04 July 2020

News Flash

मूर्तिमंत देवी

पुराणांमध्ये देवीच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत.

नवरात्री विशेष
पुराणांमध्ये देवीच्या पराक्रमाच्या अनेक कथा आहेत. या कथांवरून साकारलेली शिल्पकला विविध मंदिरांवर बघायला मिळते. या देवीप्रतिमा साधारण सारख्याच दिसतात. पण त्यातल्या काही देवीप्रतिमा मात्र त्यांच्या खास वैशिष्टय़ांमुळे आपले लक्ष वेधून घेतात.

शक्तीची उपासना आदिम काळापासून जगभर सुरू आहे. तिचे स्वरूप वेगवेगळे असेल, तिची नावे वेगवेगळी असतील, परंतु शक्ती, सामथ्र्य यांचे पूजन सर्वत्र लोकप्रिय आहे. शक्तिपूजेला कोणतेही भौगोलिक बंधन नाही. जगातील सर्वच संस्कृतींमध्ये शक्तिपूजा प्रकर्षांने दिसते. स्त्रीदेवतांची पूजासुद्धा मानववंशसातत्य आणि वंशवृद्धी तसेच सामथ्र्यवृद्धी यांकरिता आवर्जून केली जायची. महाराष्ट्रातही देवीची आणि शंकराचीच मंदिरे सर्वाधिक आढळतात. प्रत्येक कुटुंबाची एक कुलदेवता देवीरूपात असतेच असते. त्यांचे कुळधर्म, कुळाचार हे या देवतेशी निगडित असतात. इतिहासात कुषाण राजांच्या नाण्यांवर विविध रूपांतील देवींचे अंकन आपल्याला पाहायला मिळते. ग्रीक राजांच्या नाण्यांवरसुद्धा ती ‘ओर्दोक्शो’च्या आणि ‘नना’च्या रूपात दिसते. लक्ष्मीशी खूपच साधम्र्य असलेल्या ओर्दोक्शो या देवीमुळे शक्तिपूजेचे भारताबाहेरील स्वरूप लक्षात येते. राजा समुद्रगुप्ताच्या नाण्यावर हातात निधिशृंग असलेली देवी बघायला मिळते. लक्ष्मीशी जवळीक असलेली ही देवी आणि तिची उपासना पूर्वीपासून होती हे यावरून स्पष्ट दिसून येते. भारतामध्ये तर शक्तीची पूजा ही पार्वतीच्या स्वरूपाशी निगडित असल्याचे दिसते. मग दुर्गा, गौरी, काली, महिषासुरमर्दनिी यांची उपासना असो, किंवा चौसष्ट योगिनींचे मंदिर असो, वा बंगालमध्ये प्रसिद्ध असलेली दुर्गापूजा असो. दुष्टांच्या निर्दालनासाठी सदैव तत्पर असलेली देवी आपल्याला पाहायला मिळते.

देवीची अनेक रूपे आपल्याला भारतभर दिसतात. तिच्याशी अनेक कथा निगडित असतात. पुराणांमध्ये देवीच्या पराक्रमाची असंख्य वर्णने वाचायला मिळतात. अशा अनेक कथा विविध ग्रंथांमधे वाचायला मिळतात. या कथांवरून तयार झालेली शिल्पकलासुद्धा आपल्याला विविध मंदिरांवर बघायला मिळते. विविध रूढी, परंपरा, नवससायास हे या देवतेशी जोडले गेले आहेत. खरंतर देवी या विषयावर अनेक खंडांचे ग्रंथ लिहिता येतील. देवीच्या मनोहर रूपाची मोहिनी शिल्पकारांना पडणे साहजिकच होते. या थोर कलाकारांना तत्कालीन राजसत्तांचे मोठे पाठबळ मिळाल्यामुळे त्यांनी देवीच्या विविध रूपांची शिल्पे घडवली. मूíतरूपाने देवीची पूजा होत असली तरी देवीची तांदळा या स्वरूपात उपासनाही आपल्याकडे मोठय़ा प्रमाणात रूढ झालेली दिसते. अंबाजोगाई इथली योगेश्वरी हे या उपासनेचे मूíतमंत उदाहरण म्हणता येईल. प्रजनन आणि सुफलन याचे प्रतीक असलेली लज्जागौरीची मूर्ती ही तर अत्यंत आगळीवेगळी मूर्ती म्हणावी लागेल. स्त्रीच्या योनीची पूजा आणि तिची उपासना ही आपल्या देशात विविध ठिकाणी केलेली आजही बघायला मिळते. गुवाहाटी इथली कामाख्या देवी हे योनीचे प्रतीक म्हणूनच पुजली जाते. त्याचप्रमाणे बदामी आणि आलमपूर इथे असलेली लज्जागौरीची उपासना हेदेखील योनीच्याच पूजेचे स्वरूप आहे. जीवसृष्टीची उत्पत्ती जिथून झाली त्याची देवीरूपाने पूजा करण्याची थोर परंपरा आपल्याला प्रकर्षांने दिसते. दक्षिण कोंकणात सातेरी या नावाने पुजली जाणारी देवी म्हणजे प्रत्यक्षात एक वारूळ असते. वरीलप्रमाणेच वारूळ हेसुद्धा योनीचेच प्रतीक समजले गेले आहे. नाग हा पुरुषतत्त्वाचा प्राणी आणि त्याचा अर्थातच वारुळाशी असलेला संबंध यातून सातेरी देवीची उपासना रूढ झाल्याचे अभ्यासक सांगतात. त्यामुळे कोंकणात त्या वारुळाचीच पूजा सातेरीदेवी म्हणून केली जाते. अशी अनेक चित्रविचित्र वैशिष्टय़े आपल्या देशात बघायला मिळतात. विविध राजवटींनी या देवीस्थानांना वर्षांसने दिली, इनामे दिली, त्यांची पूजाअर्चा नियमित व्हावी याची काळजी घेतली. गावोगावी नुसत्या पाषाणरूपात असलेल्या सटवाई, भराई, पावणाई अशा देवींपासून ते अगदी सुबक शिल्पकाम केलेल्या मंदिरात स्थित असलेल्या देवींपर्यंत विविध देवीमूर्तीची आपल्याकडे रेलचेल आहे. या चराचरात अस्तित्वात असलेली देवी आपल्यासमोर मूíतरूपात येऊन उभी राहते. साधारणपणे देवीप्रतिमा सर्वत्र सारख्याच दिसतात, परंतु काही प्रतिमा मात्र त्यांच्या खास वैशिष्टय़ांमुळे आपले लक्ष वेधून घेतात.

