीत! सर्वानुमते आधी वर चढायचे ठरले आणि गाडी साडेपाच हजार फुटांवरच्या ‘डांटेज् व्हय़ू’कडे दामटली. ब्लॅक माऊंटन हा डेथ व्हॅलीची पूर्वेकडची वाट अडवणारा दादा! त्याने गाठलेली ११ हजार फुटांची उंची हा या नॅशनल पार्कातला परमोच्च िबदू. त्याच्यावर चढाई केली तर सर्व गोष्टी टेलिस्कोपने पाहाव्या लागतील इतक्या छोटय़ा दिसतात, म्हणून या परमोच्च िबदूला सरळसोट ‘टेलिस्कोप पीक’ असे नाव देऊन टाकले आहे. ‘डांटेज् व्हय़ू’सुद्धा याच पर्वतावर वसलेला आहे. फक्त तो टेलिस्कोप पीकच्या बरोब्बर अध्र्या उंचीवर आहे. अनेक वळणे घेत घेत गाडी डांटेज्च्या पाìकगला लावली आणि व्हय़ूसाठी रेिलगला जाऊन चिकटलो. खाली अमरगोसा नदीचे नजरेत मावणार नाही इतके अजस्त्र खोरे होते. हा डेथ व्हॅलीचा सगळ्यात मध्यवर्ती भाग. इथे वाहणारी अमरगोसा नदी अर्थात वाहताना दिसत नव्हती, पण ती ओळखू आली तीच मुळात तिच्या पांढऱ्याफटक रंगामुळे.. हेही वाळवंटी नद्यांचे खास वैशिष्टय़. बहुतेक वाळवंटी नद्या या त्यांच्याच वाळू-चिखलाखालून वाहतात. क्वचित कधी वाळूखालच्या खडकाला आपटून काही काळ डोके वर काढतात. वर आल्या की भोवतालच्या मरणप्राय कोरडेपणाने पाणी केव्हाच नाहीसे होते आणि मागे उरते ते पांढरेशुभ्र मीठ! उत्तरेकडून वाहत येणारी अमरगोसा नदी डेथ व्हॅलीत शिरून अशी पूर्ण वाळू आणि मीठनशीन होते आणि जाता जाता आपल्याला तिच्या अप्रतिम सौंदर्याचे दर्शन घडवून जाते. जगप्रसिद्ध इटालियन कवी डांटेच्या ‘डिव्हाइन कॉमेडी’त ‘इन्फर्नो (नरक), पग्र्याटोरिओ (पापक्षालन), आणि पॅराडिसो (स्वर्ग)’ असे तीन टप्पे अमरगोसा नदीसारखे डेथ व्हॅलीच्या प्रत्येक घटकाच्या वाटय़ाला येतात आणि ते बघण्याचे भाग्य आपल्याला या ठिकाणी मिळते म्हणून हा ‘डांटेज् व्हय़ू’! निघण्यापूर्वी एक गिरकी घेऊन इथून दिसणारा पूर्व कॅलिफोíनया ते मध्य युटाहचा संपूर्ण प्रदेश डोळे भरून पाहून घेतला आणि गाडीसह दरीत उतरायला सुरुवात केली. बरीचशी ठिकाणे गाडीने चक्राक्रांत केल्यानंतर तिला जरा विश्रांती देऊन पाय मोकळे करायला ‘गोल्डन कॅन्यन’मध्ये शिरलो. ब्लॅक माऊंटनच्या पोटातली ही सात-आठ फुटी रुंद घळ नावाला शब्दश: जागणारी होती. दुपारच्या रणरणत्या उन्हात तिचे सगळे कोपरे सोनेरी रंगाने उजळून निघाले होते. घळ म्हटले की कधी काळी डोंगऱ्याच्या अंगाखांद्यावर खेळणारी नदी आणि तिने जातायेता केलेली दगडांची कापाकापीच दिसायला लागते. इथे त्या बयेने मुळात तिरपेतारपे झालेले दगड रीतसर कापून काढले होते आणि त्यात असंख्य लहानमोठी जीवाश्मे उघडय़ावर आणली होती. मी या जीवाश्मांच्या भानगडीत शिरणार याची थोडी कुणकुण मंडळींना लागताच त्यांनी मला बरोब्बर वेळेला बाहेर काढलेच; तसेही दुपारी दोनच्या टळटळीत उन्हात, ३५ अंश फॅरनहाइटला अजून भाजून निघण्यापेक्षा काढता पाय घेणे गरजेचेच होते. तेव्हा बराचसा ट्रेल पूर्ण करून माघारी परतलो आणि ‘आर्टस्टि ड्राइव्ह’वर गाडी पळायला लागली. नऊ मलांचा हा एकेरी मार्ग वळसे घेत, चढउतार करत डेथ व्हॅलीच्या सगळ्यात रंगीबेरंगी भागामधून चक्कर मारून आणतो. यातली सगळ्यात मोठी कडी म्हणजे इथला ‘आर्टस्टिस् पॅलेट’ नावाचा भाग. एखाद्या चित्रकाराच्या रंगफळीला लाजवेल इतक्या हिरव्या, गुलाबी, जांभळ्या, केशरी, तपकिरी, पिवळ्या, लाल रंगांच्या असंख्य छटा! एकच डोंगर जणू विविध रंगांचा कॅलेडिओस्कोपच, पण हा कॅलेडिओस्कोप फिरवण्याऐवजी तुमची नजरच फिरवा आणि डोळ्याच्या वेगवेगळ्या कडांना वेगवेगळे रंग साचतात की नाही ते बघा! निसर्गाचे इतके खुले आव्हान! आपण तर बुवा सपशेल हरलो या ठिकाणी. त्या अलबेल्या रंगछटा नजरेत भरून घेताना ते रंग कशाने उमटले असतील असा भूशास्त्रीय विचारही मनात डोकावला नाही! या वेळी मात्र मी काही शिकवणी देत नाही हे पाहून मित्रमंडळी चांगलीच धास्तावली, तुला ‘तुला तापबिप आलाय की काय!’ वगरे टिंगल करून मोकळी झाली!

