02 March 2021

News Flash

देवी नवदुर्गा

नवदुर्गा ही देवी मूळची गोव्यातील गावशी येथील.

00-navratri-logo-lpनवदुर्गा ही देवी मूळची गोव्यातील गावशी येथील. नंतर ती कोकणात सावंतवाडीजवळ कन्याळ रेडीज इथं स्थापन झाली.

रेडी हे सावंतवाडीच्या नैर्ॠत्येला असलेले गाव. श्रीदेवी नवदुर्गा देवस्थान हे रेडी गावाच्या कन्याळे वाडीत आहे. तेरेखोल किल्ला इथून जवळच आहे. देवी नवदुर्गा हे पार्वतीचे रूप मानले जाते. ती बऱ्याच गौडसारस्वत ब्राह्मणांची तसंच इतर अनेकांची कुलदेवता आहे.

देवी नवदुर्गेचे भक्त महाराष्ट्रात वेंगुर्ला, रेडी, मुंबई, पुणे येथे तसंच गोवा व कर्नाटकात आहेत. नवदुर्गा हे महिषासुरमर्दिनीचे रूप आहे. ही देवी मूळची गोव्यातील गावशी गावातील! पण सोळाव्या शतकात गोव्यातील पोर्तुगीजांच्या छळामुळे त्या वेळच्या महाजन व भक्त मंडळींनी देवीला  वेंगुर्ले रेडी येथे नेऊन तिची स्थापना केली. तेव्हापासून गेली साडेचारशे र्वष ही देवी रेडी गावात आहे. नवदुर्गेची आणखी काही मंदिरे गोव्यात मडकई, कुंडई, बोरी, पैंगीण, पाळी, अद्कोलाना, सुरला येथे आहेत.

गोव्यात नवदुर्गेचे नवव्या शतकापासून अस्तित्व होते असे सांगितले जाते की सोळाव्या शतकात पोर्तुगीजांच्या अत्याचारांनी भयभीत होऊन त्यावेळच्या गावस्कर तसंच कामत मंडळींनी ती मूर्ती रातोरात वेंगुर्ले येथे नेऊन स्थापन करायचे ठरवले. त्यासाठी मूर्ती घेऊन मार्गक्रमण करत असताना विश्रांतीसाठी मंडळी रेडी गावी थांबलेली असताना मूर्ती खाली जमिनीवर ठेवली. अशी आख्यायिका सांगितली जाते की विश्रांतीनंतर मूर्ती उचलायला गेलेल्यांच्या लक्षात आले की मूर्ती जागेवरून हलेना आणि उचलणेही अशक्य झाले. हा काय प्रकार आहे म्हणून भाविकांनी रेडी ग्रामदेवीला कौल लावला. तेव्हा समजले की देवी पुढे (वेंगुल्र्यास) जाण्यास तयार नाही. याच गावी स्थापना व्हावी अशी तिची इच्छा आहे. नंतर कन्याळ वाडीत भक्तांनी जागा खरेदी करून तिचे भव्य मंदिर उभारले आणि मूर्तीची विधिवत स्थापना केली. आजतागायत देवी या कन्याळ रेडी गावात आहे.

मूर्तीचे स्वरूप

श्रीनवदुर्गा देवीचे स्वरूप अष्टभुजा महिषासुरमर्दिनीचे आहे. तिच्या हातात शंख, चक्र, गदा, पद्म, त्रिशूल, भाला ही आयुधे असून चौथ्या हातात महिषासुराचे शिर आहे. खालील बाजूस रेडा आहे. मूर्ती काळ्या पाषाणाची आहे. गाभाऱ्यात देवीच्या बाजूस कशी कल्याणी ब्राह्मण, जैन ब्राह्मण वगैरेंसह देवता आहेत. मंदिराच्या मुख्य दरवाज्याच्या डाव्या बाजूस बाराचा पूर्वस हा देव आहे. देवीकडे सांगणे केल्यानंतर या पूर्वसकडे सांगणे करावे लागते. या दोन्ही देवतांना रोज महानैवेद्य असतो. देवीचे सेवेकरी कन्याळ गावात राहतात. वर्षांतून चार वेळा देवीचा पालखी सोहळा उत्सव असतो. त्यावेळी देवीस तसंच पूर्वसास अलंकारांनी सजवले जाते. देवीची मूर्ती छोटीशी पण देखणी आहे. वर्षभर या देवळात विविध उत्सव होतात त्यातील सर्वात प्रमुख उत्सव म्हणजे माघ महिन्यातील नवमीला भरणारी जत्रा. तसेच दसरा नवरात्रातही उत्सव असतो. त्यावेळी पालखी काढतात. सर्व ठिकाणचे भक्त जत्रेच्या वेळी जमतात.

या देवीचे प्रमुख महाजन म्हणजे कामत व गावस्कर ही मंडळी. गोव्यातील गावशी गाव मूळचे असल्यामुळे हेच कामत पुढे गावस्कर या नावाने ओळखले जाऊ लागले.

सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील वेंगुर्ले तालुक्याच्या दक्षिणेस रेडी हा निसर्गरम्य गाव गोव्यापासून अगदी जवळ आहे. हा परिसर सुंदर समुद्रकिनारा, नारळी-पोफळीच्या बागा, काजू व इतर झाडांनी संपन्न आहे. पूर्वीच्या काळी रेडीला अतिशय महत्त्व होते. रेडीला पूर्वी रेडी पटणं हे नाव होते व ते एक महत्त्वाचे बंदर होते. पर्यटन जिल्हा घोषित केल्यापासून सिंधुदुर्ग जिल्ह्य़ाचे महत्त्व वाढले आहे व पर्यटकांचा ओघही वाढला आहे. स्वच्छ समुद्रकिनारे, ऐतिहासिक यशवंतगड किल्ला, गणपती, माउली मंदिर व नवदुर्गा देवस्थान हे पर्यटकांचे आकर्षण झाले आहे.

रेडीला यायचे झाल्यास गोवामार्गे किंवा वेंगुर्ले सावंतवाडीपासून येता येते. जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे सावंतवाडी. विमानाने यायचे झाल्यास गोव्याचा दाबोली विमानतळ जवळ आहे. सावंतवाडीपासून साधारण २५ किमी अंतरावर रेडी आहे. बसची व्यवस्था सर्व ठिकाणांहून आहे.
गिरीश गावस्कर – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2016 1:22 am

Web Title: devi navdurga 2
Next Stories
1 मुलाखत : दिग्दर्शनासाठी संकलन शिकले
2 स्मरण : आगळावेगळा नेता
3 संस्कृती : भारत नागपूजकांचा देश
Just Now!
X