सरस्वती

विद्य्ोची देवता असलेल्या सरस्वतीच्या मूर्ती तुलनेने फार कमी प्रमाणावर दिसतात. सरस्वतीची स्वतंत्र मंदिरे तर अगदीच दुर्मिळ म्हणायला हवीत. वीणावादन करणारी, हंसावर अथवा मोरावर आरूढ असलेली देवी सरस्वती ही ब्रह्मा, विष्णू यांच्यासोबत दाखवली जातेच, पण काही ठिकाणी ती गणपतीच्या सोबतही दाखवली जाते. एकटय़ा सरस्वतीच्या स्वतंत्र आणि अत्यंत देखण्या अशाही मूर्ती आहेत, त्यातलीच एक म्हणजे हळेबिडूच्या मंदिरावर असलेली, नृत्य करणारी सरस्वती. अत्यंत आकर्षक आणि ठसठशीत सरस्वती होयसळेश्वर मंदिरावर आहे. दहा हात असलेली ही सरस्वती त्रिभंग स्थितीत दाखवली आहे. तिच्या हातात अक्षमाला, परशू, स्रुक, पुस्तक, मातुलुंग असून काही हात हे नृत्यमुद्रेत दाखवले आहेत. देवीचा मुकुट आणि कमरेची वस्त्रे अत्यंत सुंदर आहेत. पायाशी हंस असून शेजारी वादक विविध वाद्यं वाजवताना दाखवले आहेत. विद्य्ोची ही देवता नृत्याचीसुद्धा अधिष्ठात्री आहे असेच जणू काही शिल्पकारांना सुचवायचे असावे.

अशीच तितकीच सुंदर दुसरी देवी मराठवाडय़ात औंढय़ा नागनाथच्या जवळ राजापूर गावी आहे. एका मंदिराच्या बाजूला ही मूर्ती ठेवलेली आहे. उभ्या त्रिभंग अवस्थेत असलेली ही देवी निव्वळ देखणी आहे.

 गजलक्ष्मी

कमलासनावर बसलेली देवी, तिच्या दोन बाजूंना दोन उभे हत्ती, त्यांच्या सोंडेमधे पाण्याने भरलेल्या दोन घागरी, ते हत्ती घागरीमधले पाणी देवीच्या डोक्यावर ओतत आहेत असे शिल्प आपल्याला अनेकदा बघायला मिळते. हिलाच अभिषेकलक्ष्मी अथवा गजलक्ष्मी असे संबोधले जाते. लक्ष्मी, हत्ती ही संपत्ती, ऐश्वर्याची प्रतीके मानली गेली आहेत. तद्वत लक्ष्मीचा पृथ्वीशी आणि हत्तींचा मेघाशी संबंध जोडलेला बघायला मिळतो. मेघांच्या द्वारे धरतीला केलेला जलाभिषेक हेसुद्धा या मूर्तीमधून कलाकारांना दाखवायचे असते. गजलक्ष्मीच्या सुंदर मूर्ती आपल्याला विविध ठिकाणी बघायला मिळतात. त्यातली नितांतसुंदर आणि त्रिमितीचा भास करून देणारी भव्य अशी मूर्ती वेरुळच्या कैलास लेण्याच्या प्रवेशापाशीच आहे. कैलास लेण्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला अत्यंत भव्य, देखणे असे गजलक्ष्मीचे शिल्प सामोरे येते. इथे बसलेल्या देवीच्या डोक्यावर हत्ती पाण्याचे कलश रिते करताहेत, देवी एका जलाशयात फुललेल्या कमळावर बसलेली आहे आणि त्या जलाशयात निर्माण होणाऱ्या लाटासुद्धा या प्रतिमेत दाखवलेल्या आहेत. त्या लाटांमुळे त्या शिल्पाला त्रिमितीचा भास निर्माण होतो. इतके देखणे शिल्प क्वचितच दुसरीकडे असेल.

गडचिरोली जिल्ह्य़ातल्या मरकडी इथल्या मंदिरावरसुद्धा गजलक्ष्मीचे असेच सुंदर शिल्प पाहायला मिळते. कोंकणात ही शिल्पे आश्चर्य वाटावं एवढय़ा मोठय़ा प्रमाणावर बघायला मिळतात. कोंकणात गजलक्ष्मीला ‘भावई’ असे म्हटले जाते. म्हणजे मूर्ती तीच, पण तिचे नाव भावई देवी. सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात गोठोस या गावी या देवीचे अतिशय सुबक आणि आकर्षक शिल्प मंदिरात ठेवलेले आहे. तसेच गोव्यातसुद्धा वळवई या गावाची ग्रामदेवता म्हणून याच भावईची अतिशय सुंदर मूर्ती बघायला मिळते. कोंकणात अनेक मंदिरांच्या आवारात हे गजलक्ष्मीचे शिल्प ठेवलेले दिसते. कदाचित जुन्या कुठल्या मंदिरावरील हे शिल्प आता मात्र ऊन-पाऊस झेलत उभे असते. याचे उदाहरण म्हणजे चिपळूण इथल्या भरव मंदिराच्या बाहेर असेच सुंदर शिल्प बाजूला ठेवलेले आहे.

पुणे जिल्ह्य़ातील प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी गजलक्ष्मीचे एक काहीसे भग्न शिल्प आहे, तसेच हरिश्चंद्रगडावर जाताना टोलार िखडीत गजलक्ष्मी आपल्याला दर्शन देते.