डेथ व्हॅली भेटीचा कळस गाठायचा होता ‘बॅडवॉटर बेसिन’ नामक समुद्रसपाटीखाली २८२ फुटांवर असलेल्या तळ्यात! हेच ते ‘डांटेज् व्ह्य़ू’वरून दिसणारे अमरगोसाचे खोरे आणि त्याला अगदी खेटून उभा असलेला तोच तो ११ हजार फुटांचा ब्लॅक माऊंटन! दोन्ही-तिन्ही बाजूंनी असलेल्या उत्तुंग डोंगरांच्या बेचक्यातले ‘बॅडवॉटर बेसिन’ म्हणजे जगातल्या एका सर्वोत्कृष्ट मिठाच्या पठाराचा (सॉल्ट फ्लॅट) चा नमुना आहे. हे मीठ दुसरेतिसरे काहीही नसून आपण दररोज खातो ते टेबल सॉल्ट, सोडिअम क्लोराईड! अमरगोसासारख्या अतिशय कमी पावसाच्या प्रदेशात नद्या-सरोवरे संपूर्णत आटून जातात आणि मागे उरते ते फक्त मीठ! या अशा भागात बाष्पीभवनाचा वेग विलक्षण असतो, अर्थात ही बाष्पीभवनाची प्रक्रिया अव्याहतपणे चालू राहायला हजारो वष्रे पोषक वातावरण लाभले तरच अशा दहा फूट खोलीच्या विलक्षण रचना तयार होतात! एवढी रुंद रचना तयार व्हायला एक प्रक्रिया सदोदित घडणे गरजेचे असते आणि ती म्हणजे या भागात दर पावसाळ्यात नव्याने होणारा पाण्याचा रतीब. संपूर्ण डेथ व्हॅलीत पाऊस पडतो असा हा एकमेव भाग. त्यामुळे सालाबादप्रमाणे दीड इंचाचा पाऊस पडला की मिठाचे वरचे थर तात्पुरते विरघळून लगोलग नवे पांढरेशुभ्र स्फटिक तयार होतात. पावसानानंतर काही काळ पाणी साचून राहते, पण इथले मीठ खाण्यायोग्य असले तरी पाणी मात्र पिण्यायोग्य नसते, म्हणूनच त्याला ‘बॅड’वॉटर संबोधले जाते. मात्र हे बॅडवॉटर बेसिन समुद्रसपाटीच्या इतक्या खाली का याला अजून तरी उत्तर नाही. डेथव्हॅलीचा हा भाग पश्चिम गोलार्धातील दुसरा सगळ्यात खोल भाग म्हणून गणला जातो. अशा विलक्षण वेगळ्या ठिकाणी गेल्यावर निसर्गापुढे खुजे वाटावे याची खास तरतूद ‘नॅशनल पार्क’वाल्यांनी करून ठेवलीय. त्याला शेजारच्या उत्तुंग ब्लॅक माऊंटनवर ‘सी लेव्हल’ असे लिहून ‘आप बिल्कुल पानी में नहीं हो!’ म्हणणारी ती पाटी आपल्याला जमिनीवर पाय रोवायला अधिक भाग पडते हे निश्चित. तशा त्या जड पावलांनी या ‘लॅण्ड ऑफ एक्सट्रीम्स’चा निरोप घेणे खरोखरच जड गेलं.

(छायाचित्र सौजन्य – दारियो कपासो, सिद्धार्थ धोमकर)