महिषासुरमर्दिनी

देवीचे हे रूप कलाकारांना, शिल्पकारांना सर्वात जास्त भावलेले रूप असावे असे वाटते. देवीच्या या रूपाच्या जितक्या मूर्ती घडवल्या गेल्या असतील तेवढय़ा क्वचितच दुसऱ्या कुठल्या रूपाच्या घडवल्या असतील. अतिशय आकर्षक, जोमदार, आवेशपूर्ण असे हे देवीचे रूप. दुष्टांचे निर्दालन करणारी देवी ही हातात विविध शस्त्रे घेऊन दाखवलेली असते. ती कधी अष्टभुजा असते तर कधी तिला त्याहूनही जास्त हात दाखवलेले असतात. तसेच तिने हातांत विविध आयुधे धारण केलेली असतात. एक पाय तिने महिषासुराच्या पाठीवर ठेवलेला असतो आणि हातातला त्रिशूल त्या महिषरूपी दैत्याच्या पोटात खुपसलेला असतो. अत्यंत देखणे, डौलदार आणि सुंदर असे हे देवीचे रूप नक्कीच सर्वाना भुरळ पाडणारे आहे. भारतात अनेक ठिकाणी महिषासुरमर्दनिीच्या विविध शैलींतील मूर्ती बघायला मिळतात. खजुराहो इथल्या मंदिरांवर खास चंदेल शैलीमधील मूर्ती पाहायला मिळतात, तर ऐहोळे इथल्या दुर्गा मंदिरावर खास चालुक्यांची छाप असलेली महिषासुरमर्दनिी बघायला मिळते. हळेबिडू इथल्या मंदिरांवर विविध अलंकारांनी नटलेली महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. होयसळ शैलीचे हे वैशिष्टय़च आहे की मूर्ती कोणतीही असो, तिला नखशिखांत दागदागिन्यांनी मढवून काढायचे. मग ती मूर्ती हिरण्यकशिपूला मारणाऱ्या नरसिंहाची असली तरीसुद्धा ती अलंकारांनी मढवलेली असते. मग महिषासुरमर्दनिी त्याला अपवाद कशी असेल? हळेबिडू इथल्या होयसळेश्वर मंदिरावर अशीच अत्यंत देखणी महिषासुरमर्दनिी कोरलेली आहे. देवीच्या हातात विविध आयुधे दाखवलेली आहेत, त्याचसोबत देवीचा चेहरा अतिशय आनंदी आणि प्रसन्न दाखवलेला आहे. राक्षसाचे निर्दालन ही देवीसाठी जणू काही अगदीच किरकोळ गोष्ट आहे असे भाव देवीच्या चेहऱ्यावर दिसतात.

चिपळूण इथली िवध्यवासिनी देवी म्हणजे महिषासुरमर्दनिीच होय. चालुक्य शैलीमधली ही मूर्ती अतिशय आकर्षक आणि देखणी अशी आहे. देवीचा आवेश आणि तिच्या चेहऱ्यावरचा राक्षसाप्रती असलेला राग अगदी स्पष्टपणे दिसतो. महिषासुरमर्दनिीच्या मूर्तीमध्ये देवीच्या पायाखाली महिषरूपी राक्षस दाखवलेला असतो. मात्र वेरूळ इथल्या कैलास लेणीमध्ये मानवी देह आणि रेडय़ाचे डोके असलेल्या राक्षसाशी देवीचे युद्ध कोरलेले आहे. ही एक काहीशी वेगळी मूर्ती इथे पाहायला मिळते. अगदी अशीच मूर्ती दक्षिणेत महाबलीपुरम येथेही आहे.

कलाकारांची अत्यंत आवडती अशी ही मूर्ती महाराष्ट्रातसुद्धा अनेक मंदिरांत तसेच मंदिराच्या बािभतींवर हटकून बघायला मिळते. महिषासुरमर्दनिी ही दुग्रेचे म्हणजेच पार्वतीचे रूप समजले जात असल्यामुळे तिची शैव पंथाशी जवळीक असणे साहजिक आहे. त्यामुळे अनेक शिवमंदिरांवर महिषासुरमर्दनिीची मूर्ती अगदी आवर्जून कोरलेली असतेच. सुडौल, देखणेपणा, उग्रभाव, जोमदार आवेश असे सर्व घटक या मूर्तीमध्ये ओतप्रोत भरलेले बघायला मिळतात.

हरगौरी

पार्वती ही कधी उमा असते तर कधी ती गौरी असते. तिच्या या रूपांतील फरक मूर्तीमध्ये बघायला मिळतो. मूíतकारांनी अतिशय कौशल्याने आणि नेमकेपणाने हा फरक दाखवलेला आहे. जेव्हा पार्वती ही गौरी रूपात दाखवायची असते तेव्हा तिच्या पायाशी तिचे वाहन म्हणून गोधा किंवा घोरपड आवर्जून दाखवली जाते. घोरपड चिवटपणासाठी प्रसिद्ध आहे. एखाद्या ध्येयाच्या प्राप्तीसाठी कठोरातील कठोर तप करण्याचे सामथ्र्य हे घोरपडीच्या रूपाने दाखवले जाते. शिवाच्या प्राप्तीसाठी पार्वतीने अशीच घोर तपश्चर्या केलेली होती. तिचा हा चिवटपणा, गोधेच्या रूपात दाखवला जातो. रूपमंडन या ग्रंथात वर्णन केल्याप्रमाणे म्हणजे ‘गोधासना भवेत् गौरी’ या वचनानुसार गौरी ही गोधासना, चार हात, तीन डोळे, आणि आभूषणांनी युक्त असावी असे म्हटले आहे. गौरी कधी घोरपडीवर उभी असल्याचेही दाखवले जाते. अशीच एक सुंदर आणि देखणी हरगौरी लातूर जिल्ह्यातल्या निलंगा गावातील नीलकंठेश्वर मंदिरात पाहायला मिळते. निलंगा येथील नीलकंठेश्वर मंदिर हे त्रिदल पद्धतीचे मंदिर आहे. मंदिराच्या बाह्यंगावर सूरसुंदरींच्या मोहक प्रतिमा पाहायला मिळतात. मुख्य गर्भगृहात शिविपडी असून उजवीकडील गर्भगृहात उमामहेश्वर आिलगन मूर्ती दिसते. शिवाच्या डाव्या मांडीवर देवी बसलेली असून शिवाचा डावा हात तिच्या डाव्या खांद्यावर ठेवलेला दिसतो. परंतु इथे एक अजून वैशिष्टय़ आहे. ते म्हणजे शिव आणि पार्वती ज्या पीठावर बसलेले दाखवले आहेत त्याच्या पायाशी एका घोरपडीचे शिल्प कोरलेले आहे. शंकर व गोधासना पार्वती अशा या निलंग्यातील प्रतिमेला शिवपार्वती असे न म्हणता हरगौरी प्रतिमा असे संबोधले जाते. शिव म्हणजे हर आणि पार्वतीची होते गौरी. या अशा हरगौरी प्रतिमा खूपच दुर्मिळ आहेत. या अत्यंत देखण्या प्रतिमेवर दक्षिण भारतातल्या शिल्पकलेची छाप पडल्याचे जाणवते. िहदू विवाह पद्धतीत गौरीहराची पूजा करण्याचा विधी प्रामुख्याने केला जातो. त्यामागेदेखील घोरपडीच्या चिवटपणाचेच तत्त्व सांगितले आहे. पती-पत्नींनी एकमेकांशी एकनिष्ठ राहावे हे या विधीमधून सुचवायचे असावे. तत्त्वज्ञानाचा मूíतकलेवर तसेच समाजजीवनावर पडलेला प्रभाव इथे प्रकर्षांने जाणवतो. अशीच हरगौरीची एक सुंदर प्रतिमा हळेबिडू इथल्या होयसळेश्वर मंदिरावर आपल्याला बघायला मिळते.

विष्णूच्या शक्ती -अन्वा

कोणत्याही देवाची शक्ती जर मूíतरूपात दाखवायची असेल तर ती देवता स्त्रीरूपात दाखवली जाते. जसे पुण्याजवळ असलेल्या भुलेश्वरला गणेशाची शक्ती जिला गणेशिनी किंवा वैनायकी असे संबोधले जाते, ती प्रतिमा म्हणजे स्त्रीरूपात दाखवलेला गणपती आहे. भाषाशास्त्रानुसार शक्ती हा स्त्रीिलगी शब्द येतो आणि हे वाचणाऱ्यालासुद्धा लगेच समजते. परंतु मूíतशास्त्रानुसार जर शक्ती दाखवायची असेल तर त्या संबंधित देवाची स्त्रीरूपातील प्रतिमा दाखवली जाते. विष्णूच्या शक्तींचे असेच मूíतरूपातील अत्यंत सुंदर अंकन आपल्या शिल्पकारांनी मंदिरावर करून ठेवलेले आहे. हे मंदिर महाराष्ट्रातच असून ते अजिंठा या जगप्रसिद्ध ठिकाणाच्या अगदी जवळ आहे. औरंगाबादपासून अजिंठय़ाला जाताना अंदाजे ८० कि.मी.वर गोळेगाव लागते. इथून उजवीकडे १० कि.मी. गेले की अन्वा हे गाव आहे. गावात महादेव मंदिर आहे ज्याला स्थानिक भाषेमध्ये मढ असे म्हणतात. गावाच्या किंचित बाहेर असलेले, अंदाजे १२ व्या शतकातील हे मंदिर मूळचे लक्ष्मीचे मंदिर असावे. मंदिराला अत्यंत सुंदर अशा पाच द्वारशाखा असलेले गर्भगृह असून दरवाजाच्या बाहेर त्रिभंग अवस्थेमधील वैष्णव द्वारपाल दिसतात. मूळ गाभाऱ्यात सध्या शिविपडी आहे. या मंदिरावर विष्णूच्या शक्तींचे शिल्पांकन पाहायला मिळते. चतुर्भुज विष्णूच्या हातात शंख-चक्र-गदा-पद्म अशी चार आयुधे असतात. या आयुधांचा त्यांच्या हातातील क्रम बदलला की गणिती शास्त्रानुसार २४ प्रकार होतात. त्या प्रत्येक प्रकाराला केशव, माधव, नारायण, अशी संध्येत येणारी २४ नावे आहेत. त्याचप्रमाणे विष्णूच्या या शक्तींचीसुद्धा कीर्ती, कांती, तुष्टी, पुष्टी, धृती अशा प्रकारे चोवीस नावे आढळतात. अग्निपुराण, पद्मपुराण, चतुर्वर्गचिंतामणी या ग्रंथांच्या आधारे ही माहिती मिळते. अन्वा इथल्या मंदिराच्या बाह्यभागावर विष्णूच्या चोवीस शक्तिप्रतिमा दिसतात. स्त्रीरूपातील या प्रतिमांच्या हातात विष्णूच्या हातातली आयुधे आहेत. त्या सगळ्या प्रतिमांच्या हातातील आयुधांचे क्रमसुद्धा बदलते आहेत. त्यामुळे त्या विष्णूच्या शक्ती समजल्या जातात. औरंगाबाद-अजिंठा रस्त्यावर असलेल्या अन्वा गावातले हे मंदिर विष्णूच्या शक्तींचे या स्वरूपातील एकमेव मंदिर असावे. आणि असे हे एकमेवाद्वितीय मंदिर आपल्या महाराष्ट्रात आहे ही खरंच अभिमानाची गोष्ट. या मूर्तीची काही प्रमाणात झीज झालेली आहे, तरीसुद्धा त्यांच्या अंगावरील अलंकरण, त्यांचा डौल, चेहऱ्यावरील भावमुद्रा केवळ पाहण्याजोग्या आहेत. वैष्णव शक्ती दाखवलेल्या मूर्तीच्या उपलब्धतेचे हे सौभाग्य महाराष्ट्राच्या इतर भागाला नक्कीच नाही. म्हणूनच हे मंदिर अवश्य भेट देण्याजोगे आहे.

हिंगुळजा देवी

अतिशय आगळीवेगळी आणि आजच्या पाकिस्तानातून आपल्याकडे आलेली एक देवी आहे, तिचं नाव हिंगुळजा देवी. हे वाचून काहीतरी भलतंसलतं लिहिलंय असं वाटलं ना? या दोन गोष्टींचा काहीतरी संबंध असेल तरी का अशी शंका मनात येणं अगदी स्वाभाविक आहे. पण गंमत अशी की ही गोष्ट अगदी खरी आहे. यात अजिबात अतिशयोक्ती नाही. खरंतर भारतात राजस्थान, कर्नाटक, महाराष्ट्र इथे या देवीची ठिकाणं आढळतात. महाराष्ट्रात कोल्हापूर जिल्ह्यतल्या गडिहग्लज या तालुक्याच्या ठिकाणी या िहगुळा देवीचे मंदिर आहे. पुराणातील प्रसिद्ध कथेनुसार राजा दक्ष याने आपल्या यज्ञात आपलाच जावई शंकराला बोलावले नाही. शंकराच्या पत्नीला, सतीला हा अपमान सहन न झाल्यामुळे तिने त्या यज्ञातच उडी घेतली. परंतु तिचे शरीर जळाले नाही. उद्विग्न झालेल्या शंकराने ते शरीर पाठीवर टाकले आणि तो मार्गक्रमण करू लागला. त्या शरीराचे विविध अवयव पृथ्वीवर अनेक ठिकाणी पडत गेले. ज्या ज्या ठिकाणी ते अवयव पडले त्या त्या ठिकाणी शक्तिपीठे तयार झाली. त्या कथेनुसार तिचे शिर जिथे पडले ते स्थान आताच्या पाकिस्तानात बलुचिस्तान या प्रांतात आहे. कराचीच्या वायव्येला सुमारे २५० कि.मी.वर बलुचिस्तान प्रांतातल्या मकरान टेकडय़ांच्या प्रदेशात िहगोळ नदीच्या काठावर एका गुहेमध्ये नानीबीबी किंवा िहगुळजादेवी हे िहदूंचे पवित्र क्षेत्र वसलेले आहे. तीच िहगुळा देवी गडिहग्लज इथे गुड्डाई देवी म्हणून आली. एका छोटय़ाशा टेकडीवर वसलेले हे मंदिर आहे. िहगुळा देवीचा गड म्हणून गडिहग्लज अशी या गावाच्या नावाची व्युत्पत्ती सांगितली जाते. गुजरातमधील सोनारकाम करणाऱ्या पराजीया सोनी जातीची ती कुलदेवता आहे. याच जातीमधील एक पुरुष हुकुमीचंद याला देवीने सुवर्ण कारागिरी शिकवल्याची कथा सांगितली जाते. तर स्थानिक समजुतीनुसार िहगाचा व्यापार करणाऱ्या बलुची व्यापारी मंडळींबरोबर त्यांची ही देवी गडिहग्लज या ठिकाणी आल्याचे सांगतात. ही व्यापारी मंडळी मोठी व्यापारी पेठ असलेल्या ठिकाणी गेली, तिथे त्यांनी त्यांची ही देवी प्रस्थापित केली. िहगुळा देवीचे अजून एक मंदिर मराठवाडय़ात तेर या ठिकाणी तर राजस्थानमध्ये िहगलाजगढ या ठिकाणी आहे. तर कर्नाटकातील गुलबर्गा जिल्ह्यतदेखील ही िहगुळादेवी असून तिथे तिला ‘चंदला परमेश्वरी’ अशा नावाने संबोधले जाते. मराठवाडय़ातील तेर हे एक प्राचीन व्यापारी केंद्र होते. या तेरच्या जवळसुद्धा एक िहगुळा देवीचे मंदिर आहे. मुळात ही देवी िहगाचा व्यापार करणाऱ्या मंडळींसोबत इकडे आली असे सांगितले जाते. त्यामुळे ह्या देवीचे स्थान आणि व्यापारी पेठ यांचे समीकरण नक्कीच जुळते. गडिहग्लज गावाला लागूनच असलेल्या छोटय़ा टेकडीवर हे मंदिर आहे. मंदिरामध्ये देवीची पाषाणरूपातली मूर्ती आहे. या डोंगरावरून खाली आले की भडगावमध्ये नाईक यांच्या घरात याच देवीचे ठाणे आहे. तिथे मात्र देवीची चार हाताची मूर्ती आहे. मूर्तीच्या हातात मशाल, कमल अशी आयुधे असून डोंगरावर असलेली गुड्डाई चालत या ठिकाणी आली असे सांगतात. विविध कथा आपल्याभोवती घेऊन जगदंबा निरनिराळ्या रूपात आपल्या आजूबाजूला वसलेली आहे. गरज आहे जरा आडवाट करून तिचे मुद्दाम दर्शन घेण्याची.

सप्तमातृका

मातृका या विविध देवतांच्या शक्ती असतात. याविषयीच्या विविध कथा आपल्याला पुराणांत आढळतात. त्यातली अंधकासुरवधाची कथा जास्त प्रसिद्ध आहे. अंधकासुर दैत्याच्या निर्दालनाच्या वेळी महादेवाने विविध देवांना आपल्या शक्ती देण्यास सांगितले. अंधकासुर दैत्याला एक वरदान लाभलेले होते. त्याच्या रक्ताचा थेंब जमिनीवर पडला तर त्यातून अजून एक दैत्य निर्माण होईल असे वरदान असल्यामुळे त्याचे रक्त जमिनीवर सांडू न देण्याची जबाबदारी या मातृकांनी घेतली. ब्रह्मा, विष्णू, काíतकेय, इंद्र, शिव, यम, रुद्र या देवतांनी आपापल्या शक्ती शिवाला मदतीसाठी दिल्या. त्या ब्रह्माणी, वाराही, कौमारी, इंद्राणी, माहेश्वरी, नारसिंही या नावांनी ओळखल्या जातात. या शक्तींनी मिळून शिवाला साहाय्य केले आणि दैत्याचा नायनाट केला अशा कथा पुराणांमधून येतात. या मातृकांना सप्तमातृका असे म्हटले जाते. त्यांच्या मूर्ती कशा असाव्यात याबद्दल सुप्रभेदागमतंत्र या ग्रंथात सविस्तर वर्णन दिलेले आहे. या देवतांचे स्वतंत्र मंदिर दिसत नाही तर मंदिरात यांचे पट्ट आढळतात. त्यांना सप्तमातृका म्हणतात. कधी कधी मंदिराच्या गर्भगृहाच्या दरवाजावर यांचा पट्ट आढळतो. वेरूळ इथल्या कैलास लेण्यांत यज्ञशाळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या ठिकाणी या सप्तमातृकांची भव्य अशी शिल्पे पाहायला मिळतात. यांच्या बरोबरच गणपती आणि काíतकेय किंवा वीरभद्राच्या मूर्तीसुद्धा कोरलेल्या असतात. यांच्या मूर्ती कोरताना त्या त्या देवतेची आयुधे त्यांच्या हातात दाखवतात, तसेच त्या मूळ देवाचे वाहन त्यांच्या मूर्तीच्या खाली दाखवलेले असते त्यावरून या मातृका कोण ते ओळखता येते. उदाहरणार्थ ऐन्द्री ही इंद्राची शक्ती त्यामुळे ती ऐरावत हत्तीवर बसलेली दाखवतात. याच न्यायाने इतर मातृका दाखवलेल्या असतात. बदामीचे चालुक्य राजे स्वतला या सप्तमातृकांचे भक्त समजत असत.

धर्मापुरी इथल्या किल्ल्यात या सप्तमातृकांचा सुंदर पट्ट किल्ल्याच्या तटबंदीमध्ये बसवलेला आहे. पूर्वी हा कुठल्या मंदिरावर शोभून दिसत असणार. परंतु मंदिर भग्न झाल्यावर याच्या नशिबी किल्ल्याची तटबंदी आली. परंतु अतिशय देखणा असा हा पट्ट आहे. तसेच कर्नाटकात केळदी इथल्या मंदिरातसुद्धा या सप्तमातृकांचा सुंदर पट्ट बघायला मिळतो. अनेक ठिकाणी या मूर्ती झिजलेल्या असतात. किंवा त्यांच्यावर प्रचंड प्रमाणात शेंदूर फासलेला असतो. या सात मातृका आणि गणपती व वीरभद्र मिळून नऊ मूर्ती होतात. त्यामुळे अनेकदा त्यांना नवग्रह म्हणून पूजले जाते. सप्तमातृकांची स्वतंत्र मंदिरे तशी दुर्मिळच. पण मंदिरांवर असलेले त्यांचे शिल्पांकन अत्यंत सुंदर आहे.

नृत्यमग्न सप्तमातृका – मुखेड

वैशिष्टय़पूर्ण सप्तमातृका असणारं अजून एक ठिकाण आहे ते म्हणजे नांदेड तालुक्यातील मुखेड गावचे महादेव मंदिर. या मंदिरावर आहेत अत्यंत दुर्मिळ अशा नृत्य करणाऱ्या सप्तमातृका. प्राचीन भारतीय समाजात मातृदेवतेची पूजा प्रचलित होतीच. शिल्पकारांना अर्थातच या सप्तमातृकांचे अंकन करण्याचा मोह झाला होता. एका ओळीमध्ये बसलेल्या या मातृका आणि त्यांच्या पायाशी असलेली त्याची वाहने असे शिल्प अनेक ठिकाणी पाहायला मिळते. परंतु मुखेडच्या महादेव मंदिराच्या बाह्यंगावर यातली प्रत्येक मातृका ही अत्यंत डौलदारपणे नृत्य करताना शिल्पित केलेली आहे. दुर्दैवाने यातील काही शिल्पांचे हात भंगलेले आहेत, तरीसुद्धा त्यांच्या शरीराचा डौल अत्यंत आकर्षक दाखवला आहे. नृत्य करताना शरीराला आलेला बाक आणि लयबद्धता त्या मूíतकारांनी इतकी अचूक दाखवली आहे की, प्रत्यक्ष नृत्याचा भास झाल्याशिवाय राहत नाही. त्या प्रत्येक मातृकांच्या पायाशी एक कमळाचे फूल असून त्यामध्ये त्यांचे वाहन शिल्पित केलेले दिसते. त्या वाहनावरून त्या मातृकांची ओळख पटते. नृत्यरत अवस्थेमधील या सप्तमातृकांच्या डोक्यावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. त्यांचे अधोवस्त्र मेखलेने बांधलेले असून वस्त्राचा सोगा दोन्ही पायामध्ये रुळताना दिसतो आहे. काही मातृकांच्या पायात तोडे आणि पैंजण यांसारखे अलंकारदेखील दिसतात. अत्यंत दुर्मिळ असा हा शिल्पठेवा आपल्या महाराष्ट्रात आहे ही खरेच अभिमानाची गोष्ट म्हणायला हवी.

श्री दुर्गादेवी-कुणकावळे

दुर्गा हे तर पार्वतीचेच रूप. तिच्या हातात विविध आयुधे असतात आणि ती अनेकदा सिंहवाहिनी असते. काहीशी उग्र असलेली दुग्रेची मूर्ती आपल्याला मराठवाडय़ात तेरच्या जवळ असलेल्या जागजी इथल्या मंदिरात दिसते. ती बसलेली दुर्गा आहे. दुग्रेची विविध अलंकारांनी घडवलेली उभी मूर्ती मालवणच्या जवळ असलेल्या कुणकावळे या गावी बघायला मिळते. दुर्गादेवीचे मंदिर आणि त्यापेक्षासुद्धा सुंदर असणारी देवीची अत्यंत सुडौल मूर्ती हे इथले खास आकर्षण आहे. अगदी आड असलेल्या गावात इतकी शिल्पजडित मूर्ती असेल यावर विश्वासच बसत नाही. गावाच्या उत्तर दिशेला गावकऱ्यांनी केलेला सुमारे एक कि.मी.चा रस्ता आपल्याला थेट दुर्गादेवी मंदिरापाशी आणून सोडतो. प्रत्यक्ष धर्मराजाने या देवीची स्थापना केली अशी ग्रामस्थांची श्रद्धा आहे. १९६१ साली झालेल्या वादळाचा तडाखा बसल्यामुळे या मंदिराचा जीर्णोद्धार करणे गरजेचे झाले. खास कोंकणी पद्धतीची सुंदर अशी दीपमाळ एका ओटय़ावर उभी आहे. मंदिरात भव्य सभामंडप बांधलेला आहे. आणि या मंदिरात अतिशय देखणी साडेचार फूट उंचीची दुर्गादेवीची उभी मूर्ती आहे. चतुर्भुज देवीच्या हातात तलवार, चक्र, त्रिशूळ ही आयुधे असून डाव्या हातात परळ आहे. पायाशी दोन्ही बाजूला सेविका दाखवल्या आहेत. मूर्तीवर वस्त्रप्रावरणे, दागदागिने, ठसठशीत कोरलेले आहेत. दंडामध्ये वाकी असून बाजूला मोर दाखवले आहेत. देवीच्या पायात खडावा आहेत. तिचा केशसंभार तर केवळ अप्रतिम आहे. देवीच्या पाठीमागे कोरलेली प्रभावळ फारच देखणी आहे. मूर्तीसमोर दगडी प्रसादपात्र आहे. अत्यंत मनोहारी अशी ही मूर्ती आडवाटेला असली तरी खास वेळ ठेवून पाहायला हवी. प्रसन्नवदना असलेली ही श्रीदुर्गादेवीची मूर्ती दगडामध्ये कोरून काढलेल्या इतक्या अलंकारांनी मढवलेली आहे की ते पाहून अचंबित व्हायला होते.

चौसष्ट योगिनी

योगिनी या शाक्त संप्रदायाच्या गौण देवता आहेत. त्यांना आवरण देवता असेसुद्धा म्हटले जाते. त्यांना पार्वतीच्या सख्या मानले गेले आहे. योगिनींची संख्या कोटय़वधी असल्याचे सांगितले असले तरी ६४ योगिनी प्रसिद्ध आहेत. योगिनीतंत्रात त्यांची उत्पत्ती, त्यांची शक्ती आणि त्यांच्या कथा दिलेल्या आहेत. दैत्य निर्दालनासाठी दुग्रेनी ६४ रूपे घेतली आणि त्यांच्या सर्वाच्या शक्तीनिशी दैत्याशी युद्ध केले आणि त्यात त्या दैत्याचा पराभव केला. या युद्धानंतर त्या योगिनींनी दुग्रेकडे याचना केली की स्मारक रूपाने त्यांना तिच्या जवळच स्थान मिळावे. दुग्रेने ते मान्य केले आणि त्या योगिनी दुग्रेच्या सर्व बाजूने स्मारक रूपाने वास्तव्य करून असतात अशी समजूत आहे.

दुसऱ्या एका कथेनुसार घोर नावाच्या राक्षसाचा वध करण्यासाठी दुग्रेने त्याच्याशी युद्ध मांडले. परंतु तिचा युद्धात विजय होईना म्हणून शंकराने सूक्ष्म रूपाने तिच्या शरीरात प्रवेश केला आणि तिची शक्ती शतगुणित केली. त्या वेळी दुग्रेचे रूप पाहता पाहता भयानक रौद्र झाले आणि त्यातून तेजस्वी, युयुत्सु, भयंकर गर्जना करणाऱ्या अशा योगिनी बाहेर पडल्या.

भारतात ६४ योगिनींची फक्त चारच मंदिरे आहेत. त्यातली २ ओडिशामध्ये आहेत. एक हिरापूरला आणि दुसरे रानीपूर-झरीयाल या ठिकाणी. मध्य प्रदेशात भेडाघाटला एक आणि खजुराहोला एक अशी ६४ योगिनींची मंदिरे आढळतात.

निसर्गरम्य ओडिशामध्ये विविध देवदेवता आणि त्यांची मंदिरे यांचीसुद्धा विपुलता आहे. इथल्या देवता संप्रदायांवर आणि त्यांच्या उपासनापद्धतींवर आदिवासी परंपरेची मोठीच छाप पडलेली दिसते. अत्यंत आगळ्यावेगळ्या देवता आणि उपासनापद्धती या भूमीमध्ये रुजलेल्या दिसतात. हिरापूर इथले ६४ योगिनी मंदिर वर्तुळाकार आहे. हे मंदिर इ.स.च्या ९ व्या शतकात ब्रह्म राजवटीमधील हिरादेवीने बांधल्याचे सांगतात. उघडय़ा आकाशाखाली असलेले ६४ कोनाडे म्हणजे हे मंदिर. मंदिराचं असं रूप निश्चितच वेगळं आहे. वालुकाश्म दगडात बांधलेलं हे वर्तुळाकार मंदिर वैशिष्टय़पूर्ण आहे. त्याच्या आतील बाजूला कोनाडे असून प्रत्येक कोनाडय़ामध्ये काळ्या रंगाच्या ग्रॅनाइट दगडात घडवलेल्या एकेका देवीची मूर्ती प्रतिष्ठापित केलेली दिसते. अशा ५६ मूर्ती या वर्तुळाकृती िभतीच्या आत असलेल्या कोनाडय़ात आहेत. मंदिराच्या मध्यभागी मनुष्याच्या डोक्यावर पाय दिलेल्या कालीदेवीची मूर्ती आहे. बुद्धीच्या मनावरील विजयाचे हे प्रतीक समजले जाते. तिथेच मध्यभागी एक चौथरा असून त्याला चंडी मंडप असे म्हणतात. या चंडी मंडपाच्या चारही बाजूंनी एकूण ८ योगिनींच्या मूर्ती बसवलेल्या आहेत. पूर्वी या चंडी मंडपावर महाभरवाची मूर्ती असल्याचे सांगितले जाते. वर्तुळाकार िभतीच्या आतील कोनाडय़ात असलेल्या ५६ आणि चंडी मंडपावरील ८ अशा ६४ योगिनी इथे दिसतात. ६४ योगिनींची पूजा ही तांत्रिक पूजा समजली जाते. योगिनी शक्यतो प्राणी, राक्षस किंवा माणसाचे मुंडके यावर उभ्या असलेल्या दाखवतात. शक्तीचा विजय यातून दाखवायचा असतो. या योगिनींच्या चेहऱ्यावर क्रोध, दुख, आनंद, सुख, समाधान, इच्छा असे विविध भाव दाखवलेले असतात.

बोलांगीर जिल्ह्य़ात असलेले रानीपूर-झरीयाल हे ठिकाणसुद्धा ६४ योगिनींच्या मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. ‘राष्ट्रीय महत्त्व असलेले ठिकाण’ असा दर्जा राज्य सरकारने या वास्तूला दिलेला आहे. या ठिकाणी मध्यभागी शिवपार्वती आिलगन मुद्रेत असून त्यांच्या सर्व बाजूंनी ६४ योगिनींच्या मूर्ती दिसतात. या सर्व योगिनी विविध नृत्यमुद्रेत दाखवलेल्या आहेत. हे या ठिकाणाचे सुंदर आणि वेगळे वैशिष्टय़ म्हणावे लागेल. यातल्या १३ मूर्ती आता दिसत नाहीत तर इतर काही भग्न झालेल्या आहेत. परंतु तरीही त्यांचे सौंदर्य मात्र अजिबात कमी होत नाही.

इथे जवळच २० मीटर उंचीचे ‘इंद्रलथ’ नावाचे एक विटांचे मंदिर असून, ते तत्कालीन ओडिशामधील सर्वात उंच विटांचे मंदिर समजले जाते.

या आगळ्यावेगळ्या मंदिराला ओडिशाच्या भटकंतीमध्ये मुद्दाम भेट द्यावी. देवदेवतांची मंदिरे आपण आवर्जून पाहतोच, परंतु एका वेगळ्या पंथाची, वेगळ्या तांत्रिक उपासनापद्धतीची मंदिरे तशी दुर्मिळ असतात. भुवनेश्वरपासून अगदीच जवळ असलेले आणि वेगळे स्थापत्य असलेले हे ६४ योगिनींचे मंदिर मुद्दाम बघितले पाहिजे.

स्कंद पुराणातल्या काशीखंडात या ६४ योगिनींची नावे दिली आहेत-

१) ब्राह्मणी २) कुमारी ३) वाराही ४) संकटी ५) रुद्राणी 6) किंकाली ७) कराली ८) काली ९) महाकाली १०) चामुंडा ११) ज्वालामुखी १२) कामाक्षा १३) भद्रकाली १४) दुर्गा १५) अंबिका १६) ललिता १७) गोरवी १८) सुमंगला १९) रोहिणी २०) कपिला २१) शूलकरा २२) कुंडलिनी २३) त्रिपुरा २४) कुरुकुल्ला २५) भरवी २६) चंपावती २७) वारसिंजी २८) निरंजना २९) हेमवती ३०) प्रेतासना ३१) ईश्वरी ३२) वैश्वानारी ३३) विनायकी ३४) यमघंटा ३५) सरस्वती ३६) तोतिला ३७) वैष्णवी ३८) वंदी ३९) संशनी ४०) पद्मिनी ४१) चित्रिणी ४२) वारुणी ४३) यमभगिनी ४४) सूर्यपुत्री ४५) सुशीतला ४६) कृष्णवाराही ४७) रक्ताक्षी ४८) कालरात्री ४९) आकाशी ५०) श्रेष्ठिनी ५१) जया ५२) विजया ५३) इमवती ५४) वागेश्वरी ५५) कात्यायिनी ५६) अग्निहोत्री ५७) चक्रेश्वरी ५८) महाविद्या ५९) ईशानी ६०) भवानी ६१) भुवनेश्वरी ६२) चक्रेश्वरी ६३) मोहरात्री ६४) थी देवी

ज्येष्ठा/अलक्ष्मी

विविध रोगांचा नाश करणाऱ्या देवीसुद्धा प्रसिद्ध आहेत. जसे शितलादेवी, मरीआई, गुडघेमोडी माता. विशिष्ट रोग झाल्यावर विशिष्ट देवतेची उपासना केली म्हणजे तो रोग बरा होतो हा समज अगदी प्राचीन काळापासून बघायला मिळतो. वर उल्लेख केलेल्या नांदेड जिल्ह्य़ातल्या मुखेड गावातील महादेव मंदिरात ही देवी बघायला मिळते. या मंदिरावर असणारी ज्येष्ठा अथवा अलक्ष्मी म्हणजे दुर्मिळ शिल्प आहे. महाराष्ट्रात ‘अक्काबाई’ म्हणून प्रसिद्ध असलेली ही देवी लक्ष्मीची मोठी बहीण होय. समुद्रमंथनाच्या वेळी दोघी बहिणींमध्ये ही प्रथम आली म्हणून हिला ज्येष्ठा हे नाव मिळाले. लक्ष्मीशी श्रीविष्णूने लग्न केले पण या मोठीचा हात धरायला कोणी तयार होईना. शेवटी कपिल मुनींनी तिच्याशी लग्न केले अशी कथा पुराणात आढळते. दक्षिण भारतात या ज्येष्ठेचे मोठे महत्त्व आहे. केरसुणी आणि कावळा ही तिची चिन्हे तर गाढव हे तिचे वाहन असते. रोगराई, मरीआई, यांची देवता असेही तिचे वर्णन काही ठिकाणी आलेले आहे. मुखेडच्या महादेव मंदिरावरील ज्येष्ठेची प्रतिमा चतुर्मुख असून उजव्या वरच्या हातात केरसुणी आहे. तर एका हातात सुरा, आणि एका हातात कपालपात्र धरलेले दिसते. कानात कुंडले तर डोक्यावर मुकुट घातलेला असून तिच्या डाव्या खांद्यावरून एक मुंडमाळा खाली लोंबते आहे. तिच्या शेजारीच तिचे वाहन गाढव दिसते आहे. अत्यंत दुर्मिळ असे हे शिल्प एक आगळेवेगळे नक्कीच आहे. अभ्यासक तर तिथे जातीलच, पण खरे तर सर्वानीच अशा आगळ्यावेगळ्या देवीचे दर्शन अवश्य घ्यायला हवे.

देवी आपल्या भक्तांना विविध रूपांत दर्शन देत आज वर्षांनुवष्रे उभी आहे. कधी ती बौद्धांची हरिती होते तर जैनांची अंबिका होते. वेरूळ लेणींत आम्रवृक्षाखाली बसलेल्या अंबिका या देवीची अतिशय सुंदर मूर्ती आहे. तिच्या शेजारी तिचे वाहन असलेला सिंहदेखील दाखवलेला आहे. आदिवासी जमातीमध्ये ती गावाच्या सीमेवरील एखाद्या गोल दगडाच्या स्वरूपात असते तर कधी ती एखाद्या लाकडाच्या ओबडधोबड मूर्तीच्या रूपात असते. गावाचे, वस्तीचे रक्षण करणारी ती गावदेवी होते. त्याचसोबत देवी ही विविध रोगांचा नायनाट करणारी म्हणूनही प्रस्थापित असते. मग ती सटवाई, मरीआई, अक्काबाई या नावांनी दिसते. देवी ही आई असल्यामुळे आपल्या मुलांचे सर्व आपत्तींपासून रक्षण करणे आणि त्यांचे कल्याण करणे हे तिचे कार्य कल्पिलेले आहे. देवी अज्ञानाचा अंधकार दूर करून भक्तांच्या आयुष्यात उजेड आणणारी देवता आहे. देवी या संकल्पनेची व्याप्ती खूप मोठी आहे. अनेक लोककथा, लोकगीते यातून ती वारंवार प्रकट होत असते. सर्वसामान्य जनतेला ती अत्यंत जवळची वाटणारी देवता आहे. प्रत्यक्ष आई असेच तिला संबोधन असल्यामुळे तिच्याशी असलेले नाते विलक्षण आहे. त्याच विलक्षण नात्यातून कलाकारांनी तिची एकापेक्षा एक अप्रतिम शिल्पे घडवली. आपल्या मनातील सर्व भावभावना या तिच्या रूपातून प्रकट केल्या. तिला नटवले, सजवले आणि पुन्हा तिच्याच समोर नतमस्तकही झाले. कोणी कलाकार आपल्या हातातल्या छिन्नी-हातोडय़ाने एखाद्या दगडाला देवीचा आकार देत असतो. निराकारातून तो आपल्या कलेच्याद्वारे देवीची मूर्ती घडवतो. आणि मग मूíतमंत देवी समोर उभी राहिल्यावर तिला म्हणतो, ‘‘या देवी सर्वभूतेषु मातृरूपेण संस्थिता, नमस्तस्य नमस्तस्य नमस्तस्य नमो नम:’’

संदर्भ:

भारतीय संस्कृती कोश- संपादन महादेवशास्त्री जोशी.
मूर्तिविज्ञान- डॉ. ग. ह. खरे.
भारतीय मूíतशास्त्र – नी. पु. जोशी.
वेरूळ दर्शन- डॉ. गो. बं. देगलूरकर
लज्जागौरी – रा. चिं. ढेरे
आशुतोश बापट – response.lokprabha@expressindia.com

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 15, 2017 1:08 am

Web Title: devi navratri utsav 2017
Next Stories
1 देवीमाहात्म्य : रचना, इतिहास आणि परंपरा
2 कुलदेवता
3 राजस्थानातील देवीची मंदिरे
Just Now!
X